"अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?" इतक्या लांबलचक नावाचा काल 16 जानेवारीला रिलीज झालेला मराठी चित्रपट मी आज कुमार पॅसिफिक मॉलमध्ये PVR ला पहिला. चांगले मराठी चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघितले पाहिजेत. आणि हो! हा चित्रपट जुन्या पुराण्या टिपिकल मराठी सासू सून छाप चित्रपटापेक्षा वेगळा आहे!
केदार शिंदे आणि टीम, तसेच कसलेले कलाकार आहेत म्हटल्यावर चित्रपट चांगलाच असणार हा माझा अंदाज खरा ठरला. पाहिल्या प्रसंगापासून चित्रपट पकड घेतो तो शेवटपर्यंत. सर्वांचाच अभिनय अतिशय उत्तम झालेला आहे.
या चित्रपटाची कथा वेगळी आहे. आधी कधीही न वाचलेली, पाहिलेली आणि ऐकलेली. त्याबद्दल लेखकांचे अभिनंदन! आयुष्यात सर्वच काही फील गुड नसतं, आयुष्यातील सगळ्याच उपकथनकांचं हॅपी एंडिंग नसतं, असे सांगून हा चित्रपट वास्तववादी टच देतो.
घाटकोपरच्या एका सोसायटीत वडिलांच्या फ्लॅटमध्ये (राजन भिसे, निर्मिती सावंत) रहाणारे दोन्ही नोकरी करणारे मुलगा आणि सून रहात असतात (नकुल घाणेकर, प्रार्थना बेहेरे).
सून वर्क फ्रॉम होम असते. सासू सुनेचे वारंवार खटके उडतात. त्यातील काही प्रसंग विनोदी तर काही गंभीर. शेवटी मुलगा सून वेगळे रहायचा निर्णय घेतात.
इथे कथेत एक खूपच अनपेक्षित ट्विस्ट येते. ती सांगता येणार नाही.
बरं, एक विचारतो! तुम्ही घाटकोपरला पूर्वी पावसाळ्यात घडलेली एक घटना वाचली आहे का? असो. जास्त सांगू शकत नाही. ही ट्विस्ट त्याच संदर्भात आहे. तो प्रसंग (नकुल घाणेकर आणि राजन भिसे यांच्यावर चित्रित झालेला) चित्रपटातील हाय पॉइंट आहे. अतिशय छान लिहिलाय.
त्या एका घटनेमुळे सासू सुनेचे आयुष्य एकदम बदलून जाते. पण त्यांच्यातील भांडणे काही कमी होत नाहीत.
त्यानंतर आणखी एक ट्विस्ट येते. त्या ट्विस्टनंतर कथा एक वेगळे वळण घेते.
बॅकग्राऊंड म्युझिक अतिशय जबरदस्त आहे. थिएटरमध्ये इमोशनल आणि थरारक सीनमध्ये ते खूपच परिणामकारक वाटते. चित्रपटाची निर्मितीमूल्ये खूप उच्च दर्जाची आहेत.
आधुनिक टेक्नोलॉजी कथेत बेमालूमपणे मिसळून जाते. जसे की, ऑनलाइन, वर्क फ्रॉम होम, लबाड लांडगे व्हॉट्सॲप ग्रुप आणि चॅट जिपीटी (AI चा वापर लोक जीवनातील महत्वाचे निर्णय घेतांना कसा करतात).
वडा पाव आणि पावभाजी हे पण या चित्रपटातील जणू महत्वाचे पात्र. पावभाजी खातांनाचा Anuual Gathering वाला विनोद पण खासच आहे. गौतमी पाटीलवर पण विनोद केलाय बरं त्यांनी.
मिक्सर चालवताना "साखर किती बारीक करू?" "तुझ्या इतकी!" हा पण जोक मस्तच. मोलकरणीवर चित्रित झालेला!!
विनोदांमध्ये बऱ्यापैकी नाविन्य आहे. प्रसंगानुरूप ते फिट होऊन जातात.
"दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे!" आणि "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे", ही गाणी पण झकास झालीत. छान वाटतात ऐकायला. "आलो होतो काही श्वासांसाठी फक्त!" या ओळी प्रसंगानुसार अगदीच चपखल बसतात.
एका पुलावर सासू सुनेचे विनोदी कन्फेशन प्रसंग आहे. भारी जमून आलाय.
शेवटी आणखी एक ट्विस्ट आहे.
निर्मिती सावंतने दगड उचलून वास्तवमधील संजय नार्वेकर (देढ फुट्याची) अक्टिंग केलीय: "एssss"
निर्मिती सावंतचा एक्टिंगच्या बाबतीत नाद करायचा नाय!
आणि प्रार्थना बेहेरेनी तर खूपच छान ऍक्टिंग केली आहे. मागेपण मी तिच्याबद्दल लिहिले होते की तिने आपला अभिनय, वर्षानुवर्षे चालणाऱ्या निरर्थक डेली सिरीयलमध्ये वाया घालवू नये. असो.
शेवटी हा चित्रपट बागबानच्या वाटेवर जातो की काय असे वाटताना "अर्धांगिनी, पूर्णांगिनी" वाला एक छान लिहिलेला डायलॉग त्या शक्यतेला पूर्णविराम देतो.
एकूण हा एक सहज हसवणारा आणि सहज रडवणारा फिफ्टी फिफ्टी चित्रपट आहे. सुंदर कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि संगीत. माझ्याकडून या चित्रपटाला पाच पैकी साडे चार स्टार.
छान परीक्षण. हा चित्रपट
छान परीक्षण. हा चित्रपट पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करिन. केदार शिंदे आवडते दिग्दर्शक आहेतच, आणि जोडीला निर्मिती सावंत.
निर्मिती या खूप कसलेल्या अभिनेत्री आहेत. मला त्यांचा "शुभमंगल सावधान" चित्रपटातील अभिनय खूप आवडला.
पिक्चरचं नाव आगगाडीसारखं आहे.
पिक्चरचं नाव आगगाडीसारखं आहे. आगगाडीच्या ठेक्यावर वाचलं नाव.
भोंडल्याची गाणि माहीती नाहीत, पण एक असंच काही तरी कानावर पडायचं. अगं अगं टिंब टिंब, काय म्हणता टिंब टिंब.
सासूबाई पुढे तोंडाला पंजा लावून आगीनगाडीची शिट्टी वाजवत पळताहेत आणि सूनबाई त्यांच्या पदराला धरून मागे मागे पळत आहेत असं चित्रं डोळ्यासमोर येत.
रिव्यू आवडला. आणि चित्रपट
रिव्यू आवडला. आणि चित्रपट सुद्धा आवडला.
निर्मिती आणि प्रार्थना बिहार दोघींची काम आवडली.
तिचा वकील मित्र एकदम ठोकळा वाटतो. त्या ऐवजी अजून कोणी बरं acting करणार घ्यायला हवं होतं.
सुरुवातीला मातीच्या चुली सारखा होतोय का असे वाटले. पण चित्रपट नंतर खूपच वेगळे वळण घेतो.
मध्यंतरानंतरचा काही भाग थोडा लांबण लावल्या सारखा वाटत असतानाच त्यांनी आवरता घेतला आहे.
मराठी मालिका कमी पडल्या
मराठी मालिका कमी पडल्या म्हणून काय हा चित्रपट केला असेल वाटलं पण परिक्षण वेगळं सांगतोय. नणंद, आत्या, नवऱ्याचा मित्र, सुनेची बहीण ही पात्रं नाहीत?
सासू सून केंद्रित आहे.
सासू सून केंद्रित आहे.
खर तर सासू सून नेहेमीची / टिपिकल नोक झोक ते दोन समदुःखी स्त्रिया हा प्रवास दाखवलाय.
प्रार्थना बेहरे खूप क्यूट दिसलीय:)
या चित्रपटाची एक रीळ पाहिली.
या चित्रपटाची एक रीळ पाहिली.
चित्रपट बघून सर्व बायका रडत आहेत.
मी ओटीटी वर बघेन.
पुरुष थिएटरमध्ये रडताना बरा दिसणार नाही
https://www.facebook.com/share/r/14SwaVM6KKZ/
(No subject)
ऋन्मेष उलट यावेळेस लेकीबरोबर
ऋन्मेष उलट यावेळेस लेकीबरोबर आई आणि बायकोलाही सोबत न्या एकदम म्हणजे जेवणालाही सुट्टी, एकदम 8 मार्च सेलिब्रेट करून या.
मला वाटतं बायकांचा पुरुषांचा असा काही वेगळा चित्रपट नसतो. शेवटी सासू सुनेच्या नात्यात नवर्याचा रोल फार महत्वाचा असतो त्यामुळे पुरुषांनी असे पिच्चर बघावेत. त्यांनाही गोष्टी रिलेट होतीलच.
आम्ही भाऊ बहीण सगळे कझीन्स मिळून "मातीच्या चुली" बघायला गेलो होतो ते या निमितताने आठवलं तेव्हा मी फोर्स केल्यामुळे सगळे आले होते आणि तेव्हा मला कसला रडका बायकी पिच्चर बघायला लावला म्हणून शिव्या घातल्या होत्या भावांनी आज इतक्या वर्षांनी त्यांची लग्न झाल्यावर तेच मला त्या बद्दल धन्यवाद देतात . त्यामुळे बायकी पिच्चर म्हणून सोडून देऊ नका.
परीक्षण आवडले.
सिमरन हो बरोबर आहे तुमचे.
सिमरन हो बरोबर आहे तुमचे.
बायकांच्या विषयावर चित्रपट असतो म्हणून बायकांनीच बघावा असे काही नसते.
जसे लहान मुलांच्या भावविश्वावर चित्रपट असला तर तो पालकांनीही बघावा असा असतो तसेच हे..
वरचे मी गमतीने म्हटले तरी इमोशनल अँगल बघताना माझ्या डोळ्यात येते चटकन पाणी. बायकांच्या लेव्हलचे (माझ्या आईच्या लेव्हलचे) नाही येत पण डोळे पाणावतात, आणि ते मला आवडते. स्पेशली ते अंगावर शहारा येणारे खुशी की आसू टाईप सीन मी राजाबाबू सारखे पुन्हा रिवाइंड करून बघतो. चित्रपट समरसून बघण्यातच खरी मजा आहे. उगाच डोळ्यातले पाणी लपवायच्या नादात ती घालवू नये.
>> सासू सुनेच्या नात्यात
>> सासू सुनेच्या नात्यात नवर्याचा रोल फार महत्वाचा असतो >>
... कात्रीतला कागद.
नवऱ्याने दुसरीकडे रहायला जावे
नवऱ्याने दुसरीकडे रहायला जावे.
मातीच्या चुली सारखी असावी
मातीच्या चुली सारखी असावी गोष्ट असं वाटतंय.
नाव बघून अजिबात बघितला नसता पण तुमचं परीक्षण वाचून बघावासा वाटतोय. छान लिहिलं आहे.
नवरा आणि सासरा मेला. सून आणि
नवरा आणि सासरा मेला. सून आणि सासू जिवंत. हे म्हणजे त्या माझं घर माझा संसार सारखं पण तो फारच गंभीर आणि रडवणारा चित्रपट होता. हा विनोदी दिसतोय.