प्रचारातल्या गंमतीजमती

Submitted by एक लेखक on 8 January, 2026 - 22:40

एका मित्राने अर्ज भरल्याने पुण्याला जावे लागले. पठ्ठ्याने सर्वच पक्षांकडून तिकीट मागितले पण त्याला आम आदमी पक्ष सोडा मीमकडूनही तिकीट मिळाले नाही. म्हणून तो अपक्ष लढतोय. समजावून सांगण्याच्या पलिकडे गेला आहे आणि जे साथ देत नाहीत त्यांच्या नावाने चिडचीड चालू आहे. म्हणून दोन दिवस म्हणताना आता सहा दिवस झाले इथेच कैदेत आहे.

या धामधुमीत पुण्यात फिरताना प्रचाराच्या गंमती जमती पहायला मिळाल्या.

आम आदमी पक्षाची रिक्षा जनवाडी ( वडारवाडी ) इथे फिरत होती. या रिक्षाच्या स्पीकरवरून रेकॉर्डेड भाषण चालू होते ते लोकसभेला साजेलसे होते.
" घराणेशाही मोडून काढण्यासाठी फक्त आम आदमी पक्षच प्रयत्नशील आहे. विकासाच्या नावाखाली जो भ्रष्टाचार आणि तत्त्वशून्य राजकारण चालू आहे ते मोडून काढायला आम आदमी पक्ष मैदानात उतरला आहे" ही रिक्षा कुठेही थांबत नाही. अगदी सिग्नललाही. कारण रिक्षाचालकाने हा प्रचार मनपा निवडणुकीला किती प्रभावी आहे हे ओळखले असणार.

सिंहगड रस्ता इथे एका प्रोफेशनल आवाजात, अभिनयासकट प्रचार चालू होता "ताईंची कामं काय सांगावीत. गोरगरीबांसाठी त्यांचे ममत्व उफाळून येते. सर्वसामान्यांच्या पर्श्नांना त्या थेट भिडतात. नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्या झोकून देतात. " हे प्रवचन बराच काळ चालू होते पण इतक्यात राष्ट्रवादीची रिक्षा आली. त्यांनी गाणं बनवून घेतलं होतं. वाट लावली या गाण्याच्या चालीवर गाणं बनवलं होतं. त्यातली "घड्याळ घड्याळ घड्याळ घड्याळ " हीच ओळ लक्षात राहिली.

मग लक्षात आलं जिथं कुठं विरोधी पक्षाची रिक्षा भाषण ठोकत असते तिथे ही रिक्षा जाऊन उभी राहते. आपल्या पक्षाचा प्रचार झाला नाही तरी चालेल पण दुसर्‍याचाही झाला नाही पाहीजे हा दादांचा बाणा यातून दिसून आला. एका चौकात तर चार रिक्षा उभ्या होत्या तिथेही रीक्षा उभी राहिली. तिला पाहताच इतर उमेदवारांच्या रिक्षा पळ काढतात आणि ही रिक्षा त्यांचा पाठलाग करते, मनात दादा डोळ्यातून पाणी काढून हसत हसत प्रचाराचा प्लान त्यांच्या शिलेदारांना सांगत आहेत असं चित्रं उभं राहिलं.

गाणी बनवणार्‍यांचा सध्या सुकाळ आहे. त्या गाण्यांची क्वालिटी बहुतेक पेमेंट मिळेल कि नाही यावर ठरत असेल.
ट ला ट हे फार जुने झाले. नेण्य़ा, येण्या, करण्य़ा अशी ण्यानी क्रियापदे जुळवणार्‍या गीतकारांना सध्य़ा डिमांड आहे.

एका गाण्यात उमेदवाराचं नाव असं काही बसवलं होतें कि ज्याचं नाव ते.

"प्रभाग क्रमांक __ मधुनी राहिले
बाळासाहेब बापूसाहेब डबडे* उभार
आपल्या काळजाचा माणूस हाय रं
त्याला पाडायचा बिडायचा नाय रं*
(* डबडे आडनाशी मिळतेजुळते आडनाव असलेल्ञा उमेदवाराने हा योगायोग समजावा)

एका उमेदवाराच्या प्रचाराची रिक्षा जवळून गेली.
फलाणे फलाणे उमेदवार हे गरीबीतून आलेले असल्याने त्यांना समस्याची जाण आहे. अगदी सर्वसामान्य, मनमिळावू व्यक्तिमत्व. रिक्षा पुढे गेली आणि मागून एक विशालकाय पांढरी परदेशी एसयुव्ही येऊन उभी राहिली. त्यातून खादीच्या शुभ्र कपड्यातले "गरीब" उमेदवार उतरले. खुरटी दाढी, कुरतडलेल्या मिशा आणि मूळच्या पैलवान कटावर वाढलेले केस, त्यावर रेबन चा गॉगल , बोटात अंगठ्या, सोन्याची चेन यामुळे उमेदवार लोभसवाणे दिसत होते. अशा लोभस उमेदवारांचा भरणा जास्त आहे. चकचकीत दाढी मिशा असे उमेदवार बहुतेक महिलाच आहेत. त्या सोडल्या तर अल्फा मेल उमेदवारांचं वर्चस्व आहे.

हे काहीच नाही, जो मित्र उभा राहिला आहे त्याने छापलेल्या पत्रकात प्रभागातले रस्ते, एक उड्डाणपूल आणि दुसर्‍या मतदारसंघात उभारलेली पाण्याची टाकी याच्याच प्रयत्नाने झाली असं म्हटलंय. त्याला विचारलं तर म्हणाला "मी कुठं म्हणतो कि मी उभारली ?"

अशा गंमती जमती तुम्ही पण पाहिल्या असतील. सांगा कि. वाचायला उत्सुक आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

* बायकोच्या चेहर्‍यावरचे भाव असे आहेत ....* -
कुणाला नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव , " निदान तुझ्या तावडीतून तरी सुटेन !!! " असे आहेत, असंही वाटू शकतं; इच्छा असली तरीही इतके अचूक भाव दाखवू शकेन असा चित्रकार मात्र मी नक्कीच नाही !!!! Wink

चकचकीत दाढी मिशा असे उमेदवार बहुतेक महिलाच आहेत. >

भवतालच्या समाजातही गेली १०-१५ वर्षे हेच आहे. मुले कोहली कट मारुन असतात.

हल्लीच एक अंध पुरुष पाहिला. त्याच्या चेहर्‍यावर दाढीचे जण्जाळ होते त्याने अर्धा चेहरा झाकलेला, डोक्यावर भरपुर केस जे कपाळावर येऊन अर्धे कपाळ त्यात बुडाले होते आणि डोळ्यांवर भलामोठा काळा गॉगल. तो अंध असल्यामुळे हा गॉगल झोपायच्या वेळेस काढत असणार. त्याला बघुन प्रश्न पडला की ह्याने दाढी सफाचाट केली, केस मागे वळवले आणि गॉगल काढला तर घरचे याला ओळखु तरी शकतील का?

(अंध आहे म्हणजे सहानुभुती दाखवायलाच हवी असे मला वाटत नाही, तेही आपल्यासारखेच आहेत हेमावैम. हा माणुस अंध असला तरी तो कुठल्याही डोळस माणसाइतकाच पुर्णपणे सबळ आहे. त्याला सहानुभुतीचा तिटकारा आहे. हा कंस मुद्दाम लिहिला नाहीतर काहीजण अंधाबद्दल असे लिहिले म्हणुन मला झोडपायला सुरबात करतील)

Pages