प्रचारातल्या गंमतीजमती

Submitted by एक लेखक on 8 January, 2026 - 22:40

एका मित्राने अर्ज भरल्याने पुण्याला जावे लागले. पठ्ठ्याने सर्वच पक्षांकडून तिकीट मागितले पण त्याला आम आदमी पक्ष सोडा मीमकडूनही तिकीट मिळाले नाही. म्हणून तो अपक्ष लढतोय. समजावून सांगण्याच्या पलिकडे गेला आहे आणि जे साथ देत नाहीत त्यांच्या नावाने चिडचीड चालू आहे. म्हणून दोन दिवस म्हणताना आता सहा दिवस झाले इथेच कैदेत आहे.

या धामधुमीत पुण्यात फिरताना प्रचाराच्या गंमती जमती पहायला मिळाल्या.

आम आदमी पक्षाची रिक्षा जनवाडी ( वडारवाडी ) इथे फिरत होती. या रिक्षाच्या स्पीकरवरून रेकॉर्डेड भाषण चालू होते ते लोकसभेला साजेलसे होते.
" घराणेशाही मोडून काढण्यासाठी फक्त आम आदमी पक्षच प्रयत्नशील आहे. विकासाच्या नावाखाली जो भ्रष्टाचार आणि तत्त्वशून्य राजकारण चालू आहे ते मोडून काढायला आम आदमी पक्ष मैदानात उतरला आहे" ही रिक्षा कुठेही थांबत नाही. अगदी सिग्नललाही. कारण रिक्षाचालकाने हा प्रचार मनपा निवडणुकीला किती प्रभावी आहे हे ओळखले असणार.

सिंहगड रस्ता इथे एका प्रोफेशनल आवाजात, अभिनयासकट प्रचार चालू होता "ताईंची कामं काय सांगावीत. गोरगरीबांसाठी त्यांचे ममत्व उफाळून येते. सर्वसामान्यांच्या पर्श्नांना त्या थेट भिडतात. नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्या झोकून देतात. " हे प्रवचन बराच काळ चालू होते पण इतक्यात राष्ट्रवादीची रिक्षा आली. त्यांनी गाणं बनवून घेतलं होतं. वाट लावली या गाण्याच्या चालीवर गाणं बनवलं होतं. त्यातली "घड्याळ घड्याळ घड्याळ घड्याळ " हीच ओळ लक्षात राहिली.

मग लक्षात आलं जिथं कुठं विरोधी पक्षाची रिक्षा भाषण ठोकत असते तिथे ही रिक्षा जाऊन उभी राहते. आपल्या पक्षाचा प्रचार झाला नाही तरी चालेल पण दुसर्‍याचाही झाला नाही पाहीजे हा दादांचा बाणा यातून दिसून आला. एका चौकात तर चार रिक्षा उभ्या होत्या तिथेही रीक्षा उभी राहिली. तिला पाहताच इतर उमेदवारांच्या रिक्षा पळ काढतात आणि ही रिक्षा त्यांचा पाठलाग करते, मनात दादा डोळ्यातून पाणी काढून हसत हसत प्रचाराचा प्लान त्यांच्या शिलेदारांना सांगत आहेत असं चित्रं उभं राहिलं.

गाणी बनवणार्‍यांचा सध्या सुकाळ आहे. त्या गाण्यांची क्वालिटी बहुतेक पेमेंट मिळेल कि नाही यावर ठरत असेल.
ट ला ट हे फार जुने झाले. नेण्य़ा, येण्या, करण्य़ा अशी ण्यानी क्रियापदे जुळवणार्‍या गीतकारांना सध्य़ा डिमांड आहे.

एका गाण्यात उमेदवाराचं नाव असं काही बसवलं होतें कि ज्याचं नाव ते.

"प्रभाग क्रमांक __ मधुनी राहिले
बाळासाहेब बापूसाहेब डबडे* उभार
आपल्या काळजाचा माणूस हाय रं
त्याला पाडायचा बिडायचा नाय रं*
(* डबडे आडनाशी मिळतेजुळते आडनाव असलेल्ञा उमेदवाराने हा योगायोग समजावा)

एका उमेदवाराच्या प्रचाराची रिक्षा जवळून गेली.
फलाणे फलाणे उमेदवार हे गरीबीतून आलेले असल्याने त्यांना समस्याची जाण आहे. अगदी सर्वसामान्य, मनमिळावू व्यक्तिमत्व. रिक्षा पुढे गेली आणि मागून एक विशालकाय पांढरी परदेशी एसयुव्ही येऊन उभी राहिली. त्यातून खादीच्या शुभ्र कपड्यातले "गरीब" उमेदवार उतरले. खुरटी दाढी, कुरतडलेल्या मिशा आणि मूळच्या पैलवान कटावर वाढलेले केस, त्यावर रेबन चा गॉगल , बोटात अंगठ्या, सोन्याची चेन यामुळे उमेदवार लोभसवाणे दिसत होते. अशा लोभस उमेदवारांचा भरणा जास्त आहे. चकचकीत दाढी मिशा असे उमेदवार बहुतेक महिलाच आहेत. त्या सोडल्या तर अल्फा मेल उमेदवारांचं वर्चस्व आहे.

हे काहीच नाही, जो मित्र उभा राहिला आहे त्याने छापलेल्या पत्रकात प्रभागातले रस्ते, एक उड्डाणपूल आणि दुसर्‍या मतदारसंघात उभारलेली पाण्याची टाकी याच्याच प्रयत्नाने झाली असं म्हटलंय. त्याला विचारलं तर म्हणाला "मी कुठं म्हणतो कि मी उभारली ?"

अशा गंमती जमती तुम्ही पण पाहिल्या असतील. सांगा कि. वाचायला उत्सुक आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Election is literally in the air
वैताग आलाय रिक्षा फुल आवाजात गल्ली बोळात फिरत आहेत.
अतिक्रमण, बेकायदेशीर पार्किंग असलेला , भरपूर ट्रॅफिक असलेल्या चौकात एकाच वेळी 2 ते 3 वेगवेगळ्या उमदेवरांची महती स्क्रिन वर दाखवणारे टाटा ace इतक्या मोठ्या गाड्या उभ्या असतात. त्याने ट्रॅफिक अजूनच वाढते.
सगळ्या गमती जमती आहेत.
कालपासून ह्या सगळ्याला जोर चढलाय.
काही उमेदवार तर घरोघरी पोहचले नाहीत.
काही जण एकदा स्वतः, घरचे मेम्बर शक्यतो लेडीज ( आई किंवा पत्नी ) असेही भेटी देउन गेलेत.
लक्ष असुद्या दादा , ताई ( आमच्या पेक्षा वयाने मोठे लोकं असे म्हणतात ( असुदेत काका म्हणत नाहीत तोवर ठीकच ) )
आमचा प्रभाग फार मोठा झालाय.
त्यात लोकसंख्या डेन्स आहे.
पैसे वाटप वै बहुतेक आदल्या दिवशी होते.
सोसायटीत आम्ही फक्त ऐकतो ह्या एरिया मध्ये वाटले वै.
आमच्याकडे असे काही अनुभव नाहीत.
Btw,
गाठीभेटी, स्नेहमेळावे वै मोठ्या हॉटेलात झालेत काहीवेळा.
सोसायटी पदाधिकारीना खास आमंत्रणं येतात.
सोसायटी ग्रुप वर फिरतात.
किती जण जातात देव जाणे.
विशेषतः नंतर भोजन आहे अशी विशेष नोंद असते आमंत्रणात.

लोकशाहीचा उत्सव जोरात आहे एकुणात.

'एक लेखक' महोदय, तुमच्या मित्राला सर्वच प्रस्थापित आणि विस्थापित राजकीय पक्षांनी तिकीट नाकारले आहे म्हणजे नक्कीच ते 'गुन्हेगारी पार्श्वभूमी, घोटाळेबाज, बदमाश वगैरे प्रवृत्ती नसलेले' उमेदवार असावेत असे वाटतंय. "मी कुठं म्हणतो कि मी उभारली ?" ह्या विधानातून त्यांचा प्रामाणिकपणाही दिसून येतो. नगरसेवकपदाची निवडणूक लढवणारा उमेदवार 'सदाचारी', 'धुतल्या तांदुळासारखा स्वच्छ' वगैरे असावा असल्या अवाजवी अपेक्षा आता मतदारही करत नाहीत, फक्त 'स्वहिताच्या' बरोबरीने प्रभागात जनहिताचीही चार-दोन कामे त्याने करावीत एवढीच बहुतेकांची माफक अपेक्षा असते. त्यामुळे तुमच्या मित्राला विजयी होण्यासाठीच्या माझ्या शुभेच्छा कळवा!

झकासराव...
>>"लोकशाहीचा उत्सव जोरात आहे एकुणात.">>
अगदी अगदी... कधी नाही ते माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनाही यंदा सुगीचे दिवस आले आहेत. मंडळांना सर्वच पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांकडून भरघोस देणग्या, कार्यकर्त्यांना मेजवान्या आणि बाटल्यांचे बॉक्सच्या बॉक्स वगैरेंची अगदी रेलचेल आहे 😀

झाले वाचून सगळ्यांचे जाहीरनामे ? आता सांगा, कधी जायचं मुंबई सोडून !!!athapakala.JPG

ही रिक्षा कुठेही थांबत नाही. अगदी सिग्नललाही. >>>
आपल्या पक्षाचा प्रचार झाला नाही तरी चालेल पण दुसर्‍याचाही झाला नाही पाहीजे हा दादांचा बाणा यातून दिसून आला >>> Lol

धमाल लिहीले आहे.

चकचकीत दाढी मिशा असे उमेदवार बहुतेक महिलाच आहेत. त्या सोडल्या तर अल्फा मेल उमेदवारांचं वर्चस्व आहे. >>> यात कोठे कॉमा राहिला आहे, की मलाच विनोद कळाला नाही? Happy

लक्ष असुद्या दादा , ताई ( आमच्या पेक्षा वयाने मोठे लोकं असे म्हणतात ( असुदेत काका म्हणत नाहीत तोवर ठीकच ) ) >>> झकास Lol

फार गमतीदार क्लिप्स येत आहेत एकेक. कोण कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत हे लोकांना तर सोडाच कधीकधी त्या उमेदवारांनाही माहीत नसते. एका क्लिपमधे काँग्रेसच्या वतीने उभी असलेली एक महिला उमेदवार भर सभेत मी भाजपकरता निवडणूक लढवत आहे म्हणाली, मग मागून कोणीतरी सांगितले, तेव्हा ते करेक्ट केले Happy

तिकीट न मिळाल्याने निराश होउन पुढचे राजकीय करीयर धोक्यात येईल हे लक्षात न घेता बेधडक बोलणार्‍यांच्याही क्लिप्स मजेदार आहेत.

एले - तुमच्या मित्राबाबत संजय भाव्यांनी लिहीले तेच मलाही वाटले. "दुश्मन बहुत है उसके, आदमी जरूर अच्छा होगा" हे कोठेतरी वाचलेले वचन आठवले Happy

गाणी बनवणार्‍यांचा सध्या सुकाळ आहे. त्या गाण्यांची क्वालिटी बहुतेक पेमेंट मिळेल कि नाही यावर ठरत असेल.>>> Proud Lol
धमाल लिहिले आहे.

धागा विरंगुळात आहे हे बेस्ट Happy

संजय भावे आणि फारएण्ड, मित्राच्या वतीने शुभेच्छांबद्दल आभार.

मित्र असल्याने आम्ही जरी टिंगल करत असलो किंवा डिपॉझिट वाचलं तरी पुष्कळ असं म्हणत असलो तरी निवडून आला(च) तर सर्वाधिक आनंद आम्हालाच होणार आहे. प्रचारात खर्च होणारा प्रचंड पैसा बघता लोक डामडौलाला भुलूनच मत देणार हे दिसतंय. आम्हाला वाटत होतं कि मित्राने हात पोळून घेऊ नयेत. (हा कसला दळभद्री शौक ?).

भारतीय जनता प़क्ष आणि अजितदादा गटाने पाण्यासारखा पैसा खर्च केलाय. त्यापुढे अपक्षच काय अन्य पक्ष सुद्धा साफ उडून जातील. सध्या प्रचाराच्या नावाखाली लोक मित्राची लूट करताहेत ते आम्ही थांबवू शकत नाही याचंच वाईट जास्त वाटतंय.

चकचकीत दाढी मिशा असे उमेदवार बहुतेक महिलाच आहेत. >> फारेण्ड Lol
अ‍ॅक्च्युअली, सफाचट चेहरा असलेले पुरूष उमेदवार दिसतच नाहीत , अशा चेहर्‍याच्या फक्त स्त्रियाच आहेत असं लिहीता लिहीता डेंजर टंकन झालं. पूर्वी मध्यमवयीन उमेदवार असे दिसायचे पण आता या वयाचे लोक विधानसभेला दिसतात.

दाढी, मिशा आणि डोक्यावर कुरतडलेला कट मारलेल्या उमेदवारांचे हसर्‍या चेहर्‍याचे फोटोज मुंबईत दिसत नाहीत. मुंबईत चकाचक उमेदवार भरपूर आहेत. (रिक्षावाल्या नेत्याचे सोडून). पण पुण्यात मला तरी दिसले नाहीत.

एका उमेदवाराचा हसरा फोटो तर थेट "अब आयेगा मजा" म्हणणार्‍या गब्बरच्या हसण्याची आठवण करून देतोय. हसले तरी प्रॉब्लेम नाही हसले तरी प्रॉब्लेम.

अहो, तुम्ही बाकावर व वर्गाबाहेर त्याला सतत उभं करायचेत म्हणूनच निवडणुकीला उभं रहायची प्रेरणा मिळाली, असं म्हणतोय तो उमेदवार !!20190305_102939.jpg

यावेळेस प्रचाराकरता मराठी सिरीयल्सचा वापर केलेला दिसतोय. "ठरलं तर मग" मधे सीन चेंज होताना मधेच रस्त्याच्या बाजूला लावलेले एकनाथ शिंद्यांचे मोठे बॅनर्स दिसले. इतरांनी हे केले आहे का माहीत नाही. दुसर्‍या एखाद्या सिरीज मधे असेल. आयडिया भारी आहे Happy

राजकारण धाग्यावर टाकले होते पण नंतर लक्षात आले की इथे जास्त चपखल आहे.

एका उमेदवाराचा हसरा फोटो तर थेट "अब आयेगा मजा" म्हणणार्‍या गब्बरच्या हसण्याची आठवण करून देतोय >>> तंबाखू-दातांसकट? Happy

भाऊ Happy Happy

माझ्या आईला फोन करून म्हटलं " जावई खूपच आठवण काढतोय, लगेच ये ! " ; काल ओरडतत होतात ना झोपेत, " येवून येवून येणार कोण ?" !!!20200914_172734_2.jpg

भाउची व्यन्गचित्र एकदम चपखल !
बाकी इथे कुठलिही निवडणूक असो किवा कशाचा निषेध असो फक्त फलक घेवुन चौकात उभ राहतात...सपोर्ट असेल तर हॉन्क करायच..तेवढाच हॉर्न वाजवायचा चान्स..झाला प्रचार.
नो! ताइ-माइ-अक्का छ्या कसली मज्जाच नाही.

भाऊ Lol

आज सकाळीच मला मिळालेला घरचा अहेर -

मी बोललेलं न ऐकताच नुसतं हंसून वेळ मारून नेता ना, त्याच तंत्राचा आज भरपूर वापर करा ! घरोघर प्रचारासाठी येताहेत आज झुंडीने सारे प्रचारक !!!20181230_224732.jpg

भाऊ, सगळे व्यंचि एकसे बढकर एक!!

आमच्या वार्डातील एकही उमेदवार माहितीचा नाही. गेल्या २५ वर्षात कधी पाहिलेले नाहीत. फक्त फलक पाहिलेत वाढदिवसांच्या शुभेच्छांचे, आणि त्यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यांचे नाम निर्देश करणारे.

भाऊंची सगळीच व्यंगचित्र मार्मिक. Proud
सासू ला बोलवून घेतल्याने जावयाच्या चेहऱ्यावरचे भाव बघून डोळ्यात पाणी आलं. हसून हसून ओ. Rofl

तंबाखू-दातांसकट >> पुढचे फारोळे दात दिसतात. कपिलदेवचे पण दिसायचे पण ते शोभून दिसत. इथे बळेच सभ्य होण्याचा आटोकाट प्रयत्न लपत नाही. तंबाखू फोटोत ना काही आली पण गडी गुटखा खाऊन " बलम पिचकारी अचूक जागी मारी" थाटाचा आहे.
फोटो काढले होते पण इथे पोस्ट करणे म्हणजे आ बैल मुझे मार होईल.

अजून एक गंमत
दोन्हीही राष्ट्रवादीचा मोर्चा एकाच ठिकाणी आला होता. दोन्हीचं प्रचारगीत एकच.
राष्ट्रवादी पुन्हा... कॅची आहे.
काही शब्दात फरक आहे. मग एक गाणं वाजल

साऱ्या जनतेने वाजवायची
साहेबांची तुतारी
मोठ्या साहेबांची तुतारी

साहेबांची तुतारी वाजवा असं बहुतेक धरणगट म्हणत असेल म्हणून बघितले तर काकांचाच उमेदवार.
मतदाराने शब्दशः अर्थ घेऊन वाजवली तर?

इति, ' प्रचारातल्या गंमतीजमती ' समाप्त ! -

अहो, बाहेर जाताय , जरा सांभाळून ! प्रचाराचा गोंगाट , गोंधळ संपलाय म्हणजे आता तो बिबट्या नक्की येईलच परत !!20181230_225207.jpg

भाऊ Lol
हे ही मस्तच. बायकोच्या चेहर्‍यावरचे भाव असे आहेत , "आमच्या येड्याला बिबट्याने नेलं तर किमान त्याचं तरी पोट भरेल, इथं काही उपयोग नाही"

Pages