तुमचा अकाउंट बॅलन्स काय ओ ताई?

Submitted by pratidnya on 11 January, 2026 - 08:09

निःस्वार्थ भाव ठेवून दुसऱ्याला मदत करता आली तर माणसाच्या मनाला बरं वाटतं. फक्त ती मदत योग्य व्यक्तीला मिळायला हवी हा माझा अट्टाहास. कारण नवीनच नोकरीला लागल्यानंतर मी भांडुप स्टेशनजवळ गावाहून आलेल्या, सामान चोरीला गेलेल्या कुटुंबाला शंभर रुपये आणि चार वडापाव घेऊन दिले होते. आणि आपण किती किती छान काम केलं या आनंदात दोन दिवस होते. मग तिसऱ्या दिवशी कळलं की अशी सामान, पैसे चोरीला गेलेली कुटुंबं संपूर्ण भारतभर पसरलेली आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या एका गावातल्या लोकांचा हाच व्यवसाय आहे. काही वर्षांनी त्यांचेच एक दुसरे भाऊबंद मला गुवाहाटीलाही भेटले. असो. तर शंभर रुपये अधिक चार वडापावचे पन्नास रुपये असे दीडशे रुपये का होईना पण आपले मेहनतीचे पैसे असे दुसऱ्याने आपल्याला येडं बनवून काढून घ्यावे याचं मला फार फार दुःख झालं.
मग ठरवलं. तुमच्याकडे जे मदत मागायला येतील त्यांना खरंच मदतीची गरज आहे का हे नेहमी पडताळून पाहायचं. आमच्याकडे कामाला येणाऱ्या बाईंच्या घरी दरवर्षी मुलांचे वाढदिवस, बारसे, गणपती उत्सव इतर कार्यक्रम इतके जंगी साजरे केले जातात तेवढे आम्हीही नाही करत. पण त्यांच्या घरी कुणी आजारी पडले की मात्र त्यांचे पैसे संपतात. मग त्यांनी दागिनेच गहाण ठेवलेत, घरच गहाण ठेवलं अशी रडारड करत पैसे मागितले जातात.
दुसरी एक गोष्ट. ऑफिसमध्ये एक काँट्रॅक्टवर काम करणारी बाई होती. ती दर क्षणाला तिच्या गरिबीचं गाऱ्हाणं गात असे. नवरा दारू पित असे. ह्या बाईला कॉन्ट्रॅक्ट जॉबमध्ये तसा काही वाईट पगार नव्हता. पण दर दोन दिवसांनी ती नवीन व्यक्तीजवळ काही ना काही कारण काढून पैशांसाठी रडत असे. बिचारे लोक तिला मदत करून थकत नसत. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तिच्या गरिबीच्या चर्चा. अशी एकही व्यक्ती नव्हती जिने तिला पैशांची, कपड्यांची मदत केली नव्हती. तिला सवयच झाली होती की काहीही लागलं की ऑफिसमध्ये रडायचं. लोक लगेच देतात. स्वाभिमान गेला तेल लावत.
तर हे सगळे नमुने अनुभवल्यानंतर मी मनाशी ठरवलं. च्यायला नाही करायची कुणाला मदत.
पण प्रत्येक वेळेस मी तोंडावर आपटते. तर यावेळी झालं काय लेकीच्या जन्माच्या वेळेस तालुक्याच्या इस्पितळात श्वेता नावाच्या नर्सशी ओळख झाली होती. रात्रीच्या वेळेस बाकी वरिष्ठ नर्स झोपा काढायला जात असत तेव्हा ह्या लहानखुऱ्या नर्सने मला खूप मदत केली होती. लेकीच्या बारशाला बोलवावं म्हणून प्रसादने आणि मी तिचा मोबाईल नंबर घेऊन ठेवला होता. पण बारशाला काही ती येऊ शकली नाही. वर्षभराने त्याच इस्पितळात तपासणीसाठी गेलो असता ती पुन्हा भेटली. आम्हालाही तिला पुन्हा भेटल्यावर आनंद झाला. कसं काय चाललंय वगैरे चौकशी झाली. गेल्या आठवड्यात तिचा मला मेसेज आला.

"ताई एक मदत हवी होती. तुमच्या ओळखीत कुणी व्यक्ती किंवा संस्था आहे का जो मदत करू शकेल. मला काही पैशांची गरज आहे. मी एज्युकेशन लोन साठी अप्लाय केलं होतं. माझं लोन अप्रूव्हही झालंय. पण ते पैसे अकाउंटला जमा होण्याआधी मला त्यांना काही रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून द्यावी लागणार आहे. तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत."

शिक्षणाचा विषय निघाल्याने मी विरघळले. परिस्थिती आर्थिकदृष्ट्या हलाखीची असल्यामुळे मला स्वतःला शिक्षणासाठी हवे ते क्षेत्र निवडता आलं नव्हतं. (म्हणजे खरंच हलाखीची होती बरं का.) तसं बघायला गेलं तर मदत करणाऱ्या बऱ्याच संस्था असतात आणि सरकारच्याही विद्यार्थ्यांसाठी खूप योजना असतात पण त्याबद्दल माहिती नव्हती. सांगायला, मार्गदर्शन करायला चांगले शिकलेले नातेवाईक, शेजारीही नव्हते. आई अशिक्षित आणि वडील कमी शिकलेले. भांडुपच्या त्या कामगारांच्या चाळीत त्यावेळी बारावीच्या पुढे शिकलेला माणूस दुर्मिळ. आईबाबांमध्ये स्वाभिमान ठासून भरलेला त्यामुळे कुणाकडे पैशांसाठीही मदत मागितली नाही. आता जास्त खोलात जात नाही. या गोष्टी आता सहज जरी मित्र मैत्रिणींना सांगितल्या तरी त्यांना खऱ्या वाटत नाहीत. असो. तर यामुळे आवड नसलेल्या क्षेत्रात शिक्षण घेतले. चांगल्या मार्काने पास झाले. पण करियरवर वाईट पारिणाम झाला. या गोष्टी कितीही सोडून द्यायचा विचार केला तरी खंत वाटत राहते. यामुळे झालं काय की ज्यांना गरज आहे अशांना तरी आपण मार्गदर्शन करावे अशी इच्छा कायम मनात राहिली. कुठून तरी या मुलीला मदत करूया अशी इच्छा मनात निर्माण झाली.

"अरे वा. पुढचं शिक्षण घेतेस का?"

" नाही ताई. माझा bsc नर्सिंग कोर्स पूर्ण झालाय. पण फी पूर्ण भरली नसल्याने कॉलेज माझा रिजल्ट आणि प्रमाणपत्र देत नाहीये."

" शिक्षण पूर्ण झाल्यावर एज्युकेशन लोन मिळत नाही गं बहुतेक. ही कोणती बँक आहे?"

"फेडरल बँक."

" तू स्वतः बँकेत गेली होतीस का लोनसाठी? आणि ते किती रुपये प्रोसेसिंग फी मागत आहेत?"

" नाही ताई. मी ऑनलाईन अप्लाय केलं आहे. २३००० रुपये प्रोसेसिंग फी मागत आहेत?"

" एवढी? एव्हढी तर मला होम लोनसाठीही भरावी लागली नव्हती. अग ऑनलाईन फ्रॉड असेल."

" नाही हो. फ्रॉड नाहीये. मी त्यांना विचारलं फोनवर ते म्हणाले की ते फ्रॉड नाही आहेत."

बाई गं. एवढं निरागस कुणी कसं असू शकतं.

"चोर कशाला सांगेल की तो चोर आहे. त्यांनी तुला मेल किंवा मेसेज पाठवला असेल त्याचा स्क्रीनशॉट पाठव."

तिने स्क्रिनशॉट पाठवला. अतिशय चुकीच्या इंग्रजीमध्ये लिहिलेल्या त्या मेलमध्ये असं लिहिलं होतं की डियर श्वेता XXXX तुमचे १ लाखाचे एज्युकेशन लोन अप्रुव्ह झाले आहे. तुम्ही २३००० रुपये आम्हाला पाठवले की लगेच ते पैसे तुमच्या खात्यात जमा करू. म्हणजे सायबर क्राईमचा प्रकार. नेटवर गुगलून पाहिलं तर फेडरल बँक स्टुडन्ट लोन स्कॅमच्या बातम्या दिसल्या. लगेच फोन करून तिला परिस्थिती समजावून सांगितली. बऱ्याच वेळाने तिला पटलं पण ती भरपूर नाराज झाली.

" ताई मला पैशांची गरज होती हो."

शिक्षण झाल्यावर एज्युकेशन लोन कदाचित मिळणार नाही. अन्य काही मार्गाने ओळखीच्या संस्थांकडून मदत मिळू शकेल का हे मी विचारून पाहते असं तिला सांगितलं.

संस्थेच्या लोकांना दोन दिवस कॉल लागला नाही. तोपर्यंत श्वेताचे दहा मेसेज येऊन गेले. विचारलं का हो ताई म्हणून.

संस्थेतल्या बाईंशी बोलणं झालं तर त्या म्हणाल्या की शिक्षण होऊन गेल्यावर स्कॉलरशिप देता येणार नाही. मग आमच्या ऑफिसमधल्या GM पदावर असणाऱ्या भोसले मॅडमना कॉल लावला. त्या CSR मध्ये बऱ्याच कार्यरत आहेत. त्यांच्या ओळखीतल्या एका संस्थेतर्फे ह्या मुलीच्या परिस्थितीची चौकशी करून काही आर्थिक मदत करता येईल असे ठरले. त्याप्रमाणे मी तिला तिच्या कॉलेजची आणि कोर्सची माहिती विचारली. तुला मदत देण्याआधी आम्ही कॉलेजमध्ये चौकशी करणार आहोत. या नावाच्या मुलीने खरंच इथे शिक्षण पूर्ण केले आहे का किंवा तिचे प्रमाणपत्र तुम्ही अडकवून ठेवले आहे का अशा गोष्टी आम्ही तिथे विचारणार म्हटल्यावर ही जरा चपापली. आधी मला न सांगितलेल्या काही गोष्टी तिने सांगितल्या.

" खरं म्हणजे मॅडम मला ना स्कॉलरशिप मिळाली होती पण ते पैसे खर्च झाले."

"असे कसे खर्च झाले?"

तर अगदी खोलात जाऊन माहिती काढल्यावर असे कळले म्हणजे ह्या मुलीला तिच्या नर्सिंगच्या वार्षिक फीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त सूट मिळत होती. कॉलेजची वार्षिक फी एक लाख दहा हजार त्यापैकी ८५००० हजार तिला स्कॉलरशिप म्हणून मिळत असत. वरचे २५००० तिला भरायचे होते. तिला विचारलं, "तुझे हे वरचे २५००० भरायचे राहिले आहेत का."

"नाही. ते मी भरले. तीन वर्षांची स्कॉलरशिप डायरेक्ट कॉलेजमध्ये फी म्हणून जमा झाली पण चौथ्या वर्षांची ८५००० रुपयांची स्कॉलरशिप त्यांनी तिच्या अकाउंटमध्ये जमा केली. तिने फी म्हणून ती कॉलेजमध्ये जमा करणं अपेक्षित होता. तिचं म्हणणं होतं की हे पैसे कुठून जमा झाले हे तिला कळलंच नाही आणि तिच्याकडून ते खर्च झाले. एकूण ६५००० रुपये फी बाकी राहिली होती."

"पण तुझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे कुठून कसे जमा झाले हे तुला कळलं कसं नाही."

यावर तिच्याकडे उत्तर नव्हतं. नाही कळलं ताई एवढंच म्हणाली. कशासाठी खर्च केले हेही उत्तर तिने स्पष्ट दिलं नाही. अचानक भरपूर पैसे मिळाले ते फ़ार विचार न करता ख़र्च करुन टाकले असं वाटत होतं.

तुला आधीच स्कॉलरशिप मिळाली असताना पुन्हा मोठी आर्थिक मदत देता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं. कोर्स २०२३ मध्ये पूर्ण झाला होता. त्या गोष्टीला दोन वर्षे पूर्ण झाली होती. सध्या ही मुलगी इथल्याच एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते. इथे भरपूर नसला तरी पुरेसा पगार आहे. दर महिन्याला थोडी रक्कम बाजूला काढून ती आतापर्यंत सहज फी भरून प्रमाणपत्र घेऊ शकली असती. तसं का केलं नाही विचारल्यावरही काही उत्तर नव्हतं. आता सहा महिन्यात थोडे पैसे बाजूला काढून फी भरून टाक असा सल्ला दिला तर म्हणाली की सध्या तिला कुणाच्या तरी ओळखीने मुंबईत महिना २८००० पगार असणारी नर्सची नोकरी मिळते आहे पण सर्टिफिकेट नसल्यामुळे सर्व अडकलं आहे असं म्हणाली. ती नोकरी मिळवण्याची तिला घाई होती.

" मी तुला सध्या तरी कुठल्याही संस्थेमार्फत मदत करू शकणार नाही."

"मग ताई संस्थेतर्फे नाही तर तुम्ही तरी मला पैसे देऊ शकाल का?"

"मी नुकताच माझा व्यवसाय सुरु केला आहे. एवढी रक्कम मी तुला देऊ शकणार नाही. सध्याच्या नोकरीमधून काही पैसे बाजूला ठेवलेस तर वर्षभरात फी भरून टाकू शकशील. खरं तर ते तू आधीच करायला हवं होतं. तुझा रिजल्ट मिळाला की मुंबईत काही हॉस्पिटल्स ओळखीची आहेत तिथे तुझ्या जॉबसाठी विचारता येईल."

ठीक आहे ताई एवढं बोलून तिने निरोप घेतला. मला जरा वाईट वाटलं पण तसं सगळं हिच्याच गोंधळामुळे घडलं होतं.
तीन चार दिवसांनी तिचा पुन्हा मेसेज. यावेळी डायरेक्ट... "ताई तुमचा अकाउंट बॅलन्स काय आहे हो?"
एकदम मोठा धक्काच दिला हिने. मला आतापर्यंत माझ्या नवऱ्याने, आईबाबांनी कधी हा प्रश्न विचारला नाही . एकदम डोक्यातच गेली ही.
सर्वात आधी विचारलं कशासाठी विचारतेस. त्यावर उत्तर.. माझा भाऊ रत्नागिरीमध्ये आहे त्याला पाच हजारांची गरज आहे. कशासाठी रत्नागिरीला आहे, कशाला पैसे हवेत हे काहीच नाही. फक्त मागणी.
तिच्या डोक्यात असणारी कल्पना अशी की अकाउंट बॅलन्स विचारल्यानंतर पैसे मागितले की माझ्यावर जरा प्रेशर येईल, एवढे पैसे तर आहेत ना मग काय झाले पाच हजार श्वेताला दिले तर.
सगळे मॅनर्स गुंडाळून खूप झापलं तिला.
मी काही चुकीचं केलं असं मला आता अजिबात वाटत नाही. मदत मागताना तिने बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या होत्या. तिने स्कॉलरशिपचे पैसे कशासाठी खर्च केले. कोर्स पूर्ण झाल्यावर दोन वर्षे नोकरी करूनही तिने राहिलेल्या फीसाठी पैसे का जमा केले नाहीत या गोष्टीची नीट उत्तरं तिने दिलीच नाहीत. तिला मदतीसाठी नकार दिल्याबद्ल जी काही थोडीफार खंत वाटत होती तीही या घटनेनंतर निघून गेली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>माझेच पैसे मागताना मी रडकुंडीला आलो होतो.
आणि तरीसुद्धा देता? काही तरी कारण असेल.

कारण म्हणजे नाही म्हणता येत नाही. व दुसरे कारण म्हणजे मागचा अनुभव चांगला नव्हता हे सांगता येत नाही.

>>>>कारण म्हणजे नाही म्हणता येत नाही.
बाऊंडरीज सेट करणे हे जिवनावश्यक स्किल आहे. मी यात अजिबातच निष्णात नाही. पण जस्ट एक सांगतेय.

आहेत ना आपल्याकडे, आणि वेळेला द्यावे वाटताहेत ना? देऊन टाकावे. द्यावे वाटत आहेत म्हणजे दिल्याने बरं वाटतं तर बरं वाटुन घ्यावं.
मग वसुल केल्याने परत बरं वाटतं, तर वसुल ही करावे.
शेवटी आपल्याला बरं वाटत राहील ते ते सर्व करावे. आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे!

पूर्वी इथे स्वीट टॉकर यांचा लेख वाचलेला. त्याचं म्हणणं मला पटलेलं. आपण महिन्याच्या/ वर्षाच्या बजेट मध्ये एक काही रक्कम दान करायला बाजूला काढावी आणि ते कोणाला द्यायचे ते शोधून देऊन टाकावे. असं केलं की मेंदूला आपल्याला शक्य होतं ते आणि तेवढं करुन झालं आहे सिग्नल जातो आणि इम्पल्स गिल्ट आणि इम्पल्स ग्रॅटिफिकेशन पासून आपण (थोडं) दूर राहू शकतो.

दिल्याने बरं वाटतं तर बरं वाटुन घ्यावं..... नक्कीच वाटते. पण आपण मामा बनवले गेल्याचे दुःख त्याहून मोठे असते. शेवटी पाय मातीचे असतात ना.

पैसे बुडू नये असं वाटत असेल तर ते देऊच नयेत. पण तसं जमत नाही हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं या समस्येवर तोडगा .

१. घरकाम करणार्‍या बाईने पैसे मागू नयेत यासाठी तिला कामावर ठेवल्यापासून सांगावे कि "लवकर आटप मला चार घरची भांडी करायला जायचं आहे"
तिने विचारलं कि "तुम्ही का करताय कामं ?"
तर सांगायचं " तुझा पगार, उधारीचे पैसे परत करायचे आणि रात्रीच्या जेवणासाठी "
जर तिने रात्रीचं जेवण म्हणजे काय विचारलं कि सांगावं कि आमच्या कमाईत फक्त एकाच वेळचं जेवण बनतं. रात्रीचं जेवण मग आम्ही चार घरून घेऊन येतो.
आणि उधारीचे पैसे यावर विशेष भर द्यावा. ती ऐकू आलं न आलं करेल पण खणखणीत आवाजात पुन्हा पुन्हा सांगावं जोपर्यंत तिचे कान किटत नाहीत. आपण पैसे उधार आणतो म्हटल्यावर तिचा पैसे मागायचा धीर होणार नाही.

२. आपल्याला मित्र मंडळी, दु़कानदार पैसे मागत असतील तर चेहर्‍याची प्लाटीक सर्जरी करून तो बेरकी करून घ्यावा. म्हणजे दर महा पैसे मागणारा दुकानदार टरकून राहील. फक्त चेहराच बेरकी करू नये तर लोणावळ्याला कर्नल साहेबांकडे ट्रेनिंग घ्यावे.
जुन्या बाजारात मिळणारे कपडे घेऊन यावेत. शक्यतो याच कपड्यात बाजारहाट करावी, दुकानात जावे. चांगले कपडे घेणं बंद म्हणजे बंद.
शान मधल्या अब्दुल्लाचं वाहन बनवून घ्यावं. त्यावरूनच फिरावे. शक्यतो महिना महिना अंघोळ करू नये. साबण परवडत नाही असे उत्तर द्यावे.

३. जे कुणी उधार मागतात त्यांच्याकडेच उधार मागायला सुरूवात करावी. धंदा बुडाला, नोकरी गेली अशी कारणे सांगावीत. बायकोला बीडाचे दागिने आणून द्यावेत. फारच वाईट परिस्थिती आहे असे सांगावे.

४, फ्लॅट भाड्याने द्यावा आणि सोसायटीच्या वॉचमन केबीनच्या जवळ झोपडं बांधून रहावे. पैसे परत न करणार्‍यांच्या घरी अंगाला वास येत असताना जावे. खाली फरशीवर बसकण मारावी किंवा दाराबाहेर बसून उभयतांनी मोठमोठ्याने रडावे. पैसे बुडाले आता कसं होणार असा सूर लावावा. माणुस गेल्यावर लावतात तसा सूर लागला पाहीजे. याचं ट्रेनिंग आमच्याकडे मिळेल.

५. दुकानदारांकडून उधारीवर सामान आणावे आणि त्याचे पैसे वर्षभर तरी देऊ नयेत. म्हणजे तो त्याचे पैसे वसूल करण्याच्या मागे लागेल आणि स्वतःसाठी पैसे मागावेत हे सुचणारच नाही.

६. रोज सासायटीत, कामाच्या ठिकाणि कुणाशीही पैशांवरून भांडण उकरून काढावे. यामुळे सगळीकडे तुम्ही पैसे मागता हे होईल. यामुळे लोक आपोआप टाळू लागतील. तुम्हाला तोंड लपवून फिरायची पाळीच येणार नाही. तुम्ही छाती काढून चाला. लोकच लपतील. म्हणजे पैसे मागायला कुणी येणारच नाही.

अजून कुणाला काही सुचत असेल तर सांगावे.
लोकांचे आशिर्वाद मिळतील.

एक लेखक >> Lol भन्नाट आहेत सर्व उपाय.
माझ्याकडून काही वापरता येतील असे उपाय. नवीन मोलकरीण कामाला लावतानाच सौम्य शब्दात हे स्पष्ट करावे कि पैसे उसने किंवा वेळेच्या अगोदर पगार मिळणार नाही. अजून घसट निर्माण झाली नसल्यामुळे भिडस्त व्यक्तींनाही हे बोलणे शक्य होते. थोडे खोटे बोलायची तयारी असल्यास, असेही सांगावे कि पूर्वी असेच एकीने मोठी रक्कम बुडविली असल्याने हा नियम केला आहे.
जर पैसे द्यायचीच वेळ आल्यास ऑनलाईन द्यावेत आणि त्या तेथे देण्याचे कारण नमूद करावे, म्हणजे पुरावा तयार होतो व एक वचक राहतो. जर रक्कम मोठी असेल तर त्यांच्याकडून PDC (Post Dated Cheque) घ्यावा. जर चेक बाउन्स झाला तर फौजदारी खटला करता येतो. यामुळे सुद्धा एक वचक राहतो आणि देणाराही निश्चिन्त होतो. जो खरेच प्रामाणिक आहे व पैसे परत देणार आहे, तो चेक द्यायला नाही म्हणायचे काही कारण नाही. ज्यांचे इरादे नेक नाहीत ते चेक देणार नाहीत व पैसे मागणे बंद करतील.

माबो वाचक, उपाय पटले.
माझ्या साबा आठ वर्ष अंथरूणावर होत्या. त्यामुळे असंख्य कामवाल्या बायकांशी डील करावं लागलं. घरातल्या ज्येष्ठांशी एक बोलणे, माझ्याशी दुसरं. असं करून दोघांकडूनही पैसे उसने घेणे असे कटू अनुभव आले. उचल मागणे तर नेहमीच. आजारपणं किंवा शिक्षणासाठी पैसे मागितले, की आपण विरघळतो, हे बायका जोखून असतात. साबा - साबू आजारी असताना हात दगडाखाली अडकल्यासारखे होते. ठेवले तरी दुखायचं आणि ओढले तरी. त्यामुळे बायकांचे सगळे नखरे झेलावे लागले.
ते दोघं निवर्तल्यावर मात्र कडक भूमिका घेतली. पगार वेळेवर मिळेल. उचल कुठल्याही कारणासाठी मिळणार नाही, हे स्पष्ट सांगितलं. पगार - दिवाळीचा बोनस, कधी कुठे गेले तर छोटी - मोठी वस्तू आणणे, मुलांना पास झाल्यावर बक्षिस देणे, हे सगळं करते. पण उचल नाही म्हणजे नाहीच. हा झाला कामाच्या मदतनिसांचा विषय . पण बाकीच्या व्यवहारात गंडा घालणारे लोकं भेटले. त्यांनी फसवलं आहे. ते मिळवायचा प्रयत्न केला. कधी मिळाले. बहुतेक वेळा अक्कलखाती जमा केले.

जुनी गोष्ट आहे, पण एकदा आमच्यावर अशी वेळ आली होती की आम्ही घरकामाला येणारया बाईंकडून पैसे उधार घेतले होते Happy

या अनुभवाचा एक फायदा असा की तो कायम लक्षात ठेवल्यास पाय नेहमी जमिनीवर राहतात Happy

@ धागा शीर्षक,
मला कोणी कधीही हा प्रश्न विचारला की तुझे अकाऊंट बॅलन्स काय आहे तर माझे उत्तर कधीही पाच आकडी नसते आणि ते खरेच असते.
माझा पूर्ण पगार आल्याआल्या बायको स्वतःच्या ताब्यात घेते आणि उधळून टाकते. त्यामुळे मला कधी हा उधार प्रश्न भेडसावत नाही. बायकोला पडतात हे प्रश्न कारण पैसे तिच्या ताब्यात असतात.

लग्नाआधीचे मात्र फार अनुभव आहेत. त्यात एक मजेशीर चटकन आठवला तो असा,

पहिल्या जॉबला लागलो तेव्हा मला पगार साडेबारा हजार होता आणि तिसऱ्या की चौथ्याच महिन्यात एका कॉलेजच्या मित्राने पंधरा हजार मागितले.
कॉलेजला असताना त्याने कित्येकदा माझे ५० ते २०० रुपये घेऊन जुगारात हरून झाले होते. कारण तेव्हा देण्यासाठी तेवढेच असायचे. पण आता थेट १५००० वर उडी मारली होती.
गंमत म्हणजे तो डिप्लोमाचा मित्र होता. आणि मी डिग्री करत बसलो तेव्हा त्या वेळेत त्याला स्वतःचा धंदा उघडून तीन वर्षे झाली होती. पण म्हणावे तसा सेटल झाला नव्हता.
मला पैसे देताना समजले की हे सोडून द्यायचे आहेत. पण नाते असे होते की क्या करू मैं इसका? मार भी नही सकता, प्यार जो इतना करता है.. म्हणून मी त्याला माझा सव्वा महिन्याचा पगार उधार दिला आणि विसरून गेलो.

पण मग वर्ष दीड वर्षाने माझा पगार वाढला तेव्हा इन्कम टॅक्स वाचवायला मला पैसे कुठेतरी गुंतवायचे होते. सेव्हिंग नावाचा प्रकार आयुष्यात कधी केला नाही. त्यामुळे खिसा रिकामा होता. म्हणून फक्त एक ट्राय मारायला त्याला कॉल केला. अर्थात असे आयत्यावेळी पैसे मिळाले नाहीतच. आणि त्यापुढे मी ते पैसे कायमचे विसरून गेलो.

मग काही वर्षांनी माझे लग्न झाले. काही वर्षांनी मला मुलगी झाली. काही वर्षांनी तिचा कुठलातरी वाढदिवस मी साजरा करत असताना तो मित्र बिन बुलाये आला आणि मला म्हणाला अरे तुझे पंधरा हजार द्यायचे होते ना मला, हे घे.. म्हणून माझ्या हातात बळेच कोंबून गेला.

तब्बल दहा वर्षांपूर्वी घेतलेले पैसे तो परत करत होता. मला तर अगदी लॉटरी लागली, वाढदिवसाचा खर्च सुटला असे झाले.

गंमत म्हणजे माझा पगार साडेबारा हजार असताना मला त्याला इतके पैसे द्यायचे काही वाटले नव्हते कारण स्वतःचा असा काही खर्चच नव्हता.
आणि नंतर पगार काही पटीत वाढला असून देखील त्या अचानक परत मिळालेल्या पंधरा हजाराचे काय अप्रूप वाटले म्हणून सांगू .. कारण तेव्हा संसार चालू झाला होता. त्या पैशाला किंमत आली होती Happy

त्या दिवशी एक समजले की किंमत पैशाला नसते तर वेळेला असते!
(हे आपले उगाच. कारण हे बरेच प्रसंगात सर्वांनाच समजतेच)

तर आता इकडे कोणी असे बोलून दाखवू नये की कसा आहे हा माणूस, जे मित्राला दिलेले पैसे बोलून दाखवतो..
तर त्यांना सांगू इच्छितो, की नंतर तो मित्र बीएमसी मध्ये कामाला लागला आणि छापू लागला तसे त्याने माझ्यावर बरेच पैसे खाण्यापिण्यात उधळले आहेत.

धमाल धागा आणि किस्से. बॅलन्स विचारणे हे फार भारी आहे Happy

पैसे मागेपर्यंत गरीब बिचारे असणारे लोक नंतर एकदम १८० अंशात बदलून बेरकी झालेले अनेकदा पाहिलेले आहेत. "असे लोक आपल्याला सोर्स म्हणून पाह्तात" असे अमांनी कोठेतरी लिहीलेले आठवले.

लोकांच्या अशा वागण्याचा परिणाम म्हणजे सर्वच गरीब लोकांबद्दल एक प्रतिकूल मत तयार होते. २-४ लोक असे वागले की या चोर लोकांना एक पैसा द्यायला नाही पाहिजे, यांची हीच लायकी आहे वगैरे वगैरे वाटू लागते व त्यातून खरे गरजवंत भरडले जातात. जेथून मिळेल तेथून फुकट पैसा घेऊन नंतर निर्विकारपणे त्याबद्दल विषयही न काढणे, घेतलेल्या पैशांबद्दल कसलीही सचोटी न दाखवणे, त्याची किंमतही नसणे ई गुणांनी युक्त असे बरेच लोक आहेत. जेन्युइन गरजवंतांमधून यांना कसे ओळखायचे हा खरा प्रश्न आहे Happy

मी कधी भिडस्त तर कधी अगदी व्यवहारी असे अनेक वेळा वागलो आहे व त्यातील काही वेळा आपण जरा जास्तच केले असे दोन्ही बाबतीत वाटलेले आहे Happy

त्रासदायक, करूण असे सगळ्याच प्रकारचे अनुभव येतात.

मुलगी बरीच चलाख आहे आणि खरे कारण सांगत नाही. तिला तुम्ही मदत केली नाही हे बरेच केले. ती मदत घेऊन तुम्हाला डच्चू देऊन पळून गेली असती असे मला वाटले. परतफेडीचा प्रश्नच आला नसता कदाचित. अकाउंट मधे अचानक ८५००० आल्यावर फीचा आधी विचार यायला पाहिजे.

तुम्ही मस्त लिहिता. अजून अनुभव लिहा.

मी मदत करण्याआधी माझ्या गट वर विश्वास ठेवतो. म्हणजे एखादा किती अडचणीत आहे हे जेन्युइनली कळतेच. जराही काळेबेरे असेल तर मी सरळ नाही म्हणतो.

मी नुकतेच माझ्या मित्राला दुकान सुरू करण्यासाठी बरेच पैसे उधार दिले. येत्या एप्रिलच्या आधी परत करतोय म्हणाला आहे. मला तर अजिबात खात्री नाही परत करेल याची.

पण कोणत्याही अडचणीला धावून येतो, कोणतेही काम अगदी ना लाजता स्वतःचे म्हणून करतो. मैत्री मधे पैसे आणल्यावर वितुष्ट येते तसे येऊ नये म्हणजे झाले. माझ्या आईला सांभाळून घेतो. त्यामुळे मी मदत केली. आधी व्याजावर देणार होतो पण त्याने दुकानासाठीच पतसंस्थेचे व्याज काढले आहे म्हणून व्याजावर दिले नाही.

तिला तुम्ही मदत केली नाही हे बरेच केले. >>> मला स्वतःच्या खिशातून एका रुपयाचीही मदत करायची नव्हती. त्याबाबतीत मी अगदी ठाम होते. खरंच गरजू असेल तर अशा मुलांना मदत करणाऱ्या संस्थेशीच गाठ घालून द्यायची होती. ती करता आली नव्हती म्हणून मला सुरुवातीला जरासे वाईट वाटले. पण स्कॉलरशिपचे पैसे उडवून टाकले हे कळल्यावर आपल्याकडून मदत करायची नाही हे नक्की झाले. नंतर तर अकाउंट बॅलन्स विचारून तिने थोडीफार जी काही चांगली इमेज उरली होती तीही घालवून टाकली. यापूर्वी मी नित्यनेमाने एका म्हाताऱ्या जोडप्याला मदत केली आहे. त्यांची अवस्था खूप जास्त वाईट होती. त्यांना खरंच गरज होती. पण तिथेही अनुभव असा आला की आपल्याकडून कितीही पैशांची मदत असेल ती मिळेलच असं गृहीत धरलं जात आहे.

जनहितार्थ सुचवलेल्या उपायांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडेल. पुढच्या वेळी करोडो रूपयांना चुना लागेल. आपल्याला काय करायचे!

एक लेखक, खरं सांगू तर अतिशय पांचट विनोद होते, त्यामुळे तुम्हाला प्रतिसाद मिळाला नाही.

राजकारणावर लिहीत नसल्याने तुमच्या सारखे दर्जेदार सभ्य शिकलो नाही अजून. तुमचे धागे वाचून प्रतिसाद कसे वाढतील याचा अभ्यास करीन. Lol
https://www.maayboli.com/node/86668

https://www.maayboli.com/node/86668

अशा धाग्यावर जे भरपूर प्रतिसाद आलेत ते कशामुळे याचं तुमचं जबरदस्त विश्लेषण नक्की वाचनीय असेल.

आणि कितीही खुंदक काढली तरी इथले माझे मत तेच राहील Rofl
https://www.maayboli.com/node/87631

पण पांचट विनोद आपल्या धाग्यपुरतेच ठेवावेत ही विनंती, एखाद्या स्वच्छ रस्त्यावर पो टाकून काय मिळते? आपण विनोदवीर असाल तर आपले धागे गाजवा, इतरांना बोर मारू नका.

एखाद्या मान्यवर आयडीने सांगितले तर नक्कीच विचार करेन. शिवराळ आणि बेताल आयडीचे का ऐकेन? Lol

तुझ्या लिखाणाला किती दाद मिळाली ते पाहून डोळे निवले.

आदाआओ.
आपणच एकटे बळी पडलो नाहीत ही भावना सुखद वाटतेय. Happy

बऱ्याच वेळा आपण दिलेले पैसे विसरतो, तुम्हीही विसरला असाल, लक्षातही नसेल कुणाला किती दिले ते, मी एक यादी बनवली आहे, त्यात कुणावर किती बाकी ते लिहून ठेवतो, एका ओळखीच्या टॅक्सी चालक मालकाने २० हजार घेतले होते १.५ वर्ष दिले नाही, फोन केला तर काहीतरी सांगुन अर्धा तास पकवत बसायचा, त्याला फोन करायचा म्हटलं की भीती वाटायची, शेवटी एकदा त्याची गाडी वापरली नि व्यवहार सेटल केला, कुणी २ हजार, ३ हजार अशे घेतलेत, त्यांनी माझा नंबर ब्लॉक केला आहे,
त्यातले खरच किती परत येतील सांगता येत नाही. आता कुणी अचानक फोन केला तर समजून जातो की पैसे पाहिजेत, फोन उचलल्या वर समोरचा बोलला की मदत पाहिजे तर त्याला “पैसे सोडून काहीही सांग” असे उत्तर देतो.
पैसे गेल्याचे दुःख नसते तर कुणीही आपल्याला फसवते ह्याचे दुःख मोठे असते.
अमुक तमुक आजारी आहे, मुलाच्या शाळेला पैसे पाहिजे वगैरे वगैरे कुणी कारण सांगितले यारी आजीबात भावनिक व्ह्यायचे नाही, कितीही जवळचा असला नी लगेच देतो वगैरे गोष्टींवर विश्वास ठेवायचाच नाही, स्पष्ट नाही सांगायचे. मागे एका ngo मधील बाईचा फोन होता, बाळ एडमिट आहे ६ महिन्याचे वगैरे, तातडीचे ऑपरेशन आहे, पैसे टाका वगैरे, मी जास्त न बोलता फोन कट केला तर नंतर दोन चार वेळा फोन करून “केव्हा टाकताय” वगैरे विचारत होती जसे तिचे मी देणे लागत होतो, तिला चांगले झापले, परत फोन केलास तर याद राख बोललो.
काही मुली रस्त्यात किंवा मॉल मध्ये गाठतात, सुरुवातीला छान शर्ट घातलाय वगैरे वरून सुरू करून मग डोनेशन द्या सांगतात, मी सरळ मी बँक्रप्ट आहे, खिशात छदाम नाही सांगून सरळ निघतो.
एका मित्राने पैसे घेतलेत २ वर्ष झाले अजून देत नाहीये, त्याला आज सकाळी मेसेज केला तर हे उत्तर आले,
Nahi re **** bekkar tangi chalu ahe hospital chalu ahe
Takto me thode tri month end la

तुझ्यासारख्या रासवट, तुसड्या आणि उर्मट माणसाकडे कशाला कोण पैसे मागेल ? उगाच काहीच्या काही फेका मारतो.
तुझा तू धागा काढ आणि तिकडे काय घाण करायची ती कर. Lol

Pages