पुणे पुस्तक महोत्सव - २०२५

Submitted by संप्रति१ on 13 December, 2025 - 04:53

फर्ग्युसनच्या ग्राऊंडवर १३ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत पुस्तक महोत्सव आहे. यंदाचं तिसरं वर्ष. चांगलं आहे.‌ आज फक्त वरवरनं रेकी करावी, कुठं कुठं काय काय आहे? 'आपल्या कामाचे' स्टॉल्स कुठं कुठं आहेत हे बघून ठेवावं, असा माफक उद्देश होता जाण्यामागं. तर त्याप्रमाणे खरीदो-बेचो (B35), नॅशनल बुक ट्रस्ट(C1), वॉल्डन (A17), सस्ता साहित्य मण्डल(E8), आरके पब्लिकेशन (F23), राजपाल प्रकाशन (F41), राजकमल प्रकाशन (G10) असे काही हेरून ठेवलेत सध्यातरी.

तर आज काय फक्त सहज बघून यायचं आहे, आज खरेदीबिरेदी काही करायची नाही, मागच्या महोत्सवांत केला तसा हावरेपणा करायचा नाही, आता आपण मॅच्युअर झालो आहोत, त्यामुळे डोममध्ये आत शिरल्यावर कुंडलिनी जागृत झाल्यासारखे वेडेचाळे करायचे नाहीत, किंवा इथं सासुरवाडी असल्यासारख्या रोजरोज घिरट्या तर बिलकुलच घालायच्या नाहीत, वगैरे काहीतरी ठरवलं होतं जाताना, पण तरीही काही पुस्तकं 'मला घे' 'मला घे' म्हणत लहान मुलांसारखी मागेच लागली. हातपाय आपटत भोकाड पसरून रडायलाच लागली अगदी. काय करणार मग!

बाकी चालून चालून पाय दुखण्याच्या प्रॉब्लेमला यावेळी जरा टॅक्टफुली हाताळावं लागेल असं दिसतंय. डोममध्ये मधल्या पॅसेजेसमध्ये लोकांना थोडंफार बूड टेकण्यासाठी काहीतरी सोय केली असती आयोजकांनी तर बरं होतं.‌ पण असो.
एकूण हा सगळा पेशवाई पंगतीचा थाट वगैरे. त्यातला आजचा हा समजा स्टार्टरच्या आधीचा स्टार्टर.‌ पहिला राऊंड. किंवा तत्सम तोंड खवळणं वगैरे.
IMG_20251213_124150~2.jpg

आता पुढं आठवडाभर कसकसले मेनकोर्सेस, Desserts, मुखशुद्धी इत्यादी मध्ये अजून काय काय येतंय ते बघायला लागेल. त्यासाठी जागा मोकळी करायला घ्यावी लागेल. आणखी नवनवीन चळती येण्याची दाट शक्यता दिसायला लागली आहे. त्या काय आपण रोखू शकत नाही.

IMG_20251213_094615~2.jpgIMG_20251213_120016~2.jpgIMG_20251213_120414~2.jpgPS: धागा पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने काढलेला आहे. तर त्याशी संबंधित माहिती, अपडेट्स, प्रतिसाद, अनुभव, टिप्स, वगैरे लिहायचे असतील यू आर मोस्ट वेलकम..!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही वर्षांनी एखाद्या स्टॉलवर मला भेटण्याचा योग तुम्हाला येईल. सध्या तरी हे प्रदर्शन वाचकांसाठीच असल्याने जाणार नाही.
नाहीतर याच वर्षी तुमची आणि Sparkale ची भेट झाली असती. Sparkle या आयडीला माझ्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे तो असोच.

सम्प्रति मराठीतली नवीन पुस्तकान्ची यादी टाका की. या वर्शी भेट द्यायची सन्धी आहे मला.

@ संप्रति१,

"छबीला रंगबाज का शहर" कथासंग्रह आहे की पूर्ण कादंबरी ?

जमल्यास योग्य जागी या आणि तुम्ही घेतलेल्या अन्य पुस्तकांचा परिचय लिहाल ? मागच्या वर्षी खूप छान लिहिले होते तुम्ही.

पुस्तकं आहेत तेंव्हा तिथं भेट देणं आलंच ; शिवाय, माझ्या मुलीचंही कुमार वयोगटासाठी लिहिलेलं पुस्तकही माझ्यासाठी महोत्सवातील खास आकर्षण आहेच. (स्टॉल - E 5 ) - बघा जमलं तर तुम्हीही भेट देवून.
.
IMG-20251213-WA0020_1.jpg

अनिंद्य,

<<छबीला रंगबाज का शहर" कथासंग्रह आहे की पूर्ण कादंबरी ?>>
दीर्घकथांचा संग्रह आहे. ॲक्चुअली काशीनाथ सिंह म्हणून एक जबरदस्त लेखक आहेत, त्यांनी या पुस्तकाबद्दल कव्हरवर फारच कौतुक केलेलं दिसलं म्हणून मी ते उचललं.

<<जमल्यास योग्य जागी या आणि तुम्ही घेतलेल्या अन्य पुस्तकांचा परिचय लिहाल ?>>
होय!.
असं नुसतं पुस्तकांच्या नावावरून फारसा बोध होत नाही, एकेका पुस्तकाचं फक्त शीर्षक वाचून त्यात काय आहे, याची काही कल्पना येत नाही. प्रत्येक पुस्तकाच्या नावाबरोबरच त्याबद्दल थोडक्यात परिचयात्मक टिपण लिहिलं गेलं तर ते जिज्ञासूंसाठी जास्त उपयुक्त ठरेल, हे लक्षात आलेलंय. पण काही वेळा जेनेटिक आळसामुळे तर बऱ्याच वेळा 'या पुस्तकाबद्दल काहीही लिहिण्याची आपली कुवत नाही. आयुष्यातला बराचसा भाग खर्ची घालून लिहिलं गेलेलं दिसतंय हे पुस्तकं, आपण थोडक्यात काय सांगणार त्याबद्दल?' असं काहीतरी प्रामाणिकपणे वाटल्यामुळे, लिहिलं जात नाही. असो. पण प्रयत्न करेन नक्की Happy

टवणे सर,
अलीकडच्या आवडलेल्या मराठी पुस्तकांची यादी टाकतो थोड्या वेळाने. Happy

भरत,
थॅंक यू.!

हो तेच. Happy
पण काशी का अस्सी पेक्षा त्यांची ' रेहन पर रघ्घू' जास्त चांगलीय.. साहित्य अकादमी कडून मराठी अनुवाद पण झालाय तिचा.. कविता महाजनांनी केलाय बहुतेक.

'याद हो कि न याद हो' म्हणून एक संस्मरण पण चांगलंय त्यांचं.. म्हणजे हिंदीतल्या इतर लेखकांशी असलेल्या त्यांच्या नात्याच्या आठवणीवजा कम् नॉस्टॅल्जियात्मक कम् व्यक्तिचित्रणात्मक दीर्घलेख आहेत.. हिंदी लेखकांमध्ये अशी उत्तम संस्मरणं वगैरे लिहिण्याची पद्धतच आहे बहुतेक, मराठीत त्यामानाने फारच कमी...

@ टवणे सर, यातली बघा कशी वाटतायत. कदाचित काही तुम्ही वाचलेली असतीलही.

गुरू- नितीन कोतापल्ले (सायन प्रकाशन)
निळावंती- नीतीन भरत वाघ (न्यू इरा)
कळीकाळ-- बालाजी घारूळे (हर्मिस)
दाट काळा पाऊस -- भारत सासणे (मॅजेस्टिक)
अखेरीस नयनाची गोष्ट- श्याम मनोहर (पॉप्युलर)
आपुले आपण - जैत (राजहंस )
अयोध्या-- जी के ऐनापुरे (हस्ताक्षर)
तुरूंगरंग - रवींद्रनाथ पाटील (मनोविकास)
खून पहावा करून --इमॅन्युअल व्हिन्सेंट सॅंडर (सांगाती प्र.)
कानविंदे हरवले -- हृषीकेश गुप्ते (मॅजेस्टिक)
माया महा ठगनी-- संवेद गळेगावकर (न्यू इरा)
सिद्ध-- राजन खान (संधिकाल प्र.)
कुब्र -- सत्यजीत पाटील (शब्दालय)
हमरस्ता नाकारताना -- सरिता आवाड (राजहंस)
रूळानुबंध -- गणेश मनोहर कुलकर्णी (शब्दमल्हार)
हरवलेल्या कथेच्या शोधात--सीताराम सावंत (लोकवाड्मय गृह)
भुई भुई ठाव दे - सीताराम सावंत (लोकवाड्मय गृह)
बिन्दूनादकलातीत-- महेश एलकुंचवार (मौज)
पत्र आणि मैत्र -- दिलीप माजगावकर (राजहंस)
पुरोगामी-- राकेश वानखेडे (लोकवाड्मय गृह)
भास १०.२४-- भास प्रकाशन
भास १०.२५-- भास प्रकाशन

अनुवादित :

मनुष्य होने के संस्मरण- देवीप्रसाद मिश्र (अनु. 'माणूस असण्याच्या आठवणी', गणेश विसपुते, पपायरस)

अबुझमाडचे अनुनाद- नरेन्द्र( अनु. अवधूत डोंगरे, पपायरस)

ॲन आयलंड - कॅरन जेनिंग्ज (अनु.‌ संकेत लाड, मेहता प्र.)

सत्तर तासांपूर्वी -- आयफर टंक (अनु. श्वेता प्रधान, पॉप्युलर)

द मास्टर ऑफ पीटर्सबर्ग-- जे एम कुट्सी (अनु. पीटर्सबर्गचा उस्ताद, अवधूत डोंगरे, वॉल्डन प्र.)

द ऑड बुक ऑफ बेबी नेम्स - अनीस सलीम (अनु. मुग्धा गोखले, 'बाळांच्या नावांची अनोखी डायरी', मेहता प्र.)

मधसूर्यछाया- रोन्या ओथमान (अनु. राजेंद्र डेंगळे, पपायरस)

बॉर्न अ क्राईम - ट्रेवर नोआ (अनु. आभा पटवर्धन, मनोविकास प्र.)

मृत्यूकथा: नक्षली भूमीतील स्वप्ने आणि भ्रम - आशुतोष भारद्वाज (अनु. सविता दामले, मधुश्री प्र.)

नाव (द रूम)— दानियल केलमान (अनु. श्रीकांत पाठक)

सिंधूतील साम्राज्ये- ॲलिस अल्बिनिया( अनु. श्याम नारायण पाठक, इंडस सोर्स प्र.)

मस्त धागा संप्रती
ही तर पुस्तक पंढरीची वारी !
माबोकर कोणी भेटलं तर उत्तमच

भाऊ नमसकर
ग्रेट ! मुलीचं अभिनंदन !

संप्रति१,

तुम्ही मेंशन केल्याने उत्सुकता वाटली आणि रेहन… चा हा अल्पपरिचय वाचला :

‘रेहन पर रग्घू’ में वास्तविकताओं, चरित्रों, लोकेल, उपकथाओं आदि का ऐसा सधा हुआ अकाट्य अन्तर्गुम्फन है कि उसे एक प्रौढ़ रचनात्मकता के रूप में दर्ज किया जाना चाहिए। देशज सच्चाइयों, कल्पना, काव्यात्मकता, झीनी दार्शनिकता का सहमेल उपन्यास को मूल्यवान आभा से समृद्ध बनाता है।

—अखिलेश

महोत्सवाला खूप चांगला प्रतिसाद आहे .
तिथे अनेक भाषांमधली पुस्तकं आहेत
पण खूप नवीन - मराठी अर्थात , उत्तम पुस्तक आली आहेत . सुदिन !

आतापयंत तीन वेळा गेलो , पण ते कामासाठी
त्यामुळे प्रदर्शन पहायचं राहिलं आहे . पुढचे तीन दिवस जायचा विचार आहे .

काल अनंत सामंत - एम टी आयवा मारू - यांना पहिल्यांदाच भेटण्याचा योग आला . मग चहा न गप्पा .
माझा आवडता ग्रेट लेखक ! संधी अचानक मिळाली .

चिनुक्स यांची भेट झाली . अचानक - हाही धक्काच !

मला ८ मुलाखती घेण्याची संधी यंदा मिळाली .

प्रा . अरविंद गुप्ता - विज्ञान खेळणी
आनंद घैसास - अनेक विज्ञान पुस्तकं

रवी आमले - पुस्तक - raw - गुप्तचर संघटना
नीलांबरी जोशी - पुस्तक - मनकल्लोळ - मनोविकारांची उत्तम माहिती
वंदना भागवत - पुस्तक - एज्युकेटेड - अमेरिकेच्या आपल्या कल्पनांना धक्का देणारा अनुवाद

राजीव तांबे - पुस्तक - पकोडी , विकोडी - पक्षी कोडी व रंजक शास्त्रीय माहिती
प्रा मंदार दातार - फुल उमललं विश्व बदललं - फुलाची रंजक शास्त्रीय माहिती
डॉ दीक्षित - विनासायास वेट लॉस व मधुमेह मुक्ती - दीक्षित डाएट- ट्रेंडिंग

ज्या क्रमाने मुलाखती होत्या -

प्रदर्शन जरूर पहा .

आभार

आमचं थोडक्यात हुकलं हे प्रदर्शन!
फेसबूकवर खूप फोटो व्हिडोयो येत आहेत. चांगलं वाटतं आहे एकूणात.

बिपीन सांगळे, मस्तच!

बऱ्याच वेळा 'या पुस्तकाबद्दल काहीही लिहिण्याची आपली कुवत नाही.आयुष्यातला बराचसा भाग खर्ची घालून लिहिलं गेलेलं दिसतंय हे पुस्तकं, आपण थोडक्यात काय सांगणार त्याबद्दल?' असं काहीतरी प्रामाणिकपणे वाटल्यामुळे, लिहिलं जात नाही. असो. पण प्रयत्न करेन नक्की Happy >>> प्लिज लिहा .
तुमची परीक्क्षणं इतर शोधून काढलेल्या परिक्षणा पेक्षा वेगळी असतात. कुवत नाही म्हणून असं तुमच्या आतल्या लेखकाला अंडरेस्टींमेट करू नका तुमच्या महोत्सवाच्या पुस्तक परिक्षणाची आम्ही वर्षभर वाट पाहत असतो. तुमची पुस्तकांची चॉईस युनिक आहे. हल्लीच्या हिंदी पुस्तकांबद्दल तर मला काहीच माहिती नव्हती ती तुमच्या मुळे मिळाली. त्यामुळे सविस्तर परीक्षण लिहा ,स्पेशली कथासंग्रहाबद्दल ,त्याबद्दल फार उत्सुकता आहे.

भाऊ ,
ग्रेट ! मुलीचं अभिनंदन !

मला दुर्दैवाने फक्त रविवारी सकाळी/दुपारी जायला जमणार आहे. रविवारी स्टॉल्स असतील की गुंडाळले गेले असतील. काही कल्पना?

या प्रदर्शनात झालेल्या गैरसोयीबद्दल गजू तायडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फेसबुकवर पोस्ट वाचली त्यांची

या प्रदर्शनात झालेल्या गैरसोयीबद्दल गजू तायडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फेसबुकवर पोस्ट वाचली त्यांची>>>>>>>> होय.
मी ही त्यावर पोस्ट टाकली आहे
https://www.facebook.com/prakash.ghatpande/posts/pfbid0MF3AtaRJSwTB8Jpw9...

अरेच्चा! तुम्ही अंताजीच्या बखरी वाचल्या नव्हत्या काय अजून !
'वाचून उरणारी पुस्तकं' पण चांगलंय.. त्यात अजून काही हिंदी नावं सापडली.
पंकज भोसलेंचं 'बुकहुंदडकी' येतं आहे आज तिथे 'रोहन'च्या स्टॉलवर.
दाट काळा पाऊस पण चांगलंच आहे त्यातली मदन मोहन मालवीयांच्या पार्श्वभूमीवरची एक दीर्घकथा मला फारच आवडलेली.

दामले मास्तर म्हणजे चिनूक्स का?
..........
हे प्रदर्शन नेहमी याच तारखांना भरते का? याच काळात माबो मिनी गटगे ठेवता येतील का?
...........
@संप्रति१, माबो मराठी असले तरी काही लेख तुम्ही हिंदीतही लिहावे.

अन्ताजीन्च्या बखरी वाचल्या आहेत ना म्हणुनच घेतल्या - सन्ग्रही नव्हत्या. ९९-२००० च्या आसपास अन्ताजी वाचला होता तो पुन्हा वाचायचा होताच.

आज जमले तर साधना च्या स्टॉल वर जाउन येईन. कोणि येणार आहे का?

साधना च्या स्टॉलवर स्वामी रामानंद तीर्थांची डायरी असेल, तसेच आनंद करंदीकर आणि विनय हर्डीकरांची पुस्तकं पण बघा कशी वाटतायत.
माझा एक लास्ट राऊंड होईल संध्याकाळी.

@ संप्रती, मला जायला नाही जमले आज सन्ध्याकाळी. जर तुम्ही हा मेसेज बघुतला तर साधना च्या स्टॉल वरुन माझ्यासाठी पुस्तके उचलाल का?

Best Sellers in Marathi

इंग्लजी कसे बोलावे ?
सूल्यनमस्कार - फायदे
गोली कांती कशी मिलवावी
श्लीमंत कसे व्हावे ?
मुलं नापास का होतात ?
मूल होन्याचे १०१% उपाय
गुप्तधन कसे मिलवावे ?

सगळे काही भव्य दिव्य होते. पण टॉयलेट... त्याबद्दल घाटपांडे सरांनी लिहिले आहेच.
अजून एक मला "गॉगल लावलेला घोडा " हे पुस्तक पाहिजे होते. हे पुस्तक पपायरस पब्लिकेशनचे आहे. आता मी नेट वर बघितले तर हे पब्लिकेशन वजनदार दिसतंय, पण ह्यांचा स्टॉल प्रदर्शनात नव्हता. शेवटी एका परामात्न्याने मदत केली आणि स्टॉल चा क्रमांक सांगितला. तो कुणा वाल्डेन नामक पब्लिकेशनचा होता, त्याच्या कडे सुदैवाने एक प्रत होती.
मला एव्हढेच म्हणायचे आहे कि एखादा मार्गदर्शक संगणक घेऊन बसला असता तर बरे झाले असते.
बाकी सुहाना कडचा वडापाव मस्त होता. सुहानाला पब्लिकला लुटायचा छान चान्स होता पण त्यांनी तसे काही केले नाही हे नमूद करावेसे वाटले.

Pages