महाराष्ट्र - त्रिभाषा धोरण - (पहिलीपासून हिंदी सक्ती?)

Submitted by भरत. on 8 October, 2025 - 02:32

या शैक्षणिक वर्षाच्या आरंभी महाराष्ट्र शासनाने मराठी माध्यमाच्या शाळांत पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून जनक्षोभ उडाल्यानंतर तो स्थगित केला. राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाला. या समितीत भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक डॉ. वामन केंद्रे, शिक्षणतज्ञ डॉ. अपर्णा मॉरिस, डेक्कन महाविद्यालयाच्या भाषा विज्ञान प्रमुख सोनाली कुलकर्णी, शिक्षणतज्ञ डॉ. मधुश्री सावजी आणि बालमानसतज्ञ डॉ. भूषण शुक्ल हे सदस्य असतील, तर समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. ही समिती तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे.

समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने https://tribhashasamiti.mahait.org हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे.
संकेतस्थळावर त्रिभाषा धोरणाबाबत जनमत व सूचना एकत्रित करण्यासाठी एक प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.

https://tribhashasamiti.mahait.org/Site/1577/Questionnaire
सर्व नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट देऊन प्रश्नावलीमधील माहिती भरावी, आपले मत व सूचना नमूद कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे उपसंचालक (प्रकल्प/प्रशा) संजय डोर्लीकर यांनी केले आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तज्ज्ञ समिती नेमल्यावर जनमत आजमवण्याचे कारण कळले नाही. पुढे जाऊन - बघा लोकांनाच हे हवं आहे, असं म्हणायची सोय असू शकेल.
तर प्रश्नावली गुगल डॉकच्या स्वरूपात आहे.
मराठी, इंग्रजी व अन्य माध्यमातील शाळांसाठी वेगवेगळ्या प्रश्नावली आहेत.
मराठी माध्यमासाठी
त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी कोणत्या इयत्तेपासून करावी?
दुसरीपर्यंत गाणी, खेळ, अक्षरओळख या करिता कोणकोणत्या भाषांचा वापर करण्यात यावा?
इंग्रजी भाषेचे वाचन , लेखन कोणत्या इयत्तेपासून करावे?
इंग्रजी संभाषणकला व इंग्रजी भाषेतून सादरीकरणाचे कौशल्यशिक्षण कोणत्या इयत्तेपासून
हिंदी भाषेचे वाचन, लेखन कोणत्या इयत्तेपासून करावे? - एक पर्याय कधीही नाही असाही आहे.
आठवीपासून मराठी, इंग्रजीसह कोणते पर्याय असावेत यात संपूर्ण हिंदी / संस्कृत / पाली / अर्धमागधी किंवा हिंदीसोबत संस्कृत / पाली/ अर्धमागधी / उर्दू / अरेबियन / पर्शियन यांचा समावेश आहे.
माहिती तंत्रज्ञान / संगणक कोणत्या इयत्तेपासून शिकवावे?
राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने मराठी, इंग्रजी आणि हिंदी याव्यतिरिक्त कोणतीही भारतीय भाषा किंवा जागतिक दृष्टीकोनातून कोणतीही परकिय भाषा (सवलतीचे वाढीव गुण देऊन) संगणकीय ॲपवर स्वयंचलित, स्वयंप्रमाणित या तत्वावर विद्यार्थ्यांनी शिकावी का ?

सध्या मराठी माध्यमाच्या शाळांना पाचवीपासून हिंदी अनिवार्य आहे. आठवीपासून हिंदी वगळून किंवा घेऊन इतर भाषांचा पर्याय आहे.

इंग्रजी माध्यमासाठी गुगल डॉक
या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी अनिवार्य आहेत. पाचवी ते सातवी संपूर्ण हिंदी किंवा हिंदी + मातृभाषा.
आठवीपासून हिंदी (संपूर्ण) किंवा संस्कृत (संपूर्ण) किंवा हिंदी + (संस्कृत / पाली / अर्धमागधी / फ्रेंच / जर्मन / रशियन / गुजराती / कन्नड / तामिळ / तेलगू / बंगाली / सिंधी / उर्दू / पर्शियन / अरेबिक या पैकी एक (50:50 विभागून)
म्हणजे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हिंदी / उर्दू खेरीज इतर भारतीय भाषा व इंग्रजीखेरीज इतर पाश्चात्य भाषा शिकायचा पर्याय नाही.

फॉर्म शेअर केल्याबद्दल आभार भरत...........

गूगल फॉर्म चेक केला. त्यात खालील प्रश्नासाठी तुम्ही एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता असे म्हटले आहे.

१. आठवीपासून मराठी, इंग्रजीसह कोणते पर्याय असावेत. यात संपूर्ण हिंदी / संस्कृत / पाली / अर्धमागधी किंवा हिंदीसोबत संस्कृत / पाली/ अर्धमागधी / उर्दू / अरेबियन / पर्शियन यांचा समावेश आहे.
पण इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठीच्या प्रश्नावलीत एकापेक्षा जास्त पर्याय निवडता येत नाहीत.
इतर भाषांच्या प्रश्नावलीत निवडता येतात.

२. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, सिंधी हे पर्याय ८वीनंतर हिंदीसोबत ५०% अव्हेलेबल आहेत. पण इतर कुठल्या माध्यमांना नाही.

३. इंग्रजी सोडल्यास इतर कुठल्या माध्यमाच्या शाळांना ८वीनंतर तिसरी भाषा म्हणून रशियन, अरेबिक, फ्रेंच, जर्मन हे पर्यायच उपलब्ध नाहीत.

४. तिसऱ्या भाषेसाठी हिंदी माध्यमाच्या शाळांना संपूर्ण हिंदी व संपूर्ण संस्कृतसोबत संपूर्ण पाली आणि संपूर्ण अर्धमागधी हा पर्याय उपलब्ध आहे. पण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पाली, अर्धमागधी ५०% हिंदीसोबतच उपलब्ध आहे.

५. हिंदी/मराठी/इंग्रजी नसलेल्या माध्यमाच्या शाळांना संपूर्ण हिंदी, संपूर्ण संस्कृतचा पर्याय उपलब्ध नाही. त्यांना ५०% पर्शियनचा (हिंदीसोबत) किंवा 50% अरेबिक (हिंदीसोबत) पर्याय उपलब्ध आहे जो हिंदी माध्यमाला नाही.

६. ८वीनंतर तिसरी भाषा म्हणून जे पर्याय आहेत ते अक्रॉस मीडियम्स कॉमन असायला हरकत नव्हती. तिथे प्रचंड गोंधळ आहे.

पाली, अर्धमागधीविषयी आकस नाही किंवा त्यांना मी गौण मानत नाही पण त्यांचा ऑप्शन देऊन काय साध्य केले आहे हे माहीत नाही. आणि इतर भारतीय भाषाचे ऑप्शन दिलेत तर मग ओडिया, काश्मिरी आणि पंजाबीने काय घोडं मारलं होतं? (पंजाबी शिकली मुलं तर निदान कशावर नाचतोय हे तरी समजेल त्यांना. असो. )

बरं फॉर्ममध्ये ई-मेल आय डी मागितला ठीक आहे. फोन नंबर कशाला हवा? काय जो युनिक कन्स्ट्रेट लावायचा तो ई-मेल आयडीवर लावता येणार नाही का?

आता या सगळ्याची तक्रार कुठे करायची हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

फक्त फार्स, काही अर्थ नाही. किती लोक भरणार आहेत तो फॉर्म. अशी काय पब्लिसिटी केली का आहे याची की जास्तीत जास्त लोकांना हे असलं काही करायचं आहे तिसरी भाषा नको असेल तर हे माहिती होईल...
त्यांच्याच लोकांकडून भरून घेऊन नंतर जनमत बाजूने आहे असं दाखवायला बरं

राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने मराठी, इंग्रजी आणि हिंदी याव्यतिरिक्त कोणतीही भारतीय भाषा किंवा जागतिक दृष्टीकोनातून कोणतीही परकिय भाषा (सवलतीचे वाढीव गुण देऊन) संगणकीय ॲपवर स्वयंचलित, स्वयंप्रमाणित या तत्वावर विद्यार्थ्यांनी शिकावी का ?>>>>
इथे शब्दांचा खेळ केला आहे, इथे बाय डिफॉल्ट हिंदीला जमेत धरून करून मोकळे झाले आहेत खरा प्रश्न खालील प्रमाणे हवा होता (हा फॉर्म महाराष्ट्राकरीता आहे हे ध्यानात घेता)

- राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हिंदी याव्यतिरिक्त कोणतीही भारतीय भाषा किंवा जागतिक दृष्टीकोनातून कोणतीही परकिय भाषा (सवलतीचे वाढीव गुण देऊन) संगणकीय ॲपवर स्वयंचलित, स्वयंप्रमाणित या तत्वावर विद्यार्थ्यांनी शिकावी याबाबत तुम्ही सहमत आहात का ?

मला त्याचा अर्थ असा लागला की या इतर भाषांचं प्रत्यक्ष शिक्षण देण्याची सोय करणं अवघड आहे, त्यामुळे त्यासाठी संगणकाधारित स्वयंशिक्षण पर्याय असावा का?
पहिलीत तिसरी भाषा हवीच, पण ती हिंदीच अनिवार्य नाही असे वळसे घेतले तेव्हा, मग हिंदीव्यतिरिक्त अन्य भाषेसाठी शिक्षक नसतील तर ऑनलाइन शिक्षण देऊ असे इमले आधीही बांधले होते

>>>>धन्यवाद.
नो प्रॉब्लेम, युअर थ्रेड - युअर रुल्स.

विषय काय आहे? त्याची पार्श्वभूमी माहीत आहे का? हा गप्पांचा धागा नाही. कृपया थांबा.

भरत हे मला उद्देश्युन आहे का? मी फक्त धन्यवाद ला उत्तर दिलेले आहे. आय हॅव्ह रिस्पेक्टेड युअर विश. हे समजुन घेणे इतके अवघड आहे का? हे माझे शेवटचे उत्तर आहे.

तज्ज्ञ समितीने जनमत अजमावण्यात तसं काही चूक नाही ना?
तज्ज्ञ म्हणजे विषयाची थोडी अधिक माहिती, दृष्टीकोन, परिप्रेक्ष असलेले लोक. ते जरी असतील तरी कलेक्टिव्ह बुध्यांक हा कधीही अधिकच असतो. तसेच जनमानसाचा कल आजमावूनच योग्य निर्णय घ्यावा. तो पोलिटिकली गळी उतरवणे, पाहुण्याच्या लाठीने साप मारणे, ड्युडिलिजंस, प्रोसेस पाळली हे सांगणे इ. करणे सोपे जाईल.
यावर आपल्याला मत मांडायला एक मंच मिळाला आहे. त्या मतांची अभिप्रायांची वासलात लावतील का खरंच काही करतील ते माहित नसलं तरी किमान एक व्यासपीठ आहे त्याचा वापर करावा असं वाटलं.
माझ्या अनुभवानुसार कुठल्याही विषयांत तज्ज्ञ वगैरे कोणी नसतं. प्रत्येकाचं वर्तुळ हे मर्यादितच असतंच. कुणाचं थोडं मोठं, कुणाचं एलिप्टिकल., बास. डायव्हर्सिटी जितकी जास्त आणता येईल तितकी आणावी झालं.
यात तुम्ही म्हणताय तसं राजकारण असेलच न्हवे आहेच. त्याबद्दल काही मत नाही.

सॉरी. हे सगळं लिहिलं आणि मग लक्षात आलं की हे सगळ 'स्क्यू' करायला केलेलं आहे. आता मलाही फक्त राजकारण दिसू लागलं आहे.