ऑक्टोबर महिन्यापासून २०१९चे नोबेल पुरस्कार जाहीर होऊ लागतील. संपूर्ण संशोधक जगताचे त्याकडे लक्ष असते. ते पुरस्कार सन्मानाचे असतात. पण त्यापूर्वीच सप्टेंबरमध्ये एक अनोखे लक्षवेधी पुरस्कार दरवर्षी दिले जातात. त्यांचे नाव शीर्षकात दिलेच आहे.
आता वळतो या Ig- नोबेल पुरस्कारांकडे. १९९१ पासून दरवर्षी सप्टेंबरमध्ये हे पुरस्कार अमेरिकेत दिले जातात. मार्क अब्राहम या संपादकाने हा अनोखा उपक्रम चालू केला. हा गृहस्थ एका शास्त्रीय विनोदाच्या मासिकाचा संपादक आहे. हे पुरस्कार उपरोधिक हेतूने दिले जातात. त्यासाठी १० संशोधने निवडली जातात, जी किरकोळ किंवा विचित्र प्रकारची असतात ! या पुरस्कार-संस्थेचे ब्रीदवाक्य असे आहे:
' ही संशोधने लोकांना प्रथमदर्शनी हसवतात पण नंतर विचार करायला लावतात !'
'Ig नोबेल' मधील Ig चा अर्थ आहे 'ignoble' (अज्ञानी).
संशोधन शाखा व निकष:
एकूण १० शाखांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. त्यापैकी ६ शाखा या खऱ्या नोबेलप्रमाणेच आहेत. याव्यतिरिक्त जीवशास्त्र, अभियंत्रिकी , व्यवस्थापन अशा काही शाखा निवडल्या आहेत. यासाठी सादर करायची संशोधने ही विनोदी, विचित्र किंवा काही अनपेक्षित निष्कर्ष काढलेली असावी लागतात. पुरस्काराचा हेतू असा असतो. संशोधक जगतात बऱ्याचदा अतिसामान्य दर्जाचे शोधनिबंध 'पाडले' जातात. त्यांचा लायकीपेक्षा जास्त गाजावाजा केला जातो आणि काहींचे ढोल उठसूठ बडवले जातात. या सगळ्यावर उपरोधिक टीका करणे हा। Ig नोबेल चा खरा उद्देश आहे.
मात्र या वरवर विनोदी वाटणाऱ्या उपक्रमाला एक आशेचीही किनार आहे. कधीकधी अशा एखाद्या विचित्र वाटणाऱ्या संशोधनातूनच खऱ्या उपयुक्त संशोधनाला चालना मिळालेली आहे. एक उदाहरण तर अचंबित करणारे आहे. Sir Andre Geim यांना २००० साली Ig-नोबेल दिले होते. पुढे २०१०मध्ये त्यांनाच पदार्थविज्ञानात खरेखुरे नोबेल प्राप्त झाले !! असे हे एकमेव उदाहरण आहे.
पुरस्कार वितरण:
हे सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठात केले जाते. विजेत्यांना माजी खऱ्या नोबेल विजेत्यांच्या हस्ते पुरस्कार दिले जातात. त्यानंतर विजेत्यांना १ मिनिटात भाषण करायची संधीही दिली जाते. एकूणच या समारंभात हास्यविनोद आणि टिंगलटवाळी यांची रेलचेल असते.
आता हे सर्व वाचल्यावर वाचकांना उत्सुकता लागली असेल की असली अजब संशोधने नक्की कुठली असतात त्याची. नुकतेच यंदाचे हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तेव्हा त्यातल्याच काहींची ही झलक. फक्त संशोधन-विषय लिहितो; कोणाला मिळाला याला काही आपल्या दृष्टीने महत्त्व नाही.
२०१९ चे पुरस्कार:
१. रसायनशास्त्र: ५ वर्षाचे मूल एक दिवसात अर्धा लिटर लाळ तयार करते.
२. अभियांत्रिकी:
बाळांचे लंगोट बदलायच्या यंत्राचा आराखडा.
३. वैद्यकीय: a)पिझ्झा खाण्याने माणसाला मृत्यूचा प्रतिबंध करता येतो.
b) पुरुषाचे डावे अंडाशय उजव्यापेक्षा अधिक गरम असते.
४. अर्थशास्त्र: चलनी नोटांच्या हाताळण्यातून रोगजंतूंचा प्रसार होतो.
५. शांतता: आपल्याला शरीराचा कुठला भाग खाजवायला सर्वात जास्त आवडते? त्याचे उत्तर आहे पायाचा घोटा.
आता अंग खाजणे आणि शांतता यांचा काय संबंध, असे प्रश्न इथे गैरलागू असतात !
दोन वर्षांपूर्वीचे एक संशोधन तर खरेच विनोदी आहे.
ते असे:
उंदराचे २गट :
एकाला कॉटनचे ' कपडे' तर दुसऱ्याला पॉलिस्टरचे घातले.
मग त्या दोन गटांच्या लैंगिक क्षमतेची तुलना केली !
….
भन्नाट कल्पना आणि अशक्य कोटीतले संशोधन यांना या उपक्रमात पूर्ण मुभा असते.
वरील यादी वाचता वाचता तुमची ह ह पु वा झाली असणार याची मला खात्री आहे ! किंबहुना तोच तर या उपक्रमाचा उद्देश आहे.
जर आपण गेल्या २८ वर्षांतील या पुरस्कारांच्या यादीवर नजर टाकली तर आपल्याला एक जाणवेल. बरीचशी संशोधने ही गंमतजम्मत स्वरूपाची आहेत. काहींत थोडेफार तथ्य आहे पण त्यांकडे निव्वळ निरीक्षण म्हणून पाहिले जावे. उठसूठ कुठल्याही सामान्य निरीक्षणाला शोधनिबंधाचा दर्जा देता कामा नये, हेच या उपक्रमातून सूचित होते.
तर असे हे गमतीदार अज्ञान-पुरस्कार. या उपक्रमातून प्रचलित संशोधनातील काही अपप्रवृत्तीना छान चिमटे काढले जातात. यातून बोध घेऊन संशोधकांनी खरोखर गरज असलेलेच संशोधन करावे हा संदेश दिलेला आहे. संशोधन विश्वातील एरवी गंभीर असलेल्या वातावरणावर असे उपक्रम विनोदाची पखरण करतात आणि सामान्य माणसालाही घटकाभर हसवतात.
**********************
वास येणाऱ्या बुटांनी भारताला
वास येणाऱ्या बुटांनी भारताला आयजी नोबेल पुरस्कार कसा मिळवून दिला
https://www.bbc.com/marathi/articles/c4g78j8k070o
छानच !
छानच !
त्यातले हे भारी :
या पुरस्काराबद्दल विकाश कुमार सांगतात की, आम्हाला या पुरस्कारा बद्दल काहीच कल्पना नव्हती,"हा जुना 2022 मधील संशोधनाचा पेपर होता, आम्ही कधीच तो कुठेही पाठवलेला नाही. Ig नोबेल टीमने फक्त शोधलं, फोन केला.आणि यामध्येच हसण्यासारखं आणि विचार करण्यासारखं आहे."
ग्रु, मस्त लेख आहे.
ग्रु, मस्त लेख आहे.
>>>गाईंना रंग दिला की माशांचा त्रास कमी होतो. टोगोमधील इंद्रधनुषी रंगाच्या पालींना चीज पिझ्झा फारच आवडतो हे संशोधन.
अमेरिकेतील बालरोगतज्ज्ञांनी शोधलं की लसणामुळे बाळांना आईचं दूध अधिक चवदार वाटतं. डच संशोधकांनी दाखवलं की अल्कोहोलचे सेवन परकीय भाषा शिकण्यात मदत करतो
Ig उपक्रमाला शोभेल असा एक
Ig उपक्रमाला शोभेल असा एक मजेशीर व पूर्णपणे अशास्त्रीय प्रयोग इथे वाचला :
https://indianexpress.com/article/opinion/columns/derek-obrien-books-sur...
काही वर्षांपूर्वी ब्रिटिश लेखक Ian McEwan आणि त्यांच्या मुलाने तो केला आहे. ते दोघे जेवणाच्या सुट्टीदरम्यान लंडन पार्क मधील गर्दीत घुसले आणि त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या कादंबऱ्यांच्या प्रति फुकट वाटायला सुरुवात केली. साधारण 30 कादंबऱ्या फुकट वाटून झाल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्या खुषीने स्वीकारणाऱ्या व्यक्ती प्रामुख्याने स्त्रिया होत्या. स्त्रियांनी त्या भेटी आवडीने घेतल्या परंतु पुरुषांनी त्याकडे संशयाने पाहून त्या घेण्याबद्दल नाराजी दर्शवली.
निष्कर्ष : जर बायकांनी वाचन बंद केले तर कादंबऱ्यांचे अस्तित्व संपेल !
Pages