Ig- नोबेल पुरस्कार : विनोदातून विचाराकडे !

Submitted by कुमार१ on 16 September, 2019 - 01:30

ऑक्टोबर महिन्यापासून २०१९चे नोबेल पुरस्कार जाहीर होऊ लागतील. संपूर्ण संशोधक जगताचे त्याकडे लक्ष असते. ते पुरस्कार सन्मानाचे असतात. पण त्यापूर्वीच सप्टेंबरमध्ये एक अनोखे लक्षवेधी पुरस्कार दरवर्षी दिले जातात. त्यांचे नाव शीर्षकात दिलेच आहे.

आता वळतो या Ig- नोबेल पुरस्कारांकडे. १९९१ पासून दरवर्षी सप्टेंबरमध्ये हे पुरस्कार अमेरिकेत दिले जातात. मार्क अब्राहम या संपादकाने हा अनोखा उपक्रम चालू केला. हा गृहस्थ एका शास्त्रीय विनोदाच्या मासिकाचा संपादक आहे. हे पुरस्कार उपरोधिक हेतूने दिले जातात. त्यासाठी १० संशोधने निवडली जातात, जी किरकोळ किंवा विचित्र प्रकारची असतात ! या पुरस्कार-संस्थेचे ब्रीदवाक्य असे आहे:

' ही संशोधने लोकांना प्रथमदर्शनी हसवतात पण नंतर विचार करायला लावतात !'

'Ig नोबेल' मधील Ig चा अर्थ आहे 'ignoble' (अज्ञानी).

संशोधन शाखा व निकष:
एकूण १० शाखांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. त्यापैकी ६ शाखा या खऱ्या नोबेलप्रमाणेच आहेत. याव्यतिरिक्त जीवशास्त्र, अभियंत्रिकी , व्यवस्थापन अशा काही शाखा निवडल्या आहेत. यासाठी सादर करायची संशोधने ही विनोदी, विचित्र किंवा काही अनपेक्षित निष्कर्ष काढलेली असावी लागतात. पुरस्काराचा हेतू असा असतो. संशोधक जगतात बऱ्याचदा अतिसामान्य दर्जाचे शोधनिबंध 'पाडले' जातात. त्यांचा लायकीपेक्षा जास्त गाजावाजा केला जातो आणि काहींचे ढोल उठसूठ बडवले जातात. या सगळ्यावर उपरोधिक टीका करणे हा। Ig नोबेल चा खरा उद्देश आहे.

मात्र या वरवर विनोदी वाटणाऱ्या उपक्रमाला एक आशेचीही किनार आहे. कधीकधी अशा एखाद्या विचित्र वाटणाऱ्या संशोधनातूनच खऱ्या उपयुक्त संशोधनाला चालना मिळालेली आहे. एक उदाहरण तर अचंबित करणारे आहे. Sir Andre Geim यांना २००० साली Ig-नोबेल दिले होते. पुढे २०१०मध्ये त्यांनाच पदार्थविज्ञानात खरेखुरे नोबेल प्राप्त झाले !! असे हे एकमेव उदाहरण आहे.

पुरस्कार वितरण:
हे सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठात केले जाते. विजेत्यांना माजी खऱ्या नोबेल विजेत्यांच्या हस्ते पुरस्कार दिले जातात. त्यानंतर विजेत्यांना १ मिनिटात भाषण करायची संधीही दिली जाते. एकूणच या समारंभात हास्यविनोद आणि टिंगलटवाळी यांची रेलचेल असते.

आता हे सर्व वाचल्यावर वाचकांना उत्सुकता लागली असेल की असली अजब संशोधने नक्की कुठली असतात त्याची. नुकतेच यंदाचे हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तेव्हा त्यातल्याच काहींची ही झलक. फक्त संशोधन-विषय लिहितो; कोणाला मिळाला याला काही आपल्या दृष्टीने महत्त्व नाही.

२०१९ चे पुरस्कार:
१. रसायनशास्त्र: ५ वर्षाचे मूल एक दिवसात अर्धा लिटर लाळ तयार करते.

२. अभियांत्रिकी:
बाळांचे लंगोट बदलायच्या यंत्राचा आराखडा.

३. वैद्यकीय: a)पिझ्झा खाण्याने माणसाला मृत्यूचा प्रतिबंध करता येतो.
b) पुरुषाचे डावे अंडाशय उजव्यापेक्षा अधिक गरम असते.

४. अर्थशास्त्र: चलनी नोटांच्या हाताळण्यातून रोगजंतूंचा प्रसार होतो.

५. शांतता: आपल्याला शरीराचा कुठला भाग खाजवायला सर्वात जास्त आवडते? त्याचे उत्तर आहे पायाचा घोटा.

आता अंग खाजणे आणि शांतता यांचा काय संबंध, असे प्रश्न इथे गैरलागू असतात !

दोन वर्षांपूर्वीचे एक संशोधन तर खरेच विनोदी आहे.
ते असे:
उंदराचे २गट :
एकाला कॉटनचे ' कपडे' तर दुसऱ्याला पॉलिस्टरचे घातले.
मग त्या दोन गटांच्या लैंगिक क्षमतेची तुलना केली !
….
भन्नाट कल्पना आणि अशक्य कोटीतले संशोधन यांना या उपक्रमात पूर्ण मुभा असते.

वरील यादी वाचता वाचता तुमची ह ह पु वा झाली असणार याची मला खात्री आहे ! किंबहुना तोच तर या उपक्रमाचा उद्देश आहे.
जर आपण गेल्या २८ वर्षांतील या पुरस्कारांच्या यादीवर नजर टाकली तर आपल्याला एक जाणवेल. बरीचशी संशोधने ही गंमतजम्मत स्वरूपाची आहेत. काहींत थोडेफार तथ्य आहे पण त्यांकडे निव्वळ निरीक्षण म्हणून पाहिले जावे. उठसूठ कुठल्याही सामान्य निरीक्षणाला शोधनिबंधाचा दर्जा देता कामा नये, हेच या उपक्रमातून सूचित होते.

तर असे हे गमतीदार अज्ञान-पुरस्कार. या उपक्रमातून प्रचलित संशोधनातील काही अपप्रवृत्तीना छान चिमटे काढले जातात. यातून बोध घेऊन संशोधकांनी खरोखर गरज असलेलेच संशोधन करावे हा संदेश दिलेला आहे. संशोधन विश्वातील एरवी गंभीर असलेल्या वातावरणावर असे उपक्रम विनोदाची पखरण करतात आणि सामान्य माणसालाही घटकाभर हसवतात.
**********************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमाल आर खान. हे व्यक्तिमत्व माहित नसलेलंच बरं आहे!
>>>>>
कमालच आहे ! म्हणजे दरवर्षी ज्यांना असे केळं दिलं जाईल ते लोक असे उजेडात येतील ☺️

या अनोख्या आणि मजेशीर विषयावरील लेखात रस दाखवल्याबद्दल सर्व वाचक व प्रतिसादकांचे आभार !
पूरक माहितीमुळे अन्य काही अशा उपक्रमांचीही माहिती झाली.

आता दरवर्षी यावर लक्ष ठेवता येईल. थोडासा विरंगुळा, बस्स !

हा पुरस्कार सोहळा खूप छान असतो आणि मी २०१४ मधे प्रत्यक्ष पाहिला आहे. नुसते पुरस्कारच नाहीत तर सोहळाही तितकाच मजेशीर असतो. या सोहळ्याला काही खरे नोबल पुरस्कार मिळालेले शास्त्रज्ञही असतात आणि नंतर ते आवर्जून रंगमंचावरचा कॉन्फेटीचा कचरा गोळा करायला मदत करतात. विद्या विनयेन शोभतेचं चालतं बोलतं उदाहरण त्या दिवशी जवळून पहायला मिळालं. ज्या सर आंद्रे गेम यांना २००० साली बेड्कांना चुंबकीय शक्ती वापरून हवेत तरंगायला लावण्याबद्दल इग नोबल पुरस्कार मिळाला त्यानाच २०१० साली ग्राफीनचा शोध लावल्याबद्दल भौतिकशास्त्राचा खरा नोबेल पुरस्कार मिळाला.

सोहळ्याला जमलेले सगळे मजेशीर टोप्या घालून येतात. मी माझ्याबरोबर एक प्लास्टीकचे माकड घेऊन गेलो होतो. हे माकड जर खर्‍या नोबल पुरस्कार मिळालेल्या शास्त्रज्ञाच्या सहवासात आले तर त्याच्या उत्क्रांतीच्या वेगात काही फरक पडतो का किंवा त्या शास्त्रज्ञाच्या मेंदूत , प्लास्टीकच्या माकडाच्या सहवासाने काही बदल पडेल का यावर मी संशोधन करत आहे असे सांगून मी एका नोबल लॉरेटची भेट घेतली . त्यांनीही मोठ्या मनाने माझ्या विनोदात सामील होऊन आमच्या बरोबर थोडा वेळ काढला आणि माझी आणि माकडाची विचारपूस केली.

या कार्यक्रमाची तिकिटे मिळणे खूप अवघड आहे कारण १५-२० मिनिटात ती संपतात. पण १९९५ पासून दरवर्षी हा सोहळा नेटवर फुकट पाहता येतो. यावर्षी १७ सप्टेंबर ला (भारतीय वेळेनुसार १८ ला पहाटे) हा पाहता येईल. दरवर्षीचाच सोहळा हे पहिलंच वर्ष म्हणून साजरा होतो. यावर्षीचं हे ३० वं, पहिलं वर्ष आहे,
https://www.improbable.com/ig-about/the-30th-first-annual-ig-nobel-prize...

अजय,
रोचक अनुभव !
माहितीसाठी धन्यवाद.

यंदाचा (२०२०) हा सोहळा अपेक्षेप्रमाणे ऑनलाइन पार पडला. काही उल्लेखनीय पुरस्कार असे:

१. मानसशास्त्र : माणसांच्या भुवयांवरून त्यांची आत्मपूजक वृत्ती ओळखणे.

२. शांतता : हे भारत व पाकिस्तान सरकारला विभागून मिळाले आहे.
विषय : या दोन्ही देशांचे राजदूत मध्यरात्री एकमेकांच्या दारावरची बेल चोरटेपणाने वाजवून दुसऱ्याने दार उघडण्यापूर्वीच पळून जाण्यात तरबेज असण्याबद्दल.

३. अर्थशास्त्र : देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि तिथल्या नागरिकांचे तोंडाची चुंबने घेण्याचे प्रमाण यांचा परस्पर संबंध.
हे इंग्लंड व फ्रान्ससह १० देशांना विभागून मिळाले.

४. वैद्यकीय शिक्षण : कोविडच्या साथीतून जगाला दाखवून दिले, की नागरिकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांमध्ये वैज्ञानिक व डॉक्टरांपेक्षा राजकारणी व्यक्तींचे महत्त्व अधिक आहे.

हे भारत, अमेरिका आणि रशियासह ९ राष्ट्रप्रमुखांना विभागून दिले.

अन्य पुरस्कार इथे पाहता येतील :
https://www.improbable.com/ig-about/winners/#ig2020

अभिनंदन Bw

१. रोचक
२. खरंच?
३. Lol
४. Sad , धोकादायक अन्याय.
धन्यवाद. लेक ट्रंपला मिळणारे म्हणाली , धडकीच भरली होती मला.

२०२१ चा अज्ञान- नोबेल पुरस्कार सोहळा काल अमेरिकेत संपन्न झाला. Bw
यंदाची काही ठळक पारितोषिके अशी :

१. अर्थशास्त्र : एखाद्या देशाच्या राजकारण्यांचा लठ्ठपणा हा त्या देशातील भ्रष्टाचाराचा निर्देशांक आहे.

२. वैद्यकीय : श्वसनमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी लैंगिक कळसबिंदू हा नाकात घालायच्या औषधी थेंबांइतकाच प्रभावी असतो !

३. शांतता : चेहऱ्यावर मारलेल्या ठोशांपासून बचाव होण्यासाठीच माणसांमध्ये दाढीची निर्मिती उत्क्रांती दरम्यान झाली.

४. रसायनशास्त्र : चित्रगृहातील प्रेक्षकांच्या श्वासांच्या रासायनिक पृथक्करणावरून संबंधित चित्रपटातील हिंसा लैंगिकता व शिव्या यांचे मोजमाप करणे.

अन्य पुरस्कार इथे पाहता येतील:
https://www.improbable.com/2021-ceremony/winners/

Bw

यंदाच्या (२०२२) सोहळ्यातील पुरस्कार विजेते आणि त्यांची संशोधने येथे आहेत:
https://improbable.com/ig/winners/?amp=1

फक्त शांततेच्या पुरस्काराचा इथे उल्लेख करतो.

" सतत कुजबूज करणाऱ्यांनी खरे कधी बोलायचे आणि खोटे कधी बोलायचे हे ठरवण्यासाठी एक प्रणाली" तयार केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

2023 चे विनोदी आणि विचित्र !

सालाबादप्रमाणे यंदाही हे विविध पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्यापैकी मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलेल्या दोघांची नोंद घेतो :
1. साहित्य Ig : जेव्हा काही लोक एकच शब्द लागोपाठ वारंवार वापरत राहतात तेव्हा काय वाटते, याचे संशोधन. या शोधनिबंधाचे नावही असे मजेशीर आहे :
The The The The Induction of Jamais Vu in the Laboratory: Word Alienation and Semantic Satiation.

2. वैद्यकीय Ig : माणसाच्या दोन नाकपुड्यांमधील केसांची संख्या समान असते का नाही, हे मोजण्यासाठी प्रेतांचा वापर करून संशोधन केले.
(https://www.wionews.com/science/ig-nobel-prize-2023-from-re-animated-dea...)

Pages