छंद पक्षीनिरीक्षणाचा - Window birding!

Submitted by वर्षा on 2 October, 2025 - 01:00

Window birding अर्थात पक्षी बघायला मुद्दाम कुठेही न जाता, घरबसल्या, खिडकीतून दिसणार्‍या पक्ष्यांना बघणे! नुसत्या डोळ्यांनी बघा, कॅमेर्‍यातनं बघा किंवा दुर्बिणीतून. खिडकीतून दिसतायत ना, मग अजून काय हवं?

असे हे Window birding मला तसे नवीन नव्हते. भारतात लहानपणी सोसायटीत पुष्कळ झाडे असल्याने खिडकीतून बरेच पक्षी दिसायचे. पण हे अमेरिकेत कधी नशिबात असेल असे वाटले नव्हते. कारण पक्षीनिरीक्षणासंदर्भातले सर्व मर्फीज लॉज हे कायमच लागू पडत आलेत. म्हणजे उदा. कॅमेरा किंवा दुर्बिणीसकट, मोक्याच्या ठिकाणी मोक्याच्या वेळी पोचलात की एकही पक्षी न दिसण्याची गॅरंटी. आणि सहज चालायला बाहेर पडावे (कॅमेर्‍याविना) की बरोब्बर हवे असलेले पक्षी दिसणे (विशेषतः Lifer - म्हणजे एखादा पक्षी आयुष्यात प्रथमच दिसणे) आणि त्यातही कहर म्हणजे त्यांनी बराच वेळ एकाच जागी राहून दर्शन देणे, वगैरे प्रकार घडतातच.

त्यामुळे घरबसल्या पक्षी कसे काय दिसणार असं वाटतच असे. पण आता सध्या मी त्यादृष्टीने फारच नशिबवान ठरले आहे.
सध्याच्या माझ्या अपार्टमेंटच्या Patio म्हणजे गॅलरीत मी पक्ष्यांसाठी पाणी आणि त्यात एक छोटे फाऊंटन ठेवले आहे. जवळपास वीसहून जास्त प्रकारचे नॉर्थ अमेरिकन पक्षी तिथे हजेरी लावतात! अर्थात वर्षभरात काही रोज येणारे/नेहमी आढळणारे (कॉमन) पक्षी त्यात आहेत आणि काही स्थलांतर करुन येणारे पाहुणेही आहेत! (हे वीसेक पक्षी माझ्या बर्ड बाथवर येतात. याव्यतिरिक्त काही पक्षी हे मी घरामागच्या कम्युनिटी पार्कात किंवा सिटीत नेहमी बघते. ते मात्र अजूनपर्यंत एकदाही बर्ड बाथवर आलेले नाहीत. का माहित नाही. त्यांच्याविषयीही पुढे लिहिनच.)

इतके सगळे पक्षी येण्याचे मुख्य कारण म्हणजे अर्थातच झाडे! गॅलरीच्या दोन्ही बाजूंना दोन झाडे आहेत ज्यांनी गॅलरीवर छत्र धरले आहे. (ही लेमनवुड व कॅलरी पेअरची झाडे आहेतअसं मला गूगल लेन्सने सांगितले. त्यापेकी पेअरच्या झाडाला अर्ली स्प्रिंग (फेब-मार्च) चेरी-प्लमसदृश पांढर्‍या फुलांचा बहर येतो आणि फॉलमध्ये पाने लाल-पिवळी होऊन पुढे झाडे एकदम पर्णहीन होतात. लेमनवुड मात्र वर्षभर सदाहरित असते).

तर मुख्य म्हणजे या दोन झाडांमुळे तसेच कम्युनिटीत असलेल्या एकंदरीत झाडांमुळे, हिरवळीमुळे आणि कम्युनिटीच्या अगदी मागेच असलेल्या मोठ्ठ्या पब्लिक पार्कमुळे इथे पक्षी बर्‍यापैकी आहेत हे आल्याआल्याच जाणवलं होत. त्यात हाऊसफिंच, चिकाडी पहिल्या भेटीतच ऐकू आल्या, दिसल्या. पहिल्या दिवशी, विना फर्निचरच्या त्या घरात लिविंग रुममध्ये जमिनीवरच मॅट्स टाकून झोपलो होतो. लिविंग रुमची गॅलरीला फेसिंग बाजू ही फ्रेंच विंडोंची आहे. त्यातून गॅलरीवर झुकलेले दोन्ही वृक्ष सुरेख दिसतात. सकाळी किलबिलाटानेच जाग आली. गोल्डफिंच फार गोड शीळ घालतात. ते ऐकून फार छान वाटलं. गॅलरी बर्‍यापैकी ऐसपैस आहे. त्यामुळे त्यात थोड्याफार झाडांच्या कुंड्या आणि एक बर्ड फीडर लावावे असे ठरवले.

यथावकाश झाडे आली. मागोमाग एक बर्ड फीडर आणले आणि त्यात बर्ड सीड्स भरुन ठेवल्या.

फार वाट बघावी लागली नाहीच. हाउसफिंच, गोल्डफिंच, आणखी एका प्रकारची चिमणी, या पक्ष्यांनी त्याचा ताबा घेतला आणि नळावरील भांडणे टाईप वादावादी, मार्‍यामार्‍या होऊ लागल्या. त्याहीपेक्षा सीडस, धान्य खाली प्रचंड प्रमाणात सांडू लागले. शिवाय खारीही कमी नव्हत्याच. एकदा बर्ड सीड्सची प्लॅस्टीकची पिशवी तिथेच खाली राहिली. त्याची झिप व्यवस्थित बंद होती तरीही खारुताईंनी त्यावर आक्रमण करुन भोके पाडून आपला कार्यभाग साधला होताच. त्यातच लक्षात आले की असे सांडलेले धान्य रोजच्या रोज साफ करण्यात जराजरी दिरंगाई झाली की तिथे उंदरांचे आगमन होऊ शकते! एकंदरीत विचार करता, बर्डफीडर प्रकरण हाय मेन्टेनन्स असल्याने, विचारांती काढून टाकले.

कम्युनिटीच्या मागेच पब्लिक पार्क आहे. तिथे एकदा मॉर्निंग वॉक करत असताना, तिथेल्या वॉटर फाऊंटन्सच्याभवती सांडलेल्या पाण्याजवळ दोन निळे पक्षी (Western bluebird) पाणी पिताना दिसले आणि पटकन विचार आला की अरेच्चा, गॅलरीत पक्ष्यांसाठी पाणी ठेवू शकतो की! पक्ष्यांना पाणी प्यायला, त्यात डुंबायला आवडतंच. शिवाय उन्हाळ्यात इथे कधीकधी शंभरच्या जवळपास (३५ सेल्सिअसपेक्षा जास्त) तापमान जातंच तेव्हा पाण्याच्या स्रोतांची जास्त गरज असेल.

लागलीच अ‍ॅमेझॉनवरुन एक पसरट थाळी मागवली. पाणी भरुन ठेवले आणि मग चालू झाला पक्ष्यांचा खूप आनंद देणारा, सुखावणारा सिलसिला!

या भागात सर्वसाधारणपणे आढळणारे फिंच, चिमण्या वर्गीय पक्ष्यांपासून स्थलांतर करुन येणारे हंगामी पाहुणे अगदी सोफ्यावर बसल्याबसल्या मनसोक्त पहायला, ऐकायला मिळाले, मिळत आहेत!
अजून एखादी मोठ्या व्यासाची थाळी आणावी असे वाटले आणि मग त्यात एक छोटे वॉटर फाऊंटन्/पाण्याचा पंप ठेवावा असेही वाटले आणि मग ते ताबडतोब अमलात आणले. सौर उर्जेवर चालणारे कारंजे आधी आणले. ते चांगले होते पण ढगाळ हवेत निरुपयोगी ठरले. मग हे अन ते प्रयोग करता करता एका विजेवर चालण्यार्‍या साध्या वॉटर पंपवर आता स्थिरावले आहे. त्यावर आणखी कारंज्याच्या भोकांचे टोपण लावले की छान छोटे कारंजे तयार होते. थाळ्यांवर एखादी बारकी काठी ब्रिजसारखी आडवी ठेवून दिली. एखाददोन दगड/गोटे ठेवले.

या सर्व गोष्टींनी अप्रतिम रिझल्ट्स दिलेत. मोठ्या थाळ्याचा व्यास मोठा आहे तशीच त्याची खोलीही किंचीत जास्त आहे. गोल्डफिंचसारखे बारके, नाजूक पक्षी अशा खोल पाण्यात पटकन उतरत नाहीत. त्यावर मग एखादी काठी असली किंवा दगड असला तर त्यावर उभं राहून पाण्यात फर्र फर्र करत पंख फडफडवायला त्यांना भारी आवडतं. अमेरिकन रॉबीनसारखे तुलनेने मोठ्या आकारचे पक्षी अश्या पाण्यात सहज डुंबतात. वॉटर पंपमुळे पाण्याचा जो आवाज येतो (खळखळाटासारखा) त्यामुळेही पक्षी अगदी नक्की जास्त प्रमाणात येतात. माझ्या गॅलरीचे जे ग्रील आहे, ते जिथे काटकोनात मिळते, तिथेही मी एक लांबलचक काठी ब्रिजसारखी तारेने बांधली आहे. नव्याने येणार्‍या पक्ष्यांना, खाली पाण्याच्या थाळ्यांवर थेट उतरण्यापेक्षा, आधी त्या काठीवर बसून, मान वेळावत इकडचेतिकडचे निरीक्षण करुन, सुरक्षिततेची खात्री पटल्यावर मगच खाली पाण्यावर उतरायला आवडतं. तसंच पाण्यात डुंबल्यानंतर पंखांची फडफड करुन अतिरिक्त पाणी झाडायला, अंग-पिसे साफसूफ करत बसायलाही हीच काठी काही पक्ष्यांना फार आवडते. काही पक्ष्यांना मी त्यावर चक्क व्यवस्थित विश्रांती घेतानाही बघितलंय.

थाळ्यांमध्ये अर्थातच शेवाळं जमतं, पक्ष्यांच्या आंघोळींमुळे पाणी गढूळ होतं. वरतून झाडांची पाने पडतात (पानगळीच्या दिवसात तर सततच). खारी वगैरे एका खेपेत भरपूर पाणी पिऊन जातात त्यामुळे पाण्याच्या पातळ्या कमी होतात. वॉटर पंपमध्ये, कारंज्याच्या भोकाभोकांच्या टोपणात पिसं, किंवा इतर कचरा अडकतो.
त्यामुळे या थाऴ्या वारंवार स्वच्छ घासून पसून, ताज्या पाण्याने भरुन ठेवाव्या लागतातच. वॉटर पंप साफ करावा लागतो. आसपास वरच्या झाडांची पाने सतत पडत असतात, ती साफ करत रहावी लागतात. पण पक्षीनिरीक्षणाच्या या छंदातून मिळणार्‍या आनंदापुढे हे काहीच नाही हो! सकाळी उठून लिविंग रुममध्ये आलं की प्रथम पक्ष्यांच्या थाळ्या तपासायच्या, वॉटर पंप चालू करायचा हे माझं रोजचं रुटीन. त्यांनंतर चहाचा कप घेऊन बर्ड बाथवर येणार्‍या पहिल्या गोल्डफिंचला किंवा जुन्को स्पॅरोला हॅलो म्हटलं की दिवस छान जातोच.


"American Goldfinch"

जसजसे पक्ष्यांचे प्रकार जास्त प्रमाणात दिसू लागले तसे वाटले की यांची नोंद करुन ठेवावी. एखादा नवीन पक्षी दिसला की त्याचा इंटरनेटवर शोध घेऊन नाव हुडकायचं. कधीकधी फोटो काढायलाही वेळ मिळत नाही, तेवढ्यात तो उडून जातो. तेव्हा नंतर त्याचे रंगरुप आठवून, त्या वर्णनावरुन शोध घ्यायचा. घरच्यांनाही आता याची सवय झालीय. मी बाहेर चालायला गेले असताना नेमका Western tanager हा नितांतसुंदर पक्षी बर्डबाथवर येऊन गेला. घरच्या मेंबर्सनी तत्परतेने हातातल्या मोबाईलवर फोटो काढले. यातल्या काही पक्ष्यांना त्यांच्या रंगरुपावरुन किंवा लकबींवरुन आम्ही मराठी टोपणनावेही ठेवलीत. "बर्‍याच दिवसात वेताळ पक्षी आला नाही". किंवा "तुरेवाला कुठे गेला?" किंवा "काळतोंड्या फार डॉमिनेट करतो हं" असं आम्ही जेव्हा एकमेकांशी बोलतो तेव्हा कुणाबद्दल बोलतोय हे लगेच कळतंच. या सर्व पक्ष्यांविषयी फोटोंसकट वेगवेगळ्या भागांद्वारे लिहिण्याचा मानस आहे. तेव्हा या मराठी टोपण नावांची स्टोरीही सांगेनच.


"Wilson's warbler" किंवा आमचा "टोपीवाला".

होता होता बरीच मोठी यादी झाली. हे सर्व नॉर्थ अमेरिकन खंडामध्ये आढळणारे आणि काही स्थलांतर करणारे पक्षी आहेत. मी तर अपार्टमेंटमध्ये राहते, आणि तेही एका शहरात (उपनगरा)मध्ये. तरीही इतक्या प्रकारचे पक्षी येऊ शकतात हे मला फारच नवलाचे होते. म्हणजे झाडं किती महत्त्वाची आहेत!! जे लोक शहराबाहेर, गावांत/कंट्रीसाइड आहेत किंवा शहरात असाल पण ज्यांचे घर आहे - ज्यात फ्रंटयार्ड/बॅकयार्ड आहे, त्यांना तर पक्षिनिरीक्षणाचा छंद जोपासणे अगदी सहज शक्य आहे. बॅकयार्ड बर्डींग या नावाने शोध घेतलात तर बॅकयार्डात येऊ शकणार्‍या पक्ष्यांची यादी वाचून थक्क व्हाल. अगदी सहज, सोपा छंद आहे आणि असीम आनंद मिळतो यातून.

1. Oak titmouse
2. House finch
3. Gold finch
4. Mourning dove
5. Junco sparrow
6. Chikadee
7. Hermit thrush
8. Yellow throated warbler
9. Nuttal’s Woodpecker
10. California towhee
11. American Robin
12. White crowned sparrow
13. Townsend’s warbler
14. Wilson’s warbler
15. White breasted nuthatch
16. Ruby crowned kinglet
17. American bushtit
18. Western tanager
19. American crow
20. Brown headed cow bird
21. Yellow warbler
22. Black phoebe

मला तर वाटतं या व्यतिरिक्तही इतर पक्षी येऊन गेले असावेत, कुणास ठाऊक. चोवीस तास कुठे मी बघतेय! रात्री इथे घुबडांचा आवाज येतोच. ती रात्री पाणी पीतही असतील कदाचित...
हे भाड्याचे घर आहे. इथे थोडीच मी कायम राहणारे! पुढच्या घरात असे नशोब उघडेल की नाही माहित नाही. त्यामुळे हे पक्षी फोटो, व्हिडीओ आणि जमेल तसे माझ्या कलर्ड पेन्सिल्सच्या माध्यमातून कायमचे जतन करुन ठेवणार आहे. यूट्यूब वर windowbirding नावाने एक चॅनेल उघडलेय आणि त्यात या पक्ष्यांचे शॉर्ट्स अपलोड करुन ठेवायला सुरुवात केलीय. इन्स्टावर माझ्या फोटोग्राफी अकाऊंटवर फोटो/व्हिडीओज टाकत असते. याद्वारे पुढे या क्लीपा बघणे फारच सोपे जाईल.

हे घर सोडून गेले की हे रंगीबेरंगी क्षण मला पुन्हा अनुभवता येतील. डीजीटली का होईना!!

Group content visibility: 
Use group defaults

लिहा.
पाच, दहा किलोमीटर परिसरात पक्षी असतील तर ते घराजवळ किंवा बाल्कनीत येण्याची शक्यता खूप असते.
माझ्याकडे मुनिया, सनबर्ड, शिंपी आणि बुलबुल , चिमण्या येतात. तीस वर्षांपूर्वी जेवढी संख्या होती आजुबाजुला ती आता अजिबात नाही.

काय मस्त लिहीलयस वर्षा. अगदी संग्राह्य लेख झालाय. प्रत्येक पक्ष्याविषयी लिही. मी त्या त्या पक्ष्यावरची इंग्रजी कविता कमेन्टमध्ये टाकत जाइन Happy
--------
थांब, माझं बर्ड लव्हरस अ‍ॅन्थॉलॉजी शोधून माझी एक लाडकी कविता देते.

A Minor Bird - robert frost
I have wished a bird would fly away,
And not sing by my house all day;
.
Have clapped my hands at him from the door
When it seemed as if I could bear no more.
.
The fault must partly have been in me.
The bird was not to blame for his key.

.
And of course there must be something wrong
In wanting to silence any song.

------------------
शेवटच्या २ ओळी फार फार आवडतात. माझ्या मते आपल्यालाही आनंदी, सतेज, आपल्याच धुंदीत जगणारे, सभोवार आनंदाचा प्रसन्न शिडकाव करणारे लोक आसपास दिसतात आणि कधीकधी मत्सरातून आपण त्यांचे गाणे थांबविण्याचा प्रयत्न करतो. त्या 'any' शब्दातून, कविता, पक्ष्यांपुरता मर्यादित न राहता, वैश्विक होते.
.
मृत्यु पूर्वी एखाद्या बर्ड्+पोएट्री लव्हरला हे पुस्तक देउनच जाणार आहे. कारण पक्ष्यांवरच्या , जुन्या फार दुर्मिळ कविता आहेत त्यात. एक जाहीर ब्लॉग करायचाय या कवितांचा (कारण जुन्या मुद्राधिकार मुक्त आहेत) पण भाकरीच्या चंद्रातून वेळ मिळत नाहीये.

धन्यवाद एसआरडी.
>> माझ्याकडे मुनिया, सनबर्ड, शिंपी आणि बुलबुल , चिमण्या येतात. तीस वर्षांपूर्वी जेवढी संख्या होती आजुबाजुला ती आता अजिबात नाही.
वाईट वाटते. झाडे कमी झाल्यामुळे असावे ना

धनश्री, धन्यवाद. किती मस्त कल्पना. सुंदर कविता. तुझे कवितांवरचे आणि त्यातूनही पक्ष्यांवरच्या कवितांवरचे प्रेम जाणवते. येऊ देत. तसंच, ब्लॉग करच वेळ काढून.

मी तर सबस्क्रायबर आहेच पण इतरही होतील. जर तू तुझ्या यु ट्युब चॅनलची लिंक इथे दिलीस तर. पण घाई नाही. तुला योग्य वाटेल तेव्हाच दे.

>>>>>>>बाहेर पडावे (कॅमेर्‍याविना) की बरोब्बर हवे असलेले पक्षी दिसणे (विशेषतः Lifer - म्हणजे एखादा पक्षी आयुष्यात प्रथमच दिसणे) आणि त्यातही कहर म्हणजे त्यांनी बराच वेळ एकाच जागी राहून दर्शन देणे, वगैरे प्रकार घडतातच.
हाहाहा

वर्षा तुझं विंडो बर्डिंग आवडलं. पक्षांची स्केचेसही आवडतात.

मला पण पक्षी/ फुलपाखरं/ फुलं पानं बघायला आवडतात.

पक्षांची नावं माहीत नाहीत. पण आमच्याकडे, पिवळे, निळे, केशरी असे छोटे पक्षी दिसतात.
अमेरिकेत आल्यावरच बघितलेला/ कळलेला आणि खूप आवडलेला म्हणजे humming bird. इतकुसा तो असा पंख फडफडवत हवेत तरंगत एका जागी स्थिर राहतो. काही वेळा कामं सोडून त्याच्याकडेच बघत बसलेली आहे. Happy
त्याचं चित्र काढून ठेवलेलं रंगवायचं राहिलंय.

वरचा टोपीवाला पिवळा पक्षी ( मी पिवळी चिमणी म्हणालेले)
त्या हवाईला खूपवेळा दिसल्या होत्या.

पण भाकरीच्या चंद्रातून वेळ मिळत नाहीये.>>> Happy
वाक्य आवडलं.. म्हणून ..

मला पण पक्षांचे फोटो घ्यायला क्वचितच जमत. Sad

>>>>>पण भाकरीच्या चंद्रातून वेळ मिळत नाहीये.
पण त्याविषयी कणभरही तक्रार नाही. कारण अनेम्प्लॉयमेन्ट मधे माझी मानसिक स्थिती फार बिघडते. नकोच ते. समहाऊ माझी सेल्फ वर्थ माझ्या नोकरी बरोबर घट्ट घट्ट बांधली गेलेली आहे Sad
हां आता उद्या लॉटरी लागली आणि मग रिटायरमेन्ट घेतली तर ते आवडेल.

अनेम्प्लॉयमेन्ट मधे माझी मानसिक स्थिती फार बिघडते >> समजू शकते.

सेल्फ वर्थ माझ्या नोकरी बरोबर घट्ट घट्ट बांधली गेलेली आहे>>
हे जरा बदलल तर आयुष्य कमी ताणाच होतं. .. ( स्वानुभव )

वरचे दोन्ही मुद्दे थोडे मूळ विषयापासून लांब जातायत.

वा मस्त लिहिलं आहेस. आम्हीही या समरमध्ये पक्षी निरीक्षणात बराच वेळ घालवला आहे. दोन फिडर्स डेकवर लावले आहेत. एक आमच्या बेडरुमच्या खिडकीतून दिसेल असा लावल्यामुळे सकाळी उठलं की कोणी पक्षी आहेत का हे बघायचं. आम्हांला वुडपेकर, ब्लू जे, कार्डीनल्स आणि मोर्निंग डव रेग्युलर दिसतात. हमिंग बर्ड्सही येतात नेक्टर खायला. आचरट खारींचा अनुल्लेख करुन चालणार नाहीच म्हणून त्यांचाही फोटो.
ad266b9e-79f0-4e25-9b9e-4220493435ea.jpegf9021b98-8444-4e4e-9264-8bb7229c074b.jpegdc27b8aa-a5f9-492c-b567-c8b150bd061e.jpeg8779761d-8a38-45b7-a8a6-24fed6f3b8d7.jpeg

मस्त लिहिले आहेस. आपल्या आजुबाजुला कित्येक पक्षी व प्राणी नांदत असतात पण पत्ता लागत नाही.

माझ्या घरी लालबुड्या, शिंजिर, खाटिक, वेडा राघु, शिंपी, कावळे आणि दयाळ यांचे साम्राज्य आहे. चिमणीसद्रुष्य पक्षी आहेत. रोज सकाळी सहा वाजता मलबार थ्रशच्या शिळा ऐकायला येतात पण आजवर दिसला नाही. शेतात मलबार हॉर्नबिल, हिरवी कबुतरे, कवडे, इंडियन रोलर, हुदहुद्या, कोतवाल आणि चिंटु पिंटु भरपुर पक्षी आहेत. हे सहज आजुबाजुला दिसतात.

मी घरी बर्ड बाथ करुन ठेवला पण तिथे मांजरे दबा धरुन बसु लागल्याने काढुन टाकला. दारातच मलबेरीची व पेरुची झाडे आहेत त्यामुळे वेगळे फीडर ठेवले नाहीत.

मर्लिन अ‍ॅप हाती लागल्यापासुन आवाज आला की पक्षी ओळखायची धडपड करता येते. Happy

छान लिहिलयं!
प्रतिसादातील फोटो, कविता ही मस्त!

मस्त. Happy
इथेही बर्ड फीडरवर सायोने लिहिल्याप्रमाणे blue jays, woodpeckers, doves, starlings, grackles, red winged black birds, chickadees, titmice, catbirds, wrens, finches, आणि माझे लाडके northern cardinals नित्य हजेरी लावतात. Goldfinch आमचा न्यू जर्सीचा स्टेट बर्ड आहे. Happy
माझ्या घराजवळ छोटा तलाव आहे, तिथे चालायला गेलं की घारी, ससाणे, कॉर्मॉरन्ट्स, ब्लू हेरॉन, घुबडं, टर्की व्हल्चर्स, बगळे, बदकं (मालार्ड डक्स, कॅनडा गीज), आणि उन्हाळ्यात हंस ही बडी मंडळीही दिसतात.

छान लेख, अगदी मनापासून लिहीलाय. अजून फोटो टाकलेत तर आवडेल.

तीस वर्षांपूर्वी जेवढी संख्या होती आजुबाजुला ती आता अजिबात नाही. >> दुर्दैवाने हे खरं आहे. अगदी जाणवून येण्याइतपत.

सामो धनश्रीतै, कविता आवडली. _/\_
लॉटरी जिंकण्यासाठी आधी तिकीट विकत घेता का पण? Light 1

Window birding अनुभव खूप छान. त्या पीच च्या फुलांना सुवास असणार, दिसायला देखणी तर आहेतच.

लेख, प्रतिसाद, प्रतिसादातील फोटो, कविता = ❤