खपली

Submitted by देवू१५ on 19 September, 2025 - 06:25

सिद्धार्थने लवंगी फटाका पेटवून अंधाऱ्या बोळात फेकला.
फट्ट! असा आवाज बोळात घुमला, क्षणभर उजेड पसरला , आणि सिद्धार्थ पुटपुटला, " कोणीतरी बसलंय मागच्या कंपाउंडवर. " त्याने एक कागद मशालीसारखा पेटवून हातात धरला, कागदाच्या थरथरणाऱ्या ज्वाळेच्या प्रकाशात तो आणि मित्रांची गॅंग कंपाउंडकडे निघाली. " अरे ! शिरीष एवढ्या अंधारात काय करतोयस इथे ? " सिद्धार्थने विचारले. प्रकाशात त्याला शिरीषच्या डोळ्यात अश्रू दिसले. त्याने शिरीषला भिंतीवरून खाली उतरवले.

ताईच्या सासर्‍यांची तब्येत बरी नसल्याने, ती मागील दोन वर्ष माहेरी आली नव्हती. आता सासरे पूर्णपणे बरे झाल्याने ताई दिवाळीच्या आठवडाभर अगोदरच आली होती. ताई आल्यापासून घरात उत्सवाचे वातावरण होते. ताई आणि आई मिळून फराळाचे करत होते. घरभर लाडवांचा गोड वास, करंज्यांची खमंग चव आणि हास्यविनोदाने आवाज दुमदुमत होते. तीन दिवसात दोघींनी फराळाचे काम पूर्ण केले होते. आज निवांतपणे सकाळपासून सगळे एकत्र गप्पाटप्पा करत बसलो होतो . गप्पांच्या नादात बारा कधी वाजले हे कळलेच नाही. आईचे घडाळ्याकडे लक्ष गेले. " जेवायला काय करायचे? " आईने विचारले." मस्तपैकी पिठलं भाकरी कर " असे मी म्हटले. " बरोबर ! ताईने हसत मान डोलावत म्हटले, खूप दिवस झाले, तुझ्या हातचे पिठलं खाल्लं नाही."
आईने पिठलं केलं, ताईने भाकऱ्या थापल्या. पिठलं भाकरीचा पहिला घास खाताच मी म्हटले, " मस्त ! झणझणीत झाले पिठलं, अगदी सिद्धार्थच्या आईसारखं . " तू कधी खाल्लं त्यांच्या हातचं पिठलं? " आईने मला विचारले. " अगं , दादा गेला तेव्हा शेजाऱ्यांनी आणलेल्या जेवणात सिद्धार्थच्या आईने पिठलं भाकरी आणली होती, ती चव अजून आहे जिभेवर ." मी पटकन बोलून गेलो. आईने हातातला घास परत ताटात ठेवून ताटाला नमस्कार केला, डोळ्याला पदर लावून ती स्वयंपाक घरात गेली. ताईही तिच्या मागोमाग गेली. बाबांनी निर्विकार नजरेने माझ्याकडे बघितले. पाच वर्षांपूर्वी झालेल्या जखमेची खपली आज माझ्याकडून नकळतपणे काढली गेली होती. दिवसभर अपराधी मनाने मी भटकत राहिलो. मला एकांत हवा होता. शिरीष सिद्धार्थच्या गळ्यात पडून रडू लागला.

दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेरून आवाज आला , " शिरीषची आई आहे का घरात? " सिद्धार्थची आई , मानेकाकू बाहेर उभ्या होत्या. शिरीषच्या आईने दरवाजा उघडला. मानेकाकूंना घरात बोलावले. " तुमच्याकडे जरा काम होतं , कसे विचारू हे कळत नाही, आमच्या सिद्धार्थला तुमच्याकडचे बेसनलाडू खूप आवडतात, मला नाही जमत तुमच्यासारखे , त्यांच्याकडून शिकून घे असे म्हणत होता. आज धीर करून आले तुमच्याकडे. शिकवाल का मला?" मानेकाकू अवघडल्यासारख्या एका दमात विचारून मोकळ्या झाल्या. शिरीषच्या आईने होकार देत म्हटले, " कधीही सांगा, आज म्हटले तर आज करू, मी मोकळीच आहे." " तुम्ही करतात तसे मला जमतील का हो ?" मानेकाकूंनी निरागसपणे विचारले. " अहो गोडवा हातात नसतो... मनाचा असतो, नक्कीच जमतील तुम्हाला, " शिरीषच्या आईने काकूंचे हात हातात घेत त्यांना धीर दिला.

दुपारी मानेकाकूंच्या घरातून बेसन भाजतानाचा सुगंध सगळीकडे दरवळला. जुन्या जखमा शब्दांविना भरत होत्या.

संध्याकाळी शिरीषची आई आणि ताई घरी आल्या. हातात एक डबा होता, शिरीषच्या आईने त्यातील एक लाडू शिरीषच्या हातात देत म्हणाली, " सिद्धार्थच्या आईने केलेत बेसनाचे लाडू , सांग कसे झालेत? " लाडूचा एक तुकडा खाऊन शिरीष आनंदाने ओरडला, " डिट्टो तुझ्यासारखेच! " शिरीषच्या आई आणि ताईने एकमेकांकडे पाहिले, त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा गोडवा उमटला होता. शिरीषने बाबांना लाडू भरवला. घरातले गंभीर वातावरण बेसनाच्या लाडूच्या चवीबरोबर विरघळून गेले. त्या रात्री दिवे अधिक तेजाने प्रकाशत होते. तीन दिवस अगोदरच शिरीषच्या घरी दिवाळी अवतरली होती.

xxxमाकड

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

दु:खातून बाहेर पडतोय, ह्याचा गिल्ट आला, तरी बाहेर पडावे लागते, हे सत्य आहे.
काही वर्षांपूर्वी अश्या जीवघेण्या दु:खाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे कथा फार भिडली. काही जखमांवर खपली धरली तरी आत जखम तशीच ओली असते, हा अनुभव पदोपदी येतोय.

काही दु:खातुन बाहेर पडणे वगैरे असं काहीच नसतं. ती आपल्यातच खोल रुजुन असतात आणि आपल्या प्रवासात समांतर चालत असतात.
वस्तुस्थितीमुळे वरवर कुरवाळत कोणीच बसु शकत नाही कारण पुढे जावच लागतं.

कथा आवडली.
काल वाचली होती. काय प्रतिसाद द्यावा कळले नव्हते.