बाल्कनीतील बाग (बॉटलचा उपयोग)

Submitted by Srd on 9 February, 2023 - 03:59
रिकाम्या बॉटलमध्ये झाड

बाल्कनीतील बाग (बॉटलचा उपयोग)

छोट्याशा जागेत चार फुलझाडं लावणे आणि टाकाऊ बॉटलचा वापर या हेतूने केलेले प्रयोग.
फोटो १
ऑफीस टाइम फुलझाड

बाल्कनीत किंवा खिडकीत जागा लहान असते. तिथे ग्रीलही असते. कधी भाड्याची जागा असते पण झाडांची हौस तर करायची असते. शिवाय माती लाल वापरली तर त्याचे पाणी खाली ओघळायला नको. त्याचे प्रयोग.
फोटो २
पुदीना लावू शकतो.

खिडकीच्या ग्रीलमध्ये बॉटलस बांधल्या आहेत.
फोटो ३
ग्रीलमध्ये टांगतात येईल

पुदीना,ऑफीस_टाइम आणि चिनी गुलाब ही झाडे यासाठी योग्य आहेत.कारण ती वाढली की खाली वाढतात आणि सुंदर दिसतात. तीन चार तास ऊन येते खिडकीत तिथे जोमाने वाढतात. घराच्या आत बॉटल टांगायची असेल तर मनी प्लान्ट योग्य.

बॉटल तयार करणे - लिम्काच्या(६५०एमेल) बॉटलचा तळ योग्य ठिकाणी कापला की तो बॉटलच्या आत सुलटाच बसतो. साध्या चाकूने तळ कापता येतो. त्यास दोन चार चिरा काढायच्या. मग बुडाकडे म्हणजे वरती नायलॉन दोऱ्याने तुकडे असे बांधले आहेत की आतले झाड आणि मातीचे वजन कुठल्याही बाजूस गेले तरी बॉटल सरळच राहाते. ( फोटोंवरून थोडी कल्पना येईल दोऱ्या बांधण्याची) बॉटल उलटी टांगायची. यांचे बूच घट्ट असते आणि गळत नाही. मातीतले पाणी खालच्या बुचाकडच्या अर्ध्या भागात साठते ते बॉटल तिरकी करून परत मातीत जिरवता येते.
इतर शोभेच्या पाण्याच्या बॉटलस मात्र गळतात. त्यांचे तळही बरोबर कापून आत बसवणे जरा कटकटीचे असते. प्लास्टिक कठीण असते. पण या बॉटल दिसतात मात्र छान.
फोटो ४
पाण्याच्या रंगीत बॉटल

(कोणत्या बॉटलचा तळ कुठे कापून परत आतमध्ये बसवता येतो ते शोधावे लागेल. बुचाकडून पाणी गळणारी बॉटल टाळावी.)

खिडकीच्या ग्रीलच्या चिंचोळ्या उभ्या जागेत बॉटलस बांधून परत डासांची जाळीही आतून बसते.
फोटो ५
डासांची जाळी लावता येते

मोठ्या एक दीड लिटर्सच्या बॉटल मात्र बसणार नाहीत. इतर ठिकाणी शक्य असल्यास तरी खूप जड होईल.

यूट्यूबवर बॉटल वापरण्याचे बरेच विडिओ सापडतात. मीही वेगवेगळे प्रयोग केले आहेत त्यातला हा एक. टिकली तर टिकली नाही तर फेकून दिली.

फोटो ६
वेगवेगळ्या बॉटल्स बाल्कनीत

लहान मुलांसाठीही काम होईल.
करून पाहा.

______________________

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण जेव्हा प्रयोग करायला जातो तेव्हा एकेक अडचणी डोकं वर काढू लागतात.
१) बॉटल तिरकी होणे
२) माती किती भरणे.
३)संपूर्ण काथ्याच भरला तर काय होईल, मुळे निघतील का?हलकी होते पण वाढ होत नाही. काथ्या उर्फ नारळाची शेंडी ही टाकावूच आहे.
४) ऊन लागले की बऱ्याच प्लास्टिकना महिन्याभरात भेगा पडतात. चुरा होतो. यु.वी. किरणांमुळे होते.
५)बॉटलची फार कापाकापी करण्यात अर्थ नाही.
६) सरळ वर वाढणारी झाडे उपयोगाची नाहीत.
७) पाणी राहिले उघडे तर डास होतील.
८)लाल माती फार त्रास देते. कोरडी झाल्यास, वाळल्यावर घट्ट ढेकूळ होते. ओघळल्यास लाल डाग पडतात.
माझ्याकडे दुसरी साधी भुसभुशीत माती आहे तिचा हा त्रास नसतो. पण ती ट्रेकवरून येताना आणावी लागते. (पिशवी रिकामी आणू नये म्हणतात. चार पाच किलो)
९) कोणतेही घन, द्रवरूप खत घालायचे नाही कारण टाकावूतून करण्याचा हेतूच बाद ठरेल. फक्त ऊन पाण्यावर वाढवायची आहेत झाडं.

@Shraddha , छान झाली आहेत रोपं. ओफिस टाइम ( पोर्चूलका) थंडीत मरते. खूप कडाक्याचे ऊन याला फार मानवते.
दुसऱ्या फोटोतील जाड पानांचे कॅक्टस आवडले.

लेखातील फोटो क्रमांक सहामध्ये उजवीकडून दुसरी कुंडी आणि अगदी डावीकडील अर्धवट दिसणारी पिशवी यावर केलेले प्रयोग यशस्वी झाले आहेत. टाकावूतून कुंड्या तयार केल्या. माहिती देतो लवकरच. सध्या मुनिया पक्षांनी घरटी केल्याने बाल्कनीत फार वावरता येत नाही. फोटो टाकतो.

खुप वर्षापूर्वी हा सेम असाच प्रयोग फ्लैटच्या खिडकीत केलेला. पण मी भाजीपाला लावलेला आणि छान रिझल्ट्स मिळालेले. फोटो शोधून नंतर टाकेन.

मस्त…

मी यु ट्युबवर पाहुन ५ लिटरच्या कॅनमध्ये पुदिना लावला होता. पण तो थोडे दिवस चांगला वाढला, नंतर पाने बारिक होत जाऊन मेला.

खूप कडाक्याचे ऊन याला फार मानवते.>>> माझा पोर्चुलाका उन्हात वाढत नव्हता म्हणुन सावलीत ठेवला तर तिथे
फोफावला Happy

Srd>>>
Thank u.
waiting for the photos

फोटो १
मुनियांनी बांधलेले गोल घरटे. Russelia फुलझाडाला वर्षभर लाल तुरे येतात. त्या फुलांवर सनबर्ड पक्षी येतात. झाडांची पाने म्हणजे बारीक लांब काड्या असतात त्यांचा उपयोग करून मुनियांनी हा गोळा पाच दिवसांत बांधला. रसेलियाचे लांब लांब लोंबकळणारे तुरे कावळ्यांना दूर ठेवतात. घरट्याला आत जाण्याचे दार बाहेर ठेवले आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये गवताची पाने मिळतात त्यापासून मुनिया त्यांचे घरटे करतात. नंतर गवताला कोवळ्या बियांच्या लोंब्या येतात ते पिल्ले झाली की त्यांना खाणे मिळते.

फोटो २
बोरी किंवा गुलाबाला काटे असतात त्यात घरटे करणे मुनियांना सुरक्षित वाटते कारण कावळे आणि साळुक्यांना घरट्याकडे जाता येत नाही. आपण गुलाबाची छाटणी जुलै महिन्यांत करतो. पण तसे केले नाही तर फुले न येणाऱ्या लांब फांद्या कामाच्या असतात .ऑगस्टमध्ये मुनिया त्या काटेरी किल्ल्यात घरटे बांधतात.

फोटो ३
प्लास्टिक डब्यांची टाकावू झाकणे वापरून केलेली कामचलावू कुंडीची पिशवी. दोन किलो माती राहाते.लाल प्लास्टिक शीटने झाकली आहे. एका झाकणारा मध्यभागी एक इंच भोक पाडले. यासाठी पान खाणाऱ्यांकडे एक चुन्याची गोल डबी असते पत्र्याची ती तापवून वापरली. दहा बारा इंची प्लास्टिक पिशवी घेऊन त्याचा तळ कापला. परत तो गोळा करून दोरीने बांधला. तो भाग झाकणाच्या भोकातून खाली सोडला. यातून पाणी खाली गळते. या पिशवीत खाली एक दोन इंच मातीचा थर दिला. आता यावर झाडांची रोपांची पिशवी मिळते नर्सरीतून ती /तशी आतल्या मातीवर ठेवायची. झाकणारा दोऱ्या बांधून टांगायची. आतली पिशवी आणि झाड आपण कधीही काढू शकतो आणि बदलू शकतो. हे जरा चांगले दिसावे आणि मुळांना उजेड लागू नये म्हणून एक गुलाबी शीट गुंडाळली आहे बाहेरून. प्रयोग चालू आहेत आणि यशस्वी झाले आहेत.

फोटो ४
तशा मोठ्या झाकणाच्या कुंड्या. चार किलो माती राहू शकते. पंचवीस पिशव्या अशा टांगल्या आहेत. सुंदर दिसत नाही परंतु कामचलावू.

फोटो ५
लहान मोठ्या कुंड्या एकावर एक बांधल्या तर वरच्या कुंडीतले वाहून गेलेले पाणी खालच्या कुंडीत येते व त्यातले पाणी खालच्या एका बादलीत जमा करता येते. याचा फायदा असा की खत घातले असेल तर ते खतांचे पाणी खालच्या बादलीत जमा होते ते परत वरती घालता येते. तसेच बाल्कनीत पाण्याची राग होत नाही.

फोटो ६
मागच्या वर्षी नर्सरीतून आणलेले पारिजातकाचे रोप( ३०रुपये) फुलते सतत.

फोटो १
पारिजातक झाड. दोन चार वेळा छाटले आहे.

जेव्हा सुटीला बाहेर जातो तेव्हा कुंडीतल्या पिशव्या बाहेर काढून एका ट्रेमध्ये ठेवतो आणि ट्रेमध्ये तळाला एक दोन इंच पाणी राहील असे भरून ठेवतो.( या पाण्यात डास वाढेपर्यंत ते सुकूनही जाते.) तसेच झाडांची एक फुटांवर छाटणी करतो. त्यामुळे पाणी दहा बारा दिवस पुरते आणि झाडे मरत नाहीत. नवीन फुटवे आलेले असतात. मातीच्या कुंड्याचं असं काही करता येत नाही.

अरे मस्त आहे हे!
हा धागा पाहिला नव्हता कारण बागकामाची आवड नाही.
पण इंटरेस्टिंग आहे हे