पाककृती स्पर्धा ३ -व्हेजिटेबल स्टर फ्राय विथ पायनॅपल - अल्पना

Submitted by अल्पना on 8 September, 2025 - 02:05

स्पर्धा जाहिर झाल्यावर वाड्यावर अमितव ने एक एशियन / थाई पदार्थ सुचवला होता. त्याने कोणतेतरी थाई चिकन खाल्लं होते ज्यात काजू होते. आणि तो पदार्थ सफरचंद आणि मनुके घालून शाकाहारी करता येईल असं त्याला वाटलं होतं. तिथूनच हा पदार्थ सुचला. सफरचंद, तोफू आणि भाज्या घालून अशियन चवीची आंबट -गोड तिखट स्टर फ्राय भाजी किंवा ग्रेव्ही करावी असा विचार होता.
पण नंतर सफरचंदाऐवजी अननस वापरून बघू असं ठरवलं. गेल्या गणेशोत्सवातल्या पाककृती पैकी तेपाचे परत एकदा करायचे होते हिवाळा सुरू व्हायच्या आधी. त्यासाठी आख्खा अननस आणायचाच होता. मग तोच वापरू असं ठरवलं. परवा अननस आणून ठेवला. त्यानंतर बघितलं तर अननस वापरून आधीच दोन पाककृती आलेल्या दिसल्या. मग विचार केला, सफरचंद वापरू तर सफरचंदाच्या पण पाककृती आलेल्या होत्या. शिवाय सफरचंद मला फारसे आवडत नाही. आता प्लम आरेस, ते वापरावे कि काय असं वाटायला लागलं.
पण अचानक अंगावर आलेल्या काही कामांमुळे प्लम आणले नाहीत आणि काही केलंही नाही. काल अननस चिरून तेपाचे बनवायला ठेवलं आणि आता वेगळं काही न करता उरलेल्या अनन्सालाच वापरून स्टर फ्राय करायचे ठरवलं. घरात भाज्या तर सगळ्या होत्या, तोफू तेवढा आणायचा होता. काल दिवसभरात काही पाककृती घडली नाही, रात्रीच्या जेवणाला करायची तर रात्री लेकाने स्पेशल स्वयंपाक केला होता. तरी त्यासोबत हे करू असं ठरवलं, पण ऐनवेळी काही कारणाने करणं झालं नाही.
तोफू आजही नव्हताच, मग तोफू शिवायच शेवटी अगदी शेवटच्या क्षणी आज सकाळी ही पाककृती घडली.

साहित्य - दिड वाटी अननसाचे तुकडे, एक छोटा कांदा मोठे चौकोनी तुकडे करून, १ चमचा बारिक चिरलेला लसूण, एखादी सुकी लाल मिरची, वाटी भर चिरलेल्या भाज्या (मी लाल - पिवळ्या ढोबळ्या मिरच्या आणि मशरूम वापरले. यासोबत ब्रोकली पण चांगली लागेल. मोठे चौकोनी तुकडे करावेत सगळ्या भाज्यांचे)
सॉस साठी - चमचाभर सोया सॉस, अर्धा चमचा बाल्सेमिक व्हिनेगर, अर्धा चमचा रेड करी पेस्ट, अर्धा चमचा केचप, मीठ,तिखट आणि चिली फ्लेक्स चवीप्रमाणे. अजून तिखट हवे तर थोडा सिराचा सॉस, फोडणीला तेल आणि थोडे काजू
कृती:
कढई मध्ये थोड्या तेलात लसूण, सुक्या लाल मिरचीचे तुकडे आणि त्यानंतर कांदा आणि अननसाचे तुकडे मोठ्या आंचेवर परतावेत.
pinaple.jpg

२-३ मिनिटे परतल्यावर त्यात बाकी भाज्या पण घालाव्यात.

bhajya.jpg
या सगळ्याच भाज्यांमध्ये पाणी भरपूर असल्याने छान परतायला साधारण सारखाच वेळ लागतो. कांदा, अननसाचे तुकडे जरा ग्रील झाल्यासारखे दिसायला हवेत. हे करताना कढई करपेल, पण ती नंतर होते स्वच्छ, त्यामुळे त्याकडे दुर्ल़क्ष करा. भाज्या हव्या तश्या परतल्या गेल्यावर, एका भांड्यात सॉसचे सामान एकत्र करा आणि ते भाजीत घाला. मी भाजी करताना काय काय घालायचे हे ठरवलं नव्हतं. यात खरंतर बाल्सेमिक व्हिनेगर ऐवजी अननसाचा ज्युस घातला तर जास्त चांगले लागेल, पण माझ्याकडे ज्युस करायला वेळ नव्हता. मी सोया सॉस, तिखट, व्हिनेगर, मीठ आणि घरात होती म्हणून थोडी रेड करी पेस्ट मिक्स करून आधी भाजीत घातले. चव बघितल्यावर यात थोडे केचप चालेल असं वाटल्याने केचप घातलं. मग अजून तिखट हवं म्हणून थोडा सिराचा सॉस पण घातला. यानंतर तडका पॅनमध्ये थोड्या तेलात काजू सोनेरी रंगावर परतून घ्यावेत आणि भाजीत मिसळावेत.
वाढताना वरून थोडी कांद्याची पात घातली तर चांगलं दिसेल आणि चव पण चांगली येईल. माझ्या घरी कांदा पात नसल्याने मी थोडी कोथिंबीर घात्ली वरून.
यात ग्रील केलेले तोफू किंवा पनीरचे तुकडे पण छान लागतील. ते घालायचे असल्यास तोफू / पनीरला सोया सॉस+ चिली फ्लेक्स लावून थोडे मॅरिनेट करून ते तुकडे परतून मग भाजीत घालावेत.
सकाळच्या घाईत हे सगळं केल्याने सगळ्या घटकांचे फोटो काढले गेले नाहीत.

pinapple veg stir fry.jpg

बाजारात मिळणारे सॉस वापरायचे नसतील तर किंचित तेलावर टॉमॅटोचे २-३ तुकडे थोडे आलं आणि लसूण घालून परतून घ्यावेत. त्यात एखादा गवती चहाचा कांदा, थोडं मीठ, अगदी किंचित / पाव चमचा व्हिनेगर आणि तिखट किंवा सुक्या लाल मिरच्या घालून हे सगळं वाटून घ्यावे.
हा काही अगदी टिपिकल थाई पदार्थ नाही. रेड करी पेस्ट फक्त त्यातल्या गवती चहाच्या वास आणि चवीसाठी वापरली होती. केचप आणि रेड करी पेस्ट ऐवजी ही ताजी चटणी घालून जास्त चांगली चव आणि वास येईल. सोया सॉसला मात्र पर्याय नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसतोय
आणि छान लागत असेल असेही वाटतेय

खूपच छान चव आली आहे. माझी अपेक्षा नव्हती. सगळ्यात आधी माझ्याकडच्या मदतनीस मुलीने चव घेवून गो अहेड दिलाय. आज यासोबत गाजराचे अशियन सलाड केलं होते.
salad and pinaple.jpg

हे आवडेल. करून खाणार. मशरूम नै पसंद मेरे कू, ते नाही टाकणार.

प्लेटिंग उच्च आहे / असतेच तुमचे.

@ बुकमार्क/लोगो

अल्पना + कलाकारी म्हणून “अल्पनाकारी“ का ? तसे असल्यास लई भारी 👍

अल्पना + कलाकारी म्हणून “अल्पनाकारी“ का ? तसे असल्यास लई भारी >> हो. याच नावाने मी करत असलेले पेंटींग्ज / मोसाईक आणि इतर वस्तू इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मिडियावर पुढे दाखावायचा आणि जमल्यास विकायचा विचार आहे. त्यामुळे हा बुकमार्क. सध्या लोगो फायनल झाला नाहीये, २-३ डिझाईन्सवर काम अर्धवट झालेय.
मशरूम सोडा, चिकन वापरा. ते जास्त चांगलं लागेल यामध्ये.

अरे वा ! “अल्पनाकारी”ला व्यावसायिक यशासाठी शुभेच्छा.

लोगो वगैरे लवकर फायनल करून येत्या दसऱ्याचा मुहूर्त धरून grand launch करून टाका. 👍

छान दिसतय अल्पना!
इथे पान्डा एक्स्प्रेस मधे ऑरेज चिकन मिळत त्याची आठवण झाली ते पण अस ग्लेझी दिसत, मी खात नाही पण लेक हायस्कुल असताना कधी मधे तिला लन्चला द्यायचे.
मला नुसता पायनॅपल आवडत नाही खायला पण पायनॅपलचे सगळे पदार्थ आवडतात तेव्हा करुन बघेन नक्की..