भाग ३ : https://www.maayboli.com/node/86970
१८ जुलैला मध्यरात्री लँडिंग होणार होतं, पण एक दिवस अगोदर येऊन मंडळी १७ तारखेच्या मध्यरात्रीच घरी आली. अर्थात हे आम्हालाही त्यांनी बुकिंग केल्यावर लगेच कळवलं होतं. येताना काठमांडू-दिल्ली-पुणे अशी फ्लाईट होती. त्यामुळे या वेळी ताई दोघी मुलींना घेऊन आली नाशिकहून. सगळ्यांची एकत्र भेट म्हणजे एक सोहळाच असणार होता!
जाताना एक्सचेंजमधे घेतलेले चिनी युआन पुन्हा दिल्लीत बदलून झाले. एक्सचेंज रेटची दक्षिणा देऊन खिसा हलका करून झाला. जरा नॉर्मल माणसातलं म्हणता येईल असं खाणं मिळालं. (मी अन्नाला नावं ठेवत नाहिये, पण नॉशिया, सर्दी, थकवा आणि सवय नसलेले वेगळ्या चवीचे पदार्थ खाऊन मंडळी कंटाळली होती. गैरसमज नसावा.) हळूहळू एकेक टप्पा गाठत दिल्लीला आलोय असा फोन आला. हुश्श!
माझ्या बिल्डिंगच्या गेटमधून बाहेर येऊन रस्ता ओलांडला की कॉलनीच्या आतल्या रस्त्यालगत एक वडाचं झाड आहे. वटपौर्णिमा फेमस वड आहे तो. हौशी लोकांनी तिथे काही वर्षांपूर्वी शंकराचं लहानसं देऊळ बांधलंय. म्हणजे अगदी लहानशीच पिंडी आहे आणि जरा मोठ्या देव्हार्याच्या मापाचा लहानसा मंडप केलाय. वडाभोवती चौथरा आहे. जेव्हा मी विश्रामला बसमधे बसवून घरी आले तेव्हा नकळत त्या महादेवाकडे बघून, "तुझ्या परिक्रमेला गेलाय तो, सांभाळ त्याला आणि दादांनाही. सुखरूप परत घेऊन ये दोघांना." असं साकडं घालून आले. त्याने ऐकलं माझं.
ताई आणि मुली रात्री पुण्यात आल्या. १० वाजले होते. नुसता उत्साह संचारला होता सगळ्यांच्या अंगात. रात्रीची जेवणं आवरली. सगळेच उलटसुलट प्रवास आणि अवेळी येणं यामुळे मी सोलकढी- खिचडी केली होती, पापड-कुरडया तळल्या आणि चटणी पण होतीच. पालक पराठ्याची कणिक मळून ठेवून दिली होती. वाटलंच खावं, तर पराठे ऐन वेळी गरमगरम करून वाढता येतील म्हणून. पण एक्साईटमेंट एवढी, की जेवण जाईना. तरी ४ घास ढकलले तसेच आम्ही पोटात. मग औक्षणाची तयारी केली, दाराशी लहानशी रांगोळी काढली. मुली आणि ताई जरा झोपल्या. १ नंतर मंडळी आली तेव्हा औक्षण, भाकरतुकडा.... सगळे सोपस्कार पार पडले आणि मंडळी घरी आली. यथायोग्य नमस्कार घडले. गप्पांना पूर आला अगदी! काय सांगू त्याबद्दल! १५ दिवसांचा त्यांचा शीण आणि आमचा ताण क्षणात नाहिसा झाला होता.
शेवटी आता झोपा... आवरा... विश्रांती घ्या... करत मंडळींना झोपायला पाठवलं. १-२ दिवस राहून ताई जाणार होती. त्याआधी गप्पा, उरलेसुरले हिशोब असं सगळं चालू होतं. मग हळूहळू एकेक गमती बाहेर आल्या. खरेदीच्या नव्हे हां, गमती म्हणजे तयारीत निसटलेल्या गोष्टी. वाचा ते आता -
" तुम्ही लोकांनी ना इतकं गोड काय काय भरून दिलं होतंत! वैताग आला! गूळपोळ्या, खवापोळ्या, चिक्की, प्रोटीन बार ... सगळं नुसतं गोड! काहीतरी पराठे वगैरे नको होते का द्यायला?"
" मी म्हटलं होतं, पण तिखट काही नको, घशाशी येईल, पाणीपाणी होईल. त्रास होईल... म्हणून तूच नको म्हटलंस ना?"
"हो तर! आणि अगदी आज्ञाधारकच ना तुम्ही दोघी! ऐकलंतच आमचं लगेच! काही नाही तर निदान मॅगीची पाकिटं तरी द्यायचीत! आणि जरा इन्स्टंट चहा-कॉफीचे पॅक्स!"
"मी देत होते तर नको म्हटलंस!"
"आणि आपणच केली ना खरेदी, घेतली असतीस तरी चाललं असतं की!"
"हो ना, सगळं मलाच सुचायला हवं होतं!"
"जाऊद्या! आता पुढच्या वेळी द्या. चांगले १०० पराठे द्या, बाकी काही नको."
"कोण पाठवतंय पुढच्या वेळी? काही कुठे जायचं नाही. दोघं एकदम तर अजिबात नाही. एक पे एक टेन्शन फ्री देऊन भटकताय नुसते! बसा आता गप घरी."
"अगं असं काय... हा तर आऊटर कॉरा होता, इनर कॉरा अजून वेगळा असतो." - एक काडी.
"हो मी गूगल वर बघितला. गणेश मंदिर, मॉनेस्ट्री वगैरे ना...." - त्यात भर. घरी बसून केलेल्या गूगलचे परिणाम.
"हो आणि तो ५ दिवसांचा असतो." - आगीत तेल.
"हो आणि १२ आऊटर केले की १ इनर कॉरा करावा म्हणतात." - आता साजुक तूप ओतलं!
"एक काम करा, खालच्या महादेवाला प्रदक्षिणा घालायला जा. आम्ही दोघी मागून तुमच्यासाठी डब्यातून मॅगी आणि थर्मास भरून कॉफी आणतो. हौस राहिली आहे ना मॅगी-कॉफीची? जा, आम्ही मागून येतो ती पूर्ण करायला!"
"आणि तू लहान साबण द्यायचं सोडून ते काय बॉडी वॉश दिलंस? कशी करायची आंघोळ?"
"साबण भिजून खराब होईल म्हणून नको म्हटलंस ना? आणि घरातलं बॉडी वॉश मोठं आहे, जड होईल म्हणून तुला सांगून मॉलमधून तुझ्यासमोर लहान पॅक आणला. तो स्क्रब वर घेऊन दाखवला तुला. हो म्हटलं होतंस ना? मी कशाला उगीच घेऊन देईन नाहीतर?"
...
...
हसतखेळत आवराआवरी झाली. या वेळी अगदी लक्षात ठेवून, आणि एजन्सीच्या गाईडलाईन्सनुसार अगदी सुरूवातीपासूनच high altitutde sickness नको यासाठीच्या गोळ्या, सकाळी उपाशीपोटी अँटासीड घेऊन मग ब्रेकफास्ट, सगळी क्रीमं, सगळं नीट वापरून दोघांनी स्वतःची शक्य तितकी काळाजी घेतली होती. गेल्या वेळी घरी परतल्यावर मी जवळजवळ आठवडाभर आमच्या फॅमिली डॉ. कडून रोज औषध बदलून आणत होते. (ते होमेपदीचे आहेत, पण आम्हाला मानवलंय त्यांचं औषध.) आधीच्या लेखात म्हटलं तसा त्रास झाला होता, पण शिवाय त्वचा उकलून चक्क साल काढावी तशी निघत होती चेहर्यावरून आणि हातापायावरून! अन्न जात नाही, झोप आवरत नाही, पाय शिणलेले...
या वेळी असं काही झालं नाही. आता आठवडा झाला आजच, मंडळी नॉर्मलवर आली आहेत. रोजचा दिनक्रम चालू झालाय. येताना आणलेलं मानसरोवरजल, रुद्राक्ष... वाटायचे आहेत काही लोकांना.
तीर्थयात्रा झाली की मावंदं घालतात. ते हातून होईल की नाही महादेवच जाणे. पण त्या विराट रूपापुढे नतमस्तक होता येणं हे भाग्यच! प्रत्यक्ष न जाऊनही माझ्या या मानसपरिक्रमेत काहीतरी सापडत गेलं मला. शांत बसून मी डोळ्यासमोर अनेक गोष्टी आणत होते. फोटोतून दिसणारा कैलास मनात घोळत रहायचा. रुपेरी, सोनेरी... मोहक कैलास! रौद्रभीषण म्हणावं असं, भुरळ घालणारं पण भिती वाटायला लावणारं ते विरागी रूप. साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची...
सात्विक वृत्तीची एक कन्याकुमारी एका बैराग्याच्या ओढीने, त्याच्या प्रेमात पडून निरनिराळी रूपं घेऊन दरवेळी नव्याने जन्म घेत त्याला वरते! त्याचा अपमान हा तिच्या सतिरूपाचा अंत ठरतो! ती हिमकन्या होऊन पुन्हा त्याला आपलंसं करते! नुसती पत्नी म्हणून नव्हे, आदिदेवाची आदिशक्ती, महादेवाची अंबा होऊन त्याच्या बरोबर संसार करते! शक्तीविना शिवाला पूर्णत्व नाहीच! आणि अशी सगळी दैवी महती असलेला कैलास पर्वत... प्रचंड! गूढ! शांत!
त्या नीरव शांततेत स्वतःला पूर्ण हरवून एक तरी क्षण त्या विराट अवकाशात विरघळता येईल? त्या अवकाशाचाच एक अंश म्हणजे आपला मानवी जन्म हे ज्यांना उमगलं त्यांना त्या परब्रह्माची जाणीव झाली. ते तरले. संतपदी गेले. श्रीकृष्णाच्या विश्वरूपदर्शनासारखंच हे शिवाचं भव्य दर्शन. एक स्थितीचा कारक, एक विलयाचा मालक! या दोन्ही अद्भुत शक्तींना मनापासून नमस्कार करून मी इथे थांबते.
ॐ नम: शिवाय ||
****
तळटीप:
मी घरातून कुठेही न जाता यात्रेची तयारी या विषयावर हे लिखाण केलं ते केवळ इथे हक्काने व्यक्त होता येतं म्हणून. माझे थोडेफार अनुभव इथे सांगावेत असं वाटलं म्हणून पुन्हा विसरायच्या आत धडाधड लिहून टाकलं. संयमाने वाचल्याबद्दल सगळ्या वाचकांचे आभार!
***
समाप्त.
छान लिहिलं आहेस प्रज्ञा! सगळे
छान लिहिलं आहेस प्रज्ञा! सगळे भाग वाचले. तुला वाटत राहिलेली काळजी पोचते आहे शब्दांतून. सगळं सुरळीतपणे पार पडलं हे महत्त्वाचं. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन!
छानच. ॐ नम: शिवाय ||
छानच.
ॐ नम: शिवाय ||
छान. फोटो?
छान.
फोटो?
खुप छान लिहिलेस. सगळे भाग
खुप छान लिहिलेस. सगळे भाग एकत्रित वाचुन काढले. ट्रिपच्या गंमती सगळेच लिहितात पण मागे कुटुंब काय मनस्थितीत असते ते कोणी लिहित नाही. त्यात अशी हाय रिस्क ट्रिप असेल तर परत येईपर्यंत घरचे काळजीतच.
तुझे मिस्टर यात्रेला गेलेत माहित होते पण कसे गेलेत माहित नव्हते. गेल्या आठवड्यात यात्रा वाईट हवामानामुळे काही काळ स्थगित केल्याची बातमी होती ती वाचुन तुझाच विचार डोक्यात आलेला. पण उगीच विचारुन तुला का टेन्शन द्या म्हणुन गप बसले. सगळे व्यवस्थित पार पडले हे बरे झाले. शिव शंकर भक्तांची काळजी घेतोच.
फोटो लॅपटॉप मधे आलेत, आता
फोटो लॅपटॉप मधे आलेत, आता वीकेंड ला इथेपण देते.
आभार सगळ्यांचे.
छान लिहिलंय
छान लिहिलंय
मध्येच फक्त गॅप झाला असे वाटले
म्हणजे ते तिथे।पोहचले त्या मधल्या दिवसातले
छान लिहिलंय. एकदम सगळे भाग
छान लिहिलंय. एकदम सगळे भाग वाचून काढले.
माझा गोंधळ झाला खरंतर
माझा गोंधळ झाला खरंतर

मी तिसरा भाग न वाचता हा भाग वाचला
म्हणून गॅप झाला असे लिहिले वर.
आता तिसरा भाग वाचून आलो
खूप छान लिहिलंयस, प्रज्ञा.
खूप छान लिहिलंयस, प्रज्ञा. मनापासून , कुठलाही आव न आणता केलंलं सहजसोपं लेखन. मजा आली वाचायला.
मी अमरनाथला गेले होते तेव्हा घरच्यांची काय परिस्थिती झाली असेल त्याचा थोडाफार अंदाज आला. शिवाय तेव्हा मोबाईल नव्हते. त्यात पुन्हा लँडस्लाईड, यात्रा थांबली टाइपच्या बातम्या होत्या म्हणे. परत आल्यावर समजलं मला. त्याच ट्रीपमधे वैष्णोदेवी केलं होतं आणि आम्ही तिथे पोचायच्या आदल्या दिवशीच एक बाँबस्फोट झाला होता खाली. त्यामुळेही घरचे गॅसवर होते आम्ही परत येईपर्यंत. खरंच वाट बघणार्यांसाठी अवघड काम असणार हे.
मस्त लिहिले आहेस. आपण बाहेर
मस्त लिहिले आहेस. आपण बाहेर जातो ते वर्णन बरेचदा वाचलेले असते. असे घरातल्यांना काय वाटत असेल पहिल्यांदाच वाचले.
सगळ्या लेखांचे टोन पण बरोबर पकडलेले आहेत. अगदी निर्मळ वर्णन आहे. तुझ्या आवाजातच ऐकू आले असे वाटले.
झकासराव, अश्विनी, रमड, धनि,
झकासराव, अश्विनी, रमड, धनि, सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
सगळ्या लेखांचे टोन पण बरोबर पकडलेले आहेत. अगदी निर्मळ वर्णन आहे. तुझ्या आवाजातच ऐकू आले असे वाटले.>> __/\__
खरंच वाट बघणार्यांसाठी अवघड काम असणार हे.>> अगदी खरंय.
विश्रामची बॅच काठमांडूवरून सीमापार करून गेली आणि दुसर्याच दिवशी सकाळी नेपाळ-चीनचा मैत्री पूल तिथे आलेल्या महापुरात वाहून गेला. भयंकर फोटो होते ते! आणि दुर्दैव असं की आदल्या दिवशी यांच्या बॅचला पार करायला तिथे जो गेटमन होता त्याचं या दुर्घटनेत दु:खद निधन झालं. सगळ्यांनाच धक्का बसला, आणि खूप हळहळ वाटली. शिवाय अजून एक गोष्ट अशी, की दुसर्या बॅचबरोबर अजून काही शेर्पा, थोडी जास्तीची रसद येणार होती ते सगळंच प्लॅनिंग फिसकटलं. त्यामुळे आधी गेलेल्या बॅचेस ना उपलब्ध शेर्पा (गाईड-कम-पोर्टर म्हणून) आणि एजन्सीने दिलं होतं तेवढं सामान यात उरलेले दिवस मॅनेज करावे लागले. अर्थात, सुखरूप होते सगळे त्यामुळे ही तक्रार नाही. पण आपल्यासाठी आकस्मिक म्हणावेत असे प्रसंग तिथे वारंवार घडत असतात.
ट्रिपच्या गंमती सगळेच लिहितात पण मागे कुटुंब काय मनस्थितीत असते ते कोणी लिहित नाही. त्यात अशी हाय रिस्क ट्रिप असेल तर परत येईपर्यंत घरचे काळजीतच.>> कुठेतरी हे लिहावंसं वाटलं आणि वाड्यातल्या पोस्टींतून ते मी अजूनच मनावर घेतलं!
खुपच छान लिहीलय तुम्ही.
खुपच छान लिहीलय तुम्ही. मनातली तळमळ पोहोचली. आपले माणूस नजरेआड गेले की कासावीस होतोच जीव. हाय रिस्क ट्रीपला अजून काळजी वाटते.
छान झाली आहे लेखमाला, एकदम
छान झाली आहे लेखमाला, एकदम प्रांजळ वर्णन मनस्थितीचे.
चारही भाग सलग वाचले.
चारही भाग सलग वाचले.
घरी असणार्यांची काळजी अगदी अचुक मांडली आहे.
मधले मधले / मनातले न बरोबरचे "प्रेमळ संवाद" पण मस्त
आत्ता सलग वाचले चारी भाग.
आत्ता सलग वाचले चारी भाग.
खूप छान लिहिले आहेस. अनेकांनी लिहिले तसं घेत राहणाऱ्यांची मनस्थिती छान दाखवली आहेस.
>>>>सात्विक वृत्तीची एक
>>>>सात्विक वृत्तीची एक कन्याकुमारी एका बैराग्याच्या ओढीने, त्याच्या प्रेमात पडून निरनिराळी रूपं घेऊन दरवेळी नव्याने जन्म घेत त्याला वरते! त्याचा अपमान हा तिच्या सतिरूपाचा अंत ठरतो! ती हिमकन्या होऊन पुन्हा त्याला आपलंसं करते! नुसती पत्नी म्हणून नव्हे, आदिदेवाची आदिशक्ती, महादेवाची अंबा होऊन त्याच्या बरोबर संसार करते! शक्तीविना शिवाला पूर्णत्व नाहीच! आणि अशी सगळी दैवी महती असलेला कैलास पर्वत... प्रचंड! गूढ! शांत!
त्या नीरव शांततेत स्वतःला पूर्ण हरवून एक तरी क्षण त्या विराट अवकाशात विरघळता येईल? त्या अवकाशाचाच एक अंश म्हणजे आपला मानवी जन्म हे ज्यांना उमगलं त्यांना त्या परब्रह्माची जाणीव झाली. ते तरले. संतपदी गेले. श्रीकृष्णाच्या विश्वरूपदर्शनासारखंच हे शिवाचं भव्य दर्शन. एक स्थितीचा कारक, एक विलयाचा मालक! या दोन्ही अद्भुत शक्तींना मनापासून नमस्कार करून मी इथे थांबते.
ॐ नम: शिवाय ||
बाप रे! काय अफाट लिहीलय. हे असे लिहीता येणे हेच दैवी वरदान आहे. बाकी सारे चिल्लर .... हे शाश्वत मूल्य असलेले लिखाण - माझे मत!
काय सुंदर लिहीलंस प्रज्ञा!
काय सुंदर लिहीलंस प्रज्ञा! घरच्यांची मनोवस्था पोचली. धनिला मम!