माझी न केलेली "मानस"परिक्रमा - प्रवास! (३)

Submitted by प्रज्ञा९ on 24 July, 2025 - 05:15

भाग २: https://www.maayboli.com/node/86965

प्रवास सुरू झाला आणि इकडे आमचं रूटिन चालू झालं. आज शिवाजीनगरला जायचं म्हणून मी कॉलेजात अर्धा दिवस सुट्टी घेतली होती. शिवाजीनगरहून घरी आले, आवरलं आणि कामावर गेले. नवरा दुपारी ताईकडे पोहचून मग खाऊ एक्सचेंज, ताईसाठी दिलेला खाऊ आठवणीने तिला देणं, तिच्याकडचा खाऊ बॅगेत घेणं, केबिन बॅग-चेक इन बॅग वगैरे सामानाची शेवटची बदलाबदली हे सगळं करणार होता. एक हात फिरवून सामान नीट भरून लगेच संध्याकाळी राजधानी गाठायची होती.

मी एका अ‍ॅकॅडमिक प्रोजेक्टसाठी गरजेनुसार दुसर्‍या कॉलेजच्या एका मॅडमकडे जात असते. हाफ डे कामावर आल्यावर दुपारी फोनवर मॅडमबरोबर बोलणं झालं आणि दुसरे दिवशी मी पूर्ण सुटी घेऊन त्यांच्याकडे जायचं ठरलं. सकाळी जरा निवांत आवरून, लेकीला शाळेत पाठवून मी गेले. पार्किंगमधून त्यांच्या डेस्कवर पोहोचले आणि सवयीने फोन काढून बघितला. मॅडम अगोदरच कोणाशीतरी बोलत होत्या म्हणून मी केबिनच्या बाहेरच होते. फोन बघितला आणि १९ मिस्ड कॉल्स! एव्हाना ११ वाजून गेले होते, आमचे यात्री काल लगेचच नाशिकहून संध्याकाळच्या राजधानीने निघून एव्हाना ११ वाजेतो पोहोचायला हवे होते असा विचार करून मी फोन बघायला घेतला होता खरं म्हणजे, आणि १९ मिस्ड कॉल्स बघून मला घाम फुटला. हाताला कापरं भरलं. लॉग बघितला तर २ अनोळखी नंबर्स, आणि उरलेले आई-बाबांचे. खरोखरीचं बधीर फीलिंग. मी लगेच आईंना फोन लावला.

"अगं शाळेतून फोन होता, उमाला उलटी झाली आहे. तू बहुतेक गाडीवर होतीस म्हणून उचलला नसशील म्हणून त्यांनी बाबांना केला. आता गेले आहेत ते रिक्षा करून तिला घ्यायला. तू काळजी करू नको, बहुतेक कफ उलटला असेल. एकदा बाबांना फोन कर आणि जमलं तर घरी ये लवकर."
मी थोडी माणसात आले. बाबांना फोन केला.
"मी आत्ताच रिक्षात बसलोय, शाळेत आलो की तुला फोन लावून देतो. घाबरू नको. मी आहे. आणि विश्रामचा काही फोन आला तर काही सांगू नको. तो पोहोचला असेल दिल्लीला, उगाच काळजी करेल."
आता हे मीच त्यांना सांगायला हवं होतं, पण तेही शाळेतून फोन येतोय आणि मी उचलला नाही असं समजलं म्हणून थोडे पॅनिक झाले. म्हातारपणी लेकरा-नातवंडांचं काही निघालं तर सोसत नाही हेच खरं. मलाच धीर देत स्वत: धावपळ करत गेले शाळेत.

आता मी नॉर्मलवर आले आणि परत आईंना फोन केला. मग तिला डॉक्टरांकडे नेऊन आणायला परत बाबांना सांगितलं. गर्दी असेल तर नंबर लावा मी मग नेईन असंही सांगितलं. अवघा ५ मिनिटांचा विषय, पण मी पार उलटीपालटी झाले होते! १९ फोन! मग कळलं की अनोळखी नंबर शाळेचे होते. मग मी शांत झाले. विश्रामला फोन केला. आज आई-बाबांच्या जिवावर मी निश्चिंत होते.
"जस्ट पोहोचतोय, गाडीतून उतरून एजन्सीत जातो आणि मग तुला फोन करतो." हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. मी खुर्चीत बसून पाणी प्यायले! केबिनमधून मॅडमनी हाक मारली. मी थोडक्यात सगळा प्रकार सांगून जाऊ का विचारलं. She is an Angel! लगेच जा म्हणाल्या! काही असेल तर झूम मिटींगवर बोलायचं ठरलं. १५-२० मिनिटांत कामाचं ब्रीफिंग करून मी निघाले.

घरी आले. आमचा अंदाज बरोबर होता. १-२ दिवसांतली लेकीची झालेली धावपळ, उशीरा झोपणं आणि आधीच असलेली सर्दी यामुळे कफ साठून राहिला आणि तो शाळेत गेल्यावर उलटला. दुपारी दोघी मायलेकी जरा झोपलो. संध्याकाळी पुन्हा यात्रींची फ्लाईट होती म्हणून काळजी होतीच. एरवी मी तशी खमकी, थोडी धिराने घेणारी आहे. पण एकूणच सध्या होणारे अपघात, विश्राम निघायच्या आदल्याच दिवशी नात्यात झालेलं एका काकूंचं अनपेक्षित निधन आणि त्यामुळे आलेली अस्वस्थता, मधेच ढगाळ हवा आणि त्यामुळे येणारी उदासी यामुळे मन अजिबात स्थिर रहात नव्हतं. त्यात अमरनाथ यात्रेतला त्रास आठवला की नको वाटायचं. पण संध्याकाळी मंडळी काठमांडुला पोहोचली. दिल्लीत पासपोर्ट-व्हिसाचं काम झाल्यामुळे न सापडलेल्या कागदपत्रांचा ताण निघूनच गेला. हलक्या झालेल्या मनाला तेवढाच एक शुभशकून!

आता बुकिंग एजन्सी मॅक्स हॉलिडेज वर पुढची जबाबदारी होती कारण बुकिंग काठमांडू-परिक्रमा-काठमांडू असं होतं. काठमांडू मार्केटला चक्कर मारून विसरलेलं, उरलंसुरलं किरकोळ साहित्य घेऊन झालं. आता पुढचा प्रवास सागा-केरूंग असा तिबेटमार्गे मानसरोवर पर्यंत असणार होता. नेपाळमधे असलेला १५ मिनिटांचा वेळेचा फरक आता हळूहळू अडीच तासांवर गेला.

गेल्या यात्रेच्या वेळी मॉइस्चरायझर, सन्स्क्रीन असं सगळं देऊनही ते वापरलंच गेलं नाही. शिवाय ट्रेक अवघड होता बहुतेक करून सगळ्याच दिवसांतला. चढण आणि उतार दोन्ही बर्यापकी तीव्र होते. पूर्वानुभव नव्हता. हे सगळं लक्षात ठेवून या वेळी बॅग्स भरल्या होत्या. एक मुख्य बदल असा होता, की गेल्या वेळी एका मार्गाने जाऊन दुसर्‍या मार्गाने ट्रेक पूर्ण करायचा होता त्यामुळे सगळं सामान पूर्ण प्रवासात आपल्याच जवळ ठेवायचं होतं. पाय दुखावला आणि लँडस्लाईडमुळे दिवस कमी मिळाले या दोन्ही कारणांमुळे पोनी घेऊन त्याच्यावर बॅग्स टाकल्या, अजून एक पोनी स्वतःसाठी असं केलं त्यामुळे थोडं सुसह्य झालं होतं. पण या वेळी पुन्हा त्याच ठिकाणी यायचं होतं त्यामुळे लहान सॅकमधे ३ दिवसांपुरतं गरजेचं सामान घेऊन पुरणार होतं. शिवाय ट्रेकचा सगळ्यात खडातर दिवस फक्त एकच असणार होता, मधला दिवस. आणि एकूण परिक्रमा ३ दिवसांची होती, बाकी सगळा प्रवास बसने होणार होता. नियमांप्रमाणे पुण्यातूनही निघायच्या ७२ तास आधी मेडिकल चेक अप करून सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले होते ही एक अजून जमेची बाजू.

चीनमधे व्हॉट्सअ‍ॅप चालत नाही या ऐकीव माहितीमुळे आम्ही फोनमधे टेलिग्राम इन्स्टॉल करून घेतलं आणि आमचा जसा व्हॉअ‍ॅ गृप आहे तसाच टेलिग्राम गृप केला. तेही नाही तर आऊटलुक असुदेत म्हणून तेही अकाऊंट कॉन्फिगर केलं कारण जीमेल चालेल याची खात्री नाही असंही ऐकलं होतं. प्रत्यक्षात टेलि आणि आऊटलुक, दोन्ही चाललंच नाही, व्हॉअ‍ॅ चाललं फक्त! मी मारे अगदी माझ्या आणि आई-बाबांच्याही फोनवर खाडखुड करत सगळा उद्योग करून ठेवला होता! असो! चालायचंच!

प्रवास छान चालू होता. गुरूपौर्णिमेच्या शुभ दिवशी आमचे यात्री सकाळी मानसरोवराचं दर्शन घेत होते! खरे भाग्यवान! आम्हालाहे व्हिडिओ कॉल करून बसल्याजागी दर्शन घडवलं! पुढचे काही दिवस नितळ, अथांग याचे अर्थ त्यांना समजत होते. सरोवराचं पाणी शब्दश: नितळ होतं, आकाश म्हणजे तर नुसता निऴ्याचा सोहळा! थोडेफार फोटो आम्ही बघत होतो.
इथे बसल्या बसल्या मी तरी काय करणार होते? माझा आनंद कसा पोहोचवणार होते! शब्दच उसने घेत गेले मीही! कधी शंकर-पार्वतीची एखादी फॉर्वर्ड असूनही सुरेख असलेली कथा, कधी त्या जादुई निळाईबद्दल मला काय वाटतं ते.. काहीबाही लिहून पाठवत होते. आम्हाला सगळा सभोताल दाखवायची विश्रामची आणि दादांची धडपड, त्यांच्या आनंदात आम्ही सामील व्हावं म्हणून चाललेले त्यांचे प्रयत्न आम्ही समजून घेत होतो. त्यांच्या बरोबर सतत मनाने तिथेच होतो. घरी बसून होता होईल तेवढं स्तोत्रं, प्रार्थना म्हणत होतो! मी याही वेळी परिक्रमा झाली तेव्हा रात्री शिवमहिम्न म्हटलं आणि लेकीने शांत बसून ऐकलं.
म्हणताना लय लागली की आरती असो की स्तोत्र, ते संपत आलं की माझे डोळे भरून येतात! का ते कळत नाही असं नाही, पण ते अडवावंसंही वाटत नाही, एखादे वेळी तसं नाही झालं तरी वावगंही वाटत नाही. एखाद्या क्षणी मनातून अगदी काहीतरी हलतं, अनेकदा निसटतं. पण निर्मम होता यावं ही भावना मात्र खूप वेळा असते!

तर, खडतर परिक्रमा संपवून यात्री बेसला परत येत होते. तिसरा दिवस शेवटचा, त्या दिवशी काहीच संपर्क नव्हता तेव्हा मात्र मला जरा काळजी वाटली. आईंना विचारलं तर नुकताच ताईचा फोन झाला, विश्रामला बरं वाटत नाहिये, ताप चढलाय आणि दादाही जरा डाऊनच आहेत, सर्दीने बेजार आहेत असं त्या सांगायला लागल्या, त्यांच्या चेहर्‍यावरची रेघ न रेघ काळजीने भरली होती. तेवढ्यात उमा आली म्हणून मी लगेच तिला ग्राऊंडला घेऊन गेले. तिच्यासमोर विषय नको आणि तिला उशीर नको म्हणून घाई केली मीच. पण तिला सोडून घरी परत येईपर्यंत मी थार्‍यावर नव्हते! नशिबाने, मी परत आले तोवर विश्रामचेच ३-४ मेसेज होते. निदान फोन तरी करू म्हणून केला तर माझ्या कल्पनेपेक्षा तो बराच बरा होता. ताप नव्हता, पण थकव्यामुळे कणकण असेल असं वाटत होतं. High Altitute मुळे विरळ हवा आणि त्यामुळे त्रास हे होणारच होतं. त्यात गोंधळ असा, की खाऊ सगळा गोडच दिला गेला! त्यामुळे थंडीत जरा गरम तिखट खावं तर काही नाही! पणा मग मी लगेच अनयाला फोन केला. तिला थोडक्यात त्रास काय तो सांगितला आणि पुढे बोललेच नाही. एक सेकंद पॉझ घेतला. तिला काय ते समजलं.
''अगं केवढी जिद्द आणि चिकाटी लागते परिक्रमा करायला! अभिनंदन! आणि थोडा त्रास होतोच गं! पण आयुष्यातली केवढी मोठी अचिव्हमेंट आहे ही! काही काळाजी करू नको! आम्ही तर आजारपण आलं तरी आनंदात होतो! घरीपण आधी काही सांगितलं नाही, गेल्यावरच सांगितलं! आता असं कर, गरम पाणी, हळद, मीठ वगैरे घेऊन शेकणं, गुळण्या, वाफ घेणं यातलं जे जमेल ते करायला सांग त्यांना. आणि जसजसे खाली खाली उतरत जातील ना, तसतसा त्रास पटापट कमी होईल. निश्चिंत रहा!" म्हणून मला प्रचंड धीर दिला! माझा रडवेला आवाज क्षणात नॉर्मल आला! परत विश्रामला फोन केला, त्याला उपाय सुचवले. बाबा होतेच तिथे, त्यांचाशीही तो बोलला आणि बाबांचाही जीव भांड्यात पडला! आईंनाही खुशाली सांगितली. सगळेच निश्चिंत झाले!

आम्ही आता त्यांच्या परतीचे प्लॅन्स करायला लागलो. लेकीचा स्कॉलरशिपचा रिझल्ट लागून जिल्हापातळीवर रँक आल्यामुळे बाबा आल्यावर काय बक्षीस घ्यायचं, परीक्षा आहे तो आल्यावर पण नंतर कुठे जाऊन खरेदी करायची असे मनोरे रचायला सुरूवात झाली!
****
भाग ४ : https://www.maayboli.com/node/86971 शेवटचा भाग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>मी याही वेळी परिक्रमा झाली तेव्हा रात्री शिवमहिम्न म्हटलं आणि लेकीने शांत बसून ऐकलं.
म्हणताना लय लागली की आरती असो की स्तोत्र, ते संपत आलं की माझे डोळे भरून येतात! का ते कळत नाही असं नाही, पण ते अडवावंसंही वाटत नाही, एखादे वेळी तसं नाही झालं तरी वावगंही वाटत नाही. एखाद्या क्षणी मनातून अगदी काहीतरी हलतं, अनेकदा निसटतं. पण निर्मम होता यावं ही भावना मात्र खूप वेळा असते!

_/\_ फार सुरेख लिहीले आहे.