'मधसूर्यछाया' : पुस्तक अभिप्राय

Submitted by संप्रति१ on 20 July, 2025 - 01:12

'मधसूर्यछाया' - रोन्या ओथमान (अनु. राजेंद्र डेंगळे)

१. 'डाय सोमर' या मूळ जर्मन कादंबरीचा हा मराठी अनुवाद आहे. ('डाय सोमर' या जर्मन शब्दाचा अर्थ 'उन्हाळा' असा होतो.)

लैला नावाच्या मुलीच्या आयुष्यातील अनेक उन्हाळ्यांची ही गोष्ट आहे. कुर्दिश वडील आणि जर्मन आईच्या पोटी जन्मलेली ही मुलगी जर्मनीमध्ये पालकांसोबत राहत असते. लहानपणी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सीरियातील तिच्या आज्जी-आजोबांच्या गावी जात असते. कादंबरीच्या या सुरूवातीच्या भागात, एका छोट्या निरागस मुलीच्या नजरेतून दिसणारं जग आहे. तिच्या सीरियातील खेडेगावाच्या, विशेषतः तिच्या आज्जीच्या आठवणी फारच नितळपणे नोंदवलेल्या आहेत.

लैलाचे वडील, बशर-अल-असदच्या राजवटीतील कुर्दी लोकांच्या छळामुळे लाख-लडतरी करून जर्मनीत शरणार्थी म्हणून आलेले असतात. तुरुंगात झालेल्या छळाबद्दल लैलाचे वडील तिला तुकड्यातुकड्यांनी सांगत असतात, तेव्हाच्या लेखिकेच्या लिखाणातून एक शांत उदासी स्रवत असताना जाणवते, दुखावते. कदाचित हे लेखिकेच्या स्वतःच्या वडिलांसंबंधी घडलेलं असावं.

२. कादंबरीचा उत्तरार्ध २०११ सालानंतरच्या अशांततेचा घटनाक्रम घेऊन येतो. सीरियन यादवी युद्ध, असदच्या हुकूमशाहीचा अंत, तिथं ISIS नं सूरू केलेला याझिदी-कुर्दी समाजाचा वंशविच्छेद आणि त्यात तिच्या सीरियात अडकलेल्या नातेवाईकांची ससेहोलपट.!! सीरियन युद्ध, ISIS हा अगदी नजीकचा भूतकाळ आहे. वर्तमानपत्रांतून, न्यूजचॅनेल्समधून त्यासंबंधी कव्हरेज जगभर दाखवलं गेलं आहे त्याकाळात. इतरांनी तेव्हा त्याकडे फक्त बातम्या म्हणून बघितलेलं असेल, पण ज्यांच्यासाठी ते वास्तव होतं, जे त्या वास्तवातून जात होते, त्यांचं काय? ते काही कुठलं माध्यमसंस्थान दाखवत नाही. त्यांचं ते कामही नाही आणि वकुबही नाही. ते सांगायला एखादी लेखिकाच लागते. त्या काळातील काही दृश्यांचं, प्रसंगांचं संवेदनशीलतेनं केलेलं वर्णन यामध्ये वाचायला मिळतं.

या उत्तरार्धातील भागात 'टीनएजर' झालेल्या लैलाचा आयडेंटिटी क्रायसिस. एक व्यक्ती, एक आयुष्य, आणि दोन पूर्णतः वेगवेगळी जगं. एकीकडे, एका याझिदी-कुर्द स्थलांतरिताची मुलगी, आणि दुसरीकडे, एक जर्मन संस्कृतीत वाढलेली तरुणी. दोन वेगवेगळ्या आयडेंटीटींसह कसं जगायचं ? तुमच्या आत काय चाललंय, याचं तुमच्या जर्मन मित्र-मैत्रीणींना किंवा खरंतर कुणालाच काही देणंघेणं नाही. मूळ आयडेंटिटी लपवता येत नाही, विसरताही येत नाही.! असा हा आतून फाटत जाण्याचा हा काळ. हा उत्तरार्ध, पूर्वार्धाच्या तुलनेत थोडासा रिपल्सिव्ह वाटण्याची शक्यता आहे. कारण आता लैला काही निरागस छोटी मुलगी राहिलेली नाही.

३. कुर्दिश-याझिदी हा चार देशांमध्ये विखरून टाकला गेलेला एक धार्मिक अल्पसंख्यांक समाज आहे. कुठंच थारा नाही. कुठल्याही क्षणी पळून जावं लागेल, अशी टांगती तलवार घेऊन आयुष्यभर पिचत जगणं. अशा या कुर्दिश-याझिदी लोकांची ही कहाणी आहे. त्यांच्या परंपरांची, श्रद्धांची, दंतकथांची, छळाची, बेघरपणाची, हद्दपारीची कहाणी.

४. ओया बाय्दोर या तुर्की लेखिकेची 'गहाळ' ही अनुवादित कादंबरी पूर्वी वाचलेली, ती यानिमित्ताने आठवली. तुर्कस्तानमधील कुर्दिश भाषिक लोकांच्या स्वायत्ततेच्या संघर्षाला स्वर देणारी फार चांगली कादंबरी आहे ती. 'आम्हाला आमची आमची मातृभाषा बोलू द्या. बहुसंख्यांकांची भाषा आमच्यावर लादू नका' या एवढ्या साध्यासुध्या मागणीसाठीसुध्दा रोज जीवनमरणाचा झगडा करावा लागणारे लोक आहेत या जगात, हे एरव्ही कसं कळणार?

___________________________********________________

थोडंसं आजूबाजूचं (हे वैयक्तिक मत म्हणून वाचून सोडून दिलं तरी चालेल) :
पपायरस प्रकाशनाचं पुस्तक आहे. फारच चोखंदळ, एकामागून एक देखणी पुस्तकं काढतात हे लोक. पुस्तकाच्या आर्किटेक्चरवर, डिझाईनवर घेतलेली मेहनत लपत नाही. 'प्रत्येक पुस्तक नजाकतीनंच पेश करायचं', असं एखादं व्रत घेतलंय की काय, कुणास ठाऊक.
म्हणजे पुस्तक नुसतं हातात घेतलं तरी त्याच्या मुखपृष्ठावरचं चित्र, ब्लॅर्ब, त्याचा पोत, त्याचा स्पर्श, रंगसंगती हे सगळं त्या पुस्तकाच्या आत्म्यात डोकावून पाहायला खुणावतात. अप्रूप !!

IMG_20250720_010726~2.jpg

____________________________********___________________________________

IMG_20250720_095238~2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाय हो.! असंच आवड म्हणून वाचतो.. आणि वाचनाशी ज्याचा दुरून दुरूनही संबंध नाही अशा पेशात आहे. Happy

दि ज़ोमर die sommer.

डाय सोमर नाही.

मूळ पुस्तक वाचावे लागेल.

बाकी पपयरस बद्दल सगळ्या प्रोसेस बद्दल पपयरस कार (श्रीपाद आणि भूषण) खूप डिटेल मधे बोलले आहेत.

https://youtu.be/ho4NeFwGHUc?si=kirok3cyXdE_8FCr

https://www.youtube.com/watch?v=rqq105DS07E

हे दोन्ही भाग ऐकले नसतील तर जरूर ऐक.

भूषणची पुस्तकांबद्दलची भावनिकता मात्र व्यवसायामुळे किंवा एकंदरीत mature होण्यामुळे थोडीशी गळून पडली आहे आणि आता तो पुस्तकांना एक प्रॉडक्ट म्हणून पाहण्याकडे झुकत आहे हे ऐकून मला थोडेसे वाईट वाटले पण एकंदरीत अशी विस्तृत मुलाखत एकाही प्रकाशकाने मराठीत दिली आहे असे मला आठवत नाही.

छान लिहिलंय.
पुस्तक नोट केलंय.

तुमच्या आत काय चाललंय, याचं तुमच्या जर्मन मित्र-मैत्रीणींना किंवा खरंतर कुणालाच काही देणंघेणं नाही. मूळ आयडेंटिटी लपवता येत नाही, विसरताही येत नाही.!
>>>
दोन-तीन वर्षांपूर्वी बर्लिनला गेले होते, तिथे माझ्या हॉटेलमध्येच अभ्यास-सहलीवर आलेली २५-३० मुलं-मुली उतरली होती. वयोगट साधारण ११वी-१२वी.
सकाळी ब्रेकफास्ट हॉलमध्ये त्या मुलांचा गलका सुरू असायचा. त्यांच्यात एकच हेड-स्कार्फवाली मुलगी दिसायची. वेश, रंगरूप यावरून मध्य-पूर्वेतली आहे हे कळायचं. रोज तिच्याबरोबर तिच्या ठराविक मैत्रिणी दिसायच्या. सगळ्या जर्मन. त्या आपापसात जर्मन बोलायच्या. ती मुलगी सुद्धा.
मला रोज वाटायचं, ही सिरियातून आलेली असेल का, आधीच आली असेल? की २०१४-१५ च्या हलकल्लोळात इथे येऊन पडली असेल? इथल्या समाजात मिसळताना काय काय झेलावं लागलं असेल तिला?
आत्ता हे लिहितानाही तिचा चेहरा नजरेसमोर येतोय.

विशेषत: बर्लिन मधे असंख्य टर्किश लोक आहेत. आणि स्थलांतरित झालेले टर्कीश लोक हे प्रागतिक/पूर्व टर्किश लोकांपेक्षा जास्त कर्मठ आणि पारंपरिक आहेत. लेवान्ट वरुन देखिल अनेक लोक आलेले आहेत.
त्यामुळे बर्लिनला हिजाब अजिबात परका नाही. किंबहूना बर्लिन मधे तो खूप नॉर्मलाईज झाला आहे. इतका की खुपदा अत्यंत मादक आणि भडक मेकअप करून या तरुण मुली हिजाब घालून हिंडत असतात. आताच्या फॅशन नुसार अनेकांनी ओठ सुद्धा फुगवलेले असतात. तरीही डोक्यावरती हिजाब असतो.
मात्र उर्वरित जर्मनीत असे म्हणता येत नाही तरीही एकंदरीत हिजाब जर्मन विद्यार्थ्यांना परका नाही.

जर्मनी मधे सिरियन लोकांना मदत करण्यात अनेक जर्मन पुढे होते. दोन्ही बाजूंनी प्रचंड प्रमाणात मोर्चे निघाले होते त्यात wir schafen das म्हणणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड होती. उत्तरोत्तर लोकांची माथी भडकवण्यात आली आहेत.

त्या काळापेक्षा सध्या या मुलांना आणि मुलींना जास्त त्रास होऊ शकतो. तरीही बर्लिन मधे गेली काही वर्षे अनेक देशातून स्थलांतरण झाल्याने आता जी लहान मुलं आहेत ती वेगळ्या वंशाची मुलं एकत्रच मोठी होत आहेत. त्यामुळे पुढे या मुलांना त्रास होणं कमी होईल हे मात्र नक्की.

उर्वरित जर्मनीत असे म्हणता येत नाही
>>> मी तेव्हा जे काही उर्वरित जर्मनीत फिरले तिथेही एकंदर हेच चित्र दिसत होतं.

तेव्हा मी २०१४-१५ च्या हलकल्लोळावर, स्थलांतरितांच्या समस्येवर दोन्ही बाजूंनी माहिती मिळवण्याच्या मागे होते. त्यामुळे तिथे या गोष्टींकडे अधिक लक्ष गेलं.

असो. इथे अवांतर होतंय.

>>>>>>>>तेव्हा मी २०१४-१५ च्या हलकल्लोळावर, स्थलांतरितांच्या समस्येवर दोन्ही बाजूंनी माहिती मिळवण्याच्या मागे होते. त्यामुळे तिथे या गोष्टींकडे अधिक लक्ष गेलं.

तुमचे निर्वासितांवरचे/रेफ्युजी लेख विलक्षण आहेत.

ललिता प्रीती, मला म्हणायचे होते की बर्लिनच्या डेमोग्राफीचे जे युनिक कंपोझिशन ते उर्वरित जर्मनीमध्ये नाही.

निर्वासितांना सर्वच जर्मनीमध्ये डिस्ट्रिब्यूट करण्यात आले असले तरी बर्लिनला अशा कल्चरल वेगळेपणाची सवय आहे. उदा. तुर्की लोक, व्हिएतमानी लोक.

या धाग्यावर ही चर्चा अजिबातच अवांतर नाही वाटली.

तुमचे निर्वासितांवरचे/रेफ्युजी लेख विलक्षण आहेत.
>>>
थँक यू.
तेव्हा लिहिलेल्या १४ लेखांचं पुस्तक आहे - 'देश सुटतो तेव्हा'
पुस्तक किंडलवरही आहे.

रिक्षाच फिरवली की मी Lol

>>>>तेव्हा लिहिलेल्या १४ लेखांचं पुस्तक आहे - 'देश सुटतो तेव्हा'
पुस्तक किंडलवरही आहे.

ओहोहो!! बघते. फार आवडलेले ते लेख.