मानस प्रभातफेरी

Submitted by मी_आर्या on 23 July, 2025 - 06:01

मानस - प्रभातफेरी श्रीमहाराजांची
स्थळ: गोंदवले
वेळ- रात्रीच्या तिसऱ्या प्रहाराची सुरुवात!

IMG-20200908-WA0079.jpg
आदल्या रात्री गोंदवले इथे मुक्कामी आपण गेलो आहोत.. शेजारती होऊन सगळे आपापल्या रूमवर परतले असावे. आता एकेक जण निद्राधीन होण्याच्या मार्गावर आहेत.रात्रीचे साडे बारा वाजून गेले आहेत. आपली अजून चुळबुळ सुरु आहे. काही केल्या झोप येत नाहीये.

मनातल्या मनात जप सुरु आहे. रात्रीचा तिसरा प्रहर सुरु झाला आहे. आपण हळूच उठून खिडकीत येऊन उभे राहतो. संपूर्ण गोंदवले गाव, झाडे झुडपे, पशु पक्षी गाढ निद्रेत आहेत . नाही म्हणायला दूरवर कुठेतरी एखादी भुंकणारे कुत्रे आणि एखाद दुसरा टिवटिवत जाणारा एखादा चुकार पक्षी.. याशिवाय कुणाचाही आवाज नाही. एकदम निरव शांतता. आकाशात चंद्र आणि चांदण्या तेवढ्या जाग्या आहेत... आणि जागे आहे ते समाधी मंदिरातील परब्रम्ह. श्रीमहाराज ही योगनिद्रेत आहेत.

आपण हळूच दरवाजा उघडून बाल्कनीत येऊन उभे राहतो. चिंतामणी बिल्डिंग, चौथा मजला.. आल्याबरोबर पहाटेच्या प्रसन्न गारव्यामुळे अंगावर शिरशिरी येतेय. वर बघावं तर निरभ्र आकाश, चमचमणाऱ्या चांदण्या.. नुकताच रात्री पाऊस पडून गेल्याने स्वच्छ स्वच्छ झालेला परिसर.. सुस्नात झाडे, वेली. समोरचे झाड चांदणे पांघरून बसले आहे. समाधी मंदिराच्या शिखरावर चमचमणारी चांदणी. चंद्र ऐन भरात आलाय आता.. आणि अगदी समाधी मंदिराच्या शिखरावर. चंद्राभोवती खळे पडले आहे. एवढे सुंदर, प्रसन्न दृश्य पाहून आपल्याला राहवत नाही.

आपण अलगद रूमचा दरवाजा ओढून घेतो. अंगावर बारीक स्टोल घेऊन पायाचा आवाज न करता तसेच अनवाणी जिना उतरून खाली जातो. मंदिरासमोरच्या कट्टयावर बसतो. सगळे जग साखरझोपेत आहे. रस्त्यावर चिटपाखरू नाही. नाही म्हणायला एखादी मांजर तेवढ्यात दबकत जाताना दिसते. महाराजांच्या मंदिराचे दरवाजे बंद आहेत. पण आत समाधीपाशी एक मिणमिणता दिवा आहे.

आता तुळशी वृंदावन, आईसाहेब मंदिरापर्यंत एक फेरी मारून यावी म्हणून आपण उठतो. आणि एवढ्यात आपल्याला एक ओझरती आकृती गोशाळेकडे निघालेली दिसते ... पाठमोरी ! अंगात कफनी , डोक्याला फेटा.. ! चक्क इतक्या भल्या पहाटे फिरणारे हे गृहस्थ कोण हे पाहण्यासाठी आपण झपझप जातो. आता जवळ गेल्यावर दिसते.. हातात चक्क माळ ही आहे. बाजूने त्यांच्यासोबत चालणारे कुत्रेही दिसते. अरेच्चा... आता तर इथे आवारात सगळं निर्मनुष्य होते. लगेच कुत्रे कुठून आले? असा विचार आपण मनाशी करतोय तोच घोड्याच्या खिंकाळण्याचा ही आवाज येतोय. अरेच्चा.. एवढ्या रात्री घोडा कुठून आला? थोडं कानोसा घेऊन मागे वळून पाहिले तर बत्ताशा स्मारकाकडून आवाज येतोय. समोरील व्यक्ती, त्याकडे पाहून म्हणतेय, " हो रे, येतो रे बाबा.. तुला रपेट मारून आणल्याशिवाय तू शांत होणार नाहीस, माहित आहे मला!
मी चमकले, हा आवाज कुणाचा?
"बाबा, आपण कोण? एवढ्या पहाटे कुठे निघाले? तुम्हालाही झोप येत नाहीये वाटते.. " आपले वाक्य पूर्ण होण्याच्या आत ते गृहस्थ झर्रकन मागे वळून बघतात. आणि काय सांगू!
प्रत्यक्ष महाराज उभे समोर. आपण तोंडाचा वासलेला आ लवकर बंद होत नाहीये. भानावर येऊन आपण चटकन लोटांगण घालतो.
"महाsssराज, तुम्ही? "
"जानकी जीवन स्मरण जय जय राम!, आशीर्वाद! होय बाळ
न राहवून आपण विचारतो, " महाराज , कुठे निघालात?"
"बाळ, तुला माहित आहेच. एकदा एक जीव हाताशी धरला कि त्याला मोक्षप्राप्ती होईपर्यंत मला त्याला सांभाळावे लागते.
रात्रीच्या वेळी मला तुम्हा सर्वांचे सूक्ष्म देह तपासावे लागतात. तुमच्या सूक्ष्म देहातील वासना कुठे अडकल्या आहेत याचे ज्ञान मला होते. . रोज रात्री इथे मुक्कामी आलेल्या समस्त जीवांसाठी मला या सगळ्या इमारती फिरून तपासणी करावी लागते. अगदी किडा मुंगी, पक्षी का असेना.. पण त्यांच्या पोटात दोन घास गेलेत की नाही, हे बघावं लागतं. इति महाराज!
"बाळ मी आता गोशाळेकडे निघालो आहे. त्या गोमाता केव्हापासून माझी वाट बघत आहेत. तू तोवर ब्रम्हानंद मंडपात जप करत बस. नाहीतर चल माझ्यासोबत! दमदार पावले टाकीत महाराज पुढे निघतात. आपण ही संधी सोडतोय होय. आपणही श्रींच्या मागे मागे झपाझप निघालोय. त्यांच्या बरोबरीने पावले टाकण्याच्या नादात मागे पडतोय. आपण त्यांच्या मागे धावू लागतो.
IMG-20201010-WA0058.jpg
जसजसे गोशाळेच्या जवळ जातोय.. तसतसे गोशाळेत सुरु झालेली चलबिचल आपल्या कानावर येतेय. गायिंनी गोशाळेच्या दरवाजाकडे पाहून हंबरायला सुरुवात केली आहे. आपण पोहोचतो ना पोहोचतो तोच.. समोरच आपल्याला दिसते कि, सगळ्या गायी, खोंड महाराजांजवळ जाण्यास.. त्यांची एक कृपादृष्टी आपल्यावर पडावी म्हणून धडपडत आहेत. दावणीला बांधलेल्या गायीची हिसकाहिसकी सुरु आहे. महाराज प्रत्येकीजवळ जाऊन तिच्या अंगावरून हात फिरवतात. प्रत्येकीशी बोलतात. तिच्या गळ्याला खाजवतात. प्रत्येकीला वाटतेय.. आपल्या अंगावरून श्रींचा हात फिरावा.
कशी आहेस नंदिनी? बाळ झालं ना तुला? मला दाखवणार नाहीस? हसत हसत श्रीमहाराज एका गायीला विचारतात.
ती डोळ्यात प्राण आणून तिच्याशी महाराजांनी बोलावं म्हणून वाट बघत असते तिला असे विचारताच.. अपार आनंदाने आणि आत्यंतिक प्रेमाने गळ्यातील घंटा वाजवत ती मानेने उजवीकडे दाखवते. महाराज तिच्या अंगावर थाप टाकतात.. तोच तिचे शरीर थरथरते. महाराज तिला नमन करून तिचे कौतुक करतात. 'गोंडस आहे हो तुझी पाडी! नाव काय ठेवायचे तुझ्या या छान छान लेकीचे? तिच्या कपाळावर हा गोल चांदवा आहे ना.. आपण तिचे नाव चांदणी ठेवूया का? नंदिनी होकारार्थी मान हलवते.

पलीकडे गंगी मान फिरवून उभी होती.,.. जणू काही श्रीमहाराजांवर रुसली आहे. "चारा खाल्ला की नाही गंगे आज?" काल मी नाही आलो म्हणून काय असं उपाशी राहायच का? " गंगीने एकदम त्यांच्याकडे बघून हंबरायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यात पाणी पाहून महाराजांची गहिवरून येतेय. "बाळ,असा फार काळ रुसवा धरू नये. असं म्हणत महाराजांनी तिला कुरवाळले" तिने डोके खाली घालून नकारार्थी मान हलवते आणि महाराजांच्या कुशीत डोके घालते.

असं एकूणएक गायीची चौकशी करून आता महाराज परत निघायला वळतात. पण गायी पुन्हा हंबरायला सुरुवात करतात. " अगं हो हो बायांनो. मी रोज येतोच इथे तुमची खबरबात घ्यायला. एखादे दिवशी परगावी जावे लागले तर उशीर होतो इतकेच! " महाराज त्यांना आश्वस्त करतात.

आता महाराज आपल्याला म्हणतात, चल बाळ, निघूया! आपण त्यांच्यासोबत निघतो पण थोडे अंतर ठेवून. जाता जाता महाराज, कोठीघरामध्ये डोकावतात. सगळे काही धान्य, वाणसामान व्यवस्थित आहे हे बघून 'माझा बुवा इथे असल्यावर चिंता करण्याची गरज नाही." असे पुटपुटत समाधानाने मान हलवतात.

आता समाधी मंदिरासमोरच्या झाडाकडे महाराज येतात. झाडावर झोपलेल्या पक्षांच्या अंगावरून हळुवार हात फिरवतात. झोपेत जे पक्षी फांदीवरून कलंडायच्या बेतात आहेत त्यांना हळुवार हातांनी परत वर ठेवतात. पक्षांची जी पिल्ले घरट्यातून बाहेर पडण्याच्या बेतात आहेत त्यांनाही परत घरट्यात ठेवत म्हणतात, सांभाळा रे बाळांनो , आपल्या पिल्लांना! "
आता महाराज हुश्श म्हणत कट्ट्यावर बसले आहेत. आपण महाराजांच्या पायाशी बसून त्यांच्या पायावर डोके ठेवत म्हणतो, "महाराज, आम्हाला काही उपदेश द्या. नामाबद्दल काहीतरी सांगा."

श्रींना गहिवरून येते. आवंढा गिळत ते आपल्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात, "बाळ, मी आजवर नामाशिवाय काही बोललो नाही.माझी सेवा तुम्ही जी करता, ती आपल्या देहबुद्धीची करता. तुम्हाला जे पसंत पडेल, तसे तुम्ही करता. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे,सर्वांभूती भगवद्भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे,परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे. नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे." खरं सांगतो, एका नामाशिवाय तुमच्याकडून माझी काहीच अपेक्षा नाही, बरं बाळ! आनंदात राहावे .. मनापासून नाम घेत जावे व अंत:करण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा ; त्यानेच जगाचे कल्याण होईल ही माझी खात्री आहे! आता म्हण बरं माझ्यासोबत, " श्रीराम जयराम जय जय राम" , श्रीराम जय राम जय जय राम " आपण त्यांच्यामागोमाग डोळे मिटून महाराजांचा आपल्या मस्तकाला झालेला स्पर्श आठवत म्हणतोय, " श्रीराम जयराम जय जय राम " डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. किती वेळ झाला कुणास ठाऊक!
कानावर आवाज येतो. "... आता प्रक्षाळ पूजेसाठी गुरुजी येतीलच.. वर्दळ सुरु होईल. मला जायला हवं, बाळ ! एवढं बोलून महाराज प्रक्षाळ पूजेसाठी समाधी मंदिराकडे निघतात. "जी महाराज ,जी महाराज ! " नकळत आपण चरणस्पर्श करतो.
आपण भारावल्यासारखे तिथेच बसून आहोत. समोरून गुरुजी हातात ताम्हण घेऊन लगबगीने समाधी मंदिराकडे जातांना दिसतात.
आपण वेड्यासारखे " महाराज... महाराज" म्हणत ते गेले त्या दिशेला धावतोय. महाराज संथपणे समाधीमध्ये विलीन होतांना दिसत आहेत. पाठोपाठ धीरगंभीर आवाज " श्रीराम जयराम, जय जय राम, श्रीराम जयराम जय जय राम !' आवाज टिपेला... संपूर्ण समाधी मंदिर भरून.. मंदिराच्या कळसातून प्रक्षेपित होतोय. अन आता संपूर्ण आसमंत.. सगळे सजीव निर्जीव म्हणत आहेत, "श्रीराम जयराम जय जय राम !"

जय श्रीराम!

कथा ब्लॉगवर पूर्वप्रकाशित!
https://manatlegondavale.blogspot.com/?m=1

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोंदवले बाबत लिहिताना तुझी।प्रतिभा विशेष बहरते
चित्रदर्शी लिहिलं आहेस
मानस फेरी माझीही
आयुष्यात एकदाही गेलो नाहीये गोंदवलेला पण फिरून आलो असे वाटतंय