
एखाद महिन्यापूर्वी इकडील (अमेरिकेतील) एका वाचनालयात, तेथील परदेशी भाषा विभागात डोकावले. तर मराठी विभागात 50-100 पुस्तक दिसली. त्यातील “स्मरणगाथा” मी घरी येऊन आले. या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 1973 मध्ये निघाली होती. पुस्तकामध्ये 1920 नंतरचा काळ दाखवला आहे.
ही स्मरणगाथा म्हणजे गोनिदांचे (गोपाळ नीलकंठ दांडेकर) आत्मचरित्र. ही गाथा त्यांच्या वयाच्या 13 व्या वर्षी म्हणजे साधारणता 1929 मध्ये सुरू होत. जेव्हा ते स्वातंत्र्यसंग्रमात सहभाग घेण्यासाठी घरातून पळाले तिथपासून ते पुढची सलग सतरा वर्षे - हा १७ वर्षांचा प्रवास ५०० पानांत वाचायला मिळतो.
मूळचे दापोलीचे असणारे दांडेकर कुटुंबीय, सुरुवातीला अमरावतीस परतवाडा येथे राहत. त्यांचे वडील नवीनच आलेल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना मराठी आणि हिंदी शिकविण्याचे काम करत. घरची परिस्थिती साधारण बेताची होती. लहानपणी ते त्यांच्या मोठ्या बहिणीच्या, माईच्या अधिक जवळ होते. घरातील वातावरण शिक्षण, श्लोक, पाठांतरे, तसेच संगीत नाटके ह्या सगळ्यांकरता पोषक होते. पुढे काही वर्षांनी कुटुंबियांनी नागपूरला स्थलांतर केल्यावर, त्या संस्कारक्षम वयात गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीचा, स्वातंत्र्य संग्रामाचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला. एक दिवस, वयाच्या तेराव्या वर्षी, भावनेच्या भरात सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते घरातून पळून मुंबईला गेले. तेथूनच त्यांच्या खडतर जीवनप्रवासाला सुरुवात झाली.
आंदोलनातील वास्तव हे आपल्या कल्पनेच्या आणि समजुतीच्या पलीकडील आहे हे लक्षात आल्यावर, तसेच तोपर्यंत आंदोलन आटोपते घेतल्यामुळे यापुढील वाट आपली आपल्यालाच शोधायची आहे ही जाणीव झाली. त्यातूनच मग मुंबई - पुणे - नाशिक - अकोले असे मार्गक्रमण करत असता त्यांची संत गाडगे महाराजांशी गाठभेट झाली. तो त्यांच्या या प्रवासातील महत्वाचा टप्पा ठरला.
गाडगेबाबांच्या सहवासात, मार्गदर्शनाखाली काही काळ व्यतीत करताना त्यांनी कीर्तनकला जोपासली. कीर्तनानिमित्ताने त्यांना महाराष्ट्राचा प्रवास घडला. त्यादरम्यानच त्यांना ओढ लागली ती तुकाराम महाराजांच्या अभंगांची आणि ज्ञानेश्वरीची. मग देहू जवळील भंडारा डोंगरात एका गुहेत एखाद्या ऋषी-मुनींप्रमाणे एकभुक्त राहून त्यांनी साधना केली. तुकारामांची गाथा - त्यात अदमासे साडेचारहजार अभंग आहेत- ते त्यांनी मुखोद्गत केले. पुढे आळंदीला मारुतीबुवा गुरव यांजकडून ज्ञानेश्वरीचे पाठ घेतले. काही वर्षे ज्ञानेश्वरीचे अध्ययन आणि पारायणे केली.
पुढे धुळ्याला पाठकशास्त्री यांच्याकडे शंकरवेदान्त अभ्यासण्यासाठी गेले असता, गुरूंची नर्मदा परिक्रमा अर्धी राहिली होती ते कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी ह्या शिष्याने उचलली. त्यातूनच घडलेली ती नर्मदापरिक्रमा आणि पुढे लिहिले गेलेले “कुणा एकाची भ्रमणगाथा“. स्मरणगाथा वाचताना कितीतरी ठिकाणी भ्रमणगाथेमध्ये घडलेल्या प्रसंगांचे, पात्रांचे मूळ आढळते.
नर्मदेपरिक्रमेअखेर त्यांचा मुक्काम मंडलेश्वर - इंदोर- उज्जैन असा होत गेला. ह्या काळादरम्यान त्यांनी हेडगेवारांच्या संघात प्रवेश करून ते तेथील शाखेचे काम करू लागले. तशातच एके दिवशी कित्येक वर्षांच्या उपेक्षेने व्यथित झालेल्या शरीराने बंड पुकारले आणि नाईलाजाने त्यांना १७ वर्षांचा तो अनवट संघर्षमय जीवन प्रवास खंडित करून अखेर घराची वाट धारावी लागली.
मी वर ढोबळ्मानानाने लिहिलेले मुख्य टप्पे त्या जीवनप्रवासाचा फक्त आराखडा सांगतात. परंतु त्यात अनेक कंगोरे आहेत, अनेक स्तरांवर ही स्मरणगाथा आपल्याला घेऊन जाते.
त्या वेळचं १९२० -१९४६ ह्या स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजजीवन- इंग्रजांचे अत्याचार, जातिव्यवस्थेतून होणारे अन्याय, निजामशाहीत पोळणारा महाराष्ट्रातील भूभाग; सांस्कृतिक जीवन - संगीत नाटकं , नाट्यपेमी समाज, कीर्तन -प्रवर्चनाची परंपरा यांची एक झलक बघायला मिळते.
संत गाडगे महाराज- ज्यांच्याविषयी (दुसरीच्या पुस्तकात ?) एका धड्यातून जुजबी माहिती मिळाली होती- पण स्मरणगाथे मधून त्यांच्या कार्याची व्याप्ती, त्यांना लाभलेली लोकप्रियता, त्यांचा लोक संग्रह, त्यांचा कनवाळूपणा, त्यांची निःसंगवृत्ती, साधेपणा बघून थक्क व्हायला झालं.
तुकारामांचे अभंग कधी पुस्तकांतून किंवा गाण्यांमधून आपण ऐकतो पण तुकारामांच्या गाथेचा उत्तुंगपणा - जीत साडेचार हजार अभंग आहेत - जाणवून, आपल्याला माहित असलेले अभंग किंवात्यांच्याविषयीची माहिती हे, हिमनगसारखे आपल्याला दिसणारे फक्त टोक आहे, ह्याची पक्की जाणीव झाली.
ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी, त्यावेळच्या सामान्य जनतेला कळावी म्हणून सुबोध भाषेत लिहलेली ज्ञानेश्वरी, आपल्याला ह्या काळात आपल्या साठाव्या वर्षी (सगळ्यांना नाही पण वाटतं त्यांना ) समजून घ्यावी वाटते. परंतु गोनीदांना त्यांच्या विशीतच ती समजून घ्यायची आस लागली.
एकंदरच स्मरणगाथा वाचताना तुकाराममहाराज, ज्ञानेश्वरमाऊली, शंकरवेदान्तासारखे अनेक प्राचीन ग्रंथ, वारकरी परंपरा, कीर्तन परंपरा या सगळ्याच्या अफाट आणि अगाध विस्ताराच्या अस्तित्वाची जाणीव होते.
एक तेरा-चौदा वर्षांचा मुलगा राष्ट्रपेमापायी घरदार सोडून बाहेर पडतो. त्यानंतर त्याच्या वाट्याला आलेले कष्ट, झेललेले अनन्वित अत्याचार, अपमान, हलाखीची परिस्थिती, झालेली उपासमार,उपसलेले अपरंपार कष्ट, समोर आलेल्या किशोर/ तरुणमनाला चाळवणाऱ्या निसरड्या वाटा, हे असे अनेक काटे, निखारे वाटेत विखुरलेले होते. पण असं असतानाही त्यांनी दाखवलेली असामान्य समज, धैर्य, चिकाटी, स्वाभिमान, त्यांच्या ठायी असलेली तीक्ष्ण स्मरणशक्ती, प्रखर बुद्धिमत्ता, सुस्पष्ट उच्चारण आणि बालपणीच मिळालेली संस्कारांची शिदोरी ह्यांच्या जोरावर गोनीदा, भट्टीतून बाहेर आल्यावर सोनं जसं झळाळून लखलखतं, तसंच काहीसं मला गोनीदांच्या बाबतीत स्मरणगाथा वाचताना जाणवलं.
भाषेविषयी म्हणायचं तर जुनी मराठी भाषा, अनेक संस्कृत, प्राकृत श्लोकांनी नटलेली आहे. लिखाणाची शैली ओघवती आहे. भाषेवरील प्रभुत्व ह्याविषयी मी काही बोलणे म्हणजे काजव्याने सूर्याविषयी बोलण्यासारखे आहे :).
परंतु सध्याच्या / किंवा मी वाचलेल्या बाकी पुस्तकांपेक्षा अतिशय वेगळेपण जे मला जाणवत ते म्हणजे फक्त कथानक किंवा सांगायचे मुद्दे (ज्याला आपण अलीकडे कन्टेन्ट म्हणतो ) ह्यावरच फक्त लक्ष केंद्रित करून तो प्रवाह पुढे नेण्याकडे जो भर असतो ते इथे आढळत नाही किंवा तशी अजिबात घाई नाही तर तो फुलवण्याकडे, छान समजावून देऊन त्यासाठी मराठी भाषेतील अलंकारांचा, शब्दरत्नांचा वापर करून लिखाण सजविण्यावरही तेव्हढाच जोर दिलेला आहे. अर्थात त्यात कुठलाही मुद्दा / कथा वाहूनही जात नाही.
अशाच एका ग्रुपवर कुणा एकाने डकवलेली “कुणा एकाची भ्रमणगाथा” ह्या श्राव्यपुस्तकाची (ऑडिओ बुक ) ची लिंक मिळाली. त्यातील कथानक, उपकथा, पात्रे, मांडणी, मुख्य म्हणजे भाषा, शैली सगळंच इतकं आवडलं की संधी मिळताच गोनीदांचं “स्मरणगाथा” वाचलं.
मशालीने मशाल पेटवत पुढे जात रहावे, तसेच एका वाचनात पुढील वाचनाची दिशा मिळते असे काहीसं आजकाल मला वाटायला लागलं आहे. त्यातूनच पुढे जमेल तस तुकाराम, ज्ञानेशावर, गाडगे महाराज ह्यांच्या विषयी जाणून घ्यायला त्यांच्या साहित्याचा कोळून अर्क प्यायलेल्या, त्यांचे अनुयायी असलेल्या गोनीदा यांची पुस्तके पुढील दिशा दाखवतील असं आत्तातरी वाटतंय.
सुंदर परिचय. आजवर ते फक्त
सुंदर परिचय. आजवर ते फक्त उत्तम लेखक म्हणून परिचित होते. त्याच्या पूर्वायुष्यातील हा परिचय खरोखरच स्फुरणदायी आहे.
छान परिचय लिहिला आहे. आवडल.
छान परिचय लिहिला आहे. आवडल.
खूप आधी पुस्तक वाचलं आहे त्यामुळे काही आठवलं काही नाही. पुन्हा वाचायला हे निमित्त मिळाले.
उत्तम परीचय… गोनिदा माझ्या
उत्तम परीचय… गोनिदा माझ्या खूप आवडीचे लेखक आहेत.
खूपच सुरेख परिचय. मस्त
खूपच सुरेख परिचय. मस्त लिहीलयस.
आवडला परिचय!
आवडला परिचय!
सुरेख परिचय, खूप वर्षांपूर्वी
सुरेख परिचय, खूप वर्षांपूर्वी वाचलेली त्यांची पुस्तकं. त्यातले मुंबईत रहातानाचे काही प्रसंग अंगावर काटा आणणारे आहेत. कोणा एकाची भ्रमणगाथा मध्ये वाचलंय, एकंदरीत सर्वच.
त्यांची दुर्गभ्रमणावरची पुस्तकंही अप्रतिम आहेत, त्यांच्याबरोबर गड, किल्ले फिरवणारी. सगळं वाचून खूप वर्ष झाली, परत वाचायला हवीत.
सुरेख परिचय. आवडला लेख.
सुरेख परिचय. आवडला लेख.
शेवटचा परिच्छेद. रिलेट झाला म्हणून विशेष आवडला. माझं असंच होतं, एक वाचताना पुढची दिशा मिळते, आणखी लेखक, पुस्तकं, विषय गोतावळा वाढत राहतो.
रेव्ह्यू, ऋतुराज, हर्षल
रेव्ह्यू, ऋतुराज, हर्षल_चव्हाण, सामो, फारएन्ड, अन्जु, वंदना अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
रेव्यू, होण्याचा प्रवास खूप प्रेरणादायी वाटला.
वा!
पुन्हा वाचायला हे निमित्त मिळाले. >>>
काही प्रसंग अंगावर काटा आणणारे आहेत>>> ते अकोल्याला राहिला जाईपर्यंत असे अनेक प्रसंग या जातात.
गाडगे महाराजांच्या संगतीत येईपर्यंत , त्यानंतर जणू परिसस्पर्शाप्रमाणे त्यांच्या जीवनाला वेगळी दिशा मिळते
म्हणजे कष्ट संपत नाहीत पण एक दिशा मिळत जाते, चांगले मार्गदर्शन मिळत जाते.
असंच होतं, एक वाचताना पुढची दिशा मिळते, आणखी लेखक, पुस्तकं, विषय गोतावळा वाढत राहतो.>>>
शिवाय त्यातील काही परस्पर संबंध असल्यास अजून संगती लागत जाते. (Connecting डॉट्स सारख काही..)
जाता जाता,
जाता जाता,
पडघवली मध्ये आलेलं वर्णन ह्याच मूळ त्यांचं मूळ गाव, गुडघे ( दापोली जवळील) येथे असल्याचं आढळतं.
जैत रे जैत सिनेमा नुकताच पहिला - गाणी, चित्रपट, कलाकार, दिग्दर्शक सर्व मात्तबर मंडळी आहेत हे माहीत होतं पण तरीही ( बहुदा खूप जुना असल्यामुळे असेल) पहिला गेला नव्हता - अर्थात गोनीदांचा म्हणून. खूपच आवडला. साधा, सरळ तरीही गुंतवून ठेवणारा. या विषयावर इतकं सुंदर लिखाण त्यांनाच जमू जाणे. ह्याचेही मूळ त्यांनी ह्या अशा माळरानावर, जंगलात, आदिवासी, भिल्ल लोकांबरोबर राहून घालवलेल्या दिवसांत असल्याचं दिसून येतं.
आहेत
गोनिदांचं नर्मदा परिक्रमेवरचं
गोनिदांचं नर्मदा परिक्रमेवरचं पुस्तक, दुर्गभ्रमणगाथा, स्मरणगाथा, पडघवली, माचीवरला बुधा ही आणि बाकी ही बरीच आवडीची पुस्तकं आहेत. त्यांना भेटायचा योग आला नाही. पण त्यांच्या कन्या वीणाताई पुण्याला मी राहते, त्याच भागात राहायच्या. त्यांच्याशी ओळख करून घेऊन मी गोनिदांच्या, वीणाताईंच्या पुस्तकांबद्दल, त्यांचा एक अभिवाचनाचा कार्यक्रम कल्याणला झाला होता, त्याबद्दल बोलले होते.
किती विलक्षण अनुभव घेतले होते त्यांनी! म्हणूनच बहुधा असं वेगळं लिखाण त्यांच्या हातून घडलं असेल.
अनन्या, या अधिक माहिती साठी
अनन्या, या अधिक माहिती साठी धन्यवाद!
किती विलक्षण अनुभव घेतले होते त्यांनी! म्हणूनच बहुधा असं वेगळं लिखाण त्यांच्या हातून घडलं असेल.>> खरंय
स्टोरीटेल वरील त्यांची पुस्तकेही, त्यांच्या मुलीने, वीणा देव ह्यांनी वाचली आहेत. काही ठिकाणी त्यांची नात - मधुरा देव ( कुलकर्णी) , ह्यांनी पण सहभाग घेतला आहे.
खूप वर्षांपूर्वी वाचलेली
खूप वर्षांपूर्वी वाचलेली त्यांची पुस्तकं, खूप आधी पुस्तक वाचलं आहे, >>>
खर तर त्यांची पुस्तकं इतकी जुनी आहेत, बऱ्याच जणांची ती शालेय जीवनात वाचून झालेली असतात.
पण माझ्याकडून मात्र पडघवली सोडून अजून काही वाचले गेले नव्हते.
बऱ्याच उशिरा हातात आली.
छन्दिफन्दि - अजून एडिट होत
पोस्टमधला बदल केल्याने मजकूर काढत आहे.
केलं. फारएन्ड थॅन्क्स.
केलं. फारएन्ड थॅन्क्स.
ते शब्द नीट टाईप करून पुढे गेले होते.. पण बऱ्याच वेळेला मोबाईल मधील कीबोर्ड ते ऑटोकरेक्ट (खरंतर इन्करेक्ट ) करत जातो.
हो तसे पाहिले आहे कधीकधी.
हो तसे पाहिले आहे कधीकधी. थँक्स.
पावनकाठाचा धोंडी - गोनीदा
पावनकाठाचा धोंडी - गोनीदा
धोंडी हवालदार पूर्वजांचा, आपल्या हवालदार हु द्याचा खूप अभिमान बाळगणारा, तसेच काळ्या मातीशी इमान असणारा, अत्यंत तत्वनिष्ठ.
एका लढाईत जेव्हा किल्लेदार पळून गेला आणि हवालदाराने किल्ला झुंजून वाचवला त्यामुळे खुश होऊन शिवाजीराजांनी तो किल्ला हवालदारांच्या स्वाधीन केला होता. तेव्हापासून हे ढेपाळे घराणं हवालदार म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
हा धोंडी हवालदार म्हणजे त्या घराण्यातला काही पिढ्यानंतरचा वंशज.
तर हा धोंडी हवालदार म्हणजे सच्चा, कष्टाळू, मातीशी इमान राखून असलेला, तत्वनिष्ठ शेतकरी. त्याची पतीवर प्रेम आणि श्रद्धा असलेली बायको सारजा. त्याचा मुलाप्रमाणे वागवलेला धाकटा भाऊ कोंडी आणि पुढे लग्न झाल्यावर घरी आलेली कोंडीची बायको सारो या चार मुख्य ही चार मुख्य पात्र.
कोंडीला नवीन विचारांचं वारं लागलं तर धोंडी मात्र अजून जुन्यातच अडकून पडलेला. त्यामुळे कोंडी दुधाचा व्यापार करायला बघतो तर धोंडीचा त्याला पूर्णविरोध. तो दोन पिढींमधील संघर्ष, धोंडीची कुठल्याही तत्वांशी मूल्यांशी तडजोड करायला अजिबात तयारी नसणं, सारजा कोंडीच मायलेकराप्रमाणे असलेले सुंदर नाते, त्यातच नवीन विचारांची शिकलेली सुनबाई सरु हिची सासू सासऱ्या वाणी असलेल्या सारजा धोंडी यांच्यावर माया करणं, त्या काळ्या आईचं ऋण मानणं सगळं खूप छान पद्धतीने उभं केलंय.
शेवटी धोंडी त्याच्या तत्वांपायी, मातीच्या प्रेमापायी आणि पूर्वजांच्या आदरापायी त्या काळ्या मातीत स्वतःला झोकून देतो- आपल्या घामाने आणि रक्ताने तिला अभिषेक घालतो तो प्रसंग अंगावर येणारा आहे.
स्टोरीटेलवर वीणा देव विजय देव मधुर देव ह्यांनी वाचनही सुरेख ढंगात केलंय. ऐकताना छान वाटत.
इतक चित्रमय आणि नाट्यपूर्ण कथानक आहे की ह्यावरचा एखादा मराठी चित्रपट केला असता तर नक्की चालला असता
इतक चित्रमय आणि नाट्यपूर्ण
इतक चित्रमय आणि नाट्यपूर्ण कथानक आहे की ह्यावरचा एखादा मराठी चित्रपट केला असता तर नक्की चालला असता>>
नुकतच कळलं की, ह्या नावाचा एक जुना चित्रपट आहे.
मोगरा फुलला - गो.नी. दांडेकर
मोगरा फुलला - गो.नी. दांडेकर
मोगरा फुलला हा कादंबरीत ज्ञानेश्वरांची जीवन कहाणी, ज्ञानोबांच्या अमृता तेही पैजा जिंके अशा (ज्ञानेश्वर कालीन) प्राचीन मराठीत अतिशय रसाळ भाषेत उलगडून दाखवली आहे.
स्टोरीटेल वरील वीणा देव आणि विजय देव ह्यांच्या आवाजातील वाचनही तितकंच सुमधुर/ सुश्राव्य झाले आहे. काही निवेदन गोनीदांच्या आवाजातही ऐकायला मिळते. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या त्यांच्यावरील असलेल्या /त्यांनी मानलेल्या ऋणातून मूक्त व्हावे हे ‘मोगरा फुलला’ ही कादंबरी लिहिण्यामागील मुख्य प्रयोजन.
संत ज्ञानेश्वर महाराजांची जीवन कहाणी आणि त्याच्या ओघाने येणाऱ्या चुरस कथा आपल्याला चित्रपट किंवा पुस्तक/ गोष्टींमधून साधारणपणे माहिती आहेत.
इथे गोनीदांनी दोन कल्पित पात्रे- एक कावेरी म्हणजे ज्ञानेश्वरांच्या माऊलींची रुक्मिणीबाईंची बालसखी, आणि दुसरे, विठ्ठल पंतांचे स्नेही भट्टदेव - ह्यांच्या
माध्यमातून ही कहाणी सांगितली आहे.
रुक्मिणी आणि विठ्ठल पंतांची भेट, त्यांचा विवाह, त्यानंतर विठ्ठल पंतांचा संन्यास घेणे, समाजाने त्यांना वाळीत टाकणं, त्यानंतर विठ्ठल पंत आणि रुक्मिणी बाईंनी केलेला देहत्याग, थोरला निवृत्तीनाथ, ज्ञानदेव मुक्ताई आणि सोपानदेव या चौघा भावंडांनी एकमेकांवर माया करत, आधार देत, मोठ्या हिंमतीने, त्यांना बहिष्कृत केलेल्या समाजाप्रती यकिंचितही राग न धरता, उलटपक्षी स्नेहाने व्यतित केलेले दिवस, पुढे पैठण मध्ये धर्मशास्त्रातील पंडितांकडून आलेले अनुभव, तद्नंतर मिळालेली लोकमान्यता/ लोकप्रेम, ज्ञानेश्वरीचा लिखाणारंभ, तद्नंतर पंढरपुरी झालेली ज्ञानोबा- नामदेव भेट अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत कथा अखेर ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीशी येते.
जिवंतपणे समाधी घेण्याचा त्यांचा निर्धार, एक गुरु आणि थोरले बंधू या नात्याने एकाच वेळी दोन मनांचे झालेले निवृत्तीनाथ - पर्वत पाझरू लागला, प्रिय बंधूंच्या वियोगाला सामोरे जाण्याच्या कल्पनेने व्यथित झालेली मुक्ताई.. तो प्रसंग इतका हृदय द्रावक झालाय, ऐकताना आतड्याला अक्षरशः पिळ पडतो.
नामा म्हणे आता लोपला दिनकर,
बाप ज्ञानेश्वर समाधीस्त!
ह्या नामदेवांच्या आर्त अभंगाने शेवट केलाय.
हे पुस्तक ऐकणे म्हणजे फारच वेगळा अनुभव होता. श्रवणीय तर आहेत परंतु त्याही पलीकडे जाऊन कुठेतरी काहीतरी हलतं आतमध्ये..
वाटून जातं की मोगरा फुलला हे शीर्षकही किती समर्पक दिले आहे. शांत, शीतल, शुभ्र , मंद, पवित्र, प्रसन्न, आल्हाददायी आणि सुवासिक ह्या सर्वांचीच अनुभूती देणारे, असे हे ‘मोगरा फुलला’.
ह्या धाग्यावर गोनिदांची पुस्तके / साहित्य परिचय, रसग्रहण एकत्रित करण्याचा विचार आहे. म्हणून येथे डकविले आहे.
वाह ऐकले पाहीजे.
वाह ऐकले पाहीजे.
छान लिहिलंय
छान लिहिलंय
प्रतिसादात वाचून मोगरा फुलला विषयी जबरदस्त आकर्षण वाटतेय आता
वाचले पाहिजे
इथे संग्रहात असावे म्हणून:
इथे संग्रहात असावे म्हणून:
अखिल गिर्यारोहण महाराष्ट्र महासंघ निर्मित 'गोपाळ नीलकंठ दाण्डेकर - किल्ले पाहिलेला माणूस'
https://youtu.be/qhr4WkhytSA?feature=shared
सामो, झकासराव धन्यवाद!
सामो, झकासराव धन्यवाद!
हर्पेन धाग्यात भर घातल्याबद्दल धन्यवाद. बघेन/ ऐकेन .
"जैत रे जैत " मी काही
"जैत रे जैत " मी काही महिन्यांपूर्वी पहिला.
अत्यंत लोकप्रिय झालेली गाणी, दिग्गज कलाकार, उत्कृष्ट दिग्दर्शन ह्याविषयी माहिती होतीच. परंतु गोनीदां ची पुस्तके वाचत असताना कळले की त्यांची कथा आहे म्हणून मुद्दाम बघितला. “जैत रे जैत” पुस्तक वाचून/ ऐकून मगच ह्या चित्रपटाविषयी लिहायचे ठरवले होते.. पण इतक्या महिन्यांत तो मुहूर्त न मिळाल्याने आता पुढेही तो मिळेल ह्याची खात्री नाही म्हणून आज हा प्रपंच!
आदिवासी ठाकरांची वस्ती, त्यात राहणारा नाग्या, भगताचा लेक. लहानपणापासून त्याला लिंगोबाला भेटायचंय. लिंगोबा म्हणजे एक सुळका ( पहाड) ज्याला ते पाडावासी देव/ महादेव मानतात. त्याच्यावर भाळलेली चिंधी आवडत नसलेल्या पहिल्या नवऱ्याला काडीमोड देऊन नाग्याकडे आलेली आणि त्याला समर्थपणे साथ देणारी. लिंगोबाकडे जाण्यातील मुख्य अडथळा म्हणजे राणी माशी, तिची पोळी. नाग्या आणि चिंधी लिंगोबाच दर्शन घेण्यासाठी एक क्लृप्ती आखतात, पण तो सफल होतो का?
गोनीदानी आदिवासी / ठाकर जीवन जवळून बघितलं होतं. त्यांच्या बरोबर दिवस घालवले होते ( स्मरणगाथा) त्यामुळे ते इतके उत्कृष्ट पद्धतीने बारकाव्यांसहित दाखविलेले आहे.
उंदीर , कावळे खाणं, त्यांची निसर्गाशी असणारी जवळीक, निसर्गातच देव पाहणं/ शोधणं, त्यासंदर्भातही रोख ठोक पण तरी थोडफार असलेलं भोळेपण, त्यांच्या श्रद्धा/ अंधश्रद्धा, त्यांची केली जाणारी फसवणूक/ पिळवणूक, बेभान होऊन ढोल वाजवणं.. अर्थात त्यात दिग्दर्शकाचीही महत्वाची भूमिका आहेच
गाणी अतिशय आवडतात. अर्थपूर्ण, कधी गोष्ट पुढे नेणारी त्यामुळे चित्रपटाचा अविभाज्य भागच वाटतात.
भोळासांब पण हट्टी नाग्या, चतुर आणि बिनधास्त चिंधी दोघंही खूपच आवडले.
मोहन आगाशे, स्मिता पाटील, निळू फुले आणि सुलभा देशपांडे ह्यांच्या विषयी काय बोलणार?
हा चित्रपट मास्टरपीस आहे. नवीन कलाकारांनी/ सिनेमा करणाऱ्यांनी बघावेत अशा कॅटेगरीत मोडणारा वाटला.
होय जैत रे जैत खरच सुंदर
होय जैत रे जैत खरच सुंदर सिनेमा आहे - चित्रीकरण, गाणी, भाषा, वेशभूषा आणि अर्थात अभिनय व दिग्दर्शन.
जैत रे जैत चित्रपट पाहिला आणि
जैत रे जैत चित्रपट पाहिला आणि पुस्तकही वाचले होते. दोन्हीही आवडले. गोनिदांची निरीक्षण शक्ती जाणवते. तो चित्रपट पनवेलजवळच्या कर्नाळा किल्ला आणि आजुबाजूचे ठाकर यांच्यावर बेतला आहे. आपण सर्व पर्यटक पनवेल - पेण रस्त्यावरच्या कर्नाळा प्रवेशद्वाराकडून जातो. तिकडून ठाकर 'भेटत' नाहीत. कोकण रेल्वेच्या रसायनी स्टेशनकडून जी वाट आहे तिकडून कर्नाळ्याकडे जाताना ठाकरवाडी लागते. तिकडे थांबून त्यांच्याशी गप्पा केल्यावर त्यांचा स्वभाव, भोळेपणा जाणवतो. ते लोक अजूनही तसेच आहेत. कर्जतवरून ढाक गावाकडे( ढाक बहिरीचे उत्तर टोक) जातानाही काही ठाकर वस्ती लागते.
अशीच दुसरी पुस्तके म्हणजे खडकावरला अंकूर राजमाचीच्या उधेवाडी वस्तीवर बेतले आहे, तर पवनाकाठचा धोंडी लोहगडाच्या मागच्या बाजूला असलेल्या पवना गावावर आहे.
धनश्री आणि srd प्रतिसादाबद्दल
धनश्री आणि srd प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
Srd वा ! किती चांगली माहिती दिलीत.
हो कर्नाळ्याच्या इकडचं चित्रीकरण आहे. बहुदा ट्रेकर्स लिंगोबाच्या डोंगराला कर्नाळ्याची किंवा नानाची शेंडी म्हणतात.
कर्नाळ्याची माहिती मारुती चितमपल्ली काही मुलाखतीत पण मिळाली होती.
लहानपणी कर्नाळ्याचे पक्षी अभयारण्य बघायला गेलो होतो २-३ वेळा.
उंदीर / ससाणे / कावळे खातात हा उल्लेख स्मरणगाथेमध्ये आला होता.. नर्मदा परक्रमेच्या दरम्यान त्यांना आदिवासी/ भिल्ल भेटतात.
पवनकाठचा धोंडी वाचलंय.. ह्या धाग्यातच वरती लिहिलंय त्याविषयी.