
दीर्घकालीन दुर्धर आजार अनेकांच्या वाट्याला येतात. संबंधित आजाराचे सर्व उपचार करून डॉक्टर्स थकले की शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांना अंतिम सल्ला दिला जातो तो म्हणजे,
“आता मृत्यूची वाट पाहण्याखेरीज आपल्या हातात काही नाही”.
खरंय, अशा केसेसमध्ये मृत्यू हा अंतिम आणि नैसर्गिक ‘उपाय’ ठरतो.
अशा तऱ्हेने त्या रुग्णाचे आयुष्यातील अखेरचे पर्व चालू होते आणि ते किती काळ चालेल हे अनिश्चित असते. आपल्या जिवलग अथवा कुटुंबीयांच्या मृत्यूची चाहूल लागणे हा कुतुहलमिश्रित दुःखद विषय असतो. प्रत्यक्ष मृत्यू होईपर्यंत कुटुंबीय अथवा सेवक अशा कोणाला ना कोणाला तरी रुग्णाची सोबत करावी लागते. त्या दृष्टिकोनातून पाहता, मृत्यू जवळ आला असता रुग्णात कोणते शारीरिक बदल होतात आणि इतरांना त्याच्यात कोणती लक्षणे अथवा चिन्हे दिसतात यांचा आढावा या लेखात घेतोय. तो सामान्यज्ञान म्हणून सर्वांनाच उपयुक्त ठरावा. त्याचबरोबर या अंतिम घटिकांमध्ये रुग्ण-सोबत्याने रुग्णाची कशी काळजी घ्यावी आणि काय पथ्ये पाळावीत याचाही थोडक्यात उल्लेख करतो. (या लेखात फक्त नैसर्गिक मृत्यूच विचारात घेतला आहे).
आता पाहूया महत्त्वाची मृत्यूपूर्व लक्षणे :
निरिच्छता
अंथरुणाला खिळलेला रुग्ण वेळ जाण्यासाठी एरवी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत मन रमवित असतो. जसे की, पेपर वाचन, संगीत श्रवण, टीव्ही पाहणे आणि किरकोळ कौटुंबिक हितगुज. मात्र तब्येत जशी गंभीर होते तसतसा त्याचा या सर्व दैनंदिन गोष्टींमधला रस झपाट्याने कमी होतो. किंबहुना त्याची कशाचीच इच्छा नसणे आणि शांतपणे नुसते पडून राहणे हा एक महत्त्वाचा बदल इतरांनी लक्षात घेण्याजोगा. अशा प्रसंगी प्रेमभराने रुग्णाचा हात हातात घेतला असता रुग्णाला भावनिक आधार वाटू शकतो.
ढासळते अन्न-पाणीग्रहण
खाण्यापिण्याची वासना शमविणे हा तर आयुष्यभरातला सर्वोच्च आनंद असतो. परंतु मृत्यूसमीप अवस्थेत खाण्यापिण्याची वासना प्रकर्षाने कमी होते. आजारामुळे शरीरात काही रासायनिक बदल झालेले असतात व त्यामुळे शरीराची अन्नपाण्याची गरज देखील खूप कमी होते. अशा प्रसंगी, कोणीतरी आपल्याला भरवतंय ही भावना रुग्णाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची ठरते.
आता अन्न पाणी देताना शरीरपोषण वगैरे मुद्दे बाजूला ठेऊन रुग्णाचे आवडते पदार्थ झेपेल अशा पद्धतीने देणे श्रेयस्कर. बळेबळे खाऊ घालणे तर टाळलेच पाहिजे. बरेच रुग्ण घन आहार घेण्यास नाखुश असतात. अशा वेळी बर्फाचा तुकडा अथवा गोठवलेल्या फळांच्या रसाचा तुकडा चघळायला दिल्यास बरे वाटते. एखादा रुग्ण तोंडाने गिळूच शकत नसल्यास त्याला मुद्दाम भरवता कामा नये; चुकून असे केल्यास अन्नकण श्वासनलिकेत जाऊन परिस्थिती बिकट होते.
झोप
रुग्णाचा झोपेचा कालावधी प्रमाणाबाहेर वाढू लागतो आणि तो वाढतच राहतो. अत्यंत थकव्यामुळे त्याला डोळे उघडण्याचे कष्टही पेलत नाहीत. अशा परिस्थितीत तो कित्येक तास झोपून असला तरीही त्याला उठवण्याच्या फंदात पडू नये.
संभ्रमावस्था आणि चित्रविचित्र भास
टप्प्याटप्प्याने काळ, वेळ आणि ठिकाण यांचे भान राहत नाही. जवळच्या व्यक्तीही अनोळखी वाटू लागतात. चित्रविचित्र भास होणे हे देखील या अवस्थेचे एक वैशिष्ट्य. असे भास शुश्रुषा केंद्रात ठेवलेल्या वृद्धांच्या बाबतीत तर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. रुग्णाच्या नजरेसमोर दिवंगत प्रिय व्यक्ती येऊ शकतात आणि जुन्या आठवणींचीही गर्दी होते. जेव्हा रुग्ण अशा स्वरूपाची वर्णने करू लागतो तेव्हा सोबतच्या व्यक्तीने त्यात ‘हो हो करून’ सामावून जाणे हिताचे असते; उगाच रुग्णाचा भ्रम दूर करण्यात अर्थ नसतो.
अस्वस्थता व कासाविसी
जागेपणी रुग्ण कमालीचा अस्वस्थ असतो आणि त्याच्या जीवाची अक्षरशः तगमग होते. अशा वेळेस झोप लागणे कठीणच. एकंदरीत बुद्धिभ्रंश झाल्याची ही अवस्था असते. अशा वेळेस त्याचे शांतपणे ऐकून घेऊन धीर देणे हे हितावह. गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने सौम्य गुंगी आणणारी औषधे देता येतात.
अनियंत्रित मलमूत्रविसर्जन
लघवी आणि/अथवा शौच नकळत होऊन बसणे हा या स्थितीतील एक महत्त्वाचा बदल आहे. त्याने रुग्णाचा आत्मसन्मान ढासळतो आणि त्रस्तता वाढते. त्यातून पुढे त्वचेचा दाह आणि जंतूसंसर्ग देखील होऊ शकतो. या प्रकाराची वेळच्यावेळी स्वच्छता राखणे हे परिचारकाच्या दृष्टीने महत्त्वाचे काम ठरते. कित्येक तास जर लघवी झालेली नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने मूत्रमार्गातील नळीची व्यवस्था करावी लागते. मृत्यू समीप आला असता असता लघवीचे प्रमाण खूप कमी होते आणि ती बरीच गडद रंगाची असते.
दृष्टी आणि श्रवण दुर्बलता
मृत्यूपूर्व काही तासांमध्ये या दोन्ही महत्त्वाच्या संवेदना बऱ्याच कमी होतात. किंबहुना प्रकाश आणि आवाज या दोन्ही गोष्टीची सहनशीलता बरीच घटते. या दृष्टीने रुग्णाच्या खोलीतील प्रकाश मंद असावा आणि आजूबाजूला मोठे आवाज करणे टाळावे. शरीराच्या सर्व विशेष संवेदनांमध्ये ऐकण्याची थोडीफार क्षमता जवळजवळ शेवटपर्यंत टिकून राहते.
वर उल्लेखलेली महत्त्वाची लक्षणे रुग्णाचे सोबती अथवा कुटुंबीयांना दिसून येतात आणि मृत्यूची चाहूल लागते. मात्र कधीकधी काही रुग्णांच्या बाबतीत वरील परिस्थितीत अचानक सुधारणा झाल्यासारखे वाटते परंतु ती अल्पकाळ टिकते आणि परिस्थिती पुन्हा एकदा वेगाने बिघडू लागते. तात्पुरत्या सुधारलेल्या अवस्थेत जिवलगांच्या अखेरच्या भेटीगाठी घडू शकतात.
मृत्यूपूर्व परिस्थितीत डॉक्टर किंवा नर्सने रुग्णाची तपासणी केली असता काय महत्त्वाच्या गोष्टी दिसून येतात ते आता पाहू.
शारीरिक तपासणीच्या नोंदी
१. तापमान : आयुष्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये शरीराचे तापमान 1C ने बऱ्याचदा वाढते. शरीरातील दाह, कर्करोगप्रक्रिया अथवा चयापचयातील बिघाड त्याला कारणीभूत असतो. अशा प्रसंगी मुद्दामहून औषधे देण्याची गरज नसते; कपाळावर किंचित थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तरी पुरते.
२. त्वचेतील बदल : मृत्यूपूर्वी काही तास त्वचा लाल होऊ शकते आणि घामाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढते. मात्र मृत्यूच्या नजिक पोचताना अचानक शरीर तापमान एकदम कमी होते आणि त्वचा निळसर दिसू शकते. जसजसे रक्ताभिसरण अत्यंत मंद होते तसे संपूर्ण शरीर थंड पडू लागते. काही वेळेस चेहरा फिकट पिवळसर पडतो आणि हा पिवळेपणा तोंडाभोवती अधिक दिसून येतो.
३. श्वसनातील बदल : श्वसनाचा वेग बराच मंदावतो आणि उथळ आणि अनियमित श्वास घडू लागतात. दोन श्वासांमधील कालावधी देखील वाढतो. तर कधीकधी काही श्वास भराभर घेतले जाऊन पुढे काही क्षण श्वसन थांबल्यासारखे होऊ शकते. एकंदरीत ही अनियमितता वाढतीच राहते.
४. जागृतावस्था : अखेरच्या तासांमध्ये शरीराचा प्रवास जागृतीकडून कायमच्या बेशुद्धीकडे सुरू होतो. त्यावेळेस बऱ्याच जणांच्या बाबतीत गिळण्याची आणि घशातील द्रव खाकरून स्वच्छ करण्याची क्षमता संपुष्टात येते. घशात साठलेल्या द्रवातून जेव्हा श्वसन होते त्यातून मोठमोठे आवाज येऊ लागतात. सामान्य भाषेत याला मृत्यूची घरघर लागली असे म्हणतात. काही रुग्णांच्या बाबतीत हा अनुभव येतो. ही घरघर कुटुंबीयांसाठी अर्थातच चिंताजनक असते परंतु रुग्ण मात्र तिची जाणीव होण्याच्या पलीकडच्या अवस्थेत गेलेला असतो. अशा वेळेस त्याच्या डोक्याखाली मोठी उशी देऊन अथवा त्याला कुशीवर वळवून पहावे. घरघर फारच असह्य वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे देता येतात. घरघर लागलेल्या रुग्णांपैकी सुमारे 75% च्या बाबतीत सुमारे 48 तासात त्यांचा जीवनप्रवास संपतो.
. . .
चित्रपट व तत्सम दृश्य माध्यमांमधून दाखविला जाणारा मृत्यूपूर्व क्षण हा खरोखरच फिल्मी असतो ! त्यात आत्यंतिक प्रेमालाप, गुपितकथन किंवा प्रेमिकांचे हात मिळवून देणे इत्यादी रंजक गोष्टींची रेलचेल असते. परंतु वास्तव मात्र या कल्पनारंजनापासून फार दूर असल्याचे दिसते. खरोखरीच असे सुखाचे क्षण ज्यांच्या वाट्याला आले असतील ते भाग्यवानच. तसेच बऱ्यापैकी निरोगी व्यक्तींचे झोपेतले मृत्यूही सुखदायी.
परंतु वास्तवातील बहुतांश चित्र काय दिसते ? जराजर्जर रोगावस्थेतल्या मृत्यूचे दर्शन केविलवाणे असते. शरीरभर फोफावलेला कर्करोग, मेंदूचे ऱ्हासकारक गंभीर आजार, मोठे अपघात किंवा शरीराच्या सर्व महत्त्वाच्या अवयवांनी पत्करलेली शरणागती, अशा अनेक प्रसंगीचा मृत्यू बघणे हे अतिशय वेदनादायकच. घरी झालेला मृत्यू त्यातल्या त्यात बऱ्या वातावरणातला म्हणायचा. एखाद्यावर हीच वेळ जर रुग्णालयात दीर्घकाळ ठेवून आली तर तिथले वातावरणात अधिकच शोकाकुल व रोगट असते.
आपल्यातील अनेकांनी आपल्या कुटुंबीय अथवा जिवलगाचे असे मृत्यू जवळून पाहिले असतील आणि ते अखेरचे दृश्य देखील आपल्या स्मृतीत असेल. मृत्यू तर अटळ आहे. यास्तव प्रत्येकावर कधी ना कधी एखाद्या मृत्यूशय्येवरील व्यक्तीची सोबत करण्याचा प्रसंग येणार आणि अखेरीस एखाद्या दिवशी आपणही त्या शय्येवर कायमचे विसावणार आहोत. आयुष्यातले ते अखेरचे क्षण सर्वांनाच कमीत कमी त्रासदायक व्हावेत ही सदिच्छा व्यक्त करतो.
*************************************************************************************************************
संदर्भ :
हा लेख वाचुन गेल्या २
हा लेख वाचुन गेल्या २ दिवसांपासुन अस्वस्थ आहे.
आजारपण, वार्धक्य यामुळे जाणार्याला किंवा त्यांच्या प्रियजनांना निदान एक कल्पना आलेली असते. या लेखात लिहिलेल्या विविध लक्षणांमुळे मानसिक तयारी सुरु झालेली असते.
पण आकस्मिक मृत्युंचं काय ?
मरण समोर दिसत असताना त्या व्यक्तीला काय वाटत असेल असा प्रश्ण अजुनही त्रास देतो.
माझी आई अचानक एका अपघातात गेली, तिला जेव्हा कळलं असेल की आता आपण वाचणार नाही त्यावेळी तिच्या मनात काय भावना आल्या असतील ? त्या दिवशी माझा वाढदिवस होता. मृत्यु समोर दिसला असेल तेव्हा तिला माझी आठवण आली असेल का ? तिची नातवंडं दिसली असतील का ? कोणाचाच निरोप घेता आला नाही याची खंत वाटली असेल का ? तिचे वृद्ध आई वडील डोळ्यांसमोर आले असतील का ?
आईला जाउन आता ६ वर्ष होतील पण अजुनही हे विचार माझी पाठ सोडत नाहीत. डोळे झरायला लागतात. ती जायच्या आदल्या दिवशी जरा जास्त वेळ मिठी मारुन तिचा निरोप घ्यायला हवा होता असं वाटतं. ती गेली त्या दिवशी सकाळी ८ वाजता आम्ही फोन वर अगदी ३-४ मिनिटे बोललो आणि ८:३० ला ती गेल्याचा फोन आला. अजुन जास्त वेळ बोललो असती तर ती वेळ टळली असती आणि आई वाचली असती असं अजुनही वाटतं..
आपल्या प्रियजनांच्या सोबत हातात हात घेउन वार्धक्यामुळे आलेला मृत्यु हा गेलेल्या व्यक्ती साठी पण आणि त्याच्या प्रियजनांसाठी पण सर्वात समाधानी मृत्यु असेल.
कुमार सर, या संवेदनशील विषयावर खूप संयतपणे लिहिलंय तुम्ही.
अचानक संकट / मरण समोर दिसत असताना त्या व्यक्तीच्या मनात काय भावना असतात हे विज्ञान शोधु शकत असतं तर काही प्रश्णांची उत्तरं मिळाली असती असं वाटतं.
मनमोकळे व भावनेने ओथंबलेले
मनमोकळे व भावनेने ओथंबलेले दीर्घ प्रतिसाद येत आहेत व त्याचबरोबर काही चांगले आणि महत्त्वाचे प्रश्न देखील विचारले जात आहेत हे पाहून समाधान वाटले.
धन्यवाद !
क्रमाने एकेक मुद्दे घेतो.
१. आधी हृदय बंद पडते का आधी
१. आधी हृदय बंद पडते का आधी मेंदू ?
>>>> चांगला प्रश्न.
हृदय, मेंदू आणि फुफ्फुसे ही जीवनमरणाच्या संदर्भातील सर्वात महत्त्वाची इंद्रिये. मरणप्रक्रिया चालू होताना या तिघांपैकी एक किंवा अधिक इंद्रियात प्रथम बिघाड होतो आणि त्याचा परिणाम दुसऱ्यांचे कार्य थांबणे असा असतो (पहिला बिघाड कोणात होणार हे आजारानुसार ठरेल) .
प्रत्यक्ष मृत्यूच्या क्षणी हृदयाचे आकुंचन थांबते आणि त्यानंतर काही काळाने मेंदूचे कार्य (activity) पूर्णपणे थांबते. किंबहुना हृदयाचे पंपिंग थांबल्यानंतर काही सेकंदांपासून अगदी तासापर्यंत सुद्धा मेंदू पेशींचे कार्य काही प्रमाणात चालू असते.
कायद्याच्या दृष्टीने ज्या क्षणी हृदय पूर्ण थांबते आणि कुठल्याही प्रयत्नांती चालू होत नाही, तो क्षण ही मृत्यूची वेळ धरली जाते.
While the heart's cessation marks the official declaration of death, the brain's activity doesn't immediately shut down.
2. मृत्यूच्या वेळेस खरंच हात
2. मृत्यूच्या वेळेस खरंच हात पाय झाडले असं म्हणतात
>>>> होय, हे काहींच्या बाबतीत खरे आहे आणि आजारानुसार त्याची कारणे त्रिपदरी असू शकतात - चेतातंतू, स्नायू आणि चयापचयातील बिघाडांमुळे अशा कृती होतात.
मेंदूला मिळणारा ऑक्सिजन जसा झपाट्याने कमी होतो त्यानुसार हातपाय झाडल्याच्या कृती त्या व्यक्तीच्या नकळतपणे होतात. त्याचप्रमाणे चेतातंतूंचे मिस-फायरिंग देखील होत असते. या व्यतिरिक्त रक्तातील कॅल्शियम अथवा पोटॅशियमच्या पातळीत बिघाड झाले की त्याचा सुद्धा चेतातंतू व स्नायूंवर परिणाम होतो.
अर्थात या प्रकारच्या हालचाली नकळत (involuntary) होत असल्याने त्या वेदनारहीत असतात. किंबहुना तेव्हा मरणाच्या दारातील व्यक्ती जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत गेलेली असते.
शिवाय जवळचे आणि स्वर्गवासी
शिवाय जवळचे आणि स्वर्गवासी झालेले नातेवाईक आणि मित्रमंडळी दिसतात वै ऐकलेलं आहे. >> घेऊन जायला येतात असे म्हणतात.
एक hospice nurse आहे ज्युली म्हणून. तिचे फार सुंदर व्हिडिओ आहेत मरण विषयावर. काय अपेक्षा ठेवायची, लक्षणं कशी ओळखायची वगैरे.
काही व्हिडिओ मध्ये जाणाऱ्या व्यक्तीला मृत नातेवाईक दिसल्याची उदाहरण सांगितली आहेत त्याखाली जगभरातल्या अनेक लोकांचे अनुभव आहेत.
माहितीबद्दल धन्यवाद डॉक्टर.
माहितीबद्दल धन्यवाद डॉक्टर. व्यक्तीला वेदना जाणवत नाहीत हे तरी बरं
सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद
सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद डॉक्.
फारच महत्त्वाचा विषय आणि फार
फारच महत्त्वाचा विषय आणि फार छान हाताळला आहे. सगळ्यांचे अनुभव व सगळ्या पोस्टी वाचल्या. हृदयद्रावक..!
बरं झालं तुम्ही यावर लिहिलं, बऱ्याच शंकाकुशंका दूर झाल्या. शिवाय विचारण्यासाठी हक्काची व विश्वासार्ह जागा निर्माण झाली. कारण ह्या संवादाची कोंडी फोडणं कठीण असतं.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
. .
* पण आकस्मिक मृत्युंचं काय ?
>>> खरंय, हा सर्वात धक्कादायक. मानसिकदृष्ट्या वरवर स्थिर असणाऱ्या काही लोकांच्या आत्महत्या सुद्धा धक्कादायक असतात. तसेच शालेय वयातील अपघाती मृत्यू देखील.
वैद्यकीय शिक्षणादरम्यान पाहिलेला एक आकस्मिक मृत्यू मनावर अगदी कायमचा कोरला गेला. साधारण ४० वर्षांचा एक जाडा माणूस होता. त्या दिवशी मी रुग्णालयात प्रवेश केला आणि तळमजल्यावरच त्याची बायको हंबरडा फोडताना दिसली. अधिक चौकशी करता समजले की आतापर्यंत त्या माणसाला काहीही त्रास झाला नव्हता. अतिरिक्त शारीरिक जाडी व्यतिरिक्त आजार म्हणावे असे काहीच नव्हते. त्याला बहुधा पहिलाच हार्ट अटॅक जबरदस्त आलेला होता.
त्या जोडप्याची मुले लहान होती आणि शाळेत गेलेली होती. त्या पत्नीचा एकसारखा आक्रोश चालू होता,
“आता मुलं घरी येतील तेव्हा त्यांना काय सांगू?’
अशा प्रसंगी सांत्वन करणे खूप कठीण जाते.
कुमार सर अलीकडे ४०तल्या
कुमार सर अलीकडे ४०तल्या लोकांना पहिलाच हार्ट अटॅक मॅसिव्ह येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. याबद्दल काही रिसर्च झाला आहे का?
हार्ट डिसीझेसवरचा तुमचा लेख वाचला आहे. त्यात भर टाकता येईल का?
* ४०तल्या लोकांना पहिलाच
* ४०तल्या लोकांना पहिलाच हार्ट अटॅक
>>
होय, रिसर्च बऱ्यापैकी झालेला आहे.
या वयोगटात नेहमीच्या धोका वाढवणाऱ्या गोष्टीव्यतिरिक्त मादक पदार्थांची व्यसने, immune diseases आणि मानसिक ताणतणाव या घटकांचाही प्राधान्याने समावेश आहे.
गेल्या काही दशकांमध्ये भारतात तरुण वयातील लोकांत हार्ट अटॅकचे जे प्रमाण वाढले त्या मागे Lipoprotein (a) या घटकाचे प्रमाण (जनुकीय कारणास्तव) जास्त असल्याचा संबंध आहे.
सवडीने पाहूया, त्या लेखमालेत काही भर घालायचे.
संवेदनशील विषयावरचे संयमी
संवेदनशील विषयावरचे संयमी भाषेतले लिखाण.
माझे आजोबा हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांच्या जायच्या दिवशी सकाळपासून ते "अरे मला मारू नका रे" असं सारखं म्हणत होते. पण त्यांना कधी कोणीच मारलेले नव्हते.
हे कशामुळे होत असेल?
* "अरे मला मारू नका रे
* "अरे मला मारू नका रे
>>> हा एक प्रकारचा संभ्रमच (delusion) असतो. वास्तवात अशक्य असणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी त्या लोकांना आभासी जाणवू शकतात.
उदा. :
“आवरून झालं का रे, गावाला जायचंय ना आपल्याला”, असेही म्हणणारे ऐकलेत.
* "अरे मला मारू नका रे
दु प्र
@माझेमन
@माझेमन
तुम्ही वर विचारलेल्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर या धाग्यावरील नव्या प्रतिसादात दिले आहे.
death clock असं एक ॲप
death clock असं एक ॲप निघालय
https://www.death-clock.org/
मृत्यू : एक सोहळा ?
मृत्यू : एक सोहळा ?
जगभरातील विविध समाज जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूला कसे सामोरे जातात यावर निरीक्षण आणि भाष्य करणारे एक पुस्तक :
This Party's Dead: Grief, Joy and Spilled Rum at the World’s Death Festivals
by Erica Buist
https://www.amazon.com/This-Partys-Dead-Spilled-Festivals/dp/1783529547/...
Pages