आपली गोष्ट - मेरी आजी (व्यक्तिचित्र)

Submitted by sugandhi on 22 May, 2025 - 01:45

प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676

"अग ए, मुली, काय ते तुझं नाव, आमच्या शेजारी राहायला आलीस ना तू? तुझ्या मुलाला बघितलं काल सायकलवर. कसला सुसाट चालवतो ग! मी पकडून सांगितलं बर का त्याला, कोणी गाडी मागे बाहेर काढत आहे का ते बघायचं नीट म्हणून!" ही माझी आणि शेजारच्या मेरी आजीची पहिली भेट! आम्ही नुकतेच या घरी राहायला आलो होतो, अजून ओळखी होत होत्या. मेरी आजीने स्वतःची ओळख "मी मेरी आजी, शेजारीपाजारी सगळे मला मेरी आजीच म्हणतात. तू पण तेच म्हण!" अशीच करून दिली. पहिल्या भेटीतच मला ही आजी खूप आवडली. जणू मी लहान असताना "परत रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला बघताना नाही दिसलीस, तर थोत्रीत देईन!" म्हणून सांगणाऱ्या शेजारच्या आजीच परत भेटल्या आहेत!

मेरी आजी प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. त्यामुळे सहाजिकच "तुझ्या मुलांना काय आवडतं ग?" "हे पुस्तक दिलं का वाचायला?" "आता पाचवी म्हणजे सायन्स कॅम्प असेल.." असे विषय तिच्याशी सहजपणे बोलले जायला लागले. एकदा क्रिसमसला अस्मिने तिच्यासाठी एक कार्ड बनवलं. कार्डवर सगळ्यांचीच नाव लिहिली होती. दुसऱ्या दिवशी आजी दारात हजर - "लेकीचं अक्षर छान आहे बरं का तुझ्या!" मी विचारलं "तुला काय माहिती ते कोणी लिहिलं?" तर म्हणे "मुलगा तर लहान आहे तुझा, आणि हल्ली मोठ्या माणसांची कोणाची अक्षरं चांगली असतात सांग बरं?"

मागे एकदा एक कबूतर तिच्या अंगणात उतरलं. कबुतराच्या पायात कडी होती. त्यावरून ते पाळलेलं कबूतर आहे हे तिला समजलं. तिने त्याला खाऊ दिला प्यायला पाणी दिलं. पण ते कबूतर काही तिला जवळ येऊ देई ना. मग तिने लांबून त्याचा फोटो काढला, झूम केला, त्या कडीवरचा फोन नंबर शोधून त्याच्या मालकाला फोनही केला. त्यानंतर तीन-चार दिवस ते कबूतर तिच्या अंगणात होतं. तिने आजूबाजूच्या सगळ्या मुलांना शाळेतून घरी येता येता थांबवून ते कबूतर दाखवलं आणि पक्षी कसे ट्रॅक करतात हे पण दाखवलं.

अद्वय शाळेतून एकटा घरी येतो, अस्मि कधी मित्र-मैत्रिणीना घेऊन येते, मी आणि प्रमोद घरी नसलो तरी या शेजारच्या आजीचं त्यांच्याकडे येता जाता लक्ष असतं. अस्मिची रोबोटिक्सची टीम घरी आली, की सगळी मुलं मिळून, अंगणात प्रॅक्टिस करत असतात. त्यांचा किलबिलाट चालू असला, की मेरी आजी खुश! मग पुढच्या दोन-तीन दिवसात मी दिसले की सांगते, "तुझी मुलगी मोठी इंजिनियर होणार बघ! मुलींनी जायलाच हवं ग टेक इंडस्ट्रीमध्ये.. कुठे मागे ठेवू नकोस तिला मुलगी म्हणून!"

कधी फारच खुशीत असला, की लॅरी - मेरी आजीचा नवरा टेक इंडस्ट्री मधल्या, त्याच्या तरुणपणीच्या गमती जमती सांगतो. गेमिंग इंडस्ट्री कशी चालू झाली, सिलिकॉन व्हॅली स्टार्टप्स कशा चालू झाल्या याविषयी त्याच्याकडे खूप किस्से असतात. तो खूप वेळ बोलला आणि आपण चुळबूळ सुरू केली की हळूच मेरी आजी तिच्या ठेवणीतले लॅरी आबाच्या स्पोर्ट्स कारच्या प्रेमाविषयीचे किस्से सांगते. वर "आता याच्या या वयात का सुंदर मुली शेजारच्या सीटवर येऊन बसणार आहेत!" असं म्हणून त्याची बोलती बंद करते आणि आपण खूखू हसून घेते!

तिला बागेत काहीतरी काम करत राहायला फार आवडतं. आज काय नवीन रोपच लाव, नाहीतर नव्या बियाच पेर असं तिचं काही ना काही चालू असतं. मलाही थोडीफार बागकामाची आवड आहे, असं तिच्या लक्षात आल्यावर, ती आता मला तिची नवी रोपं फुलं आवर्जून दाखवते. तिच्या घरी ती आणि लॅरी असे दोघेच असतात. मग त्यांच्या बागेत लावलेल्या रोपांना खूप फळ आली की, ती कधीतरी दार वाजवून विचारते, "टोमॅटो खूप छान आलेत माझ्याकडे. देऊ का तुला थोडे? खाल ना?" - मग आमच्याकडे ताज्या टोमॅटोची कोशिंबीर होते. कधीतरी क्वचित आमच्या बागेतलं लिंबू किंवा पुदिना असं काहीतरी विचारून घेऊनही जाते.

आता मेरी आजी हळूहळू थोडी म्हातारी व्हायला लागली आहे, पण आनंदी असते. परवा काठी घेऊन चालताना दिसली, काय झालं म्हणून विचारलं तर म्हणाली - "गुडघ्याला आता स्टीलच्या वाट्या लावल्या आहेत, जरा आता थोडा सवय व्हायचा अवकाश, मग बघ माझ्या नातवाच्या मागे कसं धावता येईल मला ते!"

गेल्या महिन्यात एकदा घरी आले, तर मेरी आजी तिच्या अंगणात माझी वाट बघत बसली होती. मी गाडीतून उतरल्याबरोबर हाक आली - "मानसी, मानसी.." मी जवळ जाऊन काय म्हणून विचारलं, तर म्हणाली "तू आणि प्रमोद दोघेही टेक इंडस्ट्रीत काम करता ना? खूप लोकांचे जॉब जात आहेत असं ऐकलं. तुमचं तर सगळं ठीक आहे ना गं?" मी तिला आमचे जॉब व्यवस्थित चालू असल्याचं सांगितलं, पण कुणीतरी एवढ्या आपुलकीने, निर्मळ मनाने अशी चौकशी करावी हे बघून मला गलबलून आलं. ते तिला माझ्या चेहऱ्यावर दिसलं असावं. पटकन माझा हात धरून म्हणाली, "अग कठीण दिवस येणारच नाहीत असं नाही ग, पण तू निभावून नेशील बघ. मी बघते ना तुम्ही दोघं मिळून कसं छान मॅनेज करता आहात ते. मुलही तुझी छान मोठी होत आहेत आता.." इकडच्या तिकडच्या गप्पा करून मेरी आजी आत निघून गेली तेव्हा मनावर एक समाधानाची साय आली होती. ती निघून गेल्यावरही थोडा वेळ तिच्या बागेतली फुलं बघत, मी हातावर हात ठेवून समाधानाने बसून राहिले...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लिखाण आवडले.
'समाधानाची साय' शब्दप्रयोगही आवडला.

लिखाण आवडले > +1
'समाधानाची साय' शब्दप्रयोगही आवडला.> +786

>>>>>>अग कठीण दिवस येणारच नाहीत असं नाही ग, पण तू निभावून नेशील बघ.
वाह खोटा आशावाद नाही पण पूर्ण सकारात्मकता.

समाधानाची साय ..... खूप छान.

आवडलं.
अशी शेजारची आजी संस्कृतीचे , शेजार धर्माचे गोडवे गाणाऱ्या भारतात ही आता दुर्मिळ झाली आहे, पण जिथे व्यक्ती स्वातंत्र्य, मी माझा अश्या मूल्यांचं महात्म्य आहे अश्या अमेरिकेत तुमच्या शेजारी अशी आजी आहे हे वाचून खूप छान वाटलं.
आपल्या संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या wa fwd ना हे fwd करायला हवे Happy

Thank you, सगळ्यांनी छान प्रतिसाद दिले आहेत.

मनीमोहोर,
भारतात काय इथे काय थोड्याफार फरकाने माणसं सारखीच भेटली. आमच्या घराजवळ दोन-तीन रिटायर झालेले काका काकू, आजी आजोबा आहेत. त्यांचं थोडं संथ लईतलं आयुष्य आहे. त्यांना बघून अगदी माझ्या लहानपणचे शेजारीच आठवतात. मात्र वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या लोकांना त्यांनी छान सामावून घेतलं आहे.

किती सुंदर आहे हे व्यक्तीचित्र...... आज जो द्वेषहोम चालला आहे भारतात ... अशा वेळी जात, देश, पंथ ही सर्व कुंपणे ओलांडून असे काही वाचले की निरागस भावना उचंबळून येतात..... मी देखील हे परदेशातील वरिष्ठ नागरिकांच्या बाबतीत अनुभवले आहे..... मी एकटा व्हर्जिनियात रहात असताना खूप ताप आला आणि अशाच एका मायाळू कुटुंबाने मला सांभाळले होते...... त्याची आठवण आली

रेव्यु, thank you, छान अनुभव आहे तुमचा!
धनवन्ती, +१ आणि thank you. खरंच आपल्या आयुष्यात अशी प्रेमळ माणसं येत राहू दे.