क्रिएचर

Submitted by संप्रति१ on 8 February, 2025 - 10:02

हा भयपट आहे. यामध्ये बिपाशा बासू तिच्या वडिलांसोबत साऊथ बॉंबेमध्ये एका बंगल्यात राहत असते. त्यावर बिल्डरांचा डोळा असतो. जागा बळकावण्यासाठी बिल्डर तिच्या वडिलांवर दबाव टाकतात. त्यामुळे वडील आत्महत्या करतात. बिपाशाचा पूर्वेतिहास दुर्दैवी आहे.

पण बिपाशा या धक्क्यातून बाहेर पडलेली आहे. तिनं आता मुंबई सोडलीय. आणि हिमाचल प्रदेशात एका जंगलात एक रिसॉर्ट टाकलाय.‌ चांगलं चाललंय रिसॉर्ट. शिवाय तिथे कुणाल नामक एक हिरोछाप तरूणही मुक्कामी आलेला आहे.

तर विषय असाय की त्या परिसरात ब्रह्मराक्षसाचा वावर आहे.‌ रिसॉर्टमधली गि-हाईकं जंगल में मंगल करायला जात असतात. तर ब्रह्मराक्षस त्यांच्यावर हल्ला करत असतो. त्यामुळे गि-हाईकांच्या एंजॉय करण्यामध्ये बाधा येते. पयल्यांदा सगळ्यांना वाटतं की हे बिबट्याचं वगैरे काम असेल. त्यामुळे कुणाल फोन करून त्याच्या काही शिकारी मित्रांना बोलवतो. ही मित्ररूपी टोळी जंगलातून एका बिबट्याला मारून आणते. त्यामुळे बिपाशाला कुणालबरोबर लव होतं. आणि दोघंजण गाणं म्हणतात.

परंतु खरं संकट टळलेलं नाही. संकट टळल्याचा नुसता आभास निर्माण झालेला आहे. ब्रह्मराक्षस अद्याप मोकाटच आहे. नंतर त्यानं रिसॉर्टवरच हल्ला चढवलाय. आणि रिसॉर्टमधले सगळे कस्टमर्स पळून गेल्याच्या बातम्या पेपरमध्ये वगैरे आल्यात. एकप्रकारचा दहशतीचा माहौल आहे. परिणामी बिपाशाच्या रिसॉर्टची प्रतिष्ठा डागाळलीय.

ही बातमी एका प्रोफेसरच्या वाचनात येते. तो झूलॉजी चा प्रोफेसर आहे. आणि ब्रह्मराक्षस हा त्याचा रिसर्च एरिया आहे. प्रोफेसर रजा वगैरेच्या भानगडीत पडत नाही. मुंबईहून तडक उठून रिसॉर्टमध्ये दाखल होतो. आणि बिपाशाला ब्रह्मराक्षसाची सैद्धांतिक संकल्पना उलगडून सांगतो. बिपाशाला ती कळली किंवा नाही, हे कळायला मार्ग नाही. पण आपल्याला कळते.

एका हायवेच्या कन्स्ट्रक्शनसाठी तिथला प्राचीन पिंपळ वृक्ष तोडल्यामुळे त्यात बंदिस्त असलेला ब्रह्मराक्षस मोकळा होऊन उधळलेला असतो. यावर उपाय एकच आहे. रिसॉर्ट कायमचा बंद करून तिथून गाशा गुंडाळणे. परंतु बिपाशा जिगरबाज महिला असल्यामुळे असा पळ काढणे, तिजला मंजूर नाही. आयुष्यात काही गोष्टी नॉन-निगोशिएबल असतात, त्यापैकी ही एक.! एकतर मी मरेन किंवा ब्रह्मराक्षस मरेल, अशी आवेशपूर्ण प्रतिज्ञा बिपाशा याठिकाणी करते. इथं इंटरव्हल आहे.

बिपाशानं रिसॉर्ट टाकण्यासाठी बॅंकेचं कर्ज उचललेलं आहे.
पण ब्रह्मराक्षसाच्या थैमानामुळं रिसॉर्ट ओस पडलंय. नुकसानीत चाललंय. त्यामुळे इंटरव्हलनंतर बॅंकेचे लोक येतात आणि रिसॉर्टचा ताबा मागतात. बिपाशा कायद्याची जाणकार आहे. ती ठणकावते की ॲग्रीमेंटप्रमाणे आधी मला दहा दिवसांची नोटीस द्या. आणि इथून हला. दहा दिवसांत मी ब्रह्मराक्षसाचा विषय सलटवून टाकते. अर्थात, एकट्या महिलेला हे सगळं हॅंडल करताना बघणं प्रेक्षकांना कदाचित पचणार नाही. म्हणून तिला आधार देण्यासाठी ह्या कुणाल नामक नरपुंगवाची तरतूद केलेली आहे.

आता हा ब्रह्मराक्षसाचा इश्श्यू एवढा ज्वलंत झालेला आहे इथे. परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंटचा ह्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अगदीच सरकारी आहे. खरंतर सगळा भोंगळा कारभार आहे त्यांचा.

फॉरेस्टचे वरिष्ठ अधिकारी उद्धटपणे वागतात. बिपाशाला बिलकुल सहकार्य करत नाहीयेत. म्हणजे ब्रह्मराक्षसानं फाडून खाल्लेल्या शरीरांचा कसलातरी रिपोर्ट शिमल्याला पाठवलेलाय. पण अधिकारी तो रिपोर्ट बिपाशाला देत नाहीये. उडवाउडवीची उत्तरं देतायत. ही गोष्ट प्रेक्षक म्हणून आपल्याला चीड आणणारी आहे. पण बिपाशा त्यांना माहिती अधिकाराची धमकी देऊन वठणीवर आणते. त्यामुळे मग प्रेक्षक म्हणून आपली जी काही ठसठस चीडचीड वगैरे असते, ती थांबते.

मीनव्हाईल प्रोफेसरनं यासंबंधी जो रिसर्च केलेला आहे, तो ते आपल्यापुढे ठेवतात. एका परातीत थोडी पिंपळपानं जाळून त्याची राख ठेवलेली असते. ती राख बंदुकीच्या गोळ्यांना फासायची असते. ब्रह्मराक्षसाला मारण्यासाठी या गोळ्या बहुगुणकारी ठरणार असतात.

प्रोफेसरकडे प्लॅन आहे. जसा उंदराला पकडण्यासाठी पिंजरा लावला जातो, तसा राक्षसाला पकडण्यासाठी ट्रॅप लावायचा. म्हणजे एक खटारा बस हायवेला उभी करून ठेवायची. बसमध्ये एक मानवी पुतळा ठेवायचा. त्या पुतळ्याला मार्केटमधून आणलेलं ताजं मांस चिटकवून त्यावर ब्लड बँकेतून आणलेलं रक्तही शिंपडावं लागतं. राक्षस या वासानं आकर्षित होऊन येणार आणि फसणार.! मग त्यावर सगळ्यांनी धुवांधार गोळ्यांची बरसात करायची. एक-दोन गोळ्या घालून त्याला काय होणार नाही. अहो ब्रह्मराक्षस म्हणजे काय जोक आहे का? त्याची प्रॉपर चाळणच उडवावी लागणार आहे.!

बाकी सगळं घडतं प्लॅनप्रमाणे. फक्त प्रॉब्लेम एवढाच की या विशिष्ट गोळीबाराचा राक्षसावर घंटा काय परिणाम होत नाही.

विद्या विनयेन शोभते.! चूक झाली तर ती कबूल करणं हे ज्ञानी माणसांचं लक्षण होय. प्रोफेसर कबूल करतात की माझं ज्ञान हे पुस्तकी आहे. आणि पुस्तकी ज्ञान फेल गेलंय याठिकाणी. तर आता दुसरा कुणीतरी जाणकार माणूस शोधला पाहिजे. बोलण्यातून बोलणं निघतं. चर्चेतून एक धागा सापडतो. शेजारच्या गावातील सरपंच यासंबंधी मौलिक हिंट देतो. सुमारे सत्तर वर्षांपूर्वी हंटरसाब नामक मनुष्यानं ब्रह्मराक्षसाला मारून पिंपळवृक्षात बंद करून टाकलेलं असतं. तो हंटरसाब तर आता काय जिवंत नाय, पण त्याचा पोरगा आहे अजून. त्याचं नाव डॉक्टर मोगा.‌

या मोगाचा तपास लावायला बिपाशा व कुणाल शिमल्याकडे रवाना झालेत. परंतु वाटेत एका ढाब्यावर कुणालचा भांडाफोड होतो. हा कुणाल म्हणजे खरंतर करण मल्होत्रा असतो. म्हणजे तोच बिल्डर की ज्याच्यामुळे बिपाशाचा बाप आत्महत्येस प्रवृत्त झालेला. आरे बाबा ! ये क्या हो गयेला रे? ये तो ष्टोरी में येकदम नाट्य आ गया दिकता.. अबी एक सॅड सॉंग डालनाईच पडेंगा इदर.! टेन्शन नक्को लिवु तुम..!

गाणं संपल्यावर बिपाशा डॉक्टर मोगाला भेटते. डॉक्टर नॉस्टॅल्जियात रमतो. त्यास भयकारी भूतकाळाचा पुन:प्रत्यय येतो. तो एक जुनी डायरी कम् अल्बम दाखवतो. त्याच्या बापानं सगळं नीट डॉक्युमेंटेशन करून ठेवलेलंय. त्यातून मग आणखी धागेदोरे. फॅंटसीचं आणखी नेक्स्ट लेव्हलला उड्डाण. आणखी एक अनोखी कलाटणी.

म्हणजे पुष्कर येथे आहे एक ब्रह्मदेवाचं मंदिर. तिथं आहे एक ब्रह्मकुंड.! राक्षसाला मारण्यासाठी जी बंदूक व गोळ्या उपयुक्त असतात, त्या ह्या ब्रह्मकुंडाच्या पाण्यातून बुडवून काढाव्या लागतात. (तरूण होतकरू संशोधकांचं मी इकडे लक्ष वेधू इच्छितो. 'एक्सपिरीमेंटल स्टडी ऑफ दि ब्रह्मकुंडाज् वॉटर ऑन दि इफिशियंसी ऑफ मॉडर्न वेपन्स' हा एक चांगला रिसर्च टॉपिक होऊ शकतो. अशा संशोधनांना आजकाल मोठा उठाव आलेला आहे.)

यात आणखी एक अट म्हणजे फक्त कार्तिकी पोर्णिमेच्या रात्रीच हा बंदूक बुचकाळण्याचा विधी संपन्न करावा लागतो. पण कार्तिकी पौर्णिमा तर अजून अकरा महिने लांब आहे. तेवढं थांबायला प्रेक्षकांनाही वेळ नाही आणि बिपाशाकडं तर अजिबातच सवड नाहीये. तिकडं बॅंकेचे लोक बोकांडी बसले आहेत. त्यांनी तगादा लावलाय की पैशे टाका आमचे, नायतर जप्ती आणतो रिसॉर्टवर.! बिपाशाच्या हाती इनमीन चारच दिवस उरले आहेत. अवघड आहे. काय करावं?

आहे. सोल्यूशन आहे.!
डॉक्टर मोगानं बापाची बंदूक आणि गुणकारी गोळ्या जपून ठेवल्या आहेत. पण फक्त सातच गोळ्या शिल्लक आहेत. या सातच गोळ्यांमध्ये राक्षसाचा विषय मिटवावा लागणार आहे. म्हणजे दुहेरी अडचण आहे. वेळपण अत्यंत कमी आहे. आणि संसाधनं पण तुटपुंजी आहेत. संसाधनांचं प्रॉपर मॅनेजमेंट जरूरी आहे. त्यामुळे प्रोफेसर आयडिया काढतात की राक्षसाला जवळून गोळ्या घालून ठार करू.! डरता कशाला?

स्क्रीनवर नुकत्याच तोडलेल्या एका झाडाचं खोड दिसतं. त्याशेजारी एक भुयार आहे. त्यात राक्षसाचा अधिवास आहे. त्यात हे सगळे शिड्या लावून उतरतात. नंतर मग पळापळ, पाठलाग, धुमाकूळ, धुमश्चक्री, फुत्कार, गर्जना किंवा तत्सम किंकाळ्या इत्यादींचा समृद्ध गलबला.

इथं जीएंची उपमा उसनी घेऊन सांगायचं झालं तर बिपाशा धपापत्या उराची अभिनेत्री आहे. घाबरल्याची ॲक्टिंग करायला सांगितल्यावर ती एका वेगळ्याच झोनमध्ये जाते. आणि जोरजोरात उसासे टाकायला लागते. आणि त्यामुळे तिचे खांदे स्प्रिंगसारखे आपोआप खालीवर उचंबळत राहतात. आपली काही हरकत नाही. पण त्यामुळे तिचा नेम चुकतो ना.! आणि वारंवार चुकतो. मुलखा महागाच्या चार गोळ्या वाया जातात.!

आणि जवळून गोळी घालायच्या नादात प्रोफेसरचंही निधन झालं. वाईट झालं.! हे काय वय नव्हतं जायचं. तुम्हीही दोन मिनिटांचं मौन पाळावं, अशी विनंती आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असं करू नका. असं हसू नका, प्लीज.! श्रद्धांजली देतानाच्या क्षणांमध्ये हा काय येडेपणा आहे, असं वाटून हसण्याची जोरदार उबळ येणं, हे शाळेत असताना ठीक होतं समजा. आता ते बरोबर नाय ना दिसत.

तर ऐनवेळी कुणाल ऊर्फ करण एका जीपमध्ये सवार होऊन भुयारात घुसल्यामुळे बिपाशा सुखरूप बाहेर पडते. आत सुसाट जीप घुसविण्याचा एवढा मोठा रस्ता असताना हे लोक शिड्या लावून का उतरले होते, बाय द वे?

बिपाशा समजा चार गोळ्या बरबाद करून बाहेर पडली तरी राक्षस अजून धुमसतोच आहे तिकडे. आता त्यास गुहेतून बाहेर येण्यासाठी आमंत्रित करायचं आहे. त्याला काहीतरी आमिष दाखवून रिसॉर्टपर्यंत आणायचं आहे. कारण रिसॉर्ट ही बिपाशाची टेरीटरी आहे. इथले सगळे बारकावे बिपाशाला माहित आहेत. ग्रेट ! सिंपली ग्रेट.! यालाच युद्धशास्त्रात 'रणभूमी निवडण्याचं कौशल्य' असं म्हणतात.! (यासंदर्भात इतिहासात काही प्रसिद्ध दाखलेही आहेत. महाराजांनी अशाच युक्तीनं भुलवत भुलवत अफजलखानास प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलेलं. शिवाय १९६५ च्या लढाईत हेच तंत्र यशवंतरावांना उपयोगी ठरलेलं. काश्मीरच्या चकमकींत जास्त बळ खर्ची घालण्यापेक्षा पंजाब, राजस्थानातून नवीन मोर्चे उघडून आत लाहोरपर्यंत सैन्य घुसवता आलेलं. हे जरा विषय सोडून झालं. त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे. मोह आवरता आला नाही. सवय ! दुसरं काय?)

तर इथं त्यासाठी बिपाशास तळहात कापून गुहेपासून रिसॉर्टपर्यंत रक्ताचा एकेक थेंब सांडत यावं लागतं. ब्रह्मराक्षस रक्ताच्या वासाचा माग काढत येतो. आणि मग टी ट्वेंटी मॅच कधीकधी शेवटच्या बॉलपर्यंत रंगत जाते, तसा हा सामना शेवटच्या गोळीपर्यंत उत्तरोत्तर उत्कंठावर्धक होत जातो. किंवा त्यामाध्यमातून प्रेक्षकांच्या डोक्याचे उरलेसुरले टाकेही ढिले करतो.

बाकी, राक्षसाला मारण्याच्या प्रक्रियेमध्ये कुणालनं मदत केल्यामुळे त्याच्या आतला राक्षसही आता मरून गेला आहे. या सत्वपरीक्षेत न्हाऊन निघाल्यामुळे तोही निर्मळ झालेला आहे. त्यामुळे त्याच्या व बिपाशाच्या प्रेमास नव्याने धुमारे फुटू शकण्याचे रस्ते पुन्हा एकदा खुले होणार, हे ही सकारात्मकपणेच घेतलं आहे. नकारात्मकतेचा ऑप्शनच नाही माझ्याकडे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

धमाल लिहीले आहे.

धपापत्या उराची अभिनेत्री आहे >>>
आत सुसाट जीप घुसविण्याचा एवढा मोठा रस्ता असताना हे लोक शिड्या लावून का उतरले होते, बाय द वे? >>>
नंतर मग पळापळ, पाठलाग, धुमाकूळ, धुमश्चक्री, फुत्कार, गर्जना किंवा तत्सम किंकाळ्या इत्यादींचा समृद्ध गलबला. >>> Lol

हा ब्रह्मराक्षस जिवंत माणसांना मारतो, तर रक्ताच्या "आमिषा"शी त्याचा काय संबंध? ते काही जंगली श्वापद नाही त्याचे आमिष दाखवून आणायला. की प्रो. हे झूलॉजीचे मागवल्याने ते उपायही त्यातलेच वापरतात. If you have a hammer, everything looks like a nail, प्रमाणे?

बाकी शेवटी त्याला पुन्हा एखाद्या पिंपळात बंदिस्त करतात काय? नाहीतर "मारतात" म्हणजे नक्की काय करतात? हंटरसाबने ऑलरेडी मारला होता ना? आणि हायवे बांधताना पिंपळ तोडला तर रिसोर्टवाल्यांच्या मागे का लागतो? ते "मंगल" करायला गेलेले त्याच्या भागात जातात, की तेथे जे त्याला घाबरतात त्या "भित्यांच्या पाठी" तो लागतो? Happy

शेवटी पुन्हा एखाद्या पिंपळात बंदिस्त केला असेल तर जवळ एखादा जेसीबी आलेला दाखवून पार्ट-२ ची सोय केली आहे का?

तो बिबट्या मधल्यामधे उगाच मेला. अशानेच हे प्राणी दुर्मिळ झाले.

साउथ बॉम्बे मधले एकमेकांशी काही संबंध असलेले दोन रॅण्डम लोक एकाच वेळी हिमाचल प्रदेशातील एकाच ठिकाणी एकत्र येतात हा योगायोग मनमोहन देसाईंपेक्षा कमी नाही.

Lol भारी लिहिलंय
धपापत्या उराची अभिनेत्री आहे Lol Lol
मी पाहिलाय जेव्हा आला होता तेव्हा त्यामुळे वाचायला जास्त मजा आली . हॉलीवुड च्या तोडीचा क्रियेचर दाखवलाय अशी अफवा होती हिरो बंडल होता बिचारी बिपाशा तिच्या जीवावर चित्रपट तोलून धरलाय.

धमाल लिहिलंय Lol
बाकी प्रतिसादांत कोट केले आहे त्यात भर: 'एक्सपिरीमेंटल स्टडी ऑफ दि ब्रह्मकुंडाज् वॉटर ऑन दि इफिशियंसी ऑफ मॉडर्न वेपन्स'

ध मा ल !

… धपापत्या उराची अभिनेत्री… Lol

Lol आवडलं!
फारएण्डचा प्रतिसादही मस्त!

पाहतोय थोडा थोडा. जंगलात मोठ्या प्राण्याच्या गुरकावण्याचा आवाज आला की रस्ता सोडून ते काय आहे बघायला जाणे, एखाद्या प्राण्यापासून वाचायचा प्रयत्न करत असताना एकाच बाजूला बघत मागे मागे जाणे ई हॉरर मूव्ही क्लिशे मुबलक वापरले आहेत. तो प्राणी बराच मोठा आहे, किमान त्याची शेपूट टी-रेक्स एवढी आहे. तो पळणार्‍या व्यक्तीला सहज पकडू शकतो. असे असताना तो लपून बसून ambush कशाला करेल. तो तर उघड रिसॉर्ट मधे घुसून मारेल माणसे. हे म्हणजे जुरासिक पार्क मधे टी रेक्स एका झाडामागे लपून गुरकावत लोकांना जवळ येउ देतो व लगेच मारतो असे दाखवल्यासारखे झाले.

या प्राण्याची हंटिंग स्टाइल टी रेक्ससारखी barn storming असेल. ढिम्म बसून जवळ एखादा किडा आला की जीभ लांब करून त्याला मटकावणार्‍या बेडकासारखी नव्हे.

सगळे मेल लीड्स सारखेच दिसत आहेत. एकापासून दुसरा ओळखणे अवघड आहे. एक असिन सारखी दिसणारी कोणीतरी आहे. ती व तिचा नवरा हनीमूनला आलेले आहेत. पण दुसर्‍याच दिवशी सकाळी ती त्याला म्हणते "let's do something more fun" Wink

Rofl पाहिला होता तेव्हा पण प्रचंड करमणूक झाल्याचे आठवते. रिव्ह्यू वाचून अजून जास्त मजा आली. यच्चयावत सगळे भुतांचे प्रकार संपले होते काय म्हणून ब्रह्मराक्षस आणला असेल? आपण कसं सांगणार? ब्रह्मराक्षसाला पाठून पळवायला न भिणे हा उपाय पुरेसा नव्हता काय? पण मग धपापणं कुठे गेलं असतं?
हा ब्रह्मराक्षस रामसेंच्या पिशाच्च/राक्षस/सैतान याचं मॉडिफाईड व्हर्जन आहे असं जाता जाता नमूद करते Happy

अरे मी लेख समजून वाचायला सुरुवात केलेली Lol >> मी गोष्ट Lol
भारी लिहीलाय रिव्ह्यू. हे असे पिक्चर अस्तित्वात आहेत हेच माहित नाही. मौलिक माहिती. Lol

या वाक्यात एक कारुण्य दडलेलं असू शकतं. >>> Happy तेच म्हणायचे होते Happy

हा ब्रह्मराक्षस आगीला भितो हे बर्‍याच सुरूवातीला कळते. तरी त्याला मारायला जाताना पहिल्यांदा आग असलेले काही - मशाल वगैरे न घेता हे लोक जातात. तसेच दिग्दर्शकाने नेमून दिलेले सीन्स सोडून एरव्ही तो रिसोर्ट मधेच काय पण जंगलातही दिसत नाही. मात्र तुम्ही त्याला शोधायला/माराय्ला निघालात की जेथे जाल तेथे कायनात का जर्रा जर्रा उसे तुमसे मिलाने की कोशिश करता है

पण त्यामुळे एरव्हीच्या सीन्स मधे पब्लिक सगळीकडे मुक्त फिरते.

नंतर गुहेत त्याला मारण्याच्या प्रयत्नात झूलॉजीचा प्रोफेसर फॉरेस्ट खात्यातील पोलिसाला "या बंदुकीतून एका वेळेस एकच गोळी मारता येते" हे समजावतो. तेव्हा मला बटाट्याची चाळ मधे कोचरेकर मास्तर बोरीबंदरच्या हमालाला तिसरा वर्ग म्हणजे सरळ उभ्या तीन रेषा असतात हे सांगतात ते आठवले.

तेव्हा मला बटाट्याची चाळ मधे कोचरेकर मास्तर बोरीबंदरच्या हमालाला तिसरा वर्ग म्हणजे सरळ उभ्या तीन रेषा असतात हे सांगतात ते आठवले. >>> Lol