किरदुर्ग एक भय मालिका ~भाग ३

Submitted by रुद्रदमन on 31 August, 2024 - 03:35

किरदुर्ग एक भय मालिका ~भाग ३

पहाटेच्या थंड वातावरण जग अजूनही घनदाट धुक्यात लपेटलेले होते.. यशवर्धन हळूच सुधाकर च्या मंद प्रकाशीत खोलीत शिरला. खोलीतील हवा अनामिक भीतीने भारलेली वाटत होता, जणू काही अजुनही अदृश्य शक्ती तिच्या काठावर घुटमळत होत्या. सुधाकर झोपलेला होता, त्याचे कपाळ चिंतीत मन दर्शवित होते. यशवर्धन ने त्याला हात लाऊन बघितले... सर्व अलबेल आहे बघून तो खोली बाहेर पडला..
सकाळी उठल्या उठल्या चहा ची सवय असल्यामुळे यशवर्धन लगेच किचनमध्ये गेला, चहा बनवला आणि घराच्या दिवाणखाण्यात एका खुर्चीत बसून चहा पिऊ लागला. त्याने संपूर्ण घरावर एक नजर फिरवली, वातावरण अजूनही भयानक आणि भारलेले वाटत होते, रात्रीच्या घटनेची साक्ष म्हणून वस्तू घरभर विखुरलेल्या होत्या... भिंतीवरील रक्त आणि मांसाचे शिंतोडे आता काळपट दिसत होते..

यशवर्धन ला अचानक आठवले .. "अरेच्चा सुधाकरची बायको आणि मुलगी कुठे आहेत? घरात फक्त सुधाकरच दिसत आहे, बाकी कोणीही नाही." त्याने उठून घरभर शोधाशोध केली, परंतु पूर्ण घर रिकामे होते. ‘सुधाकरला जाग आली की त्यालाच विचारू,’ असा विचार करून यशवर्धन परत खुर्चीवर बसला आणि त्याने चहा संपवला.

चहा संपताच, त्याच्या मनातील विचार आणखी स्पष्ट होऊ लागले. एव्हाना सहा वाजले होते, खिडकीतून बाहेर पाहिल्यावर त्याला उगवणाऱ्या सूर्याची चिन्हे दिसू लागली. सूर्यकिरणांनी क्षितिजावर लालिमा पसरला होता.. अंधाराच्या पाशांशी झुंज देत असलेला तीव्र विरोधाभास....
यशवर्धन ने प्रातर्विधी उरकलेत... अंघोळ केल्यानंतर ओल्या अंगानेच झाडू शोधून घराच्या मध्यभागी एक जागा स्वच्छ केली.
अजून हि सुधाकर च्या खोलीत काही हालचाल दिसत नव्हती..

यशवर्धनने त्याची बॅग उघडली आणि त्यातून रांगोळी काढून त्या स्वच्छ केलेल्या जागेवर स्वस्तिक काढले. मग लाल कपड्यात गुंडाळलेली महादेवाची पिंड बाहेर काढून तीची त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी स्थापना केली.
आता प्राणप्रतिष्ठा विधी करायचा होता.. कारण प्राणप्रतिष्ठा झाल्या शिवाय त्या दगडी मूर्ती मध्ये देवत्वाचा संचार होऊ शकत नव्हता..त्याने विधीला सुरुवात केली.. तो हा फक्त देवत्वा चे आमंत्रण देण्यासाठी नव्हे, तर किरदुर्ग वर चालू असलेल्या भयावह शक्तींना परतवून लावण्यासाठी करत होता. घरातील वातावरणात एक बदल जाणवू लागला. जसा जसा विधी पूर्ण होत गेला, घरातील सर्व सावट दूर होऊ लागले आणि एक प्रसन्न वातावरण तयार झाले.

विधी संपल्यावर यशवर्धनने महादेवाला साष्टांग नमस्कार केला आणि उभा राहिला. इतक्यात सुधाकर बेडरूममधून बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर रात्रीच्या घटनांचा थकवा स्पष्ट दिसत होता, परंतु घरात निर्माण झालेल्या प्रसन्न वातावरणामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित झळकले.

यशवर्धन त्याच्या जवळ गेला आणि त्याला खुर्चीवर बसवले. "कसे वाटते आहे आता? जास्त दुखते आहे का?" यशवर्धनने सुधाकरच्या खांद्यावरील जखमेची पाहणी करत विचारले. सुधाकर हळू आवाजात उत्तरला, "नाही, थोडा थकवा आहे फक्त, बाकी काही नाही. पण मन प्रसन्न वाटते आहे."

"बस, मी चहा करून आणतो," म्हणत यशवर्धन किचनकडे निघून गेला. थोड्या वेळाने चहा पिऊन झाल्यावर, सुधाकर प्रातर्विधी उरकण्यासाठी गेला. यशवर्धन परत खुर्चीत बसला आणि बॅगमधून एक जुना ग्रंथ काढून त्यात काहीतरी शोधू लागला.

बराच वेळ पाने चाळून झाल्यावर, यशवर्धनने ग्रंथ बाजूला ठेवला आणि सुधाकरच्या येण्याची वाट बघत खिडकीतून रस्त्याकडे नजर टाकली, त्याला रात्रीचा प्रसंग आठवला .. तो उठून खिडकी जवळ गेला.. वेशीच्या दिशेने बघत "इथूनच रात्री कोणीतरी काही तरी ओढत नेले, काय असेल ते, कोण असेल ?.. गावातून परत एखादा माणूस तर नसेल नेला.." तो स्वतः शीच बोलत होता... "काल रात्री आल्यावर सुधाकर तो अश्या प्रसंगात होता, आपल्याला बोलायला वेळच मिळाला नाही.. आता त्याच्या कडून सर्व काही माहीत करूनच घ्यावे लागेल.. त्या शिवाय आपल्याला पुढची योजना आखता यायची नाही." स्वमग्न होत तो विचार करत अजूनही बाहेरच बघत होता..
गाव तसे चांगले मोठे होते.. दिवस उजाडून बराच वेळ झाला होता.. पण अजून त्याला रस्त्यावर चिटपाखरू ही दिसले नव्हते... गावात पसरलेल्या दहशतीची तीव्रता या वरून समजत होती..... बाहेरच्या वातावरणातील शांतता त्याला बेचैन करत होती.. यशच्या मनात अस्वस्थता होती. तो विचार करत होता, “खरेच जंगलात काय असेल? कदाचित हे फक्त यांच्या मनाचे भ्रम तर नसतील? पण जर भ्रम जर असते तर कालच्या सर्व घटनांचे स्पष्टीकरण कसे करणार." हा पण प्रश्न त्याला पडला होता..
यश ने मनाशी काहीतरी ठरवले. आता हा बाहेर आला की लगेच त्याच्या शी बोलायचे. त्याच्या कडून गावातल्या सर्व विचित्र घटना जाणून घ्यायच्या, विशेषत: त्या लोकांबद्दल, जे गेल्या काही महिन्यांत अचानक गायब झाले होते.

इतक्यात दरवाजा उघडला आणि सुधाकर बाहेर आला. त्याच्या डोळ्यां मध्ये एक चमक होती, आणि तो आता प्रसन्न दिसत होता. सुधाकर येऊन पायरीवर बसला.. यश तत्काळ उठून त्याच्याकडे गेला.

“कसा आहेस, सुधाकर?” यशने विचारले.

“मी ठीक आहे,” सुधाकर ने हसत उत्तर दिले, पण त्याच्या आवाजात काहीतरी दडलेले होते. मघाशी केलेल्या विधिवत पुजणा मुळे त्याला प्रसन्न जरी वाटत असेल तरी आत कुठे तरी अजून हि भीतीचा पगडा होताच.. यशला ते जाणवले...
त्याने थेट विषयाला च हात घातला..
"सुधाकर रात्री काही आपल्याला बोलायला जमले नाही .. आता मात्र मला इथून मागच्या सर्व घटना सांग... म्हणजे मला पुढे काय करायचे ते ठरविता येईल.."

सुधाकर काही क्षण शांत राहून म्हणाला, “होय, सर्व काही सांगतो... गेल्या काही महिन्यांत अनेक लोक अचानक गायब झाले आहेत. कुणालाही माहीत नाही की ते कुठे गेले.”

यशने पाहिले, त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. “गायब होण्यामागची काही कथा? तू तुझ्या कानांनी ऐकलेले किंवा डोळ्यांनी बघितलेले काहीतरी सांगू शकतो का?”

“हो, अनेक वेळा ऐकले आहे, जे लोक जंगला जवळ गेले आणि पुन्हा परतले नाहीत. पहिल्यांदा रामू गायब झाला, नंतर रमेश आणि सुनिल.. तिघे पण गायी चारण्यासाठी जंगलाच्या बाजूला जात... त्यानंतर मात्र कोणी जंगला कडे फिरकेनासे झाले.. पण मग नंतर रात्री बेरात्री गावातून आवाज यायला लागले.. सकाळ झाली की समजायचे की कोणीतरी गायब झाले आहे.. आता पर्यंत 18 जण गायब झाले आहेत, आता परिस्थिती इतकी खराब झाली आहे की गावात कोणीही रात्रीच काय दिवसा पण बाहेर जायचे धाडस करत नाही.”सुधाकरच्या शब्दांमध्ये जड पना आला होता, आणि यशला जाणवले की त्याच्या श्वासा ची गती वाढली आहे.

“काहीतरी आहे? हे काय असू शकते?” यश ने जाणून घेण्याची इच्छा दाखवली.

“काही लोक म्हणतात जंगलाच्या आत काहीतरी आले आहे, आणि त्याच्या विषयी प्रत्येक जण वेग वेगळी दंत कथा सांगतो..
लोक म्हणतात की तिथे एक आत्मा आहे.. तर कोण म्हणते की सैतानाने आपल्या जंगलात जन्म घेतला आहे.. कधी कधी रात्री विचित्र आवाज ऐकू येतात.. आणि ज्यांनी आवाज ऐकले ते पुढच्या काही दिवसात गायब झालेत, त्यांना कोणी कसे नेले काहीच माहीत नाही.. मी स्वतः परवा ते विचित्र आवाज ऐकले आहेत... फार भयानक... नक्की त्या अवाजांचा अर्थ काय हे सुद्धा समजत नव्हते... कानाला असह्य झाले होते... आणि काल ते घडले, तो मला न्यायला आला होता.. हे असेच काहीसे गायब झालेल्या सर्वांबरोबर झाले असेल कदाचित", सुधाकर म्हणाला.

यश च्या हृदयाची धडधड वाढली. त्याने सुधाकर च्या चेहऱ्यावर दिसणारा भितीचा भाव वाचला. “तू स्वतः जंगला जवळ जाऊन पाहिले आहेस का?”

“नाही,” सुधाकर ने घाईघाईने उत्तर दिले, “माझा विचार होता की जाऊन बघावे पण... पण मग धाडस नाही झाले. मल्हार काका पण माझ्या जाण्यास विरोध करत होते... परवा आणि कालची घटना सोडली तर आता पर्यंत मी फक्त ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला होता... मला वाटते आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. जर हे इतके भयानक असेल, तर आपल्याला गावा साठी काहीतरी पाऊल उचलायला हवे.." सुधाकर आशेने यश कडे बघत उत्त्तरला...

“नक्की काहीतरी करु, मी आलो आहे ना आता यातून नक्कीच मार्ग निघेल” यश त्याच्याकडे झुकून बघत बोलला , त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती.

“आज अगोदर मला सर्व गायब झालेल्या लोकांच्या घरी घेऊन चल.. त्यांनतर आपण जंगलाच्या आजूबाजूला एक चक्कर मारून येऊ.. म्हणजे तिथे काही clue मिळाला तर आपल्याला तो पुढे कामी येईल...आपल्याला समजून घ्यायला हवे की ते कुठे गेले. नक्की त्यांना जंगला मध्येच नेले की दुसरी कडे कुठे." यश ने मनाशी निर्धार करत सुधाकर ला सांगितले... सुधाकर काय बोलतो यासाठी यश ने त्याच्या कडे बघितले... तर सुधाकर कुठे तरी हरवून बसला होता..
"सुधाकर... ये सुधाकर" यश ने आवाज देत सुधाकर ला गदागदा हलविले....
सुधाकर भानावर आला... आणि पुटपुटला, "तो रात्रीचा आवाज, नक्कीच ओळखीचा वाटतो आहे, कुठे तरी ऐकला आहे अगदी तसाच, पण आठवत नाही आहे"..
यश त्याच्या कडे आश्चर्याने बघत होता...

तेव्हढ्यात दरवाजावर जोरजोरात कोणीतरी कडी मारल्याचा आवाज आला... त्या पाठोपाठ" सुधाकर भाऊ, ओ सुधाकर भाऊ दरवाजा उघडा लवकर... मी हरी आहे". असा आवाज घुमला..
सुधाकर घाई घाईने दरवाजा कडे गेला..
यश पण त्याच्या मागे मागे गेला..
सुधाकर ने दरवाजा उघडला...समोर एक माणूस उभा होता.. अंगावर मळका सफेद सदरा, त्या इतकेच मळलेले धोतरआणि पाया मध्ये तुटक्या कोल्हापुरी वहाणा.
"सुधाकर भाऊ, घात झाला. "धाकले धनी रात्रीपासून गायब आहेत," हरि ने काळजीच्या स्वरात सांगितले. "रात्री खोलीत झोपायला गेले होते,पण सकाळी बघितले तर खोली रिकामी.. मालकाने तातडीने तुम्हाला तिकडे बोलावले आहे."

सुधाकर ने हरीला पुढे जाण्यास सांगितले आणि यशवर्धन ला हातवारे करत म्हटले, "चल, आपण लगेच निघूया."
थोड्याच वेळात दोघे गाडीतून निघाले.
" कोण आहे हा हरी, आणि धाकले धनी आणि मालक म्हणजे कोण?" यश ने गाडी चालवत विचारले...
" मालक म्हणजे किरदुर्ग चे सरपंच मल्हारराव, धाकले धनी म्हणजे त्यांचा मुलगा किशोर आणि हा हरी त्यांचा नोकर आहे.." सुधाकर ने यशला सांगितले..
"काय झाले असेल किशोर ला, कुठे गेला असेल काय माहित." तो स्वतःशीच पुटपुटल्या सारखे बोलला...
त्याचे पुटपुटने ऐकून,"काल रात्री तो काही तरी ओढत नेण्याचा आवाज? मी खिडकीतून वेशी जवळ काहीतरी बघितले होते.". यश ने शंका उपस्थित केली आणि गाडी चालवत बाहेर बघू लागला..
"अरे सुधाकर, वहिनी आणि नेहा कुठे आहेत?" यश ला अचानक आठवले...
सुधाकर ने त्याच्या कडे चमकून बघितले...
आणि बोलला" कुठे नाही माहेरी आहे तिच्या... बरीच मोठी घटना आहे ती, त्यामुळे त्यांना माहेरी पाठवले आहे... हे प्रकरण आवरले की सांगतो तुला.." असे म्हणत सुधाकर ने चेहरा फिरवला..
यश ला संशय आलाच, पण अगोदर हे प्रकरण मिटवू मग त्याला विचारायचे मनोमन ठरवून त्याने रस्त्यावर लक्ष केंद्रित केले...

यश ने विषय काढल्या पासून सुधाकर गहन विचारात हरवला होता... त्याला आपल्या कडून काही तरी सुटते आहे असे सारखे वाटत होते..
तेव्हाच त्याला काही तरी आठवले.. अरे हो काल रात्री ते कुजबुजने.. तो आवाज थोडाफार तसाच वाटत होता.. त्याच्या सारखाच... पण त्या घटनेला तर कित्येक वर्ष झाली.. मनातल्या मनात भूतकाळ आठवून तो शहारला.. त्याचे आणि त्याच्या कुटुंबाच्या आयुष्या पाया त्या घटनेने हादरविला होता..
त्याला धरणी कंप होऊन गाडी हलते आहे की काय असे वाटू लागले.. ही गोष्ट यश ला सांगावी की नको.. याचा विचार तो करत होता.. त्याने यश कडे बघितले आणि आणि लगेच सांगण्याचा विचार झटकला.. अगोदर मल्हाररावां कडे जावू.. तिथे गेल्यावर सविस्तर बोलता येईल.. असे ठरवून तो यश ला रस्ता सांगू लागला...

काय असेल किशोर च्या गायब होण्या मागचे कारण?
काय असेल सुधकरच्या आयुष्यातील ते काळे सत्य?
यशवर्धन किरदुर्गला या संकटातून वाचवू शकेल का?
वाचत रहा किरदुर्ग....

लेखक: रुद्रदमन

( कथा कशी वाटली या विषयी अभिप्राय देण्यासाठी विसरू नका... आवडल्यास लाईक आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा..)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users