असंच आपलं काहीतरी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

कधी तासन्तास डोळे दिपवणार्‍या ढगांच्या गाद्या, कधी चिमूटभर ढगांच्या पुंजक्यांच्याही नितळ समुद्रात नाचणार्‍या आणि इतक्या वरूनही दिसणार्‍या सावल्या, कधी वाळूचीच जमीन अन वाळूचेच डोंगर आणि एकच तपकिरी रंग. पुढे तर डोळे मिटलेत की उघडे आहेत असा भास निर्माण करणारी हिरवाई.
माझे मीच अंदाज बांधत बसले होते. हे गल्फ असेल. आता युरप सुरू झालं बहुतेक.
एअर इंडियाच्या कृपेनं इटिनररीची सोय नव्हती. त्यामुळं निवांतच होतं. विमानात गर्दीच नव्हती. कुणीही कुठंही बसा असं एअर इंडियाच्या काक्या मावशा येऊन सांगत होत्या. मी दुपारचं जेवण झाल्यावर शेजारची सीट रिकामी असल्यानं
थोडी पसरले. डोळा लागला तेवढ्यात एक प्रेमळ काकू उठवून म्हणाली "बेटा मधल्या फोर सीटरवर जाऊन आरामात झोप ना."
मी नजर टाकली तर विमानाची पार यष्टी झालेली. हिंडफिर्‍या काकवा सोडून समस्त जन्ता पांघरुणं आणि पाय एकदमच पसरून निद्राधीन झाली होती. एकदोघा पाशिंजरांच्या अंगावर काकवांनी स्वतःही पांघरूणं घातल्याचं अर्धमिटल्या डोळ्यातून पाहिल्यासारखं वाटतंय. मला तर तिनं आग्रहच चालवला बेटा बेटा करून. पण म्हटलं आता व्यवस्थित जम बसलाय. शिवाय खिडकीबाहेर चाललेला लाखमोलाचा सरकता चित्रपट फार वेळ मिस नव्हता करायचा.
पायलट पण काकूच होत्या. त्यांचंही जेवण सगळ्यांसारखं आडव्या हातानं झालं असणार. कारण अधून मधून प्लेन खर्र खुर्र खटर फटर फुस्स असले आवाज काढत होतं.
पण मग पा. का. नीच अनाऊन्समेंट केली कुणालाही पाहिजे तिथं जाऊन बसा, झोपा त्यावरून त्या जाग्या असाव्यात.
नुसत्या झोपण्याचाच नाही तर खाण्याचा आणि पिण्याचाही अगदी पंजाबी आग्रह चालू होता.
मूव्हीज मात्र टुकार होते. तेही बरंच होतं म्हणा. मी डोळे दुखेपर्यंत खिडकीतून बाहेर पाहून घेतलं.
छोटी छोटी टुमदार खेडी दिसायची. अंधुक अंदाज बांधत मी त्यातली पटांगणं, चर्चेस ओळखायचा प्रयत्न करायचे.
कशी असेल बरं यांची संस्कृती?
शहरं म्हणजे संस्कृतीची भेळ. अनुरूप चवीचे पदार्थ टाकले तर चांगलीच चटपटीत होणारी पण नाहीतर रेसिपी बिघाडायचीच भिती. तसं खेड्यांचं नाही. जितकी एखादी सिस्टीम छोटी तितके तिथं रितीरिवाज जास्त.
शहरात सगळे वेगवेगळे रितीरिवाज घेऊन आलेले. खरं तर आपापल्या छोट्या सिस्टीममधेच ठेऊन आलेले पण आठवत रहाणारे.
म्हणून अशा टुमदार खेड्यांना पाहून वाटत होतं काहीतरी असेल इथं खास. एखादी गावची जत्रा, बाजार.
इथं एखादा संतपुरुष होऊन गेला असेल. त्याचं स्मृतीस्थळ असेल. श्रमदानानं लोकांनी इथं समाजमंदिर बांधलं असेल. तिथल्या आवारात जमत असतील रोज संध्याकाळी तिथले गावकरी. एखाद्या व्यायामवेड्यानं कष्टानं व्यायामशाळा उभी केली असेल आणि तिथली तरूण पोरं आमचे गुर्जी म्हणजे वगैरे सारखं वाक्य कानाची पाळी पकडून बोलत असतील. एखादं संगीतवेडं गाव कितीक संगीतशाळा मिरवत उभं असेल.
सूर येतही असतील आत्ता आतून एखाद्या शाळकरी मुलानं वाजवलेल्या व्हायोलीनचे.
या उतरत्या डोंगरावरच्या गावातल्या माथ्यावरच्या घरातून गावातल्या प्रत्येक अंगणांत काय चाल्लंय ते दिसत असेल.
या गावात सपाट छपरांची घरं आहेत. इथले लोक नक्कीच वाळवणं घालत असणार कसली तरी.
"बर्का अंदाजे किलोभर पोर्क ला २ चमचे मीठ आणि ..." असली का होईना.
आणि पोरं नक्की पतंग उडवत असणार. स्पर्धाच होत असतील इथं पतंग उडवायच्या.
हे मासेमारीच्या बोटी लावलेलं गाव. नितळ पांढरा किनारा मिरवणारं... किनार्‍यालगत झोपड्या असलेलं.
इथल्या गोमूच्यासुद्धा नाखवा निघाला की डोळ्यात पाणी येत असेल.
दाट झाडी बस बाकी काही नाही असे पॅचेस आले. आतमधे भरदिवसाही अंधार असणार आणि इथंही बल्लू बघिरा आणि शेरखान असणार.
इंग्लंड जवळ आलं त्याआधीच सुबत्ता दिसायला लागली होती. सगळीकडे हिरवे, मरून शेतीचे पट्टे, तलाव, गच्च झाडी.
प्रमाणबद्ध गावं. शहरंही. स्वतःची ओळख न सोडलेली. वस्ती वाढूनही बकाल न झालेली. काही शहरं उभी वाढतात, काही आडवी. भारतातली शहरं मात्र सूज आल्यासारखी वाढतात. जागा तेवढीच फक्त डेन्सिटी वाढत जाते.
ब्लॅक होल निर्माण होण्याची प्रोसेस पण अशीच असणार.
बाहेर आले. अंधार पडायची वेळ कधीच होऊन गेली होती पण लक्ख उजेड होता.
मी वसंतातल्या दिवसाच्या फ़्लाईटचं सौंदर्य नऊ तास अनूभवून उतरल्यामुळं आता या शॉकच्या पल्याड होते.
मागच्या वेळी हिवाळा होता. त्यामुळं आठला उजाडून साडेतीनला अंधारणारं आणि साडेसातला जेवून साडेआठला गुडूप झोपणारं शहर पाहिलं होतं. भारतात अशा लाईफस्टाईलची सवय नाही एकतर आणि त्यातून रात्री १२ वाजताही ट्रॅफिक
जॅममधे घामाघूम होणार्‍या मुंबईहून आल्यामुळं तर त्यावेळी फारच डिप्रेसिन्ग आणि होमसिक वाटत होतं.
हा स्टे मात्र प्रसन्न होणार हे हवेच्या सुगंधानंच सांगितलं. तरीही एक कोपरा सतत मुंबईच्या आठवणींनी ऍक्टीव्ह रहाणार होताच.

मी होऊन पक्षी गगनभरारी घेते.
अन अवघी अवनी चित्रमालिका होते.

हेही असंच... Happy

विषय: 
प्रकार: 

मस्त जमलय ग. अशीच break न घेता लिहित राहा.

>>शहरं म्हणजे संस्कृतीची भेळ. अनुरूप चवीचे पदार्थ टाकले तर चांगलीच चटपटीत होणारी पण नाहीतर
रेसिपी बिघाडायचीच भिती.

अगदी अगदी!
सन्मे हल्ली खाडे फार करायला लागली आहेस. जरा लिहीत जा बाई नेमाने.

>>"बर्का अंदाजे किलोभर पोर्क ला २ चमचे मीठ आणि ..."
Happy

सुन्दर लेख....

=================================================

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!

एअर इंडियाचा प्रवास मात्र मस्तच हं Happy मी एकदा प्रवास करताना असच इमान पूर्ण रिकामं होतं.. मी ताणून दिली तीनच्या सीटवर.. तर थोड्या वेळाने काकुंनी येउन मला शुद्ध हिंदी मध्ये 'बेटा, पेहले खाना खाओ और फिर सो जाना' असे ऐकवुन खायला दिले Happy वर बर्‍याच दिवसांनी किंगफिशर मिळाली असे म्हणताच, चार कॅन आणुन दिले Lol नायतर च्यायला के एल एम.. खायला नुसत्याच उकडलेल्या भाज्या..

मस्तच. मला पण सवय आहे खिडकीतुन बाहेर बघत कुठल्या गावात काय आहे/असेल असे विचार करायची (त्यासाठी मी प्रत्येक वेळी window seat मागुन घेते Happy ). पण तु फारच सुंदर भाषेत मनातले विचार मांडलेस.

बापरे, एअर इंडियाच्या फ्लाईटला 'बेटा' म्हणत जेवायचा आग्रह? ऐकावं ते नवलच. गेल्या वेळी भारतात गेले तेव्हा जेवायच्या वेळी मुलगी झोपली होती म्हणून काकूंना जेवण नंतर आणायला सांगितलं तर म्हणाल्या 'नंतर मिळेल ह्याची गॅरेंटी नाही. तेव्हा ठेव तुझ्याकडेच.' मग शेजारच्या गुज्जु आजोबांनी पण तेच सांगितलं. इतक्या वेळा प्रवास करुन झाला पण असा प्रेमळ अनुभव अजून यायचाय.

मस्त लिहीलंय .. Happy
.
युरोपिअन प्रवाशांना वेगळी ट्रीटमेंट देतात का एअर इंडिया च्या काकवा?

छान लिहीलयस संघमित्रा. Happy

>>मी होऊन पक्षी गगनभरारी घेते.
>>अन अवघी अवनी चित्रमालिका होते.

व्वा दोन ओळीत काय यथार्थ वर्णन आहे विमानप्रवासाचे.....
खुप मस्त स्फुट!

व्वा छानच लिहीलय, असच असलं तरी मस्त,

सुधीर
-----------------------
हर देशमे तू हर वेषमे तू , तेरे नाम अनेक तू एक ही है
तेरी रंगभुमी यह विश्वंभरा , सब खेलमे मेलमे तूही तो है

मस्त लिहिलं आहेस मित्रा.. अगदी लंडनपर्यंत आकाशातुन चक्कर मारुन आणलंस.

व्वा, मस्तच लिहीलय, पद्धतही चान्गली! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

सुंSSSSSSदर!
_________________________
-Man has no greater enemy than himself

सुरेख लिहिलयस संघमित्रा. प्रवासात मन असं उगाचच धुणी धुवत असतं. त्याचं स्फुटात रुपांतर छानच.
***
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!

छान लिहिलं आहेस संघमित्रा. सध्या काय मु. पो. युके का ?????????? Happy

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा
    उलगडला धारांतून अवचित हिरवा मोरपिसारा

    सुंदर जमलाय लेख!
    वाचून अगदी ताजंतवानं वाटलं!

    एक नम्बर लिहिलय... आवडल.....
    >>मी होऊन पक्षी गगनभरारी घेते.
    >>अन अवघी अवनी चित्रमालिका होते

    बढिया....
    - येडचॅप

    >>> अंधुक अंदाज बांधत मी त्यातली पटांगणं, चर्चेस ओळखायचा प्रयत्न करायचे. कशी असेल बरं यांची संस्कृती?
    अगदी अगदी !! यापुढे लिहीलेले बहुतेक सर्व विचार मनात येतातच. म्हणजे जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष विहंगावलोकन घडते तेव्हा तेव्हा लाक्षणिकसुद्धा होते हा तर नेहमीचा अनुभव.
    बाकी तुम्हा लोकांना बरे असे AIनुभव येतात, मला असला प्रेमळपणा जाऊच दे, व्यावसायिक स्मितसुद्धा कधी दिसले नाहीये ! एकेकाचे नशीब !!

      ***
      It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
      - Gore Vidal

      अगदी सुरेख वर्णन!मनाला भावले. पण ऐअर इन्डिया असे सुखावह नक्कीच नाहिये.ईकोनॉमी क्लास तरी नाही.

      मी एकदा-दोनदाच प्रवास केला एअर इंडियाने.. पण मला नेहेमीच छान अनुभव आला. विमान थोडे (?) घाण होते आतुन.. जुनाट होते.. समोर टीव्ही वगैरे नव्हता.. एक पडदा ओढून त्यावर सिनेमे लावतात (जे मी आजवर बघितले नाहियेत त्यामुळे कुठले होते ते माहिती नाही).. पण जेवण चांगले मिळाले नेहेमी.. मुख्य म्हणजे फ्लाइट रिकामी, त्यामुळे झोपायला बेष्ट..
      मला नेहेमी खालची जमिन बघताना वाटते की ही सगळी गावं एकदम टुमदार असतील.. एकदम हिरवीगार.. जंगलात गुरफटलेली वगैरे वगैरे..

      मस्तच जमलाय ग लेख!

      फार मस्त लिहिलंयस गं! अगदी पिसासारखं हलकंफुलकं Happy
      भारतातली शहरं मात्र सूज आल्यासारखी वाढतात. जागा तेवढीच फक्त डेन्सिटी वाढत जाते. >> शब्दांच्या चिमटीत वास्तवाला अचूक पकडलंयस! Happy

      ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
      जीवन जगण्यात धाडस आहे.. मृत्यूला शरण जाण्यात नाही.

      रचना छानच आहे. आवडली.

      संघा...छान लिहीलस ग... अगदी तरल.. मस्त जेवण झाल्यावर.. काही काम नसतना पेंगुळलेल्या विचारां सारख... Happy

      सन्मे, सुरेख जमलाय लेख. असा प्रवास एकट्याचा हवा मात्र नाही? दुकटं असलं की त्या तंद्रीतून जागं व्हायला होतं.
      मी होऊन पक्षी गगनभरारी घेते.
      अन अवघी अवनी चित्रमालिका होते
      आहा! खूप छान!

      सन्मे, मस्त लेख. आवडला. मी पण नेहमीच खिडकी घेऊन बाहेर बघत असतो. मात्र किती ठिकाणे आहेत अजून फिरायची याची जाणीव होत रहाते Sad

      अचुक वेध मनाचा ...... !
      व्वा फारच छान जमलयं !!
      लिहिते रहा !!!

      व्वा सुंदर वर्णन लिहिलं आहेस. मलाही खिडकीतून खाली बघायला मज्ज वाटते.. जेव्हा खूप ढग दिसतात ... त्यावर उडी मारता आली तर किती मज्जा येईल नं ...:)

      एअर इंडीयात
      अशाच एका प्रेमळ काकू ने माझ्या लेकाला चॉकलेट्स चा अख्खा पॅक आणून दिला होता. जेव्हा त्यानी चॉकलेट्स ऑफर केली तेव्हा त्याने एकच घेतले होते... म्हणून थोड्यावेळाने खूप ..

      मस्त लिहीलय खुप!!
      मला असे खिडकीतुन बघताना, त्या गावात उतरुन जावे वाटते आणि तेथिल जीवन जवळुन अनुभवावे वाटते...
      .
      मला पण एअर इंडीयात नेहमी चांगलाच अनुभव आला आहे.

      मी आजच वाचले. खुप तरल!!! खूप छान!!