चित्रपट भाजणी

Submitted by रघू आचार्य on 28 February, 2024 - 08:48

कधी कधी कसलाही चित्रपट आवडत नाही. मग ठेवणीतल्या चित्रपटांचाच सहारा असतो.
लोक म्हणतात कि त्याची पिसं काढायची असतात. पण हे एक वेगळं मनोरंजन असतं.

तर मायबोलीवरच्या भट्ट्यांमधे खरपूस भाजले जाऊ शकणार्‍या चित्रपटांची चर्चा इथे करू. भाजावासा वाटला तर भट्टीत घालायचा.
दंगा होऊन जाऊ द्यात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संप्रति, एकदम धमाका पोस्ट. Lol
पाहिल्यासारखा वाटतोय,
हरीश म्हटल्यावर हिरॉईन दोन आहेत का असा पांचट प्रश्न विचारायचा मोह झालेला.
पण इतक्यातच दुसर्‍या कुठल्या धाग्यावर असाच उल्लेख वाचल्याने प्रश्न पांचट नाही आणि नवीनही नाही हे समजले. Happy

कथा नावाशी पुर्णतः गद्दारी करत आहे ह्यापेक्षा अन्योन्य संबंध तो अजुनी काय वर्णावा !! >> Lol

गेले बरेच दिवस हा बाफ बॅकलॉग मधे होता सवडीने वाचू म्हणून.

पहिले तहकीकात. त्यावरची ती दुसरी पोस्ट खतरनाक भारी आहे.
यांच्या वडलांचे नाव नरीमन बाटलीवाला आणि आईचे नाव सलमा खान असणार यात शंकाच नाही). >>>
जितेंद्र एसपी असला तरी पोलीस काही त्याचे ऐकत नसतात. >>
त्या वेळचे जितेंद्र, मिथुन,धर्मेंद्र हे राष्ट्रपती असते तरी हे भोग काही चुकले नसते बिचार्यांना. >>> असली अफलातून निरीक्षणे, किंवा "बघताक्षणी असहाय्य अबला" ते जगातील सगळ्या भूगोलाला सामावून घेतलेले अष्टपैलू गाव Lol

री गरीब घरकी असल्यामुळे तिचे सगळे ड्रेस वरून कमी पडलेले किंवा खालून कमी पडलेले आहेंत >>> Lol ही कॉमेण्टही लोल.

आता "गद्दार" कडे Happy

गद्दार बद्दलची पोस्टही धमाल आहे.
ते प्रॅक्टिकल विचारांचे आहेत. ह्या प्राचार्यांना मला एकदा गुटख्याच्या जाहिरातीत बघितल्यासारखं वाटतंय. असो. >>
ती तिथेच विद्यार्थीनी म्हणून काम करते. >>>
प्रोफेसर नाग हाणामारी करून हरीशला जेलातनं सोडवतात. ते कॉलेजमधलं कामधाम सोडून ह्या पोरासोरांच्या मागंच फिरत असतात.‌ >>> Lol

मुलखा-महागाचे ड्रग्ज सगळ्यांना जेवणातून वाटणारे ड्रगमाफिया आजकाल सापडणार नाहीत >>> हे सगळ्यात अफलातून Happy

बाय द वे, अन्नात ड्रग्ज आहेत का नाही हे कळायला फॉरेन्सिक लॅब कशाला? साधी लॅबही चालेल की. बहुधा फॉरेन्सिक वगैरे म्हंटले की काहीतरी भारी/कूल वाटत असावे.

९०ज मधल्या चित्रपटांमधे गुंडांनी एखाद्या गरीब घरातून भांडीकुंडी बाहेर फेकून देणे हा कॉमन थ्रेड दिसतो.

आपको शैतान पर यकी नही हो तो क्या हुआ ?
शैतान को तो आप पर यकीं है !

चित्रपट :- राज - ए - शैतान
प्र.भू. :- अमिता नांगिया, कविता राधेश्याम , निरोब होसेन
दिग्दर्शक - समीर खान

एखाद्याने युट्यूबवर चित्र कसं काढतात हे पहावं आणि मग व्हॅन गो सारखं चित्र काढायला सुरूवात करावी. चित्र काढता काढताच मग "अरेच्चा ! पिक्सेल टू पिक्सेल कॉपी नको करायला, मग आपली प्रतिभा ती काय ?" अशा विचाराने त्यात बदल करावेत पण मूळ कल्पना काही बदलत नाही असा एक चित्रपट राज - ए शैतान पाहण्यात आला.
द ओमेन सारखा क्लासिक पाहिल्यानंतर निर्माता किंवा दिग्दर्शकाला असा एखादा चित्रपट आपल्याकडे बनला पाहीजे अशी सुरसुरी आली असावी. पण एक तर अनुभव नाही, शास्त्रशुद्ध शिक्षण नाही, प्रतिभा नाही आणि बजेटही नाही असे अनेक अडथळे यावेत पण निव्वळ जिद्द आणि जिद्द कशा प्रकारे हाती घेतलेले काम करवून घेते याचे हे आदर्श उदाहरण आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे या म्हणीचा प्रत्यय इथे येतो. काही जण केला तुका अन झाला माका असेही म्हणू शकतात. करायला गेला गणपती, झाला मारूती अशीही म्हण कुणाला आठवेल पण सध्या दिवस बरे नाहीत. त्यामुळे ही म्हण मनातच राहू द्यावी.

द ओमेन मधे ग्रेगरी पेक हा अमेरिकन राजदूत आहे. त्यातून नियुक्ती ब्रिटन मधे ( कि उलटं ?). आता हे खर्चिक काम झालं. अमेरिकन राजदूत म्हटल्यावर मोठ मोठ्या राजेशाही हवेल्या, त्यात किंमती वस्तूंची रेलचैल दाखवायची तर बजेट कुठून येणार ?

मग नायक सीबीआय ऑफीसर दाखवण्यात येतो. सीबीआय अधिकारी कसा वागत असावा याचा लेखक, दिग्दर्शक यांना अदमास असायला हवा असे नाही. जसे सावरकर चित्रपटात भगतसिंग त्यांना भेटायला रोज रत्नागिरीला येत असतो ( आणि याला गणेश मतकरींनी जस्टीफाय केले आहे कि असा फ्रीडम घेतला तर बिघडत नाही, अचूक दाखवायला तो माहितीपट थोडीच आहे ?) त्याच प्रमाणे सीबीआय अधिकारी हा इंग्लीश वाक्यं बोलताना ( पूर्ण चित्रपटात एकच वाक्य आहे ) ते अशा ठिकाणी तोडतो कि अर्थच वदलावा आणि मग वाक्य संपले असा समज झाल्यावर उरलेले वाक्य बोलतो. हे बहुधा एव्हढे इंग्लीश पहिल्यांदाच बोलताना होते ( अनुभवाचे बोल आहेत).

एका मुलीच्या हत्येच्या केस मधे तिच्या बॉयफ्रेंडला अटक केलेली असते ती केस हे फॉरेन्सिक लॅब मधे डिस्कस करत असतात. हाताखालचा अधिकारी त्याला ही माहिती देतो कि आम्ही त्याला रात्रभर तोडला. यावर सीबीआय अधिकारी आश्चर्याने म्हणतो कि " क्या तुम्हे सच मे लगता है कि इसके बॉयफ्रेंड ने इसका कत्ल किया है ?"
म्हणजे बहुधा यांना ऑफीस नसावं. असलं तरी बसायचं कुठे , बोलायचं कुठे फायली कुठे ठेवायच्या असे लोचे असावेत. किंवा त्या ऑफीस मधे बसणे सेफ नसावे. किंवा तिथे कुठलीही गोष्ट गुप्त राहत नसणार म्हणून यांना प्रेत ठेवायची जागा ही खलबतं करायला सेफ वाटत असावी.

सीबीआय आधिकारी म्हणतो कि "इतनी खूबसूरत लडकी को बिना कुछ लिये मार दिया ? "
मग खालचा अधिकारी म्हणतो "क्या ये व्हर्जिन है ?"
तिसरा म्हणतो " मानना पडेगा सर आपको. ये तो हमने सोचा ही नही था "
मग सीबीआय अधिकारी म्हणतो "इसके बाप को उठा लाओ "
तर बाप पोपटासाअखा बोलू लागतो. सगळं सांगितल्यावर म्हणतो कि मेरे भाई कि कुर्सी बचाने के लिये मुझे अपनी बेटी कि हत्या करनी पडी. क्यूं कि ये दूसरे जात के लडके से ब्याह करना चाहती थी. अब बताओ इन्स्पेक्टर इस बात को दबाने का कितना पैसा लोगे ?"

आता एव्हढा पॉवरफुल नेता आणल्याबरोबर पोपटासारखा बोलतो, मुळात त्याला आणायला जाताना तो वकील बकील काही बोलवत नाही. त्याला हे असेच घेऊन येतात हे पाहून देशात रामराज्य आलेले आहे याची खात्री पटते.

त्याच्या घरात बायकोला मूल दत्तक घ्यायचं असतं. तिला एक मुन्नी नावाची मुलगी बागेत दिसते. तिलाच आपण गोद घेऊयात ( गोद लेंगेचं शब्दश: भाषांतरच बरं वाटतंय) असा प्रस्ताव ती सीबीआय अधिकार्‍यापुढे ठेवते. सीबीआय अधिकार्‍याला फक्त ती नऊ दहाआ वर्षांची आहे हाच प्रॉब्लेम असतो. नायक सीबीआय मधे आहे म्हणजे तो अधून मधून काहीतरी लॉजिकल बोलणार असे लेखक दिग्दर्शकांना वाटते. त्यामुळे त्याचे चतुराईचे मुद्दे अधून मधून येतात. पण गोद लेनेके लिये मुलीच्या आईबापांचा पत्ता लावणे, कायदेशीर परवानग्या घेणे, उद्या कोर्टात मुलीचे आईवडील गेले तर काय यातला कोणताही मुद्दा त्याच्या मनाला शिवत नाही. आपणही हा प्रश्न विचारू शकत नाही. कारण सीबीआय म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडीया पासून ते छिंदवाडा बीअर इंडस्ट्रीज पर्यंत काहीही असू शकते. त्यांचे अधिकारी अधून मधून पोलीसांना मदत करू शकतातच ( गणेश मतकरींना वंदन).

गोद घेतलेल्या मुलीच्या अंगात शैतान असतो हे लगेचच नायिकेच्या लक्षात येते. नायिका खात्यापित्या घरची आहे. दोघेही नायक नायिका पदावर काम करत असल्याने ते गाणी म्हणतात. गाण्यावर इयत्ता तिसरी तुकडी फ च्या बाईंनी गॅदरींगला " ससा गं सा , कापूस जसा , त्याने कासवाशी पैज लावली" या गाण्यावर डान्स बसावावा तशा हालचाली दोघे करत असतात. नायिकेच्या खात्या पित्या स्टेटस मुळे तिचे रिफ्लेक्सेस हे करिश्मा कपूर प्रमाणेच आहेत असा आपण समज करून घ्यावा लागतो.

नायक हाणामारी करताना ती रिहर्सल असावी अशी शंका येते. म्हणजे एक माणूस समोरून येतो त्याला तो डाव्या हाताने बाजूला काढतो तो त्याच हाताला जाऊन थांबतो. मग तो विचार करून विरूद्ध बाजूची लाथ वर उचलतो आणि आता कुणाला हाणू असा विचार करत शक्यतो साईडच्या माणसाला किक मारतो.इतका वेळ ज्याला हाताला धरून ठेवले होते त्याने टाईमप्लीज घेतलेली असते. ज्याला किक बसते तो आता हिरवळीवर जाऊन झोपतो. मग हाताने लांब केलेला माणूस हा समोर ओढून घेतो आणि त्याला गुद्दे मारतो. मग उरलेले दोघे.

चित्रपटातली ही मारामारी पाहून लहान असताना एकदा पाच उनाड मुलांच्या अंगावर धावून गेलो होतो. एकट्याने पाच जणांची धुलाई म्हणजे नॉट अ बिग डील असं वाटलं होतं. मग समोरच्याला एका पंचमधे गार करू मग साईडच्याच्या गळ्यात दोन्ही हातांची कैची घालून त्याला खाली वाकवू आणि पाठीत कोपर पोटात गुडघा असा जायबंदी केला कि मागच्याला बॅक किक आणि इकडच्या बाजूला साईड किक असा प्लान आखून गेलो.

पण समोरच्यानेच माझा पाय पकडला आणि मागच्याने मागून पकडलं. हे चीटिंग होतं. एक एक करून यायचं असतं एव्हढे मॅनर्स नसावेत का ? यामुळेच देश मागे राहतो हे त्यांना ओरडून सांगत होतो पण ते असभ्य भाषेचा प्रयोग करू लागले हे पाहून ज्ञानामृत पाजण्याचा बेत रहीत केला. यांची ती पात्रताच नाही हा विचार केला. आता यांना काय करायचे ते करू देत पण यांना फुकटात ज्ञान देणार नाही असा विचार करून पराभवातही विजय मिळवला. त्या दिवशी समजलं कि आईशप्पथ फार मारतात ही गुंड मुलं.

एका मित्राचा किस्सा तर अनेकदा सांगितलाय. कॉलेजला इलेक्शनच्या वेळेत हा गुंड मुलांच्या विरोधात प्रचार करत होता. हॉस्टेलवर हा ज्या पॅनलचा प्रचार करत होता त्या पॅनेलला मारायला बाहेरची मुलं सायकलची चेन, सोडावीटरच्या बाटल्या , तलवारी घेऊन आली होती. एकाने एक बाटली जीएसच्या उमेदवाराच्या डोक्यातच फोडली. इतक्यात एकाने या मित्राला पाहिले. मित्राने प्रसंगावधान राखून सायकलला टांग मारत यू टर्न घेतला आणि कॉलेजच्या छोट्या गेटमधून सायकल जी दामटली ती रस्त्याला लागून दहा बारा किलोमीटर ती तुफान वेगाने चालवली. मागे मोटरसायकल्सचा आवाज येत होता. त्या कुणाच्या आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्नच केला नाही. या बाईक्स शत्रूच्याच या विचाराने सायकल बुलेट ट्रेनच्या वेगाने चालवून रस्त्यात दिसलेल्या पोलीस चौकीत नेऊनच थांबवली.

हा मित्र दुसरा तिसरा कुणीही नसून साक्षात अस्मादिकच होते.
सिनेमाची स्टोरी काहीशी अशीच आहे. म्हणजे ओमेन मधे बदल करताना मेडच्या जागी एक माणूस दिसणे. हे पात्र गीतकार गुलशन बावरा यांच्यासारख्या दिसणार्‍या असिफ बसरा यांनी रंगवले आहे. जंजीर मधे गुबा होते. या चित्रपटात अब दिसले. त्यांच्या मुळे जसा जंजीर गाजला तसा हा चित्रपटही माईल स्टोन व्हायला हरकत नव्हती.

शेवटी साय फाय (सायकॉलॉजिक फिक्शन) कि शैतानी ताकत हे काही क्लिअर होत नाही. शैतानी ताकत पण अंगात आहे, काळी जादू पण आहे आणि मानसिक स्थिती बिगडल्याने काल्पनिक मित्राचा कन्स्पेट पण अशा एण्डवर चित्रपट संपतो. बहुतेक लेखकाने गुगळून सायकॉलॉजी आ़णि क्राईमचे किस्से वाचलेले असावेत.

शेवटच्या रीळात नायिकेला सांगितलं असावं कि घे अभिनयाची हौस भागवून. आता तुझ्यावरच चित्रपटाची मदार आहे. मग त्यात तिने अंगात आल्यावर दात वाजवून तोंडाने "खिट खिट खिट खिट" असे आवाज काढलेले आहेत. ज्या क्षणाला कुणी तरी खुलासा करतं कि अमूक अमूकला मानसिक आजार आहे त्याच क्षणी आतापर्यंत नॉर्मल असलेलं पात्र लगेच डोळे फिरवतं, विचित्र गूढ हसू लागतं, सेकंदात डोळ्याखाली काजळ येतं हे शास्त्र इथेही पाळलं गेलं आहे. म्हणजेच मॅनर्स पाळलेले आहेत.

एकंदरच द ओमेन वरून प्रभावित या कलाकृतीच्या बाबतीत आज मटण करूया असे म्हणत आळूच फदफदं बनवावं तसा प्रकार झालेला दिसतो. चित्रपटाचे नाव शैतान द ओह मेन होल असे ठेवले असते तरी चालले असते.

टीप : शैतान हे नाव मोठ्या ठळक अक्षरात पाहिल्याने युट्यूबवर हा चित्रपट पाहिला. अनेकदा फसल्यानंतर या फसण्यातही खजिना हाती लागण्याचा अनुभव गाठीशी असल्याने मुद्दामून जाळ्यात शिरायला आवडत असेल तर नक्कीच ट्राय करावा.

रघु आचार्य >>> Lol Lol
ही रत्नं कुठे सापडतात तुम्हांला?

हे एक Lol वाचायच्या आधीच. अमिता नांगिया आणि "निरोब" होसेन म्हंटल्यावर नावापासूनच कहानी की माँग पूरी करण्याचे प्रयत्न दिसत आहेत Happy

बाय द वे, इथेच कोठेतरी वाचून मी "सौ साल बाद" बघायचा प्रयत्न केला १५ मिनीटे. आपल्या तंत्रसामर्थ्याने पाऊस पाडणे, सभेत अपमान, प्रेमप्रसंग व तेव्हाचे संवाद, प्रेमात जालिम जमान्याचा अडथळा व घनघोर मारामारी - या सर्व प्रसंगात जोगिंदर "खूँखार चेहरा" हे एकच एक्स्प्रेशन घेऊन वावरतो.

या सर्व प्रसंगात जोगिंदर "खूँखार चेहरा" हे एकच एक्स्प्रेशन घेऊन वावरतो. >>> हो त्याचा चेहराच डोळ्यापुढं आला . त्याचे हावभाव असे असतात कि या शतकातला सर्वात महान व्हिलन आपण करत आहोत, आणि ते करताना चेहरा फनी दिसणार नाही याची काळजी घेतली पाहीजे.

अमिता नांगिया आणि "निरोब" होसेन म्हंटल्यावर नावापासूनच कहानी की माँग पूरी करण्याचे प्रयत्न >>> Lol
बांग्लादेशी आहे तो.

“ पण एक तर अनुभव नाही, शास्त्रशुद्ध शिक्षण नाही, प्रतिभा नाही आणि बजेटही नाही असे अनेक अडथळे यावेत पण निव्वळ जिद्द आणि जिद्द कशा प्रकारे हाती घेतलेले काम करवून घेते याचे हे आदर्श उदाहरण आहे. ” - इथे आचार्यांचा सगळा ‘दाटून उद्वेग’ आलेला आहे. Happy

“ अमिता नांगिया आणि "निरोब" होसेन म्हंटल्यावर नावापासूनच कहानी की माँग पूरी करण्याचे प्रयत्न” - Lol

हा शैतान सिनेमा नवा आहे का ? अमिता नांगिया चा पहिला सिनेमा इतक्या प्राचीन काळी आला होता की आजकाल ती एखाद्या देवळात प्रवचन ऐकत वाती वळत भाचरांसाठी स्थळे शोधत असेल असे वाटले होते.

सर्व लिहिलेलं भयंकर आहे हे Happy स्वतःला छळायला बघावा की काय एकदा.
हा शैतान वेगळा, आणि एक कल्की चा होता (ज्यात शेवटपर्यंत त्यांना नक्की काय सांगायचंय हे मला कळलं नाही)तो वेगळा , आणि आता गुजराती वश वरून आणलेला अजय देवगण माधवन चा शैतान अजून वेगळा.
या नावाचे बरेच पिक्चर असणार.

९०ज मधल्या चित्रपटांमधे गुंडांनी एखाद्या गरीब घरातून भांडीकुंडी बाहेर फेकून देणे हा कॉमन थ्रेड दिसतो>> भांडीकुंडी घराबाहेर फेकून देणे हा त्या काळी ट्रेनी गुंडांच्या इंडक्शन प्रोग्रॅमचा एक भाग होता.

राज - ए - शैतान>> संपूर्ण पोस्ट कहर आहे Biggrin

ही रत्नं कुठे सापडतात तुम्हांला?>> चित्रपटाचे नाव आणि स्टार कास्ट वाचून मलाही हाच प्रश्न पडला.

चित्रपटाचे नाव शैतान द ओह मेन होल असे ठेवले असते तरी चालले असते> पूर्ण चित्रपटाचे सार Lol

हा शैतान सिनेमा नवा आहे का ? अमिता नांगिया चा पहिला सिनेमा इतक्या प्राचीन काळी आला होता की >> यात ती फुफीजान झालेली आहे.

अस्मिता,फारएण्ड तुमच्या प्रतिसादांची उत्सुकता आहे.
@अनघा_पुणे >> Lol

स्वतःला छळायला बघावा की काय एकदा. >>> मी_अनु , लोकांना छळवादापासून दूर ठेवण्यासाठी टाकीचे घाव सोसण्याचं व्रत घेतलेलं आहे. या मेहनतीवर पाणी फिरलेलं खूप आवडेल. Happy

किती दिवसांनी दिसलात आचार्य, >>> आज सोशलमीडीयात उणीपुरी सोळा वर्षे झाली. या सोळा वर्षात हे वाक्य ऐकायला वाचायला डोळ्यात प्राण आले होते. ( पडीक माणसाला कोण म्हणणार हे असं ?) . चला एक इच्छा पूर्ण झाली याबद्दल आभार. Happy

एक तर अनुभव नाही, शास्त्रशुद्ध शिक्षण नाही, प्रतिभा नाही आणि बजेटही नाही असे अनेक अडथळे यावेत पण निव्वळ जिद्द आणि जिद्द कशा प्रकारे हाती घेतलेले काम करवून घेते याचे हे आदर्श उदाहरण आहे >>>
सीबीआय म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडीया पासून ते छिंदवाडा बीअर इंडस्ट्रीज पर्यंत काहीही असू शकते >>>
गाण्यावर इयत्ता तिसरी तुकडी फ च्या बाईंनी गॅदरींगला " ससा गं सा , कापूस जसा , त्याने कासवाशी पैज लावली" या गाण्यावर डान्स बसावावा >>>
नायक हाणामारी करताना ती रिहर्सल असावी अशी शंका येते. >>>

Lol

यासारखे कोट्स धमाल आहेत. तसेच राजकीय नेता असलेल्या बापाला वकीलबिकील न घेता सहज उचलणे किंवा गोद घेण्याची प्रोसेस वगैरे निरीक्षणे भारी आहेत

त्यांचे अधिकारी अधून मधून पोलीसांना मदत करू शकतातच >>>> हो. ती सीबीआय आहे एसबीआय नाही Happy

काही जण केला तुका अन झाला माका असेही म्हणू शकतात.
अचूक दाखवायला तो माहितीपट थोडीच आहे ?
ससा गं सा , कापूस जसा ,
एक तर अनुभव नाही, शास्त्रशुद्ध शिक्षण नाही, प्रतिभा नाही आणि बजेटही नाही असे अनेक अडथळे यावेत पण निव्वळ जिद्द आणि जिद्द कशा प्रकारे हाती घेतलेले काम करवून घेते याचे हे
बँक ऑफ इंडीया पासून ते छिंदवाडा बीअर इंडस्ट्रीज पर्यंत काहीही असू शकते.
एक एक करून यायचं असतं एव्हढे मॅनर्स नसावेत का ? यामुळेच देश मागे राहतो हे त्यांना ओरडून सांगत होतो पण ते असभ्य भाषेचा प्रयोग करू लागले हे पाहून ज्ञानामृत पाजण्याचा बेत रहीत केला.
हा मित्र दुसरा तिसरा कुणीही नसून साक्षात अस्मादिकच होते.
शैतान द ओह मेन होल असे ठेवले असते तरी चालले असते.

>>>>> Rofl

कहर लिहिले आहे. मजा आली. वाक्यावाक्याला पंचेस आहेत.

तुम जिस स्कूल में खेलते हो , हम उसके आचार्य है' पोस्ट आवडली >> Lol
विनोद खन्नाचा रूबाब आठवला.

अस्मिता, फारएण्ड , आभारी आहे .

धर्मेंद्रचा 'लोहा' बघितलाय का?
मस्त रिलॅक्सींग डायलॉग आहेत. सुरूवातीलाच झलक मिळाली.
लुक्काभाई आणि तांड्याभाई हे दोन आजी-माजी डॉन संघर्षाच्या पवित्र्यात एकमेकांपुढे उभेयत.

तांड्याभाई: भूल गया क्या वो दिन? जब तू दिन में बूट पॉलिश और रात में तेल मालिश किया करता था? और मवाली लोग 'चिकना चिकना' बोल के तेरे पे हाथ फेरते थे. इसके पहले के उनका हाथ गलत जगह पहुंचे, मैंने तेरा हाथ पकडा. दादागिरी की चालचोपडी पढाई. लेकीन तूने मेरे साथ गद्दारी की.

लुक्काभाई: फकीरों का चेहरा लेके जुर्म के शहेनशहा से लडने की कोशिश मत कर. वरना तेरी हालत उस खटमल जैसी होगी जो खून पीने के लिये खटिया के खांचे से दिन में बाहर निकलता है.

तांड्याभाई: तू बकरी का दूध पीके अपने मूंछ के बाल उखाडते रह. मैं चला तेरी गोलबस्ती पे कब्जा करने.

कट टू:
स्थळ गोलबस्ती :
श्री. तांड्याभाई गोलबस्तीवर कब्जा करण्यास गेलेलेयत. परंतु
त्याआधीच लुक्काभाईंनी डाव टाकून आपल्या गुंडाकरवी तांड्याभाईंच्या बहिणीचा अतिप्रसंग व खून तडीस नेलेलाय.

त्यातून मग तांड्याभाई यांस लुक्काभाईंच्या पॉवरचा अंदाज येतो. आणि त्यांस उपरती होते. आत्मग्लानीने पछाडलेले श्री. तांड्याभाई आपोआप सरळ लायनीवर येतात. आणि गयावया करत म्हणू लागतात की, मैं वो सिनेमा का आधा टुकडा हूं, जिसकी किंमत शो खतम होने के बाद दो कौडी की भी नहीं रहती.

तांड्याभाईंचा सदर डायलॉग संपुष्टात आल्यावर लुक्काभाई त्यांस गोळी घालतात व विषय संपवतात.

Pages