चित्रपट भाजणी

Submitted by रघू आचार्य on 28 February, 2024 - 08:48

कधी कधी कसलाही चित्रपट आवडत नाही. मग ठेवणीतल्या चित्रपटांचाच सहारा असतो.
लोक म्हणतात कि त्याची पिसं काढायची असतात. पण हे एक वेगळं मनोरंजन असतं.

तर मायबोलीवरच्या भट्ट्यांमधे खरपूस भाजले जाऊ शकणार्‍या चित्रपटांची चर्चा इथे करू. भाजावासा वाटला तर भट्टीत घालायचा.
दंगा होऊन जाऊ द्यात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरूवात करतो.
१. जितेंद्र, आदित्य पांचोली, रोनित रॉय यांच्या अभिनयाने सजलेली, ए जगन्नाथ यांच्या दिग्दर्शनाने नटलेली के सी बोकाडिया यांची कलाकृती.
तहकिकात
पहिली हाणामारी पाहूनच मन प्रसन्न झालं.
https://youtu.be/IZmMdGi3Uyg?t=120

वरील यू ट्यूब लिंकमध्ये श्री. जितेंद्र यांना फादरच्या गेटअप मध्ये बघून झोप उडाली.
'अगर गांव में किसी ने भी किसी पर जुल्म किया तो मैं चुप नहीं रहनेवाला' - इति पांचोली.
हे छान आहे. म्हणजे स्पेसिफिक अशा कुठल्याही आकृतीबंधात अडकवून घेतलेलं नाही. जुल्म ची संकल्पना एकाच वेळी व्यापक किंवा समजा ढोबळ किंवा तत्सम लिबलिबीत फोपशा स्वरूपाची ठेवलेलीय. त्यामाध्यमातून अनेकानेक संभावनांची क्षितिजं किलकिली झालेलीयत. म्हणजे जो जे पांचोली वांछिल, तो ते लाहो.

Lol परवा मी एक तास 'इलाका' बघितला आणि काल तीन मिनिटे सौतन की बेटी.

'इलाका' मधे भरपूर कलाकार आपापली नेहमीची ठरलेली कामं करून गेले आहेत. सगळे सज्जन सज्जनच आहेत, सगळे दुर्जन दुर्जनच आहेत. मला 'जब वी मेट'च्या करीना सारखं 'अब एक रात में इतना ॲडव्हेंचर बहोत है, बाबाजी. बोअरिंग करदोजी इस रातको' वाटले की मी सगळं स्पष्ट असलेले सिनेमे बघते. इलाका भलताच स्पष्ट आणि मसालेदार आहे.

ओम पुरी, मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त, राखी, धर्मेंद्र, अमरीश पुरी , माधुरी दीक्षित, अमृता सिंग, दलीप ताहील, ए के हंगल.

या नावांवरून व्हिलन कोण ,पोलिस कोण, दारूची भट्टी चालवणारा कोण, पोलिसाचा मुलगा पोलीस आणि त्याची 'नैनमटक्का' पोलिसीण कोण, गरीब शिक्षक कोण, गरीब शिक्षकाची भिकार घागरा ओढणी घालून किराणा दुकान चालविणारी नटी कोण, नवरा गुंडाबरोबर ढिशक्यांव करताना शहीद झालेली माता कोण, गुंडांचा हस्तक कोण, दोन विरूद्ध करीअर पाथ निवडलेले जीवश्चकंठश्च मित्र कोण ओळखा......

आहे की नाही सगळं सुस्पष्ट... Lol
त्यात मिथुन उठसूठ समोरच्याला कमी लेखायला
'तेरे नामका कुत्ता पांलू' म्हणू लागला. ज्याचा एक कुत्रा पालक म्हणून राग येऊन दोन मिनिटांसाठी मनातल्या मनात माझ्याच कुत्र्याचं नाव 'मिथुन' केलं.

Lol

हे असे असले तर मला अपार रिस्पेट येईल या पिक्चर बद्दलः

व्हिलन कोण , - ए के हंगल
पोलिस कोण- माधुरी
, दारूची भट्टी चालवणारा कोण - ए के हंगल (डबल रोलही चालेल. डावीकडून भांग पाडा म्हंटलो असतो पण जाऊदे. मे बी विग लावेल. किंवा मुछे हो तो नत्थुलाल जैसी स्टाइल मिशा),
पोलिसाचा मुलगा पोलीस आणि त्याची 'नैनमटक्का' पोलिसीण कोण, - हे कोण सुचले नाही. मे बी मिथुन स्त्रीवेषात. आमिर खान ने कधीतरी केले होते तसे.
गरीब शिक्षक कोण - दलिप ताहील.
, गरीब शिक्षकाची भिकार घागरा ओढणी घालून किराणा दुकान चालविणारी नटी कोण - राखी (राहू दे. इमॅजिन सुद्धा करू नका. मेरे संजय मिथुन आयेंगे म्हणेल)
, नवरा गुंडाबरोबर ढिशक्यांव करताना शहीद झालेली माता कोण - अमृता सिंग
, गुंडांचा हस्तक कोण - धर्मेंद्र,
दोन विरूद्ध करीअर पाथ निवडलेले जीवश्चकंठश्च मित्र कोण ओळखा..... - अमरिश पुरी व संजय दत्त. एकाला तरूणपणीचा विग किंवा दुसर्‍याला म्हातारपणीचा

हे एक Lol
आणि हे फक्त शेवटच्या ओळीला Rofl .

नैनमटक्का' पोलिसीण कोण>>>> अमृता सिंग होती.
तुझ्या साहसी आईस ब्रेकींग व्हर्जन मध्ये माधुरी दीक्षित नाही. आता मला भिकार घागरा ओढणी बोहारणीला देऊन चहाचं भांडं घ्यावं लागेल. Wink

ता. क.
राखीचे भकास डोळे मला राहूनराहून रश्मिकाची आठवण करून देत होते.

तुझ्या साहसी आईस ब्रेकींग व्हर्जन मध्ये माधुरी दीक्षित नाही >>> हो अमृता व माधुरी मधे टफ फाइट होती (पिक्चर च्या सीन मधे नाही). माधुरीही चालेल. केसाची एक बट ग्रे करून. म्हणजे तिच्या भूमिकेला ग्रे शेड्सही येतील (कलात्मक अर्थाने. ५० शेड्समधल्या नव्हे)

श्री. जितेंद्र यांना फादरच्या गेटअप मध्ये बघून झोप उडाली. >> या वाक्यालाच फुटलो. मलाही जाम हसू आलं होतं.
सुरूवातीच्या फाईट सीन मधे बाई जीव घेऊन पळतेय आणि तिच्या मागे शंभर एक गुंड जीव घेऊन पळताहेत हे दृश्यच पोट धरून हसवणारं होतं. नंतर ती ब्रेक मारून थांबल्यावर सगळे शिस्तीत तिच्या भोवती गोल करतात. मग कवायतीप्रमाणे एक जण हातातले हत्यार उपसतो आणि घाव घालणार इतक्यात दोन अदृश्य हात येऊन त्याला लोळवतात. घाव घालेपर्यंत तो त्या हातांची वाट बघत असतो. बहुतेक त्याला शिट्टी मारून सिग्नल मिळाला असणार.

सर्वात शेवटचा समोरून वार करतो तेव्हां बाईच्या दोन्ही बगलेतून हात येऊन त्या नराधमाचा सफाया करतात. बगलेतून पुढे आलेल्या एका हाताची बंद मूठ उघडल्यावर काय ? खाक नाही सिगारेट ! केव्हढं प्रत्तिकात्मक आहे हे. सिगारेट जळत जळत राख होते. तसा नायक स्वतः जळत इतरांना आनंद देत आहे. सिगारेट तोंडात ठेवून तो पेटवणार, पण नराधम त्याला ते कृत्य करू देत नाहीत. मग पुन्हा पीटीच्या अ‍ॅक्शन्स करत तो चौफेर टोलेबाजी करतो.

पन एक जण लाठीला आग लावतो. शेर आग से डरता है तसा आदित्य पंचोली मागे सरतो. पण नराधम वार करतो तेव्हां तो मॅट्रीक्स पोज मधे त्या जळक्या लाकडाने सिगारेट पेटवतो, इथेच जीवनाचे इप्सित साध्य होते...!!

पुढचा धक्का म्हणजे जितेंद्र फारदच्या आदरणिय रोल मधे. बरं भारतातलं हे गाव बाई बदलचलन आहे म्हणून तिच्या मागे जोरजोरात पळून तिला मारणारं असतं. पण यांचे निवाडे चर्चच्या फादरकडे होत असतात. असं एकही गाव बघण्यात नाही जिथे गावच्या पुजार्यालाही हा मान असेल. जितेंद्रने हा फादरणिय रोल केला म्हणजेच रात्रीचा वेष बदलून तो मारामारी करत असणार यात तीळमात्रही शंका नाही. किंवा मामुट्टीच्या पिक्चरप्रमाणे हा स्वतःच पोलीस कम डिटेक्टिव्ह बनून तहकिकात करून कसलातरी छडा लावणार !

आगे देखते है
हम लोग !

'इलाका' मधे भरपूर कलाकार आपापली नेहमीची ठरलेली कामं करून गेले आहेत. सगळे सज्जन सज्जनच आहेत, सगळे दुर्जन दुर्जनच आहेत. मला 'जब वी मेट'च्या करीना सारखं 'अब एक रात में इतना ॲडव्हेंचर बहोत है, बाबाजी. बोअरिंग करदोजी इस रातको' वाटले की मी सगळं स्पष्ट असलेले सिनेमे बघते. इलाका भलताच स्पष्ट आणि मसालेदार आहे. >> Rofl

ही संपूर्ण पोस्टच धमाल आहे. आज भयंकर हसलो.
येतो पुन्हा सायंकाळी.

बोरिंग करदो जी.

तिच्या भूमिकेला ग्रे शेड्सही येतील (कलात्मक अर्थाने. ५० शेड्समधल्या नव्हे)

डावीकडून भांग पाडा म्हंटलो असतो पण जाऊदे.

राखी (राहू दे इमॅजिनसुद्धा करू नका)
@अस्मिता, @फारएण्ड >>>> Rofl Rofl
अशक्य आहात तुम्ही दोघं.

तरी मला नैनमटक्का पोलिसीण कोण म्हणून कन्फ्यूज झालेलं. पण भिकार घागरा ओढणीमुळे दुकान माधुरीच चालवत असणार ही खात्री पटली.

@अस्मिता >>> तुझ्या डॉगीला आयडेंटिटी क्रायसिस होईल गं Light 1 मागे तू त्याला नारळ म्हणालीस, आता मिथुन… काय हे?

@रआ

सिगारेट जळत जळत राख होते. तसा नायक स्वतः जळत इतरांना आनंद देत आहे. Rofl
आम्ही उगीच ‘झिजूनी स्वतः चंदनाने’ वगैरे म्हणत आलो. सिग्गी इज मच मोअर इनटॉक्झिकेटींग…

असं एकही गाव बघण्यात नाही जिथे गावच्या पुजार्यालाही हा मान असेल.>>>
तुम्ही डेंजर टेरीटेरीत एन्ट्री करताय. तुम्हाला माबोवर ‘बॉयकॉट जितेंद्र’ मोहिम सुरू करायचीय का?

तेरे नामका कुत्ता पांलू' म्हणू लागला. ज्याचा एक कुत्रा पालक म्हणून राग येऊन दोन मिनिटांसाठी मनातल्या मनात माझ्याच कुत्र्याचं नाव 'मिथुन' केलं. >> प्रत्यक्ष आयुष्यात मिथुन आणि राजेश खन्नाची खुन्नस असताना त्याने आपल्या कुत्र्याचे नाव काका ठेवले होते. मिथुनला अनेकांनी नाव किंवा कुत्रा बदल म्हणून सांगितले होते. Lol

. डावीकडून भांग पाडा म्हंटलो असतो >>> Lol

गरीब शिक्षकाची भिकार घागरा ओढणी घालून किराणा दुकान चालविणारी नटी कोण - राखी (राहू दे. इमॅजिन सुद्धा करू नका. मेरे संजय मिथुन आयेंगे म्हणेल) >>> Lol

ए के हंगल बद्दल खासगीत असेच बोलायचो. शक्ती मधल्या अमिताभच्या जागी एके हंगल विग लावून अमिताभचे डायलॉग हाणताहेत. ते ही त्यांच्या " दुनियमे सबसे बडा बोझ होता है, बाप के कंधे पे बेटे का जनाजा " या शैलीत !

मेरे बाप ने दो दो शादी की है हा डायलॉग वरच्या आवाजात इमॅजून पहावा.

अस्मिता, फारएंड >> Lol
सौतन की बेटी, मी चुकून ' सैतान की बेटी ' वाचलं.

तहकिकात - सुरवातीला पळतानाचं बॅकग्राउंड म्युझिकच कसलं विनोदी आहे! ती बाई गुंडांना जितकी घाबरली, त्यापेक्षाही जास्त ते मागून आलेले हात बघून घाबरली. सर्वात कडी म्हणजे सिगरेट पेटवायची स्टाईल ! Lol

मेरे बाप ने दो दो शादी की है हा डायलॉग वरच्या आवाजात इमॅजून पहावा.>>

हंगल च्या आवाजात "मेरी दो दो मां" ऐकू आलं अन् गोपी किशन मधल्या पोराच्या वाकड्या चालीनी रस्त्यातून जाणारे हंगल दिसले...

तुम्ही डेंजर टेरीटेरीत एन्ट्री करताय. तुम्हाला माबोवर ‘बॉयकॉट जितेंद्र’ मोहिम सुरू करायचीय का? >>> नाही नाही. असे काहीच डोक्यात नव्हते. Lol

पहिली हाणामारी पाहूनच मन प्रसन्न झालं. >> ती मारामारी जीन्सपँटचं ब्रॅण्ड च प्रमोशन करावेत ईतके वाईट अ‍ॅन्गल ने शॉट्स घेतलेत Happy

धमाल Lol
'तेरे नाम का कुत्ता पालु' बहुतेक ऐकला होता हा डायलॉग कुणा कडुन तरी. जाम हसलो होतो.

तहकिकात एकदाची पूर्ण झाली.

जितेंद्राला फादरच्या बेड्यात अडकवल्यामुळे तो वाया घालवला अशी खंत थोड्याच वेळात भरून निघते.
बरेच अंदाज होते , जसे कि झुंजार आणि काळा पहाड प्रमाणे जितेंद्र दिवसा फादर रात्री रॉबीनहूड असेल. रात्री हिरॉईनसोबत डान्स सुद्धा करत असेल. पण इथे दिग्दर्शकाने चकवलंच.
दुसरा जितेंद्र ! आहे कि नाही कमाल ?
दोघेही हुबेहूब दिसत असतात. दोघांची संवादफेक,उंची, हेअर स्टाईल, आवाज आणि हावभाव सुद्धा अगदीच सारखे असतात. एक तरी बरे हावभाव करेल तर अजिबात नाही. दुसरा जितेंद्र हा एसपी अरूण कुमार असतो. गंमत म्हणजे दोघेही जुडवा असतात.
एकाचे नाव अरूणकुमार आणि दुसर्याचे नाव फादर फ्रान्सिस !!! ( यांच्या वडलांचे नाव नरीमन बाटलीवाला आणि आईचे नाव सलमा खान असणार यात शंकाच नाही).

चर्चच्या समोर एक मशीद असते. गावातले लोक मात्र फादर फ्रान्सिस कडे सल्ला मसलत, न्याय निवाड्यासाठी येत असतात. जमीनदार भानुप्रताप (डॅनी) सुद्धा फादरचे सल्ले ऐकत असतो. त्याचा एकुलता एक मुलगा रोनीत रॉय हा हाणामार पंटर पीटर (आदित्य पंचोलीच्या) बहीणीच्या प्रेमात पडलाय. दोघेही गाणी म्हणत असतात. गाण्यावरची कोरिओग्राफी म्हणजे शाळेतून मुलं घरी येताना जशी एकमेकांच्या पुढे आडवा पाय टाकत चालतात तशी आहे. अगदीच निरागस.
मेरी घरची गरीब आहे. तिचे वडील कारपेन्टर आहेत. त्यांना मुलाचा राग आहे. पण गावातला मुस्लीम पीटरचा सहानुभूतीदार आहे.
पीटरचा टाका गाव कि गोरी संगीता बिजलानीशी भिडला आहे. तिची आई (आशा शर्मा) ही बघताक्षणीच असहाय्य अबला आहे. तिने संवाद म्हटले नाहीत तरी सहानुभूती तिलाच मिळणार असा करूण चेहरा तिला लाभलेला आहे.
त्यात तिच्या पतीचे निधन झालेले असल्याने जमीनदाराचा गुंड ( महेश आनंद) तिच्या घरातली भांडी बाहेर आणून ठेवत आहे. घरात काहीही नाही हे आपल्याला यावरून समजते. पण हंड्याला लाथ मारताक्षणी तिथे पीटर प्रकटतो आणि मग दे दणादणा.
आता घर भानुप्रतापचं आहे. या बाईने बरेच दिवस भाडे भरलेले नाही. तर मग डेनी तरी काय करणार ? पण आपला हिरो त्याकाळच्या गरीबांच्या मसीहा असल्याने " ये गरीब मां, कहा जायेगी" असा प्रश्न विचारतो.
इथेही फादर पुन्हा मधे पडत भानुप्रतापला दुसरे घर घेऊन द्यायला सांगतात.
मग संगीता बिजलानी गाव कि गोरीच्या गेट अप मधे दोन वेण्या ( त्या ही आडव्या, कानाच्या जवळ केसाला गाठ मारून ) घालून, त्या समोर घेऊन , सारख्या दोन्ही हातात घेऊन नको नको करून सोडत असते . आता एकाच गावात पीटरची बहीण मेरी ही function at() { [native code] }यंत गरीब असतानाही मॉडेल सारखी राहतेय. मेरी म्हणजे ड्युप्लीकेट माधुरी दीक्षित फरहीन खान जी साऊथला बिंदिया होती. मेरी पीटरची बहीण. बहीण इतकी मॉडर्न असताना पीटरला एकदम गावठी संगीता बिजलानी आवडलीय. ज्या ग्रामीण मुली असतात त्या गावच्या राहणीत सुद्धा आब राखून असतात. पण रॅम्प वॉक करणार्या ललना एकदा का गाव कि गोरी झाल्या कि मग त्यांचा अल्लडपणा मेंदूत गिरमीट फिरवत राहतो.

यांनाही गाणी आहेत.
अनु मल्लीक ने निर्मात्याला बहुतेक सांगितले असणार " ये डबल मीनिंगवाला गाना सुपरहीट होगा. देखना लोग शादी मे बजाएंगे, हनीमून मे भी बजाएंगे" . एव्हढ्या ग्यारण्टीमुळे अशी सपक चार आणखी गाणी त्याने पाडलीत.

गाव पण इतकं अष्टपैलू आहे कि गावात शिमल्याचे प्रसिद्ध चर्च आहे. म्हणजे हे डोंगरावर असणार. थोडं पुढे गेलं कि गोव्याचा समुद्र पायथ्याला लागतो. गाणं म्हणायला झाडीत गेलं उटीचं झील लागतं. वरून लोळत लोळत पडताना पाचगणीचा फेमस पॉईण्ट सुद्धा याच गावात दिसतो. या गावातल्या लोकांना कुठेही जायला नको. हिमालय, हिमालयाच्या पायथ्याला अरबी समुद्र.
इतकेच नाही शेवटी तर मारामारी करता करता ते मुंबईच्या भाऊच्या धक्क्याला पोहोचतात. आय मीन हा पण त्या गावाला लागूनच आहे.
लेखक आणि दिग्दर्शकाला भूगोलाचे प्रोफेसर म्हणून तत्काळ नोकरी देण्यात यावी असा आदेश मोदीजींनी काढावा ही विनंती.

बाकी रहस्य हे योगायोगानेच उलगडतं.

जितेंद्र एसपी असला तरी पोलीस काही त्याचे ऐकत नसतात. त्यामुळे एसपीला एकट्याला गुंडांच्या अड्ड्यावर जाऊन फायटिंग करावी लागते. त्या वेळचे जितेंद्र, मिथुन,धर्मेंद्र हे राष्ट्रपती असते तरी हे भोग काही चुकले नसते बिचार्यांना.

मधेच जितेंद्राचे भूत, लक्ष्याची कधीतरी जमेल या आशेवरची कॉमेडी , मेहमूद चुकून फिरत फिरत सेटवर आल्यासारखा त्याचा वावर, गुड्डी मारूती चे रटाळ विनोद अशा वळणावळणाने जाऊन एकादाचा चित्रपट संपतो.

यात मेरी आणि फादरचा जीव मात्र जातो.
शेवटी ते दोघेही जिवंत असल्याचा खुलासा होईल हा अंदाज ही दिग्दर्शकाने चुकवला. यावरून दिग्दर्शक चतुर आहे हे सिद्ध होते.

हा चित्रपट पूर्ण बघितला त्याबद्दल चिकाटीला सलाम!
अगदी खरपूस भाजला गेला आहे Lol
आशा शर्मा - अगदी अचूक निरिक्षण.

खूप सहनशक्ती आहे रघू आचार्य तुमच्या कडे.मी मेरी, आणि तिचा जेरी यांच्या नाचपर्यंत चं बघू शकले सिनेमा. मेरी गरीब घरकी असल्यामुळे तिचे सगळे ड्रेस वरून कमी पडलेले किंवा खालून कमी पडलेले आहेंत.गावच्या काठी घेऊन साडीवाल्या बाईच्या पाठी पडलेल्या संस्कृती रक्षकांना गरीब मेरी च्या काट छाट कापडांबद्दल काहीही objection नाहीये.आणि पहिल्या हाणामारीत पीटर च्या क्लोज उप शॉट ला पीटर च्या डोळ्याला मेरी च्या मेकअप बॉक्स मधलं रूज काजलसारखं लावलं आहे, बास एवढंच बघून मी डोळे मिटून झोपी गेले काल.

ती बाई गुंडांना जितकी घाबरली, त्यापेक्षाही जास्त ते मागून आलेले हात बघून घाबरली. सर्वात कडी म्हणजे सिगरेट पेटवायची स्टाईल ! >>> @ अनघा_पुणे, सिगारेट मुळेच आख्खा पिक्चर बघितला. Happy

मेरी गरीब घरकी असल्यामुळे तिचे सगळे ड्रेस वरून कमी पडलेले किंवा खालून कमी पडलेले आहेंत.गावच्या काठी घेऊन साडीवाल्या बाईच्या पाठी पडलेल्या संस्कृती रक्षकांना गरीब मेरी च्या काट छाट कापडांबद्दल काहीही objection नाहीये.आणि पहिल्या हाणामारीत पीटर च्या क्लोज उप शॉट ला पीटर च्या डोळ्याला मेरी च्या मेकअप बॉक्स मधलं रूज काजलसारखं लावलं आहे, Lol

ती मारामारी जीन्सपँटचं ब्रॅण्ड च प्रमोशन करावेत ईतके वाईट अ‍ॅन्गल ने शॉट्स घेतलेत >>> Lol

येऊ द्या पुढच्या सिनेमाची लिंक.

अरे, पण काय हा माज! तो चार पाच झुरके घेऊन सिगरेट थुंकून टाकतो. नव्हती एवढी भूक, आपलं तल्लफ, तर कशाला उष्टी करायची आणि टाकून द्यायची?

आम्ही एकदा फॉरिनात गेलो होतो. तिथे एक सिगार विकत घेतली. थोडी पिऊन झाल्यावर ऍश ट्रे मध्ये विझवून टाकली. ते बाजुला उभ्या असलेल्या एकाने पाहिले. तो म्हणाला तुम्हाला एवढी तल्लफ नव्हती तर टाकून का दिली. विझवुन रुमालात बांधुन खिशात ठेवायची. आम्ही दुर्लक्ष करत म्हटले आमच्याच पैशाने घेतली होती ना.
ते ऐकून त्याने लगेच एक फोन केला आणि काही ऑफिसर्स तातडीने आले. त्यांनी ती टाकलेली अर्धी सिगार पाहिली आणि सांगितले इथल्या कायद्या प्रमाणे असे काही वाया घालवणे चालत नाही. तुम्हाला शंभर डॉलर्स दंड करण्यात येत आहे. आम्ही दंड भरून जाऊ लागलो तर त्यांनी थांबवले आणि ती अर्धी सिगार एका पाकिटात घालून आम्हाला दिली आणि सांगितले की तल्लफ येईल तेव्हा हीच ओढून संपवा मगच दुसरी विकत घ्या.
केवढी जाणीव आहे ना त्यांना काहीही वाया घालवु नये याची! नाहीतर आपण!

(अवांतराबद्दल क्षमस्व.)

अचाट अ तर्क्य धाग्याची आठवण आली Lol मज्जा चालुये.
अस्मिता, फारेंड सहीच..
जितेंद्रने हा फादरणिय रोल केला म्हणजेच रात्रीचा वेष बदलून तो मारामारी करत असणार यात तीळमात्रही शंका नाही.>>> Rofl

दोन मिनिटांसाठी मनातल्या मनात माझ्याच कुत्र्याचं नाव 'मिथुन' केलं>>> अगं काय? Lol

गरीब शिक्षकाची भिकार घागरा ओढणी घालून किराणा दुकान चालविणारी नटी कोण - राखी (राहू दे. इमॅजिन सुद्धा करू नका. मेरे संजय मिथुन आयेंगे म्हणेल)>>> Rofl आज चा दिवस हास्यात सफल!

दोघेही हुबेहूब दिसत असतात. दोघांची संवादफेक,उंची, हेअर स्टाईल, आवाज आणि हावभाव सुद्धा अगदीच सारखे असतात. एक तरी बरे हावभाव करेल तर अजिबात नाही. हा हा हा हा हा हा .....।

गद्दार
इ.स. १९९५
सुनील शेट्टी, हरीश कुमार, सोनाली बेंद्रे.
मोहन जोशी उर्फ गुजरालशेठ - सुनीलचे वडील.
आलोकनाथ - सोनालीचे वडील.
रिमा लागू - हरीशची आई.
किरण कुमार - प्रोफेसर नाग.

हाणामारीची चॅम्पियनशिप जिंकलेला सुनील.‌ त्या खुशीप्रीत्यर्थ एक पार्टी आयोजित करणारे गुजरालशेठ. सुनीलला आहे बापाविषयी तिरस्कार. परंतु पोरानं पार्टीत यावं आणि जबरदस्तीने एंजॉय करावं असा गुजरालशेठची तळमळ. सुनीलला शोधण्यासाठी माणसं पाठवलीयेत शेठनी.

सुनील आहे हरीशच्या घरी. सुनील श्रीमंत तर हरीश गरीब, अशी क्रांतिकारक मैत्री आहे.
सुनील हे आईविना वाढलेलं पोर. त्यामुळे त्यास रिमामातेच्या मायेचा लळा. सध्या तो हरीशच्या घरीच आनंद सेलिब्रेट करतोय. परंतु रिमामाता सांगते की आनंद सेलिब्रेट करायला तू पहिल्यांदा तुझ्या वडिलांच्या पार्टीला जायला हवे होते. ते तिकडे वाट बघतायत. मगच सुनील जातो. मातृभक्त आहे सुनील.

कु. सोनाली ही नेपच्यून कॉलेजमध्ये शिकत आहे. सुनीलला ती सहज दिसते आणि त्यास लव होते. लवगुरू हरीश याच्या सल्ल्यानुसार सुनील तडक प्राचार्यांना भेटतो आणि त्या कॉलेजात ॲडमिशन घेतो.‌
तिथेच प्रोफेसर नाग बसलेले आहेत. ते तत्वनिष्ठ, गुरू टाईपचे इसम आहेत. ते फॉर्मवर वडिलांचं नाव नाही, हा आक्षेप घेतात. परंतु प्राचार्य हा आक्षेप खोडून काढतात. आणि म्हणतात की 'सुनीलसारखा बॉक्सिंग चॅम्पियन आपल्या कॉलेजात आल्यावर आपला खूप फायदा होणारे. आणि सुनील गुजरालशेठचा पोरगा असल्याचे मला लगेच कळाले आहे. त्याला प्रवेश नाकारला तर आपल्या सगळ्यांच्याच पोटावर पाय येईल.' प्राचार्य तत्वनिष्ठ नाहीत. ते प्रॅक्टिकल विचारांचे आहेत. ह्या प्राचार्यांना मला एकदा गुटख्याच्या जाहिरातीत बघितल्यासारखं वाटतंय. असो.

गुजरालशेठना नेपच्यून कॉलेजात ड्रग्ज पसरवायचेत. परंतु
ड्रग्जचा सुळसुळाट रोखण्यासाठी सोनाली पर्वतासारखी ठाम उभी आहे. ती तिथेच विद्यार्थीनी म्हणून काम करते.
गुंडालोक कॅन्टीनच्या जेवणातून ड्रग देण्याचं नियोजन करतात. मुलखा-महागाचे ड्रग्ज सगळ्यांना जेवणातून वाटणारे ड्रगमाफिया आजकाल सापडणार नाहीत.‌ परंतु त्याकाळी ते होते, असे दिसते.

तर सोनाली फूड क्वालिटी कंट्रोल ऑफिसरला बोलावते चेकींगला. म्हणजे एक डंगरा मनुष्य सुटकेस घेवून येतो आणि एक चमचा भाजीची चव घेऊन बघतो. तेवढ्यात कॅंटीनवाला त्यास पैशे देऊन त्याची मूठ गरम करतो. डंगरा ऑफिसर लगेच एका कागदावर खोटा रिपोर्ट तयार करतो. असा सगळा भ्रष्टाचार माजलेलाय.!
हरीश हे बघतो आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण हे जेवण फोरेन्सिक लॅब मध्ये नेऊ.‌ तिथंच न्याय मिळेल. हरीशमधल्या नेतृत्वगुणांची ही चुणूक सोनालीस दिसते आणि तिला तत्क्षणी त्याच्या प्रेमात पडावं वाटतं. हयगय कसली?

सुनील आणि प्रोफेसर नागचं भांडण कम् धराधरी. प्रोफेसर नाग सुनीलची मानखंडना करतात. मित्राच्या अपमानामुळे हरीशचा दिल दुखतो. तो विद्यार्थ्यांचा स्ट्राईक पुकारतो. मधल्या काळात हरीश कॉलेजचा जीएस झालेलाय, बाय द वे.
त्या स्ट्राईकमुळे गरीब विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असतं. ज्ञानापासून वंचित राहत असतात विद्यार्थी.‌ परिणामी एका गरीब विद्यार्थ्यांनं आत्महत्येचा प्रयत्नही केलाय. तो आचके देत हॉस्पिटलमध्ये पडलाय.
त्याचे आईबाप हॉस्पिटलमध्ये धावतपळत येतात. ओव्हरॲक्टिंग फारच करतात. जो दिसेल त्याला मिठी मारत 'कहां है मेरा बच्चा?' 'बचाओ मेरे बच्चे को' 'क्या हुआ मेरे बच्चे को?' वगैरे ओरडत सगळ्यांना दचकवत मोठा हलकल्लोळ उडवून देतात.‌

सोनाली हरीशला खडसावते. लेक्चर झाडते. गुरूचं महत्व पटवून देते. हरीशच्या सद्सद्विवेकास आवाहन करते. तिथे एक पाचेक मिनिटांचा सलग डायलॉग आहे. डायलॉग संपवता संपवता तिला धाप लागलेलीय. हरीश स्ट्राईक मागं घेतो.

अशा प्रकारे सोनालीही हरीशला मिळाली. आणि तिकडे हरीश हिरो होऊन बसला. मग आपल्या सुनीलला ह्यात काय मिळालं? काईच नाही. परिणामी सुनील इकडे क्रुद्ध.
गुजरालशेठला हे सहन होत नाही. ते कॉलेजात जाऊन प्राचार्य आणि प्रोफेसर नागची गचांडी धरतात.
हरीशच्या घरादारावर संकटांची मालिका कोसळवतात.
हरीशच्या बापावर चोरीचा आळ येतो. तो जेवणाच्या डब्यातनं कसल्यातरी वायरी, नटबोल्ट आणि खिळे चोरून नेताना सापडतो. खोटा आळ..!
गुजरालशेठचे गुंड भांडीकुंडी, पिठाचे- तांदळाचे डबे, ताटं वाट्या, बादल्या वगैरे घराबाहेर फेकतात. सौ. रिमामाता धाय मोकलून विनंत्या करते की, 'जरा थांबा. माझा नवरा आत्ता फॅक्टरीतनं पगार घेऊन येईल आणि तुमची थकबाकी देऊन टाकेल.'
परंतु दुष्ट गुंड काही ऐकत नाहीयेत.‌ आणि तिकडे नवऱ्याची नोकरी तर ऑलरेडी गेलेलीच आहे चोरीच्या आरोपामुळे.

सुनील-हरीश या दोन मित्रांचे दिल आता दुरावलेत. भीषण दरी पडलेलीय संबंधांमध्ये. सोनालीस हे पाहवत नाही. तर ह्या दोन दिलांना जोडण्याचं काम ती करणार आहे.

हरीश सोनालीस सांगतोय की तू सुनीलवरच प्रेम कर.‌ माझ्यावर प्रेम नको करू.
ह्यामध्ये खरंतर सोनालीची कुचंबणा होतेय. स्त्रीचं मन, यू नो..? कोमल वगैरे..! परिणामी आता ती जीव देण्यासाठी एका दगडावर उभी. तेवढ्यात हरीश येऊन तिला सावरतो.
नेमकं त्याच वेळी सुनील हे बघतो. ओह् नो..! ह्यामुळे गैरसमजास वाव मिळतो. सुनीलचं प्रेमभंगाच्या आगीत तडपणं गुजरालशेठला बघवत नाही. बापाचं हृदय. कसं मऊ..! कसं मायाळू..! परंतु गुजरालशेठ पोराच्या आगीत तेल ओतताना दिसताय.

हरीशवर आता ड्रगडीलर असल्याचा आळ आलेलाय. आणि त्यास तुरुंगात डांबलंय.
इकडे सुनील हरीशच्या बहिणीचं परस्पर लगीन लावून टाकतोय. कारण हरीश ड्रग डिलर असल्याचं सगळीकडे कळालं तर मग बहिणीच्या लग्नाला प्रॉब्लेम येणार असतोय.‌ लग्न म्हटलं की विदाई, रडारड वगैरे सगळं ओघानं आलंच.

सोनाली आलोकनाथला विनंती करतेय की माझ्या हरीशला सोडवा.‌ माझं त्याच्यावर लव आहे. परंतु आलोकनाथ बाप असल्यामुळे तो सोनालीस कोंडून घालतो‌.

प्रोफेसर नाग हाणामारी करून हरीशला जेलातनं सोडवतात. ते कॉलेजमधलं कामधाम सोडून ह्या पोरासोरांच्या मागंच फिरत असतात.‌

हरीशकडून दरवाजा तोडून सोनालीची सुटका.‌ आलोकनाथ आडवा येतो, पण हरीश त्यास धक्का मारून सोनालीस घेऊन जातो. सोनालीही आनंदानं जाते.‌ मागं उरतो बाल्कनीतून पोरीला आर्त हाका मारणारा आलोकनाथ..!

आता हरीश सोनालीला पुरानी हवेली नामक स्थळी घेऊन चालला आहे.‌ त्याचा इरादा वाईट आहे. मनात पाप आलेलं आहे.‌ म्हणजे तसं तो सुनीलला फोन करून सांगतोय. सुनील चवताळतोय. आणि दारू निम्म्यावर सोडून ताडकन निघतो. मग हाणामारी.

मग सुनील सोनालीची थेट एंगेजमेंटच..! आलोकनाथ गुजरालशेठ वगैरे दोन्हीकडची मंडळी सजून धजून आलेलीयत.
सुनीलला अंगठी घालण्याआधी सोनाली थबकते. डिक्लेअर करते की तिचं खरं प्रेम कुणावर आहे ते. हे रहस्योद्धाटन करायला फारच उशीर केला तिनं.
आता ह्या समारंभाचा, लॉनचा, साऊंड सिस्टीमचा, लाईटींग, मांडव, दारू, जेवणावळी वगैरेचा खर्च कोण देणार? आलोकनाथ?

ह्यात हिरो आहेत दोन आणि हिरॉईन एकच आहे.‌ सोनालीच्या दिलाचा तराजू आलटून पालटून दोघांच्या बाजूनं झुकतो. तिचं प्रेम नेमकं कुणाला मिळणार हे अनिश्चित.‌ सस्पेन्स कायम राहतो.‌ त्यामुळे शेवटी कुठूनतरी एक गोळी सुटेल आणि एकमेकांना वाचवण्याच्या नादात दोघांपैकी एका हिरोला मरावं लागेलसं वाटतं.

मुलखा-महागाचे ड्रग्ज सगळ्यांना जेवणातून वाटणारे ड्रगमाफिया आजकाल सापडणार नाहीत..>>>>
संप्रति धमाल पोस्ट. आता एवढा पाहिलात तर उरलेला पण बघून टाका आणि नक्की सांगा की मेलं कोण? की हरीश किंवा सुनील हाच चॉईस असल्याने सोनालीच आत्महत्या करते.
जमलं तर कथेचा व नावाचा काय संबंध तेही उलगडून सांगा.

Pages