आमचे अनोखे खेळ

Submitted by मनीमोहोर on 22 February, 2024 - 02:06

तरुण मुलांना हे सगळं रिलेट होणं कठीण आहे पण आमच्या लहानपणी आम्ही काय खेळत होतो, शून्य साहित्यातून ही आम्ही खेळाचा आनंद कसा घेत होतो त्याची ही गोष्ट. तुमचे ही असे काही स्पेशल खेळ आणि आठवणी असतील तर ते ही इथे लिहा.

आमचे अनोखे खेळ

लहान मुलांचे हल्लीचे खेळ आणि त्यांची मनोरंजनाची अनेक साधनं बघितली की नकळतच मला आमच्या लहानपणीचे खेळ आठवतात. हल्लीचे भारी भारी आणि संख्येत प्रचंड खेळ पाहून मनातल्या मनात तुलना ही केली जातेच. अर्थात हेवा वगैरे नाही वाटत कारण आमच्या वेळी आम्ही जे खेळ खेळत होतो ते सगळे तेव्हा आम्हाला ही आवडत होतेच. तसेच आमचं लहान गाव, दोन्ही बाजूला अंगण, आजूबाजूला झाडी , तेव्हाचे शांत , निवांत , गाड्यांची रहदारी नसलेले रस्ते ह्या मुळे खेळाच्या साधनांची उणीव आहे हे जाणवलं ही नाही.

धावाधावी, लंगडी , कांदेफोडी लपाछपी, चोर पोलीस, साखळी, दगड की माती, खांब खांब खांबोली, तळ्यात मळ्यात, शिवाजी म्हणतो अश्या खेळांना काही ही साहित्य लागत नसे. कधी छानसा फरशीचा तुकडा मिळाला तर आट्यापाट्या किंवा नारळाची करवंटी घेऊन डबा ऐसपैस खेळायला खुप मजा यायची. आमचे बहुतांश खेळ हे असेच काहीतरी घरातलच किमान साहित्य किंवा नो साहित्य लागणारे असेच असत. त्यामुळे लगोरी ही आम्ही फार खेळत नव्हतो कारण त्यासाठी चेंडू लागत असे.

शिकेकाईच्या शेंगा हलकेच उखळात कुटून घेऊन आई त्यातील बिया आधी मोकळ्या करून घेऊन त्या निवडत असे. मगच त्या शेंगा कुटून घेऊन त्यात लिंबाची साल , गवला कचरी वगैरे मिसळून सुगंधित शिकेकाई घरच्या घरीच तयार होई. तर त्या शिकेकाईच्या वेगळ्या काढलेल्या गुळगुळीत , छोट्या छोट्या काळ्या बिया घेऊन आम्ही “ एकी का बेकी” नावाचा खेळ खेळत असू. प्रत्येकाकडे काही बिया असत आणि समोरच्या भिडूने एकी का बेकी हे आधीच गेस करून सांगायचं. मग दोन दोन बियांच्या जोड्या लावायच्या आणि शेवटी एक बी उरते की नाही ह्यावर एकी का बेकी आणि कोण जिंकला हे ठरत असे. तसं बघायला गेलं तर काय होतं त्या खेळात पण आम्ही तासनतास तो खेळ आवडीने खेळत होतो.

सायकलचा निकामी झालेला टायर जर कधी मिळालाच तर तो न पाडता फिरवायचा खेळ ही खुप रंगत असे. पावसाळ्यात अंगणातल्या चिखलात “ तार रोपी “ हा छत्रीची तार चिखलात रोवत रोवत पुढे जाण्याचा खेळ तर पावसाची सर आली तरी बंद पडत नसे. तार चिखलात उभी न राहता पडली की आऊट अस साधं समीकरण होतं. पाऊस फारच मुसळधार असेल तर घरातल्या घरात सागरगोटे खेळायला ही मजा येई. जनरली सागरगोटे आम्ही मुली मुलीच खेळायचो . मुलांचा सहभाग वरच्यावर आमचे सागरगोटे झेलणे किंवा सागरगोटे पळवणे इत्यादींनी आम्हाला चिडवण्याचाच असे फक्त. Happy . दुपारच्या वेळी जेव्हा अंगणात खेळायला मनाई असायची तेव्हा “ नाव गाव फळ फुल” हा डाव खुप रंगत असे. एखाद्या विशिष्ट अक्षरावरून सुरू होणारी मुला मुलींची, फळाची, फुलाची , गावाची, सिनेमाची वैगरे नाव पटापट लिहून जास्तीत जास्त स्कोअर होईल तो जिंकला असा तो खेळ होता.

आता तुम्हाला खोटं वाटेल पण बांगड्यांच्या काचेचे तुकडे गोळा करणे आणि रस्त्यावर पडलेली सिग्रेटची रिकामी पाकिट गोळा करणे हे दोन्ही फारच पॉप्युलर होतं तेव्हा. नंतर मैत्रिणींशी ह्या गोष्टी एक्सचेंज ही केल्या जात. वर्ख वाल्या बांगडीच्या मोठ्या तुकड्याला जास्त भाव मिळत असे. मला आठवतंय सिग्रेटच्या पाकीटात पिवळा हत्ती हा आमच्या जगात सर्वात स्वस्त ब्रँड होता आणि एक कॅपस्टन म्हणून खुप मौल्यवान ब्रँड होता. पंधरा वीस पिवळ्या हत्तींना एक कॅपस्टनच पाकीट मिळे. मात्र सिगरेटच नाव ही घेतलेलं घरात वडिलांना चालत नसे आणि बांगडीची काच हाताला लागेल म्हणून आई काचा गोळा करायला परवानगी देत नसे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी चोरी छुपेच आम्हाला जमवाव्या लागत असत.

आमच्या घरी वडिलांना वाचनाचं वेड होत आणि ते आम्हाला ही वाचनासाठी प्रोत्साहन देत असत. गावातल्या सार्वजनिक वाचनालयाचे आम्ही सगळेच जण सभासद होतो. त्यामुळे आमच्या घरी एकावेळी चार पाच पुस्तके तरी असत. मराठी वाचनाची गोडी त्यामुळेच लागली मला. आम्हा सर्वच भावंडांच वाचन खुप होतं. अगदी श्रीमान योगी सारखी मोठी मोठी पुस्तकं ही आम्ही लहानपणीच वाचली आहेत. नंतर नंतर इंग्लिश पुस्तकं जास्त करून फिक्शन खुप वाचली. खेदाची गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळात मात्र माझं वाचन खूपच कमी झालंय.

पावसाळ्यात मेंदीचा पाला तोडून स्वतः हाताने वाटून ती लावण्याचा कार्यक्रम एखाद्या शनिवारी मुद्दाम ठरवला जायचा. सणासुदीला त्या त्या सणा प्रमाणे फुल गोळा करून हार तोरणं करणे, पत्री गोळा करणे, दिवाळीत ठिपक्यांचा कागद , कंदील स्वतः करणे, संक्रांतीला पतंग आणि होळीला पळसाच्या फुलांपासून रंग करणे, उन्हाळी कामात आणि दिवाळी फराळ करायला आईला वर वरची मदत करणे, असा सिझनल विरंगुळा मिळत असे. वडील कधीतरी चार सहा महिन्याने एकदा आमच्या गावात असलेल्या टुरिंग टॉकीज मध्ये म्हणजे वरून आकाश दिसणाऱ्या थिएटर मध्ये सिनेमाला नेत असत, ते थ्रील पुढे महिना दोन महिने सहज पुरत असे. तसेच आपण न पाहिलेल्या तीन तासाच्या सिनेमाची स्टोरी मैत्रिणीकडून ऐकणे ह्यात पाच सहा दिवस सहज जात असत. Happy

माझ्या वडिलांच्या एकंदर विचारांवरून आणि त्यांच्या मुल्यांवरून मला आता नवल वाटत पण मे महिन्याची सुट्टी सुरू झाली की ते पत्त्यांचा एक कॅट आम्हाला आणून देत असत. जून मध्ये शाळा सुरू होई पर्यंत आम्हाला पत्ते खेळण्याची परवानगी होती. एकदा शाळा झाली सुरू की पुढल्या वर्षीच्या उन्हाळी सुट्टी पर्यंत पत्ते बंद. आम्ही सुट्टीत अक्षरशः पत्ते कुटत होतो. जसे भिडू असतील तसे लॅडीस, झब्बू, सात आठ, मेंढी कोट, मार्क डाव, चॅलेंज असे अनेक डाव रंगत. कधी कधी माझे आई वडील ही खेळायला येत असत आमच्या बरोबर. त्या आठवणी अजून ही मनाला आनंद देतात. कोणीच नसेल खेळायला तर पेशंस किंवा पत्त्यांचा बंगला बांधणे हे ही आवडत असे. पत्ते खेळताना चोरून दुसऱ्याचे पत्ते बघणे, खाणाखुणा करणे , आरडा ओरडा ह्याला ही ऊत येई. त्याची परिणीती भांडणे, पत्ते फेकणे, ते हरवणे होत ह्यात असे. एखादा पत्ता हरवला तर दुसरा कॅट मिळणं शक्यच नव्हतं. त्यावर उपाय म्हणून जोकरला त्या हरवलेल्या पानाच चित्र काढून वेळ भागवली जाई आणि खेळ पुन्हा सुरू होई.

लहानपणी आम्हाला फार कमी साहित्य आणि साधनं उपलब्ध होती पण त्यातून ही आम्ही स्वतःची करमणूक स्वतः निर्माण केल्याने लहानपण मजेतच गेलं. आम्हाला ही विकतचे रेडिमेड खेळ मिळाले असते तर कदाचित जास्त मजा आली ही असती. असो. आता मात्र जागतिकीकरण, स्त्रियांच्या नोकरीमुळे वाढलेलं उत्पन्न, लहान कुटुंब , वस्तूंची सहज उपलब्धता, बदललेली जीवनशैली आणि विचारसरणी ह्या सगळ्यामुळे काळ एकशे ऐंशी अंशात बदलला आहे. अशी शून्यातून करमणूक निर्माण करण्याची गरज अजिबात उरलेली नाही. तरी ही मुलांना अश्या गोष्टी करायला अधून मधुन प्रेरित केलं तर हे खेळ टिकून ही राहतील आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाची अनुभूती मुलांना ही घेता येईल.

हेमा वेलणकर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न आलेला आत्मा 'नो'वर कसा जाईल?! >> Lol

खेळ सुरु व्हायच्या आधी सुटताना आम्ही जास्तीची मेजॉरिटी म्हणायचो , म्हणजे जास्तीत जास्त हात ज्यांचे सुलटे किंवा उलटे ते सुटले. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे कमीची पण मेजॉरिटीच म्हणायचो Happy कधी विचारच नाही केला कि आपण काय बोलतोय. आता खरच हसायला येते आठवले कि.

एका कागदावर १ ते १५ आकडे लिहायचे तीन रो मध्ये आणि उजवीकडे खाली कोपऱ्यावर एक घर काढायचे. पेन्सिल घेऊन खेळायचा हा गेम. बाकीच्यांनी नंबर्स सांगायचे त्या नम्बरवरून दुसऱ्या नम्बरवर रेषा जॉईन करायच्या . एकावर एक रेष न काढता १ ते १५ आकडे सांगितल्याप्रमाणे जॉईन करायचे . सुरवातीला सोप्पा वाटतो गेम पण नंतर नंतर कठीण होतो. आकडे उलटे सुलटे सांगितले कि शेवटी खूप कमी जागा उरते . आणि सगळे आकडे टच करून झाले कि पुन्हा घरात जायचे. मुलीसोबत हा गेम सध्या खेळते. आवडतो तिला.

अजून एक बैठा खेळ म्हणजे रांगोळीसारखे ठिपके काढायचे आणि ते जोडत जायचे . दोघांमध्ये खेळायला मजा येते. एकदा आपली टर्न तर एकदा दुसऱ्याची. शेवटी शेवटी जो चौकोन पूर्ण करेल त्याने तिथे स्वतःचे initial लिहायचे . जास्त घरं ज्याची होतील तो जिंकला

@सामी,आम्ही पण खेळायचो तुम्ही सांगितलेले दोन्ही खेळ. आम्ही जास्तीची मेजॉरिटी कमीची कमिटी असं म्हणायचो, काहींच्या काहीच Lol
अजून एक खेळ म्हणजे राजा राणी चोर शिपाई, चिट्ठ्या आणि त्यात त्यांचे मार्क Happy गडी वाढत गेले कि राजपुत्र, राजकन्या, प्रधान, हवालदार अशी character वाढवायचो, आमटीत पाणी घातल्यासारखी. चोराला हवालदार किंवा पोलिसाने ओळखलं तर त्याचे मार्क त्याला मिळायचे नाहीतर त्याचे मार्क चोराला जायचे आणि चोराचे शून्य पोलिसाला आणि हवालदाराला.
व्यापार पण खेळायचो पण त्याला पूर्ण दिवस एकाठिकाणी बसावं लागायचं. ते जरा जड जायचं

चोर पोलीस पकडा पकडी पण खेळायचो खूप, त्यात जिवंत पणा आणायला, चोर सापडला कि त्याचे हात दोरीच्या उड्या वाल्या दोरीने बांधून आणायचो Lol क्रीटीव्हिटी ची हद्द

दोरीच्या उड्या खेळायचो, त्यात सिंगल पायाची, डबल पायाची, उलटी उडी असे उड्यांचे प्रकार होते त्याची रेस करायचो. कोण पाहिलं अडखलतंय अशी

खूप खूप मस्त लेख आणि प्रतिसाद.
कितीतरी प्रतिसाद वाचून वाटले, खरच की, हे खेळलो आहे Happy बिया घासून चटके देणे, काडी पेटी चा फोन, पट्कन सार्‍या आठवणी जाग्या झाल्या!

माझे दोन पैसे, कोणी अजून खेळले असेल असे वाटत नाही Lol पावसाळ्यात खाली मैदान ओले असले की आम्ही मजल्यावर खांब खांब खेळायचो. सॉर्ट ऑफ़ डोंगर का पाणी! एका मजल्यावर चार घरे, दोन दोन समोरासमोर. त्यामध्ये एक खांब. एकूण चार खांब
प्रत्येक खांब धरून एक मुलगी उभी असायची. अणि एकमेकां मध्ये खांब एक्स्चेंज करायचे. जिच्यावर राज्य
तिने mid खांब मुलींना पकडायचे... Improvised डोंगर का पाणी.

ही आठवण लिहिताना, मला माझ्या मुलीचा आणि तिच्या मित्र मंडळाचा खेळ आठवला. आमच्या घराजवळ पार्क आहे. तिथे घसरगुंडी, monkey bar असे नेहमीचे प्र कार आहेत. एकदा मी तिला आणायला गेले होते तेव्हा ती मुले ही असाच खेळ खेळत होती. आपला monkey बार, घसरगुंडी वगैरे पकडून रहायचे अणि ज्याच्यावर राज्य असेल त्याचा डोळा चुकवून दुसरा प्रकार पकडायला ग्राउंड वरून धावत जायचे... तो बघून म्हटले, Apple doesn't fall far from the tree Happy त्यांचे improvised version of डोंगर का पाणी, खांब खांब!

आम्ही मजल्यावर खांब खांब खेळायचो.
>>>>>
आमच्याकडे याला कोपरा कोपरा बोलायचे. चार कोपऱ्यात चार जण उभे राहून....
खेळ सिपल होता.. पण मजा राज्य असेल त्याला हूल द्यायला यायची.. किंवा कोणाशी तरी गद्दारी करून त्यालाच आऊट करायला यायची Happy

@मनमोहन तुम्ही ज्याला खांब खांब म्हणताय तो आमचा दही भात होता. अजून एक खेळायचो डोंगराला आग पण नीट आठवत नाही पुढ काय करायचो. डोंगराला आग लागली पळा पळा अशी सुरुवात होती

डोंगराला आग लागली पळा पळा पळा...
याचे दोन वर्जन होते..
कमी मुले असतील तर त्यानंतर statue म्हणायचे.. हलेल तो आऊट..
जास्त मुले असतील तर दोन, तीन, चार जो आकडा घेतला जाईल तेवढ्याच ग्रूप बनवायचे.. ज्याना बनवता येणार नाही ते बाद..
मुलाच्या की मुलीच्या वाढदिवसाला खेळलेलो आम्ही हा खेळ..

@ऋन्मेष आम्ही डोंगराला आग लागल्यावर पुढ काय करायचो ते आठवत नाही पण ते statue आम्ही भारत भारत ला करायचो. राज्य असलेल्याने बाकीच्यां कडे पाठ करून भारत भारत भारत असं म्हणायचं आणि मागचे बेसावध असताना वळून statue करायचं आणि मग एकेकाच्या जवळ जाऊन त्याला हात न लावता हसवायचं हलायला लावायचं आणि आऊट करायचं, जो पाहिला आऊट पुढच राज्य त्याला

मस्त धागा आणि प्रतिसादही मस्त!
वर उल्लेखलेले सगळे खेळ खेळल्याचे आठवते.
सद्ध्या मुलाबरोबर नवा व्यापार आणि वर सामीने लिहिलेले १ ते १५ आकड्यांचा व चौकोन पूर्ण करून तिथे स्वतःचे initial लिहायचा खेळ खेळते.

अरे हां
तो 16 वाला गेम आठवला, म्हातारीचं घर.4 पोल्स पण खेळायचो.
अजून तो कलर्स कलर्स वाला खेळ, जो रंग सांगितला त्या रंगाच्या कपडे घातलेल्या माणसाला, रंगाच्या झाडाला/वस्तूला सर्वात आधी धावत जाऊन हात लावायचा.
(कोणी उत्साही कलाकार असेल तर या सर्व खेळांचं एकत्रित कंपायलेशन करून एक खेळ एक चित्र असं करून इबुक काढता येईल, एक डॉक्युमेंटेशन म्हणून(पण हे सोपं नाही.चित्र काढायला प्रचंड कष्ट आहेत.))

आम्ही एक ते दहा आकडे काढायचो. खाली एक चौकोन काढून त्यात 'मुंबई' लिहायचो Happy सगळे आकडे झाले की शेवटी मुंबईलाही जाता आलं पाहिजे. या खेळासाठी आमचं नावच 'मुंबई' होतं.

लेख आणि प्रतिक्रिया वाचताना मन मागे गेलं. हे सगळे खेळ खेळलोय

सकाळी/ किंवा दुपारी बैठे खेळ किंवा झाडा पाशी
पत्ते ( नॉट at होम , झब्बू , चॅलेंज ) , कॅरम, नाव गाव फळ फुल , व्यवहार , राजा राणी चोर शिपाई

साबण किंवा अत्तर किंवा गुलकंद किंवा तत्सम काही बनवणे ( जे कधी काही बनलं नाही)

उगाच एखाद्या झाडावरचे बदाम (?), पेरू, आवळे , कैऱ्या पाडणे .. ते क्वचितच काही पोटात जाई

संध्याकाळी / सकाळी : डबा आईस पैस, दगड का माती, विषामृत , बॅटमिंटन
जवळच्या बागेत खेळायला जाणे, सायकलिंग करणे,
किंवा थोडं मोठं झाल्यावर नंतर मग तळ्यावर फिरायला जाणे, बोटिंग करणे

आमच्या कडे आम्हीच मुलानी एकमेकांना सायकली शिकवल्यात .. २रुपयाला १ तास ह्या हिशेबाने सायकल भाड्याने मिळायची.
मग पुढे कधीतरी स्वतःची सायकल मिळाली.

उन्हाळ्याच्या सुट्टीत अजून एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे कोणाकडे तरी vcr भाड्याने आणायचे आणि मग पुरी फैय्य्यर त्यांच्याकडे पिक्चर बघायला ( ती सध्या काय करते मध्ये दाखवलेल तसाच काहीस ..)

६-७ वी नंतर एकदा सगळ्यांनी मिळून भेळ किंवा काही करायचे, किंवा प्रत्येकीला जमेल तस काही करून आणायचं आणि पार्टी करायची .. आता पॉट लक करतो तस .. पण त्यात आमचे १-२ दिवस मस्त जायचे.

भरीला पुस्तक असायचीच..

आताची मुलं पण त्यांच्या परीने मस्त मनसोक्त खेळतात (स्क्रीन शिवाय सुद्धा ), पोहतात, भटकतात, वाचतात .. म्हणजे माझ्या बघण्यात तरी ...

आहाहा अतिशय सुरेख लेख, अनेक गोष्टी रिलेट केल्या.

आज वाचू उद्या वाचू करत थोडा उशीर झाला. उशीर झाला ते एकाअर्थी बरं झालं कारण सुरेख एकसेएक प्रतिसाद वाचता आले आणि तेही बरेच रिलेट झाले.

धन्यवाद सर्वांना. सगळेच प्रतिसाद खूपच सुंदर ... लेखात मोलाची भर घालणारे... जुन्या आठवणींना उजाळा देणारे...

Pages