आमचे अनोखे खेळ

Submitted by मनीमोहोर on 22 February, 2024 - 02:06

तरुण मुलांना हे सगळं रिलेट होणं कठीण आहे पण आमच्या लहानपणी आम्ही काय खेळत होतो, शून्य साहित्यातून ही आम्ही खेळाचा आनंद कसा घेत होतो त्याची ही गोष्ट. तुमचे ही असे काही स्पेशल खेळ आणि आठवणी असतील तर ते ही इथे लिहा.

आमचे अनोखे खेळ

लहान मुलांचे हल्लीचे खेळ आणि त्यांची मनोरंजनाची अनेक साधनं बघितली की नकळतच मला आमच्या लहानपणीचे खेळ आठवतात. हल्लीचे भारी भारी आणि संख्येत प्रचंड खेळ पाहून मनातल्या मनात तुलना ही केली जातेच. अर्थात हेवा वगैरे नाही वाटत कारण आमच्या वेळी आम्ही जे खेळ खेळत होतो ते सगळे तेव्हा आम्हाला ही आवडत होतेच. तसेच आमचं लहान गाव, दोन्ही बाजूला अंगण, आजूबाजूला झाडी , तेव्हाचे शांत , निवांत , गाड्यांची रहदारी नसलेले रस्ते ह्या मुळे खेळाच्या साधनांची उणीव आहे हे जाणवलं ही नाही.

धावाधावी, लंगडी , कांदेफोडी लपाछपी, चोर पोलीस, साखळी, दगड की माती, खांब खांब खांबोली, तळ्यात मळ्यात, शिवाजी म्हणतो अश्या खेळांना काही ही साहित्य लागत नसे. कधी छानसा फरशीचा तुकडा मिळाला तर आट्यापाट्या किंवा नारळाची करवंटी घेऊन डबा ऐसपैस खेळायला खुप मजा यायची. आमचे बहुतांश खेळ हे असेच काहीतरी घरातलच किमान साहित्य किंवा नो साहित्य लागणारे असेच असत. त्यामुळे लगोरी ही आम्ही फार खेळत नव्हतो कारण त्यासाठी चेंडू लागत असे.

शिकेकाईच्या शेंगा हलकेच उखळात कुटून घेऊन आई त्यातील बिया आधी मोकळ्या करून घेऊन त्या निवडत असे. मगच त्या शेंगा कुटून घेऊन त्यात लिंबाची साल , गवला कचरी वगैरे मिसळून सुगंधित शिकेकाई घरच्या घरीच तयार होई. तर त्या शिकेकाईच्या वेगळ्या काढलेल्या गुळगुळीत , छोट्या छोट्या काळ्या बिया घेऊन आम्ही “ एकी का बेकी” नावाचा खेळ खेळत असू. प्रत्येकाकडे काही बिया असत आणि समोरच्या भिडूने एकी का बेकी हे आधीच गेस करून सांगायचं. मग दोन दोन बियांच्या जोड्या लावायच्या आणि शेवटी एक बी उरते की नाही ह्यावर एकी का बेकी आणि कोण जिंकला हे ठरत असे. तसं बघायला गेलं तर काय होतं त्या खेळात पण आम्ही तासनतास तो खेळ आवडीने खेळत होतो.

सायकलचा निकामी झालेला टायर जर कधी मिळालाच तर तो न पाडता फिरवायचा खेळ ही खुप रंगत असे. पावसाळ्यात अंगणातल्या चिखलात “ तार रोपी “ हा छत्रीची तार चिखलात रोवत रोवत पुढे जाण्याचा खेळ तर पावसाची सर आली तरी बंद पडत नसे. तार चिखलात उभी न राहता पडली की आऊट अस साधं समीकरण होतं. पाऊस फारच मुसळधार असेल तर घरातल्या घरात सागरगोटे खेळायला ही मजा येई. जनरली सागरगोटे आम्ही मुली मुलीच खेळायचो . मुलांचा सहभाग वरच्यावर आमचे सागरगोटे झेलणे किंवा सागरगोटे पळवणे इत्यादींनी आम्हाला चिडवण्याचाच असे फक्त. Happy . दुपारच्या वेळी जेव्हा अंगणात खेळायला मनाई असायची तेव्हा “ नाव गाव फळ फुल” हा डाव खुप रंगत असे. एखाद्या विशिष्ट अक्षरावरून सुरू होणारी मुला मुलींची, फळाची, फुलाची , गावाची, सिनेमाची वैगरे नाव पटापट लिहून जास्तीत जास्त स्कोअर होईल तो जिंकला असा तो खेळ होता.

आता तुम्हाला खोटं वाटेल पण बांगड्यांच्या काचेचे तुकडे गोळा करणे आणि रस्त्यावर पडलेली सिग्रेटची रिकामी पाकिट गोळा करणे हे दोन्ही फारच पॉप्युलर होतं तेव्हा. नंतर मैत्रिणींशी ह्या गोष्टी एक्सचेंज ही केल्या जात. वर्ख वाल्या बांगडीच्या मोठ्या तुकड्याला जास्त भाव मिळत असे. मला आठवतंय सिग्रेटच्या पाकीटात पिवळा हत्ती हा आमच्या जगात सर्वात स्वस्त ब्रँड होता आणि एक कॅपस्टन म्हणून खुप मौल्यवान ब्रँड होता. पंधरा वीस पिवळ्या हत्तींना एक कॅपस्टनच पाकीट मिळे. मात्र सिगरेटच नाव ही घेतलेलं घरात वडिलांना चालत नसे आणि बांगडीची काच हाताला लागेल म्हणून आई काचा गोळा करायला परवानगी देत नसे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी चोरी छुपेच आम्हाला जमवाव्या लागत असत.

आमच्या घरी वडिलांना वाचनाचं वेड होत आणि ते आम्हाला ही वाचनासाठी प्रोत्साहन देत असत. गावातल्या सार्वजनिक वाचनालयाचे आम्ही सगळेच जण सभासद होतो. त्यामुळे आमच्या घरी एकावेळी चार पाच पुस्तके तरी असत. मराठी वाचनाची गोडी त्यामुळेच लागली मला. आम्हा सर्वच भावंडांच वाचन खुप होतं. अगदी श्रीमान योगी सारखी मोठी मोठी पुस्तकं ही आम्ही लहानपणीच वाचली आहेत. नंतर नंतर इंग्लिश पुस्तकं जास्त करून फिक्शन खुप वाचली. खेदाची गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळात मात्र माझं वाचन खूपच कमी झालंय.

पावसाळ्यात मेंदीचा पाला तोडून स्वतः हाताने वाटून ती लावण्याचा कार्यक्रम एखाद्या शनिवारी मुद्दाम ठरवला जायचा. सणासुदीला त्या त्या सणा प्रमाणे फुल गोळा करून हार तोरणं करणे, पत्री गोळा करणे, दिवाळीत ठिपक्यांचा कागद , कंदील स्वतः करणे, संक्रांतीला पतंग आणि होळीला पळसाच्या फुलांपासून रंग करणे, उन्हाळी कामात आणि दिवाळी फराळ करायला आईला वर वरची मदत करणे, असा सिझनल विरंगुळा मिळत असे. वडील कधीतरी चार सहा महिन्याने एकदा आमच्या गावात असलेल्या टुरिंग टॉकीज मध्ये म्हणजे वरून आकाश दिसणाऱ्या थिएटर मध्ये सिनेमाला नेत असत, ते थ्रील पुढे महिना दोन महिने सहज पुरत असे. तसेच आपण न पाहिलेल्या तीन तासाच्या सिनेमाची स्टोरी मैत्रिणीकडून ऐकणे ह्यात पाच सहा दिवस सहज जात असत. Happy

माझ्या वडिलांच्या एकंदर विचारांवरून आणि त्यांच्या मुल्यांवरून मला आता नवल वाटत पण मे महिन्याची सुट्टी सुरू झाली की ते पत्त्यांचा एक कॅट आम्हाला आणून देत असत. जून मध्ये शाळा सुरू होई पर्यंत आम्हाला पत्ते खेळण्याची परवानगी होती. एकदा शाळा झाली सुरू की पुढल्या वर्षीच्या उन्हाळी सुट्टी पर्यंत पत्ते बंद. आम्ही सुट्टीत अक्षरशः पत्ते कुटत होतो. जसे भिडू असतील तसे लॅडीस, झब्बू, सात आठ, मेंढी कोट, मार्क डाव, चॅलेंज असे अनेक डाव रंगत. कधी कधी माझे आई वडील ही खेळायला येत असत आमच्या बरोबर. त्या आठवणी अजून ही मनाला आनंद देतात. कोणीच नसेल खेळायला तर पेशंस किंवा पत्त्यांचा बंगला बांधणे हे ही आवडत असे. पत्ते खेळताना चोरून दुसऱ्याचे पत्ते बघणे, खाणाखुणा करणे , आरडा ओरडा ह्याला ही ऊत येई. त्याची परिणीती भांडणे, पत्ते फेकणे, ते हरवणे होत ह्यात असे. एखादा पत्ता हरवला तर दुसरा कॅट मिळणं शक्यच नव्हतं. त्यावर उपाय म्हणून जोकरला त्या हरवलेल्या पानाच चित्र काढून वेळ भागवली जाई आणि खेळ पुन्हा सुरू होई.

लहानपणी आम्हाला फार कमी साहित्य आणि साधनं उपलब्ध होती पण त्यातून ही आम्ही स्वतःची करमणूक स्वतः निर्माण केल्याने लहानपण मजेतच गेलं. आम्हाला ही विकतचे रेडिमेड खेळ मिळाले असते तर कदाचित जास्त मजा आली ही असती. असो. आता मात्र जागतिकीकरण, स्त्रियांच्या नोकरीमुळे वाढलेलं उत्पन्न, लहान कुटुंब , वस्तूंची सहज उपलब्धता, बदललेली जीवनशैली आणि विचारसरणी ह्या सगळ्यामुळे काळ एकशे ऐंशी अंशात बदलला आहे. अशी शून्यातून करमणूक निर्माण करण्याची गरज अजिबात उरलेली नाही. तरी ही मुलांना अश्या गोष्टी करायला अधून मधुन प्रेरित केलं तर हे खेळ टिकून ही राहतील आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाची अनुभूती मुलांना ही घेता येईल.

हेमा वेलणकर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत थँक्यु ... ठिक्कर म्हणजे काय जरा उलगडून सांगा ना , तसेच तुमचे ही काही असे खेळ असतील तर जरूर लिहा.

सुंदर आठवणी , छान लिहिलंय ! थोड्याफार फरकाने आपण सगळ्यांनीच हे खेळ खेळले आहेत, प्रत्येक पॅरा वाचताना मला त्या त्या वेळचे माझे सवंगडी, घर , वेळ जागा सगळं डोळ्यासमोर दिसत होतं .. अशा आठवणींसाठी गतकालविव्हल व्हायला मला नेहेमीच आवडतं..
पत्ते वगैरे अगदी अगदी झालं .. आम्हाला पण मे महिन्याची सुट्टीतच पत्ते खेळायला allowed होतं..
एक 'तार रोपी' सोडल्यास बाकी सर्व खेळ खेळले आहेत. त्या तार रोपी ऐवजी आम्ही असे खेळायचो : सगळ्यांच्या हातात काठ्या असतात , ज्याच्यावर राज्य त्याने सगळ्यांकडे पाठ करून उभं राहायचं आणि त्याची काठी दोन्ही हातात वर धरायची , इतरांपैकी एकाने मागच्यामागे आपल्या हातातल्या काठीने ती लांबवर उडवायची आणि स्वतःची काठी लगेच एका दगडावर टेकवायची .. दगडावर टेकवायच्या आत जर आपण पकडले गेलो तर आऊट .. नाहीतर ती काठी अशीच ठरलेल्या सीमेपर्यंत उडवत न्यायची .. थोडंसं रुमाल की पाणी/ डोंगर का माती सारखंच ..! जाम मज्जा !!

सगळ्यांच्या हातात काठ्या असतात , ज्याच्यावर राज्य त्याने सगळ्यांकडे पाठ करून उभं राहायचं आणि त्याची काठी दोन्ही हातात वर धरायची , इतरांपैकी एकाने मागच्यामागे आपल्या हातातल्या काठीने ती लांबवर उडवायची आणि स्वतःची काठी लगेच एका दगडावर टेकवायची .. दगडावर टेकवायच्या आत जर आपण पकडले गेलो तर आऊट .. नाहीतर ती काठी अशीच ठरलेल्या सीमेपर्यंत उडवत न्यायची .. >> आम्ही ह्याला 'लकडी आस' म्हणायचो. का ते माहीत नाही. मोठी मुलं म्हणायची म्हणुन असेल.
सायकलचा टायर चालवत तो कोणाच्या तरी पायावर लागेल असा ढकलायचा की तो आउट असाही खेळ आम्ही शोधला होता Lol

अगदी अगदी झालं ममो!
चौसर खेळायचो आजकालचा लुडो. उलट्या पाटावर रकाने आखायचे. डायस म्हणून चिंचोके. उन्हाळ्यात चिंच फोडून वर्षभरासाठी साठवून ठेवायचो. ते तीन चिंचोके फोडून डायस व्हायचे. बांगड्यांच्या, दगड, काड्याच्या सोंगट्या. सागरगोटे, बिट्ट्या खेळायचो. ठिक्कर म्हणजे फरशीचा चपटा तुकडा. आम्ही मातीतच खेळायचो. काडीने आठ चौकोन आखायचे उभे चार आडवे दोन. चौकोनाच्या बाहेरून डाव्या चौकोनात ठिक्कर टाकायची ठिक्कर लाईनीवर पडली तर आऊट. लंगडी घालत उजव्या बाजूने चार चौकोन पार करून डाव्या बाजुच्या चौकोनात यायचं ही लंगडी करत येत असताना पायाचा स्पर्श कुठल्याही लाईनीला होऊ द्यायचा. ठिक्करच्या चौकोनात आल्यावर लंगडी पोझिशनमध्ये वाकून ठिक्कर उचलायची. लंगडी सुटली तर आऊट. उचलेली बाहेर अशी फेकायची की त्यावर पाय पाडून लंगडी सोडायची.

आम्ही ह्याला 'लकडी आस' म्हणायचो>> आम्ही काय म्हणायचो काय माहित .. आता तरी आठवत नाहीय कदाचित काहीच नाव नव्हतं.. विचारून बघते .. अजून एक काहीतरी असे खेळायचो पण मला नीटसं आठवत नाही, की , मातीचा किंवा वाळूचा हातभर किंवा जास्त लांब स्पीडब्रेकर सारखा डोंगर करायचा.. आणि त्यात बांगडीची तुटलेली काच लपवायची .. ज्याच्यावर राज्य त्याने बघायचे नाही. इतरांनी वेगवेगळ्या जागी आपले हात ठेवायचे एकाच हात निश्चित जिथे काच लपवली तिथे असणार आणि राज्य वाल्याने ओळखायचं कोणत्या हाताखाली काच लपवली आहे वगैरे .. एकदाच ओळखायचे की ३ चान्स होते वगैरे आठवत नाहीय पण असे काहीतरी खेळायचो

मस्त मस्त ! Happy
तूर्तास रुमाल या विषयावर...

मस्त मस्त ! Happy
तूर्तास रुमाल या विषयावर...

मस्त.

रुमाल पाणी, भातुकली बाहुलीचे लग्न, घर घर, ट्रायसायकल आ डवी पाडून चाक गरगर फिरवणे, माझ्या आईचे पत्र हरवले संगीत खुर्ची, वाळूच्या ढिगात खोप्या करणे, पावसाच्या पाण्यात होड्या सोडणे. हे माझी भर.

लहानपणी आम्हाला फार कमी साहित्य आणि साधनं उपलब्ध होती पण त्यातून ही आम्ही स्वतःची करमणूक स्वतः निर्माण केल्याने लहानपण मजेतच गेलं. >> हे कोणते दशक असावे?

आता मात्र जागतिकीकरण, स्त्रियांच्या नोकरीमुळे वाढलेलं उत्पन्न, लहान कुटुंब , वस्तूंची सहज उपलब्धता, बदललेली जीवनशैली आणि विचारसरणी ह्या सगळ्यामुळे काळ तीनशे साठ अंशात बदलला आहे. >> १८० डिग्री पाहिजे. व मला सध्याच्या गेम्स पण खूप आवडतात,

प्लेस्टेशन च्या गेम्स, व मोबाईल गेम्स. उगीच नावे का ठेवा मज्जानु लैफ.

वा! मस्त. नॉस्टॅल्जिक.

भातुकली. यात घरून शेंगदाणे, गूळ, खोबरं मिळालं तर ठीक नाहीतर आजूबाजूच्या झाडांची पानं, फुलं गोळा करून त्याचा सैपाक होत असे.

कुंपणावरच्या एका जाडसर पानाचा आरसा करत असू. ते पान दुमडून फाकवलं की त्यातल्या चीकामुळे एक आरसा दिसू लागेल. झुडपाचं नाव माहीत नाही.

असंच अमरवेलीचे चष्मे आणि मैत्रीचा चौकोन.

झुरळाची फळं एकमेकांच्या कपड्यांवर मारणे. या झाडाचं देखिल नाव माहित नाही. शिवाय गुंडाच्या वेलीच्या सुकलेल्या शेंगेतून गुंजा गोळा करणे.

काचा गोळा करून मग काचापाणी खेळणे. यासाठी बांगड्यांच्या दुकानाबाहेर जाऊन काचा आणणे. त्यात रंग, डिझाईनची विविधता असणे ही खासच अभिमानाची गोष्ट. सोनेरी वर्खवाल्या बांगड्यांचे तुकडे म्हणजे लॉटरीच.

'दगड का माती' हा खेळ भयंकर पॉप्युलर होता. सोनसाखळी, जोडसाखळी, आबादुबी, लगोरी आणि लपाछपी पण चिक्कार खेळलीये.

आईवडील घरात नसताना खोलीत पावडर टाकून त्यावरून धावत जाऊन घसरणे (आता विचार करू धसकायला होतं की किती रिस्क होतं त्यात), टॉवेलवर एकीला बसवून दुसरीने तो खेचत तिला घरभर फिरवणे.

आईच्या शिवणाच्या मशीनच्या पॅडलवर बसून ते वादी लावलेलं चाक फिरवत मोटार चालवण्याचा आनंद घेणे. ही मोटार मोठीच अद्भुत होती. त्यात बसलं की शरीराचा अर्धा भाग खाली आणि उरलेला अर्धा वर असं फटाफट हलत राही. जास्त जोरात चालवली तर हात चाकात अडकून स्पीकिंग केल्याबद्दल शिक्षाही भोगावी लागतात असे. या मोटारीचं प्रसंगानुरूप कधी कधी बसमधेही रूपांतर होत असे.

आईवडील घरात नसताना खोलीत पावडर टाकून त्यावरून धावत जाऊन घसरणे >>>
यातून एक अपघात घडला, आणि आमच्या बिल्डिंगच्या गणेशोत्सवाचा ओनामा झाला! Lol
या खेळात भंगलेल्या मूर्तीचा मित्राच्या आईबाबांना पत्ता न लागू देता, यथोचित उपयोग म्हणजे, बिल्डिंगचा सार्वजनिक गणपती बसवणे!
खरं तर यातून कोणाला अशुभसंकेत जाणवेल. पण आम्हा मुलांच्या दहा वर्षातल्या दोन पिढ्यांना खूप मोठा कार्यानुभव देण्याचं महत्कर्म या गणेशोत्सवानं साधलं.

दगड की मातीची सुरुवात आमच्या कडे अशी व्हायची -- ' कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही, अर्धा लिंबू / कच्चा लिंबू अस्से, चिडायची बात नस्से, चिडला तर सात राज्य दिली जातील..वर बघून सांग दगड की माती ' Proud
लेख मस्तच, नंतर विस्ताराने प्रतिसाद देईन.

आमच्याकडच्या ठिक्करमध्येही आठ चौकोन / वर्तुळे असत. पण ती अशी - एका पुढे एक तीन. त्या पुढे ळ सारखी जोडून दोन. पुन्हा एक. मग पुन्हा दोन. क्रमाने पहिल्या चौकोनापासून प्रत्येकात ठिक्कर टाकत लंगडी घालत जायचं. ज्या चौकोनात ठिक्कर असेल तो जाताना टाळायचा. परत येताना तो ठिक्कर उचलायचा. असे आठ चौकोन पूर्ण झाले की पुढचे प्रकार. पालथ्या मुठीवर, खांद्यावर, कपाळावर, डोक्यावर, पावलावर ठिक्कर ठेवून सगळ्या चौकोनांत फिरून परत यायचं. शेवटचा प्रकार डोळे झाकून चौकोनांतून फिरून यायचं. रेषेवर पाय पडला की बाद.
ठिक्कर म्हणजे टाइलचा तुकडा.

दगड की माती काय होतं? आम्ही डोंगरपाणी खेळत असू.

डब्बा ऐसपैस सारखा स्टॉप हा एक खेळ होता. यात भोज्या म्हणजे ज्याच्यावर राज्य आहे त्याची पाठ. त्याच्या मागून येऊन त्याने पहायच्या आत पाठीला स्पर्श करायचा. तेव्हा ओरडायचा एक शब्दही होता. लपलेला भिडू दिसला की त्याचं नाव घेऊन स्टॉप म्हणायचं. चुकीचं नाव घेतलं तर पुन्हा राज्य.

कांदाफोडी - जमिनीवर पाय सरळ करून बसायचं. दुसर्‍या भिडूने ते ओलांडून जायचं. मग उंची वाढवत न्यायची. एका पायावर दुसरा पाय, मग त्यावर एक हात, दोन्ही हात, मग गुढघे आणि हात टेकून मग ओणवं उभं राहून.

आईवडील घरात नसताना खोलीत पावडर टाकून त्यावरून धावत जाऊन घसरणे >> आईशप्पथ !! हे आम्ही पण करायचो .. डेंजर एकदम
काचापाणी खेळणे>> हे नक्की कसे खेळतात ?

आमच्या छोट्या इमारतीला ८ पायऱ्यांचा जिना होता हळूहळू आम्ही ५ व्या ६ व्या असे करत करत ८व्या पायरीवरून म्हणजे अख्या जिन्यावरून खाली उडी मारायला जमवले होते...

हो कांदाफोडी पण मज्जा यायची..

आजोळी घरात मोठा झोपाळा होता. एका वेळी तीन चार मोठी माणसं बसायची एवढा मोठा.
उन्हाळ्यात आम्ही पुण्याहून सुट्टीसाठी जायचो. आगगाडीतून येणारे आम्हीच.
मग वय वर्षे तीन ते बारा या वयातल्या सात-आठ नातवंडांचा आवडता खेळ म्हणजे त्या झोपाळ्याला आगगाडी समजून मोठ्यात मोठा झोका काढायचा.
मग कुणी इंजिन ड्रायव्हर म्हणून पुढे बसायचा. कुणी गार्ड म्हणून मागे. त्याच्या हातात लाल आणि हिरवे हातरुमाल किंवा टॉवेल.
आणि दोघे जणं दोन बाजूंना कड्यांना धरून उभे. हे कोण? फायरमॅन, ते बॉयलरमध्ये कोळसा टाकणारे असायचे ना त्या काळी? तेच!
मग हे दोघे उभ्याउभ्या पायानं जोर काढून उंच उंच झोका काढणार...
इंजिन ड्रायव्हर आणि गार्ड यांचं मुख्य काम म्हणजे पायानं झोका थांबवणे!
सगळी चिल्लीपिल्ली प्रवासी असायचे. जिवाच्या आकांतानं झोपाळ्याच्या कडांना पकडून बसलेले असायचे.
मग कधी ही महाराष्ट्र एक्सप्रेस तर कधी गीतांजली. कधी जीटी (ग्रॅन्ड ट्रंक) तर कधी राजधानी.
मधेच कुणी काका फ्रॉन्टिअर मेलची महती सांगून जायचे. मग लगेच रेल्वेचं टाइमटेबल काढून त्यावरची स्टेशनं शोधायची.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या स्टेशनावर काय खायला मिळते, ही माहिती.
मग आतून आजीकडे जाऊन शेंगदाणे, चुरमुरे, गूळ, खोबरं, चिवडा, लाडूचा भुगा, कधी पापड-कुरडया घेऊन यायचं.
मग चुरमुऱ्यांच्या कचोऱ्या व्हायच्या आणि गुळाचा आग्रेका पेठा!
कारण आमची ही गाडी सगळ्या स्टेशनांवर रीतसर थांबायची!
बडनेरा आलं की आत्या चहा घेऊन स्टेशनावर भेटायला यायची. शेगावला कचोरी खाल्ली जायची. रात्रीचं जेवण भुसावळला व्हायचं. काही विचारू नका!!
हा खेळ कुणी तरी एखादा धडपडला किंवा झोपाळा भिंतीवर आपटून कुणाचं ढोपर फुटून रडायला लागला की मगच संपायचा.
नाही तर, आतून एखादी काकू वा आत्या 'चला जेवायला' असे हाकारे करत यायची, मागून आजी यायची.
पण गाडी यार्डात लावल्याखेरीज खेळ संपायचा नाही!

ममो फारच सुंदर आणि स्मरणरंजन करून देणारा लेख
यातील बरेच खेळ खेळलो आहे लहानपणी. मुंबईत कबड्डी, लपाछपी, खो खो, लंगडी, आंधळी कोशिंबीर, डब्बा ऐसपैस असे अनेक खेळ होते. पण सुट्टीत गावी गेल्यावर अगदी वेगळे खेळ असायचे.
शेतात चांगल झाड बघून आम्ही सुरपारंब्या खेळायचो. मंजू ताईंनी सांगितलं तस पाटामागे कोळश्याने चौसर आखून खेळायचो. त्याला काचा कवड्या म्हणायचो. बांगड्यांच्या काचा सोंगट्या म्हणून v कवड्या फासे म्हणून वापरता असू. कवड्या नसल्या की चिंचोके फोडून वापरायचे. त्यात जर सगळ्या चिंचोक्यांची काळी बाजू वर पडली तर "छाप छाप" म्हणून सगळ्यांनी जमेल तसे ते चींचोके हाताने झाकायचे. ज्याने जेवढे झाकले त्याला तेवढे पॉइंट.
मुली गजगे (सागरगोटे) खेळायच्या, मुले त्यांना गजगे आणि ते नाही मिळालं तर बिट्ट्या आणून द्यायचो.
आणखी म्हणजे बांगड्यांच्या काचांचे तुकडे हातात घेऊन उडवायचे आणि पटकन हात उलटा करून ते झेलायचे मग बाकीचे त्यातली एक काच मळहातवर ठेवायला सांगायचे. तीच काच ठेऊन बाकी सगळ्या झटकायच्या व मग सगळ्या काचा ती एक काच तशीच मळहातावर ठेऊन उचलायच्या वरची काच पडली की आऊट.
उन्हाळयात गावी छोटासा मांडव घालायचो आणि त्याची पूजा करायचो. मुली त्यात त्यांच्या बाहुल्यांची लग्न लावायची. घरातून शिरा मिळायचा.
गोटया तर खूप खेळायचो. विटी दांडू, लगोरी हे पण असे जोडीला.
उन्हाळयात आम्ही करंजाच्या शेंगा वेचून त्या फोडायचो घरच्यांचा डोळा चुकवून (अगदी खुफिया मिशन असे) आणि त्या फोडलेल्या बिया विकून येणाऱ्या पैशात आईस क्रीम, पानावरची कुल्फी, गारीगार खात असू.
गावी जत्रा असली की मग त्यातून काही खेळणी घेतली जात.
त्यात ते बोटभर लांबीचे प्लास्टिकचे ट्रक त्यात माती भरून खेळत असू. आणखी एक म्हणजे एक मध्ये काच आणि त्याच्या चारी बाजूला वेगवेगळी चित्रे असणारे एक खेळणे भेटे, मग तुला काय पाहिजे ते विचारून त्या भागाच्या चित्राची घडी पहिली काचेवर करून दुसऱ्या बाजूने ते त्याला दाखवत असू व कशी जादू केली असे भासवू. आणि एक कॅमेरा आणि फिल्म (फोटो निगेटिव्ह) मिळत असतं त्या घेऊन एखाद्या खोलीत अंधार करून धोतराचा पडदा करत असू मग आरस्याने सूर्यकिरण त्यावर टाकून त्या फिल्म मोठ्या पडद्यावर बहात असू.
आणखी एक पत्र्याच टिक टिक वाजणार खेळण भेटे त्याच्या कर्कश्य आवाजाला सगळे वैतागत. पिपाण्या पण भारी असतं. नाही मिळाल्या तर करंज वडाच्या पानाच्या करत असू.

कुंपणावरच्या एका जाडसर पानाचा आरसा करत असू. ते पान दुमडून फाकवलं की त्यातल्या चीकामुळे एक आरसा दिसू लागेल. झुडपाचं नाव माहीत नाही.>>>>>>>मोगली एरंड, आम्ही ह्याचे बुडबुडे काढत असू. आत्ताची पोरं बबल्स म्हणतात ते

असंच अमरवेलीचे चष्मे आणि मैत्रीचा चौकोन.>>>>>आम्ही वाळलेल्या ज्वारीच्या ताटाचे चष्मे, टेबल खुर्ची, बैलगाडी बराच काही बनवत असू.
झुरळाची फळं एकमेकांच्या कपड्यांवर मारणे. या झाडाचं देखिल नाव माहित नाही. >>>>>>लांडगा, कुसळ

ममो फारच सुंदर आणि स्मरणरंजन करून देणारा लेख
यातील बरेच खेळ खेळलो आहे लहानपणी. मुंबईत कबड्डी, लपाछपी, खो खो, लंगडी, आंधळी कोशिंबीर, डब्बा ऐसपैस असे अनेक खेळ होते. पण सुट्टीत गावी गेल्यावर अगदी वेगळे खेळ असायचे.
शेतात चांगल झाड बघून आम्ही सुरपारंब्या खेळायचो. मंजू ताईंनी सांगितलं तस पाटामागे कोळश्याने चौसर आखून खेळायचो. त्याला काचा कवड्या म्हणायचो. बांगड्यांच्या काचा सोंगट्या म्हणून v कवड्या फासे म्हणून वापरता असू. कवड्या नसल्या की चिंचोके फोडून वापरायचे. त्यात जर सगळ्या चिंचोक्यांची काळी बाजू वर पडली तर "छाप छाप" म्हणून सगळ्यांनी जमेल तसे ते चींचोके हाताने झाकायचे. ज्याने जेवढे झाकले त्याला तेवढे पॉइंट.
मुली गजगे (सागरगोटे) खेळायच्या, मुले त्यांना गजगे आणि ते नाही मिळालं तर बिट्ट्या आणून द्यायचो.
आणखी म्हणजे बांगड्यांच्या काचांचे तुकडे हातात घेऊन उडवायचे आणि पटकन हात उलटा करून ते झेलायचे मग बाकीचे त्यातली एक काच मळहातवर ठेवायला सांगायचे. तीच काच ठेऊन बाकी सगळ्या झटकायच्या व मग सगळ्या काचा ती एक काच तशीच मळहातावर ठेऊन उचलायच्या वरची काच पडली की आऊट.
उन्हाळयात गावी छोटासा मांडव घालायचो आणि त्याची पूजा करायचो. मुली त्यात त्यांच्या बाहुल्यांची लग्न लावायची. घरातून शिरा मिळायचा.
गोटया तर खूप खेळायचो. विटी दांडू, लगोरी हे पण असे जोडीला.
उन्हाळयात आम्ही करंजाच्या शेंगा वेचून त्या फोडायचो घरच्यांचा डोळा चुकवून (अगदी खुफिया मिशन असे) आणि त्या फोडलेल्या बिया विकून येणाऱ्या पैशात आईस क्रीम, पानावरची कुल्फी, गारीगार खात असू.
गावी जत्रा असली की मग त्यातून काही खेळणी घेतली जात.
त्यात ते बोटभर लांबीचे प्लास्टिकचे ट्रक त्यात माती भरून खेळत असू. आणखी एक म्हणजे एक मध्ये काच आणि त्याच्या चारी बाजूला वेगवेगळी चित्रे असणारे एक खेळणे भेटे, मग तुला काय पाहिजे ते विचारून त्या भागाच्या चित्राची घडी पहिली काचेवर करून दुसऱ्या बाजूने ते त्याला दाखवत असू व कशी जादू केली असे भासवू. आणि एक कॅमेरा आणि फिल्म (फोटो निगेटिव्ह) मिळत असतं त्या घेऊन एखाद्या खोलीत अंधार करून धोतराचा पडदा करत असू मग आरस्याने सूर्यकिरण त्यावर टाकून त्या फिल्म मोठ्या पडद्यावर बहात असू.
आणखी एक पत्र्याच टिक टिक वाजणार खेळण भेटे त्याच्या कर्कश्य आवाजाला सगळे वैतागत. पिपाण्या पण भारी असतं. नाही मिळाल्या तर करंज वडाच्या पानाच्या करत असू.

कुंपणावरच्या एका जाडसर पानाचा आरसा करत असू. ते पान दुमडून फाकवलं की त्यातल्या चीकामुळे एक आरसा दिसू लागेल. झुडपाचं नाव माहीत नाही.>>>>>>>मोगली एरंड, आम्ही ह्याचे बुडबुडे काढत असू. आत्ताची पोरं बबल्स म्हणतात ते

असंच अमरवेलीचे चष्मे आणि मैत्रीचा चौकोन.>>>>>आम्ही वाळलेल्या ज्वारीच्या ताटाचे चष्मे, टेबल खुर्ची, बैलगाडी बराच काही बनवत असू.
झुरळाची फळं एकमेकांच्या कपड्यांवर मारणे. या झाडाचं देखिल नाव माहित नाही. >>>>>>लांडगा, कुसळ

काय आठवणीचं पोतडं उघडलंस ममो. बाबा आम्हीपण खूप खेळलोय हे खेळ.
दादरला काकूच्या घरी राहायला जायचो तर तिथे पण मित्रमैत्रिणी होते. तिथे गोट्या, डफ्फर पण खेळलोय. लगोरी, डबा ,ऐसपैस, क्रोकोडाईल क्रोकोडाईल विच कलर डूयु वॉंट? , विष की अमृत, L O N D O N लंडन, अजून एक खेळायचो, हातात माती आणि त्यात काडी रोवलेली असायची ,मग डोळे बंद करून त्या मुलीला गरगर फिरवून कुठेतरी नेउन ती माती ठेवायला सांगायची मग परत पहिल्या ठिकाणी आणून डोळे उघडून शोधायला लावायची.
आम्ही घरी बैठे खेळ पण खूप खेळायचो. परिकथेची छान छान चित्र असलेली पुस्तकं होती माझ्या दुसऱ्या काकूकडे ( ती ज.पु. भागवतांची मुलगी Happy ) तर त्या पुस्तकातल्या चित्रावरून मेमरी गेम घ्यायचा माझा भाऊ.
भरत ठिक्कर म्हणताहेत ते आम्ही भरपूर खेळलोय. ठिक्करबिल्ला नाही तर चिप्पी पण म्हणायचो. ते घर चॉकने काढूनच ठेवलेलं असायचं. त्यात हिरा म्हणून पण खेळायचो. आता ते कसं काढायचो ते एवढं आठवत नाहीये.
बाकी नावगावफळफूलरंगअडनावसिनेमामार्क हे माबोला नवीन नाही. एका गणेशोत्सवात खेळलोय.
सांगा सांगा लवकर सांगा काही " " ची नावे सांगा बी क्वीक. हे पण खेळायचो. ह्यातलं बीक्वीक चा अर्थ मला किती नंतर बी क्वीक असा कळला. ते एकत्र न समजताच म्हणायचे. Lol
पावडर वरून घसरणं>>> मला वाटायचं आपणच असे अतरंगी. आम्ही बाथरूम मध्ये पाणी साठवायचो. स्विमिंग पूल म्हणून Proud

असंच अमरवेलीचे चष्मे आणि मैत्रीचा चौकोन.>> हो आम्ही पण केलेत. अजून एक पांढऱ्या लिलीची पानं लांबलचक असायची आणि त्याला चिक खूप असायचा तर ती पानं हलकेच तोडून त्याच्या माळा करायचो. चिकामुळे न तुटता लांब लांब माळा व्हायच्या. आता विचार करून वाटतंय की बरीच पानांची ( लिलीच्या) नासाडी केली हो आम्ही

डबा ऐसपैस बहुतेक सगळे खेळले आहेत असं दिसतंय.
ऐसपैस हा 'I spy'चा अपभ्रंश असल्याचं कुठेतरी वाचलं होतं. त्यात डबा कुठून आला माहीत नाही. Happy

वर आलेली नावं वाचून एकदम नॉस्टॅल्जिक वाटलं. इथे आल्यावर मुलाच्या प्रीस्कूलमध्ये 'पिक अप स्टिक्स' पाहिल्या तेव्हा 'अरे हे तर काचापाणी!' असं झालं होतं!
आम्ही ठिक्कर खेळायचो ते खण (चौकोन) आखून त्यात ठिक्कर (किंवा एखादी मोठी सेफ्टी पिन वगैरे) टाकायचो. ती रेषेवर किंवा खणाबाहेर पडली तर डाव जात असे. मग ज्या खणात ठिक्कर असेल त्या खणात पाय न टाकता ती उचलून यायचं असायचं. सगळा पट दोन्ही बाजूंनी पूर्ण केला की एक खण आपल्या मालकीचा करता येत असे - मग त्यात इतर कोणी पाय टाकू शकत नसे. मग ते ठिक्कर आणणं अवघड होत जायचं.

आमच्या चाळीच्या चौकात टाइल्सच्या तुकड्यांनी बॅडमिंटन कोर्ट 'आखलेलं' होतं. मग पकडापकडीची 'रेषेवरची' एक व्हर्जन खेळली जायची.

बाकी बैठ्या खेळांत पत्ते, कॅरम, सापशिड्यांसारखे बोर्ड गेम, नावगावफळफूल, घरी मोठे कझिन्स जरा इन्टुक असल्यामुळे स्क्रॅबल वगैरे बरंच खेळलं जायचं.

भा. रा. भागवत (फास्टर फेणे लिहिणारे) आमचे शेजारी होते. लीलाताईंनी त्यांच्या (माझ्या वयाच्या) नातीच्या बाहुलीचं लग्न मोठ्या थाटात लावल्याचं आठवतंय. माझी मोठी बाहुली फक्त साइजमुळे नवरा झाली होती. Proud
पण अगदी चाळभर वरात वगैरे काढली होती आणि वर्‍हाड्यांना मस्त खाऊपिऊ घातलं होतं हे आठवतं. Happy

भरतजी आम्ही त्याला टिपरी पाणी म्हणत असू, त्यात सगळ्यात शेवटी बहुदा डोक्यावर टिपरी ठेवायची आणि ती चौकोनात टाकताना तिची पापी घेऊन टाकायची :P..लिंगोरचा, डब्बा ऐसपैस, पत्ते, व्यापार, कांदा फोडी, माझ्या आईचं पत्र, आमच्या घरात ४० चोर , डोंगराला आग लागली, गोट्ा, रुमाल पाणी, विटी दांडू, अप्पा रप्पी हे आणि असे खेळ आमच्या मोठ्या वाड्यात सहजी खेळता येत. वाड्यात प्रवेश केलं की मोठा चौक होता मग आमची ओसरी मग एक बोळ आणि बोळा च्या शेवटी मागचं अंगण.. मागच्या अंगणाच्या शेवटी वाड्याचा दरवाजा आणि पुढे मोरया गोसावी बाग. त्या बागेत जोड साखळी, विष अमृत, पकडा पकडी, लंगडी असे खेळ Happy संध्याकाळ कमी पडायची पण साडे सात आठ पर्यंत घरी यायचेच. नंतर कधी तरी सायकल टायर ला चिंचेच्या फोकान हाकलत न्यायचा खेळ पण आवडीचा झाला. कधी संध्याकाळी साडे सहा / सात ला दिवे गेले की लपाछपीला अशी काय मजा यायची आणि अगदी दोन तीन वाडे ' हद्द ' ठरायची ज्यावर राज्य येई तो किंवा ती अगदी मेटाकुटीला येऊन जाई..Gotya मध्ये तो पांढरा हंटर असायचा, असा लागायचा वरमी. नडगी वर बसला की जीव कळवलायचा. 'चकणे ' ही पण मजा असायची, जास्तीची आणि कमीची मेजॉल्टी Proud किंवा टीम पाडताना किंवा क्रम ठरवताना एकाने वाकायचं आणि दुसऱ्याने नंबर विचारायचा. पत्त्यातला पार्टनर लाल गोटूने ठरवायचा. Happy माझ्या कडे काडेपेटी छाप पण खूप होते जमवलेले. फारच नॉस्टॅल्जिक झालं, ममोजी धन्यवाद Happy

हो हो स्वाती त्या घराची मालकी गेली की ते घर सोडून मग टिपरी फेकायची आणि वाकायचं नाही ती फेक्ताना ताठ उभे राहून फेकायची Happy

ममो, किती छान लेख! प्रतिसादही मस्त! त्या निमित्ताने आठवणींचा खजिनाच उघडला.
वर लिहिलेले बहूतेक खेळ आम्ही खेळायचो जोडीला आमच्याकडे रंगित लाकडी लगोर ते स्क्रॅबल असे बरेच काही होते. पण ते वयच असे होते की साधी छत्रीची तार असो नाहीतर मुंबईहून आणलेला मेकॅनो सगळ्यातच जीव रमायचा. सगळ्यांचीच लहान-मोठी आंगणं आपली वाटायची. मैत्रीणीला कंटाळा आला असेल तर तिच्या ताईसोबत खेळायचे. मारुतीच्या देवळाबाहेर छान मंडप होता. शनिवार सोडल्यास फारशी वर्दळ नसे, मंडपाच्या खांबांना पकडत खांब खांब खांबोल्याही खेळायचो. अजून एक उद्योग म्हणजे कुंपणाला अडूळसा लावलेला असे त्याच्या फुलांचा मध चोखत फिरणे.
मामी, ते चिकाचा आरसावाले झाड रानभेंडीचे ?
इथे लेक लहान असताना टिचरचा निरोप आला होता की जीम मधे सॉक हॉकी खेळतो तर समजावून सांगा. हे सॉक हॉकी म्हणजे जीमच्या गुळगुळीत लाकडी जमिनीवर नुसते सॉक्स घालून घसरणे कळल्यावर लहानपणी पावडर टाकून घसरण्याचा खेळ खेळायचो ते आठवून साधर्म्याची गंमत वाटली होती.

सर्वांना मनापासून धन्यवाद... सगळेच प्रतिसाद मस्तच आहेत, मजा येतेय वाचताना. जणू ते दिवस पुन्हा अनुभवते आहे असच वाटतंय.

स्टॅच्यु आणि प्लांचेट ह्या दोन चा उल्लेख कोणी केला नाहिये. स्टॅच्यु खेळताना मला लगेचच इतकं हसू यायचं विनाकारण ही आऊट होणारी मी कायम पहिलीच असे. आणि प्लॅनचेट दुपारी घरात झोपाझोप झाली की होत असे. फारच भारी , गूढ अद्भुत वाटायचं तेव्हा. अगदी दबक्या आवाजात बोलणं वगैरे ...

अजून एक कोण म्हणत टक्का दिला ? आता नीट आठवत नाहीये पण एकमेकांना विचारायच असायचं त्यात का टकका दिला ते .. आणि एक जॉली Proud राजा राणी चोर शिपाई. आणि अजून एक टिपरी नेच असायचा ज्याच्यावर राज्य असेल त्याने तीन ढांगा मारून टिपरी ठेवायची आणि इतरांनी जिथून पहिली ढांग मारली तिथून स्वतःची टिपरी त्याच्या टीप्रिला मारायची. Happy

लेख आवडला.
टिपरीपाणी, लंडन- लंडन-लंडन, कटिंग द केक, जंगलजिम, सीसॉ, झोके, घसरगुंडी, दिवे गेलेले असताना, लपाछपी. यात मुले अंगावरचे शर्टस बदलून मुद्दाम शर्ट दिसेलसे लपत मग धोप्पा होइ.
स्टॅच्यु व जॉली मस्तच. मला जॉली काढायची कधीच लक्षात रहात नसे.
विषामृत, जमीन की पाणी, लंगडी.
नाव-गाव-फळ-फूल मध्ये जाम मजा येई.
अरे लिंगोरचा/लगोरी कोणी बोलले आहे का वरती? म्हणजे उल्लेख केलाय का? आजकाल या पेट पिव्हजचा धसका घेतलाय. Wink
आट्यापाट्या मुले खेळत आम्ही मुलीही खेळत असू पण फार फार क्वचित. क्रिकेटही अगदी एखाद्या वेळेसच.
पिवळी फुलपाखरे किती होती तेव्हा. त्यांच्या मागे काँग्रेस गवताचे झाडोरे घेउन लागणे, कैर्‍या पाडणे, लोकांच्या दाराला कडी लावून मग बेल वाजवून पळणे असे नतद्रष्ट प्रकारही केलेत.
>>>> कुंपणाला अडूळसा लावलेला असे त्याच्या फुलांचा मध चोखत फिरणे
हां टणटणीची म्हणजे घाणेरीची फुले.
भातुकलीमध्ये दाण्याच्या मध्ये गूळ चेपून लाडू करणे वगैरे प्रकार केलेल आहेत.
नकाशावरती अनवट गाव शोधून ते विचारायचं आणि इतरांनी ते शोधून दाखवायचं.
पिसे, ग्रीटिंगज गोळा करणे, संग्रह करणे.
@अबुवा - अरे वा केवढा मोठा झोपाळा होता तुमच्याकडे. माझ्या एका मैत्रिणीकडे पितळी कड्यांचा असाच मस्त ऐसपैस झोपाळा होता.
>>>>>अमरवेलीचे चष्मे
हाहाहा. अरे कोणी गुलमोहराच्या अंगठ्या केल्यात की नाही? आणि ते गुलमोहराचे आंबटगोड तुरे खाणे. झेंडूचे खोबरे खाणे.
>>>>>>आमच्या छोट्या इमारतीला ८ पायऱ्यांचा जिना होता हळूहळू आम्ही ५ व्या ६ व्या असे करत करत ८व्या पायरीवरून म्हणजे अख्या जिन्यावरून खाली उडी मारायला जमवले होते...
बाप रे दात पडायचा ना Sad
अळी-मिळी-गुप-चिळी ..... जो पहीला बोलेल त्याची जीभ काळी.
वयानी मोठ्या ताया म्हणजे आदर्श. त्यांचे ग्रुप्स, त्यांच्या गप्पा भारी वाटत.
प्राथमिक शाळेत डबा खायच्या सुट्टीत, ९ वी १० वी च्या मुली येउन गालगुच्चे घेत. अगं ही बघ किती गोड आहे- अगं ती बघ ना किती गोड आहे करत. गाल लाल होत.

ओह प्लॅन्चेट! आम्ही रात्री करायचो. जमिनीवर खडूने अल्फाबेट्स, आकडे, आणि 'येस'/'नो' चे गोल आखून, डबीवर बोटं धरून.
मोठी भावंडं/मित्रमंडळी काय काय पुड्या सोडायची त्या खर्‍या वाटायच्या. फक्त नॅचरल कॉजेसमुळे गेलेल्यांनाच बोलवायचं असतं, तेही मरणोत्तर तीन वर्षांनी वगैरे. प्रश्न विचारून झाले की 'जा आता' असं स्पष्ट सांगायचं, नाहीतर ते आत्मे तिथेच राहातात आणि त्रास देतात वगैरे वगैरे.
एक 'अनुभवी' मैत्रीण एकदा 'आवाहन' करताना "तुम्ही आला असाल तर 'येस'वर जा, नसाल तर 'नो'वर जा" म्हणाली होती आणि मला जे अतोनात हसू यायला लागलं की पुढे कितीतरी दिवस आम्ही प्लॅन्चेट करू शकलो नाही! Lol
न आलेला आत्मा 'नो'वर कसा जाईल?!

Pages