मसाला डालबाटी

Submitted by दिनेश. on 28 May, 2009 - 17:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

बाटिसाठी
दोन कप बरिक रवा. एक मोठे गाजर, अर्धा टिन स्वीट कॉर्न, अर्धा कप दूध, मीठ
सारणासाठी
तीन मोठे बटाटे उकडून, अर्धा टिन स्वीट कॉर्न, धणे जिरे पावडर एक चहाचा चमचा, लाल तिखट एक चहाचा चमचा, मूठभर बेदाणे, हवे तर काजू तूकडा मुठभर
डाळी साठी
एक कप तुरिची डाळ, अर्धा कप इतर कुठलीही डाळ, अर्धा कप आवडले कडधान्य ( मूग, चवळी आदी ), तीन चार लाल मिरच्या ( सांडगी असल्या तर उत्तम ) तीन चार हिरव्या मिरच्या, धणा जिरा पावडर, दोन चहाचे चमचे, हळद, हिंग, मीठ, लाल तिखट व कोथिंबीर

लागेल तसे तेल व तूप

क्रमवार पाककृती: 

बाटिसाठी
रव्यात तीन चहाचे चमचे तूप वा तेल घालून हाताने चोळून घ्या. मग त्यात गाजर बारिक किसून घाला. स्वीट कॉर्न बारिक वाटून घाला. दुध व मीठ घालून शक्यतो पाणी न वापरता फार घट्ट नाही वा फार सैल नाही असे मळा ( रवा असल्याने थोड्या वेळाने मिश्रण घट्ट होणार हे लक्षात ठेवा )

सारणासाठी
उकडलेले बटाटे कुस्करा, पण फार बारिक करु नका. त्यात स्वीट कॉर्नचे अख्खे दाणे व बाकीचे जिन्नस घालून हलक्या हाताने एकत्र करा. मळू नका.

रवा निदान अर्धा तस तरि भिजवून ठेवा. मग त्याचे लिंबाएवढे गोळे करा. तेलाचा हात लावून त्याची पारी करा. त्यात सारण घाला. मग बाट्याचे तोंड बंद करा. हलक्या हाताने दाबून पेढ्यासारखा आकार द्या.
एका डिशला तेलाचा हात लावा. त्यावर बाट्यांचा एक थर द्या. वरुन थोडे तूप वा तेल लावा. गरम ओव्हनमधे दहा मिनिटे ठेवा. एका बाजूने झाल्या की परतून घ्या. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग यायला हवा. ओव्हन नसेल तर या बाट्या तव्यावर वा पॅनमधेही भाजता येतात. आधी थोडा वेळ झाकण ठेवा, मग झाकण काढून भाजा.

डाळीसाठी
सर्व डाळी व कडधान्य हळद व हिंग घालून शिजवा. तेल वा तूप तापवून त्यात लाल वा सांडगी मिरच्या तळून घ्या व कुस्करा. त्यातच हिरव्या मिरच्या परता. टोमॅटोचे तूकडे घाला, तेल वा तूप सुटेपर्यंत परता.
मग त्यावर शिजलेली डाळ घाला. मीठ घाला. तिखट व मसाले घालून उकळा. शक्यतो साखर वा गुळ घालू नका. सारण उरले असेल तर तेहि डाळीत घाला. वरुन कोथिंबीर घाला.

डिशमधे बाट्या घ्या, चमच्याने जरा दाबून तूप घाला व वरुन डाळ घालून खा.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

पारंपारि़क डाळ बाटी करताना, भाजण्याचे तंत्र जमवावे लागते. निखार्‍यावर भाजल्याची चव घरी आणता येत नाही. त्या मानाने या बाट्या भाजायला सोप्या आहेत. लवकर भाजल्या जातात.
मसाल्याची डाळ नको असेल तर साधे वरण करता येते. त्याला तूपाची जिर्‍याची फोडणी द्यायची. व हिरव्या मिरच्या आणि दाणे यांची चटणी घ्यायची. वरुन लिंबाचा रस पिळायचा.

माहितीचा स्रोत: 
सलत सूर सनईचा, हि कादंबरी वाचल्यापासून मला डाळबाटीचा ध्यासच लागला. एका राजस्थानी ढाब्यावर अस्सल चीज खाल्ली. ते बघून प्रयोग करु लागलो. आणि ..
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! क्रुति तर चवीश्ट वाटतेय्... वन डिश मिल.

दिनेश, दाल-बाटी बरेच दिवस केली नसल्यामुळे विसरल्यासारखी झाली होती. तुमची मस्त रेसीपी पाहुन मी या वीकेंडला नक्की करणार.

एक सूचना,
रेसिपी तयार करताना ती सर्वांना दिसायला हवी असल्यास खाली 'ग्रूप' अशी एक लिन्क दिसते ती क्लिक करुन 'सार्वजनिक' चा चेकबॉक्स निवडा. असे न केल्यास रेसिपी फक्त ग्रूप मेम्बर्सनाच दिसते. धन्यवाद.
-मदत समिती.

आभार मदत समिती, हे मला माहित नव्हते. आता काही करता येईल का ?

दिनेश, पाककृती 'संपादन' मध्ये जाऊन वर सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक करता येईल.

फार्मिंगटन कितीकसे लांब आहे. करायला घेतल्या की फोन कर. डाळ शिजुन आणि बाट्या बेकुन होइपर्यंत मी पोचेनच Happy

त्याला म्हणजे 'you know you' ना भाई Wink

सिंडे, फोने फकस्त खाताना... तोवर पोचलीस तर मिळु शकेल Wink

आमच्या गावात मारवाडी समाजातल्या लग्नात काय अप्रतीम डालबाटी करतात! बरोबर चुरमा! अहाहा!

१ शन्का आहे.
ह्यात फक्त स्वीट कोर्न च वापरायचे असतात का? सारणात आणि पारिसाठी.
त्यच्याशिवाय इतर काही वापरता येते का सारणात आणि पारिसाठी. ?

स्वीट कॉर्न वाटून पारित मिसळन्याने, ओलसरपणा व कुककुरीतपणा दोन्ही मिळते.
सारणात, कुठलेही दाणे, जसे मटार, तूर चालतील.
सारणात गाजराचा किस आहेच. (त्याच्याजागी दूधी, काकडी, भोपळा वगैरेचा किस वापरता येईल.)
शक्यतो पाणी न वापरता पारीचे पिठ मळायचे आहे, त्यामुळे ओलसरपणासाठी काहितरी घालावे लागेल.

दालबाटी कशा बरोबर खातात? रेसिपी तर छान वाटत आहे.

इंदूरात खास प्रसंगी दाल बाटीचा बेत असतो - त्याच्या जोडीला चुरमे के लड्डू, बटाट्याची भाजी, आंबट तिखट चटणी हे असतातच. पण नुसत्या कणकेची भरपूर तूप घालून केलेली बाटी किंवा बाफला तिथल्या मुंबईकरांना (अस्मादिक त्यातच)कधी रुचल्या नाहीत, त्यापेक्षा ही कृति छान वाटते.

दालबाटी खायची पण एक पद्धत आहे. बाटी हाताने कुस्करून त्यावर दाल घालून हातानेच खायची. बाटीचा तुकडा मोडून डाळीत बुडवून खाणार्‍या मंडळींना यजमान लगेच (प्रेमाने) हे शिकवतात.

दालबाटीबरोबर एखादी चटणी असेल तर खायला मजा येते. (त्यावेळी वरण प्लेन असावे). डाळ मसालेदार असेल तर तूपाशिवाय काही नकोच.

दिनेशदा'
सांडगी मिरची ही बाजारात मिळणारी लाल मिरचीची काही जात आहे का?
की तिचा सांडग्यांशी काही संबंध आहे?

सांडगी मिरची म्हणजे दह्यात मोहरीपुड, हळद, हिंग, मीठ इत्यादी घालून ते मिरच्यात भरतात व त्या मिरच्या वाळवतात. या मिरच्यांचे अनेक उपयोग आहेत. नूसत्या तळून खातात किंवा दहिभात, पोहे, आमटी यामधे तळून, कुस्करुन टाकता येतात. मूगाची खिचडी, कटाची आमटी, फणसाची भाजी यातही घालता येतात. मुंबईत सहज मिळतात.

दिनेशदा घरी क्रीम स्टाईल कॉर्न आहे बरंच. पारीसाठी रव्यामधे ते मिसळलं तर चालेल का? ओलसरपणा आणी कुरकुरीत पणा येण्यासाठी? कदाचित दूध वगळावं लागेल मग असं वाटतं.