श्रीमती मेधा पाटकर - आस्था चळवळीची

Submitted by चिनूक्स on 14 December, 2009 - 13:44

तेंडुलकरांनी विविध आंदोलनांना वेळोवेळी दिलेला पाठींबा, सामाजिक चळवळीमध्ये घेतलेला सक्रीय सहभाग हा त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा एक विलक्षण भाग होता. विवेक पंडितांची श्रमिक संघटना असो, श्रीमती मेधा पाटकरांची आंदोलनं असोत, किंवा खैरनारांची तडफदार कारकीर्द, तेंडुलकर या सार्‍यांच्या पाठी उभे राहिले. वेळोवेळी त्यांची बाजू घेतली, त्यांच्या वतीनं भांडलेही. असं करताना आपले हितसंबंध धोक्यात येतील, किंवा आपली लोकप्रियता कमी होईल, याचा तेंडुलकरांनी विचार केला नाही. इतर मराठी साहित्यिकांप्रमाणे लोकानुनय करणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं.

Medha2.jpg

सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित होणार्‍या आदिवाशांच्या न्याय्य हक्कांसाठी प्राणपणानं लढणार्‍या श्रीमती मेधा पाटकर यांना तेंडुलकरांचं हे 'चळवळं' रूप फार जवळून अनुभवता आलं. तेंडुलकरांच्या सक्रीय सहभागामुळं मेधाताईंच्या आंदोलनाला बळ मिळालं.

आपलं सर्वस्व पणाला लावून गेली अनेक वर्षं आदिवाशांसाठी शासनकर्त्यांविरुद्ध लढा देणार्‍या या ज्येष्ठ व आदरणीय सामाजिक कार्यकर्तीचं हे मनोगत...

******

तेंडुलकर गेल्याला वर्षं होऊन गेलं, हे अजूनही खरं वाटत नाही. तसेही ते कुठे कुणाच्या अध्यातमध्यात होते? कुठे समाजाच्या वा साहित्याच्या धकाधकीत, चकमकीत झळकत होते? कधी स्पर्धेत उतरल्याचे वा जिंकल्याहरल्याचे दिसत होते? नाही. तरीही ते असायचे. नुसते असायचेच नाहीत, तर पाहत असायचे. घडामोडींच्या चक्रभेदात कधीतरी त्यांचं भाष्य कानी आलं किंवा वाचायला मिळालं तर ते धीरगंभीर स्तंभागत भासायचे. या नश्वर आयुष्यातून त्यांचं उठून जाणं घडूच कसं शकतं? तेही माझं भेटणं राहून गेलं असताना? "घाई करू नका. कामाच्या धावपळीत नको. शांतपणे या. काळजी घ्या. मी आहे इथेच. निवांत", अशी त्यांची संथ वाक्यं कानात घुमत व लाजवतही असताना?

तेंडुलकरांचा पिंडच चिकित्सकाचा. त्यांच्याशी सहज, सलगीच्या बोलण्यातही चिकित्सा असायचीच. आपल्या 'खोलीत' व तंद्रीत असल्यागत, तरी परखड भाष्य करीतच संवाद पुढे नेण्याची त्यांची हातोटीच. तिथेही इथूनतिथून सर्व घडामोडी त्यांच्यापर्यंत कशा पोहोचत असतील, कुणाकडून, हा प्रश्न आपल्यालाच छ्ळायचा. अगदी सत्ताधीशांच्या मूल्यघसरणीपासून ते नर्मदेच्या निर्णयप्रक्रियेपर्यंत त्यांचं मत असायचं आणि ते नेमकं गरिबांच्या, पीडितांच्या बाजूचं. आम्हांलाही स्पष्ट संदेश व समर्थक मिळायचा. साहित्य संमेलनाच्या निमितानं व धर्मांधतेविरुद्धच्या आक्रोशाने, सत्ताधीशाच्या उर्मटतेला त्यांचा जवाब गोळ्या घालण्याइतकाच कठोर असायचा. त्यावर वादंग माजायचा. सर्वांनाच माहीत असायचं की, तेंडुलकरांच्या हातात कलमाशिवाय दुसरं हत्यार येणे नाही, तरीही चर्चाचर्वण व्हायचंच. मात्र आपली चीड व्यक्त करून तेंडुलकर अनेकांना विचार करायला भाग पाडायचे.

नर्मदेवर मोठंच ऋण ठेवून गेले तेंडुलकर. त्यांची पायखूणही कुठेतरी नर्मदेच्या खो‍र्‍यात अजून असेल, असंच वाटतं. ते माझ्यासह आले ते एका प्रदीर्घ मुलाखतीच्या निमिताने. त्यावेळी त्यांची प्रकृती ठीकठाक असायची म्हणून काय झालं, ते चक्क बोटीसारख्याच डोलणार्‍या बसमधून हापेश्वरपर्यंत प्रवास करून पोहोचले. भरडजवळच्या होळीत अंधाराचा तुकडा निवडून नाचणार्‍या आदिवासी पोरींना पाहून भरपूर हसले. रात्रभर डोमखेडीच्या होळीत, ढोलांच्या दणकट आवाजातही नाजूक संवेदनेने सर्व टिपत राहिले. कित्येक किलोमीटर चालले, माळ चढले, नदी पार करून गेले. त्यानंतर कुठेही, केव्हाही आंदोलनाच्या कार्यक्रमांना हजर राहिले. कधी 'मी बोलणार नाही', अशी अट घालायचे, कधी 'कशाला त्यांना पत्र लिहायला सांगता' म्हणायचे, परंतु प्रत्येक संकटसमयी 'तें' सही करायला हजर असायचे. त्यांचं पंतप्रधानांना व्यक्तिगत पत्र गेलं वा त्यांनी मुख्यमंत्र्यांना आग्रहानं लिहिलं की लगेच भरभरून प्रतिसाद देण्याइतपत सरकार संवेदनशील नव्हतं, नाही - परंतु आदिवासींनाच उखडून टाकले जाण्याविरुद्धचा संताप तेंडुलकरांची सहजसाथ कधीही न आटू देणारा असाच होता. अन्यायाविरुद्धही केवळ भावनेपोटी नव्हे, तर पूर्ण विचारांती 'तें' आपली बाजू मांडायचे, घ्यायचे. मोजक्या शब्दांत.

नंदीग्रामच्या हत्याकांडानंतर सर्वांच्या सहीने जाहीर करण्याच्या पत्राचा एक मसुदा त्यांच्याकडे गेला. अनेक मान्यवरांच्या मान्य-अमान्यतेचा विचार करून तो काहीसा सौम्य झाल होता. तेंडुलकरांनी तो बाजूला ठेवून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करणारा, भर्त्सना करणारा दुसरा मसुदा स्वत: लिहून पाठवला. कदाचित ते त्यांचं स्वत: लिहिलेलं असं शेवटचं आंदोलनकारी पत्र असेल. त्यांचा सहजसुंदर आधार, जनचळवळींना पाठींबा हा हिशेब मांडण्याच्या पलीकडचा आणि कुठलीही प्रतिष्ठा नव्हेच, तर निष्ठा व्यक्त करणारा होता. नर्मदा बचाओ आंदोलनावर फिल्म काढण्यासाठी म्हणून इंग्लंडच्या निकोलस क्लॅक्सक्टन या पारितोषिकविजेत्या चित्रपटनिर्मात्याने तेंडुलकरांना गाठलं होतं. तासन् तास अनेक दिवस त्या पटकथेवर काम केल्यानंतरही, शबाना आझमीने त्या लघुपटात काम करण्याचं कबूल केल्यावरही, लघुपट फार व्यक्तिवादी होत आहे, हे चळवळीला शोभेसं होणार नाही, असं माझं म्हणणं तत्काळ मान्य करून त्यांनी सर्व काम बाजूला ठेवलं. त्यांच्या मनाचा मोठेपणा, तसंच निर्व्याज सहयोग हा आंदोलनासाठी एक ठेवा होता. याबाबत बाबा आमट्यांशीच त्यांचं साधर्म्य मानायला हवं.

श्रमिक संघटना व अन्य चळवळींवर चित्रपट निर्मितीसाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील त्यांच्या कार्यकाळात तेंडुलकर फिरायचे तेव्हाही, त्यांना असलेलं चळवळींचं भान, चळवळींची सखोल जाण व कार्यकर्त्यांविषयीची नि:स्पृह स्नेहभावना जाणवायची, पदोपदी. थोरामोठ्यांच्या नादी न लागता ते आपल्या चिंतनात गढलेले असायचे आणि अगदी 'सामान्य' म्हणवल्या जाणार्‍या व्यक्ती, घटना, गाण्या-बजावण्यावरही खूप प्रेम करायचे. मिश्किल चेहराही पाघळला की तसं स्पष्ट जाणवायचं. त्याचवेळच्या त्यांच्या बरोबरच्या प्रवासात मुकुंद सावंतसारख्या कुशल फोटोग्राफरवरची त्यांची माया आणि गाडीत आमच्या डब्यातच चुकून टपकलेल्या नेत्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून मारलेल्या गप्पा अजून मनावर गोंदलेल्या आहेत, नोंदल्या नसल्या तरी. 'उंबरठा' चित्रपटापर्यंत समाजकार्याच्या क्षेत्रातील त्यांची मनोमन टिपलेली व प्रकट केलेली समज अन् विश्लेषण अमूल्य झाले आहेत, ते त्यांच्या अशाच घडामोडींच्या पलीकडे, जनात नि मनात उतरून हुडकण्याच्या वृत्तीमुळे.

कार्यकर्त्यांशी निवडकच तरीही सूचक बोलणारे तेंडुलकर सामाजिक मुद्द्यांवर भरभरून लिहून गेले म्हणूनच त्यांचे विचार हे जागतिकीकरण, उदारीकरण वा उपभोगवादी विकासाच्या विरुद्ध होते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. म्हणूनच एका माध्यम-मित्राने 'एन्रॉन'ला पाठिंबा, म्हणजेच एन्रॉनविरोधी लढ्याला विरोध दर्शवण्यासाठी त्यांना प्रकल्प दाखवण्याच्या निमित्ताने नेले, त्यांच्या भेटीचा फोटो सगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापवून आणला तरी तेंडुलकर आंदोलनाच्या विरोधी भूमिका घेणार नाहीत, हे माहीत असल्याने आम्हीही त्यांना कधी त्याबद्दल विचारलं नाही.

तेंडुलकरांसह त्यांच्याच मंतरलेल्या खोलीत घालवलेले, नव्हे जपलेले क्षण आज आयुष्याच्या कोर्‍या वहीतील सुकल्या पण न सडलेल्या, सुंदर, निरंतर काष्ठ झालेल्या फुलागत भासताहेत. नर्मदेवर, आंदोलनांवर बोलणं सुरू करूनही तेंडुलकर कधी व्यक्तिगत आयुष्यावर यायचे ते कळायचंही नाही. व्यक्ती समष्टीतील अंतर सहज पुसणे फार थोड्यांना, थोरांनाच जमतं. तेंडुलकर त्यातील एक. स्वत:चं व्यक्तिगत आयुष्य ते फारच कमी उलगडायचे. मन हादरून गेलेलं आपणच जाणवून घ्यायचं. ते जाणवूही द्ययचे नाहीत. आपल्या मात्र मनात शिरायचे. नेमकं ओळखून म्हणायचे, "फार थकलेल्या दिसताहात. निराशा तर नाही ना? आली तरी कळू शकते म्हणा. पण तुमच्या ओठी येऊन चालणार नाही. पोटी तर नाहीच नाही. सारं संपल्यागत वाटलं की तुम्ही सारी मंडळी आहात, हेच मला जाणवतं". शिवाय आणखीही काहीकाही. तेंडुलकर गेल्यानंतर आता हे सगळं सांगावं तर व्यक्तिगत नात्याचा दावा करण्यासारख्ण होईल आणि त्याचा जपला सुगंधही निष्प्राण होईल. नकोच. तरी तेंडुलकरांची त्यांच्या एकटेपणातही आमच्यावर असलेली नजर, की पाखर, आम्हां कार्यकर्त्यांना हळवं करून जायची. साध्यासुध्या संवादातही ते 'राष्ट्रीय समानता' पेरायचे. साहित्यिकाची संवेदना रणनीतीवरील भाष्यात उमटायची.सत्तास्थानावर बसलेल्यांचा पर्दाफाश करायचे, तितक्याच प्रखरतेने सामाजिक मंचांची, त्यावरील कार्यकर्त्यांचाही पोलखोल करायचे. चार-दोन शब्दांतच. स्पष्ट, तरी सौम्य. त्यांच्या संपर्कातल्या एका माध्यमकर्त्याने आमच्यावर, माझ्यावर, केलेली टीका ऐकून, वाचून म्हणायचे, "सोडून द्या हो. ते जागतिकीकरण व खाजगीकरणाच्या बाजूचे आहेत. त्यामुळे आपली भूमिका थोडी बदलणार आहे? मला सगळं कळतंय. तुम्ही स्वत:ला जपा". नकळत ते स्वत:लाही 'आमच्या' भूमिकेत सामावून घ्यायचे. अशावेळी आदरार्थी शब्दही फार आपुलकीचे, एकेरीच जाणवायचे. तेंडुलकरांचं व्यक्तिमत्त्व तसं होतं - मलाच काय, अनेकांना ते आपलेच जवळचे नि:स्पृह मित्र भासावेत, असं.

कार्यक्रमात भेटले की गर्दीतही तेंडुलकर शांतपणे भेटायचे. स्वत:ही सेलिब्रिटी बनून राहायचे नाहीत, आणि इतरांच्या पुढेमागे तर अजिबात उभे ठाकायचे नाहीत. म्हणूनच त्यांना 'विरळा' ही उपाधी शोभून दिसते. या वेगळे व विरळेपणातही चाललेली त्यांच्या मनाची घालमेल, अंतरातील विश्लेषण प्रक्रिया व नातेजोडीचे मनस्वी प्रयत्न मला जाणवायचे. त्यांतील कशाकशावरही भाष्य करणं जमायचं नाही म्हणून कधीमधी त्यांना पत्र लिहावं लागायचं. 'तें'चं त्रोटक, पण सूचक, मोहक पत्र आणि आपले मात्र अघळपघळ यांतला फरक व्यक्तिमत्त्वातलाच, हे जाणवून कसेकसेच वाटले तरी एका संवाद-भेटीत असे भेद मिटायचे. प्रिया, सुषमा, तनुजा, राजू या सार्‍या स्वतंत्र, वेगळ्या व्यक्तिमत्त्वांना, अनेक कलाकारांना, विद्या आपटेसारख्या जिव्हाळ्याच्या सहयोगीला नाही का ते स्नेहभावे गुंफायचे? ते नाहीत तर सारे विखुरतील का दोर तुटल्यागत?

मनस्वी वृत्ती हेच खरं मोठेपणाचं, सखोल विचारांचंही लक्षण. भावनाशीलता ही विचारांना मारक नव्हे, तर पूरक ठरणारी अशी तेंडुलकरांकडे होती. त्यातूनच ते ठाम तरी नम्र असायचे. 'चिंता : स्वरूप व उपाय' या डॉ. प्रदीप पाटकरांच्या पुस्तकप्रकाशनाच्या कार्यक्रमात तेंडुलकर फार थकल्या अवस्थेत भेटले. भाषणाच्या ओघात मानसशास्त्रावरील पुस्तक असताना मानसशास्त्र व शास्त्रज्ञांवरच घसरले. त्यांची ही मनमोकळी बातचीत - काही लपवाछपवी नसलेली, फार लोभस होती. कामाच्या ओढाताणीत, तत्कालीक उद्दिष्टांपोटी, हा सहवास भरभरून घेऊ न शकल्याची हळहळ ते अनेकांसाठी मागे ठेवून गेले, हे नक्की. खरंतर प्रिया, राजू व पत्नीही गेल्यावर सोबतीसाठी हपापलेले तरी एकलयात्रेचे वारकरी असे तेंडुलकर खचले होते. कशाकशासाठी, कौटुंबिक जबाबदारी म्हणून काय करावे लागते आहे, याबद्दल क्वचित कुणाजवळ बोलून जात होते, परंतु एवढ्या दिपवत्या कर्तबगारीच्या या साहित्यिक-कलाकाराचे एकटेपण समजण्यासाठीही त्यांचे 'साथी' बनण्याचे धाडस फार कमी व्यक्तींमध्ये होते, हेच खरं. प्रियाच्या पुस्तकप्रकाशनासाठी हट्टानं झटणारे, जिव्हाळा वाटेल त्या व्यक्ती-कार्यासाठी सतत झुरणारे तेंडुलकर हे केवळ 'तें'नी लिहिलेल्या पत्रांतून व्यक्त होणारे नव्हते. त्यांच्याशी शांत, प्रदीर्घ, मानवीय संवाद हाच एक विरळा अनुभव होता. तो तोडून ते सार्‍या जगाच्या पलीकडे निघून गेले. आपण गेल्यानंतर श्रद्धांजली सभा, लेख असं काही नको, असं ते सांगून गेले होते. आयुष्याची निरर्थकता तेव्हा त्यांना जाणवली असेल का? आता त्यांच्या सार्थक व अतुलनीय योगदानाबद्दल आपण लिहायचं, बोलायचं ते आपल्या समाधानासाठी. ते हयात असताना जमलं नाही, ते आपल्याच विश्वात निघून गेल्यावर तेंडुलकरांना कोण सांगणार? हिशोबी जगात बिनहिशोबी वृत्तीचा हा समृद्ध माणूस अखेर किती काळ टिकणार?

**********

श्रीमती मेधा पाटकर यांचं छायाचित्र www.narmada.org यांच्या सौजन्याने.
या लेखातील काही भाग पूर्वी अन्यत्र प्रकाशित.

**********

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम लिहिलंय..ह्या मोठ्या अनुभव संपन्न माणसांचं विश्वच वेगळं असतं की अनुभवाची प्रत्येक पायरी चढतांना ते विश्व अधिक समृद्ध, प्रगल्भ आणि सामान्यांपासून वेगळं होत जातं कोण जाणे.

धड ना पाटकर धड ना तेंडुलकर>>>>

तीरकस मग तुम्ही लिहा की. तेंडुलकर किंवा पाटकर, दोन्हींबद्दल वाचायला मिळणे चांगलेच. आणि खास करून दुसरे कोणी त्यावर मेहनत घेऊन, आपला वेळ खर्च करुन लिहत असेल तर, नाही का?

मला तर आवडला.

चिन्मय... मस्त झालाय लेख.. !
ह्या मालिकेतले लालन सारंग, रोहिणी हट्टंगडी ह्यांचे लेख सर्वात जास्त आवडले होते.. त्यानंतर हा.. Happy

विजय तेंडुलकरांची लेखमाला म्हटल्यावर त्यांच्यावरचेच लेख अपेक्षित आहेत. सगळे लेख वाचले नाहियेत पण जे वाचलेत त्यात चिन्मयची मेहनत दिसून येते. आपल्याला जागेवर बसल्याबसल्या या मुलाखती, लेख वाचायला मिळताहेत हे काय कमी आहे? (आता माझी मुलाखत घेतली तर काळं कुत्रं सुद्धा वाचणार नाही, पण विषय सुद्धा एका टॅलेंटेड व्यक्तीचा अन बोलणारेही तितकेच टॅलेंटेड किंवा कर्तृत्ववान म्हटल्यावर अबव्ह अ‍ॅव्हरेज तर नक्कीच, फडतूस अजिबात नाही).

चिनूक्ष, दर्जेदार नेहमी प्रमाणेच. या लेखमालेचे पुस्तक, किंवा इथेच कायमस्वरूपी उपलब्ध असणे गरजेचे आहे.

अप्रतिम. मन भरून अन भारून टाकणारी ही लेखमाला बंद होणार नाही अशी आशा. Happy

आता त्यांच्या सार्थक व अतुलनीय योगदानाबद्दल आपण लिहायचं, बोलायचं ते आपल्या समाधानासाठी >> अगदी, अगदी. यासाठी तर आहेच, पण 'इथे' तयार होत चाललेला एक महत्वाचा दस्तावेज हेही महत्व आहेच. मोठी माणसे मोठ्या माणसांबद्दल किती बोलतात? अन त्यातलं किती आपणा-सामान्यांपर्यंत पोचतं?
हे सारे दिवे. वाट दाखवणारे. प्रकाश दाखवणारे. या प्रकाशात आपण कितपत अन काय काय बघून घ्यायचं, ते आपलं आपल्यावर. बाकी दिवे त्यांचं काम करणारच. Happy

चिनुक्स, सुंदर लेखमाला! तेंडुलकरांबद्द्ल या लेखमालेतुन नवनवीन माहिती मिळते आहे! ते नर्मदा बचाव आंदोलनशी पण संमंधित होते हे वाचुन त्यांच्याबद्द्लचा आदर अजुनच वाढला आहे!

पु. ले. शु,!

चिनूक्सच्या श्रमाला दाद. मात्र लेख विषय असलेया व्यक्ती वादग्रस्त .त्यांचे कौतुक करण्याचे कारण नाही....

>मात्र लेख विषय असलेया व्यक्ती वादग्रस्त .त्यांचे कौतुक करण्याचे कारण नाही....
ही प्रतिक्रीया पण लवकरच ऊडवली जाईल. Happy

सुंदर लेख...!!
<< मुख्यमंत्र्यांना आग्रहानं लिहिलं की लगेच भरभरून प्रतिसाद देण्याइतपत सरकार संवेदनशील नव्हतं >>
सरकार आणि संवेदना ही दोन परस्परविरोधी टोकं आहेत जे कधिच एकत्र येवु शकत नाही. हे अजुनही मेघाजींना कळलेले दिसत नाही.