सध्या आपल्याकडे थंडी पडली आहे. पहाटे व रात्री एकदम थंड तर दुपारी बऱ्यापैकी गरम असे विषम हवामान अनेक ठिकाणी आहे. आता पुढचे ३ महिने हवेतील अॅलर्जिक सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढत जाईल. मग या लेखाच्या शीर्षकात लिहिल्याप्रमाणे बऱ्याच जणांना फटाफट शिंका येत राहतील. त्यापुढे जाऊन सर्दी अथवा नाक बंद होणे, डोळे चुरचुरणे आणि एकूणच बेजार होणे अशा अवस्था येऊ शकतील. एकंदर समाजात या त्रासाचे प्रमाण लक्षणीय आहे आणि दिवसेंदिवस ते वाढतच आहे. या आजाराची कारणमीमांसा, लक्षणे, तपासण्या आणि उपचार या सर्वांचा आढावा या लेखात घेत आहे.
या आजाराचे शास्त्रीय नाव Allergic Rhinitis असे आहे. Rhino = नाक व itis = दाह. ‘सर्दी’ होण्याचे हे समाजात सर्वाधिक आढळणारे कारण आहे. हवेतील सूक्ष्मकण नाकात जातात आणि मग त्यांचे वावडे (allergy) असलेल्या व्यक्तीस नाकाच्या आतील पातळ आवरणाचा(mucosa) दाह होतो. परिणामी त्या व्यक्तीत खालीलपैकी काही लक्षणे दिसतात:
१. शिंका येणे
२. नाक चोंदणे व खाजणे
३. नाकातून सर्दी वाहणे
४. डोळे चुरचुरणे
५. घसा खवखवणे
६. कान अथवा कपाळ दुखणे
कारणमीमांसा
साधारणपणे असा त्रास होण्यास हवेतील काही पदार्थकण कारणीभूत ठरतात. त्यामध्ये धूळ, परागकण, बुरशीचे बीजकण (mold spores) आणि पाळीव प्राण्यांच्या संपर्कातून आलेले कण (mites) यांचा समावेश होतो. परागकण हे विविध झाडे, गवत आणि तण यांच्यातून येतात. भौगोलिक स्थानानुसार यांचे प्रमाण काही ऋतूंत वाढते. भारतात डिसेम्बर ते मार्च या काळात झाडांची पानगळ खूप होते. त्यातून सूक्ष्मकण हवेत पसरतात. अगदी घरातही गालिचे, सोफ्याची आवरणे, उशांचे अभ्रे आणि पडदे अशा अनेक वस्तूंतून धुलीकण हवेत पसरतात. याव्यतिरिक्त काही व्यावसायिकांना त्यांच्या रोजच्या कामामुळे असा त्रास सहन करावा लागतो. यात सुतारकाम, रासायनिक प्रयोगशाळा व कारखाने, शेती आणि जनावरांचे दवाखाने असे व्यवसाय येतात.
जर अशी व्यक्ती धूर, प्रदूषण किंवा तीव्र वासांच्या संपर्कात आली तर तिची लक्षणे अजून वाढतात. मुळात एखाद्याच्या शरीरात अॅलर्जिक प्रवृत्ती निर्माण व्हायला त्याची जनुकीय अनुकुलता असावी लागते. आता अशा कणांच्या (allergens) श्वसनातून नाकात पुढे काय होते ते पाहू.
अॅलर्जिची शरीरप्रक्रिया:
आपल्या प्रतिकारशक्तीचा एक भाग म्हणजे आपल्या रक्त आणि इतर स्त्रावांत असलेली प्रतिकार-प्रथिने अर्थात इम्म्युनोग्लोब्युलिन्स (Ig). त्यांचे ५ प्रकार असतात आणि त्यातला अॅलर्जिच्या संदर्भातला प्रकार आहे IgE. प्रथम अॅलर्जिक कण नाकात शिरतो. त्यावर प्रतिकार म्हणून विशिष्ट IgE तयार होते. नाकाच्या आतील आवरणात विशिष्ट पांढऱ्या पेशी असतात. हे IgE त्या पेशींवर चिकटते. आता या पेशी उत्तेजित होतात आणि काही रसायने बाहेर सोडतात. त्यातली दोन प्रमुख रसायने आहेत Histamine व Leukotrienes.
ही रसायने आवरणातील म्युकस-ग्रंथींना उत्तेजित करतात आणि मग तिथे भरपूर द्रव तयार होतो. ह्यालाच आपण ‘सर्दी’ म्हणतो. मग तेथील चेतातंतू उत्तेजित होतात आणि त्यामुळे शिंका येणे व नाक खाजणे ही लक्षणे दिसतात.
ही प्रक्रिया नाकापुरती मर्यादित नसते. ती पुढे जाऊन सायनसेस, कानातील नलिका, घसा आणि डोळे इथपर्यंत पसरते. या भागांतील पेशींत (रक्तातील) पांढऱ्या पेशी उत्तेजित होऊन लढू लागतात. परिणामी दाह होतो. नाकातील द्रवाचे प्रमाण खूप वाढल्यास त्याची धार (postnasal drip) तयार होते आणि ती आपसूक खालील श्वसनमार्गात उतरते.
दीर्घकालीन परिणाम :
अॅलर्जिक सर्दी वारंवार झाल्यास त्यातून नाकाच्या आजूबाजूच्या इंद्रियांच्या समस्या निर्माण होतात. या रुग्णांना पुढे कानाचा अतर्गत दाह होतो आणि Eustachian नलिकेचा बिघाड होतो. तसेच विविध सायनसेसचेही दाह (sinusitis) होतात.
बऱ्याचदा या रुग्णांना दमा आणि त्वचेचा अॅलर्जिक दाह बरोबरीने असल्याचे दिसते. जेव्हा विशिष्ट मोसमात अॅलर्जिक सर्दी होते तेव्हा हे आजार अजून बळावतात. एकंदरीत असे रुग्ण त्रस्त व चिडचिडे होतात.
रुग्णतपासणी:
वर वर्णन केलेले या आजाराचे स्वरूप बघता रुग्णाने योग्य त्या तज्ञाकडून नाक, घसा, कान व डोळे यांची प्रामुख्याने तपासणी करून घ्यावी. अशा तपासणीत साधारणपणे खालील गोष्टी आढळतात:
१. नाक: पातळ आवरणाचा भाग सुजलेला आणि निळसर-करडा दिसतो. कधी तो लाल देखील असतो.
२. घसा: सूज आणि रेषा ओढल्यासारखे दृश्य दिसते. टॉन्सिल्स आकाराने मोठे व सुजलेले असू शकतात.
३. कान ; दाहाची लक्षणे.
४. डोळे: लालबुंद, काहीशी सूज आलेली आणि अश्रूंचे प्रमाण वाढते.
गरजेनुसार अशा रुग्णाची छाती व त्वचेची तपासणी करतात.
प्रयोगशाळा आणि अन्य तपासण्या
अॅलर्जिचे निदान करण्यासाठी यांची मदत होते. सामान्यतः खालील दोन चाचण्या केल्या जातात:
१. रक्तातील eosinophil या पांढऱ्या पेशींचे प्रमाण मोजणे : अॅलर्जिक रुग्णात यांचे प्रमाण बऱ्यापैकी वाढते.
२. रक्तातील IgE या प्रथिनाचे प्रमाणही वाढलेले असते.
या दोन्ही चाचण्या अॅलर्जिच्या निदानासाठी पूर्णपणे खात्रीच्या (specific) नाहीत. पण त्या करण्यास सोप्या आहेत व सामान्य प्रयोगशाळांत होतात. रुग्णाचा इतिहास, तपासणी आणि या चाचण्यांचे निष्कर्ष असे सर्व एकत्रित अभ्यासल्यास रोगनिदान होते. बहुतेक रुग्णांच्या बाबतीत हे पुरेसे असते.
काही विशिष्ट मोजक्या रुग्णांसाठी याहून वरच्या पातळीवरील चाचण्या करण्याची गरज भासते. त्या अशा आहेत:
१. त्वचेवरील अॅलर्जिक तपासणी: ही करण्यासाठी विशेष प्रशिक्षित तज्ञ लागतो. रुग्णाचा इतिहास आणि राहायच्या ठिकाणानुसार ठराविक अॅलर्जिक पदार्थांची निवड केली जाते. मग असे पदार्थ इंजेक्शनद्वारा सूक्ष्म प्रमाणात त्वचेत टोचले जातात. त्यानंतर काही वेळाने टोचल्याच्या जागेवर काय प्रतिक्रिया (reaction) दिसते ते पाहतात. जेव्हा ही प्रतिक्रिया तीव्र स्वरूपाची असते, तेव्हा त्या पदार्थाची रुग्णास अॅलर्जि आहे असे निदान होते.
२. असे पदार्थ रुग्णास टोचल्यानंतर त्याच्या रक्तातील IgEचे प्रमाण मोजणे. परंतु या चाचणीचे निष्कर्ष पहिल्या चाचणीइतके विश्वासार्ह नसतात.
एक लक्षात घेतले पाहिजे. या विशिष्ट चाचण्या करूनही रुग्णास नक्की कशाची अॅलर्जी आहे याचा शोध दरवेळी लागेलच असे नाही. बऱ्याचदा ‘अमुक इतक्या पदार्थांची अॅलर्जी नाही’ असा नकारात्मक निष्कर्षच हाती पडतो ! म्हणूनच उठसूठ या चाचण्या करीत नाहीत.
उपचार :
यांचे ३ गटांत विवेचन करतो:
१. अॅलर्जिक कणांचा संपर्क टाळणे
२. नेहमीचे औषधोपचार
३. इम्युनोथेरपी
अॅलर्जिक कणांचा संपर्क टाळणे:
तसे पाहता हा उपाय सर्वोत्तम ठरेल. अर्थात हा सांगायला सोपा पण आचरायला महाकठीण आहे ! तेव्हा जेवढे शक्य आहे तेवढे टाळावे असे म्हणतो. भारतात डिसेंबर ते मार्चदरम्यान पहाटे व सकाळच्या वेळेत अशा कणांचे प्रमाण जास्त असते. त्या वेळात घराबाहेर पडणे टाळावे. तसेच धूर, धूळ व तीव्र वासांपासून जमेल तितके संरक्षण करावे. बाहेर पडताना गरजेनुसार तोंडावरील ‘मास्क’चा वापर करावा.
घरात साठणाऱ्या धुळीसाठी योग्य ते स्वच्छतेचे उपाय केले पाहिजेत. उशीचे अभ्रे, पडदे, अंथरूण आणि गालिचे यांची योग्य निगा राखणे महत्वाचे.
परागकणांची अॅलर्जी असणाऱ्या रुग्णांना मात्र वरील काळजी घेऊनही ठराविक मोसमात त्रास होतोच. तो कमी करण्यासाठी औषधोपचार गरजेचे असतात.
औषधोपचार
साधारण जेव्हा ‘सर्दी’चा त्रास सुरु होतो तेव्हा रुग्ण प्रथम घरगुती उपचारांचा अवलंब करतो. मात्र ही सर्दी जर अॅलर्जिक असेल तर त्यांचा फारसा उपयोग होत नाही. हळूहळू हा त्रास वाढू लागतो आणि रुग्णास बेजार करतो. अशा वेळेस वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. अॅलर्जिक सर्दीसाठी अनेक उपचारपद्धतींची औषधे उपलब्ध आहेत. या लेखाची व्याप्ती आधुनिक वैद्यकातील औषधांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे त्यांची जुजबी माहिती देत आहे. (ज्या वाचकांना अन्य उपचारपद्धतींची माहिती वा अनुभव असतील त्यांनी ते प्रतिसादात जरूर लिहावेत. त्याचा आपल्या सर्वांनाच फायदा होईल). खालील सर्व औषधे ही वैद्यकीय सल्ल्याविना कोणीही घेऊ नयेत ही सूचना.
औषधांचे प्रमुख गट:
१. Antihistamines : ही गोळ्यांच्या रुपात वापरतात. अॅलर्जीमुळे शरीरात जे Histamine तयार होते त्याचा ती विरोध करतात.
ही औषधे सुमारे ५० वर्षांपासून वापरात आहेत. त्यातील पहिल्या पिढीच्या गोळ्यांमुळे रुग्णास गुंगी येत असे. आता दुसऱ्या पिढीची औषधे ही त्या बाबतीत सुधारित आहेत. तरीही काहींना त्यामुळे तोंडाचा कोरडेपणा आणि त्वचेवर पुरळ येऊन खाजणे असे दुष्परिणाम जाणवतात. यावर मात करण्यासाठी आता या औषधांचे नाकात मारायचे फवारे निघाले आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण शरीरातील दुष्परिणाम फारसे होत नाहीत. मुळात अॅलर्जीविरोधी औषधे म्हणून ही विकसित झाली; पण त्यांच्या वापरानेसुद्धा काहींना (वेगळी) अॅलर्जी होऊ शकते हा विरोधाभास आहे ! ‘सर्दी’च्या अन्य काही प्रकारांसाठी ती स्वतःहून उठसूठ घेऊ नयेत.
२. Decongestants : ही औषधे चोंदलेले नाक मोकळे करतात. ती वरील गटाच्या बरोबर देतात. अलीकडे या दोन्ही गटाच्या औषधांचे मिश्रण उपलब्ध आहे.
३. नाकातील Steroidsचे फवारे: जेव्हा हा आजार दीर्घकालीन होतो तेव्हा वरील औषधांपेक्षा हे फवारे उपयुक्त ठरतात. ही औषधे आता विकसित होत तिसऱ्या पिढीत पोचली आहेत. पहिल्या पिढीतील औषधांचे नाकातून रक्तात शोषण होई व त्यामुळे शरीरभरातील दुष्परिणाम होत. आता तो भाग बराच सुधारला आहे. या औषधांमुळे रुग्णाच्या शिंका, नाक खाजणे, नाक चोंदणे आणि वाहणे ही सर्व लक्षणे कमी होतात. त्यामुळे ती वरील दोन गटांपेक्षा अधिक फायद्याची आहेत. अर्थात त्यांच्यामुळे डोळ्यांची खाज मात्र कमी होत नाही. या फवाऱ्यामुळे नाकात चुरचुरणे किंवा रक्त येणे असे तात्पुरते दुष्परिणाम होऊ शकतात.
४. Steroids च्या पोटातून घ्यायच्या गोळ्या: जेव्हा रुग्णास हा त्रास असह्य होतो व निव्वळ वरील औषधे व फवाऱ्यानी आटोक्यात येत नाही तेव्हाच याचा विचार अगदी थोड्या कालावधीकरता केला जातो; ही उठसूठ घ्यायची नसतात.
५. Antileukotrienes : वर पाहिल्याप्रमाणे अॅलर्जी प्रक्रियेत तयार होणारी अन्य एक रसायने आहेत leukotrienes. ही औषधे त्यांच्या विरोधी कार्य करतात. Antihistaminesना पर्याय म्हणून ती वापरता येतात.
औषधोपचाराबरोबर गरम पाण्याची वाफ घेणे इत्यादी पूरक उपचार उपयुक्त ठरतात.
(वरील सर्व औषधांची माहिती सामान्यज्ञान होण्याइतपतच दिली आहे. त्यांपैकी कुठलेही औषध वैद्यकीय सल्ल्याविना घेऊ नये).
इम्युनोथेरपी
हे उपचार काहीसे लसीकरणासारखे आहेत. ज्या रुग्णांना अॅलर्जीचा असह्य त्रास होतो त्यांच्या बाबतीत याचा विचार केला जातो. पण त्यासाठी रुग्णास नक्की कुठली अॅलर्जी आहे हे त्वचा-अॅलर्जी चाचणीने सिद्ध झालेले असले पाहिजे. समजा एखाद्याला गवतातून उडणाऱ्या सूक्ष्मकणांची अॅलर्जी आहे. तर या व्यक्तीसाठी त्या कणांपासून तयार केलेले अर्क (allergen extract) उपलब्ध असतात. त्या अर्काच्या गोळ्या जिभेखाली ठेवून घेतात. संबंधित अॅलर्जीचा मौसम सुरु होण्याच्या ४ महिने अगोदर हे उपचार सुरु करतात. हे उपचार दीर्घकाळ घ्यावे लागतात. त्याने फरक पडल्यास पुढे काही वर्षे चालू ठेवतात.
समारोप
अॅलर्जिक सर्दी हा समाजात बऱ्यापैकी आढळणारा आजार आहे. साधारण ३०% लोकांना तो असतो. मुलांतील त्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. हा आजार वरवर दिसायला साधा वाटला तरी प्रत्यक्षात तसा नसतो. या त्रासाने पिडीत रुग्ण त्या मोसमात अक्षरशः पिडलेला असतो. त्या त्रासाने त्याच्या कामावर व दैनंदिन जीवनावर आणि कौटुंबिक स्वास्थ्यावरही बऱ्यापैकी परिणाम होतो. काहींना तर दर ३ सेकंदांना एक अशा वेगाने शिंका येतात. अशा रुग्णांना त्या संपूर्ण मोसमात नैराश्य येते. हा आजार नाकापुरता मर्यादित न राहता अन्य इंद्रियांवर परिणाम करू शकतो. काही जणांना याच्या बरोबरीने दम्याचाही त्रास असू शकतो. म्हणून त्याकडे वेळीच लक्ष देणे आणि योग्य ते उपचार करून घेणे आवश्यक ठरते.
****************************************************************************************************
**२ शॉटस. पण त्यामुळे अ
**२ शॉटस. पण त्यामुळे अॅलर्जीचा त्रास एकदम थांबला आहे.>>>
बरे झाले. शुभेच्छा !
धन्यवाद कुमार.
धन्यवाद कुमार.
पोलन अॅलर्जी करता एकाने
पोलन अॅलर्जी करता एकाने 'नाकपुडीला बाहेरुन वॅसलीन लावायचे' असा उपाय सुचवला हल्लीच. त्याला पोलन चिकटतात व त्यामुळे त्रास कमी होतो हे कारण आहे. मिश्टर सुनिधी यांना हा त्रास फार होतो. वॅसलीन लावायला सुरु केल्यावर फार कमी झालाय त्रास. ते लावत रहायचे असते काहीकाही तासांनी.
वॅसलीन >>
वॅसलीन >>
सोपा घरगुती उपाय समजला.
चांगला उपाय सांगितलात सुनिधी.
चांगला उपाय सांगितलात सुनिधी.
माझा एक मित्र नाकपुडीला आतून
माझा एक मित्र नाकपुडीला आतून विक्स लावायचा या त्रासासाठी....
अजून एक घरगुती उपाय काही
अजून एक घरगुती उपाय काही जणांना लागू पडला आहे. मी तो अरुण टिकेकर यांच्या पुस्तकात वाचला, जो त्यांचा स्वानुभव आहे. त्यांना जुन्या पुस्तकांची दुकाने धुंडाळण्याचा जबरदस्त छंद होता. तिथल्या धुळीने प्रचंड शिंका येऊन ते बेजार होत.
मग त्यांनी एक कप कोऱ्या चहामध्ये अर्धे लिंबू पिळूनचे मिश्रण बराच काळ नियमित घेतले. त्यांना खूप फरक पडला.
माझ्या माहितीतील एक दोघांनाही याचा चांगला उपयोग झाला आहे.
वैज्ञानिक दृष्टीने पाहता,
कोऱ्या चहामधील काही विशिष्ट अँटिऑक्सिडंट आणि लिंबातील क जीवनसत्व यांचा एकत्रित उपयोग होत असावा.
वरचे उपाय सोपे आहेत.
वरचे उपाय सोपे आहेत. माहितीबद्दल आभार !
अर्रे मस्त व्हॅसलिन करुन
अर्रे मस्त व्हॅसलिन करुन पाहीन.
व्हॅसलिन चांगला उपाय आहे. पण
व्हॅसलिन चांगला उपाय आहे. नाकात व्हॅसलिन लावण्यापेक्षा बेनड्रिल परवडलं म्हणणार होतो पण तुम्ही बाहेरुन म्हणताय. आतुन लावलं पाहिजे ना? बाहेरुन लावलं तर कसा फरक पडला विचार करतोय. हनिट्रॅप होतो का बाहेरुन लावुन?
सालाबादप्रमाणे सध्या
सालाबादप्रमाणे सध्या भारतातील ऍलर्जीचा हा मोसम.
घराघरांत शिंकांचे आवाज घुमू लागले आहेत..,.
मुलांमधील वाढत्या प्रमाणातील ऍलर्जीची जनुकीय कारणे शोधण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. त्या दृष्टिकोनातून एक मोठा संशोधन प्रकल्प चालू आहे :
https://medicine.iu.edu/news/2023/12/grant-funds-research-on-maternal-in...
मूल गर्भावस्थेत असताना जर त्याच्या आईच्या फुफ्फुसांमध्ये eicosanoid या प्रकारातील विशिष्ट मेद पदार्थ जास्त असतील तर ते त्या मुलामध्ये संक्रमित होतात. त्याच्या भविष्यातील ऍलर्जीशी त्यांचा संबंध असावा या गृहीतकावर हे संशोधन चालू आहे.
आमच्याकडे सध्या सर्दीची साथ
आमच्याकडे सध्या सर्दीची साथ आहे, तिचे वैशिष्ट्य:
सर्दी साधारण ४-५ दिवस रहाते. त्यात काही औषधे - अँटीहिस्टामाईन, अँटीएलर्जीक, सिनारेस्ट वगैरे घेतली, काही घरगुती उपाय वाफ घेणे काढे वगैरे, काही आयुर्वेदिक उपाय यांनी तात्पुरते बरे वाटते, नाक वाहणे, डोळ्यात पाणी येणे, शिंका तात्पुरत्या कमी होऊन थोडा आराम मिळतो.
पण या साथीत यातील कुठलिही औषधे, उपाय काम करेनात. अगदी मिनिटभर सुद्धा अराम नाही. वाफ घेत असताना बरे वाटे आणि मग थांबले की लगेच नाक वाहणे सुरू.
त्यामुळे चार दिवस सतत नाक वाहणे, डोळ्यात पाणी शिंका सुरू आणि काम करणे अशक्य झाले होते.
माझा आणि माहितीतील तिघांचा अगदी हाच अनुभव या साथीत.
मानव
मानव
सहमती आणि सहानुभूती !
म्हणूनच मी लेखात अनुभवाचे बोल लिहीले आहेत :
त्रासाने पिडीत रुग्ण त्या मोसमात अक्षरशः पिडलेला असतो. त्या त्रासाने त्याच्या कामावर व दैनंदिन जीवनावर आणि कौटुंबिक स्वास्थ्यावरही बऱ्यापैकी परिणाम होतो.
.......
या महिन्यात नववर्षाची सुरुवात होते. साधारण या काळात सांस्कृतिक उपक्रमही जोरात असतात. आपणही नवे काही करावे असं बरंच काही वाटत असतं. परंतु हा त्रास आपल्या उत्साहाचे अक्षरशः शोषण करतो.
यंदा फेब्रुवारी मार्च हा
यंदा फेब्रुवारी मार्च हा भारतातील (निदान पश्चिम महाराष्ट्रात) एलर्जीचा मौसम गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत बराच बरा गेला हा अनुभव.
यंदा बहुधा हवेत पानगळीचे सूक्ष्म कण बरेच कमी होते. ते डोळ्यांसाठी सुखावह ठरले. गेल्या कित्येक वर्षात या महिन्यांमध्ये डोळ्यांना समाधान लाभले !
धुळीचे वादळ हा प्रकार जवळजवळ नव्हता.
हा नैसर्गिक बदल असाच दरवर्षी टिकावा ही इच्छा !
यावर्षी बेक्कार ट्री पोलन
यावर्षी बेक्कार ट्री पोलन होते. फार फार त्रास झाला. झार्टॅक+फ्लोनेस. अजुनही घेते आहे.
अरे नेमका आज हा धागा वर आला,
अरे नेमका आज हा धागा वर आला, आणि आजच दुपारी साट साट शिंका देऊन थकल्यावर एक बेनेड्रिल घेऊन झोप काढली. गेले दोन दिवस थोडं लाकुड काम/ गवतात काम इ. झालं. नाकावर फडकं बांधायचा आळस केलेला. त्यामुळेच काहीतरी ट्रिगर झालं असावं.
अरेरे ! म्हणजे परदेशात वेगळी
अरेरे ! म्हणजे परदेशात वेगळी परिस्थिती होती तर . . .
. . .
सध्या पश्चिम महाराष्ट्रातील एप्रिल एका अर्थाने त्रासदायक ठरत आहे. दिवसाचे तापमान 40 C च्या पुढे जाते परंतु मध्यरात्र ते पहाट या दरम्यान एकदम गारवा पडतो. या बऱ्याच तापमान फरकामुळे पुन्हा एकदा श्वसनविकार वाढलेले दिसतात.
Pages