आ..आ... च्छी ! अर्थात अ‍ॅलर्जिक सर्दी

Submitted by कुमार१ on 31 December, 2018 - 00:23

सध्या आपल्याकडे थंडी पडली आहे. पहाटे व रात्री एकदम थंड तर दुपारी बऱ्यापैकी गरम असे विषम हवामान अनेक ठिकाणी आहे. आता पुढचे ३ महिने हवेतील अ‍ॅलर्जिक सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढत जाईल. मग या लेखाच्या शीर्षकात लिहिल्याप्रमाणे बऱ्याच जणांना फटाफट शिंका येत राहतील. त्यापुढे जाऊन सर्दी अथवा नाक बंद होणे, डोळे चुरचुरणे आणि एकूणच बेजार होणे अशा अवस्था येऊ शकतील. एकंदर समाजात या त्रासाचे प्रमाण लक्षणीय आहे आणि दिवसेंदिवस ते वाढतच आहे. या आजाराची कारणमीमांसा, लक्षणे, तपासण्या आणि उपचार या सर्वांचा आढावा या लेखात घेत आहे.

या आजाराचे शास्त्रीय नाव Allergic Rhinitis असे आहे. Rhino = नाक व itis = दाह. ‘सर्दी’ होण्याचे हे समाजात सर्वाधिक आढळणारे कारण आहे. हवेतील सूक्ष्मकण नाकात जातात आणि मग त्यांचे वावडे (allergy) असलेल्या व्यक्तीस नाकाच्या आतील पातळ आवरणाचा(mucosa) दाह होतो. परिणामी त्या व्यक्तीत खालीलपैकी काही लक्षणे दिसतात:
१. शिंका येणे
२. नाक चोंदणे व खाजणे
३. नाकातून सर्दी वाहणे
४. डोळे चुरचुरणे
५. घसा खवखवणे
६. कान अथवा कपाळ दुखणे

कारणमीमांसा
साधारणपणे असा त्रास होण्यास हवेतील काही पदार्थकण कारणीभूत ठरतात. त्यामध्ये धूळ, परागकण, बुरशीचे बीजकण (mold spores) आणि पाळीव प्राण्यांच्या संपर्कातून आलेले कण (mites) यांचा समावेश होतो. परागकण हे विविध झाडे, गवत आणि तण यांच्यातून येतात. भौगोलिक स्थानानुसार यांचे प्रमाण काही ऋतूंत वाढते. भारतात डिसेम्बर ते मार्च या काळात झाडांची पानगळ खूप होते. त्यातून सूक्ष्मकण हवेत पसरतात. अगदी घरातही गालिचे, सोफ्याची आवरणे, उशांचे अभ्रे आणि पडदे अशा अनेक वस्तूंतून धुलीकण हवेत पसरतात. याव्यतिरिक्त काही व्यावसायिकांना त्यांच्या रोजच्या कामामुळे असा त्रास सहन करावा लागतो. यात सुतारकाम, रासायनिक प्रयोगशाळा व कारखाने, शेती आणि जनावरांचे दवाखाने असे व्यवसाय येतात.
जर अशी व्यक्ती धूर, प्रदूषण किंवा तीव्र वासांच्या संपर्कात आली तर तिची लक्षणे अजून वाढतात. मुळात एखाद्याच्या शरीरात अ‍ॅलर्जिक प्रवृत्ती निर्माण व्हायला त्याची जनुकीय अनुकुलता असावी लागते. आता अशा कणांच्या (allergens) श्वसनातून नाकात पुढे काय होते ते पाहू.

अ‍ॅलर्जिची शरीरप्रक्रिया:
आपल्या प्रतिकारशक्तीचा एक भाग म्हणजे आपल्या रक्त आणि इतर स्त्रावांत असलेली प्रतिकार-प्रथिने अर्थात इम्म्युनोग्लोब्युलिन्स (Ig). त्यांचे ५ प्रकार असतात आणि त्यातला अ‍ॅलर्जिच्या संदर्भातला प्रकार आहे IgE. प्रथम अ‍ॅलर्जिक कण नाकात शिरतो. त्यावर प्रतिकार म्हणून विशिष्ट IgE तयार होते. नाकाच्या आतील आवरणात विशिष्ट पांढऱ्या पेशी असतात. हे IgE त्या पेशींवर चिकटते. आता या पेशी उत्तेजित होतात आणि काही रसायने बाहेर सोडतात. त्यातली दोन प्रमुख रसायने आहेत Histamine व Leukotrienes.
ही रसायने आवरणातील म्युकस-ग्रंथींना उत्तेजित करतात आणि मग तिथे भरपूर द्रव तयार होतो. ह्यालाच आपण ‘सर्दी’ म्हणतो. मग तेथील चेतातंतू उत्तेजित होतात आणि त्यामुळे शिंका येणे व नाक खाजणे ही लक्षणे दिसतात.
ही प्रक्रिया नाकापुरती मर्यादित नसते. ती पुढे जाऊन सायनसेस, कानातील नलिका, घसा आणि डोळे इथपर्यंत पसरते. या भागांतील पेशींत (रक्तातील) पांढऱ्या पेशी उत्तेजित होऊन लढू लागतात. परिणामी दाह होतो. नाकातील द्रवाचे प्रमाण खूप वाढल्यास त्याची धार (postnasal drip) तयार होते आणि ती आपसूक खालील श्वसनमार्गात उतरते.

दीर्घकालीन परिणाम :

अ‍ॅलर्जिक सर्दी वारंवार झाल्यास त्यातून नाकाच्या आजूबाजूच्या इंद्रियांच्या समस्या निर्माण होतात. या रुग्णांना पुढे कानाचा अतर्गत दाह होतो आणि Eustachian नलिकेचा बिघाड होतो. तसेच विविध सायनसेसचेही दाह (sinusitis) होतात.
बऱ्याचदा या रुग्णांना दमा आणि त्वचेचा अ‍ॅलर्जिक दाह बरोबरीने असल्याचे दिसते. जेव्हा विशिष्ट मोसमात अ‍ॅलर्जिक सर्दी होते तेव्हा हे आजार अजून बळावतात. एकंदरीत असे रुग्ण त्रस्त व चिडचिडे होतात.

रुग्णतपासणी:

वर वर्णन केलेले या आजाराचे स्वरूप बघता रुग्णाने योग्य त्या तज्ञाकडून नाक, घसा, कान व डोळे यांची प्रामुख्याने तपासणी करून घ्यावी. अशा तपासणीत साधारणपणे खालील गोष्टी आढळतात:

१. नाक: पातळ आवरणाचा भाग सुजलेला आणि निळसर-करडा दिसतो. कधी तो लाल देखील असतो.
२. घसा: सूज आणि रेषा ओढल्यासारखे दृश्य दिसते. टॉन्सिल्स आकाराने मोठे व सुजलेले असू शकतात.
३. कान ; दाहाची लक्षणे.
४. डोळे: लालबुंद, काहीशी सूज आलेली आणि अश्रूंचे प्रमाण वाढते.
गरजेनुसार अशा रुग्णाची छाती व त्वचेची तपासणी करतात.

प्रयोगशाळा आणि अन्य तपासण्या
अ‍ॅलर्जिचे निदान करण्यासाठी यांची मदत होते. सामान्यतः खालील दोन चाचण्या केल्या जातात:
१. रक्तातील eosinophil या पांढऱ्या पेशींचे प्रमाण मोजणे : अ‍ॅलर्जिक रुग्णात यांचे प्रमाण बऱ्यापैकी वाढते.
२. रक्तातील IgE या प्रथिनाचे प्रमाणही वाढलेले असते.

या दोन्ही चाचण्या अ‍ॅलर्जिच्या निदानासाठी पूर्णपणे खात्रीच्या (specific) नाहीत. पण त्या करण्यास सोप्या आहेत व सामान्य प्रयोगशाळांत होतात. रुग्णाचा इतिहास, तपासणी आणि या चाचण्यांचे निष्कर्ष असे सर्व एकत्रित अभ्यासल्यास रोगनिदान होते. बहुतेक रुग्णांच्या बाबतीत हे पुरेसे असते.
काही विशिष्ट मोजक्या रुग्णांसाठी याहून वरच्या पातळीवरील चाचण्या करण्याची गरज भासते. त्या अशा आहेत:

१. त्वचेवरील अ‍ॅलर्जिक तपासणी: ही करण्यासाठी विशेष प्रशिक्षित तज्ञ लागतो. रुग्णाचा इतिहास आणि राहायच्या ठिकाणानुसार ठराविक अ‍ॅलर्जिक पदार्थांची निवड केली जाते. मग असे पदार्थ इंजेक्शनद्वारा सूक्ष्म प्रमाणात त्वचेत टोचले जातात. त्यानंतर काही वेळाने टोचल्याच्या जागेवर काय प्रतिक्रिया (reaction) दिसते ते पाहतात. जेव्हा ही प्रतिक्रिया तीव्र स्वरूपाची असते, तेव्हा त्या पदार्थाची रुग्णास अ‍ॅलर्जि आहे असे निदान होते.

२. असे पदार्थ रुग्णास टोचल्यानंतर त्याच्या रक्तातील IgEचे प्रमाण मोजणे. परंतु या चाचणीचे निष्कर्ष पहिल्या चाचणीइतके विश्वासार्ह नसतात.
एक लक्षात घेतले पाहिजे. या विशिष्ट चाचण्या करूनही रुग्णास नक्की कशाची अ‍ॅलर्जी आहे याचा शोध दरवेळी लागेलच असे नाही. बऱ्याचदा ‘अमुक इतक्या पदार्थांची अ‍ॅलर्जी नाही’ असा नकारात्मक निष्कर्षच हाती पडतो ! म्हणूनच उठसूठ या चाचण्या करीत नाहीत.

उपचार :
यांचे ३ गटांत विवेचन करतो:
१. अ‍ॅलर्जिक कणांचा संपर्क टाळणे
२. नेहमीचे औषधोपचार
३. इम्युनोथेरपी

अ‍ॅलर्जिक कणांचा संपर्क टाळणे:

तसे पाहता हा उपाय सर्वोत्तम ठरेल. अर्थात हा सांगायला सोपा पण आचरायला महाकठीण आहे ! तेव्हा जेवढे शक्य आहे तेवढे टाळावे असे म्हणतो. भारतात डिसेंबर ते मार्चदरम्यान पहाटे व सकाळच्या वेळेत अशा कणांचे प्रमाण जास्त असते. त्या वेळात घराबाहेर पडणे टाळावे. तसेच धूर, धूळ व तीव्र वासांपासून जमेल तितके संरक्षण करावे. बाहेर पडताना गरजेनुसार तोंडावरील ‘मास्क’चा वापर करावा.
घरात साठणाऱ्या धुळीसाठी योग्य ते स्वच्छतेचे उपाय केले पाहिजेत. उशीचे अभ्रे, पडदे, अंथरूण आणि गालिचे यांची योग्य निगा राखणे महत्वाचे.
परागकणांची अ‍ॅलर्जी असणाऱ्या रुग्णांना मात्र वरील काळजी घेऊनही ठराविक मोसमात त्रास होतोच. तो कमी करण्यासाठी औषधोपचार गरजेचे असतात.

औषधोपचार

साधारण जेव्हा ‘सर्दी’चा त्रास सुरु होतो तेव्हा रुग्ण प्रथम घरगुती उपचारांचा अवलंब करतो. मात्र ही सर्दी जर अ‍ॅलर्जिक असेल तर त्यांचा फारसा उपयोग होत नाही. हळूहळू हा त्रास वाढू लागतो आणि रुग्णास बेजार करतो. अशा वेळेस वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. अ‍ॅलर्जिक सर्दीसाठी अनेक उपचारपद्धतींची औषधे उपलब्ध आहेत. या लेखाची व्याप्ती आधुनिक वैद्यकातील औषधांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे त्यांची जुजबी माहिती देत आहे. (ज्या वाचकांना अन्य उपचारपद्धतींची माहिती वा अनुभव असतील त्यांनी ते प्रतिसादात जरूर लिहावेत. त्याचा आपल्या सर्वांनाच फायदा होईल). खालील सर्व औषधे ही वैद्यकीय सल्ल्याविना कोणीही घेऊ नयेत ही सूचना.

औषधांचे प्रमुख गट:

१. Antihistamines : ही गोळ्यांच्या रुपात वापरतात. अ‍ॅलर्जीमुळे शरीरात जे Histamine तयार होते त्याचा ती विरोध करतात.
ही औषधे सुमारे ५० वर्षांपासून वापरात आहेत. त्यातील पहिल्या पिढीच्या गोळ्यांमुळे रुग्णास गुंगी येत असे. आता दुसऱ्या पिढीची औषधे ही त्या बाबतीत सुधारित आहेत. तरीही काहींना त्यामुळे तोंडाचा कोरडेपणा आणि त्वचेवर पुरळ येऊन खाजणे असे दुष्परिणाम जाणवतात. यावर मात करण्यासाठी आता या औषधांचे नाकात मारायचे फवारे निघाले आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण शरीरातील दुष्परिणाम फारसे होत नाहीत. मुळात अ‍ॅलर्जीविरोधी औषधे म्हणून ही विकसित झाली; पण त्यांच्या वापरानेसुद्धा काहींना (वेगळी) अ‍ॅलर्जी होऊ शकते हा विरोधाभास आहे ! ‘सर्दी’च्या अन्य काही प्रकारांसाठी ती स्वतःहून उठसूठ घेऊ नयेत.

२. Decongestants : ही औषधे चोंदलेले नाक मोकळे करतात. ती वरील गटाच्या बरोबर देतात. अलीकडे या दोन्ही गटाच्या औषधांचे मिश्रण उपलब्ध आहे.

३. नाकातील Steroidsचे फवारे: जेव्हा हा आजार दीर्घकालीन होतो तेव्हा वरील औषधांपेक्षा हे फवारे उपयुक्त ठरतात. ही औषधे आता विकसित होत तिसऱ्या पिढीत पोचली आहेत. पहिल्या पिढीतील औषधांचे नाकातून रक्तात शोषण होई व त्यामुळे शरीरभरातील दुष्परिणाम होत. आता तो भाग बराच सुधारला आहे. या औषधांमुळे रुग्णाच्या शिंका, नाक खाजणे, नाक चोंदणे आणि वाहणे ही सर्व लक्षणे कमी होतात. त्यामुळे ती वरील दोन गटांपेक्षा अधिक फायद्याची आहेत. अर्थात त्यांच्यामुळे डोळ्यांची खाज मात्र कमी होत नाही. या फवाऱ्यामुळे नाकात चुरचुरणे किंवा रक्त येणे असे तात्पुरते दुष्परिणाम होऊ शकतात.

४. Steroids च्या पोटातून घ्यायच्या गोळ्या: जेव्हा रुग्णास हा त्रास असह्य होतो व निव्वळ वरील औषधे व फवाऱ्यानी आटोक्यात येत नाही तेव्हाच याचा विचार अगदी थोड्या कालावधीकरता केला जातो; ही उठसूठ घ्यायची नसतात.

५. Antileukotrienes : वर पाहिल्याप्रमाणे अ‍ॅलर्जी प्रक्रियेत तयार होणारी अन्य एक रसायने आहेत leukotrienes. ही औषधे त्यांच्या विरोधी कार्य करतात. Antihistaminesना पर्याय म्हणून ती वापरता येतात.
औषधोपचाराबरोबर गरम पाण्याची वाफ घेणे इत्यादी पूरक उपचार उपयुक्त ठरतात.
(वरील सर्व औषधांची माहिती सामान्यज्ञान होण्याइतपतच दिली आहे. त्यांपैकी कुठलेही औषध वैद्यकीय सल्ल्याविना घेऊ नये).

इम्युनोथेरपी

हे उपचार काहीसे लसीकरणासारखे आहेत. ज्या रुग्णांना अ‍ॅलर्जीचा असह्य त्रास होतो त्यांच्या बाबतीत याचा विचार केला जातो. पण त्यासाठी रुग्णास नक्की कुठली अ‍ॅलर्जी आहे हे त्वचा-अ‍ॅलर्जी चाचणीने सिद्ध झालेले असले पाहिजे. समजा एखाद्याला गवतातून उडणाऱ्या सूक्ष्मकणांची अ‍ॅलर्जी आहे. तर या व्यक्तीसाठी त्या कणांपासून तयार केलेले अर्क (allergen extract) उपलब्ध असतात. त्या अर्काच्या गोळ्या जिभेखाली ठेवून घेतात. संबंधित अ‍ॅलर्जीचा मौसम सुरु होण्याच्या ४ महिने अगोदर हे उपचार सुरु करतात. हे उपचार दीर्घकाळ घ्यावे लागतात. त्याने फरक पडल्यास पुढे काही वर्षे चालू ठेवतात.

समारोप

अ‍ॅलर्जिक सर्दी हा समाजात बऱ्यापैकी आढळणारा आजार आहे. साधारण ३०% लोकांना तो असतो. मुलांतील त्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. हा आजार वरवर दिसायला साधा वाटला तरी प्रत्यक्षात तसा नसतो. या त्रासाने पिडीत रुग्ण त्या मोसमात अक्षरशः पिडलेला असतो. त्या त्रासाने त्याच्या कामावर व दैनंदिन जीवनावर आणि कौटुंबिक स्वास्थ्यावरही बऱ्यापैकी परिणाम होतो. काहींना तर दर ३ सेकंदांना एक अशा वेगाने शिंका येतात. अशा रुग्णांना त्या संपूर्ण मोसमात नैराश्य येते. हा आजार नाकापुरता मर्यादित न राहता अन्य इंद्रियांवर परिणाम करू शकतो. काही जणांना याच्या बरोबरीने दम्याचाही त्रास असू शकतो. म्हणून त्याकडे वेळीच लक्ष देणे आणि योग्य ते उपचार करून घेणे आवश्यक ठरते.
****************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी याच फेज मध्ये आहे गेले काही वर्षे. लिवोसिट्रझिन + माँटेलुकास्ट आणि अती त्रास झाला तर सिरेटाईड चा पंप. सध्या तरी आटोक्यात आहे पण संपूर्ण फिट असं मी गेले कित्येक वर्षे नाही.

अ‍ॅलर्जिक सर्दी वारंवार झाल्यास त्यातून नाकाच्या आजूबाजूच्या इंद्रियांच्या समस्या निर्माण होतात. या रुग्णांना पुढे कानाचा अतर्गत दाह होतो आणि Eustachian नलिकेचा बिघाड होतो. तसेच विविध सायनसेसचेही दाह (sinusitis) होतात.>>>>>> दातदुखी होणे (upper jaw) हा पण एक sinusitis चा भाग असू शकतो का?

उत्तम लेख !
मला त्या जळल्या एसीमुळे दर दोन आठवडाआड सर्दी , डोके धरणे हा त्रास होतो .
डॉक्टरांनी वाफ घेत जा हा सल्ला दिलाय जो उपयुक्त ठरतोय .

मला स्वतःला पूर्वी सर्दीचा खूप त्रास प्रत्येक ऋतू बदलताना होत असे त्यानंतर मी नियमित व्यायामाला सुरुवात केल्यानंतर हा त्रास जाणवेल इतपत कमी झाला आता प्रत्येक ऋतू बदलताना मला हा त्रास होत नाही त्यामुळे नियमित व्यायामामुळे सर्दी न होण्यासाठी फायदा होतो असं माझं मत बनलं आहे ते बरोबर असेल का?
तसंच माझे 85 वर्षांचे वडील रोज झोपताना वाफारा घेऊन मग झोपतात. रोज एका लिंबाचा रस गरम पाण्यात घालून पितात. तीन किलोमीटर हळूहळू का होईना पण रोज चालतात आणि सकाळी 10 मिनिटे प्राणायाम करतात. हे उपाय ते सतत सर्दी होऊ नये व आजारी पडू नये यासाठी मुद्दामहून करतात. आणि खरंच सर्दीचे प्रमाण कमी झालं आहे

च्रप्स,
बरोबर, ते anti histamine गटातील औषध आहे.
>> मला पोलन्स ऍलर्जी चा भयंकर त्रास व्हायचा. मी allegra घेऊन टाईम काढला आहे. सटासट शिंका यायच्या एकामागे एक.
पण त्यापेक्षा बेटर उपाय म्हणजे नेती पॉट आहे, मी नेती पॉट वापरायला लागलो आणि समस्याच संपली ऍलर्जी ची.
https://en.m.wikipedia.org/wiki/Nasal_irrigation

* दातदुखी होणे (upper jaw) हा पण एक sinusitis चा भाग असू शकतो का?>>>>
होय, त्याला maxillary दातदुखी म्हणतात.

* मला त्या जळल्या एसीमुळे दर दोन आठवडाआड सर्दी , डोके धरणे हा त्रास होतो .>>>> +१०००००
‘त्या जळल्या’ या विशेषणास अनुमोदन ! मुळात ए सी हा अनैसर्गिक मार्ग आहे.ज्यांना त्रास होतो त्यांनी जरूर टाळावा. पुन्हा त्याची शास्त्रशुद्ध देखभाल कोणीच करत नाही व त्यामुळे ते आरोग्यास वाईट.

* नियमित व्यायामामुळे सर्दी न होण्यासाठी फायदा होतो असं माझं मत बनलं आहे ते बरोबर असेल का? >>>
अप्रत्यक्ष फायदा आहे हे बरोबर. एक लक्षात घ्यावे की ‘सर्दी’चे अनेक प्रकार आहेत. त्यातल्या फक्त एका प्रकाराचा या लेखात विचार केला आहे. ऍलर्जीक सर्दी व्यायामाने “बरी” नाही होणार, पण तिचा प्रतिकार करण्याची शक्ती वाढेल .

वर ए सीचा मुद्दा आला आहे. त्याच्याशी सहमत.

भारतात मी घरी तो वापरत नाही आणि कामाच्या ठिकाणी सुदैवाने तो नाहीच. उघड्या खिडक्या, मोकळी हवा आणि उन्हाळ्यात पंखा हे मला पुरेसे असते.

परदेशात होतो तेव्हा मात्र कार्यालयात सक्तीने एसी होता. मला तर त्याचा त्रास. मग माझ्या केबिन पुरते मी त्याचे सेटिंग नेहमी उबदारपणा कडेच ठेवत असे. जेव्हा माझे वरीष्ठ वा पाहुणे माझ्याकडे येत तेवढ्यापुरते मी ते थंड करत असे. अन्य ठिकाणी जाताना मी कायम जर्किंन अंगावर चढवे.

समारोप:

चर्चेत सहभागी सर्वांचे अनुभव वाचनीय आहेत. समाजात बऱ्यापैकी आढळणाऱ्या या आजाराचे अनुभव एकमेकांना यातून समजले हे चांगले झाले. अशा रुग्णांपैकी संपूर्ण समाधानी कोणी नसते. विशिष्ट मोसमात मनात भीती असतेच. या आजाराचे मूळ आपल्या जनुकांत दडलेले आहे. त्यामुळे प्रतिबंध व उपचार यांनी त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते.

यासाठीची कुठलीच उपचारपद्धती परिपूर्ण नाही. त्या प्रत्येकाची बलस्थाने व मर्यादा स्पष्ट आहेत. ज्याला ज्यामुळे बरे वाटेल तो मार्ग त्याने स्वीकारावा हे उत्तम. एखाद्याला अमुक उपचाराने बरे वाटले म्हणून त्यामुळे दुसऱ्याला वाटेलच असे नाही.

गरम वाफ आणि तत्सम घरगुती उपचार हे औषधपूरक आहेत. ते जरूर करावेत. नाकात तेल वा तूप घालणे हे आधुनिक वैद्यकानुसार अयोग्य परंतु ( येथे तुम्ही काहींनी लिहिल्याप्रमाणे) आयुर्वेदानुसार योग्य आहे. त्यामुळे असे उपाय स्वतःच्या इच्छेनुसार करावेत. अनेक औषधे घेऊन पिडलेला रुग्ण हा शेवटी स्वतःच स्वतःचा डॉक्टर होतो हे खरे !
असो…..

भारतातील येणारे २-३ महिने अशा सर्व पीडितांना सुखाचे जावोत यासाठी मनापासून शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या देखील !
लोभ असावा.

मला पण हा त्रास चांगलाच होतो, थोडी माहिती माझ्याकडून:
१) नॉन अ‍ॅलर्जिक rhinits हा अजून एक प्रकार, पोलन मुळे नाही पणवातावरणातील बाकी बदलांमुळे जसे humidity, temperature वगैरे
२) मला स्वतःला दूध आणि गहू आहारातून कमी केले की खूप फायदा होतो. Luke Coutinho चा यूट्यूब वर खूप चांगला व्हिडिओ आहे.
३) हे त्रास मानसिक तणावामुळे वाढतात.

मला साधारण थंड झोत अंगावर आला तर सर्दी होते.डोके जाम होते. नाक गळू लागते. ३-४ दिवस विकेट दर दिवशी खराब होत जाते. माझा डॉक्टर वर्गमि त्र मला अ‍ॅलेग्रा १२० + नाइस असे कॉम्बो देतो. सिनारेस्त प्रिस्क्राइब करत नाही कारण सिनारेस्ट ने गिडीनेस येतो वाहन वगैरे चालवताना प्रॉब्लेम होउ शकतो. मी मेडिको नसल्याने दिलेल्या गोळ्या मुकाट गिळतो....

सिनारेस्त प्रिस्क्राइब करत नाही कारण सिनारेस्ट ने गिडीनेस येतो वाहन वगैरे चालवताना प्रॉब्लेम होउ शकतो>>>+ 111

मी पण ही गोळी अजिबात घेत नाही, लै वंगाळ आहे ती .☺️

वरील दोन प्रतिसादांशी सहमत. सीनारेस्ट गोळीतील Chlorpheniramine हे पहिल्या पिढीतील Anti histamine आहे आणि त्यामुळे झोप येते. या पिढीतील औषधे सर्दीसाठी घेऊ नयेत. ती श्वसनमार्गात खूप कोरडेपणा आणतात. ती शक्य तितकी टाळावीत.

मीठ-कोमट पाणी गुळण्या, सितोपलादी चूर्ण-मध आणि septiline ची मला खूप मदत होते. पण आठवड्यात बरं वाटलं नाही तर मात्र डॉक्टर कडे जावं लागतं. मला समुद्रकिनारच्या दमट हवेत एकदम प्रफुल्लित वाटते, सर्दी-खोकला-घसा काहीही त्रास होत नाही.

आम्ही सिनारेस्ट घेऊन कधीही गाडी चालवली नाही; पण तरी यापुढे त्या गोळ्या घेणार नाही.
आता मलाच आठवत नाहीय की कुठून मला या गोळीचं नाव कळलं. पण सुरवातीला एका गोळीत सर्दी अगदी कमी व्हायची आणि दुसऱ्या गोळीत गायब. आजकाल तसे होत नाही (याचा अर्थ आम्ही जेम्स गोळ्यांसारख्या सिनारेस्ट खात होतो असा नाही; वर्षातून दोन-तीन वेळा सर्दी होईल तेव्हा घेत होतो. तेदेखील बंद करतोय.)

धन्यवाद बाबा कामदेव, साद आणि कुमार१ Happy

भारतात एलर्जीचा मोसम साधारण डिसेंबर चा मध्य ते मार्च ची सुरवात असा असायचा. गेली २-३ वर्षे हा पुढे सरकत चालला आहे.
यंदा मार्चचा शेवटचा आठवडा आला तरीही असे बरेच रुग्ण अजून त्रस्त आहेत.

मला पूर्वी सर्दी होत नसे. पण हिमालयात सातत्याने जाणं झालं. त्यात पीक विंटर हाय अल्टिट्युडला होतो. त्यानंतर सातत्याने सर्दीचा त्रास आहे. अनेकदा उपचार घेतले तरी त्रास होतच राहतो.

किरण, बरोबर.
टोकाचे हवामान बदल शरीर कसे स्वीकारते यावर हा त्रास अवलंबून असतो. काहींच्या बाबतीत ते सहज होत नाही.

मी Loratadine १० mg ची १ गोळी सकाळी घेतो, त्यामुळे दिवसभर त्रास होत नाही. ही non-drowsy आहे, त्यामुळे झोप येत नाही.

हवामान-ऋतु बदलाच्या आसपास / गरज पडेल तसे, एकदोन थेंब तूप कोमट करून नाकपुड्याना आतून लावायचं. खूप उपयोग होतो.

सध्या सर्दीचा मोसम आहे.
लेखात Antihistamines या प्रकारच्या औषधाबद्दल लिहिलेलेच आहे.

सावधान : खालची बातमी पहा आणि असे कधीही करू नका

“औषध खाऊन जर तुम्ही गाडीचं स्टेरिंग हाती घेत असाल तर ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. कारण सिनेअभिनेता हेमंत बिर्जे यांची हीच चुक अपघाताला कारणीभूत ठरली आणि अख्ख्या कुटुंबांचा जीव टांगणीला लागला”.

https://marathi.abplive.com/entertainment/actor-hemant-birje-accident-on...

CHIENESE सूप मध्ये किंवा जेवणात सोया सॉस वापरतात, याची मला एवढी AALERGY आहे की,
थोडं जरी सोया सॉस घस्यात गेला कि मला शिंका यायला लागतात. त्यामुळे सोया सॉस असलेले सूप घेणेच मी बंद केले आहे.

परागकणांची सिव्हिअर अ‍ॅलर्जी आहे. एक वर्षं झालं दर आठवड्याला २ शॉटस घेते आहे.
- शिंका/सर्दी
- कपाळ-घसा-कान-डोळे-नाक लाल होणे
- डोळे-कान -कपाळ राक्षसी खाजणे
एकदा तर खाजेमुळे, डोळे इतके चोळले होते की बुबुळावर चरे उठले होते.रात्री इमर्जन्सीत जाउन यावे लागले होते.
तेव्हा ठरवले शॉटस घेउन हा प्रॉब्लेम सोडवुन टाकायचा.

ॲलर्जीने त्रस्त असलेल्या सर्वांनाच यंदाचा मोसम सुखाचा जावो. योग्य ती औषधे घेऊन आपापले त्रास नियंत्रणात ठेवा.
शुभेच्छा !

Pages