मराठी भाषा गौरव दिन - स.न. वि.वि. - anudon

Submitted by anudon on 2 March, 2023 - 15:44

प्रिय सखी,

हे पत्र पाहून तुला आश्चर्य वाटेल याची मला खात्री आहे. इतक्या वर्षांनी मला तुझी आठवण झाली,
म्हणून रागावशील ही. पण तो राग घालवायला मी काही ह्या जगात नसेन. आपल्या कॉलेजमधल्या
मैत्रीला जागून मी ही माझी मर्मबंधातली ठेव तुझ्या सुपूर्द करते आहे. ह्या ठेवीबद्दल ह्या जगात कुणालाही
न सांगता निघून जाणं मला जमलं नाही. आपलं आयुष्य जरी काळावरचा बुडबुडा असलातरी, तरी
त्यात दिसलेल्या सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या पाऊलखुणा मागे ठेवण्याचा मोह होतोच, नां?

तर, त्या नात्याचा जन्मच मुळी "कां" ह्या प्रश्नासकट झाला होता. मी बासष्ट वर्षांची आणि तो चौतीसचा.
मी कशाच्याच शोधात नव्हते, काहीतरी सापडावं असं वाटण्याच्या पलिकडे गेले होते. त्याचं अर्थातच
मला माहिती नाही, पण तो मला शोधत नव्हता हे नक्की.

विश्वाने एक दार उघडलं आमच्यासाठी, आणि आम्ही त्या दारातून सहज प्रवेश केला. त्याने माझ्या
आयुष्याला परिसस्पर्श केला. ते दिवस जादूई होते. कित्येकदा रात्री झोप यायची नाही कारण झोपेत
पडणाऱ्या स्वप्नांपेक्षा मला माझं वर्तमान हवंहवसं वाटतं होतं.

माझ्या आयुष्यातले ते पहिले प्रेम खचितच नव्हते, आणि मी सुद्धा काही त्याची पहिली किंवा शेवटची
प्रेमाची व्यक्ती नव्हते. पण त्या वेळेला आम्ही प्रेमात होतो एकमेकांच्या, सगळ्या जगापासून वेगळे,
आणि ते तसं असणं फार सुंदर होतं.

वर्षभरातच मी त्याला जाऊ दिलं. प्रेमाची जादू उतरली म्हणून नाही किंवा उतरावी म्हणूनही नाही. तर
ह्या नात्याचा जीवघेणा असला तरी तोच अटळ शेवट आहे, हे मनोमनी जाणून.

लोक ज्याला प्रेम समजतात, त्याची जागा, वेळ आणि वय थोडीचं ठरलं असतं?

मी मेल्यानंतर, माझे कुटुंबिय माझ्या उरल्या-सुरल्याची आवरासावर करतील. त्यांना त्याच्या कुठल्याच
खुणा सापडणार नाहीत. सगळे पुरावे नाहिसे केले गेलेत, आणि आठवणी मनाच्या कप्प्यात बंदिस्त केल्या
आहेत. फक्त ह्या संगीताच्या चार सिडीज वगळता. त्याने ह्या सिडीज् माझ्यासाठी तयार केल्या होत्या.
त्याला मला काहीतरी मोलाचं द्यायचं होतं. त्याला मला द्यायचं होतं, काहीतरी त्याच्या प्रेमाचं, खुप जवळचं,
त्यानं मला ही गाणी दिलीत.

ह्या सिडीज् त्याचं सन्मानचिन्ह तसंच एका विदीर्ण झालेल्या हृदयाचंही !

प्रेम हा प्रश्न नव्हे, सगळं आयुष्य खर्ची न घालता अगदी सहज तुमच्या ओंजळीत येऊन पडलेलं
उत्तर आहे.

सप्रेम,
तुझीच.

("Museum of Broken Relationship" ह्या संग्रहातील एका entry वर आधारित)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>> आपलं आयुष्य जरी काळावरचा बुडबुडा असला, तरी त्यात दिसलेल्या सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या पाऊलखुणा मागे ठेवण्याचा मोह होतोच ना?
>>> विश्वाने एक दार उघडलं आमच्यासाठी, आणि आम्ही त्या दारातून सहज प्रवेश केला. त्याने माझ्या आयुष्याला परिसस्पर्श केला.
>>> प्रेम हा प्रश्न नव्हे, सगळं आयुष्य खर्ची न घालता अगदी सहज तुमच्या ओंजळीत येऊन पडलेलं उत्तर आहे

इतकं सहजसुंदर लिहिता येऊ शकतं प्रेमाबद्दल?! फार फार आवडलं! Happy

या म्यूझियममधल्या एन्ट्रीज कुठे वाचायला मिळतील?

कित्येकदा रात्री झोप यायची नाही कारण झोपेत
पडणाऱ्या स्वप्नांपेक्षा मला माझं वर्तमान हवंहवसं वाटतं होतं. > प्रेमाबद्दल हे एकदमच भारी जमलय वाक्य - नेहमीच्या प्रतिमांपेक्षा एकदमच वेगळं झालय. पूर्ण लेखामधे मी तिथेच गुंतून पडलोय.

सुरेख पत्र.

"Museum of Broken Relationship" ही कल्पनाच खूप छान आहे. प्रत्यक्ष भेट देता आली हे माझे अधिकचे भाग्य.

अप्रतिम!

कित्येकदा रात्री झोप यायची नाही कारण झोपेत
पडणाऱ्या स्वप्नांपेक्षा मला माझं वर्तमान हवंहवसं वाटतं होतं. > प्रेमाबद्दल हे एकदमच भारी जमलय वाक्य - नेहमीच्या प्रतिमांपेक्षा एकदमच वेगळं झालय. >> +१

प्रेम हा प्रश्न नव्हे, सगळं आयुष्य खर्ची न घालता अगदी सहज तुमच्या ओंजळीत येऊन पडलेलं उत्तर आहे>>> आई गं! वाह अगदी.

Museum of Broken Relationship>>> हे पुस्तक आहे का?

Museum of Broken Relationship>>> हे पुस्तक आहे का?

नाही, खरेखुरे म्यूझियमच आहे, क्रोएशियात

anudon यांना तेच अभिप्रेत आहे का हे मात्र त्याच सांगू शकतील

किती वेळा वाचलं तरी समाधानच होत नाहीये. प्रेमा बद्दल इतकं संयत, इतकं सुंदर लिहिणे अशक्य आहे. खूप आवडतं अनुदोन तुझं लेखन नेहमीच. Happy

>>>>>>>>>.त्याला मला द्यायचं होतं, काहीतरी त्याच्या प्रेमाचं, खुप जवळचं,
त्यानं मला ही गाणी दिलीत.
बेस्ट गिफ्ट!!

तुमच्या प्रतिक्रिया वाचून मला खुप आनंद झालाये. खुप हिंमत करावी लागली मला माझं लेखन टाकायला. त्यामुळे मी nervous होते, आता जरा धीर आलाय. Happy Thank you so much.

About The Museum of Broken Relationships: मी काही वर्षांपूर्वी Zagreb, Croatia मधे ह्या म्युझियमला गेले होते. तेव्हा काही entries चे फोटो काढले होते. त्यांच्या website वरून एक LA ला पण सुरू केलं आहे हे कळलं, पण अजून जायचा योग आला नाहिये. @स्वाती: तुला तिथे काही entries सापडतील. पुस्तकंही झालेलं दिसतंय प्रकाशित. https://brokenships.com/