मराठी भाषा गौरवदिन २०२३ - स.न. वि. वि. - रघू आचार्य (चिंगीस पत्र)

Submitted by रघू आचार्य on 1 March, 2023 - 09:27

प्रेषक - ओळख बघू

प्रती - शीक्रेट हाय

विषय - डायरेक्ट विषयाला हात नगंच

प्रिय आदरणिय
लाडकी नुसतीच चिंगी चिंगे

स न वि वि ( चुकलं माकलं समजून घे)
पत्रास कारण कि..

तू मला फेसबुकवर बी ब्लॉक केलंय अन इन्स्टाग्रामवर बी. इनबॉक्सात जेवण झालंय का विचारलं म्हनुन ब्लॉक करतं का कोण ? अगं ते हाय फाय पोरींचे धंदे, हितं हडळीला मिळंना बॉयफ्रेण्ड अन खईसाला मिळंना गर्लफ्रेण्ड अशी गत आपली. मंग ? हाय का न्हाई ? आपण असली थेरं केली तर कोण हाय का इचारायला आपल्याला ?

मला बी मस वाटतं का बाबा मस्त फटफटीवर गॉगल मारून, शर्टाची बटणं उघडी ठेवून रस्त्यावरून केस उडवत जावं आणि एकांद्या रापचिक आयटेमनं आपल्याला हात करून थांबवाव आणि साऊथच्या हिरोला कसं तिकडच्या हिरविनी लगेच लाईन देत्यात तसं म्हणावं " ए हिरो ! कहा निकला बे तू ? हमारी तरफ देखे बगैरे ? अकड रहा क्या मामु ? देख तेरे को दो घंटे मे नही पटाया ना तो मेरा नाम भी गजलक्ष्मी नही है "

नुसत्या आयडियेनंच गुदगुल्या व्हत्यात. अनुष्का शेट्टीसारखा माल आपल्याला पटवणार ! आयला !!!
पण च्यायला हेच डायलॉग आपल्यालाच पोरींना मारायला लागत्यात. तरी एकपण ढुंकून बघत न्हाई. फुकट फटफटीचं कर्ज झालं. बाप गाडी घेतल्यापासून रोज शिव्या घालतु. तवापास्नं रघ्याच्या भट्टीवर काम करून त्याला पैसं देतुय.

हितकं झाल्यावर आपण तुझ्याकडं बगायला सुरूवात केली. शेवटी कसं असतंय तळाला रायलेला माल असतो त्यानं आपसात झ्याटम्याट करायची असती. म्हंजी शेटलमेंट गं. आपलं काय शिंदे गट अन ठाकरे गटासारखं हाय का ? आपलं जमलच की कदी तरी.

एकच गोष्ट सांगायची व्हती. इन्स्टाग्राम वर त्या गोरट्याला पोरीवानी नाचताना व्हिडीओ टाकू नगं जास्त. जळत न्हाई गं. पण असं उघडं अंग टाकायला ते बरं दिसायला नगं व्हय ? उद्या तुझ्यावर लाईन मारतु म्हणून माझं माप काडतील पंटर लोक असलं काय वंगाळ वागू नगं. व्हिडीओ टाकण्यासारखी तू असती तर मंग नादालाच लागलु नसतो.

सगळीकडं तू ब्लॉक करून ठिवलं म्हटल्यावर मंग पत्र लिवायचंच तेवडं हातात राहिलं. तेच करतुय. रघ्याकडून लिहून घेतुय. त्यानं कायदेशीर दारूच्या लायसेनसाठी लै ठिकाणी पत्रं लिवलीत. दांडगा अनुभव हाये त्याला पत्र लिवायचा.

तुझ्या गल्लीतलं कुत्रं लैच भुकतंय अन माझ्याच मागं लागतंय. त्याचा कायतरी बंदोबस्त करून ठिव. न्हाईतर
जिस गल्ली मे तेरा घर ना हो बालमा, उस गल्ली से कभी भी गुजरना नही या गाण्यावर बंदीच आणतु का न्हाय बगच. डायरेक्ट सीएमलाच सांगीन. लैच वट हाय आपला. तुझी पण काही कामं असतील तर सांग कि मला. शेट्टीच्या बार मधी नाचायला जाती ते लै बेक्कार वाटतंय . माझ्यापेक्षा काळा टेणा तिथं तुज्यावर पैसं उडवतंय, अन तू काय बी बोलत न्हाई. त्याच्याशी हसून बोलतीस ते सहन होत न्हाई.

ते काय न्हाई, मी आता चिंगीज डिस्को नावानं बार टाकतु, तू हितंच हक्कानं नाचायला ये. डबल काय फिफ्टी फिफ्टीची पार्टनर करतु का न्हाई बग . येकदा का माझा बारचा अर्ज सायेबानी निवडणूक आयोगाकडं पाठवला कि आपलं कामच झालं. मंग नुसत्या नोटा छापायच्या अन राजाराणीचा संसार करायचा .

काय म्हण्तीस ?

पत्राचं उत्तर कळव. वाट बघ्हत आहे

तुझाच
रघूचा दोस्त जग्गू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol
ता.क.
आग ते ताक न्हाय आन ताकाची कढी बी न्हाय . रघ्याचा हात पार कामातंन गेला लिवून, लिवून. मग म्हणला ताजा कलम चा साटकट म्हंजी ता. क. लिवतो. ती उशिरा सुचलेले ज्ञान पाजाळायची सोय म्हंजी वराती मागनं घोडं आसतया. सगळं लिवल्याव डोकं खाजलं तं घालायचं पत्रात. आग पण एवढं सांगसतवर हात गेला की कामातनं रघ्याचा.
शिएमला सांगायला यळ न्हाय मला. आपून मागून न्हाय मिळलं तर हिसकावतो तू ऐकलंच आसलं तवा लै माज नाय करायचा. आपुण सिद्दा
दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे.
तू हे बी ध्यानात घे की तुझी जोडीदार पिंकी आपुण पे मरती है. आपुणच उसकु भाव नै देता.
पत्र पिंकी कडून वाचून घेऊ नाय.

Lol Lol Lol
व्हाय कान्ट दे स्टे इन देअर 'औकात' यार Wink बोट दिलं की डायरेक्ट हातच पकडतात. त्या जग्गूची लायकी आहे का मला गर्लफ्रेन्ड बनवायची? भाषा बघ त्याची. आणि म्हणे व्हिडीओ टाकू नकोस. चिप्पो असता ग हे. चीप आणि चिपको. यांना यांची जागा दाखवुनच द्यायला हवी. उद्या बघ कशी त्याला बोलावुन टांग देते मग बसेल उसासे टाकत. क्राय बेबी!! आजच रघुला पत्र देउन त्याला एकांतात बोलावुन घेते. च च रघूला नाही जग्गूला. तूही मॅडकॅपच आहेस. आणि त्या जग्ग्याच्या पाठीचं धिरडच करवते माझ्या जिम ला जाणार्‍या पैलवान बॉयफ्रेन्ड कडुन. ही इज सो सो सो माचो यु नो!!! पुरे पुरे नसेल माहीती तरी ठिके. तूच त्याच्या मागे लागू नकोस हां. आपण दोघी बी एफ एफ ना गं मग असं जळायचं नाही यार.

>>>>>.आपून मागून न्हाय मिळलं तर हिसकावतो तू ऐकलंच आसलं तवा लै माज नाय करायचा.
अर्र्र्र्र्र पोलिसकोठडीची हवा दाखवा या जग्ग्याला Sad

ए जग्या,
मुडद्या, डोळे हायती का बटणं! हिथं जो त्यो वळू व्हिडीयोला 'Hotter than the tropics' बोलतो. तुझा भूगोल कच्चा म्हणून माझा इतिहास नगं बिगडवूस. पर आता न्हाई टाकायची व्हिडीयो. माझं कसं बी धकेल, तुला तुज्या पंटरांखेरीज कुणी न्हाई. जप त्यासनी.

किती रं खोटं बोलशील? जेवण झालं का इचारतोस म्हणून ब्लॉक न्हाई केलं. उपाशी वाटतं का इचारतोस म्हणून केलं. निलाजरा मेला. तुला रं का पंचाईत. पाववडा खाया गेलतो तर बिल म्याच दिलं नि वेटरला टीप ठेवली ती बी तू उचलून घेतली. माय तुझी दिसली गल्लीत तवा लै शिणली व्हती. म्हणाली "म्या भाजी आणाया पैसे देते तर ह्यो पोरींना लिफाफे पाठवतो". रघ्याची भट्टी सोड नि जसपाल भट्टीकडं रोल पकडं. लिंबूलाईट मंदी येशील तवा जरा कुठे फ्रेंड बनशील. "बारा लडके साथ घूमे, तेरा बॉयफ्रेंड कौनसा" वाल्या पंचाईती सोड, नायतर तुझाच तेरावा घालायची येळ यायची.

ते गल्लीतल्या कुत्र्याचं घे तूच जरा मनावर. कामावर जाता-येता छळत्यात. बरं न्हाई असं. आरं, आपण काय अदानी-अंबानी न्हाई, हातावरचं पोट. शेट्टी मला "आर्टीस्ट" बोलतो, काळ्या टेणा 'शो फी, रॉयल्टी' असं समदं एकदम सोफि..स्फि..स्फि..स्टीकेटेड वागवतो. तुझ्यावानी हिडीस-फिडीस न्हाई करत त्ये. पर कुत्रे हाकलायला तूच उपेगाचा. लै नगं ताणू, तेवढं काम कर बगू. मग गणपतीच्या टैमाला "कोरियन टोकबोकी" खाऊ. बिलाची काळजी नको करू, कुत्रे गेले तर तंवर जमतील पैसे.

तुझी न्हाई, मी माझी
चिंगी

ता.क. त्यो कविता लिवतो तो दिप्या तुझाचं दोस्त हाय का रं? डीपी बदल म्हणाव त्याला.

प्रती जगन्नाथराव कांडके पाटील

मी इन्स्टा @चिन चिन चू उर्फ चिन्मयी सरदेशमुख ( चिंगी काय ? ) यांचा सोशल मिडिया मॅनेजर. त्यांच्या सर्व सोशल मिडिया प्रेझेंसवर माझी नजर असते. त्यांच्या करियरला फायदा होईल असेच फॉलोअर्स ठेवतो मी आणि तुमच्या सारख्या किरकोळ फॅन्सना ब्लॉक करतो .

पुन्हा पत्र पाठवायची तसदी घेऊ नका. गल्लीतले कुत्रे परवडले म्हणाल !

सर्वांचे आभार.
चिंगीचं उत्तर येऊ शकतं. Lol
सर्वांनी चिंगीकडून जग्याची धुलाई केलीय. Proud

दत्तात्रय साळुंके >>> ता.क. लै भारी Lol
सामो >>>> चिंगी पार फेमिनिस्टच निघाली कि. बिचार्‍या जग्याला माहिती असतं तर ? Proud
बार्सिलोना >>>> ही चिंगी सगळ्यात खतरनाक निघाली Rofl जग्याची होती नव्हती ती पण इज्जत काढली. Proud

अनिंद्य, धन्यवाद.

मेधा >>> चिंगीचा मॅनेजर Rofl
जग्याचे डोळे पांढरे झाले. Proud

भन्नाट लिहिलंय!
दसा, सामो यांनी 4 चांद लावले.
बार्सिलोना >>>> ही चिंगी सगळ्यात खतरनाक...+१.

धमाल लिहिलेय..

चिंगीचं उत्तर येऊ शकतं.>>>>>

वाचत असताना हेच डोक्यात येत होते… उत्तर येऊ द्या लौकर…

Rofl Rofl
भन्नाट लिहिलंय!
दसा, सामो यांनी 4 चांद लावले.
बार्सिलोना >>>> ही चिंगी सगळ्यात खतरनाक...+१>>>>११११११

प्रिय जग्गू,

कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की तुझ्या सततच्या पत्रांमुळे अखेर चिंगीचे मन विरघळले आणि तिच्याकडून होकार आला आहे. माझ्याकडून पत्रे लिहून घेण्याचा तुझा निर्णय अगदी योग्य होता बघ. तुझ्या निर्व्याज प्रेमभावना आणि माझे सुंदर हस्ताक्षर हे दोन्ही एकत्र आल्यावर आणखी काय होणार?
इथे मला तुला हे सांगणे जरुरीचे आहे की खबरदारीचा उपाय म्हणून सुरुवातीला मी पत्रांवर तुझे नाव टाकत नव्हतो. चिंगीचा आडदांड बाप आणि पैलवान भाऊ यांच्याकडून तुला काही अपाय होऊ नये एवढ्यासाठी आणि केवळ एवढ्याचसाठी मी ही काळजी घेतली होती. परंतु जसजसे चिंगीचे मत अनुकूल होऊ लागले तसे मी पत्रावर नाव टाकायला सुरुवात केली. इथे माझ्याकडून एक बारीकशी चूक झाली ती म्हणजे सुरुवातीला नजरचुकीने (सात-आठ वेळा) मी तुझ्याऐवजी माझेच नाव टाकले. नंतर मला माझी चूक लक्षात आली पण चिंगीचा गोंधळ उडू नये म्हणून मी माझेच नाव कायम ठेवले. या छोट्याश्या आणि अगदी नजरचुकीमुळे झालेल्या चुकीबद्दल तू मित्र म्हणून मला माफ करशील याची खात्री आहे. लग्न पुढच्या महिन्यात बारा तारखेला आहे. या लग्नाला तुझी उपस्थिती नसली तर मला फारफार वाईट वाटेल. तू चिंगीसाठी सोन्याची चेन बनवून ठेवल्याचे मला विश्वासात सांगितले होतेस. ती चेन अहेरादाखल तू चिंगीस द्यावीस असे मला वाटते. कारण चिंगी मिळाली नाही तर फकीर होण्याचा निश्चय तू मला बोलून दाखवला होतास म्हणजे तुला आता त्या चेनचा काहीच उपयोग नाही. त्या निमिताने तुझ्या निर्व्याज प्रेमाची आठवण आमच्याजवळ राहील. आम्हाला मुलगा होईल तेव्हा त्याला जग्गूमामाचे नाव द्यायचे हा निश्चय मी केला आहे हे ऐकून तुला फार आनंद होईल.

तुझा विश्वासू मित्र
रघू

मोरोबा Lol
आचार्य, धमाल लिहिले आहे.

मोरोबा Lol
एका पत्रावरून किती पत्रं येऊ शकतात ? Lol
चिंगीकडून पत्र, चिंगीच्या मॅनेजरचं पत्र आणि आता जग्गूलाच पत्र Proud
ही पण शक्यता दाखवून दिलीत. धमाल आहे हे पत्र. Lol
वाटलं नव्हतं इतक्या शक्यता दाखवून दिल्यात सर्वांनी.
आभार सर्वांचे __/\__

मूळ पत्र वाचून भाऊसाहेब पाटणकर यांचा ' पत्रे तिला प्रणयात आम्ही कित्येक होती धाडिली ' हा शेर आठवला, व त्यावरचा सी ताईंचा प्रतिसाद बघून भाऊसाहेबांचाच पुढचा शेर (धाडिली मजला तिनेही) आठवला -
पत्रातही त्या हाय तेथे काय ती लिहिते पहा,
माकडा चेहरा आपुला आरशात थोडा पहा

ह घ्या Happy

'विजू गं विजू, मी तुझ्यासाठी झुरतोय गं रात्रंदिवस' याच्याशेजारी लगेच
'आणखी महिनाभर माहेरी विश्रांती घ्यावी. माझे इथे उत्तम चालले आहे.'
हे आठवलं वरचे दोन शेर वाचून!

प्रेषक - पैचान कौन..??

प्रती - जग्गू पंटर

प्रिय (??) जग्गू यांस ,

स.न.वि.वि.

पत्रास कारण की, तुझं पत्र मिळालं... पन ते माझ्या हातामंधी पडलं म्हणून तू बचावलास जग्ग्या ... आमच्या तात्याच्या हातात पडलं असतं तर तू माझं पत्र वाचायास जित्ता राहिला नसता... असा भी आमचा तात्या तुझ्यावर लई खार खाऊन हाय बरं ..!. रघ्याच्या हातभट्टीची जादा न ओतता तू दारूच्या गिलासात पाणीच लय ओततो असं म्हणत तुला लई शिव्या घालुतोयं बघ तो...

माझ्या जग्गू राजा, तुझ्या डोस्क्यात कसं काय घुसत नाय रं.. पोरीला पटवायच्या आधी तिच्या बापाचं मन जितायचं असतं ते... आनि आमच्या तात्याच्या पोटात मंजी त्याच्या मनात घुसायचं असलं तर तो रस्ता कडक पावशेरच्या बाटलीतून जातोय बघ... तवा ते ध्यानात ठिव..

आनि एक लिवते, त्या नाक्यावरच्या गंगी भाजीवाली सोबत काय गुलूगुलू बोलत असतो रं तू सदा न् कदा .. आता मी तुझ्या चारित्र्यावर संशय नाय घेत रं पन मला नाय आवडत तू दुसऱ्या कुनाबरोबर असं बोललेलं.. ती गंगी म्हणत हुती की, जग्ग्या माझ्यावर लाइन मारूतया म्हणून... अस्सा राग आला व्हता मला तिचा.. वाटलं .. तिच्या झिपऱ्या ओढाव्या न् बदडून काढावं लई ...पन मंग वाटलं.. जाऊ दे.. ती एवढ्या खात्रीनं बोलत व्हती तवा डोस्क्यात आलं तिला बी तू मला लिवतोय तश्शीच प्रिम पत्र लिवत असल तर... आपलाच शिक्का खोटा निघाला तर...??

तुझं माझ्यावर जर खरं खरं प्रिम असलं तर त्या
रघ्याच्या पायाची आन घिऊन मला लिव तसं मगच मी इश्वास ठिविन तुझ्यावर...

आनि एक शिक्रेट गोष्ट हाय... तू त्या रघ्याची भट्टी सोड नाय तर त्याच्या संग तू बी जाशील बाराच्या भावात..
.. पोलिस त्याच्या भट्टीवर धाड टाकणार हायेत म्हने.. त्यानं मटका बी चालू केलायं नव्ह तिथं.. आता मला कसं माहित.. आरं शेट्टीनच त्याची टिप दिली नव्ह का..?? तर ते तेवढं ध्यानात राहू दे..

आनि काय रं , त्या गल्लीतल्या भटक्या कुत्र्याना कशापाय घाबरतोस तू एवढा ... त्यांचा बंदोबस्त ते कडू का गोड कुनीतरी हायेत तिथं सरकारात... ते करनार हायेत म्हणे ... ते म्हणले सगळी भटकी कुत्री धरून तिथ दूर आसामात नेणार हायेत... लई भाव मिळतोय बरं तिथ कुत्र्यापासून आमदारापर्यत सगळ्यानाच...

बरं माझ्या डोस्क्यात एक आयडिया आलीय... आपन भी पळून जाऊन लगीन करायचं का रं .. तिथ दूर आसामात जाऊन... म्हणे तिथं एक देवी हाय तिचा आशिर्वाद घेतला की, मंग संसार लई सुखाचा व्हतो... राजाराणी सारखा..!

मी काय मंते, आपन पन जोडीनं त्या देवीची खणा-नारळान वटी भरू मंग आपला बी संसार लई गोडीगुलाबीचा व्हईल... शिंदे- फडवीणासासारखाच ... नव्ह का..!

काय मंतोस..?? हाय का मग तयार..

लवकर उत्तर लिवं... वाट बघतीयं...

तुझीच

होणारी चि.सौ.का. चिंगी

रुपाली एकेक पंचेस मस्त जमलेत.
>>>>> आपला बी संसार लई गोडीगुलाबीचा व्हईल... शिंदे- फडवीणासासारखाच ... नव्ह का..!
अर्र्र!!! Lol Lol

रूपाली , सॉल्लीड जमलंय पत्रं. Lol
एक से एक पंचेस. Proud
ही चिंगी जरी रघूवर खार खाऊन असली तरी जग्गूची ती हितचिंतक दिसतेय.
कारण जग्याने आपलं प्रपोजल रिजेक्ट होणारच या १००% ग्यारण्टीसह पत्र लिहिलंय. Lol
प्रपोजल अ‍ॅक्सेप्ट होईल आणि आपल्या प्रत्येक सेकंदाचा हिशेब द्यावा लागेल,
संगीत संशयकल्लोळाला तोंड द्यावं लागेल यातलं थोडं जरी त्याला ठाऊक असतं तर त्याने हे डेरींग केलं असतं का शंकाच आहे.
चिंगीनं त्याला आढेवेढे घेत उत्तर देऊन संगीत संशयकल्लोळ हातचा राखून न ठेवता पत्रातच उघड करून संधी दिलीय.
अशी दयाळू चिंगी सर्वांना मिळो. Proud
महिला दिनाच्या विलंबित शुभेच्छा !