अंमली! - भाग ९

Submitted by अज्ञातवासी on 11 February, 2023 - 13:04

याआधीचा भाग

'जंगल! जंगल सगळ्या प्राण्यांचं असतं. लांडगा, कोल्हे, हरीण, तरस, अस्वल, वाघ, सिंह सगळे.
पण विष असतं फक्त सापामध्ये. सापाची नजर भक्ष्यावर स्थिर असते. पूर्णपणे स्थिर... लपलेला साप कुणाला दिसतही नाही, पण ज्याक्षणी साप दंश करतो, त्याक्षणी मृत्यू समोर येतो...'
बुवा प्रवचन देत होते, मानस शांतपणे ऐकत होता.
"बेटा काय वाटतं, साप हा सगळ्यात खतरनाक प्राणी आहे की दुसरं कुणी?" तो माणूस मानसजवळ आला.
...मानस फक्त हसला.
"तुम्हीच सांगा."
ती व्यक्तीही हसली, आणि बोलू लागली.
"सापापेक्षा तीक्ष्ण नजर असते, गरुडाची. आणि तो सगळ्यात वरून वाट बघत असतो, सापावर झडप घालण्याची... इथे प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी कुणासाठी तरी भक्षक आहे, आणि कुणाचं तरी भक्ष्य... हे द्वंद्वच निसर्ग समतोल ठेवतं.
...आणि इथे जगायचं कुणी, हे निसर्गच ठरवतो. म्हणून सगळ्यात महान आहे तो हा निसर्ग, ही प्रकृती!"
ती व्यक्ती एवढं बोलून दिसेनाशी झाली. मानस पुन्हा शांतपणे प्रवचन ऐकू लागला.
****
"सर."
"बोल ज्युली."
"जैनसाहेब आले आहेत, तुम्हाला भेटायचंय त्यांना."
त्याच्या कपाळावर आठी आली.
"पाठव त्यांना आत." तो म्हणाला.
थोड्यावेळाने जैन साहेब आत आले.
"माफ करा मानस साहेब, तुम्हाला तसदी दिली."
"तसदी काय त्यात जैनसाहेब? बरेच दिवस झाले आपली भेट झाली नव्हती. एकदा व्यवहार पूर्ण झाल्यावर न भेटणंच योग्य असं तुम्ही ठरवलं वाटतं?" तो हसला.
"अहो मानस साहेब असं काही नाही. किंबहुना इतका मोठा टॉवर बांधल्यावर, बऱ्याचशा लोकांशी व्यवहार करावाच लागतो. सगळे लोक तुमच्यासारखे सरळ सरळ व्यवहार करत नाही हो."
"मला मनासारखी जागा मिळाली, त्यासाठी मी काहीही करू शकत होतो."
"मानससाहेब मी तेच बोलायला आलोय, ही जागा तुमच्या मनासारखी आहे, पण काही लोकांना तुम्ही इथे असलेलं आवडत नाही. म्हणून मी तुम्हाला दुसरीकडे जागा देतो, पण ही जागा सोडा. कळकळून विनंती आहे."
"काय बोलतात जैनसाहेब?" त्याचा पारा चढला.
"जे तुम्ही आता ऐकलंत साहेब."
"जैन मूर्ख झालास का तू? तू जेवढं बोलला ना तेवढे मी दिलं तुला. फक्त या जागेसाठी. मूर्खासारखं काहीही बरळू नको."
"मानस साहेब जर तुम्ही तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवलं, तर बऱ्याच गोष्टी आपण शांततेत सोडवू शकू."
"जैन निघ इथून, नाहीतर भें** देवरे आमदाराला सांगून तुझे सगळे धंदे बंद पाडेल."
"मानस साहेब शांत रहा आणि माझं ऐका."
"मी बोललो ना निघ इथून."
"ये भाड** तुला साहेब साहेब करतोय तर जास्त डोक्यावर बसायला लागला का? त्या देवरे आमदाराची तू मला भीती दाखवतो? लाव फोन, लगेच लाव. माद***. तुला काय वाटलं, नाशिकचा इतका मोठा बिल्डर मी असाच झालो. भा*** जर तुझी ही जागा लवकर सोडली नाही ना, तर दादासाहेबांची माणसे येतील, ही काच फोडतील आणि तिथून तुला फेकून देतील. तुला इथून हाकलायचा निर्णय दादासाहेबांचा आहे. तिन्ही बाजूंनी मोकळी जागा हवी होती ना तुला? समोर तुला वाडा बघायचा होता ना? लक्षात घे त्या वाड्याच्या मालकाच्या नजरेत तू आला आहेस, आणि त्याच्या नजर जो एकदा येतो ना, त्याचा पिच्छा तो आयुष्यभर सोडत नाही. उद्या संध्याकाळपर्यंत ही जागा खाली करायची, नाहीतर संध्याकाळी खानसाहेब येतील, तुला उचलतील, आणि या खिडकीतून बाहेर फेकून देतील. समजलं?"
...सुन्न...
मानस या हल्ल्याने सुन्न झाला होता...
अनेक दिवसांनी मानसला कुणीतरी त्याची जागा दाखवली होती. इतके दिवस सर्व जगाला वाकवण्याची ताकद असणारा मानस जैनच्या या हल्ल्याने अक्षरशः निर्वस्त्र झाल्यासारखा झाला होता.
"जैनसाहेब, म...माफ करा. मला माहिती नव्हतं दादासाहेबांसाठी तुम्ही हे बोलताय."
जैनने क्षणार्धात आपला रोख बदलला.
"अहो मानस साहेब माफी कशाला मागतात? जर तुम्हाला दादासाहेबांशी बोलून बघायचं असेल तर बोलून बघा. त्यांचा काही गैरसमज असेल तर दूर करून बघा. मला तुम्हाला इथून हाकलून काय मिळणार आहे? दादासाहेबांनी इथे असलेल्या माणसाला हाकललं, हे ऐकून कोणी इथे येईल का? तुम्हीच जाऊन बोलून बघा."
"ठीक आहे जैनसाहेब तुम्ही म्हणाल तेच करतो." मानस म्हणाला.
जैनने नमस्कार केला व तो तिथून निघून गेला...
इतके दिवस सापाची नजर भक्षावर होती...
...पण आता गरुडाची नजर त्याच्यावर पडलेली होती.
****
"पप्पू."
"जी साहेब."
"गाडी वाड्यावर घे."
"शेलारांकडे?"
"हो."
"ठीक आहे साहेब."
मानस विचारचक्रात गढला होता.
थोड्याच वेळात गाडी गेटपर्यंत आली.
"थांबा कुणाला भेटायचंय?"
"दादासाहेबांना."
"नाव सांगा."
"मानस नागरे."
"तुमचं आजच्या यादीत नाव नाही. यादीत नाव असेल, तरच भेटता येईल."
"त्यांना सांगा मानस नागरे आले आहेत."
गेटवरचा माणूस हसला.
"तू पहिल्यांदा आला आहेस का वाड्यावर?"
"हो."
"मग लक्षात घे, ज्याचं यादीत नाव नसतं, त्याचं नाव दादासाहेबांना सांगितलं सुद्धा जात नाही."
असह्य...
मानसला आता या गोष्टी असह्य होत होत्या.
तो एरवीचा मानस असतो तर आत्तापर्यंत शिव्या देऊन अंगावर धावून मोकळा झाला असता.
... पण गरुडाने उचललेल्या नागासारखी त्याची अवस्था झाली होती.
"थांबा साहेब मी बोलून बघतो." पप्पू म्हणाला.
"दादा माझं नाव पप्पू. शेखावतसांच्या गाडीवरचा ड्रायव्हर कृष्णा माझा मोठा भाऊ. तो इथे नेहमी येतो, दादासाहेबही त्याला ओळखतात. त्याने जर दादासाहेबांना फोन केला, तर जाऊ द्याल ना आम्हाला आत? नाहीतर दादासाहेबांना विचारा, कृष्णाच्या लहान भावाला आत सोडू का? आमचे साहेब मोठ्या आशेने आले आहेत."
गेटवरचा माणूस विचारात पडला, व त्याने फोन लावला.
"ठीक आहे दादासाहेबांनी भेटायला बोलावलंय. लवकर जा, पाचच मिनिटं."
पप्पूने सलाम केला, गाडी आत गेली.
मानस आश्चर्याने या सगळ्या गोष्टी बघत होता.
"मानस साहेब तुम्हाला एक सांगतो, आमचे दादासाहेब म्हणजे खूप मोठ्या मनाचा माणूस. एकदा भेटलेल्या व्यक्तीला कधीही विसरत नाही. लहान मोठा असा कधीही भेदभाव करत नाहीत. जीवापाड प्रेम करतात त्यांच्या माणसावर."
"हं." मानस एवढंच म्हणू शकला.
गाडी थांबली. समोर अनेक माणसे उभी होती.
"मानस नागरे." कुणीतरी लगेच पुकारा केला.
मानस तिकडे गेला.
"त्या छोट्या हॉलमध्ये जा. दादासाहेब तिकडे बसलेत."
त्याची छाती दडपून गेली...
... इतके दिवस ज्याची जागा घेण्याचे त्याने स्वप्न बघितलं, त्या व्यक्तीला तो आज भेटणार होता.
... त्या काळ्या कातळातला वाडा त्याला खायला उठला होता.
... पदोपदी जाणीव करून देत होता, तू किती मोठा झालास तरी तुझ्याही पुढे कोणीतरी आहे. तुला एका क्षणात मात देणारी व्यक्ती तुझ्यासमोर आहे. तुझं आयुष्य कस्पटासारखं संपवून टाकणारी व्यक्ती तुझ्यासमोर आहे...
... राजशेखर जगनअण्णा शेलार...
...आणि समोरच ती व्यक्ती उभी होती...
दादासाहेब...
वेताळ...
नाशिकचा राजा...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद केशवकुल. ही माणसेच अशी आहेत हो, क्षणाक्षणाला वेगळे रंग दाखवतात.
हा भाग मोठा टाकायचा होता, पण गॅप पडला असता म्हणून इथेच थांबणं सयुक्तिक वाटलं. पुढचा भाग आता जरा उशिरा येईल.
पुन्हा एकदा धन्यवाद!

मस्तच एकदम...
दादासाहेबांचे आगमन झालेय आता वार-पलटवार वेगळ्याच उंचीवर सुरू होतील.
छोटा का होईना पण भाग टाकल्याबद्दल धन्यवाद..

<<. हे द्वंद्वच निसर्ग समतोल ठेवतं.
...आणि इथे जगायचं कुणी, हे निसर्गच ठरवतो. म्हणून सगळ्यात महान आहे तो हा निसर्ग, ही प्रकृती>>
_/\_

@धनवंती - धन्यवाद! _/\_

पण ही कथा जास्तीत जास्त मानसचीच असण्याकडे भर असेल.
दादासाहेब तुम्ही स्पेशल कॅमिओ म्हणा हवं तर. अर्थात हा कॅमिओ फार महत्वाचा आहे. मी मुद्दामहून दादासाहेब अतिशय कमी वेळ ठेवणार आहे, कारण या नावाचं वलय नाशिकसाठी प्रचंड मोठं आहे, आणि त्यासाठी अज्ञातवासी आहेच.

खुप छान लेखन. अगदी अंगावर येत. भन्नाट, वाचता वाचताच लेखनाचा वेग अंगात भिनत जातो. जणु सिनेमाच पहातोय. प्रत्तेक पात्र मनात ठसत जात.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.. पुढील भागा साठी जास्त वेळ लागू देऊ नका हि प्रेमळ विनंती आहे.

@रूपाली विशे - पाटील - धन्यवाद!
@सूर्यकांत - धन्यवाद!
@केशवकुल - धन्यवाद!

उशिरा भाग टाकल्याबद्दल माफी असावी! पुढचा भाग टाकलेला आहे.