पैशाचे झाड- भाग ३

Submitted by अतरंगी on 24 January, 2023 - 22:31

भाग १:- https://www.maayboli.com/node/82901

भाग २:- https://www.maayboli.com/node/82912

" अभ्या कुठे आहेस?"

" गावातच आहे, का रे?"

"विनितला पॅरेलेसिसचा अ‍ॅटॅक आलाय, रुबीला नेलंय. "

" निघतो लगेच. पंधरा मिनिटात पोचतो.'

एकेचाळीसाव्या वर्षी अ‍ॅटॅक यायला विनितची अनुवंशिक जाडी, त्याचे कामाचे स्वरुप, खाण्या पिण्याच्या सवयी, सगळेच कारणीभुत होते. कमी हालचाल, त्यात त्याला व्यायमाची फार आवड नव्हती.

सगळेच जमेल तसे धावत पळत रुबीला पोचले. सगळ्यांनाच हा मोठा धक्का होता. रोजच्या बसण्या ऊठण्यातल्या मित्रावर ओढवलेली ही परिस्थिती , त्याची ती अवस्था पाहून सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. हॉस्पिटल मधून डिसचार्ज मिळे पर्यंत सगळे मित्र रोज तिथे जमेल तसे येऊन जाऊन विनितच्या घरच्यांचा भार हलका करत होते. त्याच्या घरच्यांना या सगळ्या मित्रांचा मोठाच आधार होता. विनितला हॉस्पिटल मधून डिसचार्ज मिळाला तरी त्याच्या घरच्यांची ओढाताण संपली नव्हती, ऊलट थोडी वाढलीच होती. मित्रांच्या रविवारच्या पार्टीमधला एक ग्लास रिकामा राहू लागला होता. अशाच एका रविवारी सगळे त्याला भेटून नेहमीच्या अड्ड्यावर जमले होते. तिथुनच सरळ आल्यामुळे वातावरण जरा ऊदासच होते. कोणी जास्त काही बोलत नव्हते. शेवटी नित्यानेच काहीतरी बोलायचे म्हणून बोलायला सुरुवात केली

"च्यायला , नशिबाच्या एका फटक्याने काय आयुष्य बदलून जाते नाही."

" मागच्याच महिन्या पासून अजून एक ऑफिस चालू करायचे म्हणून जागा बघत होता तो. मागच्याच आठवड्यात बघितलेलं एक फार आवडलं होतं त्याला. आता कधी यायचा तो त्याच्या दुसर्‍या ऑफिसचा योग देव जाणे!"

" हॉस्पिटलचं बिल पण फारच आलं रे. त्याच्या घरात कायम कॅश असते म्हणून धावपळ करायला लागली नाही. नाहीतर ऐन वेळी हालत खराब झाली असती."

एवढा वेळ शांत बसलेला अमोल म्हणाला," ते हॉस्पिटलचं बिल जाऊ दे रे कुठूनही भरलं असतं. पण आता हे जे रोजचे खर्च भागवणं किती अवघड आहे! औषधं, त्याला एक कायमचा अ‍ॅटेंडंट, त्यात घरातला नेमका कर्ताच माणूस अंथरुणाला खिळलेला. मला असं काही झालं तर मी पार बरबाद होऊन जाईन.."

" गप रे, असं काही होत नाही. "

" शुभ बोल की जरा काही तरी!"

सगळ्यांनीच एका मागे एक अमोलला गप्प केले.

एवढा वेळ शांत बस लेला अभि तेवढा म्हणाला " बरोबर आहे. तुच काय आपल्या आजुबाजूचे ८०-९०% लोक याच कॅटेगिरी मधे मोडतात. "

सगळ्यांच्या माना अभि कडे वळाल्या.

"कटू असले तरी सत्य आहे......"

"असले तरी असू द्या. विषय बदला प्लिज"

" विषय बदल्याने किंवा टाळल्याने परिस्थिती बदलत नसते राजे."

" मग कशाने बदलते?"

" बदलत कशानेच नाही, पण ती ओढवली तर काय करायचे याचा बॅक अप प्लॅन तयार असेल तर निदान आपल्या मागे घरच्यांना त्रास कमी होतो. "

" अरे हे असे पॅरेलेसिस वगैरे सारखे आजार लाखात एखाद्याला होतात."

"एखाद्या गोष्टीची शक्यता, फ्रिक्वेन्सी, प्रोबॅबिलिटी कमी आहे म्हणजे ती कधीच होणार नाही, होतच नाही असे नाही. शिवाय प्रश्न फक्त पॅरेलेसिसचा नाही रे. अनेक प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात ज्यासाठी आपण तयार नसतो. "

" ऊदाहरणार्थ ? "

" मृत्यू, अपंगत्व, दिर्घ आजार, बेकारी, महामारी, भुकंप, पुर, दुष्काळ, युद्ध, महामंदी, राजकिय अस्थिरता.... यादी बरीच मोठी आहे. एखादी गोष्ट घडायची शक्यता कमी का होईना पण शक्यता असतेच ना...... आपण कमी शक्यता असलेल्या गोष्टी अशक्य आहेत असे धरुन चालतो. मी तुला कोकणात ट्रिपला गेलो होतो तेव्हा म्हणालो होतो ना की आपल्यातल्या अनेक जणांची ही मस्त चाललेली लाईफ स्टाईल नाहीशी व्ह्यायला नशिबाचा एक झटका पुरेसा आहे. त्याची जिवंत उदाहरणं मी फार पाहिली आणि वाचली आहेत, येत्या काही महिन्यात तुम्हाला पण विनितच्या घरातून फार जवळून पहायला मिळणार आहे. "

" तू ना लई डिप्रेसिंग बोलतो यार कधी कधी.... कशाला एवढा विचार करायचा? काय नाय होत. आपण कायम पॉझिटिव्ह विचार करायचा."

" Always hope for the best and plan for the worst. आपल्याला कधीच काहीच होणार नाही असे गृहित तर धरून चालणार नाही ना? आपल्या प्रत्यक्ष ओळखीतच किती सार्‍या घटना घडल्या आहेत.... आत्ता हे विनितचे एक झाले, मागच्या वर्षी अन्याचा भाऊ अ‍ॅक्सिडंट मधे गेला, माझ्या चुलत भावाचे बत्तिसाव्या वर्षी डोळे गेले, आपल्या शाळेतला भंडारी गॅस गँगरीन होऊन गेला. ही सगळी उदाहरणे आपल्या वयातली किंवा आपल्या पेक्षा चार पाच वर्षे कमी जास्त वयातली आहेत. सगळ्यांना लाखात, करोडोंमधे घडणार्‍या एका प्रसंगाला सामोरे जावे लागले.

देव न करो पण आपल्या वर असा एखादा प्रसंग ओढावला तर आपण तयार आहोत का? आपण असो किंवा नसो आपल्या बायका पोरांचे पालन पोषण चांगल्या प्रकारे होईल? आपल्या मागे त्यांना कोणावर अवलंबून रहावे न लागता जगता येईल? आपल्याला अपंगत्व आलं तर घर आहे तसे चालू राहिल? किती प्रॉब्लेम्स येऊ शकतील कल्पना कर... "

" जे प्रॉब्लेमस येऊ शकतात ते तर माहित आहेत रे. तेच परत सांगून काय होणार आहे? उपाय सांग ना. "

" यातल्या पहिल्या दोन पायर्‍या तर आजकाल सर्व सामान्य लोकांना माहित आहेतच. लाईफ ईन्सुरन्स आणि हेल्थ ईन्शुरन्स. हे दोन सगळ्यात आधी हवेच. ते शक्यतो सगळ्यांचे असतातच. ते नसतील तर ते सगळ्यात आधी काढायचे. पण अशा काही सिच्युएशन असतात ज्यात हे दोन्ही कामाला येत नाहीत.

पॅरेलेसिसचेच ऊदाहरण घेऊ. समज एखा द्या घरातल्या कर्त्या माणसाला, जो त्या घराचा मेन कमावणारा माणूस आहे, त्याला ऊद्या का ही झालं तर काय? त्याच्या घरच्यांवर काय कुर्‍हाड कोसळेल विचार कर. त्याची बायको काय काय करेल? जॉब करुन घर चालवेल, मुलांच्या शाळा, घर खर्च, नवर्‍याची गोळ्या औषधे, त्याचे डायपर बदलणे, त्याला काय हवे नको ते बघणे, हे त्या पुढची किती वर्षे करावे लागेल देव जाणे. हे सगळे करुन रिटायरमेंट नंतरचे खर्च भागवायला पण चार पैसे जोडून ठेवणे.... हे झालं फक्त चौकोनी कुटुंब असेल तर. त्यात अजून सासू सासरे असतील तर त्यांचे खर्च वेगळे. नुसता विचार केला तरी काटा येतो माझ्या अंगावर.... "

" पण मग यावर ऊपाय काय?"

" मल्टिपल ईन्कम सोर्स आणि पॅसिव्ह ईन्कम सोर्स !"

" जरा विस्कटून सांग की... परिक्षेत एका वाक्यात उत्तरे द्या मधे लिहितोस तसे नको सांगूस."

" चल, सुरुवात मल्टिपल ईन्कम सोर्स पासून करू. रॉबर्ट कियोसाकीचे Cash Flow Quadrant नावाचे एक चांगले पुस्तक आहे. त्यात त्याने आपल्या कडे येणारे उत्पन्न कोणात्या चार प्रकारे येते ते छान पद्धतीने सांगितले आहे. पहिले म्हणजे नोकरी, दुसरे स्वयं रोजगार, तिसरे आपण उपस्थित असलो काय आणि नसलो काय तरी व्यवस्थित चालू शकेल असा बिझनेस, आणि शेवटचा पर्याय वेगवेगळ्या ठिकाणी केलेली गुंतवणूक यात शेअर्स, बाँड्स, रिअल ईस्टेट, म्युच्युअल फंड्स वगैरे सगळे आले.

या चार प्रकारातले शेवटचे दोन सर्वोत्तम, त्याचे फायदे भरपूर आहेत. कारण त्यात तू दोन महत्वाच्या गोष्टी वापरु शकतोस. OPM म्हणजे other people's money आणि/ किंवा OPT म्हणजे Other people's time . तुझे जितके ईन्कम OPT आणि OPM वापरून येईल तेवढे चांगले.

कधी कधी आपण मल्टीपल ईन्कम सोर्स तयार करताना ते एकाच प्रकारातले करायला जातो, तसे न करता आपले ईन्कम वेगवेगळ्या प्रकारातून येईल हे पाहिले पाहिजे आणि त्यात पण भर शेवटच्या दोन प्रकारांवर हवा. ते खरे गेम चेंजर आहेत. तिथून जेवढे जास्त ईन्कम येत असेल तेवढे उत्तम. काही अवघड प्रसंग ओढावला तर ते आपल्याला सावरायला बराच मोठा कालावधी देतात. आपल्याला काही झाले तरी त्यातून मिळणारं उत्पन्न काही लगेच अ‍ॅफेक्ट होत नाही.

चौथ्या प्रकारातलाच महत्वाचा उपप्रकार म्हणजे पॅसिव्ह ईन्कम सोर्स.

तू काही न करता किंवा कमीत कमी काम करुन, तू नसताना पण जे ईन्कम महिन्या घरी येत राहते ते पॅसिव्ह ईन्कम. म्हणजे प्रॉपर्टी/ मशिन्स वगैरे मधून मिळणारे भाडे, बाँड्स मधून किंवा बँकेच्या एफडी मधून मिळणारे व्याज, आपल्याकडे काही कंपन्यांचे शेअर्स असतील तर त्यावर मिळणारा लाभांश म्हणजेच डिव्हीडंट, पुस्तकांची/ गाण्यांची/ संगीताची मिळणारी रॉयल्टी, वगैरे वगैरे. बेसिकली ज्यात तू एकदा कष्ट करतो आणि त्यातून तुला त्यानंतर काही न करता रेग्युलर पैसे मिळायची शक्यता असते असे काहीही.

फॅमिलीवर एखादा मोठा आघात आला ना की पॅसिव्ह इन्कम सोर्स सारखा आधार नाही."

" पण हे सगळे जे ऊपाय आहेत ते तुला तेव्हाच कामाला येतील जेव्हा जग सुरळीत चालू आहे. ऊद्या तू म्हणालास तसे महामारी, भुकंप, पुर, युद्ध, महामंदी, राजकिय अस्थिरता असले काही घडले तर तेव्हा याचा काहीच ऊपयोग नाही. तेव्हा कशाचा आधार असणार माणसाला?"

"अशा वेळेस माझ्या मते आपल्याकडे असलेले कॅश रिसोर्सेस, सरकारी बाँड्स आणि आपण स्वतःमधे जी काही गुंतवणूक केली आहे ती कामाला येते. जेव्हा अशी मोठी आपत्ती येते तेव्हा सगळे जगच गोंधळलेले आणि घाबरलेले असते. अशा वेळेस कामाला येतो आपल्या कडे असलेला हर हुन्नरीपणा किंवा मार्केटमधे कमकरता असणारे स्किल की ज्याचा वापर करुन आपण पैसे कमावू शकतो, कमीत कमी गरजा, मनावरचा संयम, दुरदृष्टी...... सगळे जग बुडत असताना, सगळीकडे पॅनिक असताना शांत डोक्याने विचार पुर्वक दुरदृष्टीने निर्णय घ्यायची क्षमता, अंगी बाणवलेल्या चांगल्या सवयी.... शिस्त.... पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड, हेच तुला वाचवू शकते आणि तुझ्याकडची कॅश तू कशी वापरतो त्यावर तू परत किती लवकर श्रीमंत होऊ शकतोस हे डिपेंड असते. "

" तुझ्या बोलण्याचा सारांश काढायचा झाला तर १. टर्म ईन्शुरन्स काढा, २. हेल्थ ईन्शुरन्स काढा ३. मल्टिपल ईन्कम सोर्सेस आणि पॅसिव्ह ईन्कम सोर्स तयार करायचा प्रयत्न करा, ४. मार्केट मधे ज्याचे शॉर्टेज आहे असे नवनविन स्किल शिकत रहा, स्वतःला अपडेट ठेवा ५. ईमर्जन्सी मधे कामाल येईल एवढी कॅश बाजूला ठेवा/ सरकारी बाँड्स मधे पैसे गुंतवून ठेवा. ६. गरजा कमी ठेवा, चांगल्या सवयी, शिस्त, अ‍ॅटिट्यूड अंगी बाणवा. बरोबर?"

" हो बरोबर. माझ्या मर्यादित ज्ञानानुसार सामान्य माणसांच्या आवाक्यात असणारे एवढेच पर्याय मला माहित आहेत."

अभ्याने मांडलेल्या मतांनी सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडलं. जगात कोणालाही आपल्याला काही झालं तर, घरच्यांना काही झालं तर असल्या वाईट गोष्टींचा विचार करायला आवडत नाही. पण तरी ते होऊ शकतं याची शक्यताच लोक विचारात घेत नाहीत आणि असं काही झालं तर काय करायचे याचा विचार पण फार कमी जण करतात. आपल्याला काही झालं तर आपले आणि घरच्यांचे कमीत कमी हाल व्हावे अशी सोय
प्रत्येकाने करायला हवी, हे मात्र आज सगळ्यांनाच पटलं होतं.

भाग ४ https://www.maayboli.com/node/82919

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचलं. खरंय.
डिसेबिलिटी इन्शुरन्स ?
या चित्रातला जोडीदार = पत्नी कमावती का नाहीए/ नसावी? तुमच्या मागच्या आर्थिक साक्षरतेच्या लेखमालेत एक स्त्रीही होती. या लेखमालेतही पुढे येईल अशी आशा/ अपेक्षा आहे.

अतरंगी, छान चालल्ये गोष्ट.

भरत, तुम्ही जेव्हा गोष्ट लिहाल तेव्हा घाला त्यात कमावते स्त्री पात्र.
लेखकावर दडपण आणू नका तुमच्या अपेक्षा मांडून. कृ. ध.

भरतदा,

डिसेबिलिटी इन्शुरन्स बद्दल लिहायला विसरलो. तो पण महत्वाचा आहेच.

पत्नी कमावती का नाहीए/ नसावी?>>>>> माझ्या (ऐकिव) माहिती प्रमाणे भारतातील ७० ते ८०% स्त्रिया ह्या गृहिणी आहेत. भारतातील स्त्री-पुरुष पगारातील भेदभाव लक्षात घेता ज्या २०-३० टक्के स्त्रिया नोकरी-व्यवसाय करतात त्यातील किती जणी स्व:बळावर संपुर्ण घर चालवू शकतील हे पण पहावे लागेल. म्हणून ह्या कथेतील पत्नी कमावती नाही.

आणि जरी ती असली तरी जॉब करुन घर चालवणे, मुलांच्या शाळा, घर खर्च, नवर्‍याची गोळ्या औषधे, त्याचे डायपर बदलणे, त्याला काय हवे नको ते बघणे, हे त्या पुढची किती वर्षे करावे लागेल देव जाणे. हे सगळे करुन रिटायरमेंट नंतरचे खर्च भागवायला पण चार पैसे जोडून ठेवणे.... हे झालं फक्त चौकोनी कुटुंब असेल तर. त्यात अजून सासू सासरे असतील तर त्यांचे खर्च वेगळे हे सर्व करणे फार ओढाताणीचे असेल.

खरे तर हे फक्त घरातील कर्ता पुरुषच नाही, तर घरातील कोणतीही व्यक्ति अंथरुणाला खिळलेली असेल तरी होईलच.....