पैशाचे झाड- भाग ४

Submitted by अतरंगी on 25 January, 2023 - 22:50

भाग १ https://www.maayboli.com/node/82901

भाग २ https://www.maayboli.com/node/82912

भाग ३ https://www.maayboli.com/node/82915

विनितची तब्येत हळूहळू सुधरायला लागली होती. तोडकं मोडकं का होईना समोरच्याला कळेल असे तो बोलायला लागला होता, शरीराची पण थोडीफार हालचाल करायला लागला होता. विनितला आलेल्या अ‍ॅटॅक नंतर नेहमीच्या मैफिलींमधे जरा खंड पडलाच होता. बर्‍याच महिन्यांनी अचानक एके दिवशी नित्याने प्लॅन बनवला. त्याच्याच घरी पार्टी ठेवली होती. बरेच दिवस झाल्याने सगळेच एकमेकांना भेटायला आतुर होते. वेळात वेळ काढून सगळेच जमले. नित्याने जुन्या दिवसांची आठवण म्हणून आज दुसरे काही न आणता सरळ ओल्ड मंक आणली होती. ओल्ड मंकच्या त्या विशिष्ठ व्हॅनिला फ्लेवर चवीने त्या दिवशी मॅफिलीला एक वेगळाच रंग चढला होता. कॉलेजचे दिवस, तेव्हाचे पिण्याचे किस्से, गंमतीजमती, जे हॉस्टेलवर राहीले होते त्यांनी तिकडचे सांगितलेले किस्से यानेच मैफिल सजली. प्रत्येक गृपमधले असे काही ना काही किस्से असतातच की जे कधीही आणि कितीही वेळा ऊगाळले तरी जुने होत नाहीत, प्रत्येक वेळेस तेवढेच हसवतात. असे सगळे किस्से चालू असतानाच आनंदला हॉस्टेलवर आणि ईंजिनिअरींगला असतानाची फेमस असलेली चावट गाणी म्हणायची हुक्की आली. आनंद आणि अभिलापण अर्थातच ती गाणी तोंडपाठ होती. सगळे जण कोरस मधे चढ्या आवाजात गात होते. सगळेच जाम चेकाळले होते. अमोल मस्तपैकी चकणा खात या सगळ्यांची मजा बघत होता.

" च्यायला ह्या नित्याचा असली चावट गाणी म्हणतानाचा व्हिडीओ कोणीतरी एफबी वर टाकायला पाहिजे. कसला सोफेस्टिकेटेड असल्या सारखा वागत असतो कंपनी मधे आणि सोशल मिडियावर. याचं खरं रुप सगळ्यांना दाखवायला हवं."

" अरे ते कंपनीचं सोड, हा किती हरामी आहे हे तिथे किमान तरी चार पाच लोकांना माहित असेल. वहिनींना आणि सासरच्यांनी ह्याचे व्हिडिओ बघितले तर खरी मजा येईल. "

"पण वहिनी आणि बच्चे कंपनी आहे कुठे?"

" त्यांना दोन आठवड्यासाठी तिच्या माहेरी पाठवलं आहे. घर रिनोव्हेट करतोय. पंधरा दिवस तरी जातील. बेड, कपाटं सगळंच नविन करतोय. सोफा पण नविन ऑर्डर केलाय. पेंटींग पण करायचं आहे. मुलांना त्रास नको म्हणून सगळ्यांनाच तिकडं पाठवलं आहे. ऊद्या पासुन काम सुरु होईल. म्हणून म्हणलं आजचा दिवस रिकामा आहे तर एंजॉय करुन घेउ."

" अरे ईतकं चांगलं फर्निचर का बदलतोयस? हा सोफा तर सागवानचा दिसतोय!"

" सागवानचाच आहे. ओएलक्सवर टाकलाय कालच. एकबोटे मधून नविन ऑर्डर केलाय."

" सागवानचा सोफा विकून तू तो जंगली लाकडाचा तकलादू सोफा ऑर्डर केलास?"

"अरे तो होता बापाच्या लग्नातला. झाली त्याला आता चाळीस वर्षे. सगळं घर च्यायला जुनाट दिसतं नुस्ता. चार लोकं घरी येतात, बरं दिसत नाही आता. मी ईतक्या कलिग्सच्या, ज्युनिअर लोकांच्या घरी जातो, कसले मस्त ऐटीत राहतात ते. आपल्या घरी आल्यावर काय म्हणत असतील? आपल्या पगाराप्रमाणे, पोझिशन प्रमाणे राहणीमान पण ठेवावं लागतं ना. शिवाय आत्ता हौसमौज नाही करणार तर कधी करणार? तुला सांगून काय फायदा म्हणा, तुझं निम्मं आयुष्य तर भाड्याने राहण्यात गेलं. स्वतःचं सुंदर सजवलेलं घर असणं यातली मजा तुला काय कळणार? "

" बरोबर आहे" म्हणत अभ्याने विषय थांबवला.

पार्टी संपल्यावर आनंद, अमोल आणि अभि तिघेच पान खायला बाहेर पडले. पान घेऊन निवांत गाडीत येऊन बसल्यावर अमोलने हळूच अभ्याला डिवचलं " बोला देसाई, बोलून टाका मनातलं"

" काय?"

" बोल रे, मला माहित आहे, तुला नित्याने नविन फर्निचर करायला घेतलं ते पटलं नाही. तुला बोलायचं होतं पण तिथे त्याला वाईट वाटायला नको म्हणून जास्त काही बोलला नाहीस."

" मला पटलं नाही असे नाही. त्याने ज्या कारणाने ते करायला घेतलं ते नाही पटलं."

" काय हौसमौज कधी करायची हे?"

" नाही. चार माणसं काय म्हणतील हे!"

" असू दे रे. त्यात काय एवढं. ऐपत वाढली की राहणीमान चांगलं असावं असं वाटतं एकेकाला. असते हौसमौज. नुस्ता पैसा पैसा करत, बँकबॅलन्स बघत आयुष्य काढायचं का? आयुष्यात मजा तरी कधी करायची?'

" मी कधी म्हणालो, हौसमौज करु नका, मजा करु नका, मन मारुन जगा? ऊलट मीच कायम म्हणतो एकांगी आयुष्य जगू नये, लाईफ बॅलन्स्ड असावी. "

" मग काय तर! च्यायला रिटायरमेंट वगैरे साठी आयुष्यभर दमडी दमडी साठवत रहायचं आणि त्या आधीच गचकलो किंवा त्या वेळेस जर मजा करायच्या कंडिशन मधेच नसलो तर काय ऊपयोग त्या पैशाचा? मला तर आजिबातच पटत नाही ते. "

" ते तर आहेच रे. तो चंद्रशेखर गोखले म्हणतो तसं

मरताना वाटलं
आयुष्य नुसताच वाहून गेलं
मला जगायचंय मला जगायचंय म्हणताना
जगायचंच राहून गेलं

असं नको व्हायला."

" येस्स मला पण असंच वाटतं. साला मरताना रिग्रेट नाय पाहीजे आयुष्यात"

" मग तुला सगळं आमच्यासारखंच वाटतं तर तू असा का चेंगटपणा करुन, मन मारून का राहतोस? ना चांगले कपडे, ना मोबाईल, ना गाड्या?"

" तुला कोणी सांगितलं मी मन मारुन जगतो? हौसमौज करत नाही? मी मला हवी ती हौसमौज भरपुर करतो. तुमच्या पेक्षा जास्त करतो."

" वाटत तर नाही तसं..."

" कारण मी हौसमौज माझ्या पद्धतीने करतो, ती कशी करायची ते मी माझ्या पुरतं ठरवलं आहे."

" म्हणजे कशी?"

" सगळे जण कायम म्हणतात ना की चार लोक काय म्हणतील? त्या चार लोकांना मी फाट्यावर मारलं आहे. मी आजिब्बात पर्वा करत नाही, की लोक काय म्हणतात. जे जे चार लोकांत बरे दिसावे म्हणून करावे लागते ते मी आज्जिबात करत नाही. मी फक्त तीच हौस करतो जी माझी स्वतःची आहे"

" आम्हाला अजूनही नाही कळलं."

" सांगतो. माझा मुलगा चार महिने मागे लागला आहे की त्याला गिअरची सायकल हवी आहे. का? तर त्याच्या सगळ्या मित्रांकडे ती आहे. हे सगळे सोसायटीच्या सपाट , ना चढ ना ऊतार असलेल्या रस्त्यांवर सायकल चालवतात. ह्यांना गिअरची सायकल कशाला लागते? पण एकाने घेतली की दुसर्‍याच्या मनात ईर्ष्या निर्माण होते मग तो पण त्यापेक्षा भारी काही तरी आणतो, मग अजून एक मग दुसरा, असं करत करत ती गोष्ट सगळ्यांकडे आली की एखाद्या कडे नसेल तर त्याला पण ती घ्यायची ईच्छा निर्माण होते. याला पिअर प्रेशर म्हणता येईल. खरं तर त्यातल्या एकालाही तेवढ्या भारी सायकलची गरज नसते. पण तरी सगळे घेतात. "

" याचा आपल्या विषयाशी काय संबंध?"

" आहे ना. मोठे पण फार वेगळे नसतात रे. एकाने आयफोन घेतला की दुसर्‍याला पण घ्यावासा वाटतो. एकाने भारी टिव्ही घेतला की दुसर्‍याला पण तो हवा हवासा वाटतो. एकाने धूमधडाक्यात लग्न केलं की आपल्याला पण करायचं असतं. कपडे, गाड्या, घर, फर्निचर, लग्न, वाढदिवस, ट्रिप्स..... काय विचारु नकोस. आपल्याला सगळं दुसर्‍या पेक्षा भारी करायचं असतं. आपल्या मनातली ही जी ईर्ष्या असते ना ती सगळ्याचे कारण असते. कधी कधी ईर्ष्या नसते पण ऊगाच नविन गोष्टी घ्यायची ईच्छा असते. कोणी विचारच करत नाही की ही गोष्ट खरेच मला हवी आहे का? मला गरज आहे का? की फक्त आजूबाजूच्या चार लोकांकडे आहे, त्यांनी केली आहे म्हणून मला करायची आहे? मी जे काही करत आहे ती माझी स्वतःचीच हौस आहे का? मी एखादी गोष्ट फक्त स्टेटस सिम्बॉल म्हणून घेतोय का, करतोय का?

आपण हौसेला मोल नसतं वगैरे डायलॉग मारुन स्वतःची दिशाभूल करत असतो. हौसेच्या नावाखाली काय काय करत असतात लोक.... त्यातली त्यांची स्वतःची हौस किती आणि समाजाने प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे लादलेली हौस किती, पिअर प्रेशर किती हे त्यांना माहित तरी आहे की नाही देव जाणे. "

" मग काय करायचं? आपली हौस कुठली? काय करायचं आणि काय नाही हे कोण ठरवणार? कशाच्या आधारावर ठरवणार?"

"आपणच ठरवायचं. हे सगळं प्रत्येक व्यक्ती प्रमाणे बदलणार, एकाला ज्या गोष्टीची हौस असेल त्याची दुसर्‍याला असेलच असे नाही. मला कशाची हौस आहे आणि ती किती करायची हे ठरवण्याचा माझा पहिला क्रायटेरिया साधा सरळ आहे. जी गोष्ट तुम्हाला दुसर्‍या कोणाला दाखवायला, सांगायला, जगातल्या कोणासमोरच फुशारकीने सांगायला परवानगी नसेल आणि तरी ती तुम्हाला करावीशी वाटेल ती तुमची स्वतःची हौस. ती गोष्ट करताना, वापरताना तुम्हाला मनापासून आनंद झाला पाहिजे. तुमचा आनंद दुसर्‍याच्या प्रतिक्रियेवर अवलंबून नसावा. "

" तू म्हणालास की हा तुझा पहिला क्रायटेरिया आहे. मग अजून किती आणि कोणते तेही सांग आता. ईतका वेळ बोअर केलंच आहेस तर अजून थोडं कर, म्हणजे आजचा तुझा बोअर करायचा कोटा संपून जाईल आणि बाकीचे त्यातून सुटतिल. " आनंदने उगीचंच मधेच अभिला एक टोमणा मारुन घेतला. अभ्याने तो हसण्यावारी घालवून पुढे सांगायला सुरुवात केली.

" मला ईच्छा नव्हती तुम्हाला अजून बोअर करायची, पण आता तुम्ही डिवचलंच आहात तर ऐकाच. मुख्य क्रायटेरिया तीनच आहेत. बाकी दोन चार पोटनियम आहेत. पण मुख्य क्रायटेरिया तीनच. त्यातला दुसरा क्रायटेरीया, हौस या गोष्टीवर किती खर्च करायचा हा. आपल्या टोटल इन्कम पैकी किती टक्के रक्कम हौस या गोष्टीवर खर्च करायची हे आधीच ठरवायचे आणि तेवढीच रक्कम त्यावर खर्च करायची. जसं आपण म्हणतो ना नुस्ताच पैसा पैसा करत कंजूषपणे जगायचं नाही. तसंच हे ही खरे आहे की आलेला सगळा पैसा ऊधळून म्हातारपणी कोणावर तरी अवलंबून रहायची वेळ पण येऊ द्यायची नाही. दोन्ही करायचं. मजा पण करायची आणि भविष्याची सोय पण करुन ठेवायची."

" आणि तिसरा क्रायटेरिया?"

" ऋण काढून सण नाही करायचा. जो पैसा आपल्या कडे नाही, भविष्यात येणार आहे त्या पैशाने हौस करायही नाही. थोडक्यात काय तर हौसेसाठी कर्ज काढायचे नाही. लोक काय वाट्टेल त्या गोष्टींसाठी कर्ज काढतात रे. मी तर काही काही येडे असे बघितले आहेत जे हौस म्हणून गाडीसारखी गोष्ट पण कर्जावर घेतात" अभ्याने आनंद कडे बघत शेवटच्या वाक्यावर जोर देत, डोळे मिचकावत मगाचच्या जोकचा वचपा त्याने कर्ज काढून घेतलेल्या महिंद्रा थार वरुन टोमणा मारुन परतवला.

" बरं चला निघा मग आता तुमच्या तुमच्या त्या डबड्या अ‍ॅक्टिव्हा वरुन. मला उद्या सकाळी कामावर जायचं आहे. तुमच्या सारखा रिकाम टेकडा नाहीये मी. "

आनंद गेला तरी अमोलच्या डोक्यातून आधी चालू असलेला विषय काही जात नव्हता.

"अभ्या, मगाशी तू म्हणालास की ईन्कमच्या काही टक्केच रक्कम हौसमौज करायला वापरायची. पण नक्की किती? हे ठरवायचं कसं?"

" असं नाही सांगता येत रे. हे प्रत्येकाने आपलं आपण ठरवायचं. असं एकच प्रमाण सगळ्यांसाठी असं नाही करता येणार. पण आपण जे काही ठरवू त्यातच होईल तेवढीच ऐश करायची. जर मी म्हणालो त्या प्रमाणे लोकांना फाट्यावर मारून फक्त आपल्या स्वतःच्या मता प्रमाणे हौस मौज केली तर अगदी कमी पैशात पण छान आणि व्यवस्थित हौसमौज होते. कारण तुम्ही तुमच्याकडचे पैसे सतराशे साठ गोष्टींवर खर्च करण्या ऐवजी महत्वाच्या अशा मोजक्या गोष्टींवर खर्च करता."

" हं. बरोबर"

" मला पण माझं प्रमाण ठरवायला हवं."

" ते ठरव. बाकी सगळं नंतर भेटलो की बोलू. मला लेट झाला आता."

" थांब जरा, एका प्रश्नाचे उत्तर राहिलं आहे, फार दिवस तुला विचारेन विचारेन म्हणत होतो. आज नित्या तुला भाड्याने राहण्याविषयी बोलला. तुला गृपमधले सगळेच कधी ना कधी या विषयी बोलले आहेत. प्रत्येकाला हा प्रश्न आहेच की तू भाड्याने का राहतो? तुझ्याकडे पैसे तर काही कमी नाहीत आणि कोणतीही बँक तुला अगदी सहज लोन देईल. मग तू स्वतःचे घर का घेत नाही. "

अभि हसला. बोलू की नको, नेहमी सारखा हा विषय टाळावा का, याचा काही क्षण विचार करुन त्याने सांगायला सुरुवात केली.

" घर विकत घेणं हे माझ्या आर्थिक प्रगती मधली खोड ठरु शकतं म्हणून....

आपण सगळेच घर या गोष्टीशी भावनिकरित्या जोडलेले असतो. प्रत्येकाला वाटतं आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. त्यात घर ही एक चांगली गुंतवणूक असते, रिअल ईस्टेटचे रेट कायम वाढत असतात असेही आपल्या मनावर ठसलेलं असतं, त्यामुळे सगळे जण घर घ्यायच्या मागे असतात. पण माझ्यामते आपलं राहतं घर ही गुंतवणूक किंवा अ‍ॅसेट नसून लाएबिलिटी असते. तुला हे सगळं ऐकताना आश्चर्य वाटत असेल. पण स्टेप बाय स्टेप विचार करु.

सगळ्यात आधी रिटर्न्स. आपण जेव्हा फ्लॅट घेतो तेव्हा लाँग टर्म मधे बघितलं तर साधारणतः त्याचे रेट वार्षिक ६-९ टक्क्याने वाढतात. त्यापेक्षा जास्त रिटर्न देणारे अनेक मार्ग मार्केटमधे उपलब्ध आहेत. शिवाय जर ईन्फ्लेशन, आपण बँकेला भरलेलं व्याज कन्सिडर केलं तर तो रिटर्न अतिशय कमी येईल. त्यामुळे राहता फ्लॅट ही काही चांगली गुंतवणूक नाही.

दुसरा विचार करु रेंटल यील्डचा. म्हणजे तुला किती गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो. आपल्या ईथे साधारण एक कोटीच्या फ्लॅट वर २० ते २२ हजार भाडे मिळते. म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स, सोसायटी चार्जेस वगैरे सोडले तर वर्षाला साधारण अडीच लाख धरू या. मग त्याचा रेंटल यील्ड २.५% झाला. मी जर याच पैशाचे दुकान घेतले तर मला हाच रेंटल यील्ड ५ ते ६ टक्के मिळतो. मी एखाद्या डिमांड असलेल्या ठिकाणी थोडी जागा घेतली आणि तिथे बांधकाम करुन ते फ्लॅट्स भाड्याने दिले तरी साधारण ५ ते ६% रेंटल यील्ड मिळतो. म्हणजे तिथेही फ्लॅट हा चांगला पर्याय नाही.

आता तिसरा विचार opportunity costचा.

आधी कर्जावर घेतलेल्या फ्लॅटचा विचार करु. कॅल्क्युलेशनसाठी १ कोटीचा फ्लॅट घेऊ. फ्लॅट घेताना मला २०% डाऊन पेमेंट करावे लागणार. म्हणजे २० लाख. त्यानंतर मला महिन्याला कमीत कमी ७० ते ८० हजार हफ्ता पडणार. ते कर्ज कायम माझ्या मानगुटीवर टांगती तलवार राहणार. मला काही करुन ते फेडत रहावे लागणार. मी २० हजार भाडे दिले तर हेच २० लाख मी चांगल्या फंड मधे गुंतवून, ५० ते ६० हजार रुपयाची SIP करु शकतो. यावर अगदी १०% रिटर्न जरी धरला तरी मला २० वर्षात ७-८ कोटी मिळतील. किंवा सरळ एखाद्या Debt fund मधे पैसे पार्क करुन ठेवले आणि मधे अधे जर कुठे चांगली संधी/ जागा उपल्ब्ध झाली तर तिथेही गुंतवणूक करता येऊ शकते.

किंवा हेच २० लाख मी व्यवसाय सुरु करण्या साठी वापरु शकतो. त्यातून येणारे ईन्कम मी अजून कुठे तरी गुंतवू शकतो, ज्यातून अजून जास्त रिटर्न मिळू शकतात. महिन्याला जो हफ्ता जाणार होता त्यातून पण अजून गुंतवणूक करता येते. फ्लॅट लोन वर घतला की मी त्याला बांधील असतो, अडकून पडतो. फ्लॅट लोन वर विकत घेतला की मला त्या फ्लॅट साठी काम करावे लागणार, तो माझ्यासाठी काम नाही करणार. आणि एवढे करुन मला रिटर्न पण अगदी इन्फ्लेशनला कट टू कट बीट करणारे मिळणार.

आता समज दुसरी केस की ज्यात माझ्या कडे एक रकमी एक कोटी तयार आहेत ज्यातुन मी फ्लॅट घेणार आहे. तर मगाशी सांगितलं तसं रेंटल यील्ड जास्त मिळेल अशा ठिकाणी मी ते पैसे गुंतवू शकतो. मी फ्लॅट ऐवजी एक दुकान किंवा ऑफिस घेतले आणि ते भाड्याने दिले तर मला ४० ते ५० हजार भाडे मिळेल, माझे २० हजार घरभाडे वजा करुन वर जे पैसे राहतील ते मी परत अनेक प्रकारे गुंतवू शकतो. किंवा त्या एक कोटीमधे काही गुंठे जागा घेऊन ठेऊ शकतो. पुढे त्या भागात डेव्हलपमेंट आली की तिथे बांधकाम करुन ते विकून चांगले पैसे मिळू शकतात, किंवा भाड्याने दिले तर रेग्युलर ईन्कम पण मिळू शकते, जे म्हातारपणी माझे हात पाय थकल्यावर मला उपयोगी पडेल.

हे सगळे अगदी छोटे छोटे कमी रिस्क असलेले पर्याय आहेत. जरा हात पाय मारत राहिलो आणि जास्त रिस्क घ्यायची तयारी असेल तर काय पैसा बनवता येतो माहितीए....

आपण फ्लॅट घेताना opportunity costचा विचारच करत नाही.

तुला खोटे वाटतील असे माझ्या आयुष्यातले किस्से मी तुला सांगू शकतो. बाबांच्या रिअल ईस्टेटच्या कॉन्टॅक्टसचा मला फार फायदा झाला. ते नसते तर दुसर्‍या कोणासोबत तरी चांगले रिलेशन बनवायला लागले असते. सात वर्षापुर्वी एका एजंटने एक डिल आणलं होतं. त्याच्या कडे एक फ्लॅट आला होता. त्या माणसाला एक दोन आठवड्यात फ्लॅट विकून US ला परत जायचं होतं. विनितने स्वतः कागदपत्रं बघितली होती, सगळी कागदपत्रं क्लिअर होती. त्या मालकाला घाई होती, थोडेफार कमी पैसे मिळाले असते तरी फरक पडत नव्हता. मी दहा दिवसाची कमिटमेंट देऊन व्यवहार पुर्ण केला. ६८ लाखात फ्लॅट घेऊन मी तो सात महिन्यात रंगरंगोटी करुन ८५ लाखाला विकून टाकला. सात महिन्यात सगळे खर्च सोडून साडेतेरा लाख सुटले. परत २०१८ मधे बाबांच्या ओळखीने अजून एक डिल आलं होतं. एक बिल्डर होता त्याला एक प्लॉट घ्यायचा होता सव्वा कोटी कमी पडत होते. त्याच्या कडून एक फ्लॅट मार्केट रेट पेक्षा २३ टक्क्यांनी कमी मधे लिहून घेतला. सव्वा कोटी लगेच दिले आणि पन्नास नंतर. साडेतीन वर्षानी तोच फ्लॅट तयार झाल्यावर मी दोन कोटी ५७ लाखाला विकला. कोव्हिडमधे जेव्हा शेअर मार्केट पडले होते तेव्हा एक रकमी ३५ लाख ईंडेक्स फंड मधे टाकले पंधरा की सतरा महिन्यात पैसे दुप्पट झाले. भांडवल काढून घेतलं, जो नफा झाला त्याचे युनिट्स तसेच आहेत. ते वाढत जातील त्याचा हिशोब वेगळाच. असे अजून कमीत कमी सहा सात व्यवहार वेगवेगळे केले मी या बारा वर्षात.

सगळेच व्यवहार फायद्यात गेले असेही नाही. मा्गे डिपी रोडला ६७ लााखात एक दुकान घेतलं होतं, आठ महिन्यांनी नऊ लाख लॅास घेऊन विकावं लागलं. एक बागायती शेत जमिन घेतली होती पंधरा लाख रूपये एकराने, ती साडे दहा लाखात सोडावी लागली. एका कॅालेजच्या मित्रासोबत मिळून एका हॅाटेलमधे ३७ लाख गुंतवले होते. ते पुर्ण बुडाले. चालायचंच. तरी या बारा वर्षात माझं भांडवल पाच पट झालं.

आपण रहायला फ्लॅट घेऊन आपल्या हातातले खेळते भांडवल घालवतो. शिवाय आपली रिस्क टेकिंग कॅपॅसिटी एकदम कमी करतो. मी जर एक फ्लॅट घेऊन, त्यात राहून तो सजवत बसलो असतो तर हे सगळं कसं झालं असतं?

पण हे सगळं झालं माझ्या सारख्या व्यक्तिसाठी, जो अकाउंटला कितीही पैसे असले तरी शांतपणे त्यातली दमडीही वायफळ खर्च न करता, योग्य संधीची वाट बघत बसू शकतो. पण ज्यांच्या हातात पैसा टिकत नाही आणि हातात असलेल्या पैशांचा सदुपयोग कसा करायचा हे माहित नसेल त्यांच्या साठी फ्लॅट घेणेच योग्य. उगीच नको त्या गोष्टींवर पैसे खर्च करण्यापेक्षा निदान ते तरी बरे. "

" च्यायला अभ्या एवढा विचार तर मी बापजन्मी सुद्धा केला नसता.... पण तुला तुझ्या बापाच्या कॉन्टॅक्टसचा फायदा झाला सगळ्यांनाच होईल असे नाही. शिवाय ईतक्या मोठ्या रकमा प्रत्येकाच्या आवाक्यात पण नसतात रे."

" कॉन्टॅक्ट्सचं काय रे तयार करता येतात. बाबांचे कॉन्टॅक्ट्स सोडून मी माझे स्वतःचे पण भरपूर तयार केले. जरा हात ढिला ठेवावा लगतो. वेगवेगळ्या लोकांवर मी आज पर्यंत सात ते आठ लाख खर्च केले आहेत. गिफ्ट्स, बाटल्या, पार्ट्या....

आणि भांडवलाचे म्हणशील तर, आपल्या पैकी प्रत्येकाने लग्नात पंधरा वीस लाखाचा खर्च केला, दारात पाच ते पंधरा लाखाची कार ऊभी आहे, खिशात पन्नास साठ हजाराचे मोबाईल आहेत, घर घेताना दहा ते वीस लाखाच्या मधे डाऊन पेमेंट केले आहेत, वीस ते पन्नस हजार हफ्ता भरतात, बायकांकडे दहा वीस तोळे सोने आहे, घरात पाच दहा लाखाचे फर्निचर आहे, लाख दोन लाखाचे टिव्ही- म्युझिक सिस्टीम आहेत. काढ हिशोब....

हे सगळे भांडवल आहे, जे तुम्ही कुजवत बसला आहात. मी हे सगळं बोललो की लोक म्हणतात मग काय सन्याशासारख जगायचं का? हौसमौज कधी करायची? ऐश कधी करायची? हौस मौज करावी रे, पण त्यापायी जर तुम्ही स्वतःचे स्वातंत्र्य गमवून बसला असाल, तर विचार करा की त्याची गरज आहे का आणि तुम्ही जे हौस म्हणून करताय ती खरेच तुमची आहे का? दुसर्‍याने कोणी तरी आपल्याला भारी म्हणावं, दुसरं कोणीतरी ईंप्रेस व्हावं म्हणून भांडवल घालवून वस्तू कशाला गोळा करायच्या आणि आपले स्वातं त्र्य आर्थिक प्रगतीची संधी घालवून बसायचे. हे सगळे माझ्या डोक्याच्या बाहेरचे आहे. मी जेव्हा भारतात परत आलो, तेव्हा मी पण गावात एक झकास बंगला बांधून मस्त एखादी महागडी SUV घेऊ शकलो असतो की.हा सगळा छान छौकीपणा करुन काय मिळालं असतं? मी आयुष्यभर पैशाचा आणि वेळेचा गुलाम झालो असतो. मी तिथेच एक बिल्डिंग बांधली, तीन फ्लॅट विकून भांडवल रिकामे केले, बाकिचे फ्लॅट भाड्याने देऊन मी स्वतःचे स्वातंत्र्य विकत घेतले. ते मला जास्त महत्वाचे वाटते. "

" खरंय, आता घरी जाऊन काय काय विकून भांडवल तयार करता येतंय बघतो" अमोल स्टँडवरून गाडी काढत हसत हसत उत्तरला

भाग ५ :- https://www.maayboli.com/node/82936

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या पाहण्यात आहे २-३ जण, शक्य असतानाही फ्लॅट न घेता भाड्याने घर घेऊन राहतात.

भाड्याने घर घेऊन राहायचे - हे कॅलक्युलेशन आत्ता समजलं.

काही गोष्टीत कळतंय पण वळत नाही असं काहीसं होतय.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

<< दुसरा विचार करु रेंटल यील्डचा >>
Purchasing real estate is not so black and white.

Let me reply in English and I will translate in Marathi later if time permits and editing is still available.
Buying a 1 crore flat, which can be rented for 25,000 per month, may not be such a bad decision. Let me explain why and when. समजा, नवरा-बायको दोघे आय. टी.मध्ये प्रत्येकी २५ लाख वर्षाला कमवत असतील, तर रहाण्यासाठी १ कोटीचा फ्लॅट विकत घेणे, हा अगदी चुकीचा निर्णय नाही. (वार्षिक उत्पन्नाच्या २ पट किंमत). They are just investing in another asset class. Owning a primary residence is a good thing, personally as well as for society and that's why government also encourages home ownership. If needed in emergency, the equity can be tapped as well, so it is not 100% dead investment.

On the other hand, if they wanted to a flat for investment purpose, it is entirely different scenario. My thumb rule is that if the real estate cannot be rented for 1% per month of asset value, then it won't be cash flow positive. Of course, the returns may come as appreciated value of asset, but if you are strictly looking at rental yield, it is pretty much not a winning situation and personally I wouldn't invest in such a deal. A rental property helps in 4 ways.
1. You are using leverage, using OPM.
2. It can be cash-flow positive in rental income.
3. There are tax benefits like depreciation which delay the tax. You are also building equity that is paid from the rent.
4. Last advantage can be due to price appreciation of the real estate.

Real estate is useful asset class in one's portfolio. It is not like gold which is dead investment. Gold just sits there, doing nothing, generating no cash flow, appreciating barely (if at all) with inflation and costs you money to protect it in a bank locker.

जागा खरेदी करून विकणे हे उद्योग करणारी एक व्यक्ती पाहण्यात होती.
वयाच्या 83 वर्षी, एकाला 20 की 30 लाख देऊन 40 लाख मिळवले होते.
मलाही सल्ला दिला होता अलिबागला जागा घेऊन ठेव.नंतर 1 -१.५ वर्षाने रिलायन्सने तिथल्या जागा चांगला भाव देऊन खरेदी केल्या. मी नव्हती घेतली जागा.

Biggest problem of investing in real estate is that it is illiquid compared to equity asset class and also higher frictional costs involved. Personally, I am hesitant to invest in Indian real estate market, considering poor enforcement of property rights/laws.

हौसेमौजेबद्दलचे क्रायटेरिया पटले.
मालकीचं घर वि. भाड्याचं घर यात वित्तीय दृष्टीने भाड्याचं घर फायद्याचं वाटलं तरी घराबाबत तेवढा एकच निकष लावता येत नाही. स्वतःचं घर असल्याने येणारी सुरक्षिततेची भावना, वरचेवर घर बदलावं लागण्यातली गैरसोय, इ, अनेक मुद्दे येतात.
(या लॉजिकने भाड्याने देण्यासाठी घरं घेणं हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरू शकतो)

काही लोकांकडे इतका पैसा असतो की त्यांना सतत काही ना काही रिनोव्हेट किंवा अपग्रेड ( फोन, कार, घरातल्या वस्तू) करणं सहज परवडतं आणि लोक असं करताना दिसतात. हे अर्थव्यवस्थेच्या भल्याचं आहे , असं वाटतं. पैसा खेळता राहतो, मागणी निर्माण होते, त्यांनी टाकलेल्या वस्तू इतरांना स्वस्तात मिळतात. त्यांनी नुसती बचत आणि गुंतवणूक केली तर मागणी नसलेल्या बाजाराला त्याचा फार उपयोग नाही.

पैसे गुंतवताना ज्या काही गोष्टींचा विचार करायचा त्यातील महत्वाच्या.......

1. Yield/ returns/ Probable upside
2. Probability of upside
3. Risk &/ or Probable Downside
4. Probability of Downside
5. Liquidity

समोर जर गुंतवणूकीचे २ पर्याय असतील तर या बेसिस त्यांची तुलना करुन निर्णय घ्यावा . जिथे जास्त फायदा व्हायची शक्यता आहे तो पर्याय निवडायचा. यात कुठेही भावनांना थारा नाही.

बाकी ते समाज, अर्थव्यवस्था वगैरेंची जवाबदारी माझ्या ईवल्याश्या मेंदुला आणी कमजोर खांद्याना पेलवणार नाही. त्यासाठी सरकार माझ्या कडून भरपुर टॅक्स घेतं आणि त्यांनी अतिशय हुशार व सक्षम लोक पगारावर ठेवली आहेत. ते बघून घेतील त्याचे काय करायचे ते.

भरतदा,

मलाही वाटतं की लोकांनी कायम सतत सगळं रिनोव्हेट आणि अपग्रेड करत रहावं, फार बचत किंवा गुंतवणुक करु नये. तेच अर्थव्यवस्थेच्या (आणि माझ्याही) भल्याचे आहे. त्यांनी जर ते केले नाही तर बाजारातला माल विकला जाणार नाही, माल विकला नाही तर कंपन्यांना नफा होणार नाही, कंपन्या मोठ्या होणार नाहीत. ते जर झाले नाही तर मी जे अशा कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवले आहेत ते वर जाणार नाहीत. ते जर वर गेले नाहीत तर मी wealth creation कसे करणार ????? Wink Happy

हौसेमौजेबद्दलचे क्रायटेरिया पटले.
मालकीचं घर वि. भाड्याचं घर यात वित्तीय दृष्टीने भाड्याचं घर फायद्याचं वाटलं तरी घराबाबत तेवढा एकच निकष लावता येत नाही. स्वतःचं घर असल्याने येणारी सुरक्षिततेची भावना, वरचेवर घर बदलावं लागण्यातली गैरसोय, इ, अनेक मुद्दे येतात.>> +१११

जिथे जास्त फायदा व्हायची शक्यता आहे तो पर्याय निवडायचा. >> Regret to inform you that this is not correct. Higher rewards come with higher risk. Please read about importance of asset allocation.
नाही, हे तितकेसे बरोबर नाही. जास्त परतावा, म्हणजे जास्त रिस्क असते. म्हणूनच स्टॉकचा परतावा (returns) बाँडपेक्षा जास्त असतो. कृपया "ॲसेट अलोकेशन" बद्दल वाचून बघा.

हो. मी खरे तर जिथे जास्त रिस्क ॲडजस्टेड रिटर्नस मिळतील तिथे पैसे गुंतवावे असे सर्वांना कळेल असे लिहायला हवे होते.

स्वतःचं घर असल्याने येणारी सुरक्षिततेची भावना, वरचेवर घर बदलावं लागण्यातली गैरसोय, इ, अनेक मुद्दे येतात.... +1.

मालकीचं घर वि. भाड्याचं घर यात वित्तीय दृष्टीने भाड्याचं घर फायद्याचं वाटलं तरी घराबाबत तेवढा एकच निकष लावता येत नाही. स्वतःचं घर असल्याने येणारी सुरक्षिततेची भावना, वरचेवर घर बदलावं लागण्यातली गैरसोय, इ, अनेक मुद्दे येतात.>> +१११

माझं घर विकत घेण्याच अजून एक कारण --> माझ्या लहानपणापासून दर वर्षा दोन वर्षांनी घर बदलेलं आहे. मित्रांच्या होणाऱ्या ताटातुटिमुळे जसं मोठं होत गेलो तसं अलिप्तपणाची भावना आपोआप स्वभावात आली. त्यामुळे कॉलेज, पहिला जॉब, दुसरा जॉब जिथे पाच वर्षे होतो, आताचा जॉब कोणत्याही ठिकाणी, कोणी जिवाभावाचा किंवा yz मित्रही नाही बनला. I really cherish those friendships that wouldn't have broken because of relocation. अशी ताटातूट आपल्या पाल्यांची होऊ नये म्हणून विचारपूर्वक निर्णय घेतला घर घेण्याचा.

भाड्याच्या घरात तसंही तुम्हाला खिळा मारायचं देखील स्वातंत्र्य नसतं.
अनेकवेळा जरी आपण उघडपणे नाही बोललो तरी मनात हे दुसऱ्याचं घर आहे हे बोचतचं. आयुष्यात हवं तेव्हा समोर असलेल्या पर्यायांपैकी मला हव तो, योग्य तो, बेस्ट पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य हे भाड्याच्या घराला प्रत्येकवेळी नाही apply होत.

उदा. समजा तुमच्याकडे लाखो रुपये आले तरी मला हवा तो रंग, हवा त्या ब्रँड चा भाड्याच्या घराला मारण्याचं स्वातंत्र्य बहुधा नसेलचं. असलं तरी ते घर आपल्याला हव तेवढं काळ वापरायला मिळेल ह्याचं स्वातंत्र्य किंवा शाश्वती नाही. त्यामुळे आपण त्याला तयार नाही होणार.

माझ्या लहानपणापासून दर वर्षा दोन वर्षांनी घर बदलेलं आहे. मित्रांच्या होणाऱ्या ताटातुटिमुळे जसं मोठं होत गेलो तसं अलिप्तपणाची भावना आपोआप स्वभावात आली. त्यामुळे कॉलेज, पहिला जॉब, दुसरा जॉब जिथे पाच वर्षे होतो, आताचा जॉब कोणत्याही ठिकाणी, कोणी जिवाभावाचा किंवा yz मित्रही नाही बनला. I really cherish those friendships that wouldn't have broken because of relocation. अशी ताटातूट आपल्या पाल्यांची होऊ नये म्हणून विचारपूर्वक निर्णय घेतला घर घेण्याचा.>>>>>>

भाड्याचे घर विरूद्ध स्वतःचे घर यात अनेक मुद्दे आहेत, त्यातल्या कोणत्याही मुद्द्याला प्रतिवाद करावासा वाटत नाही. याला अपवाद फक्त तुम्ही मांडलेला हा मुद्दा आहे . कारण तो बरोबर आहे. मुलांना जे जिवाभावाचे मित्र मिळायचे वय असतं त्यात दर तीन चार वर्षांनी घर बदलावे लागल्यास कोणीच जिवलग मित्र न मिळायची शक्यता आहे.

या मालिकेच्या पहिल्याच भागात अभि त्याच्या मित्राला म्हणतो की मुलांना शाळा जवळ पडते म्हणून राहतो रे….

९०% लोकांचं होतं काय बघा. असलेल्या पैशांमधे/ उत्पन्नामधे सगळं बसवायचं असतं. मग जिथे परवडेल तिथे घर घ्यावे लागणार. पुण्यातल्या कित्येक चांगल्या शाळा आहेत त्यांच्या शाळेच्या पाच किमी त्रिज्येबाहेर तुम्ही रहात असाल तर तुम्हाला प्रवेश देत नाहीत. जरी दिला तरी मुलांना पुण्याच्या रहदारीतून रोज शाळेला यायचा जायचा बहुमुल्य वेळ वाया घालवावा लागणार.

पुण्यातल्या सर्वोत्तम शाळा, स्पोर्टस क्लब जिथे आहेत त्याच्या जवळपास रिअल ईस्टेटचे भाव प्रचंड आहेत. तिथे फ्लॅट घेणे, त्या शाळांची फी, स्पोर्टस क्लबचे चार्जेस हे पण तसेच आहेत. ईतर शहरांचा अनुभव नाही.

जर आपण फ्लॅट विकत घ्यायचा ठरवला तर मग परवडेल तिथे घ्यायचा, तिथून फार लांब नसलेली शाळा बघायची, त्याची शाळा येण्याजाण्याचा वेळ हे सगळे वजा करून मग राहीलेल्या वेळेत त्याला जवळपासच्या एखाद्या त्यातल्या त्यात बऱ्या स्पोर्टस क्लब नाहीतर हॅाबी क्लासला घालायचं. ह्या सगळ्या तडजोडी कशासाठी? तर आपल्याला आपल्या शहरातील चांगल्या भागात घर विकत घेता येत नाही म्हणून?

परवडणारे घर, मग जवळ व परवडणारी शाळा, मग जवळ व परवडणारे extra curriculum activities……
घर विकत घेतल्यामुळे अशा अनेक खर्चांवर येणारी बंधने या सर्वांचा पण विचार करायला हवा.

पाल्याची मित्रांशी होणारी ताटातूट जशी विचारात घेत आहात तसेच त्याने आपल्याला परवडत नाही म्हणून साधारण (sub standard हा शब्द टाळतो आहे) शाळेत, ट्रेनिंगला जायचे का? हापण विचार करा की.

मुलांना चांगले शिक्षण, ट्रेनिंग, ईन्फ्रास्ट्रक्चर, सुविधा देण्यासाठी जर दर तीन वर्षांनी घर बदलावे लागत असेल, घराला हवा तो रंग देता येत नसेल, “ सुरक्षिततेची” भावना येत नसेल तर जरा सहन करायला काय हरकत आहे?

मुलांच्या भविष्यासाठी, जडणघडणीसाठी ती फारच छोटी किंमत आहे.

धन्यवाद अतरंगी जी.

प्रतिवादाचा मुद्दाच नाही. पहिल्या वाक्यात म्हंटल्याप्रमाणे आपण जे सांगताय त्यात वित्तीय फायदा आहेच. त्या बाबतीत 100% सहमत.

पण फक्त तो निकष लावून भाड्याच्या घरात राहणे हे अधिक स्वातंत्र्य देते किंवा अधिक पर्याय देते, सुखं/समाधान देते असे नाही. थोडे सहन करायला काय हरकत आहे म्हणजे compromise आलेच. त्यामुळे घराच्या बाबतीत भाड्याने राहणे हे जेनरिक solution असू शकत नाही पण subjective असू शकते.

वित्तीय फायद्याच्या बदल्यात मी काय गमावले हे फक्त सांगायचा उद्देश होता. लाखो रुपये जमा झाले तरी गेलेली संगत परत येत नाही. ह्याने फरक नसेल पडत तर जरूर भाड्याच्या घरात राहून वाचलेला पैसा invest करून आर्थिक फायदा घ्यावा. पण फरक पडत असेल तर घर घेणं उत्तम.

शाळा हा एक भाग झाला, स्वानुभवावरून stability and company (स्थिरता आणि संगत) हा निकष मांडला.

पु ले शु.

समजा एका 'अ ' ने मुलांना चांगली शाळा मिळावी म्हणून महागड्या वस्तीत जास्त भाडे देऊन घर भाड्याने घेतले ( त्याने उपनगरात कर्जाने घर घेतले असते तर घरभाड्यात थोडी भर घालून कर्जाचा हप्ता फेडता आला असता) . त्याच्याच वर्गातल्या 'ब' ने उपनगरात आपले बजेट विचारात घेऊन एक प्लॅट विकत घेतला आणि परिसरातील चांगल्या शाळेमध्ये मुलांचे अँडमिशन घेतले.
उपनगरातील शाळा तुलनेने स्वस्त होती. महागड्या वस्तीत रहाणे टाळल्याने ब चा खर्च तुलनेत कमी होता.
आता १५ वर्ष उलटून गेलेत मुलांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण संपले. अ आणि ब दोघांच्या मुलांना १२ वी ला चांगले मार्क मिळाले आणि उच्च शिक्षणासाठी दोघांची मुले परगावी वसतिगृहात रहातात.
अ आणि ब चे फायदे / तोटे पाहू
१) अ- मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या ठिकाणी राहिलो हे समाधान . त्याचे ऑफिस त्याच परिसरात असल्याने प्रवासाचा वेळ वाचला .
दर दीड दोन वर्षानी घर बदलावे लागत होते त्यामुळे कुठे फारसा आपले पणा वाटलाच नाही. आजही ११ महिन्यानी नवीन घर शोधावे लागणार हा विचार आहेच. पगार वाढला पण त्या प्रमाणात घरभाडे व इतर खर्चही वाढला .
२) ब - १५ वर्षांपूर्वी पै पै जमवून घेतलेले घर , पैसे जमवण्यासाठी चांगल्याच खस्ता खाव्या लागल्या होत्या त्यावेळी. १५ वर्षात वस्ती वाढत गेली आणि तो रहातो त्या परीसरातल्या जागेचा भाव ही वाढत गेला. आणी कर्ज ही जवळपास फिटले आहे. छोटे का असेना पण मालकीचे घर आहे; उद्या रिटायर झाल्यावर आपल्याला किमान भाड्याचे घर शोधत फिरावे लागणार नाही , भाड्यावर खर्च करावा लागणार नाही याचे समाधान श्री व सौ. ब यांच्या मनात आहे.
( लेखास प्रतिवाद करण्याचा हेतू नाही, पण स्वमालकीचे घर असण्याचा फायदा मांडण्याचा तोकडा प्रयत्न समजावा)

फलक से जुदा, माझ्या प्रतिसादातील टोन खटकला नाही ना? तसे असेल तर क्षमस्व.

प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते आणि ती चुकवावी लागते.

जिवलग मित्र न मिळायची रिस्क आहे. पण त्या बदल्यात चांगले शिक्षण, ट्रेनिंग,वातावरण, सुविधा अशा अनेक गोष्टींवर पाणी सोडावे लागू शकते.
आयुष्यात सगळ्यांना सगळेच मिळत नाही. कुठे तडजोड करायची हे आपले आपण ठरवायचे. हे सगळे तुम्ही म्हणालात तसे व्यक्तिसापेक्ष आहे.

काय मिळवण्यासाठी आपण काय गमावत आहोत हा विचार करून प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यायचा असतो.

One size fits all असे सोल्यूशन नसतात ना….

वीरू,

‘अ’ पण जागा/घर घेऊ शकतो की….

धाग्यात मी ते कव्हर केले आहे.

शाळेला खूप जास्त महत्त्व देताय. >> +१

<< जरा सहन करायला काय हरकत आहे? >> Lol

<< मी quality education ला महत्व देतोय. >>
मुंबईत कफ परेडला भाड्याने घर घेतले म्हणून Cathedral and John Connon School मध्ये admission मिळणार नाही. मग काय उपयोग तुमच्या भाड्याच्या घराचा?

अमक्या शाळेत प्रवेश घेतला की मुलाला नक्की उच्च दर्जाचं शिक्षण मिळेलच (आणि त्या चं आपसूक भलं होईल) त्याचा व्यत्यास त्याला त्या शाळेत प्रवेश मिळाला नाही तर त्याला उच्च दर्जाचं शिक्षण मिळणार नाही ( व तो मागे राहील) ही दोन्ही सोपी , सरळसोट गृहीतकं वाटली. त्यासाठी भरपूर पैसा ओतायचा. मुलाला (आणि आपल्यालाही) त्याच्या वाढत्या वयातल्या आनंदाच्या इतर बाबींपासून दूर ठेवायचं. लहानपणीच रॅट रेसम ध्ये ढकलायचं. त्याने नक्की किती फरक पडतो?

'हॉबी क्लास' ऑक्सिमोरोन वाटतो.
मुलाला आम्ही तुझ्या(शिक्षणा- जोपासने)वर किती पैसा खर्च करतोय, त्यासाठी अन्य किती गोष्टींवर पाणी सोडतोय असं दडपण आणायचं हे ही पटत नाही.

रिअल इस्टेटमध्ये लाखांनी गुंतवणूक आणि स्वतः भाड्याच्या घरात राहणं हे गणितही पटलं नाही. आयडियलीरिअल इस्टेट हा आपल्या गुंतवणुकीचा काही भागच असायला हवा. जो माणूस रियल इस्टेट मध्ये लाखो रुपये गमवू शकतो, त्याची नेटवर्थ केवढी असेल?

लेखमालेत ज्या वयोगटातल्या, बॅकग्राउंडच्या व्यक्तिरेखा आल्या आहेत त्यांच्या केसेसमध्ये त्यांच्या माताही नोकरदार असण्याची शक्यता अधिक आहे. तरीही त्यांचे जोडीदार नोकरी करत नसणं खटकलं.
तसंच या सगळ्यांचा मज्जा करण्याचा कन्सेप्ट म्हणजे एकाकडे बसून दारूच्या बाटल्या रिचवणं हेही. त्यांचा व्यक्तिमत्व विकास फारच नॅरो राहिला आहे असं वाटलं. हे नॅरेशनच्या सोयीसाठी लिहिलं असेल. तरीही खटकलं.

वाचतेय!

>>पाल्याची मित्रांशी होणारी ताटातूट जशी विचारात घेत आहात तसेच त्याने आपल्याला परवडत नाही म्हणून साधारण (sub standard हा शब्द टाळतो आहे) शाळेत, ट्रेनिंगला जायचे का? हापण विचार करा की.

मुलांना चांगले शिक्षण, ट्रेनिंग, ईन्फ्रास्ट्रक्चर, सुविधा देण्यासाठी जर दर तीन वर्षांनी घर बदलावे लागत असेल, घराला हवा तो रंग देता येत नसेल, “ सुरक्षिततेची” भावना येत नसेल तर जरा सहन करायला काय हरकत आहे?

मुलांच्या भविष्यासाठी, जडणघडणीसाठी ती फारच छोटी किंमत आहे.>>

मुलांना खरेच हे असे दर तीन वर्षांनी घर बदलणे आवडेल का? कारण परीसर तोच राहिला तरी सोसायटी बदलते, काही वेळा भाडेकरु म्हणून वेगळी वागणूक असते. त्या भागात मालकीचे घर असलेल्यांची आर्थिक स्थिती आणि आपली कुवत यातील फरक मुलांना वारंवार टोचणार असेल, एकटं पाडणार असेल तर मुलांच्या जडणघडणीसाठी ते देखील योग्य नाही.
त्याने आपल्याला परवडत नाही म्हणून साधारण (sub standard हा शब्द टाळतो आहे) शाळेत, ट्रेनिंगला जायचे का? असा विचार करत मुलांसाठी सर्वोत्तम शाळा, स्पोर्ट्स क्लब वगैरे देखील एक प्रकारचे पिअर प्रेशर नाही का? प्राथमिक आणि माध्यमिक पातळीवरच्या शिक्षणाच्या बाबतीत हा हट्ट खरेच आवश्यक आहे का? पालकांनी इतकी तडजोड/गुंतवणूक केल्यावर पुन्हा मुलांवर कळत नकळत परतावा द्यायचे ओझे येवू शकते.