टेलिस्कोपने धुमकेतू बघण्याचा रोमांचक अनुभव!

Submitted by मार्गी on 24 January, 2023 - 06:17

✪ दुर्बिणीतून धुमकेतू C/2022 E3 (ZTF) शोधण्याचा व बघण्याचा अनुभव
✪ हा धुमकेतू बायनॅक्युलरद्वारे सध्या दिसू शकतो
✪ शहरापासून लांबचं आकाश आणि धुमकेतूची अचूक स्थिती माहित असणे आवश्यक
✪ त्याची स्थिती वेगाने बदलते आहे
✪ १ फेब्रुवारीच्या सुमारास सर्वाधिक तेजस्वी असेल

सर्वांना नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की, सध्या एक धुमकेतू- C/2022 E3 (ZTF) बायनॅक्युलरने दिसण्यासारखा आहे. २४ जानेवारीपर्यंत तो नुसत्या डोळ्याने दिसू शकेल, इतका तेजस्वी झालेला नाही आहे. परंतु तो बायनॅक्युलरने किंवा छोट्या टेलिस्कोपने बघता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला स्वच्छ आणि काळोख असलेलं आकाश लागेल. म्हणजे कोणत्याही शहरी दिव्यांपासून किमान २० किलोमीटर दूर. तसंच आपल्याला एखादं सविस्तर माहिती देणारं आकाश दर्शनाचं Sky safari सारखं app लागेल. त्याशिवाय मुख्य तारकासमुहांची ओळख असावी लागेल. आपल्याला आकाशातले ऑब्जेक्टस बघण्याची- विशेषत: अंधुक ऑब्जेक्टस बघण्याची सवय असावी लागेल.

मी हा अद्भुत धुमकेतू कसा बघितला ते आता सांगतो. काल, २३ जानेवारी रोजी लोणावळा जवळच्या अंजनवेल कृषि पर्यटन इथे आकाश दर्शन कार्यक्रम होता. पुण्यातल्या मराठवाडा मित्र मंडळ आर्किटेक्चर महाविद्यालयाने हा आयोजित केला होता आणि मला हे सत्र घेण्याची संधी मिळाली होती. सत्रामध्ये मला शनीची कडी, गुरूचे उपग्रह, चंद्राची विलोभनीय द्वितीयेची कोर, कृत्तिका इ. ऑब्जेक्टस दाखवता आले. शनी आणि शुक्राची युती छान दिसली. शिळिंब गावातून दिसणारं आकाश खूपच चांगलं होत. अनेक अंधुक तारेही दिसत होते. मला उत्सुकता होती ती धुमकेतूसोबत माझं नशीब आजमावून बघण्याची. मी आधी लिओनार्ड आणि निओवाईज धुमकेतूच्या वेळी बरेच प्रयत्न केले होते, पण ते बघता आले नव्हते. एक तर मी चुकीच्या दिशेने बघत असेन किंवा आकाशातली विजिबिलिटी ठीक नसावी. त्यामुळे ह्यावेळी मी धुमकेतू पुरेसा तेजस्वी होण्यापर्यंत वाट बघितली आणि काळोखं आकाश दिसेल अशा जागी जाण्याचीही वाट बघितली.

(ह्या धुमकेतूचा फोटो घेण्याचा मी केलेला प्रयत्न इथे बघता येईल: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/01/spotting-wonderful-comet-c20... इथे माझे आकाश दर्शनाशी संबंधित लेखही वाचता येऊ शकतील व इतरही टेलिस्कोपिक फोटोज बघता येतील.)

धुमकेतूच्या आकाशातल्या स्थितीनुसार तो पहाटे बघणं सोयीचं आहे. पहाटे ४.३० ला कडक थंडी होती. परंतु त्याचाच अर्थ हा की विजिबिलिटी (दृश्यमानता) चांगली असणार आहे. मी Sky safari app वर त्याची लेटेस्ट स्थिती तपासली. तो सप्तर्षीच्या थोडा खाली ड्रॅको म्हणजे कालेय तारकासमूहात आहे. तसंच तेजस्वी अशा स्वाती ता-यापासूनही काही अंतरावर आहे. त्याच्या स्थितीनुसार मी आकाशातल्या जागेचा अंदाज बांधला. माझा अंतराचा ठोकताळा वापरून त्या अंतरावर आकाशात शोध घ्यायला लागलो. टेलिस्कोपमध्ये ती दिशा घेऊन किंचित आजूबाजूला बघायला सुरुवात केली. App सांगतंय की धुमकेतू आयोटा ड्रॅकोनिस म्हणजे एडाजिश ता-याच्या अगदी जवळ आहे! थोडा वेळ शोध घेतला आणि अगदी १५ मिनिटांच्या आत मला इथे एक अंधुक कापसासारखा ऑब्जेक्ट दिसला. मग मी app वर परत स्थिती तपासली. आकाशातले धुमकेतूच्या जवळचे तारे तपासले! होय, हा धुमकेतूच आहे! एक तासभर त्याचं निरीक्षण करता आलं आणि हळु हळु त्याचा हिरवा रंगही किंचितसा दिसला.

मला तो शोधता आला, कारण मला काय दिसणार आहे, ह्याची कल्पना होती. मी तेजस्वी शेपूट असलेला धुमकेतू शोधत नव्हतो. मला कल्पना होती की, त्याची तेजस्विता ह्या स्थितीमध्ये जेमतेम दिसू शकेल, इतकीच आहे. रात्री आकाश स्वच्छ होतं, पण पहाटे धुकं होतं आणि दृश्यमानता कमी होती. वृश्चिकातले तारेही नेहमीसारखे तेजस्वी दिसत नाही आहेत. पण धुमकेतू जिथे आहे, त्या भागामध्ये मात्र बरेच अंधुक तारेही दिसत आहेत. त्यामुळे एक अंधुक पुंजका म्हणून हा धुमकेतू दिसू शकतोय. अर्थातच अधिक चांगल्या अंधा-या आकाशातून आणि चांगल्या ऑब्जर्विंग कंडीशन्स असताना तो अजून स्पष्ट दिसेल. आत्ताच्या स्थितीमध्ये त्याची ४ अंश लांब शेपटी दिसू शकत नाहीय. केवळ अंधुक डागासारखा त्याचा केंद्रभाग दिसतोय. शहरामधून छोट्या दुर्बिणीतून देवयानी आकाशगंगा जशी अंधुक दिसते, अगदी तसाच हा दिसतोय!


.

त्यानंतर मी धुमकेतूचे काही फोटो घेण्याचा प्रयत्न केला. एडाप्टर वापरून मोबाईल फोन टेलिस्कोपच्या आयपीसला सेट केला. मग शटर स्पीड ४ सेकंद ठेवली व ISO ३६०० केलं. पण अनेक प्रयत्न करूनही मला जेमतेम पुसट फोटो घेता आला. परंतु प्रत्यक्ष धुमकेतू बघणं अद्भुत होतं!

पुढच्या काही दिवसांमध्ये तो बघता येऊ शकेल. १ फेब्रुवारी रोजी तो पृथ्वीच्या सर्वांत जवळ असताना सर्वाधिक तेजस्वी दिसेल. आपल्याला त्याला बघायचं असेल तर चांगला बायनॉक्युलर, अंधार असलेलं आकाश आणि आकाशातल्या स्थितींचं चांगली ओळख लागेल. संयम शिकण्याचीही ही संधी आहे. आणि कोणी सांगावं, तो कदाचित इतका तेजस्वीही होईल की, तो नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकेल, काही जणांनी तसं भाकीत केलं आहे. आपण तयार राहूया व बघण्याचा प्रयत्न करूया. शेवटी तो तब्बल ५०,००० वर्षांनी सूर्याला भेटायला आलेला पाहुणा आहे ना!

(वाचल्याबद्दल धन्यवाद! फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचे अपडेटस हवे असतील व असं सेशन आपल्याकडे आयोजित करायचं असेल तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376 धन्यवाद.)

Group content visibility: 
Use group defaults

फार छान लिहिले आहे. मला काही फोटोत दिसला नाही. माहिती आवडली.
---
केशवकूल , तुम्ही याच लेखातल्या धुमकेतूची लिंक काल त्या रेडिओ लहरींच्या धाग्यावर दिली होती का, वाचली व आवडली. Happy

अस्मिता
थॅंक्यू. मला वाटले कोणी वाचली नाही . तिथे फोटो सुद्धा छान आहे.

अरे वा! दिसला का धूमकेतू. मीही बघण्याचा प्रयत्न करणार आहे. दिसला तर छानच. नियोवाईज दिसला होता.
टेलिस्कोपपेक्षा बायनॉक्युलरने धूमकेतू शोधायला सोपा जातो असा माझा अनुभव आहे.

केशवकूल आत्ताच लिंक पाहून आले. फोटो आणि माहितीही छान आहे. काल उघडलेली पण वाचायची राहून गेली. आज अस्मिताने आठवण केल्यावर लगेच वाचून आले.

Thank you

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! आपल्यापैकी कोणी नंतर बघितला का/ प्रयत्न केला का? तीन दिवसीय महाराष्ट्र खगोल संमेलन छान झालं. समारोप जीएमआरटीला झाला. सगळे कार्यक्रम/ व्याख्यान सुंदर होते. वृत्तांत लिहेन लवकरच. तिथूनही काल हा धुमकेतू बघितला. क्षितिजालगत असल्यामुळे त्या दिवशीपेक्षा जास्त पुसट दिसला.