खंडाळ्याच्या घाटासाठी...

Submitted by पराग१२२६३ on 28 November, 2022 - 13:49

IMG_7899_edited.jpg

यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं. त्यामुळं सकाळची शेवटची लोकल पकडली आणि लोणावळ्याकडे निघालो.

अखेर शिवाजीनगरहून लोणावळ्याला पोहचलो. थंड हवेच्या ठिकाणी जास्तच गरम होत होतं, ढगाळ हवासुद्धा होती. मग विचार करत होतो की, खंडाळ्याला अशा वातावरणात जायचं की नाही, कारण ढगाळ हवेमुळे फोटो नीट येणार नाहीत. थोडं खाणं झाल्यावर म्हटलं, “बघुया जाऊन पुढं!. किमान खंडाळ्याच्या स्टेशनपर्यंत तरी जाऊन येऊ”. असा विचार करून चालायला लागलो. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुढं निघालो. मजल-दरमजल करत, वाटेत फोटो काढत खंडाळा स्टेशनपर्यंत पोहचलो. मग म्हटलं, “जाऊ अजून पुढं, खंडाळा व्ह्यू पॉईंटपर्यंत तरी जाऊया इथंपर्यंत आलोय तर”. मग तसंच चालत राजमाची पॉईंटवर पोहोचलो. तिथून दिसणारा उल्हास नदीचा धबधबा आणि तिचं खोरं पहिल्यांदाच इतक्या शांतपणे न्याहाळू लागलो होतो. मस्त वाटत होतं. तिथूनच दूरवर मंकी हिल केबिनच्या पुढचा रेल्वेचा बोगदा दिसत होता आणि माझ्या खाली खंडाळ्याच्या बोगद्यातून बाहेर पडलेला आणि लोणावळ्याकडे जाणारा Expressway थोडासा दिसत होता. त्याच बोगद्याचे आणि एकूणच या परिसराचे फोटो काढण्याचा उद्देश ठेवूनच मी आज इथंपर्यंत पोहोचलो होतो, पण इथून Expressway चे बोगदे मात्र नीट दिसत नव्हते.

IMG_7940_edited.jpg

राजमाची पॉईंटपासून पर्यटकांची गर्दी वाढू लागली होती. उल्हास नदीचं खोरं तिथून न्याहाळून झाल्यावर मी थोड्या वेळानं खंडाळा व्ह्यू पॉईंटकडे निघालो. लांबूनच त्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांच्या गाड्या दिसू लागल्या होत्या. तिथं पोहोचल्यावर जे दृश्य डोळ्यासमोर दिसलं ते पाहून मनातल्या मनात “Ohh wowww” असे स्वर उमटले. जुना महामार्ग, त्याच्या खाली Expressway आणि त्या खाली लोहमार्ग, या सगळ्या मार्गांवरून सुरू असलेली अखंड वाहतूक, समोर जुन्या रिव्हर्सिंग स्टेशनचे अवशेष, सह्याद्रीचे कोकणाकडचे आणि खाली दरीत दिसत असलेलं खोपोली. तिथं पोहोचत असतानाच 22159 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुरात्ची थलालवर डॉ. एम. जी. राजचंद्रन चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस दिसली, म्हणजे तिचे टपच दिसले. मस्त दृश्य दिसत होतं या पॉईंटवरूनही. मग मनात आलं की, आज स्वच्छ हवा चांगली असती तर.

IMG_7910_edited.jpg

आता ठरवलं इथंपर्यंत आलोच आहे, तर तसंच आणखी चालत खाली अमृतांजन पॉईंटपर्यंत तरी जाऊन यावं. मग लागलो पुढं चालायला. इथून थोड्याच अंतरावर घाटरस्त्याची डागडुजी सुरू होती. अमृतांजन पॉईंटच्या जवळ पोहचल्यावर तिथून दिसणाऱ्या घाटाचं दृश्यही मस्त दिसत होतं. एकीकडे दरीत खोपोली शहर, दुसरीकडे सह्यकडे, जुन्या महामार्गाखालून जाणारा Expressway आणि समोरच्या डोंगरावरून छोटीशी दिसणारी आगगाडी! मग तिथं जरा जास्त वेळ रेंगाळलो. आजपर्यंत फक्त बस आणि ट्रेनच्या खिडकीतून पाहिलेलं दृश्य तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहत असल्यामुळे खूपच उत्साहित वाटत होतं.

पूर्वीच्या अमृतांजन पुलाच्या जागी गेल्यावर आता जरा काही तरी थंड प्यावं वाटलं. कारण लोणावळ्याच्या स्टेशनपासून इथपर्यंत जवळजवळ सव्वासात किलोमीटर चालणं झालेलं होतं. आता तिथं शिल्लक राहिलेल्या इतिहासाच्या काही खुणांचे फोटो काढून घेतले. कारण तिथंपर्यंत जाण्याचा माझा हेतूच तो होता. त्यानंतर मग परतीच्या मार्गाला लागलो, चालतच. तेव्हाच सुरू झालेला थेंब-थेंब पाऊस लोणावळ्यापर्यंत सुरूच होता. मध्येमध्ये थोडं खाण्यासाठी-पिण्यासाठी छोटा ब्रेक घेत लोणावळा स्टेशनवर पोहोचलो आणि संध्याकाळची लोकलही लगेच मिळाली. एकूणच या परिसराला दिलेली ही पहिलीच भेट खूपच मस्त होती. हे सारं केलं होतं खंडाळ्याच्या घाटासाठी!

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2022/11/blog-post_28.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

वा! मस्त भटकंती. माझी अनेक दिवसांची इच्छा आहे असं खंडाळ्याला फिरायचं आणि हॉटेल ड्युक्स रिट्रीट मधे रहायचे.

रेल्वेमार्गाच्या { भारतीय }इतिहासाविषयी चांगली इंग्रजी पुस्तके आहेत पण महाग आहेत.
उदाहरणार्थ Hill Railways of the Indian Subcontinent
By Richard Wallace · 2021

छान!