विक्रमवीर प्रशांत दामले : १२५०० प्रयोगांच्या निमित्ताने

Submitted by निकु on 7 November, 2022 - 04:10

सध्या विक्रमवीर, विक्रमादित्य या नावाने ओळखले जाणारे मराठी रंगभूमीवरील कलाकार प्रशांत दामले यांचा नुकताच १२५००वा प्रयोग मुंबईतील षण्मुखानंद या नाट्यगृही झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणी, किस्से, आवडलेल्या, नावडल्या गोष्टी शेअर करण्यासाठी हा धागा.

सुरवात माझ्यापासून करते. मी एकदाच लहानपणी बालगंधर्वला त्यांना भेटले आहे. भेटले आहे म्हणण्यापेक्षा, सही घेतली आहे. पण त्यांची अनेक नाटके आजवर बघत आले आहे, किंबहुना त्यांची नाटके बघतच मोठे झालेल्या पिढीतील मी एक.

मोरुची मावशी हे मी पाहिलेले पहिले नाटक. खरेतर मला तेंव्हा ते आजिबात आवडले नव्हते त्या मावशीच्या कन्सेप्टमुळे. विनोदाचा सेन्सही माझा यथातथाच होता. पण प्रशांत दामले आणि प्रदीप पटवर्धन मात्र लक्षात राहिले. त्यानंतर जशी जमतील तशी त्यांची नाटके पाहिलीत.

मला आवडणारी त्यांची गोष्ट म्हणजे जबरदस्त एनर्जी. सिनेमा असो, नाटक असो त्यांचा वावर इतका उत्साही असतो. तो माणूस आपल्याला त्याच्याकडे पहायला लावतो. आणखी म्हणजे त्यांचा प्रांजळपणा. ते स्वत: कबूल करतात की त्यांच्या सहकलाकारांबरोबर ते शिकत गेले आणि काही लकबीही आल्या. मला नेहमी, "ते.. हे.., आपल्ं ते गं" ही लकब अशोक सराफ यांच्याकडून घेतली असावी असे वाटते.

गेला माधव कुणीकडे मधला "अरे हाय काय नाय काय!" हे वाक्यही असेच अजरामर. त्यांना आजवर नट / कलाकार म्हणून ताजे ठेवणारी दुसरी गोष्ट मला वाटते ती त्यांचा गाता गळा. अभिनय आणि गाणे यांचा दुहेरी मिलाफ लाभल्याने त्यांचे नाटक इतरांपेक्षा वेगळे दिसते हे नक्क्की.

आता सध्या स्मृतीगंधने सुरु केलेल्या १/३ या मुलाखतींच्या निमित्ताने, त्यांचे कष्ट / मेहेनत आणि माणूस म्हणूनही प्रशांत दामले कसे आहेत यावर थोडा प्रकाश पडलाय असे वाटते.

१२५०० प्रयोग हा कारकिर्दीतील एक टप्पा असणे सोपे नाहीच आहे. त्यांच्या वेबसाईटवर १२५००चा हिशोब दिला आहे आणि यात केवळ मोठा किंवा महत्वाचा रोल असलेल्या नाटकाचे प्रयोग संख्या धरली आहे. सगळ्या नाटकांचे १००च्या वर प्रयोग झालेत. एक् सोडून. टुराटूर सारखी नाटके धरली तर किती आकडा वाढेल.. देव जाणे. ९२ सालापासून प्रयोग हाऊसफुल्ल घेणारा कलाकार! एक सामान्य रसिक म्हणून मला या सगळ्याचेच आश्चर्य, कौतुक वाटते आहे. प्रशांत दामले यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !

मी कुणी नाट्यसमीक्षक नाही आणि माझा या क्षेत्रातील अभ्यासही नाही. पण इथे मायबोलीवर अनेक जाणती मंडळी आहेत. त्यांची मते यानिमित्ताने वाचायला आवडतीलच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता सध्या स्मृतीगंधने सुरु केलेल्या १/३ या मुलाखतींच्या निमित्ताने, त्यांचे कष्ट / मेहेनत आणि माणूस म्हणूनही प्रशांत दामले कसे आहेत यावर थोडा प्रकाश पडलाय असे वाटते.>>> हो त्याचे काहि भाग बघितले, सगळ्याच मुलाखती छान आहे, अर्थातच कौतुक आहेच पण ते सगळ आतुन आलेल वाटत .अनेक किस्से एकायला पण छान वाटल, सन्दिप पाठकचा एपिसोड धमाल आहे.
मला आवडतो प्रशान्त दामले, एक-दोन नाटक बघितली आहेत, काही भुमिकात ते थोडे मोठे वाटले तरी त्याच्या एकदरित अभिनय्,हजरजबाबी पणा, उत्तम आवाज, बोलका आणी प्रसन्न चेहरा यावर सगळ्या त्रुटी झाकल्या जातात.
१२५०० चा टप्पा गाठणे म्हणजे खरोखर ग्रेट आहे.

चित्रपट आणि डेलीसोप्सच्या सोयीस्कर आणि सुरक्षित वाटेवरुन चालत न राहता नाटकासारखी बेभरवश्याची आणि प्रचंड जिकिरीची वाट चालायला जी एक निष्ठा, धाडस आणि पॅशन लागते त्याबद्दल दामलेंना सलाम!!
प्रचंड उर्जा, आपल्या स्ट्रेंथची आणि लिमिटेशनची अचूक जाण, प्रोफेशनलीझम आणि व्यवसायातल्या खाचाखळग्यांचा असणारा अंदाज..... उगीच नाही एखादा माणूस त्याच्या क्षेत्रात इतका मोठा होत!!

प्रशांत दामले यांचे अभिनंदन.
मी प्रशांत दामलेंची नाटकं पाहतच मोठी झाले.शिवाजी मंदिर ला नाटक पाहून पुढे (अर्थातच रस्त्यावर स्वस्तात) आईबाबांबरोबर शॉपिंग हा मोठा सोहळा असायचा
बे दुणे पाच, एका लग्नाची गोष्ट, चार दिवस प्रेमाचे, गेला माधव, मोरूची मावशी, ब्रह्मचारी,पाहुणा ही नाटकं दामले वाल्या क्रू असताना बघता आली हे भाग्यच.
अतिशय क्युट, कामात प्रोफेशनल आणि डेडिकेटेड माणूस.