कांतारा - अपेक्षापुर्ती आणि अपेक्षाभंग !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2022 - 09:29

आज अचानक कांताराला जायचा योग आला.

अचानक आला, कारण मला जायचे नव्हते. मला त्याचा ट्रेलरच भडक उथळ वाटलेला. तरी बहुतांश लोकं नावाजताहेत तर ओटीटीवर आल्यावर चान्स घेऊया म्हटलेले. तिथे रिमोट आपल्या हातात असतो. थिएटरमध्ये मात्र चित्रपट कितीही कंटाळवाणा वाटला तरी अर्ध्यावर उठून जायचा विचार आजवर माझ्या मध्यमवर्गीय मनाला शिवला नाही. वेळेचे रताळे झाले तरी चालेल, डोक्याची मंडई झाली तरी चालेल, पण समोर जो रायता फैलावून ठेवला असतो तो चाखूनच जायचा असे घरचे संस्कार आहेत.

पण बायको मात्र सोशलमिडीयावर होणार्‍या कौतुकाला बळी पडली. तिने बहिणींसोबत जायचा प्लान बनवला. कारण मी "चल हट" म्हणत विनम्र नकार दिला होता. जो तिने "जा फूट" म्हणत तितक्याच विनम्रपणे स्विकारला होता. पण आयत्यावेळी तिच्या बहिणींनी काही अपरिहार्य कारणांनी टांग दिल्याने ती विक्रम-वेधा प्रमाणे पुन्हा माझ्याच मानगुटीवर बसली.

मी काही अटी टाकल्या आणि तयार झालो,
१) थिएटरमध्ये काही खायचे नाही. काही प्यायचे नाही
२) चालत जायचे आणि चालत यायचे

यावर ती अनुक्रमे,
१) थिएटरमध्ये शिरायच्या आधी ब्रेकफास्ट करायचा, बाहेर पडल्यावर लंच - या परतअटीवर तयार झाली.
२) थिएटर घरापासून ३५० मीटर / ४ मिनिटे चालत अंतरावर आहे म्हणून विनाशर्त तयार झाली.

----------------------------------------------------

ईतकी 'मी मी' प्रस्तावना पुरे, आता मुद्देसूद परीक्षणाकडे वळूया Happy

----------------------------------------------------

१) काही लोकांनी याची तुलना तुंबाडशी करायचा चावटपणा केला होता. ट्रेलर बघून मला तसे बिलकुल वाटले नव्हते. चित्रपट पाहिल्यावर मात्र त्याचा उलगडा झाला. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी जो अमानवीय प्रकार दाखवला तिथून ही तुलना आली असावी.

२) तुंबाडमध्ये अमानवीय प्रकार असला तरी भय आणि त्या भयावर मात करणारा लोभ ही मध्यवर्ती संकल्पना होती. यात मात्र एका प्रथेमागील अंधश्रद्धेला खतपाणी होते. अर्थात असे चित्रपट असण्याला माझी काही हरकत नाही. फक्त तसा वैधानिक ईशारा सोबत असल्यास उत्तम.

३) मला चित्रपट पाहताना तुंबाड नाही पण पुष्पा जरूर आठवला. कारण यातलाही नायक वर्तनाने एक गुंडच दाखवला आहे. अश्या नायकाला थोड्याफार दृश्यात मनाने चांगले दाखवले की त्याच्या ईतर कैक दुर्गुणांचे समर्थनच नाही तर उदात्तीकरणही होते. त्यापेक्षा दुर्गुण हे नेहमी दुर्गुण म्हणूनच आलेले चांगले. (उदाहरणार्थ - कबीर सिंग)

४) पुष्पामध्ये जसे हिरोईन पटवायला जे आचरट प्रकार दिसले तेच ईथेही आढळले. हिरोईनशी पहिलेच ईंटरअ‍ॅक्शन तिच्या कंबरेला चिमटा काढून होते. तर पुढच्या सीनमध्ये या कृत्याचा पांचट विनोदनिर्मितीसाठी वापर केला जातो.
ज्याला आपल्याकडे "हाऊ चीप" म्हटले जाते त्याला दक्षिणेत "हाऊ क्यूट" म्हटले जाते का हा प्रश्न पडतो कधीकधी.
हे कल्चर आधीही काही साऊथच्या चित्रपटांमध्ये पाहिले आहे. ते या चित्रपटांच्या निमित्ताने ईथे रुजायला नको असे वाटते. यापेक्षा हिरोईनीची छेड काढणार्‍या गुंडांना मारून आपली मर्दानगी सिद्ध करणारे ऐंशीच्या दशकातील बॉलीवूड हिरो केव्हाही परवडले.

५) चित्रपट वेगवान आहे आणि पुर्ण चित्रपटभर त्याचा वेग कायम राहतो ही जमेची बाजू असल्यास, हो. ते तसे आहे असे म्हणू शकतो.
शेवटाआधी तेवढा थोडाफार रेंगाळतो.

६) संवादही तसेच धडाधड वेगात येतात. सुरुवातीला काही चुरचुरीतही वाटले. पण नंतर तो सतत संवादाचा मारा. त्यातून बाष्कळ विनोदनिर्मिती. त्यातले कित्येक कंबरेखालचे आणि दारूवरचे विनोद, जे साधारण विनोदबुद्धीतून येतात असे मला वाटते.

७) गाण्यांकडून तसेही मला अपेक्षा नव्हती. पुष्पामध्ये गाणी मजेदार होती. ईथे ते ही नव्हते. त्यांचे शब्द आणि चाल सोडा, ती कुठल्या सिच्युएशनला आली होती ते ही आता आठवत नाही.

८) अभिनयाबद्दल अळीमिळी गुपचिळी. चित्रपट भडक बटबटीत होता. अभिनय त्याला साजेसा होता. संवाद हिंदी डब असल्याने ओरिजिनल संवादफेकीवर नो कॉमेंटस. पण सारा अभिनय संवाद आणि अंगविक्षेप यावरच आधारीत होता. एकाही दृश्यात गलबलून आले, वा डोळ्यात पाणी आले असे झाले नाही.

९) वर चार ठिकाणी मी तुलनेसाठी पुष्पाचा उल्लेख केला. पण तो देखील माझ्यामते सामान्य दर्ज्याचाच चित्रपट होता. याला त्याच्याची एक घर आय मीन एक स्टार खाली ठेवावे असे वाटते. तरीही बरेच लोकांनी या चित्रपटाला दर्जेदार म्हटले आहे हे आश्चर्यचकित करणारे आहे.

१०) आवडलेल्या गोष्टींमध्ये बैलांची शर्यत आवडली. हिरो-हिरोईन रोमान्स करायला एका ऊंच मचाणीवर जातात. ते मचान फार आवडले.
पण कुठेही वाह क्या सीन है असे झाले नाही. याचा उल्लेख मुद्दाम कारण लास्ट सीन काय भारी आहे वगैरे बरेच ऐकले होते. बाकी चित्रपट कसाही असो, ईतके लोकं म्हणताहेत तर शेवटी काही छान बघायला मिळेल असे वाटलेले. पण तेही त्याच भडक रंगात रंगलेले होते.

११) हिरोईन नाही आवडली. सौंदर्य, अभिनय, अदा यापैकी कुठल्याच निकषावर नाही आवडली. वैयक्तिक आवड.

१२) अतर्क्य गोष्टींची आणि लॉजिकमधील त्रुटींची चीरफाड करायची झाल्यास त्याचा वेगळा लेख बनेल. पण मी ते करणार नाही. कारण मी सिनेमॅटीक लिबर्टीला मानतो. चित्रपट मनोरंजक, दर्जेदार आणि निखळ आनंद देणार असेल तर मला त्याचे काही घेणेदेणे नसते. हा दुर्दैवाने तसा नव्हता.

शीर्षक उलगडा:-
अपेक्षापुर्ती - माझी
अपेक्षाभंग - बायकोचा

ता.क. - थिएटरातून निघताना वॉssssव्ह करून एक जोरदार आरोळी ठोकायची प्रचंड ईच्छा झाली होती. सोबत बायको असल्याने कशीबशी आवरली Happy

तळटीप - भडक बटबटीत दाक्षिणात्य सिनेमे आणि बॉयकॉट बॉलीवूड ! या धाग्यात कांतारा चित्रपटाला न बघताच पुष्पा/केजीएफ/आर आर आर चित्रपटांच्या पंक्तीत बसवले हे काहींना रुचले नव्हते. जे योग्यच होते. पण चित्रपट पाहिल्यावर तो त्याच पंक्तीतील आहे हे मत प्रामाणिकपणे कायम आहे. चित्रपट आवडला असता तरी प्रामाणिकपणे कबूल केलेच असते. पण तसे होणे नव्हते.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेत. अनेक मुद्द्यांशी सहमत आहे. अभिनय किंवा संवाद याबाबत बऱ्याच अंशी सहमत आहे. चित्रपटाला गती आहे. फार विचार करायला वेळ देत नाही आणि विषय व पटकथेच्या दृष्टीने तेच योग्य आहे. मध्यंतरी थोडा कंटाळवाणा झालाय.

कोणत्या चित्रपटाशी तुलना करणे योग्य होणार नाही. माझ्या दृष्टीने हा चित्रपट थिएटर मध्ये अनुभवण्याचा आहे. ओटीटी (किंवा तत्सम) वर पाहणे यात मजा येणार नाही. सिनेमॅटोग्राफी खूप छान आहे. निर्मिती प्रक्रियेत कॉम्पुटरला फार स्थान दिलेले नाही असे वाचले.

मी चित्रपट पाहिला तेंव्हा त्या त्या प्रसंगी थिएटर मध्ये वॉssssव्ह च्या आरोळ्या येत होत्या. उत्साही प्रेक्षक होते.

असो पण या चित्रपटावर वेगळा धागा येणे आवश्यक होतेच. त्यामुळे यावर धागा पाहून छान वाटले. विविध अंगानी चर्चा करण्यासारखा विषय व चित्रपट आहे.

दाक्षिणात्य सिनेमे भडक आणि बटबटीत असतात असा धागा आधीच उघडून त्यावर मुक्ताफळे उधळल्याने आता दाक्षिणात्य सिनेमा आवडला तरी तसे मान्य करायची सोय आणि मनाचा मोठेपणा तुमच्याकडे उरला नाही ना Happy
पुन्हा धागा चालवण्यासाठी नेहमी उलट्या सुलट्या कोलांट्या उड्या मारतात ते दिसतेच आहे.

मला थिएटर मध्ये पाहण्याजोगे वाटले ते सुरवातीची दहा की पंधरा मिनिटे (पण त्यातल्या सगळ्याच फ्रेम्स नव्हे), म्हणजे तो पुंजरली गायब होतो तो पर्यन्त आणि मग शेवटी पुंजारली येतो दोन तीन मिनिटे तो भाग. (पुंजारली मेक अप भडक आहे, पण तरी आवडला. का? नाही सांगता येत.)
मधला वेळ म्हणजे अचानक वेगळ्याच धाग्यावर गेलो तसे. (कथेच्या दृष्टिकोनातून नव्हे, कथा सलग आहे, पण कलेच्या दृष्टीकोनातून).
आणि हो तो वॉssssव ऐकायचा असेल आणि ओरडायचाही असेल कुणाला तर त्यासाठी सुद्धा थिएटर योग्य.
क्लायमॅक्स फायटिंग तर नुसता गोंधळ आहे. आवड निवड वेगळे पण त्यात सुन्न होण्यासारखे वगैरे काहीच नाही. अधून मधून हसु मात्र येते.
कथानक आणि आणि एकंदर इतर पात्रे बघता हिरोईन त्यास साजीशी वाटली. चांगली/आवडी निवडीचा विचारच केला नाही.

मला स्वतःला तो पुंजारली मेकअप करून तसं नाचायला आवडेल.
मी घरी आल्यावर त्याच्या सारखे तो नाचता नाचता हाताने मागच्या झिळमिळया उडवतो त्या स्टेप्समध्ये नाचूनही पाहिलं आरशासमोर. पण जमलं नाही. प्रॅक्टिस करावी लागेल.
वॉssव ओरडायला मात्र डमी घ्यावा लागेल.

कोणी दक्षिण कोरिया मध्ये राहिले आहे का ?
नक्की कशी संस्कृती आहे तिथे.
समाज माध्यम, गूगल ह्या वर विश्वास ठेवणे अवघड जाते

त्याच प्रोडक्शन हाऊस च 777 Charlie ha chitrapat वूट सिलेक्ट वर पहा...नितांत सुंदर....बेवारस नायक आणि एका पावसाळी रात्री त्याचा कडे आश्रयास आलेले कुत्र्याचे पिल्लू...ते नाते कसे develop होत जाते... कथानकात ट्विस्ट पण भरपूर आहेत...फारच सेंटी होऊन जाल

विदेशी नेता भारतात आला की मुंबई किंवा दिल्ली मध्ये येतो.
दिल्ली मध्ये नवी दिल्ली चा काहीच भाग दाखवला जातो.
आणि मुंबई मध्ये मुंबई चा काहीच भाग दाखवला जातो.
आणि तेच प्रसिद्ध होते.
त्या वरून भारतातील शहर खूप प्रगत आहेत असा चुकीचा समज जगात होतो.
कोरिया चा खरा अनुभव असेल तर च तो ह्या धाग्यावर यायला हवा

उंटावरून शेळी हाकणे हा प्रकार नको.

छान लिहिलं आहे परीक्षण. मुद्दा क्र ३ आणि ४ वाचून 'ब्रुटस, तू सुद्धा?' असं झालं. आजकाल लोकांना गुन्हेगारी उदात्तीकरण का बरं आवडू लागलं आहे?

सिनेमॅटोग्राफी खूप छान आहे. निर्मिती प्रक्रियेत कॉम्पुटरला फार स्थान दिलेले नाही असे वाचले.
>>>>
हो, सिनेमॅटोग्राफी छान आहे. जंगल कथानकानच्या गरजेनुसार छान चित्रित केले आहे. पण बरेचसे रात्रीचे आणि डार्क शेडमध्ये आले आहे. डोळ्याला सुखद अशी हिरवीगार द्रुश्ये आवडली असती.

डोळ्याला सुखद अशी हिरवीगार द्रुश्ये आवडली असती.>>>>> मल्याळम सिनेमे बघा..सिनेमा कोणता हि असो..हिरवागार निसर्ग असतोच असतो.

777 Charlie>>>> हा पाहायच्या यादीत आहे.. पण प्राईमवर रेन्टवर आहे.

मृणाली ओके, पण मल्याळम चित्रपट कोणी डब करेल तरच ते बघणे होईल Happy
कोकणात चित्रित झालेल्या सिनेमांमध्येही ते आढळते. पण बरेचदा बजेटच कमी असते.

@ मानव
मला स्वतःला तो पुंजारली मेकअप करून तसं नाचायला आवडेल.
मी घरी आल्यावर त्याच्या सारखे तो नाचता नाचता हाताने मागच्या झिळमिळया उडवतो त्या स्टेप्समध्ये नाचूनही पाहिलं आरशासमोर. पण जमलं नाही. प्रॅक्टिस करावी लागेल.
>>>>>>>>>>>
मला आधी वाटले कोणीतरी मला चिडवायला माझ्या स्टाईलने पोस्ट लिहिली Happy

@ मी अश्विनी
दाक्षिणात्य सिनेमे भडक आणि बटबटीत असतात असा धागा आधीच उघडून त्यावर मुक्ताफळे उधळल्याने आता दाक्षिणात्य सिनेमा आवडला तरी तसे मान्य करायची सोय आणि मनाचा मोठेपणा तुमच्याकडे उरला नाही ना Happy
>>>>

यात कसला मनाचा मोठेपणा छोटेपणा.
तरी बाहुबलीबाबत असे आधी करून झाले आहे.
बाहुबली १ मला फारसा रुचला नव्हता. बाहुबली २ देखील बायकोमुळेच थिएटरात बघावा लागला. पुर्वग्रहदूषित मनाने बघितल्यामुळे असेन कदाचित. पण मला तो तेव्हा रुचला नाही. आणि मी त्यावर टिकात्मक परीक्षण लिहिले.

पण पुढे मात्र याच मायबोलीवर माझे कबूल करून झालेय की ती माझी चूक होती आणि मला तो आता पुन्हा पुन्हा बघायलाही आवडतो.
अपवाद त्याचा क्लायमॅक्स. तो तसाच बोअर आहे. स्पेशल ईफेक्ट आणि अतार्किक अ‍ॅक्शन सीन..

पण क्लायमॅक्स वगळता बाहुबली २ आवडला कारण त्यातील हिरो हिरोईनची पात्रे आणि केमिस्ट्री मनाला भावली. त्यातला हिरो हिरोईनसह प्रत्येक स्त्रीला सन्मान देणारा दाखवला, आईचा आदर करणारा दाखवला, तरीही जेव्हा न्यायाची बाजू आली तेव्हा पत्नीची बाजू घेणारा दाखवला.
त्याचवेळी स्त्रियांच्या पाठीवरून हात फिरवणारा दाखवला तो कथेतील व्हिलन होता. त्याचे मुंडके भर दरबारात उडवले गेले. त्या चित्रपटातील सर्वात बेस्ट सीन होता तो.
ईथे मात्र नायकच नायिकेच्या कंबरेला तिची मर्जी नसताना चिमटा काढतोय. आवडले पाहिजे का हे? तुम्हीच सांगा प्रामाणिकपणे..

ओरिजिनल ची मजा डब मधे नाही येत ओ...सबटायटल्स सोबत बघू शकता..
>>>>>>
मृणाली हो खरे आहे, पण सबटायटल्स वाचता वाचता कलाकारांच्या चेहर्‍यावरचे भाव वाचायचे राहून जातात. त्यात ईंग्लिश सबटायटल्स असले तर वाचायचा टाईम वेगळा आणि समजायचा टाईम वेगळा. एक सोडून एक वाचून होते माझे Happy पण वर सिनेमॅटोग्राफीचा मुद्दा होता. तर ते डबमध्येही चालून जावे.
किंवा बेस्ट म्हणजे द्रुश्यम सारखे आपले अजय देवगण वर्जन बनवावे Happy

777 Charlie ha chitrapat वूट सिलेक्ट वर पहा...नितांत सुंदर....बेवारस नायक आणि एका पावसाळी रात्री त्याचा कडे आश्रयास आलेले कुत्र्याचे पिल्लू...
>>>>

हो. ट्रेलर पाहिलेला छान होता.

पण पाळीव प्राणी प्रेमी नसल्याने किंबहुना चार हात दूरच राहत असल्याने हा बघायचा विचार टाळला आहे आजवर Happy

“ ओरिजिनल ची मजा डब मधे नाही येत ओ...सबटायटल्स सोबत बघू शकता” - तुम्ही दक्षिण भारतीय सिनेमांविषयी नेहमी छान लिहीता.

मला भाषा कळत नसेल तर इंट्रेस्ट टिकवून ठेवता येत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं सबटायटल्सच्या मदतीनं (सोबतीनं हा अयोग्य शब्दप्रयोग आहे) ते सिनेमे नाही पाहिले जात. असंख्य लोकांप्रमाणे माझाही हाच पूर्वग्रह आहे कि दक्षिण भारतीय सिनेमे भडक आणी function at() {
[native code]
}आर्किक घटनांनी भरलेले असतात. तो पूर्वग्रह दूर करण्याचे कष्ट घेण्याची आत्ता तरी माझी तयारी नाहीय (तितकीच जितकी ब्राऊझर बदलून ते ‘अ’ आणी ‘त’ मधे उमटणार्या असंबद्ध अक्षरांना डिलीट करण्याची Happy )

मला थिएटर मध्ये पाहण्याजोगे वाटले ते सुरवातीची दहा की पंधरा मिनिटे (पण त्यातल्या सगळ्याच फ्रेम्स नव्हे), म्हणजे तो पुंजरली गायब होतो तो पर्यन्त आणि मग शेवटी पुंजारली येतो दोन तीन मिनिटे तो भाग.
>> शेवटी पुंजरली येत नाही, गुलिगा येतो असे मला वाटले. पुजरली राजाला म्हणाला असतो ना, जरी मी तुला माफ केले तरी गुलिगा तुला माफ करणार नाही. शेवटी, पुंजरली आणि गुलिगा एकमेकांना भेटुन गायब होतात.
मला पण कामे उत्तम असली तरी ज्या जोराचे अ‍ॅड्व्हरटाइझिन्ग केले तेव्हडा काही खास नव्ह्ता. यामानाने मला रन्वे ३४ फार जास्त आवडला. विशेषतः सिनेमेटोग्राफी फारच उत्तम आणि अभिनयही.

“कांतरा वरील रूनमेष चे परीक्षण वाचून असेच अगणित प्रश्न मला पडले आहेत” Uhoh हो?? एव्ह्ढं सगळं होतं त्या परिक्षणात? (कन्फ्युजलेल्या ऋन्मेषची इमोजी) Wink

<<शेवटी, पुंजरली आणि गुलिगा एकमेकांना भेटुन गायब होतात.>>
मी याच वेळे बद्दल बोलत आहे. गुलीगा अंगात येऊन (विनोदी) फाईट करतो आणि साहेबाला मारतो, त्यानंतर तो पुंजरली बनतो तेव्हापासून पुढे, तो गायब होईस्तो.

लोकांनी कंताराला दर्जेदार म्हंटल्याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं आणि तुम्हाला तो आवडला नाही हे तुम्ही इथे आवर्जून लिहिलंत.
तुम्हाला तुंबाड चांगला वाटला आणि माझ्या मते तुंबाड हिडीस आहे. कांतारात नायक सुरुवातीलाच नायिकेसोबत जे करतो ते खटकण्यासारखंच आहे पण तुंबाडमध्ये बारा वर्षाचा मुलगा जे करतो त्यात तुम्हाला काहीच कसं खटकलं नाही?

गायब होऊन जातात कुठे दोघे बापलेक ते कळत नाही.
तरी शिवाला तो ऊंच मनुष्य ठार मारतो असे मला वाटले. त्यानंतर गुलिगा अंगात येऊन तो जिवंत होतो आणि सगळ्यांना मारतो. मग पुन्हा पुंजारलीचा मेक अप करून नाचतो. मग जंगलात जाऊन बापाला मिळतो आणि अनंतात विलीन होतात दोघे.
त्यामुळे हा आधीच त्या ऊंच मनुष्याच्या हातून मेलेला असे वाटते. पण बाप तर धावताधावताच कसा मिस्टर ईंडिया होतो त्यामागचे लॉजिक कळले नाही.

कांतारात नायक सुरुवातीलाच नायिकेसोबत जे करतो ते खटकण्यासारखंच आहे पण तुंबाडमध्ये बारा वर्षाचा मुलगा जे करतो त्यात तुम्हाला काहीच कसं खटकलं नाही?
>>>

याचे उत्तरही लिहिले आहे परीक्षणात.
जी गोष्ट चूक आहे ती गोष्ट चुकीची म्हणूनच चित्रपटात आली तर त्यात काही वावगे नाही. आक्षेप उदात्तीकरणाला आहे. जर हे स्पष्टी पुरेसे नसेल तर सविस्तर लिहिता येईल वा झाल्यास स्वतंत्र धागाही काढता येईल. आज नको. आज डोके दुखतेय माझे.

Pages