कांतारा - अपेक्षापुर्ती आणि अपेक्षाभंग !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2022 - 09:29

आज अचानक कांताराला जायचा योग आला.

अचानक आला, कारण मला जायचे नव्हते. मला त्याचा ट्रेलरच भडक उथळ वाटलेला. तरी बहुतांश लोकं नावाजताहेत तर ओटीटीवर आल्यावर चान्स घेऊया म्हटलेले. तिथे रिमोट आपल्या हातात असतो. थिएटरमध्ये मात्र चित्रपट कितीही कंटाळवाणा वाटला तरी अर्ध्यावर उठून जायचा विचार आजवर माझ्या मध्यमवर्गीय मनाला शिवला नाही. वेळेचे रताळे झाले तरी चालेल, डोक्याची मंडई झाली तरी चालेल, पण समोर जो रायता फैलावून ठेवला असतो तो चाखूनच जायचा असे घरचे संस्कार आहेत.

पण बायको मात्र सोशलमिडीयावर होणार्‍या कौतुकाला बळी पडली. तिने बहिणींसोबत जायचा प्लान बनवला. कारण मी "चल हट" म्हणत विनम्र नकार दिला होता. जो तिने "जा फूट" म्हणत तितक्याच विनम्रपणे स्विकारला होता. पण आयत्यावेळी तिच्या बहिणींनी काही अपरिहार्य कारणांनी टांग दिल्याने ती विक्रम-वेधा प्रमाणे पुन्हा माझ्याच मानगुटीवर बसली.

मी काही अटी टाकल्या आणि तयार झालो,
१) थिएटरमध्ये काही खायचे नाही. काही प्यायचे नाही
२) चालत जायचे आणि चालत यायचे

यावर ती अनुक्रमे,
१) थिएटरमध्ये शिरायच्या आधी ब्रेकफास्ट करायचा, बाहेर पडल्यावर लंच - या परतअटीवर तयार झाली.
२) थिएटर घरापासून ३५० मीटर / ४ मिनिटे चालत अंतरावर आहे म्हणून विनाशर्त तयार झाली.

----------------------------------------------------

ईतकी 'मी मी' प्रस्तावना पुरे, आता मुद्देसूद परीक्षणाकडे वळूया Happy

----------------------------------------------------

१) काही लोकांनी याची तुलना तुंबाडशी करायचा चावटपणा केला होता. ट्रेलर बघून मला तसे बिलकुल वाटले नव्हते. चित्रपट पाहिल्यावर मात्र त्याचा उलगडा झाला. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी जो अमानवीय प्रकार दाखवला तिथून ही तुलना आली असावी.

२) तुंबाडमध्ये अमानवीय प्रकार असला तरी भय आणि त्या भयावर मात करणारा लोभ ही मध्यवर्ती संकल्पना होती. यात मात्र एका प्रथेमागील अंधश्रद्धेला खतपाणी होते. अर्थात असे चित्रपट असण्याला माझी काही हरकत नाही. फक्त तसा वैधानिक ईशारा सोबत असल्यास उत्तम.

३) मला चित्रपट पाहताना तुंबाड नाही पण पुष्पा जरूर आठवला. कारण यातलाही नायक वर्तनाने एक गुंडच दाखवला आहे. अश्या नायकाला थोड्याफार दृश्यात मनाने चांगले दाखवले की त्याच्या ईतर कैक दुर्गुणांचे समर्थनच नाही तर उदात्तीकरणही होते. त्यापेक्षा दुर्गुण हे नेहमी दुर्गुण म्हणूनच आलेले चांगले. (उदाहरणार्थ - कबीर सिंग)

४) पुष्पामध्ये जसे हिरोईन पटवायला जे आचरट प्रकार दिसले तेच ईथेही आढळले. हिरोईनशी पहिलेच ईंटरअ‍ॅक्शन तिच्या कंबरेला चिमटा काढून होते. तर पुढच्या सीनमध्ये या कृत्याचा पांचट विनोदनिर्मितीसाठी वापर केला जातो.
ज्याला आपल्याकडे "हाऊ चीप" म्हटले जाते त्याला दक्षिणेत "हाऊ क्यूट" म्हटले जाते का हा प्रश्न पडतो कधीकधी.
हे कल्चर आधीही काही साऊथच्या चित्रपटांमध्ये पाहिले आहे. ते या चित्रपटांच्या निमित्ताने ईथे रुजायला नको असे वाटते. यापेक्षा हिरोईनीची छेड काढणार्‍या गुंडांना मारून आपली मर्दानगी सिद्ध करणारे ऐंशीच्या दशकातील बॉलीवूड हिरो केव्हाही परवडले.

५) चित्रपट वेगवान आहे आणि पुर्ण चित्रपटभर त्याचा वेग कायम राहतो ही जमेची बाजू असल्यास, हो. ते तसे आहे असे म्हणू शकतो.
शेवटाआधी तेवढा थोडाफार रेंगाळतो.

६) संवादही तसेच धडाधड वेगात येतात. सुरुवातीला काही चुरचुरीतही वाटले. पण नंतर तो सतत संवादाचा मारा. त्यातून बाष्कळ विनोदनिर्मिती. त्यातले कित्येक कंबरेखालचे आणि दारूवरचे विनोद, जे साधारण विनोदबुद्धीतून येतात असे मला वाटते.

७) गाण्यांकडून तसेही मला अपेक्षा नव्हती. पुष्पामध्ये गाणी मजेदार होती. ईथे ते ही नव्हते. त्यांचे शब्द आणि चाल सोडा, ती कुठल्या सिच्युएशनला आली होती ते ही आता आठवत नाही.

८) अभिनयाबद्दल अळीमिळी गुपचिळी. चित्रपट भडक बटबटीत होता. अभिनय त्याला साजेसा होता. संवाद हिंदी डब असल्याने ओरिजिनल संवादफेकीवर नो कॉमेंटस. पण सारा अभिनय संवाद आणि अंगविक्षेप यावरच आधारीत होता. एकाही दृश्यात गलबलून आले, वा डोळ्यात पाणी आले असे झाले नाही.

९) वर चार ठिकाणी मी तुलनेसाठी पुष्पाचा उल्लेख केला. पण तो देखील माझ्यामते सामान्य दर्ज्याचाच चित्रपट होता. याला त्याच्याची एक घर आय मीन एक स्टार खाली ठेवावे असे वाटते. तरीही बरेच लोकांनी या चित्रपटाला दर्जेदार म्हटले आहे हे आश्चर्यचकित करणारे आहे.

१०) आवडलेल्या गोष्टींमध्ये बैलांची शर्यत आवडली. हिरो-हिरोईन रोमान्स करायला एका ऊंच मचाणीवर जातात. ते मचान फार आवडले.
पण कुठेही वाह क्या सीन है असे झाले नाही. याचा उल्लेख मुद्दाम कारण लास्ट सीन काय भारी आहे वगैरे बरेच ऐकले होते. बाकी चित्रपट कसाही असो, ईतके लोकं म्हणताहेत तर शेवटी काही छान बघायला मिळेल असे वाटलेले. पण तेही त्याच भडक रंगात रंगलेले होते.

११) हिरोईन नाही आवडली. सौंदर्य, अभिनय, अदा यापैकी कुठल्याच निकषावर नाही आवडली. वैयक्तिक आवड.

१२) अतर्क्य गोष्टींची आणि लॉजिकमधील त्रुटींची चीरफाड करायची झाल्यास त्याचा वेगळा लेख बनेल. पण मी ते करणार नाही. कारण मी सिनेमॅटीक लिबर्टीला मानतो. चित्रपट मनोरंजक, दर्जेदार आणि निखळ आनंद देणार असेल तर मला त्याचे काही घेणेदेणे नसते. हा दुर्दैवाने तसा नव्हता.

शीर्षक उलगडा:-
अपेक्षापुर्ती - माझी
अपेक्षाभंग - बायकोचा

ता.क. - थिएटरातून निघताना वॉssssव्ह करून एक जोरदार आरोळी ठोकायची प्रचंड ईच्छा झाली होती. सोबत बायको असल्याने कशीबशी आवरली Happy

तळटीप - भडक बटबटीत दाक्षिणात्य सिनेमे आणि बॉयकॉट बॉलीवूड ! या धाग्यात कांतारा चित्रपटाला न बघताच पुष्पा/केजीएफ/आर आर आर चित्रपटांच्या पंक्तीत बसवले हे काहींना रुचले नव्हते. जे योग्यच होते. पण चित्रपट पाहिल्यावर तो त्याच पंक्तीतील आहे हे मत प्रामाणिकपणे कायम आहे. चित्रपट आवडला असता तरी प्रामाणिकपणे कबूल केलेच असते. पण तसे होणे नव्हते.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि हो तो वॉssssव ऐकायचा असेल आणि ओरडायचाही असेल कुणाला तर त्यासाठी सुद्धा थिएटर योग्य.
>>>>>>>>>>>

आज लेकीला शाळेतून आणायला गेलेलो. तेव्हा तिथल्या मैदानात काही मुले वॉssssव ओरडत होती. कांतारा न पाहिलेल्या पब्लिकला न कळणे अवघड. पण असे वाटले बरे झाले लेकीला नेले नाही पिक्चरला. १८+ आहे सांगून घरीच ठेवलेले. नाहीतर घरातही रात्री अपरात्री ते आवाज ऐकावे लागले असते.

समर्थन काय त्यात
कलाकृती आहे. कोणाला आवडेल कोणाला आवडणार नाही. त्यात आवडण्यासारख्या गोष्टीही आहेतच. स्पेशली तांत्रिक बाबीत.
पण ज्या हटके कथेचे पटकथेचे कौतुक होतेय त्याच्या सादरीकरणातच नेमके मला काही गोष्टी खटकल्याने हा परीक्षण प्रपंच.

https://www.misalpav.com/node/50827

ओळख -

नावातल्या 'ए लेजेंड' नुसार चित्रपटाची कथा एका आख्यायिकेवर बेतलेली आहे. कर्नाटकातील काही ग्रामीण लोकसंस्कृतींमध्ये आढळणाऱ्या 'भूता कोला' या परंपरेशी संबंधित ही आख्यायिका सांगून चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटात या परंपरेचा केवळ 'कोला' असा उल्लेख असून या कार्यक्रमाच्या उत्सव मुर्तीला 'देव' म्हणतात. हे देव गावातील कुणीही व्यक्ती असू शकते. एरवी सामान्य माणूस म्हणून जगणाऱ्या या व्यक्तीच्या शरीरात 'कोला'च्या वेळी वनदेव संचारतात अशी मान्यता असते. 'कांतारा'चा कन्नड अर्थ वनदेव असाच आहे. हे देवच आपले वर्षभर रक्षण करतात यावर गावकऱ्यांची श्रद्धा असते. आख्यायिका १८४७ पासून सुरू होऊन राजा आणि गावकऱ्यांमध्ये 'देवा'च्या‌ साक्षीने एक करार होतो. राजघराण्यातील पुढील पिढ्या या कराराचे पालन करतात का? गावकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करणारा 'साहेब' आणि जंगलाचे रक्षण म्हणजे गावकऱ्यांचे उच्चाटन असे समजणारा 'वन अधिकारी' यांच्या भूमिका बदलतील का? चित्रपटाचा नायक शिवा (रिशब शेट्टी) आपल्या मनमौजी तंद्रीतून कधी बाहेर येईल? हे सगळे नाट्य‌ घडत असताना त्या वर्षाचा 'कोला' पार‌ पडेल का? 'कोला' झाला तर 'देव' काय आदेश देतील? या नागमोडी वळणांवरील नाट्यांच्या खजिन्याचा‌ पेटारा म्हणजे 'कांतारा' हा चित्रपट.

शिल्लक -

चित्रपटाची शिल्लक दोन प्रकारची असते- एक प्रत्यक्ष पडद्यावर चित्रपट पाहताना त्या कालावधीत आपल्याला काय अनुभव आला तो आणि दुसरी चित्रपटातील आवडलेल्या गोष्टी जसे की पटकथा, अभिनय, छायाचित्रण वगैरे. कांतारा पाहणाऱ्या मोठ्या वर्गाचे यातील पहिल्या मुद्द्यावर एकमत होईल. कांतारा ही मोठ्या पडद्यावर अनुभवावी अशी एक सुंदर कलाकृती आहे. बहुतेक प्रसंग जंगलातील असून जंगल जसेच्या तसे पडद्यावर उभे करण्यात छायाचित्रण कमालीचे यशस्वी झाले आहे. कथेच्या सादरीकरणात कृत्रिम धागे जोडण्यापेक्षा दिग्दर्शकाने ग्रामसंस्कृती जशीच्या तशी पडद्यावर दाखवली आहे. कमी असल्या तरी प्रेक्षकाला खळखळून हसवतील अशा मोक्याच्या विनोदी जागा चपखल बसल्या आहेत. लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता या तीन जबाबदाऱ्यांचे शिवधनुष्य रिशब शेट्टी ने अत्यंत लिलया पेलले आहे. चित्रपटाच्या एका टप्प्यात रिषभ शेट्टीने जो अभिनय केलाय तो तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम अभिनयांपैकी एक असेल याची मला खात्री वाटते. समाजमाध्यमांवर बऱ्याच ठिकाणी 'कांतारा'ची तुलना‌ 'तुम्बाड'शी केली आहे. परंतु कथेसहीत इतरही बाबतींत मला 'तुम्बाड' सरस वाटला. तरीही रद्दी बॉलिवूडपटांना कंटाळलेल्या चित्रपट प्रेमींसाठी 'कांतारा' चा मनोरंजन उतारा ही दिवाळी भेट आहे.

परंतु कथेसहीत इतरही बाबतींत मला 'तुम्बाड' सरस वाटला. तरीही रद्दी बॉलिवूडपटांना कंटाळलेल्या चित्रपट प्रेमींसाठी 'कांतारा' चा मनोरंजन उतारा ही दिवाळी भेट आहे.>>>
बॉलीवूडचा द्वेष पूर्ण पोस्ट. मग त्याच्यासाठी तुंबाड पण सरस.

सर
शाहरूखचा "हॅॅपि बर्थ डे" विसरलात काय?

पण ज्या हटके कथेचे पटकथेचे कौतुक होतेय त्याच्या सादरीकरणातच नेमके मला काही गोष्टी खटकल्याने हा परीक्षण प्रपंच. >> चूक

-तरीही रद्दी बॉलिवूडपटांना कंटाळलेल्या चित्रपट प्रेमींसाठी 'कांतारा' चा मनोरंजन उतारा ही दिवाळी भेट आहे
>>>
बॉलीवूडचे पिक्चर सरसकट रद्दी नसतात. हे अचानक कुठून दाक्षिणात्यप्रेम आणि बॉलीवूडविरोध सुरू झालाय हे समजत नाही. पण अशी तुलना वाचली की हल्ली तो रिव्यूही अजेंडा राबवून लिहिलेला वाटतो. त्यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही.

मला खात्री वाटते. समाजमाध्यमांवर बऱ्याच ठिकाणी 'कांतारा'ची तुलना‌ 'तुम्बाड'शी केली आहे. परंतु कथेसहीत इतरही बाबतींत मला 'तुम्बाड' सरस वाटला. तरीही रद्दी बॉलिवूडपटांना कंटाळलेल्या चित्रपट प्रेमींसाठी 'कांतारा' चा मनोरंजन उतारा ही दिवाळी भेट आहे. >>>>>>>>>>
+११११११
उद्या चाललोय .
38वा दिवस तरीही शोज बर्या पैकी फुल्ल आहेत .
बॉलीवुड असेच संपून जातील पण सुधारणार नाहीत .

बॉलीवूडला सलमानचे मसालापटही ३०० करोड वगैरे कमावतच होते कालपरवापर्यंत. ते ही काही सगळेच दर्जेदार होते अश्यातला भाग नाही.
बॉक्स ऑफिस कमाईवर चित्रपटांचा दर्जा नाही तर पैसे खर्च करून थिएटरला पिक्चर बघणाऱ्या पब्लिकची आवड कळते.

मी सरांशी सहमत आहे. पिक्चर ओके आहे पण लोक फारच ओव्हरहाइप करतात बुवा. लास्टच्या सीनचं इतकं कौतुक ऐकून काहीतरी भव्य नि क्लेव्हर एन्डिंग बघायला मिळणार असं वाटलं होतं, तर टीपिकल साऊथ स्टाईल अचाट आणि अतर्क्य हाणामारी निघाली. कोणी एक फालतू जमीनदार जनरल डायरचा अवतार असल्यासारखा अख्ख्या गावाला मारायचा हुकूम देईल?
ते वराह रूपम गाणं कॉपी करून वर मांडवली करायची सोडून कोर्टात गेले हे पण आवडलं नाही.
अर्थात ओव्हरऑल पिक्चर चांगलाच आहे.

लास्टच्या सीनचं इतकं कौतुक ऐकून काहीतरी भव्य नि क्लेव्हर एन्डिंग बघायला मिळणार असं वाटलं होतं, तर टीपिकल साऊथ स्टाईल अचाट आणि अतर्क्य हाणामारी निघाली. कोणी एक फालतू जमीनदार जनरल डायरचा अवतार असल्यासारखा अख्ख्या गावाला मारायचा हुकूम देईल?
>>>>>>>

अगदीच.
त्यात मी जिथेतिथे क्लायमॅक्स कौतुक वाचून आधीच घरी सांगितले होते की क्लायमॅक्स भारी आहे बाब्बो..
पण जे काही बघितले त्यानंतर थिएटरमधून तोंड लपवून बाहेर पडायची वेळ आली. शेवटही तितकाच भडक आणि अतर्क्य होता जितका उर्वरीत चित्रपट. मेकअप, गाणे, चित्रीकरण वगैरेंचे कौतुक आपल्याजागी ठिक आहे. पण तो काही चित्रपटाचा आत्मा नसतो. ओवरऑल अनुभव आपल्या चॉईसला न रुचणारा टिपिकल साऊथचा सिनेमा पाहिला असाच होता.

सरांशी बर्‍याच अंशी सहमत. जय भीम पाहिल्यावर जी अस्वस्थता येते तशी येत नाही. एखादी झग मग वरात पहावी, डोळे दिपून जावेत पण वरात निघून गेल्यावर विसरून जावी असे काहिसे झाले. मला तुंबाड व जय भीम उजवे वाटले.

नक्कीच तुलनाच नको. ती कांतारावर अन्यायकारकही ठरेल.
आमच्याकडे हे तिन्ही चित्रपट बघितले गेले आहेत.
कांतारा माबोमुळेच काय तो माझ्या आठवणीत आहे. घरचे विसरूनही गेलेत. मात्र तुंबाड जयभीम स्मरणात आहेत. राहतील.

रत्नाकर मतकरींची पंगत ही कथा पुलंच्या बटाट्याच्या चाळीपेक्षा भारीच आहे असं ऐकायला मिळाले तर Wink

मला पण कळत नाही सिनेमांची तुलना कशाच्या बेसवर करायची असते.
तुंबाड वेगळा,कर्णन वेगळा, जयभीम वेगळा, कांतारा वेगळा.

मला पण कळत नाही सिनेमांची तुलना कशाच्या बेसवर करायची असते.
>>>>
कथानकात काही सिमिलर लिंक असल्यास तुलना होते.

पण जर लोकं सरसकटपणे बॉलीवूडच्या चित्रपटांपेक्षा हॉलीवूड वा टॉलीवूडचे चित्रपट भारी असता असे किंवा व्हायसे वर्सा बोलत असतील तर ते मात्र चुकीचे ठरेल.

चित्रपट = करमणूक साधन
चित्रपट = विशिष्ट विचारप्रणालीचा प्रसार
चित्रपट = प्रबोधन / विचार मंथन /संदेश
(* अपवाद
चित्रपट = फर्स्ट डे फर्स्ट शो / फॅन फॉलोविंग )
नक्की आपण काय उद्देशाने पाहतोय त्यावर तुलना ठरेल. आणि निव्वळ करमणूक हां मुद्दा प्रमुख असावा / असतो तर खर्च केलेला वेळ आणि पैसा ह्याबद्दल कुठल्या मुव्हि पाहुन काय मिळाले अश्या चर्चा रंगतात तेव्हा तुलना अभिप्रेतच आहे आणि असायला सुद्धा हवी.

आज प्राईमवर कन्नड विथ इंग्लिश सबटायटल्स बघितला.

अजिबात आवडला नाही. जेवढा गाजावाजा ऐकला होता त्या मानाने तर अगदीच सामान्य आहे!

Pages