साथीदार

Submitted by पाचपाटील on 16 October, 2022 - 07:25

नक्की आठवत नाही, पण फार पूर्वी कधीतरी एका
भुतानं माझं झाड धरलं आहे..! आणि धरूनच ठेवलं
आहे. सदैव सोबत असतं‌. शहरं, गावं, जागा, नोकऱ्या बदलून बघितल्या तरी पाठ सोडत नाही. अगदीच सांगायचं झालं
तर 'जेथे जातो तेथे, तो माझा सांगाती' असा प्रकार..
सवय झालीय आता तशी.. कारण शेवटी सवय
ही एक अशी गोष्टंय की ती होतेच‌ ना माणसाला..!
नाय का?

तर सदर भूत हे 'मुंजा' ह्या प्रकारातलं आहे..!
म्हणजे एखाद्या बिनलग्नाच्या तरूण पुरुषाचा अकाली मृत्यू होतो, तेव्हा तो स्वतःस 'मुंजा'मध्ये रूपांतरित करून घेतो..! आणि हे खरंच आहे म्हणजे..! कारण मी निखळ वैज्ञानिक सत्य सोडून इतर काही बोलत नसतो. मला तशी सवय नाही. ह्यासंदर्भात मी नासा, रॉयल सोसायटी, हार्वर्ड, बर्कले वगैरेमध्येही बरेच प्रबंध पाठवले आहेत. आणि त्यांनीसुद्धा
ह्या 'मुंजा सिद्धांता'चं पुरजोर समर्थन केलं आहे.
हल्ली माझे प्रबंध तिकडे सिलॅबसलाही लावले आहेत.
त्यामुळे तिकडचे विद्वान मला व्याख्यानासाठी सन्मानानं आमंत्रित करत असतात. परंतु मी हसून नकार देतो. त्यांना
तो माझा विनय वाटतो. तसा समज करून घेण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. माझा त्याबद्दल काही आक्षेप नाही.
माझा आक्षेप खरंतर आंग्लभाषेस आहे..! हा आक्षेप तात्विक आहे..! आंग्लभाषेतून सलग चार वाक्यं संवाद साधण्याची वेळ आली की माझ्या नाभीकेंद्राजवळ बारीकसा कंप सुटतो..! जो पुढे पुढे वाढत जातो. आणि मग पाय भुईवर दृढपणे उभे राहत नाहीत. आणि घटनास्थळावरून तातडीने पोबारा करण्याची भावना होते..!
परंतु इथे मुद्दा तो नाहीये. त्यामुळे तुम्हीही आता ह्या अनुषंगाने अधिक फाटे फोडू नये प्लीज, अशी एक विनंतीय. अर्थात ही विनंती धुडकावून लावण्याचा तुम्हास अधिकार आहे.
आणि तो मला मान्यच आहे. पण तरीही..

तर सदर भूत मृत्यूपूर्वी एक मराठी लेखक होतं..
हिरोहोंडा नामक गाडीवरनं कुठंतरी चाललं होतं.
अचानक म्हस आडवी आली आणि त्यात हे उलथलं.. आणि
मग हे 'आधीच लेखक न् त्यात पुन्हा मुंजा' असं फैनाबाज कॉम्बिनेशन‌ तयार झालं.
बाकी, मराठी लेखक म्हटल्यावर पैशे किंवा समजा
प्रसिद्धी बिसिद्धीच्या नावानं सगळा भकास उजेडच..! आणि ह्याला आपण काही करू शकत नाही.
आपल्याकडे हे असं आहे. ते स्वीकारायचं. आणि पुढे जायचं..! दुसरं काय करणार..! शेवटी असंय की सगळेच काही नेमाडे होऊ शकत नाहीत ना..! आणि यालाही आपण काही करू शकत नाही.

बाकी मला त्याचा तसा काही त्रास व्हायचं कारण
नाही. त्रास करून घेण्याची माझी वृत्ती नाही.
त्याचं त्याचं चाललेलं असतं. माझं माझं चाललेलं असतं.
जॉब तर जॉब असतो. काम तर काम असतं.
दिवस तर दिवस असतात. सपाट तर सपाट असतात.

परंतु मग शनिवार, अमावस्या वगैरे शुभदिन येतात आणि त्याचा कायतरी प्रॉब्लेम होतो..! मग ते मला डिवचून
डिवचून लिहायला भाग पाडतं. काहीतरी लिहावं लागतं मग.

मग पुन्हा त्याची पिरपिर चालू होते.
"जुन्या गोष्टींना फोडणी देऊ नकोस..! आठवून आठवून
लिहू नकोस. एक वाक्य संपेपर्यंत पुढचं वाक्य आलं
पाहिजे."

मी बरं म्हणतो.
तो चालूच असतो.

"किती गचाळ लिहितोस तू? घटनांची वर्णनं, स्पष्टीकरणं किती? शब्दांचा फाफट पसारा किती? आणि काय ही भाषा? प्रक्षुब्ध पिसाटपणाचा स्फोट आहे नुसता..! अरे लोकं वाचतात म्हणजे आपलीही कायतरी जबाबदारी असते की नाही? विषारी कशाला लिहायचं उगाचच?"

मी बरं म्हणतो.
तो चालूच असतो.

"चमकदार वाक्यं वापरू नकोस. तसं करून लक्ष
वेधून घेण्याचा मोह आवर. तसलं फार काळ टिकत
नाही. मोठमोठी जडजंबाळ वाक्यं वापरून फेकमफाक करू नकोस..! मोड ही वाक्यं..! बारकी बारकी वाक्यं कर..! व्याकरण यम नियम विरामचिन्हं वगैरेचाही फार लोड घ्यायचं कारण नाही. बिनधास्त मोडतोड कर. शेवटी मराठी ही तुझी स्वतःची भाषा आहे. तिच्या अंगाखांद्यावर हवं तसं खेळायचं नाही, तर मग कुणाच्या? आं??"

मी बरं म्हणतो.
तो चालूच असतो.

"खूप पात्रं नको. उगाच झंझट होते मग.‌ त्यातून तुझी
पात्रंही तुझ्यासारखीच सुमार निपजतात.
उदाहरणार्थ पॉलिटीकली करेक्ट बोलणं, नेमका गाभा बापजन्मी कळू न देणं, नाव‌ न घेता टोचून बोलणं वगैरे..!
शिवाय विनाकारण तडतड करणं, आव आणणं, हिमालयात निघून जाण्याच्या बाता करणं..!
अरे, हिमालय खूप दूर आहे.! आणि तिथं जाऊन तरी
काय करणार ना..! वितळायला लागलाय आता तोपण..! इथंच बघ काय तरी छोटं मोठं‌‌..! बाकी तू काय बघणार म्हणा..! तुझी नजर तुझ्या पायापुरती सरपटते..! जास्तीत जास्त उद्याचा विचार..! त्यापलीकडे झेप नाही..! काय उपयोग?"

मी बरं म्हणतो.
तो चालूच असतो.

"आणि मनुष्याच्या इंद्रियास मेलेल्या उंदराची उपमा देण्याची घाई करू नकोस..! कारण हा उंदीर कधी खडबडून जागा होईल, सांगता येत नाही...! भल्याभल्यांना चकवलं आहे त्यानं..! तू तर अजून बच्चा आहेस..!"

मी बरं म्हणतो.
तो चालूच असतो.

"दैनंदिन मानवी संपर्क संपुष्टात आलेत. संवाद नाहीतच. म्हणून लाजू नकोस. संवाद नसलेली कथा लिही.
आणि मनाला हजार वाटा..! हजार विषय भिरभिरत येतात. आगा ना पिछा. त्यातली एकतर एक प्रतिमा
पकड आणि धरून ठेव. आकार दे तिला. त्यासाठी
खुर्चीला चिकटून बसावं लागतं तासनतास.
शिस्त लागते त्यासाठी. तुझ्यात ती नाही. चिंपांझींचे
आदिम वारे अजूनही वाहतायत आपल्यातून..
तुझ्यातून जरा जास्तच सुसाट वाहतायत.. आतल्या चिंपांझीला कंट्रोल कर..! नायतर तुझ्या इमेजचं काय होणार..!"

असलं काय काय बोलून गिल्ट आणतं. तेजोभंग करतं.

मग मी त्याला बोलतो की बाबा एवढं सगळं माहितीय
तर तूच लिही ना.!

ह्यावर भूत चिडतं. डोळे गढूळ करतं. घरभर पाय
आपटत फिरत राहतं रात्रभर.
अर्थात, घर म्हणजेही एक आपली बोलण्याची पद्धत
आहे समजा..! कारण हे सरळसरळ एक बोळकांडच
आहे.
एक बसाय-उठायची खोली, चतकोर स्वयंपाकघर
आणि अर्धी न्हाणी..! खलास..! इंटेरियर आर्कीटेक्चर ॲस्थेटीक्स प्राईड एलीजन्स वगैरे हास्यास्पद प्रकारांना
पूर्ण फाटा..! तशी काही गरजच नाही ना..!

तर आता भूत पुस्तकांचा ढीग उलटापालटा करतंय.
त्याला नारायण धारपांची पुस्तकं पायजे असणार..!
ती माझ्याकडे मिळण्याचा प्रश्नच येत नाही..! म्हणून
ते वेळोवेळी निषेध व्यक्त करतं. यावेळी निषेधाचा सूर
किंचित चढा आहे.
कारण एकमेव पडदा सळसळायला लागतोय..!
विजेचा दाब कमी जास्त होतोय..! फॅनच्या अचानक अंगात येतंय. शेवटचे आचके द्यायला लागतोय. पिवळा बल्ब
पुकपुक करायला लागतोय. पुस्तकांची पानं फडफडायला लागतायत. झुरळं, मुंग्या वगैरेंची धांदल उडतेय..!
पाली, कोळी वगैरे 'काय च्यायला तापाय डोक्याला'
असं तणतणत पडद्याआड सरकतायत..!

नंतर मग पहाटेपर्यंत भूत अनाप-शनाप बरळत राहतं..!
यावेळी बहुदा काफ्का, काम्यू किंवा सांगवीकर वगैरे भुताच्या तावडीत सापडलेले असावेत..!

कारण एक्झिस्टेंशियल क्रायसिस किंवा जिवितकार्य
वगैरे धूसर शब्द स्लॅबला धडकून माघारी येतायत..! उदाहरणार्थ ह्या भूतजन्माचं प्रयोजन काय?
तसं काही प्रयोजन मुळात असतं काय?? मग ह्या
सगळ्या बेफाट आशयसंपन्न विस्तारात मी कुठे मान
टाकावी? काय करावं? काय केलं असता अस्तित्वाचा
कंद सापडेल? डोक्यात वाहणारा काळ थांबला तर भोवताली वाहणारा काळ वेगळा दिसेल का? आणि त्यासाठी कुठल्या दिशेने जात राहावं लागेल? कुठे सुरू होतो तो साकल्याचा हिंदळणारा प्रदेश ?
वगैरे वगैरे..

मी कानांवर उशी घेऊन झोपून जातो. सकाळी उठून बघतो
तर ब्लेंडर्स प्राईडचा खंबा अर्धा झालेला..!
आणि ग्लास वगैरे सगळे स्वच्छ धुवून उपडे ठेवलेले..! पुरावे नष्ट करण्याचा असफल प्रयत्न..! सदरहू भुतानं वीकेंडला
जोरदार रंगारंग कार्यक्रम केल्याचं कळतंय..! तक्रार करण्यात अर्थ नाही..! कारण मी समजा त्या क्षेत्रातला पुराना पापी.! किंवा अगदीच लाजमोड्या वगैरे..! त्यामुळे त्यास
मोठ्या दिलानं माफ करण्याशिवाय दुसरा काही मार्ग उरत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचायला सुरु केल्यावर जिवणी हलली, स्मितहास्य आले, मग ते खुसुखुसू झाले आणि
"यावेळी बहुदा काफ्का, काम्यू किंवा सांगवीकर वगैरे भुताच्या तावडीत सापडलेले असावेत..!" ह्या वाक्याला खदाखदा मधे परिवर्तित झाले.
मजा आली, लिहिते रहा
ब्लेंडर्स प्राईड महाग झाले तरीही Wink

हसवत सुरुवात केलेलं लेखन पुढे गंभीर झालं.
भुताचे Dos and Do nots आवडले.
उपान्त्य परिच्छेद वाचताना आरती प्रभू आठवले. तसे इतरांनाही ते प्रश्न पडलेत. पण मला तेच आठवले.
लगे रहो.

मी कानांवर उशी घेऊन झोपून जातो. सकाळी उठून बघतो
तर ब्लेंडर्स प्राईडचा खंबा अर्धा झालेला..!>>
सगळा उलगडा झाला, भुताने अवतार कधी आणि कसा घेतला त्याचा Happy कृ ह घ्या!
छान लिहिलंय, नेहमीप्रमाणेच !

भूत क्यूट आहे

छान लिहिलंय, नेहमीप्रमाणेच ! +१

सुनिती, rmd,, सामो.. धन्यवाद Happy

हर्पेन,
अवघड झालंय सगळं..! ब्लेंडर्स महागच होत चाललीय. आमच्यासारख्यांना संसार करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.. आवाज उठवला गेला पायजे ह्यावर Happy

अनिंद्य,
ह्या क्यूट भुतास एखादी अघोरी, मायावी, पांढऱ्या पायाची (कवटीवरून ढळलेल्या पदराचे फलकारे मारत जाणारी वगैरे..!) हडळ किंवा तत्सम जाखीण शोधून ह्या वर्षी त्याचं लगीन खंगाळून टाकण्याचा मानस आहे..! बघूया. कसं कसं जमतंय ते.

भरत, चंद्रा धन्यवाद Proud

मला वाटतंय मलाही एका वेगळ्या भुताने पछाडलंय. वाटतंय म्हणजे नक्कीच असणार. हेच बघा ना. अस्तित्वाचा कंद म्हटल्यासरशी आरती प्रभू आठवावेत हे समजा नैसर्गिकच. पण मला आनंदाचा कंद हरी वगैरे आठवला. पंचाईतच ना. आणि त्यातून कंद लिहिताना भ्रमणध्वनीयंत्राने ते शुद्ध करून कंड लिहिलं. आता यंत्रच लिहितंय म्हटल्यावर ते आपोआप शुद्धच असणार ना. म्हणा मानव एक वेळ - एक वेळ कशाला हजार वेळा चुकेल( बोलून चालून मानव हा स्खलनशील प्राणी!) पण यंत्र?
तर तो आनंदाचा कंडच सोसत राहावं लागतंय आणि लिहिताही धड येत नाहीय. आणि समजा हाताशी कुठलीच प्राइड नाहीय वगैरे..

उठा ले रे बाबा उठा ले..

ता. क. लेख आवडला आहे...

SharmilaR, AMIT धन्यवाद वगैरे Happy

हीरा,
सदर गफलतीत भ्रमणध्वनीमागच्या प्रोग्रामचा हात असावा.
आणि असंय की भाषिक व्यवहारातून कधीच लंपास होऊन गेलेले कंद वगैरे शब्द, त्याच्या जाणीवे नेणीवेच्या पटलावर येण्याचे काही कारणच नाही ना..! त्यामुळे सदर प्रोग्राम किंवा तत्सम अल्गोरिदमने हे भलतेच कांड केलेले असले, तरी आपण त्याकडे मानवतावादी परिप्रेक्ष्यातूनच पाहिले पाहिजे..! कारण तसे न पाहून सांगणार कुणाला ना ?

बाकी, ह्या अशा पद्धतीच्या भुतांसाठी श्री. बाबा चमत्कार म्हणून एक तज्ञ देवऋषी माझ्या माहितीत आहेत. इ.स.१९९३ सालापासून त्यांचं ह्या क्षेत्रात नाव आहे. श्री. तात्या विंचू ह्यांना मृत्यूंजय मंत्राची लाईव्ह दीक्षा देऊन त्यांनी स्वतःस सिद्ध केलं आहे.
"ओम् भग भुगे.. भगनी भागोदरी.. भगमासे.. ओम् फट स्वाहाss" अशा त्यांच्या दमदार स्वरूपाच्या मंत्रोच्चारापुढे कोणत्याही प्रजातीचे भूत टिकू शकेल, असे वाटत नाही..!
तर आता त्यांनाच पाचारण करण्याचा इरादा आहे..!
(ब्लेंडर्सच्या काळजीपोटी माणूस काय काय नाही करत..! त्यामुळे हे एक करावंच लागेल आता..! इलाज नाही..! खापकन् अर्ध्याने लेवल कमी झालेली बघून जीव जळतो होss..! काय सांगायचं..! कसं सांगायचं..! )

बाकी, तुम्ही म्हणत असाल तर तुमच्याकडेही देतो पाठवून त्यांना..! सांगा मग त्यांना, तुमचं काय आहे वगैरे..! औ?
Proud