चालायचंच..!

Submitted by पाचपाटील on 8 October, 2022 - 02:56

तर बारकी बारकी माणसं असतात. हातावरचं पोट असतं. आणि ते काही गप्प बसू देत नाही.. मग कुठंतरी वडापावची गाडी लावा.. कुठं गारेगार, बॉम्बे मिठाई, भेळ विका..
पाणीपुरीची सायकल लावा.. आला दिवस पलीकडे
ढकलण्यासाठी जे काही करावं लागतं ते करा.. अर्थात तिथंही स्थानिक दादा वगैरे असतात समजा.. आणि सरकारी यंत्रणाही असतात.. नगरसेवक आमदार वगैरे असतात..
त्यांचेही स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात.. जे अर्थातच आपल्या आकलनाच्या कक्षेपलीकडचे असतात. पण असतात.
म्हणजे समजा हरेक मोका साधून सिग्नलवर शुभेच्छा वगैरेंचे दीड दीड लाखांचे फ्लेक्स चमकवणे.
किंवा मग सांस्कृतिक उत्सवांचे तळमळीचे कार्यकर्ते असतात..! तर त्यांचं खाणं पिणं मजाहाजा वगैरे सांभाळावं
लागतं..! शिवाय कंत्राटं असतात.. शहरातील मोकळ्या
जागांवर वेगवेगळी आरक्षणं, झोनिंग, ग्रीन बेल्ट, रिंग रोड, डीपी वगैरे लाख लडतरी असतात..! त्यावर बारीक लक्ष ठेवून हालचाली कराव्या लागतात..! कारण त्यात समजा हजार उपाशी वाटेकरी असतात..!अधिकारी, पत्रकार, अपोझिशनचे गटनेते, आरटीआयवाले, पर्यावरणवाले, पक्षातलेच भावी स्पर्धक इत्यादी..! सगळ्या असंतुष्ट आत्म्यांना थोडा थोडा नैवेद्य ठेवावा लागतो..! पंगत बसवून खाल्ल्यावरच गोड लागतं..! अन्यथा अपचन, वमन, अल्सर इत्यादी विकार उद्भवतात.

तर ही सगळी समजा एक गुंतागुंतीची अभेद्य साखळी असते..! आणि अर्थातच ताकदवान असते..! तर मग तिच्यापुढं थरथर कापावं लागतं..!
कारण हप्ते, प्रोटेक्शन मनी वगैरेंचाही तातडीचा प्रश्न असतो..! अर्थात, तो तसा असणारच..! कारण एवढी प्रचंड यंत्रणा म्हटल्यावर पोटही तसंच बकासुरी टाईपचं..! आणि त्यात सदैव पेटलेला भुकेचा अग्नी..! तर त्यासाठी मग बारक्या माणसांच्या बोकांडी बसणार नाय तर मग कुणाच्या?
अर्थात, ही बारकी माणसंही आश्चर्यकारकच..!
फार चिवट जात, आइ टेल् यू..! कुणी कितीही कसंही नाडा..! तेवढ्यापुरती कुचमतात..! पण दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन पायावर उभीच..! हरप्रकारच्या रोगराईतूनही जिवंतच..! काय करावं ह्यांचं..! काय करावं म्हणजे ही सगळी डस्ट जगातून एकदाची कायमची हद्दपार होऊन जाईल, कळत नाही..!

बाकी, गबरू उच्चभ्रू कार्पोरेटवालेही असतात समजा..! परंतु ते लांssब तिकडे..! ह्या सगळ्या डस्ट पासून सुरक्षित..! शिवाय ते आणि त्यांचे अदृश्य बाप म्हणजे सरळसरळ डायनासॉर्सच..! मग यंत्रणा त्यांचा नाद कसा करणार ना ? तेवढा कुणाचा घास? तेवढा दमसांस, तेवढी पोच, तेवढी जिगर कोठून आणावी..!

अर्थात, त्याबाबत तक्रार अशी काही नाही..! डायनॉसॉरही शेवटी माणसंच असतात..! त्यांनाही एकच तर आयुष्य मिळालंय..! त्यातून एवढं सगळं बिनबोभाट भरभरून आहे म्हटल्यावर ताव तर मारलाच पाहिजे..!
हा ताव सुखेनैव आणि अमर्याद मारता येईल, अशी चोख व्यवस्थाही करायला हवी..!
त्यासाठी समजा अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स, जेट्स वगैरेचे ताफे दिमतीला... आणि उदाहरणार्थ आफ्रिका वगैरे भागात हिऱ्यांच्या खाणी... किंवा गोवा, बॅंकॉक, लास वेगास वगैरे ठिकाणी कसिनो वगैरे‌... तसेच खनिजांनी समृद्ध असे डोंगर, जंगलं, समुद्र, तेलविहीरी कब्जात घ्यावं लागतं.. तो कब्जा सांभाळावा लागतो..! ते सगळं डेव्हलप करण्यासाठी भरपूर झिजावं लागतं..! मोठ्या माणसांनाही दु:खं असतात..! कुणी ती समजूनच घेत नाही..!
कंटाळा येतो कधीकधी..! अर्थात मनोरंजन इत्यादींसाठी पार्टीजसाठी सिनेसृष्टीतील कलावंत वगैरे असतात समजा..! आणि ते नजरेच्या एका इशाऱ्यावर हजर होतात..! त्यांची ठरलेली बिदागी असते. ती फेकण्याची व्यवस्थाही असते. तो काही मोठा प्रश्न नाही..!

परंतु तरीही कधी कधी मनःशांती फारच ढळते.. मग ती दूर करण्यासाठी स्वतःच्या सातमजली जहाजांतून प्रशांत महासागरातील वगैरे एखाद्या निसर्गरम्य खाजगी बेटावरही जावं लागतं सगळ्यांना..! सामुहिक आत्मशोध इत्यादी..! त्यातून थोडाफार गिल्ट तळाशी जो टोचत असतो तो निघून जातो..! आणि सगळं काही स्वच्छ दिसायला लागतं..! मनाच्या प्रतलावर निर्णयाचे नवीनवीन क्षण उगवतात..! त्या उजेडात लुटण्याच्या नवनवीन सुसंधी प्रकट होतात..! त्यासाठी समजा मग काही देशांतल्या निवडणूका मॅनेज कराव्या लागतात..! जरूर पडल्यास कधीकधी सरकारंही पाडावी लागतात..! एखाद्या कंगाल देशातला डंगरा राजकारणी बोलायला लागल्यास त्यालाही सौम्य धमकी देऊन सरळ करावं लागतं..! ह्या गोष्टींना इलाज नसतो..!

बाकी, मघाशी सांगितल्याप्रमाणे डायनासॉरही माणसंच असल्यामुळे त्यांचेपाशी सामाजिक, पर्यावरणीय प्रश्नांसंदर्भातील जाणीवाही टोकदार असतात..! म्हणून मग एनजीओ किंवा ट्रस्ट वगैरेही चालवावं लागतं..! त्या माध्यमातून चकाचक आंतरराष्ट्रीय सेमिनार्स वगैरे..!! ते अर्थातच ताज किंवा ओबेरॉयमध्ये..!! लालचुटुक अप्सरा आणि हॅंडसम तरूण वुडलॅंडचे जाकीट घालून समकालीन समस्यांबद्दल विचार व्यक्त करतात..! बरं वाटतं..!! वेळ चांगला जातो..!!

शिवाय, आयुष्याच्या एका वळणावर अभिरूची, कलाप्रेम, आर्षता वगैरे भानगडीही उपस्थित होतात..! कलासक्त आत्मा असतो..! तो तळमळतो वगैरे..! त्यासाठी मग मग समजा पॅरिस रिव्ह्यू चे संदर्भ वगैरे..! किंवा आर्ट गॅलरीज् किंवा मग थेट खाजगी म्युझियम्स..! आणि अभिजात पेंटींग्जचे कोट्यवधी डॉलर्सचे लिलाव..! व्हॅनगॉग, दाली, पिकासो, मायकेल ॲंजेलो किंवा समजा वासुदेव गायतोंडे, एम एफ हुसेन इत्यादी..! कारण शेवटी असंय की आयुष्यात पैसा म्हणजे सगळं काही नसतं ना..! कला साहित्य संस्कृती वगैरे गोष्टीही असतात..! त्यातली अभिरूची डेव्हलप करत रहायचं मग..! दुसरं काय?

अर्थात हे सगळं करण्यासाठी समजा सरकारी बॅंका वगैरे डबऱ्यात घालून किंवा हरेक ठिकाणची नैसर्गिक संसाधनं राजरोस लुटून फस्त करावी लागत असली, तरी त्याचं एवढं काही नाही...! कारण आपण नाही तर दुसऱ्या कुणीतरी ते
केलंच असतं..! आणि आज नाही तर उद्या ते झालंच असतं..! त्यात विशेष आक्षेप घेण्यासारखं काही नाही..!

बाकी, कधी समजा फारच डोळ्यावर आलं तर आज्जाद फरार होण्याचे सफेदपोश रस्तेही मोकळे ठेवलेले असतात..!

कारण समजा लुटण्याच्या अशा शंभर वाटा असतील, तर नंतर समजा पळण्याच्या हजार वाटा आणि नंतर स्थायिक होण्यासाठी दीडशे देश उपलब्ध..! हा देश नाही तर तो देश..! कसली अडचण?? सब भूमी गोपाल की..! मां भै: ..! डरो मत..! भ्यायचं कशाला आणि कशासाठी? काही विषयच नाही ना.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी चपराक
आवडलं. स्टाईल छानच आहे. सांगायचं असतं तेही महत्वाचं अन नेमकं, टोकेरी!

मस्त.

--/\--
सब भूमी गोपाल की..>> मग ती आपली काय.. किंवा चीनी गोपाळांनी घेतली काय.. हा.. हा..

मोठा मासा लहान माशाला खातो, हा निसर्गाचा नियम आहे.
It is not the most intellectual of the species that survives; it is not the strongest that survives; but the species that survives is the one that is able best to adapt and adjust to the changing environment in which it finds itself. - Charles Darwin

सहज, साधे, सोपे. आपल्या नेहमीच्या शैलीतील वन कॉलम ऐवजी वेगळं फॉर्माटींग इथे आहे. अशा परिच्छेदांमुळे वाचायला सोपे गेले. शक्य असल्यास पुढेही असेच परिच्छेद देत जा. (अर्थात एखाद्या कथेची/लेखाची गरज वन कॉलम मांडणी असूच शकते .. ते "चालायचंच".. )

@ पाचपाटील,

एक सांगायचं होतं. तुमच्या लेखातील शब्दवापर फार आवडतो. कसले अर्थवाही, अनवट शब्दं. त्यानी लेखनाला एक साजिरा बाज येतो. उदा. ह्याच लेखातले खालील शब्द :-

मोका
मजाहाजा
कुचमतात
दमसांस
पोच
बिदागी
आर्षता
डबऱ्यात घालणे
आज्जाद फरार होणे

हे शब्द फारसे कानावर पडत नाहीत.

'डंगरा' हा शब्द तर अनेक वर्षांनी डोळ्याखाली आला. कुणी वापरत नाही. नाही म्हणायला आमच्या सुलभाअम्मी (वय वर्षे ९१) एखाद्या म्हाताऱ्याची विचारपूस करतांना 'त्या डंगऱ्याला काय धाड भरली आहे?' अशी विचारणा करतात सहज. Happy
स्त्रीरूप = डंगरी