'ब्लाईंडनेस'- ज्युझे सारामागो

Submitted by साजिरा on 8 October, 2022 - 06:15

आपण आपल्या आयुष्याला जगण्याला किती गृहित धरत असतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या, आपल्या मालकीच्या असोत वा नसोत, अनेक गोष्टी, वस्तू, व्यक्ती आणि एकंदरच आपल्या भोवताली मांडलेलं किंवा आपसूक तयार झालेलं नेपथ्यही गृहित धरून चालतो. एका दृष्टीने पाहिलं तर हे सारं आपण आपलंच समजून जगत राहतो.

मग एक दिवस अचानक आपला एखादा जिवलग, आपल्याला रोज भेटत असलेली व्यक्ती मरतेच.
हे काय आक्रित- असं म्हणून आपण हलतो, घाबरतो. माणूस अगदीच घरातलं असलं तर हादरून, कोसळून जातो. हताश-निराश होऊन बसून राहतो. अनेक दिवस आपले दैनंदिन व्यवहार बदलतात.

मग एक अनामिक ओढीकडे आपण हळुहळू खेचले जाऊ जातो- आपल्या नेहेमीच्या मानसिक आणि व्यावहारिक परिसंस्थेकडे पुन्हा लवकरात लवकर जाण्याची ओढ. ढवळून निघालेला मनाचा तळ निवळण्याची गरज. दैनंदिन व्यवहार सुरळित करण्याची निकड. भवतालातलं नेपथ्य पुन्हा सुस्थापित करण्याची एक जबरदस्त अनामिक गरज.

एखादी महामारी, एखादा प्रलय किंवा एखादं महासंकट आल्यावरही हेच सारं होतं. संकट कितीही मोठं असलं तरी काळानुरूप सारं नीट होईल, पहिल्यासारखं पुन्हा जगू लागू- हा विश्वास सुनामीच्या क्षणीदेखील आपल्या आत कुठेतरी, नेणीवेत का होईना, असतोच असतो!

पण समजा असं काहीतरी घडलं, की ज्यामुळे आपण आणि आपलं जग हे नंतर पुनर्स्थापित होण्याची, पुन्हा पुर्वीसारखं होण्याची शक्यताच कायमची नष्ट झाली तर?
*****

रोजच्याप्रमाणेच सिग्नलला गाड्या थांबण्याचा आणि पुन्हा तिथून निघून जाण्याचा क्रम चालू आहे. कितीतरी वर्षांपासून रोज असंच होतं. आजही हिरवा दिवा लागल्यावर गाड्या जातात. मग पिवळा, मग लाल. संकेताप्रमाणे पुन्हा गाड्या थांबतात. रोज असंच तर होतं. थांबलेल्या कार्स मंदपणे गुरगुरत दिवा हिरवा व्हायची वाट बघतात, कारण तो आता काही सेकंदांत होणार हे सर्वांना माहिती आहे. कारण रोज असंच होतं.

मग दिवा खरंच हिरवा होतो. गाड्यांची गुर्गूर वाढते. पण सिग्नलला पुढे थांबलेला गृहस्थ तसाच थांबलाय. मागचे तीन-चार सेकंद वाट बघून हॉर्न वाजवतात. हे असं रोज नाही, पण कधीतरी होतं. पुढे थांबलेला एखादा आपला फोन बघत भान विसरतो. किंवा मग एखाद्याची गाडीच बंद पडते. किंवा गाडीतल्या जोडप्याचं भांडण सुरू होतं. किंवा मग गाडीवाल्याच्या अचानक लक्षात येतं की आपण रस्ता चुकलोय, आणि आता कुठून जावं याचा विचार करत भांबावलाय. असं होतं कधीतरी.

पुढची कार हलेना, तसे मागच्या हॉर्न्सचा आवाज वाढतात. काही गाड्या त्याला वळसा घालून त्याला शिव्या देत पुढे जातात, आणि काही सेकंदांत पुन्हा रेड सिग्नल. आता कार बंद पडलेला माणूस गाडीच्या काचा खाली करून हात बाहेर काढून ओरडतोय- मी अचानक आंधळा झालोय, मला मदत करा!

मागचे आश्चर्यचकित. असाकसा एखादा गाडी चालवता चालवता अचानक आंधळा होऊ शकतो?

एक दयाळू माणूस मदत करायला येतो, आंधळ्याची गाडी चालवायला घेतो. घराचा पत्ता आणि खाणाखुणा सांगून नुकत्याच आंधळा झालेल्याच्या घरी ते पोचतात. निघताना मात्र मदत करणार्‍याच्या मनात पाप येतं, आणि गाडीची चावी घेऊनच तो बाहेर पडतो. आंधळ्याची कार सुरक्षित ठिकाणी, पोलिसांना संशय येणार नाही अशी पार्क करून तो बाहेर पडतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं- पांढर्‍या स्वच्छ दुधी रंगाच्या पडद्याशिवाय आपल्याला काहीच दिसत नाहीय.
*****

डोळ्यांच्या डॉक्टरकडे पहिला आंधळा येतो आणि डॉक्टर गोंधळतो. हे आपल्या ज्ञाना-अनुभवापलीकडचं काहीतरी वेगळंच आहे. घरी येऊन रात्रभर तो पुस्तकं चाळत बसून या विचित्र प्रकाराविषयी काही सापडतं का ते शोधत राहतो. दुसर्‍या दिवशी पुन्हा केसेस येतात तेव्हा तो आरोग्य मंत्रालयाला अ‍ॅलर्ट करतो. आणि मग त्याला वाटत होतं ते घडतंच. आतापर्यंत त्याचे पेशंट्स सांगत असलेला तो अगम्य दुधी पांढरा पडदा आता त्याच्या डोळ्यांसमोर येतोच.

'मिल्की ब्लाईंडनेस'च्या या विचित्र आणि संसर्गजन्य असलेल्या साथीशी लढायला सरकार तयार होतं, आणि कठोर 'क्वारंटाईन' प्रोटोकॉल लागू करते. एका जुन्या मनोरुग्णालयात आंधळ्यांची रवानगी होते. हे आंधळे ज्यांच्या संपर्कात आले होते अशा 'होऊ घातलेल्या आंधळ्यांचीही याच 'असायलम' मधल्या वेगळ्या भागात होते. मग सुरू होतात आंधळे होण्याची वाट बघत बसलेल्या लोकांची आणि श्वेतांधळे झालेल्या पण कधीतरी हा दुधी पडदा आला तसा जाईलही, आणि आपण पुन्हा पहिल्यासारखे होऊ या आशेवर असलेल्या लोकांची नवी आयुष्ये.

कधीच न बघितलेल्या जागेत, कधीच न बघितलेल्या बहुतेक अनोळखी लोकांसोबत पुरेसं अन्नपाणी नाही, औषधं नाहीत, पुढे काय होईल हे माहिती नाही अशा अवस्थेत हे लोक जगायला सुरूवात करतात. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत जाते. स्वच्छता, नीटनेटकेपणा, साफसफाई, छंद आणि आवडी या सार्‍या गोष्टी आपोआपच दुय्यम होतात, आणि सुरू होते अतिशय टोकाच्या, अकल्पनीय, भयानक भवतालात स्वतःला टिकवण्याची माणसाची आदिम लढाई.

एखाद्या टोळधाडीसारखी ही साथ देशावर आक्रमण करते आणि आंधळ्यांची संख्या वाढतच राहते. हक्क, घर, प्रेम, वेदना, भूक, सहिष्णुता, राग-लोभ, आपलं-परकं या सार्‍याच गोष्टींच्या व्याख्या बदलतात. भूक, जगण्याची निकड आणि दुर्दम्य आशा - इतक्याच गोष्टी शेवटी शिल्लक राहतात.
*****
Blindness.JPG

'जुझे सारामागो' या नोबेल विजेत्या, एका महान पोर्तुगीज लेखकाच्या 'ब्लाईंडनेस' या पुस्तकाची ही सुरूवात.

पुस्तकाच्या प्रस्तावनेआधी आणि मलपृष्ठावर थोरामोठ्यांचे, दिग्गज समीक्षक आणि नियतकालिकांचे अभिप्रायही छापले आहेत. त्यातला एक अशा अर्थाचा आहे- 'नोबेल विनर- ही गोष्ट घाबरवणारी असली, तरी ही कथा मात्र आमची-तुमचीच आहे. कुठेही, कधीही घडू शकणारी आहे. आपलंच जगणं या महान लेखकाने अ तिशय थेटपणे, आणि आपल्यासारख्या 'डोळस' लोकांच्या डोळ्यांत डोळे घालून थेटपणे सांगितली आहे..'

ही कथा कोणत्या देशात, कुठच्या शहरात किंवा कुठच्या भाषिकांत घडते- याचा लेखकाने कुठेही उल्लेख केलेला आही. इतकंच काय पण कुठच्याही पात्राला लौकिकार्थाने 'नाव' नाही. या दृष्टीने हे संपूर्ण कथानकच वैश्विक ठरतं. एखाद्याचं नाव उच्चारलं, की आपल्या डोळ्यांसमोर त्या माणसाचं चित्र, व्यक्तिमत्त्व, चरित्र इ. येतं. निनावी पात्रं कथेत आणून लेखकाने अशी परवानगीच वाचकाला नाकारली आहे, आणि एका प्रकारे वाचकालाही आंधळंच करून टाकलं आहे. या 'नेक्स्ट लेव्हल' अनुभूतीमुळे कथानकाची परिणामकारकता कैक पटीने वाढते, आणि पाठोपाठ घडत असलेल्या घटनांचं नृशंसपण  अक्षरशः अंगावर येतं. आंधळ्यांची लढाई ही जणू आपलीच लढाई होते, आणि अतिशय प्रतिकूल आणि टोकाच्या अवस्थेत जगून दाखवण्याची माणसाची आदिम प्रवृत्ती अधिक ठळक होते.

आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही विरामचिन्हे नाहीत. स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक, प्रश्नार्थक इ. सगळी चिन्हे कुठेच नाहीत. (वाक्य सुरू होतं तिथं लेखकाने कॅपिटल अक्षर वापरलं आहे. मराठीत ही सोय नसल्याने मराठी अनुवादात नाईलाजाने पूर्णविराम वापरला आहे). अंगावर येणार्‍या घटना आणि आशय वाचक 'जगू' लागतो आणि थकून विश्रांतीसाठी न सापडणारी विरामचिन्हे शोधतो. संवाद सुरू होताना कोण कुणाशी बोलतंय हेही नीट सुरूवातीला कळत नाही (नंतर नंतर वाचकाला त्याची गरजच उरत नाही!). परिच्छेदही जवळजवळ टाळलेच आहेत. अशा प्रकारे लेखक वाचकाला दमसास घेण्याचीही सोय नाकारतो, आणि भयानक वेगाने, चढत्या भाजणीत गडद होत जाणार्‍या या कथेसोबत वाचकाला अक्षरशः फरपटत नेतो. अजिबात अलंकरण न वापरलेल्या साध्यासोप्या शब्दांत लेखक कथा सांगत जातो तेव्हा परिणामकारकता, निकड, आशांचा खेळ, नैराश्य, हताशा अधिक ठळक होऊन आपल्याला गुदमरवून टाकते. मात्र, जवळजवळ शक्तिपात झालेल्या अवस्थेत वाचक ही कथा संपवतो, तेव्हा ही कथा त्याचीच आणि त्याच्याच परिसंस्थेची झालेली असते.
*****

वाचून संपवल्यावरही या कथेत कितीतरी दिवस 'खितपत' पडल्यानंतर लक्षात येतं- ही नुसती कथा नाही. घटना, पात्रं हे सारं रूपक आहे. असायलम मधलं आंधळ्याचं जग वेगळं नाहीच, तर ती बाहेरच्या डोळस जगाचीच छोटी प्रतिकृती आहे. I don’t think we did go blind, I think we are blind, Blind but seeing, Blind people who can see, but do not see. - हे वाचून अधिक प्रकाश पडतो, आणि या कथेच्या वैश्विकतेचं मोल आणखी वाढतं. प्रश्न एकत्र राहण्यातल्या अवघडलेपणाचा मुळात नसतोच, तर सोबत राहणार्‍यांना आपण किती समजून घेतो- हा असतो. हे एकदा कळलं की मग शारिरीक दृष्ट्या डोळ्यांनी आंधळे काय, आणि डोळे असूनही 'बघू' शकत नसलेले लोक काय- कथा शेवटी दोघांची एकच होते. ती सार्वकालिक होते, या ग्रहावरच्या प्रत्येक जिवंत प्राण्याची होते. तिच्यातलं कथानक आणि मूल्ये- दोन्ही 'चिरंतन' अशी ठरतात.
*****

जॉर्ज ऑर्वेल या द्र्ष्ट्या लेखकाच्या '१९८४' या 'टाईमलेस' आणि सर्वश्रेष्ठ अशा कादंबरीची आठवण होणं साहजिक आहे. शैली आणि कथानक वेगळं असलं तरी हे दोघे महान लेखक आपलीच आदिम आणि चिरंजीव ठरलेली, आपल्या इथल्या अस्तित्वाची, अनिश्चिततेची, संदिग्धतेची, क्रौर्याची आणि प्रेमाची- अशी जवळजवळ एकच  कथा आपल्यालाच सांगतात.
*****

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहिलेय.
विरामचिन्हे नाहीत वाचून आश्चर्य वाटले.

उत्तम परिचय.
ही कादंबरी म्हणजे फार बारकाईनं केलेलं काम आहे..!
हिचं मोल जाणून ही मराठीत आणली हे भास्कर भोळे यांचं मोठेपण..! वाचताना, आयुष्यभर लक्षात राहील, पूर्वी कधीही घेतला नसेल, अशा पद्धतीचा अनुभव घ्यायची सुरसुरी असेल तर ताबडतोब वाचून पहावी.

(बाकी, पुस्तकावरती पुणे नगर वाचन मंदिरचा बारकोड दिसला..! आमची त्याच्याशी चांगलीच ओळख आहे..! शाखा फक्त वेगळी..! Happy )

कुमार, जाई, थँक्स Happy

अस्मिता, ते अजिबात विरामचिन्हं नसणं सुरूवातीला झेपत नाहीच. पण हे असं का केलं आहे- हे लक्षात येतं नंतर.
मराठीतही असे प्रयोग झाले आहेत. मला वाटतं विलास सारंग. कुणाला माहित असेल तर कन्फर्म करा..

पाचपाटील, आओ कभी हमारी शाखा मे. मिल बैठेंगे.. Happy
या निमित्ताने तुमचं लिखाण वाचत असतो, आणि आवडतं- हे सांगतो इथंच.