पांडूबाबा.

Submitted by deepak_pawar on 30 September, 2022 - 10:48

पांडूबाबा आमच्या वाडीतील सगळ्यात जुना माणूस. जुना म्हणजे इतका जुना कि त्याच्यासमोरची लहान लहान मुलं आता म्हातारी झालेली. हाता-पायाची कातडी लोंबू लागलेली, दातांनी तोंडाचा केव्हांच निरोप घेतलेला. त्यामुळे गालाला जिथे खळी पडते, तिथं खड्डा पडलेला. भाकर खाताना सुद्धा त्याला डाळीत कुसकरून खावी लागायची.
एकदा मी सहज त्याला विचारलं," बाबा, तुझं वय किती?"
माझा प्रश्न ऐकून तो जरा विचारात पडल्यासारखा दिसला. नंतर," तुझ्या पणज्याचं वय किती?" हा प्रश्न विचारून मलाच कोड्यात टाकलं.
जिथं मला माझी जन्मतारीख चौथी पास झाल्यावर शाळेचा दाखला मिळाला तेव्हा कळली, तर पणज्याच वय थोडच माहीत असणार?
"पण माझ्या पणज्याचा आणि तुझ्या वयाचा काय संबंध?" मी प्रतिप्रश्न केला.
तेव्हा तो सांगू लागला," तुझा पणजा माझ्यापरीस दोन वर्सानी मोठा, तेव्हा कुठं जन्मतारीख लिहून ठेवायचे, पोरगं झालं कि कायबाय नाव ठेवायचं कि झालं."
" पण, तू कधी विचारलं नाहीस तुझ्या आईला." जणू आज माझ्यातला संशोधक जागा झालेला.
"विचारलं तर," म्हणत तो सांगू लागला,
" माझा जन्म झाला तंवा शेतात कापणीला सुरवात झालेली, कामाच्या येळेस माझी आय बाळंत झाल्यानं माझी आजी, आयेवर लय रागावली, म्हणाली,'तुला कामाच्या येळेसच बाळंत व्हायचं होतं होय?' पण ती तरी बिचारी काय करणार जवा दिवस भरतील तवाच बाळंतीण होणार ना? अन आजीचं पण बरोबर हुतं शेतात एवढं काम पडलेलं आणि एक माणूस कमी झालेलं,"
शेवटी आपल्या जन्माची हकीकत सांगून झाल्यावर सप्टेंबर ऑक्टोबर मधील बाबाचा जन्म असावा, असा आम्ही कयास बांधला. महिना कळला पण वर्ष शोधता शोधता माझीच तारांबळ उडाली. म्हणजे एखादा इतिहासकर ज्याप्रमाणे धाग्याला धागा जोडत शेवट शोधून काढतो, त्याप्रमाणे प्रथम माझ्या वयावरून माझ्या वडिलांचं वय, त्यावरून आजोबांचं वय आणि आजोबांच्या वयावरून पंजोबांच्या वयापर्यंत जाऊन पोहचलो. शेवटी आम्ही असा तर्क काढला कि बाबाचं वय पंच्याऐशीच्या आसपास असावं.
बाबानं एवढी मजल मारली तरी अजून ठणठणीत. सकाळी सहा वाजता उठून गुराकडं जाणार, येताना बांबू तोडून आणणार, दुपारचं जेवण होईपर्यंत बांबूची बीलं काढत बसणार. दुपारी जेवण उरकून थोडी झोप घेणार, पुन्हा तीन वाजता गुरांकडं, तिकडून येऊन आंघोळ आटपून रात्रीचं जेवण होईपर्यंत टोपल्या, सुपं, इरली असं काहीबाही वळत बसायचा.
पाऊस संपला कि बाबाला नुसत्या वळपा शिवाय फारसं काम नसायचं. नुकतीच थंडी सुरु झालेली असायची. आम्ही मुलं रात्रीचं जेवण उरकलं कि मंदिरा समोर शेकोटी पेटवून गप्पा मारत बसायचो. शेकोटीची धग घ्यायला बाबा सुद्धा यायचा. एरवी गंजिफ्रॉक आणि नुसत्या चड्डीत असणारा बाबा थंडीच्या दिवसात अंगात गरम कपडे, डोक्यावर गरम टोपरं, वरून परत घोंगडी गुंडाळून धग घ्यायला यायचा. त्याचा तो अवतार बघून दया म्हणायचा," बाबाला बघूनच थंडी पळून जाल." त्याच्या त्या अवतारकडं बघून आम्ही मुलं खी खी करून हसायचो.
"पोरांनो, का रे हसताव." तो विचारायचा
पण आम्ही सांगायचो नाही. बसल्या बसल्या बाबाच्या गोष्टी सुरू व्हायच्या. प्रत्येक गोष्टीत तो हिरो असणार. आणि त्यानं अद्दल घडविलेला कुणी माणूस नसून, कधी जकीण असायची, तर कधी खविस. प्रत्यक वेळी त्याचा सामना भुताशीच झालेला असायचा. कधी कधी बाबानं भुताशी कुस्ती खेळलेली असणार, तर कधी काठीनं भुताचं डोकं फ़ोडलेलं असणार, कितीतरी भुतांना त्यानं बाटलीत बंद करून खोल समुद्रात सोडलेलं.
एकदा संज्या त्याला म्हणाला,"बाबा, बाटलीत भरलेलं भूत दिसतं का रे?"
"दिसतं म्हणजे? असं टकामका बघत असत," बाबा म्हणाला.
आम्ही लहान असल्यानं त्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटायच्या आणि त्याचा अभिमान वाटायचा. आपण सुद्धा कधीतरी भुताला दगड मारून पळावं असा विचार मनात यायचा. पण तशी वेळ कधी आली नाही. बाबाची एक गोष्ट आम्हाला खूप आवडायची,
"एकदा बाबा सासुरवाडीला गेलेला. निघे निघे पर्यंत संध्याकाळ झाली. त्याकाळात गाड्या नसल्यानं सगळा प्रवास पायीच करावा लागायचा. सासरवाडीची माणसं आज जाऊ नका, घरी पोहोचेपर्यंत रात्र होईल म्हणून विनवण्या करू लागले, पण बाबा काही थांबला नाही. तसे ते चांदण्याचे दिवस होते. उजाड कातळावरून चालताना काही वाटलं नसतं, पण रानात शिरलं कि उजेडाची गरज भासणार म्हणून सोबत कंदील काडीपेटी घेऊन तो निघाला. झपाझप पावलं टाकत त्यानं सासुरवाडी सोडली आणि बाजूच्या गावात येऊन पोहचला. इथे त्याला एक ओळखीचा पाहुणा भेटला आणि दोघांची स्वारी अड्ड्यावर निघाली. इकडतिकडच्या गप्पा मारता मारता दोन चार घोट पोटात ढकलले. रस्त्यानं चालताना तहान लागली तर पाणी असावं म्हणून सोबत एक चंबू सारखं मातीचं भांड असायचं त्यातलं पाणी ओतून टाकलं आणि पावशेर दारू भरून घेतली. गप्पाच्या नादात बराच वेळ निघून गेला. पाव्हण्यानं सुद्धा थांबायचा आग्रह केला, "आजची रात्र राहा आणि सकाळी लवकर उठून जावा, रात्रीचं रानातून जाणं आणि ते सुद्धा एकटं बरं दिसत नाही," पण दोन घोट पोटात गेल्यानं सगळी भीती निघून गेली होती. त्यात दारूच्या वासाला भूत येत नाही, अशी त्याची पक्की खात्री असल्यानं तो निघाला. बाहेर लख्ख चांदणं पडलं होतं. गार वारा सुटला होता. तो निघाला तेव्हा चंद्र बराच वर सरकला होता. चांदण्यांच्या प्रकाशात रस्ता चांगला दिसत होता, पण सर्वत्र एकदम निरव शांतता. फक्त कानाला जाणवत होता वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज. अशा चांदण्यात फिरताना कुणी सोबत असेल तर हौस वाटते पण कुणी एकटा असेल तर हीच शांतता मनाचा ताबा घेऊ लागते. या सगळ्या ओळखीच्या वाटा असल्यानं तो झपाझप पावलं टाकत चालू लागला. बरंच पुढं आल्यावर कुणीतरी आवाज दिल्याचा भास झाला. रात्रीचा कुठल्या अनोळखी माणसानं आवाज दिला तर लगेच ओ द्यायचा नसतो, तसं केलं आणि जर का ते भूत असलं तर लगेच आपण झपाटले जातो. म्हणून त्यानं ओ दिला नाही. तो तसाच पुढं चालत राहीला, आणि एका दगडावर त्याला कोणीतरी बसलेलं दिसलं. त्या दगडाच्या जवळ पोहचल्यावर तिथं एक पाढंरा शुभ्र सदरा घातलेला. पांढरं धोतर, डोक्यावर पांढरा फेटा आणि हातात चिलीम घेतलेला एक माणूस दिसला. चिलमीचा घुटका घेऊन धूर बाबाच्या दिशेने सोडला, त्या बरोबर त्याला कुठल्यातरी धुंदीत गेल्यासारखा वाटलं. कुठल्यातरी अनामिक शक्तीनं भारून गेल्यासारखं झालं.
बाबानं त्याला, "कुठं जाणार" म्हणून विचारला.
तर तो म्हणाला,"तुमच्याबरोबरच"
"म्हणजे?" परत बाबानं प्रश्न केला.
तसा तो म्हणाला," तुम्ही कुठं जाणार?
बाबानं गावाचं नाव सांगितलं तसा तो माणूस म्हणाला, मी फक्त सीमे पर्यंत येईन.
"म्हणजे नदीपर्यंत?" बाबा म्हणाला.
तशी त्यानं हो म्हणून मान हलवली.
रात्री नदीत मासे पकडण्याच जाळं टाकण्यासाठी आजूबाजूच्या गावातली माणसं जात असतात. तसाच हा सुद्धा तिकडं चालला असेल. असा विचार करून बाबा त्याच्यासोबत चालू लागला.
"बरच झालं नदीपर्यंत सोबत मिळाली, नाहीतर रानातून भुतासारखं जावं लागलं असतं," बाबा हसत हसत म्हणाला, पण तो काही हसला नाही.
बाबा पुढं निघाला तसा तो मागून चालू लागला. त्याच्या हातात असणाऱ्या काठीला घुंगरू लावले होते. रात्रीच्या शांततेत त्या घुंगराचा आवाज बैचेन करत होता.
बाबानं त्याच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो माणूस फारसं बोलत नव्हता. एखाद्याला असते कमी बोलण्याची सवय असं समजून बाबानं सुद्धा बोलणं बंद केलं. थोडं पुढं आल्यावर आणखी एक तसाच पेहराव केलेला माणूस भेटला.
"एवढ्या रात्री झकपक कपडे घालून काय जत्रेला निघालेत का काय?" बाबाला प्रश्न पडला.
त्याची विचारपूस केली, तर तो सुद्धा नदीवर निघालेला. आता एक पुढं एक पाठी आणि बाबा त्यांच्या मध्ये असा प्रवास सुरु झाला. सपाट रस्ता संपून आता रान लागणार होतं म्हणून बाबानं कंदील पेटवला.
"माझ्या जवळ कंदील हाय मी पुढं हुतो," बाबा म्हणाला
तसं त्या माणसानं बाबाकडं नुसतं पाहिलं आणि म्हणाला,"मला दिसतंय."
बाबा निमूटपणे त्या दोघांच्या मधून चालू लागला. कितीतरी वेळ निघून गेला पण रस्ता काही संपत नव्हता. त्याला सारखं वाटत होतं आपण फिरून फिरून तिथंच येतोय. एवढं फिरून फिरून दमायला झालं, तरी रस्ता संपत नव्हता.
बाबाच्या मनात विचार आला"आपल्यावर कुणी जाळं तर टाकलं नाय ना?"
आता त्याला त्या दोघांचा संशय येऊ लागला. काय करावं सुचत नव्हतं तेव्हढ्यात पिशवीत ठेवलेल्या दारूची आठवण झाली. एक मोठा दगड बघून बाबा दम घ्यायला बसला. ते दोघे एक डाव्या हाताला आणि एक उजव्या हाताला उभे होते. बाबानं दारूचं भांडं बाहेर काढलं तसं ते दोघं थोडं मागे सरकले.
"तुम्ही घेणार का?" म्हणून बाबानं विचारलं.
पण त्यांनी मानेनंच नकार दिला. बाबानं एक घोट घेतला आणि त्याची नजर एकाच्या पायाकडं गेली. त्याचे पाय उलटे होते. एकदम त्याच्या मनात भीती दाटून आली. छातीत जोरजोरात धडधडायला लागलं. त्यानं हळूच दुसऱ्या माणसाच्या पायाकडं पाहिलं त्याचे सुद्धा पाय उलटे होते. आपण याच्या कचाट्यात सापडलोय हे बाबा ओळखून गेला. त्यांची ओळख पटली आणि त्यांच्या पाशातून जणू मुक्त झाल्यासारखं त्याला वाटू लागलं. अजूनपर्यंत त्याला आपण फिरून फिरून तिथंच येतोय असं वाटत होतं. पण आता त्याला चक्क नदी समोर दिसत होती. काही करून नदी पार करायला हवी. एकदा का नदी पार केली कि यांच्या तावडीतून सुटलो. त्यानं भांड्यातल्या दारूचा घोट घेतला. थोडीशी आपल्या अंगावर शिंपडली, एका माणसाच्या दिशेने दारूची चुळ भरली, थोडी ओंजळीत पकडून दुसऱ्यावर शिंपडली तसे ते दोघे मागे सरकले, हीच संधी साधून तो नदीच्या दिशेने धावला. जिवाच्या आकांताने नदी पार केली आणि पाठीमागून आवाज घुमला
"वाचलास,"
कसाबसा बाबा घरात आला आणि आणि त्यानं जमिनीवर अंग टाकून दिलं. त्यानंतर दोन दिवस तो तापानं फणफणत होता. बाबाची हि गोष्ट आम्हा मुलांना खूप आवडायची. पण गोष्ट संपली कि गोष्टीतलं भूत डोक्यात जाऊन बसायचं. त्यामुळे रात्री अंधारातून घरी जाताना भीती वाटायची.
एकदा मी दयाला म्हणालो," मी नाय येणार गोष्ट ऐकायला, घरी जाताना भीती वाटते."
"कसली भीती वाटते?" दयानं प्रश्न केला.
सांगावं की न सांगावं या विचारात बुडून गेलो, कारण खरं कारण सांगितलं आणि त्यानं जर का सगळ्यांना सांगून टाकलं तर सगळे भित्रा म्हणून चिडवतील. पण मनाचा हिय्या करून म्हटलं,
"भुताची."
“अरे काय नाय होत, मोठ्यानं गाणं बोलत जायाचं, काय भूत बीत येत नाय मी पण तसंच करतो," दया म्हणाला. “मोठ्यानं गाणं म्हटल्यावर भूत येत नाही? का भुताला गाणं आवडत नाही?” मला प्रश्न पडला.
पण नको ते प्रश्न डोक्यात आणण्यापेक्षा एवढा साधा उपाय करून बघायला काय हरकत होती. त्यादिवशी रात्री मोठ्यानं गाणं म्हणत घरी आलो, आणि खरंच मला रोजच्याएवढी भीती वाटली नाही. पण इतर दिवशी मी येण्याआधी झोपणारी आई बिछाण्यावर बसलेली दिसली. तिनं माझ्याकडं नुसतं बघितलं पण काही बोलली नाही. मी गप्पपणे पाणी पिऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सुद्धा तसंच घडलं. पण तिसऱ्या दिवशी मी गाणं गात आलो आणि आई पाठीत धपाटा घालत म्हणाली,
" वसाड्या, दिवसभर बरा असतोस, रात्र झाली कि तुझ्या अंगात तानसेन घुसतो काय?
पाठीत धपाटा पडल्यावर ती जागी का असते त्याच कारण कळलं. त्यादिवशी ठरवून टाकलं जरी भूतानं पकडलं तरी चालेल पण गाणं म्हणणार नाही.
थोडं मोठं झाल्यावर बाबाच्या गोष्टीतला फोल पणा जाणवू लागला. गोष्ट सुरु असताना आम्ही एकमेकांना खुणावत गालातल्या गालात हसायचो. पण अजूनसुद्धा काही भित्र्या मुलांचा या गोष्टीवर विश्वास होता. त्यात मे महिन्यात मुंबईतून येणारी मुलं तर भुताला जाम घाबरायची. मुंबईत राहणाऱ्या मुलांचा भुताखेतांवर विश्वास नसणार असं आम्हाला वाटलेलं, पण हीच मुलं भुतांना जाम घाबरायची. एकदा आम्ही गप्पा मारत असताना रवी म्हणाला,
" अरे बाबा किती टेपा मारतो रे, भुताला असं मारलं... तसं मारलं "
तसा रमेश म्हणाला, "अरे खरंच भूतं असतात!"
हा रम्या सुद्धा मुंबईवाला.
"चल, तू पण आता फेकू नको," दया म्हणाला.
"अरे खरंच, आमावसेच्या रात्री स्मशानात जमून डान्स करतात," रम्या म्हणाला.
"काय डान्स बीन्स करत नाय," दया चिडवत म्हणाला.
"तुला खोटं वाटत असेल तर एकदा स्मशानात जाऊन बघ." रम्या चिडून म्हणाला.
" ए, आपल्या स्मशानात सगळे आपले आजोबा पणजोबा पुरलेत ना? संज्यानं रमेशला विचारलं.
"हो, पण ते पण आता भूतं झाली असणार," रम्या म्हणाला.
"अरे, पण त्यांनी जिवंत असताना कधी डान्स केला नाय, मेल्यावर थोडेच करणार?"
संज्याच्या या वाक्यावर सगळे हसू लागलो.
हि आपल्यापेक्षा लहान असणारी मुलं आपली फिरकी घेत असलेली पाहून रम्या वैतागून म्हणाला,
“जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर, अमावसेला रात्री बारा वाजता स्मशानात जाऊन दाखवा.”
रम्याला आमच्या करामती माहित नव्हत्या. तिठ्यावर ठेवलेला नारळ सुद्धा खाऊन टाकणारी आम्ही मुलं. असं असून सुद्धा बऱ्याच दिवसात घरातून ओरडा पडावा अशी गोष्ट आमच्या हातून घडली नव्हती. त्यामुळे रम्यानं दिलेलं आव्हान आम्ही लगेच स्वीकारलं. अजून आमावसेला चार-एक दिवस तरी होते. त्यामुळे वाट पाहण्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं. बघता बघता दिवस उलटून गेले. आमावसेचा दिवस उजाडला. रात्री स्मशानात जायचं म्हणजे उजेडाची काहीतरी तयारी करावी लागणार होती. मशाल बनवायचं ठरलं. चार-पाच मशाल तयार झाल्या पण, मशाल पेटवण्यासाठी रॉकेल लागणार होतं, घरी कुणी नसताना सर्वानी थोडं थोडं आप आपापल्या घरातून रॉकेल आणायचं ठरलं.
रात्रीचं जेवण उरकून चौथऱ्यावर झोपण्यासाठी निघालो. आज चप्पल न घालता पडवीच्या भिंतीवर ठेवलेले बूट काढले, रानात जाताना बूट असले कि कसंही धावता येतं.
"बूट घालून कुठं निघलास?" आई माझ्याकडं संशयानं पाहत म्हणाली.
"अगं, चप्पल मध्ये काटा घुसलाय, चालताना सारखा टोचत राहतो."
आई ओठयावरून आत गेली तसा मी बिछाना घेऊन सटकलो. बरीचशी मित्र मंडळी आली होती. संज्या चौथऱ्यावर झाडू मारत होता. त्याचं झाडू मारून झाल्यावर प्रत्यकाने आपआपला बिछाना केला आणि बिछान्यावर पडून आभाळाकडं बघत गप्पा सुरु झाल्या.
बरोबर पावणेबारा वाजता आम्ही निघालो. तशी वाडी आता सामसूम झाली होती, पण कुणी एखाद्या घरात जागं असलं तर, म्हणून डाग उताऱ्यावरच मशाल पेटवायचं ठरलं होत. एक टॉर्च होता पण, त्याचे सेल संपत आल्यामुळे प्रकाश एकदम अंधुक होता. अमावस्या असल्यानं दाट अंधार पडला होता. बाजूचा माणूस सुद्धा दिसत नव्हता. पण आम्हाला फक्त रस्ता दिसला पुरे होत. जेवढे आमचे पाढे पाठ नव्हते तेवढे आम्हाला रस्ते पाठ होते, पुढे असणाऱ्याजवळ टॉर्च देऊन पाठीमागचे अंदाजानं चालणार होतो. डाग उतरल्यावर सर्व मशाल पेटवल्या आणि आम्ही स्मशानाच्या दिशेने चालू लागलो. नाही म्हटलं तरी छातीची धडधड वाढली होती. एरवी गोंधळ माजविणारे आम्ही, सर वर्गात आल्यावर जसे चूप होतो तसे सगळे तोंडाला कडी लावून चाललो होतो. एवढी शांतता कि वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज सुद्धा कानाला जाणवत होता. मधूनच झाडावर झाड घासतानाची करकर, पानांची सळसळ आणि दूरवरून येणाऱ्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज या व्यतिरिक्त कसलेच आवाज जाणवत नव्हते. आम्ही किती तरी वेळा या रस्त्यावरून फिरलो असू पण या जागेचं हे रूप आम्ही पहिल्यांदाच अनुभवत होतो.
स्मशान जस जसं जवळ येऊ लागलं तसतशी छातीची धडधड वाढू लागली. आम्हाला पक्कं ठाऊक होतं तिथं कुणीही नसणार, तरीसुद्धा भीती का वाटत होती कळत नव्हतं. स्मशानात पोहचल्यावर तिथं असणाऱ्या दोनचार समाध्या पैकी एकीवर दोन खूण करून आंबे ठेवले होते, ते घेऊन जायचं ठरलं होतं. एखाद्या वाट चुकल्या गुरांनं किंवा वानरांनं खाल्ले नसले म्हणजे मिळवलं. तसे ते कच्चे असल्यानं त्यांच्याकडं कुणी ढुंकून बघणार नव्हतं. आम्ही स्म्शानात शिरलो आणि समाध्यांच्या दिशेनं निघालो. स्मशानात एकदम स्मशान शांतता होती. आमचे पूर्वज डाराडूर झोपले होते. कुणाचाच नाचायचा विचार नव्हता. नाहीतर हि कार्टी इथं कशाला तडमडली म्हणून सगळी भूतं झालेले पूर्वज पळून तरी गेले असणार.
आम्ही समाधी तपासत चालू लागलो. एका समाधीवर आंबे दिसले.
रवी आंबे उचलत म्हणाला," जाऊन आता रम्याच्या तोंडातच कोंबतो! कुठं आहेत भूतं?"
खरं तर इथं येताना वाटणारी भीती दूर पळून गेलेली. छातीची धडधड केव्हाच थांबलेली. आम्ही घराकडं निघालो तेव्हा मनात भीतीचा लवलेश हि शिल्लक नव्हता. अजून आमच्याकडं अर्धी बॉटल रॉकेल शिल्लक होतं. डाग चढून वर आल्यावर दयानं रॉकेलची बॉटल तोंडाला लावून एक चूळ मशालीवर भरली त्या बरोबर आगीचा लोळ उठला. हा आमच्यासाठी एक नवीनच शोध होता. ज्यांच्या ज्यांच्या जवळ मशाल होती ते सगळे आता रॉकेलची बॉटल तोंडाला लावून मशालीवर चूळ भरू लागले. रॉकेल संपेपर्यंत त्यांचा तोच उद्योग सुरु होता. पाण्याच्या टाकीजवळ आल्यावर सगळे पाणी प्यायलो आणि चौथऱ्यावर गेलो. आमची वाट पाहून सगळे झोपी गेले होते. रम्याच्या कानाजवळ जाऊन दया जोरात ओरडला. तसा तो घाबरून जागा झाला. जे कुणी उठले नाहीत त्यांना एक एक फटका पडला. थोड्या गप्पा मारून सगळे झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी वाडीत बोंबाबोम सुरु झाली. पोरांना चौथऱ्यावर झोपायला पाठवू नका. काल रात्री सबीना आला होता. भुताची बारकी बारकी पोरं मशाली घेऊन फिरत होती. आमच्या उंचीवरून आम्हाला भुताची पोरं ठरवून टाकलं. सबीना म्हणजे भुताची मिरवणूक. त्याचं झालं असं आम्ही मुलं येत असताना, खालच्या घरातील म्हाताऱ्यानं आम्हाला येताना बघितलं. त्यात मशालीतून आगीचे लोळ निघत होते, आणि नेमका आमावसेचा दिवस त्यामुळं म्हाताऱ्याला वाटलं भुताचा सबीना निघाला आहे. म्हातारा घाबरून घरात पळाला. दुसऱ्या दिवशी वाडीत बोंबाबोम. तसं आम्ही सांगितलं असतं भूत बीत काही नव्हतं आम्हीच होतो म्हणून, पण मग घरातून ओरडा पडला असता आणि चौथऱ्यावर झोपायला जाणं बंद झालं असतं. म्हणून आम्ही काहीच बोललो नाही. पण त्या दिवशी रात्री बाबाची नवीन गोष्ट आम्हाला ऐकायला मिळाली जी आम्ही कधीच ऐकली नव्हती.
सगळ्यांची मळणीची काम सुरु झालेली. कुणाची अंगणातच भात झोडणी असायची, तर कुणाची खळ्यावर. खळ तसं वाडीपासून थोडं लांब होतं. म्हणजे वाडीच्या दक्षिण बाजूला दहा मिनिटं चालत गेलं कि एक पऱ्या लागतो, पऱ्याच्या पलीकडं चढण असून तिकडेच पावसाळ्यात गुरांसाठी वाडे, वाड्यांच्या वरच्या बाजूला दोन तीन खळी. त्यावेळेस वीज नसल्यानं रात्रीचं भात झोडायचं असेल तर गॅस बत्त्या पेटवल्या जायच्या. त्या दिवशी बाबाची भात झोडणी होती. भात झोडून होईस्तोवर बारा वाजून गेले. बहुतेक काम आटपलं होतं त्यामुळे कामाला असणाऱ्या माणसांना बाबा म्हणाला,
"तुम्ही पुढं व्हा, अंघोळ आटपून जेवायला बसा तो पर्यंत मी भात भरून झाकून ठेवतो.”
तसे सगळे घराकडं परतले आता बाबा एकटाच गॅसबत्तीच्या उजेडात इकडं तिकडं पसरलेलं भात जमा करत होतो. तेवढ्यात दूरवरून प्रकाशाचा झगमगाट येताना दिसला. सुरवातीला वाटलं कुणीतरी उशिरा काम करून निघालेले कामगार असतील पण तो प्रकाश जसजसा जवळ येऊ लागला तसतसं हवेत आगीचे लोळ उठताना दिसू लागले. आणि त्या प्रकाशाच्या भोवतीनं ढोलाच्या ठेक्यात काहीजण नाचत होते. बाबाच्या डोक्यात प्रकाश पडला हि कुणी माणसं नाहीत. त्याच्या छातीत धडधडायला लागलं, काय करावं? आसपास जवळ कुठलीही वस्ती नव्हती आणि घराकडं जावं तर ते घराकडं जाण्याचाच रस्त्यावर आणि पळून तरी कुठं जाणार, ते त्याच्याच दिशेनं येऊ लागले होते. काय करावं विचार करत असताना समोर झोडून टाकून दिलेल्या पेंड्याकडं त्याचं लक्ष गेलं. बत्ती बंद करून तो पेंढ्यात घुसलो. पुऱ्या अंगावर पेंढा ओढून घेतला. पेंढ्यातून थोडं थोडं दिसत होतं. सबिना जवळ आल्यावर एकदम झगमगून गेलं. एखादं दुसरं भूत असतं असतं तर बाबानं बदडून काढलं असतं. पण त्याच्यात भुताच्या बारक्या बारक्या पोरापासून खविस, जकीन सगळी भूतं होती. बाबाला वाटलं, त्यांचा काही तरी सण असणार म्हणून एवढी सगळी भुतं जमली असावी.
त्यातलं एक भूत म्हणत होतं,"माणसाचा वास येतोय, हितच कुठंतरी हाय,"
तस तशी त्याच्या छातीत धडकी भरत होती. अंगातून नुसत्या घामाच्या धारा लागल्या होत्या. नुसतं गप्प पडून राहण्याशिवाय तो काहीच करू शकत नव्हता. त्याला वाटलं आता काही आपण वाचणार नाही. हि सगळी भूतं मिळून आपल्याला खाऊन टाकणार. कुणाला दिसू नये म्हणून त्यानं आजूबाजूचा सगळा पेंढा अंगावर ओढून घेतला, आता फक्त त्यांच्या नाच गाण्याचा आणि ढोलाचा आवाज तेवढा येत होता. थोड्या वेळानं सगळं शांत झालं, बाबानं हळूच पेंढा बाजूला करून बघितलं पण त्याला कोणीही दिसलं नाही. म्हणजे सगळे गेले होते. आता गॅस बत्ती पेटवायला वेळ नव्हता. त्यानं कंदील पेटवला आणि घराकडं धूम ठोकली.
बाबानं रात्रीच्या प्रसंगावर गोष्ट रचली होती तरी ऐकताना भीती वाटली, आमचे पाटील सर असते तर म्हणाले असते,
"लेका एवढ्या थापा मारतो, त्या लिहून काढल्यास तर मोठा लेखक होशील,”
पण माझ्या मनात वेगळाच विचार घोळत होता. बाटलीत भरलेली भूतं बाबानं खोल समुद्रात बुडवली नसती, तर आज श्रीमंतांच्या घरात शोभेच्या वस्तूंच्या जागी बाबाची 'टकामका बघणाऱ्या भुताची' बाटली लटकताना दिसती असती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<स्मशानात एकदम स्मशान शांतता होती>>
<<त्यात दारूच्या वासाला भूत येत नाही, अशी त्याची पक्की खात्री असल्यानं तो निघाला. >>
एका दमात वाचून काढली. मजा आली.
भुतांच्या कथा कोकणाची यूएसपी.!

छान