मुलांचे न मारता संगोपन

Submitted by आस्वाद on 28 September, 2022 - 13:43

ऋन्मेषच्या धाग्यावर मुलांना मारावं की नाही, यावर खूप किस पडलाय. मारू की मारू नाही, हा प्रश्नच चुकीचा आहे. त्यामुळे चर्चापण वाहवत गेलीये. तुम्ही अमेरिकेत मुलांना दिवसभर डेकेयर मध्ये ठेवता, रात्री दुसऱ्या खोलीत झोपवता, तुम्ही कोण आम्हाला सांगणारे असा सूर निघाला. आम्ही एखादी चापटच तर मारतोय, कुठे रोज रोज बुकलून काढतोय, मारलं नाही तर धाक नाही राहत, कधी कधी तर मारावंच लागतं, हा युक्तिवाद बरेच लोक करतात. त्यावर मी प्रतिसाद लिहला पण तो फारच मोठा झाला. म्हणून हा नवीन धागा. यावर न मारता काय करता येईल, यावर चर्चा अपेक्षित आहे. मारावं की नाही, हा प्रश्नच नाहीये.
आता मी मुलांना मारू नये, या मताची आहे. मी qualified आहे का हे म्हणायला, हे खालचं वाचून तुम्हीच ठरवा:

मी आधीच सांगितलंय की माझी मुलगी एक्दम खतरों के खिलाडी होती, अजूनही आहे. पण ती रांगायला लागली तेव्हा आम्ही पूर्ण घराचं babyproofing केलं. यात काय काय येतं? किचन आणि जिन्याला सेफ्टी गेट्स, सगळ्या सॉकेट्सला कव्हर्स, प्रत्येक कपाटाला आणि फ्रिजला चाईल्ड लॉक. गॅसच्या नॉब्सला चाईल्ड locks. देवघर , टीव्ही, स्पीकर्स वर टांगलं. चपला- जोडे, कचरा सगळ्यांना चाईल्ड लॉक. चाकू, सूरी किंवा काहीही dangerous वस्तू (लायटर, हातोडी, cleaning supplies, detergents, औषधं इ) कधीच तिच्या हाताला लागणार नाही असं ठेवलेलं. बाहेर जाताना नेहमी तिचं बोट धरून ठेवलं. एक क्षण जरी हात सुटला तर ती पार्किंग लॉट मध्ये, रस्त्यावर सुसाट धावायची. कुठेही उंच ठिकाणी(बालकनी, terrace, हिल) तिला कायम कडेवर घेऊन असायचे. ते पण कडेपासून लांब, कारण ती कधी एक्दम झेप घेईल काही भरवसा नव्ह्ता. मॉल किंवा पब्लिक प्लेसेस मध्ये, गर्दीच्या ठिकाणी शक्य होईल तितकं स्ट्रॉलरमध्ये ठेवायचो.

ती ८-९ महिन्यांची असेपर्यंत आई-बाबा किंवा सासू-सासरे होते. पण तिला पाय फुटले तेव्हापासून मी, नवरा आणि पिल्लूच होतो. नवरा सकाळी ८ ला जायचा ते संध्याकाळी ६;३० ला यायचा. मी वर्क फ्रॉम होम करायचे. nanny ठेवून पहिली, पण काही जमलं नाही. मग मी आणि माझी पोरगी. मी माझा लॅपटॉप उंच टेबलवर ठेऊन दिवसभर उभ्याने काम करायचे. मध्ये मध्ये तिच्याशी खेळायचे. तिला पुस्तकं, चित्र काढायला द्यायचे. तिचं जेवण, दूध असं सगळं करायचे. तीचं जेवण झालं की मग १ नंतर मी फ्री व्हायचे. ती जेऊन मस्त ३ तास झोपायची. मग माझ्या पायांना जरा आराम मिळायचा. ती सव्वा वर्षाची झाल्यावर तिला जवळच्या एका daycare मध्ये आठवड्यातून २ दिवस पाठवायचो ३-४ तास. तिला खेळता यावं म्हणून. बाकी दिवसभर ती आणि मी. नवरा आल्यावर तिच्याशी खेळायचा, तिला बघायचा तेव्हड्या वेळात मी माझी अंघोळ, रात्रीचं जेवण असं सगळं करायचे. नंतर काही महिन्यांनी एक हेल्प मिळाली म्हणून माझं स्वयंपाक आणि घरातलं काम कमी झालं.

ती तीनची झाल्यावर डे केयर मध्ये ९-३ जायला लागली. २ वर्षं गेली आणि कोविडकाळ सुरु झाला. मग परत वर्षंभर घरी. आता तर ९-३ शाळेतच जाते.

माझी मुलगी (८ वर्ष) आजपण खूप मस्ती करते, रोज काही ना काही तोडफोड, सांड-लवंड करतच असते. आजपण आमच्याच जवळ झोपते. त्यामुळे झोपेत लाथा मारते. खूप प्रश्न विचारते. भंडावून सोडते. तरीही मुलीला मी मारत नाही.

time-out हा प्रकार काही आम्हाला जमला नाहीये. ती लहान असताना तिला एकदा time-out दिलं. भिंतीकडे तोंड करून बसून रहा, असं सांगितलं. तिला वाटलं हा काही नवीन खेळच आहे. ती खुदुखुदू हसायची. मग स्वतःच time-out करायची नाहीतर आम्हाला करायला लावायची. त्यामुळे हा शिक्षेचा प्रकार काही आम्हाला झेपला नाही.

बाकी मुलांना कोंडून ठेवणे, त्यांच्याशी खूप काळ अबोला धरणे हे मलाच अमानुष वाटत. असं कधी माझ्या आई बाबांनी पण नाही केलं.

ग्राउंड करीन तुला म्हणजे screen time बंद करीन अशी धमकी देऊन पहिली इतक्यातच तिला. त्याची जर्रा भीती आहे. कारण त्यात iPad, स्क्रीन time नाही मिळणार, हे जास्त क्लेशकारक आहे तिच्यासाठी.

बाकी कुठलीही गोष्ट लपून करायची नाही, हे तिच्यावर बिंबवलंय. मुळात कुठली गोष्ट का नाही करायची, हे मुलांना न समजावता नुसतं मारून काही उपयोग नाही. तू हे कर/नको करू नाहीतर मी मारीन, हे चुकीचं आहे.

कधी कधी खूप सांगून, समजावून पण नाही कळत आहे, असं वाटलं तर फारशी रिस्क नसेल तर तिला म्हणतो 'जा कर'. उदा. खूप चॉकलेट्स खाणं. खूप चोकोलेट्स, बिस्कीट खायचे असायचे तिला लहानपणी. ३ वर्षांची असताना. एकदा नवरा म्हणाला खा तुला पाहिजे तितके. ७-८ चोकोलेट्स खाल्ले तिनी. मग उलट्या झाल्या. तेव्हापासून तो हट्ट सोडून दिला तिनी. आजपण तिला १० चॉकलेट्स दिले कोणी तरीही ती १-२ च खाते. कुठलीच वस्तू कितीही आवडीची असली तरीही प्रमाणातच खाते. मी आता तिला सांगितलंय की काय किती खायचं, हे तू ठरव, तू मोठी झालीयेस.

काही गोष्टी आम्ही सोडून दिल्या. उदा. अगदी लहान असताना भिंतीवर रंगवायची. सोफा, टेबलवर खूप उड्या मारायची. आमच्या dining chairs अगदी खिळखिळ्या करून टाकल्या होत्या तिने. उड्या मारून मारून. घरभर पसारा असायचा तिच्या खेळण्यांचा. पण ते ३-४ वर्षंच होतं. ५ वर्षांची झाली आणि असं करणं बंद केलं तिने आपणहूनच. आम्ही पण सगळं furniture नवं घेतलं. पण त्या काळात आमच्या घरी येणाऱ्याला वाटत असेलच की काय घर आहे हे, कसं तुटकं सामान आहे यांचं. पण ठीके.

इतकं सगळं सांगण्याचा हेतू हा आहे की मारणं हा पर्यायच नाहीये, असं जर ठरवलं तर अमलात आणणं कठीण नाहीये. आम्ही काहीही हेल्प (स्वयंपाक, घरकामाची बाई, आया, घरातले मोठे इ) नसताना दोघंही full-time जॉब करत असताना न मारता एका चुलबूल पांडेला वाढवलंय तर ते अशक्य नाहीच्चे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माउमैया आणि नानबा - एक डिस्क्लेमर देते, तुम्ही पालक किंवा व्यक्ती म्हणून चांगल्या असाल आणि मुलांबद्दल तुमचे हेतू उत्तम असतील याबद्दल क्वेश्चन करण्याचा माझा हेतू अजिबात नाही. (मीही त्या फेज मधे एके काळी होतेच. )
मारणे आवश्यक असते असे अर्ग्युमेन्ट्स आले की आपोआप ते आवश्यक कसे नाही यावर इथे गाडी अडकतेय.
निदान ते टाळता येण्यासारखे आहे का? ते टाळून वेगवेगळ्या सिचुएशन्स हँडल करण्याचे प्रयोग कुणी केले असतील तर त्यावर चर्चा केली तर ती जास्त फलदायक ठरेल असे वाटते. हवे तर फक्त सिनारिओ लिहायचा आणि तो न मारता कसा हँडल करता येईल अशीही चर्चा करता येईल. म्हणजे कुणा एकालाच स्पॉट वर टाकल्याचा फील नको.

आम्ही एकच फटका मारतो, चांगले वळण/शिस्त लागावे म्हणून मारतो, मुलांच्या भल्यासाठी/कल्याणासाठी मारतो, त्यांनी अपघातातून स्वतःला ईजा करून घेऊ नये म्हणून मारतो, प्रेमातून मारतो तिरस्कारातून नव्हे ही सगळी कॉन्वॉल्यूटेड विचारांच्या पालकांनी आपल्या स्वतःलाच दिलेली ऊदात्त कारणे आहेत. मार देण्याचे मूळ कारण मुलांच्या लॉजिकल रिझनिंग करायच्या लेवलवर ऊतरून त्यांच्याशी संवाद साधता न आल्याच्या अपयशात आहे.

भेदरून जाईल असे रागे भरल्याने किंवा मार पडल्याने मुलांच्या नाजूक मनाला जे तडे जातात आणि ते माराच्या वा रागावण्याच्या भितीने भरले जातात हे जर ती दाखवू शकत असली तर मला खात्री आहे अशा धाग्यांची गरजच पडली नसती.

कोणी असा विचार केला आहे का की शारिरिक मार पडल्यानंतर मुले पालकांना आवडत नसलेले वागणे का बदलतात किंवा पालक एन्फोर्स करत असलेली गोष्ट का ऐकतात/करतात? भितीपोटी की मारानंतर ती गोष्ट नकरण्याच्या लॉजिकल कारणाचा साक्षात्कार झाला म्हणून?

जर भितीपोटी वागणे बदलण्याच्या मानसिक आंदोलनाची ओळख पालकांनीच मुलांना करू दिली तर प्रत्येक वेळी भितीपुढे ती वाटल्यानंतर किंवा वाटण्याची शंका आल्यास आधीच शरणांगती ही एक मानसिकता बनण्याची शक्यता नाही का? पुढे जाऊन बुली मित्र, कडक मास्तर, सिविल ऑथोरिटी, बॉसेस, देव अशा अनेक ईरॅशनल एंटिटी बरोबर पालकांनी घालून दिली भिती संलग्न होत त्याने तडकलेल्य मनाचे तडे अजून भरले जात नसतील का? मुलांनी ही पालकांची भिती मान्य पण बाकीच्यांची अमान्य असे कसे स्वतःला समजावयाचे?

पालकांना न आवडलेली ती गोष्ट जी मुलांना कुतुहलापोटी किंवा त्यातून मिळणार्‍या आनंदापोटी करावी वाटत असेल आणि माराच्या धाकाने ते करत नसतील तर लॉजिकल रिझनिंग मधून आलेली वागणूक रिवार्ड पात्र नसते आणि शक्ती वा ऑथोरिटीने केलेला अपमान, दाखवलेला धाक ही जास्त सुपिरिअर गोष्ट असते हा संदेश मुलांपर्यंत पोचोचणार नाही का?

मी अश्विनी - अनुमोदन.
शिवाय हा भयंकर स्लिपरी स्लोप आहे - मारण्याला मूल कोडगं झालं तर काय कराल?

संवाद ही खरंच गुरुकिल्ली आहे. कितीही लहान मुलात आणि तुमच्यात तो होऊ शकतो आणि व्हायलाच हवा.

धन्यवाद लोकहो, चर्चा बरोबर दिशेने चाललीये. आता माबोवर पण धाग्याला अनुसरून प्रतिसाद देणाऱ्याला पॉईंट्स/स्टिकर्स इ द्यावे वाटू लागलय. फॉर गुड बेहेविअर. Happy

अजून काही ideas:
१. मुलगी कधी कधी सकाळी उठायला कंटाळा करते. उगाच लोळत असते दुलईमध्ये. आत्तापर्यंत 'आता मी ५ पर्यंत काउन्ट करतेय हं, ५ म्हणायच्या आत मला तू बाथरूम मध्ये दिसली पाहिजेस.' असं सांगायचे आणि ती ऐकायची. आता एक दिवस ५ पर्यंत झालं तरीही ती उठली नाही. मुद्दाम माझ्याकडे 'आता काय करशील?' असा लुक देऊन दुलईत गुरफटून बसली. पहिले तर राग आला. पण ती मला challenge देत होती, हे पण कळत होतं. मी म्हटलं हे बघ मी परत ५ पर्यंत करतेय, आता मात्र दिसली नाहीस तर बघच तू. मी पुन्हा ५ पर्यंत केलं तरीही काही ढिम्म हलली नाही. आता आई काय करते हे ती पण बघत होती. मी तिची दुलई बाजूला सारली आणि मस्त तिला गुदगुल्या केल्या. तिला अनपेक्षित होतं. खुदुखुदू हसत पळाली. तिचं सकाळी सकाळी खदखदून हसणं पाहून माझी पण मॉर्निंग गुड झाली. आता तिला सांगते की ५ म्हणायच्या आत ऊठ नाहीतर tickle monster येईल.

२. आठवडाभर तू रोज सकाळी लवकर उठून तयार झालीस/ होमवर्क केलास/ डब्बा पूर्ण संपवलास/ chores केलेस (जे काही pain points असतील ते) तर वीकएंडला मूवी nightला तुझ्या आवडीची मूवी आपण पाहू. यात वस्तू प्राईझ म्हणून देण्यापेक्षा कोणती सगळ्यांनी मिळून करायची ऍक्टिव्हिटी केली तर मुलांना जास्त मजा येते, असा अनुभव आहे.

३. कधी कधी मुलांना फक्त राग काढायचा असतो. covid मध्ये सुरुवातीला फार कठीण गेलं. अचानक lockdown लागला. daycare च्या मैत्रिणींना, टिचरला बाय पण म्हणता आलं नाही पोरांना. आणि मग सगळं बंद. आम्ही पण घाबरलेलो. आमचं अचानक wfh सुरु झालं आणि मुलीला दिवसभर काहीच timepass नव्हता. ते फ्रस्टरेशन, दुःख आणि भीती तिच्यात खदखदत होती. मग चिडचिड करायची. शेवटी एक दिवस तिला म्हटलं तुला काय करायचंय तर म्हणाली मला सगळे खेळणे तोडून टाकावे वाटतात आहेत. तिला म्हटलं कर पाहिजे ते. १०-१५ मिनटं फेकाफेकी केली, काही खेळणे तुटले त्यात. घळघळ रडली. पण मग शांत झाली. तेव्हापासून पुष्कळ शांत झाली. आपल्याला काय वाटतंय ते पॅरेंट्सनी अकनॉलेज केलं, यातच तिला समाधान मिळालं. रागाचा निचरा होणं आवश्यक. कोणी म्हणेल असे कसे खेळणे तोडू दिले? पण त्या क्षणी ती इतकी उदास आणि फ्रस्टरेटेड होती आणि ५ वर्षांची म्हणजे लहानच होती. त्या दिवशी तोडू दिलं म्हणून ती आता राग आला तर तिच्या वस्तू तोडत नाही, तेवढं कळतं तिला.

आधी बारक्याचा राग, मग मोठ्याचा आणि मग माझा आणि मग अग्निअस्त्र!>>> ब्रम्हास्त्र बघितल्याचा परिणाम का?
बाकी भान्डण सोडवायला गेल की सुप्रिम कोर्ट पार्शल आहे म्हणुन एखादी तरी पार्टी रुसुन बसतेच.

स्नेहमयी, प्रतिसाद आवडला. मागचे २ दिवस तिला न मारता, बोलून किंवा समजावून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतेय. हे प्रयत्न मी यापूर्वीही केलेत. पण कुठेतरी संयम संपून जायचा. ( अगदी रोजच मारायची वेळ येते, असंही नाही. पण आठवड्यातून एकदा तरी.त्यामुळे २-३ दिवस मारण्याची वेळ न येणं हे नॉर्मल आहे. ) आता मात्र मागे हटायचं नाही, असं ठरवलंय. या धाग्यावर सविस्तर लिहिण्याचा उद्देश तोच आहे की, इथे वेगळे मार्ग, अनुभव वाचून मला मदत मिळेल. मी मारत नाहीये बघून नवराही न सांगता माझ्या मिशनमध्ये सहभागी झालाय, इथली चर्चा किंवा इतर काही तत्सम बोलणं झालं नसूनही.

माझा प्रवास कसा होतोय, हे काही कालावधीनंतर इथे लिहायलाही नक्की आवडेल. ह्या बदलामुळे, मुलीच्या स्वभावात किंवा वागण्यात बदल होणे, हे जास्त अपेक्षित आहे. कारण मुलं ही आपलंच प्रतिबिंब असतात, हे तिच्या लहानपणापासून अनुभवलंय. म्हणूनच तिची अति चिडचिड व्हायला लागल्यावर, त्याचं कारण आमची वागण्या-बोलण्याची पद्धत आहे की तिला काही त्रास होतोय की इतर काही याची चर्चा बऱ्याचदा होते आमच्यात. मग त्याप्रमाणे बदलही करतो. पण ती खरंच आमच्या पेशन्सला challenge करते बऱ्याचदा.

हवे तर फक्त सिनारिओ लिहायचा आणि तो न मारता कसा हँडल करता येईल अशीही चर्चा करता येईल. >>>>>> हे कालपासून वाटत होतं मला. कारण त्या चर्चेचा फायदा आमच्यासारख्या सगळ्यांनाच होईल.

म्हणजे कालचंच उदाहरण, तिची शाळा दुपारची असते. सकाळी झोपेतून उठल्यावर रडायला सुरुवात झाली, मला शाळेत नाही जायचंय. (ही झोपेतून उठून अर्धा पाऊण तास कुरकुर करायची सवय नेहमीची. मग चिडायला एवढंस निमित्तही पुरतं. ती वेळ नेमकी माझी आवराआवर करून निघायची असते. मग घड्याळाकडे लक्ष ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणणे, ही परीक्षाच. त्यात सकाळी मम्मीच हवी असते जवळ, त्यामुळे इतर कोणी जवळ आलेलं चालत नाही. कधीतरी पप्पा चालतो. ) तर यावर माझं म्हणणं, थोडावेळ लोळून घे, नंतर बोलू. मध्येमध्ये माझी कामं चालू होती. पण शाळेत जायचं नाही या मुद्द्यावर ती ठाम होती. आदल्याच दिवशी, क्राफ्टची वस्तू उद्याच न्यायचीय म्हणून बनवली, त्याचं काय? हेही बोलून झालं. पण ते नंतर चालेल, असा युक्तिवाद आला. न जायचं कारण काय तर, कंटाळा येतो, शाळा आवडत नाही, सर्दी झालीय; अशी विविध कारणं समोर आली.परीक्षा जवळ आलीय, तर अभ्यास करायला घरी राहतेय, हेपण कारण शेवटी. ( इयत्ता - पहिली) शाळेत दर महिन्याला स्पर्धा असते छोटीशी, ती होती काल. त्याचं टेन्शन आलं असेल, असं जाणवलं म्हणून म्हटलं की, स्पर्धेत भाग घेऊ नकोस. तसंही आम्ही तयारी केलीच नव्हती. कारण ते तिने मागच्या महिन्यातच सांगितलेलं. शाळा लवकरच सुटेल, लगेच घरी येशील; हेही सांगितले. हवंतर उद्या सुट्टी घे, (कारण आज जरा एका कार्यक्रमामुळे आमची गडबड आहे.)

पण ती नाहीच जाणार म्हणाली. जावंच लागेल, सांगितलं असतं, तर पुढंच नाचकाम सुरु झालं असतं आणि मी आता उशीर झाला, या मोडवर होते. मग म्हटलं, आता उगीच दांडी मारतेस, तर अर्धा दिवस शाळा असली तरी दिवसभर अभ्यास करावा लागेल. शिवाय चार दिवस मोबाईल मिळणार नाही.( रोज अर्धा तास ). त्याक्षणी ते सगळं कबूल होतं तिला. शाळेत जायची वेळ होईपर्यंत विचार कर, हेही सांगून गेले. शिवाय, अभ्यास काय करायचा तो लिहून द्यावा लागला. खूपच उशीर झालाय, मोडवर गेल्यावर मला नाश्ता करायला वेळ नव्हता. पटकन लाडू तोंडात टाकून निघाले.

परत आल्यावर अर्थातच तिने काही अभ्यास केला नव्हताच. पण आजीसोबत आत्याकडे जायला निघाली होती. मी नाही म्हटल्यावर, एक रडारडीचा एपिसोड झाला. मग म्हटलं, आधी अभ्यास केला नाही, तर आता उशिरापर्यंत बसावं लागेल. माझं एक वेबिनार अटेंड करत तिला घेऊन बसेल. त्यात बरीच टंगळमंगळ झाली मग. लिखाणाचा कंटाळा आल्यावर तोंडी अभ्यास घेतला मग.

आता आज एक कार्यक्रम आहे, तर रात्री पुन्हा उद्या शाळेत नाही जाणार, किंवा लवकर घरी घेऊन जा; असा सूर आला. तर म्हटलं, सकाळी तुला आज ऐवजी उद्याचा पर्याय दिला होता , पण तू नीट विचार केला नाहीस. आता ह्यापुढे आजचा हा स्पेशल दिवस लक्षात ठेव.

पण मूळ मुद्दा असा की, शाळेतच जायचं नाही, म्हटल्यावर परिस्थिती कशी हाताळावी? मी घाईत असताना, इतर काम करत करत असा निर्णय घेतला. अजून वेगळ्या प्रकारे काय करता येईल. आणि हा प्रश्न नेहमीचाच असतो.
शिवाय, आता चार दिवस मोबाईल नाही देणार, तेव्हाचे tantrums हा नवीन प्रश्न.

शाळेत जाण्याच्याबाबतीत मी लेकीला कसला खास त्रास होतोय का ? याचा विचार केला असता / शाळेत शिक्षकांशी बोलले असते आणि नंतर तिचं काहीही ऐकलं नसतं... नोकरी करून अर्थार्जन करणे ही आई बाबाची करिअर आहे त्यात आम्ही कुचराई करू शकत नाही आणि शाळेत जाऊन उत्तम शिक्षण मिळवणे हे तिची करिअर त्यात ती कुचराई करू शकत नाही अशी चर्चा मी कायमच तिच्याबरोबर करत असे

दिवसाची सुरुवात सुरळीत व्हावी म्हणून मी करत असलेल्या काही गोष्टी अशा

1- लेकीची झोप पूर्ण होते आहे का? यावर लक्ष ठेवणे 5 एक वर्षांची असताना सुरभिला चांगली 1आठ नऊ तास कमीतकमी झोप लागत असे - ते सुद्धा दुपारी न झोपता एक सलग

2- आम्ही लहान असताना आमची आई आमच्यापेक्षा सकाळी थोडं लवकर उठून उठतानाची पंधरा-वीस मिनिटं खास आमच्यासाठी ठेवत असे ही पेंगुळलेली पंधरा-वीस मिनिटं आईबरोबर घालवल्याच्या सुंदर आठवणी अजूनही आहेत

3 मी मात्र हा क्रम उलटा केला होता तू वेळेवर आवरलंस तर आपल्याला दोघींना शाळेची बस यायच्या आधी बागेत खाली खेळता येईल असा आमचा तह झालेला होता

4-रोज झोपताना उद्या काय गंमत असणारे त्याची सुरभि सोबत उजळणी करत असे - उद्या शाळेत शो अँड टेल असणारे / आवडीचा खाऊ देणारे/ नवीन हेअर बँड लावणार आहे/ संध्याकाळी शाळेतून आल्यावर तिने आणि मी अमुक गंमत करायची आहे वगैरे काहीही छोटीशी गंमत असे

5- मी रोज सुरभी ला वेळ देत होते हे वर लिहिलं आहेच मात्र हा वेळ मी सकाळी साडेपाच ते सात या वेळात देत असे... या वेळात तिच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करता यावं म्हणून मी खास सकाळी लवकर डबा करून देणारी बाई शोधली होती... आणि ही बाई परवडावी म्हणून इतर काही आर्थिक बाबतीत हात आखडता घेतला होता / काही घरगुती तडजोडी केल्या होत्या - हा वेळ सुरभिला देणं मला जमावं म्हणून माझ्या कामाच्या पद्धतीतही बराच फरक केला होता- वेबिनार/ अभ्यास/ नवीन गोष्टी पाहणे वाचणे / रोजच्या ऑफिसच्या इमेल क्लीन-अप करून ठेवणे अशा गोष्टी मी सकाळी लवकर करत असे... शेजारी शेजारी बसून दोघी आपापला "अभ्यास" करत असू - सुरभि चा अभ्यास हा शाळेत काय चाललंय याच्याशी संबंधित बहुदा नसे - वाचन शास्त्र गणित इतिहास भूगोल यांच्या सगळ्यातल्या आपापसातली नाती त्यातल्या गमती असं काहीही चालत असे. तिच्याबरोबर बोलता येतील अशा गमती जमती मी अगोदरच्या वीकेंडला आवर्जून शोधून ठेवत असे.... अनेकदा तिचा ती अभ्यास करत असे... तिच्या शेजारी बसून माझ काम करताना बऱ्याच वेळा तिच्या मनातले छोटे मोठे आनंद, तिला त्रास देणाऱ्या तिच्या विश्वातल्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचत असत. मात्र एक गोष्ट कसोशीने पाळली की हा वेळ हा कसलंही बक्षीस किंवा शिक्षा नव्हता म्हणजे तू शहाण्यासारखी वागलीस तर गंमत करू नाहीतर अभ्यास करू वगैरे काही नाही - हा आमच्या दोघींचा खास वेळ होता. मात्र हा वेळ सकाळी देण्याचा एक उप फायदा म्हणजे शाळेत जाईपर्यंत तिचा मूड चांगला झालेला असे.

6- सकाळी साडेपाचला उठायचं तर रात्री लवकर झोपणं लेकीसाठी क्रमप्राप्त होतं - ते जमावं म्हणून मी आठवड्याच्या स्वयंपाकाची संपूर्ण पूर्वतयारी करून ठेवत असे. साधारण दोन किंवा तीन भाज्या किंवा उसळी डीप फ्रिझर मध्ये कायम तयार ठेवत असे. आठवड्यात आयत्यावेळी उशीर झाल्या तर त्या कामास येत. वर लिहिल्याप्रमाणे बाईची मदत सुद्धा घेत असे. आम्हाला बुवा ताजंच लागतं / एवढी पूर्वतयारी करण्याचा मला ताण येतो/ आमच्या घरी माझ्याच हातचं लागतं वगैरे एक्सक्युजेस मी जाणीवपूर्वक लांब ठेवली होती - व्यवस्थित शिजवून योग्य वेळी डीप फ्रिजरमध्ये ठेवलेल्या अन्न पदार्थांची गुणवत्ता ताज्या शिजवलेल्या पदार्थांइतकीच असते हे मी स्वतः वाचून, डायटीशियन बरोबर बोलून ठरवलं होतं.

7- साधारणपणे चौथी पाचवीत जाईपर्यंत लेक साडेआठ वाजेपर्यंत झोपत असे. त्यानंतरचा एखादा तास हा मी टाईम/ वुई टाईम असे - सुरभीला सुंदर बालपण द्यायचं तर आई खुश आणि निरोगी अशा आवश्यक आहे हे मी कायम लक्षात ठेवत असे

छान चर्चा चालू आहे. माऊमैय्या, आमच्याकडे पण हे रोजच असते. शाळेत नाही जायचं. मग त्यातच (रड्यातच) अंघोळ होते आणि दूध पिऊन होते. तिची आजी म्हणते, फक्त ड्रेस घाल आणि स्कुलबस मध्ये बसून ये, शाळेत नको जाऊस Proud हे रोजच असते. शाळेत टीचर ओरडल्या का? कोणी मारले का? हे प्रश्न रोज विचारतो, पण उत्तर नकारार्थी असते. टीचर ला सांगितले तर त्या म्हणाल्या दिवाळी पर्यंत असेच करेल किंवा हे वर्ष असे वागेल, फार काळजी करू नका. ती पण पहिलीत आहे आणि हे शाळेत जायचं पहिलच वर्ष आहे. तिची टीचर कडक आहे, त्यांना दबून असते. त्यापण तिला हटकून जास्त प्रश्न विचारतात, पहिल्याच बेंचवर बसवतात. शाळेतून आल्यावर 1 तास किमान घरात शाळा भरवते, झालेलं सगळं परत तिच्या रुम मध्ये जाऊन शिकवत बसते (imaginary) Proud आधी लिहायचा कंटाळा करत असे, आतापण करतेच, पण अभ्यास करते पूर्ण. परवा चक्क एक पानभर तिला काय काय आवडत, आजी आबा आई बाबा भाऊ मैत्रीण ह्यावर लिहिलं, मग सगळ्यांनी कौतुक केलं (करवून घेतलं) भिंतीवर लावून घेतले :)पण मला खूप छान वाटलं , तिच्यावर लिखाण आणि वाचन ह्याची मेहेनत घेतली, त्याच चीज झाल्यासारखे वाटले Happy आईकडे बसून अजिबात अभ्यास करत नाही, मला 4 वेळा किमान व्हिडीओ कॉल करावा लागतो ऑफिसमधून. मग मी जे जे सांगेन तसा करते अभ्यास आणि मग केलेलं 'शो' पण करायचं असतं, मग परत कॉल. घरी गेल्यावर पण घेतो मी बरेचदा अभ्यास. तिच्या आईने स्टार पद्धत काढली आहे, चार्ट आहे, त्याच्यावर सकाळ दुपार संध्याकाळ असे 3 भाग केलेत, दूध प्यायली 1 स्टार, अभ्यास केला 1 स्टार, भावाला न मारता खेळवले एक स्टार, स्वतःच्या हाताने खाल्ले की अजून एक स्टार इ इ ते स्टार मिळवण्यासाठी तरी करते बरेचदा. उद्या रविवार केस धुण्याचा वार, फार रडारड करते. पण त्याकडे अजिबात लक्ष देत नाही आम्ही कारण तो हायजीन प्रकार आहे. तिथे खूप समजावून झालंय पण अजून फरक नाही रडते आणि मग होते शांत. मी हा धागा वाचून नक्कीच न मारण्याचा प्रयत्न करेन, कारण मी देत असतो फटके मध्ये मध्ये. तिच्या वडिलांना घाबरत असेल तर त्यांना काही डिपार्टमेंट द्या Happy

स्नेहमयी तुझी पोस्ट आवडली
विषय बदलायचा अजिबात नाहिये पण पहिलिच्या मुलाना अभ्यास्,परिक्षा, स्पर्धा?? नो वन्डर मुल शाळेला कन्टाळतात.भारतातल्या शिक्षण पद्धतित मुळापासुन फार बदल करायची गरज आहे.

प्राजक्ता अगदी सहमत आहे, अत्यन्त चुकीची आहे शिक्षण पद्धत. पण आता त्यातच आहे म्हटल्यावर, आलिया भोगासी. तेच घरी कसे मनोरंजक करता येईल हे बघायचे. आणि सगळीच मुलं कंटाळा करतात असे नाहीये, बहुतांश मुलांना आवडतेच शाळा, खेळ, मित्र हे प्रमुख कारण. हे परदेशी पण असेलच.

पहिलीच्या मुलींना अभ्यास परीक्षा स्पर्धा
>>>

याविषयी माझं मत सांगते

सुरभिच्या शाळेत तरी सहावीपर्यंत परीक्षा नव्हत्या. ज्या काही असेसमेंट घेत असत त्यासाठी मुलांच्या मागे लागून अभ्यास करून घेणारे खूप पालक होते - मुलांचे क्राफ्ट आणि प्रोजेक्ट घरी करणाऱ्या च्चीकार आया होत्या. खरं म्हणजे काही मुलांचे प्रोजेक्ट बघून हे प्रोजेक्ट कोणत्या पहिलीतल्या मुलाने स्वतःचे स्वतः केले आहे ते बघायची मला इच्छा आहे असं मी सुरभिच्या वर्गशिक्षिकेला सांगितलं होतं.

असे पालक असल्यावर शाळेचा थोडाफार भर अभ्यास करण्याकडे असेच- मात्र यासाठी सुरभिला प्रेशर करू नका... तिच्या मार्कांसाठी मी शाळेला जबाबदार धरणार नाही असे स्पष्टपणे सांगितल्यावर शाळे कडून त्याविषयी जबर जस्तीनव्हती

त्यामुळे हे ओझं करून द्यायची जबाबदारी मी जास्ती पालकांवर ढकलीन
दुर्दैवाने अशी वृत्ती मी सगळीकडेच पाहते आहे- कॅलिफोर्नियात राहणाऱ्या माझ्या भाचारांच्या शाळेत सुद्धा असे अति उत्साही पालक आहेतच. शेवटी हा विषय प्रत्येकाने आपापल्या आणि आपल्या मुलांच्या स्वभावाला धरून निर्णय घेण्याचा आहे

बाकी माझा आणि सुरभिचा अभ्यास हा शाळा किंवा परीक्षांशी निगडित नसे तर तिच्या कलानुसार तिच्या आवडीनुसार वेगवेगळ्या गोष्टींची ओळख तिच्याशी करून देणे/ अभ्यास हा विषय कंटाळवाणा नसतो असं तिच्या लक्षात आणून देणे/ काही गोष्टी कंटाळा आला तरी कराव्या लागतात हे सुद्धा वयानुसार समजणे अशा पद्धतीचा होता

अगदी लहानपणापासूनच सुरभिने कितीही प्रयत्न केला तरी तिचे प्रोजेक्ट क्राफ्ट मी केले नाहीत - अमक्याची आई करते असा तिचा नेहमीचा मुद्दा असे आणि त्यावर मी अमक्याची आई नाही,तुझी आहे हे माझं नेहमीच उत्तर होतं Happy
तिचे कन्सेप्ट क्लिअर आहेत हे नेहमीच पाहिलं - कितीही चांगली शाळा असली तरी दर वेळेला प्रत्येक शिक्षकाची योग्यता तेवढी असेलच असं नाही शिवाय आपल्या मुलाला प्रत्येक विषय सगळ्यांच्या वेगाने समजेलच असंही नाही हे लक्षात ठेवलं. मात्र परीक्षा आणि मार्क यासाठी तिच्या मागे अजिबात लागले नाही. घरातून ज्येष्ठ नागरिकांकडून नंतर ती मागे पडेल अशा पद्धतीचा बागुलबुवा थोडाफार करण्यात आला मात्र त्याला मी ठामपणे विरोध केला.

साधारणपणे नववीत गेल्यानंतर मी तिला मार्क आणि परीक्षा यांचे महत्त्व लक्षात आणून द्यायला केली होती - फार उशीर झाला नाही असं दहावीतल्या तिच्या मार्गांवरून तरी वाटतं आहे.

अनेक पालकांनाच शाळेने खूप अभ्यास द्यावा, परीक्षा घ्याव्यात, स्पर्धा घ्याव्यात असं वाटतं असतं. मग तिच्या मुलाला माझ्या मुलांपेक्षा अर्धा मार्क जास्त कसा असे प्रश्न येतात.

आपल्याकडे मुलांना मारण्याचं ग्लोरिफिकेशन होत आलं आहे असं वाटतं.
छडी लागे छमछम विद्या येई घमघम
आणि "आमच्या वेळी वडीलच शाळेत येऊन आमच्या पोराला नीट वागला नाही, तर चांगला बडवा , असं सांगत" टाइप वर्णनं साहित्यात असत. पुलंनी लिहिलंय का हे?

>>>
तिच्या मुलाला माझ्या मुलांपेक्षा अर्धा मार्क जास्त कसा असे प्रश्न येतात.
>>>>
भरत, अगदी अगदी.....
इयत्ता पहिलीच्या पालक सभेत मुलांची प्रत्येक असेसमेंट शीट घेऊन हिला अर्धा मार्क कमी का /त्याला पाव मार्क जास्ती का अशी चक्क घासाघीस करणारे भरपूर पालक पाहिले आहेत!

चर्चेचा ट्रॅक धागालेखकाच्या अपेक्षानुसार ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या सर्वांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. मतभेद असतील, पण धागालेखकाचे म्हणणे काय आहे हे एकदा वाचावे असे वाटणार्‍यांची छान सोय झाली आहे. नाहीतर सोडून द्यावे लागतात धागे...

योग्य शीर्षक आणि विषय मांडणी छान केली आहे.
प्रतिसाद सुध्दा छान येत आहेत. मैत्रेयी, अमितव, स्नेहमयी, मी_अश्विनी यांच्या पोस्ट्स, स्वाती आंबोळे यांचे माऊमैया यांच्या पोस्ट वरील उत्तर मग ते सकारात्मक घेऊन माऊमैया यांची पोस्ट हे आवडले.

"सगळ्या/बहुतेक पालकांना कळतं आपल्या मुलांशी कसं वागायचं " अशा अति जनरलाइज्ड (आणि चुकीच्या) समजुती वरून गाडी योग्य मार्गावर आलीय तर योग्य दिशेने चांगली चर्चा होत आहे.

अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आपण पालक मुलांच्या वागण्याला, एखाद्या गोष्टीत एंगेज राहण्याच्या कृतीला किंवा त्यांच्या एखाद्या गोष्टीचा हट्ट वा पाठपुरावा करण्याच्या कृतीला कळत नकळत बालहट्ट, खेळ, टाईमपास असे म्हणत कमी महत्वाचे समजत राहतो. जेव्हा आपले काम आणि त्यांचा खेळ/हट्ट असा क्लॅश होतो तेव्हा आपण नकळत ऑथोरिटी गाजवत मुलांना त्यांचे काम थांबवायला वा बदलावयला भाग पाडतो. अशा क्लॅशचा शेवट मोस्टली धाकदपटशा दाखवून मुलांची कृती बदलली गेली असा होतो.

ऊदा.. आपल्या स्वयंपाकाच्या रगाड्यात मुलांची गॅस आणि किचन काउंटरवरच्या वस्तू हाताळायची लगबग, आपण ऑफिसचे काम करत असतांना मुलांचा भलतेच खेळायचा आग्रह, शॉपिंगला/प्रवासाला/ ईतरांच्या घरी गेल्यावर हट्ट करणे आणि ते पूर्ण न झाल्यास टँट्रम अशा अनेक गोष्टी.
तर सांगायचा मुद्दा हा की मुलांना जाम ऊमगत नाही त्यांचे काम/खेळ/कुतूहल आईबाबांच्या कामापेक्षा कमी महत्वाचे का आहे? ते काम/खेळ/कुतूहल त्यांच्या अंतर्मनाने त्यांना लावून दिलेली अतिशय महत्वाची टास्क असते आणि ही त्यांची ऊपजत शारिरिक व मानसिक डिवेलपमेंटल गरज आहे. एका बाजुला त्यांचा आईबाबांना त्रास देण्याचा हेतू नसतोच आणि काही सुप्त हेतू असलाच तर मी सुद्धा मदत करून आई बाबांचे अटेंशन आणि अ‍ॅफेक्शन मिळवेन असाच असतो. तर दुसर्‍या बाजुला प्रत्येक वेळी मुलांची लूड्बूड खपवून घेणे आपल्याला शक्य नसते.

पण मुलांच्या अशा निरागस आणि निसर्गदत्त वागणुकीला माराचा आणि रागाचा प्रतिसाद न देता संवादातून मुलांना गोष्टींची प्रायोरिटी पटवून देण्याचे कसब पालकांनी जमवणे खूप गरजेचे आहे. भलेही ते पहिल्या क्लॅशच्या वेळी जमणार नाही पण दुसर्‍या, तिसर्‍या वेळेपर्यंत ती समजून घेण्याची मुलांची प्रगती झालीच असेल. असा प्रत्येक क्लॅश ही खरेतर संधी आहे मुलांना कार्यकारण भाव समजावण्याची.

टाईम आऊट हा अशा क्लॅशेसच्या वेळी, सिच्युएशन मधून स्वतःला डिसअसोसिएट करत सिच्युएशन अजून एस्कलेट होऊ न देण्याचा प्रकार आहे. ह्यात न बोलण्याची शिक्षा देणे किंवा भिंतीकडे तोंड करून बसवत गिल्टी फील करवणे किंवा पॉझिटिव एक्सपिरिअन्स एनव्हायर्नमेंट मधून लेस पॉझिटिव एक्सपिरिअन्स एनव्हायर्नमेंट मध्ये बसवणे जेणेकरून पुन्हा हा अनुभव येऊ नये असा प्रयत्न मुलांकडून होईल हा एक ऊद्देश असू शकतो.
पण त्याहीपेक्षा महत्वाचे टाईम आऊट देण्यापूर्वी झालेल्या संवादावर मुलांनी एकट्याने डिस्ट्रॅक्ट न होता त्यांच्या लेवलवर रिफ्लेक्ट करणे हा आहे असे मला वाटते. टाईम आऊट संपल्यावर पालकांनी मुलांशी पुन्हा त्या गोष्टीवरून संवाद साधत चॅप्टर क्लोज करणे जरूरी आहे. टाईम आऊट जेवढं मुलांसाठी तेवढाच पालकांसाठी सुद्धा राग आवरून शांत होण्यासाठी, शांत डोक्याने पुढच्या संवादासाठी विचारांची जुळवाजुळव करण्यासाठी जरूरी आहे.

लहान मुलांच्या डिवलपिंग मेंदूच्या कार्यप्रणाली बद्दल वरवरची थोडी बोरिंग टेक्निकल माहिती देऊ ईच्छिते...

संवादातून एखादी गोष्ट करण्याची वा न करण्याबद्दलची लॉजिकल रिझनिंग मुलांना स्वतःहून समजण्यासाठी डाव्या बाजूच्या मेंदूची जडणघडण पूर्ण होणे आवश्यक आहे, जी साधारणतः ७-८ वर्षापर्यंत होते. पण पॉझिटिव अनुभवातून रिझनिंग शिवकवत राहिल्यास ह्या जडणघडणीदरम्यान मिळालेले धडे मुले चांगले लक्षात ठेवतात आणि ते त्यांचे पुढील आयुष्यातल्या वागणुकीचे बिल्डिंग ब्लॉक्स बनतात. ह्या काळात अस्थिर कुटुंबातून वाढणारी मुले उदा. घटस्फोट, आईला मारहाण, सबस्टन्स अब्युज किंवा दुर्लक्ष झालेली मुले अकाली प्रौढ, वायलंट वा लो सेल्फ एस्टीम लो कॉन्फिडन्स अशी होतात आणि बहुतेकवेळा हे लाईफ डिफाईनिंग असते.

नवजात बालकांची मेंदूची ऊजवी बाजू डाव्या बाजूपेक्षा अतिशय अलर्ट आणि अ‍ॅक्टिव असते ज्यात सेकंदाला अगदी लाखाने न्यूरॉन्स बनत असतात. साध्या भाषेत मेंदूची ऊजवी बाजू मेमरीशी रिलेटेड असल्याने दिसलेले,ऐकलेले, हुंगलेले, स्पर्शिलेले आणि चाटलेले (सेन्सरी डेटा) प्रोसेस करून लक्षात ठेवणे एवढे एकच मोठे काम मेंदूला असते. ह्या दरम्यान मेंदूचा आवाका एवढा प्रचंड असतो की, १ वर्षात लिहिलेले साधे शब्द, वाक्ये वाचता येणे (हो बोलता येत नसले तरीही) ते पाच वर्षात अगदी शेक्सपिअर वाचण्यापर्यंत कुठलेही साधारण मूल प्रगती करू शकते. पाचव्या ईयत्तेपर्यंतचे अंकगणित पाचव्या वर्षापर्यंतच्या मुलांना सहज शिकता येते. वेगवेगळ्या ६ ते ८ भाषा तर मुले पहिल्या ४-५ वर्षात अगदी एक दोन आठवड्यात जुजबी शिकू शकतात.... ह्यातले एकही वाक्य अतिशयोक्ती नाही की मुले जन्मत:च प्रॉडिजी वा जिनिअस असण्याची गरज नाही. ऊजव्या मेंदूची ही अफाट ताकद साधारण ३-४ वर्षात पीकला पोचते आणि पुढे ६ व्या वर्षात फ्लॅटलाईन होते... जेव्हा आपण हे सगळे शिकण्यासाठी मुलांना शाळेत पाठवतो Happy असो तो वेगळा विषय आहे.

पण ऊजव्या मेंदूचे हे सारे काम रोजच्या जीवनात फार ऊपयोगी नाही, त्यासाठी ऊजव्या मेंदूने जमवलेली माहिती डाव्या मेंदूने अ‍ॅनालाईझ करत लॉजिकल निर्णय घेता येणे जरूरी आहे. पण ७-८ वर्षांच्या आतल्या मुलांचा डावा मेंदू त्यांच्या भवतालाचे हे चांगले ते वाईट, हे सुरक्षित ते धोकादायक, हा आपला तो परका असे वर्गीकरण करण्यासाठी अजून तयार होत असतो. तर ऊजवा भाग त्यांना त्यांचा भवताल अजुनाजून एक्स्लोर करण्यासाठी ऊद्यूक्त करत राहतो... मग ते किचन असो वा देवघर वा मोबाईल... जिथे ब्राईट, भडक, नादमय किंवा पॅटर्नवाल्या गोष्टी दिसतील तिथे कुतूहल जागृत होऊन मुले आकर्षित होतात. त्यामुळे ह्या वयाच्या मुलांच्या बाबतीत डावा-ऊजवा मेंदूचा बॅलन्स अजून पुरता डिवेलप न झाल्याने जास्त घरगुती अपघात संभवतात.
हळूहळू ह्या एक्स्प्लोरेशन दरम्यान अनुभवातून येणारे ज्ञान डाव्या बाजूच्या मेंदूला मिळून मुलांची स्वतःशी रिझनिंग करत भवतालातल्या ईतर व्यक्तींशी/गोष्टींशी डील करण्याची क्षमता आपसूक तयार होत राहते doing serves being.

तर ज्यांची स्वतःशी रिझनिंग करण्याची गोष्टीतला कार्यकारण भाव समजून घेण्याची क्षमता अजून पूर्ण डिवेलप झाली नाही त्यांना रागे भरून वा मार देऊन तात्पुरते गप्प करण्यापलिकडे फार काही साध्य होत नाही. मार पडल्याने कुतूहल शमणार नाही पण नकळत्या वयात ईतर न्यूनगंड तयार होऊ शकतात.

माउमैया - एक सुचवावेसे वाटते - शाळेत न जाण्यासाठी रोजच रडत असेल तर ते रडणे हे नुसते लक्षण तर नाही? त्याचा रूट कॉज काही गंभीर कारण तर नाही? हे शोधयाचा नक्की प्रयत्न करा.
एकदा तिचा बरा मूड असताना प्रेमाने विचारून पहा की का गं का आवडत नाही शाळा? किंवा वेगळ्या खेळकर अप्रोच घेऊन शाळेतले तुला काय आवडते? काय काय आवडत नाही? सांग बरं असे विचारा.
हेतू हा की शाळेत कुणी टीचर मारते / रागावते/ अपमान करते असे काही आहे का? कुणी मुले बुली वगैरे करतात असे तर नाही ना? कुणी काही इनाप्रोप्रिएट् बिहेव असे काही करत नाही ना ? हे माहित करून घेणे.

मी आणि मुलं मध्यंतरी काही घरगुती अडचणीच्या काळात रोज झोपण्याआधी ‘थ्री थिंग्ज’ सांगायचा ‘खेळ’ खेळत असू. म्हणजे दिवसभरात माझ्या बाबतीत घडलेल्या तीन चांगल्या घटना आणि तीन मी केलेल्या चांगल्या गोष्टी प्रत्येकाने शेअर करायच्या.
त्यात अगदी ‘कोणीतरी केलेल्या विनोदावरून मला खूप हसू आलं’ किंवा ‘मी आज एक बोरिंग कॉल सुरू असताना हळूच चॉकलेट खाल्लं,मग मला छान वाटलं’ असं काहीही असे.
हे वाचायला कदाचित पोरकट वाटेल, पण यामुळे मुलं ओपन अप होतात, आणि इन जनरल सगळ्यांच्याच तक्रारी कमी होतात.
खटकणाऱ्या बाबींवर फिक्सेट होणं हा मानवी स्वभाव आहे. तीच बाब आठवत राहाते आणि मग शाळेत/दिवसात/आयुष्यात आपल्याला नावडतं तेवढंच होतं असा ग्रह पक्का व्हायला लागतो.
त्या सवयीला यामुळे काटशह बसतो असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे.

दुसरं म्हणजे ‘सांग बरं आज शाळेत काय झालं’ असं विचारलं की मुलं हमखास ब्लॅन्क होतात. पण संभाषणाचा चॅनल ओपन ठेवला तर त्यांच्या वेळे/मूडनुसार सांगतात नक्की. तेव्हा पॉइंटेड प्रश्न विचारणं टाळावं. जेव्हा सांगतील तेव्हा मात्र पूर्ण शंभर टक्के लक्ष देऊन त्यात सहभागी व्हावं.

आम्हाला तो खेळ आता ठरवून खेळावा लागत नाही, शेअरिंगची सवय लागून गेली आहे.

बेस्ट आहे हे. शाळेच्या बस स्टॉप वरुन येताना आम्ही हे पूर्वी करायचो. परत चालू केलं पाहिजे.
वरची चर्चाही उत्तम आहे. अशी चर्चा सतत होत राहिली की डोक्यात रिएनफोर्स होत रहातं आणि ध्येय काय आणि आपण करतोय काय हे जाणवत रहातं.

छान चर्चा चालू आहे. कधीतरी फटके देणारी मी पण आता स्वतःवर कंट्रोल ठेवायला लागले आहे. चला आई पण शहाणि होतेय म्हणायला हरकत नाही Happy
इथली चर्चा वाचून खरच आपली मते आणि वागणे काही प्रसंगी चुकतेय हे लक्षात आले. सगळ्यांच्याच पोस्ट वाचनीय आहेत

Pages