मुलांचे न मारता संगोपन

Submitted by आस्वाद on 28 September, 2022 - 13:43

ऋन्मेषच्या धाग्यावर मुलांना मारावं की नाही, यावर खूप किस पडलाय. मारू की मारू नाही, हा प्रश्नच चुकीचा आहे. त्यामुळे चर्चापण वाहवत गेलीये. तुम्ही अमेरिकेत मुलांना दिवसभर डेकेयर मध्ये ठेवता, रात्री दुसऱ्या खोलीत झोपवता, तुम्ही कोण आम्हाला सांगणारे असा सूर निघाला. आम्ही एखादी चापटच तर मारतोय, कुठे रोज रोज बुकलून काढतोय, मारलं नाही तर धाक नाही राहत, कधी कधी तर मारावंच लागतं, हा युक्तिवाद बरेच लोक करतात. त्यावर मी प्रतिसाद लिहला पण तो फारच मोठा झाला. म्हणून हा नवीन धागा. यावर न मारता काय करता येईल, यावर चर्चा अपेक्षित आहे. मारावं की नाही, हा प्रश्नच नाहीये.
आता मी मुलांना मारू नये, या मताची आहे. मी qualified आहे का हे म्हणायला, हे खालचं वाचून तुम्हीच ठरवा:

मी आधीच सांगितलंय की माझी मुलगी एक्दम खतरों के खिलाडी होती, अजूनही आहे. पण ती रांगायला लागली तेव्हा आम्ही पूर्ण घराचं babyproofing केलं. यात काय काय येतं? किचन आणि जिन्याला सेफ्टी गेट्स, सगळ्या सॉकेट्सला कव्हर्स, प्रत्येक कपाटाला आणि फ्रिजला चाईल्ड लॉक. गॅसच्या नॉब्सला चाईल्ड locks. देवघर , टीव्ही, स्पीकर्स वर टांगलं. चपला- जोडे, कचरा सगळ्यांना चाईल्ड लॉक. चाकू, सूरी किंवा काहीही dangerous वस्तू (लायटर, हातोडी, cleaning supplies, detergents, औषधं इ) कधीच तिच्या हाताला लागणार नाही असं ठेवलेलं. बाहेर जाताना नेहमी तिचं बोट धरून ठेवलं. एक क्षण जरी हात सुटला तर ती पार्किंग लॉट मध्ये, रस्त्यावर सुसाट धावायची. कुठेही उंच ठिकाणी(बालकनी, terrace, हिल) तिला कायम कडेवर घेऊन असायचे. ते पण कडेपासून लांब, कारण ती कधी एक्दम झेप घेईल काही भरवसा नव्ह्ता. मॉल किंवा पब्लिक प्लेसेस मध्ये, गर्दीच्या ठिकाणी शक्य होईल तितकं स्ट्रॉलरमध्ये ठेवायचो.

ती ८-९ महिन्यांची असेपर्यंत आई-बाबा किंवा सासू-सासरे होते. पण तिला पाय फुटले तेव्हापासून मी, नवरा आणि पिल्लूच होतो. नवरा सकाळी ८ ला जायचा ते संध्याकाळी ६;३० ला यायचा. मी वर्क फ्रॉम होम करायचे. nanny ठेवून पहिली, पण काही जमलं नाही. मग मी आणि माझी पोरगी. मी माझा लॅपटॉप उंच टेबलवर ठेऊन दिवसभर उभ्याने काम करायचे. मध्ये मध्ये तिच्याशी खेळायचे. तिला पुस्तकं, चित्र काढायला द्यायचे. तिचं जेवण, दूध असं सगळं करायचे. तीचं जेवण झालं की मग १ नंतर मी फ्री व्हायचे. ती जेऊन मस्त ३ तास झोपायची. मग माझ्या पायांना जरा आराम मिळायचा. ती सव्वा वर्षाची झाल्यावर तिला जवळच्या एका daycare मध्ये आठवड्यातून २ दिवस पाठवायचो ३-४ तास. तिला खेळता यावं म्हणून. बाकी दिवसभर ती आणि मी. नवरा आल्यावर तिच्याशी खेळायचा, तिला बघायचा तेव्हड्या वेळात मी माझी अंघोळ, रात्रीचं जेवण असं सगळं करायचे. नंतर काही महिन्यांनी एक हेल्प मिळाली म्हणून माझं स्वयंपाक आणि घरातलं काम कमी झालं.

ती तीनची झाल्यावर डे केयर मध्ये ९-३ जायला लागली. २ वर्षं गेली आणि कोविडकाळ सुरु झाला. मग परत वर्षंभर घरी. आता तर ९-३ शाळेतच जाते.

माझी मुलगी (८ वर्ष) आजपण खूप मस्ती करते, रोज काही ना काही तोडफोड, सांड-लवंड करतच असते. आजपण आमच्याच जवळ झोपते. त्यामुळे झोपेत लाथा मारते. खूप प्रश्न विचारते. भंडावून सोडते. तरीही मुलीला मी मारत नाही.

time-out हा प्रकार काही आम्हाला जमला नाहीये. ती लहान असताना तिला एकदा time-out दिलं. भिंतीकडे तोंड करून बसून रहा, असं सांगितलं. तिला वाटलं हा काही नवीन खेळच आहे. ती खुदुखुदू हसायची. मग स्वतःच time-out करायची नाहीतर आम्हाला करायला लावायची. त्यामुळे हा शिक्षेचा प्रकार काही आम्हाला झेपला नाही.

बाकी मुलांना कोंडून ठेवणे, त्यांच्याशी खूप काळ अबोला धरणे हे मलाच अमानुष वाटत. असं कधी माझ्या आई बाबांनी पण नाही केलं.

ग्राउंड करीन तुला म्हणजे screen time बंद करीन अशी धमकी देऊन पहिली इतक्यातच तिला. त्याची जर्रा भीती आहे. कारण त्यात iPad, स्क्रीन time नाही मिळणार, हे जास्त क्लेशकारक आहे तिच्यासाठी.

बाकी कुठलीही गोष्ट लपून करायची नाही, हे तिच्यावर बिंबवलंय. मुळात कुठली गोष्ट का नाही करायची, हे मुलांना न समजावता नुसतं मारून काही उपयोग नाही. तू हे कर/नको करू नाहीतर मी मारीन, हे चुकीचं आहे.

कधी कधी खूप सांगून, समजावून पण नाही कळत आहे, असं वाटलं तर फारशी रिस्क नसेल तर तिला म्हणतो 'जा कर'. उदा. खूप चॉकलेट्स खाणं. खूप चोकोलेट्स, बिस्कीट खायचे असायचे तिला लहानपणी. ३ वर्षांची असताना. एकदा नवरा म्हणाला खा तुला पाहिजे तितके. ७-८ चोकोलेट्स खाल्ले तिनी. मग उलट्या झाल्या. तेव्हापासून तो हट्ट सोडून दिला तिनी. आजपण तिला १० चॉकलेट्स दिले कोणी तरीही ती १-२ च खाते. कुठलीच वस्तू कितीही आवडीची असली तरीही प्रमाणातच खाते. मी आता तिला सांगितलंय की काय किती खायचं, हे तू ठरव, तू मोठी झालीयेस.

काही गोष्टी आम्ही सोडून दिल्या. उदा. अगदी लहान असताना भिंतीवर रंगवायची. सोफा, टेबलवर खूप उड्या मारायची. आमच्या dining chairs अगदी खिळखिळ्या करून टाकल्या होत्या तिने. उड्या मारून मारून. घरभर पसारा असायचा तिच्या खेळण्यांचा. पण ते ३-४ वर्षंच होतं. ५ वर्षांची झाली आणि असं करणं बंद केलं तिने आपणहूनच. आम्ही पण सगळं furniture नवं घेतलं. पण त्या काळात आमच्या घरी येणाऱ्याला वाटत असेलच की काय घर आहे हे, कसं तुटकं सामान आहे यांचं. पण ठीके.

इतकं सगळं सांगण्याचा हेतू हा आहे की मारणं हा पर्यायच नाहीये, असं जर ठरवलं तर अमलात आणणं कठीण नाहीये. आम्ही काहीही हेल्प (स्वयंपाक, घरकामाची बाई, आया, घरातले मोठे इ) नसताना दोघंही full-time जॉब करत असताना न मारता एका चुलबूल पांडेला वाढवलंय तर ते अशक्य नाहीच्चे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>
शेवटी काय ठरलंय
मारायचं मुलांना का नाही?
>>>>
त्याची चर्चा या धाग्यावर इथे करायची नाही असं ठरलंय

सगळ्या लांब लांब पोस्टि वाचल्या नाहीत पण हा कल्चरल फरकाचा मुद्दा आहे.
एका विशिष्ट शांतीपूर्ण धर्मात बायकांना मारणं पण ओके आहे. त्याचं ते लोक समर्थन पण करतात - नवऱ्याचा हक्क असतो, तो काही उठसूठ मारत नाही, as a last resort- फार लागणार नाही अशा बेताने मारावं वगैरे.
आधी प्रेमाने समजावून सांगावं , मग शिक्षा म्हणून फिजिकल रिलेशनशिप बंद करावी. तरीही सुधारणा नसेल तर नाईलाजाने मारावं- असं मार्गदर्शन धर्मगुरुच करतात!
इथे मुलांना मारण्याबद्दल सेम सेम अर्ग्युमेंट आली आहेत याची फार गंमत वाटली. Happy

मजा नाही यार ईथल्या चर्चेत.
आधी मुलांना मार देणाऱ्या पालकांना गिल्टी फील द्यायचा प्रयत्न चालू होता.
त्यांनी आपली बाजू मांडल्यावर आता मारायचे समर्थन करत आहेत असा ओरडा चालू आहे.
जणू मुलांना मारणे हे फार असंस्कृत आणि निर्दयी असल्याचे लक्षण आहे. भले आपण तसेच थोडाबहुत मार खात लहानाचे मोठे का झालो असेना..

असो,
प्रत्येकाने आपापले प्रकार वापरा.
फक्त पोरांना शारीरीक ईजा होऊ नये यासोबत त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घ्या. आपल्या ईथल्या मतभेदांपेक्षा ते जास्त महत्वाचे आहे.

जग आपले निकष लाऊन तुम्हाला एक पालक म्हणून कसे जज करतेय यापेक्षा महत्वाचे आहे की तुमच्या मुलाची जडणघडण कशी होतेय आणि ते मोठे झाल्यावर त्याच्या मनात तुम्ही एक पालक म्हणून काय ईमेज राखता.

हेमाशेपो

धन्यवाद _/\_

हपा: पोस्ट्स छान. बरोबर आहे सगळ्यांना बाबीप्रूफिंग करणे जमणं शक्य नसतं. पण आजकाल भारतात पण हे सगळं मिळतं आणि फारसं महाग पण नाहीये, मी बहिणीला सांगितलं म्हणून तिने पण तिला बाळ झाल्यावर बऱ्यापैकी केलं (फ्रिजला, कपाटांना childlock, देवघर, टीव्ही भिंतीवर माऊंट करणे इ). आम्ही इतकं सगळं यासाठी केलं कारण आम्हाला माहित होतं की घरात मी आणि बाळच असणारे. मी कामात असले तर मी एकटी कुठे कुठे लक्ष ठेवणार? भारतात सगळ्याच मध्यमवर्गीय घरांत बाया असतात कामांना. आई-वडील दोघंही नोकरी करत असले की आया असते, शिवाय बऱ्याच घरांत आजी- आजोबा असतात. त्यामुळे इतकं burden येत नाही एकाच माणसावर.

बरे हा ऊपाय चॉकलेट खाण्याला वापरू शकतो, पण मुलगा लिफ्टकडे पळत असेल, हात सोडून रस्त्यावर पळत असेल, तर तिथे नाही म्हणू शकत की जा धडक गाडीला वा अडक एकदा लिफ्टमध्ये. म्हणजे फिटेल तुझी हौस. >> मी लिहिलंच आहे की 'जास्त रिस्क नसेल तर'

aashu: यावर काहीच बोलू इच्छित नाही.

रेव्यु: अनुत्तरित का?

अमितव, रानभुली, अवल, रेव्यु, फेरफटका, भरत, mandard, ॲमी: धन्यवाद. बरोबर आहे, सगळ्यांनाच 'मार सोलुशन नाहीये' हे नाही पटत. सोडून द्या झालं. माझ्या आणि माझ्या नवर्याच्या पॅरेंटिंग टेकनिक्स पण वेगळ्या आहेत. वरती सांगितलेला चोकोलेट्सचा किस्सा नवर्याचीच आयडिया होती. त्यावेळी त्याने मला स्पष्ट म्हटलं की "लेट मी हॅन्डल इट. काय होईल फार फार तर उलटी करेल नाहीतर पोट दुखेल. आणि खाऊन खाऊन किती खाईल ती ७-८ च्या वर तर नाहीच खाणार." त्याच्यावर विश्वास ठेऊन करू दिलं तिला आणि बिंगो! सो दोन पॅरेंट्सच इतका वेगळा विचार करतात तर इथे तर जगभरातील लोक आहेत.

maitreyee, स्नेहमयी: पोस्ट्स खूप आवडल्या. स्नेहमयी सगळ्याच मुद्द्यांना मम.

माऊमैया: तुम्ही आतापर्यंत तिचं असं वागणं चालवून घेतलं. मग आता तिला तशीच सवय झालीये ना. आणि मारून पण ती सुधारली तर नाहीच. रूट cause analysis करून पहा. सकाळी त्रास देते, मग तिची झोप पूर्ण होत नाहीये का? लवकर रात्रीचं आवरून तिला झोपवून पहा. फरक पडेल. भारतात काय झालंय आजकाल की आई वडिलांची ऑफिसचं काम संपवायची वेळच ७;३०-८ झालीये. मग ९-९;३० पर्यंत जेवण, मग टीव्ही नाहीतर अजून काही. झोपायला १२ वाजतातच आणि मुलांच्या शाळा मात्र आजपण सकाळच्या. मग त्यांची झोप होत नाही, दिवसभर किरकिर करतात. किमान ९-१० तास झोप हवी मुलांना.

आता मूळ मुद्दा. मुलांना का नाही मारायचं? कारण इट इस physical abuse. period.

बाकी time-out बद्दल माझं मत लिहिलंच आहे. मला काही ते झेपलं नाही. पण मुलीला शाळेत जर काही भांडणं केले की टीचर क्लासच्या बाहेर घेऊन जाते आणि दोघांचंही ऐकून घेते. मग दोघांनाही त्यांची त्यांची चूक समजावून सांगते. आणि मुलं ऐकतातच टीचरचं. आई-वडिलांपेक्षा जास्त इम्पॉर्टन्ट कोणी असेल मुलांच्या आयुष्यात तर ती टीचर असते. (४-५ वर्गापर्यंत तरी)

न चिडता, न रागावता शांतपणे आणि ठामपणे सतत प्रतिवाद करत राहिलं तर हेमाशेपो बघायचे दिवस इथे येऊ शकतात, मुलं तर अगदीच लहान आहेत! Happy

मैत्रेयीच्या पोस्ट्सना कानामात्रावेलांट्यांसकट अनुमोदन.

मी स्वतः लहानपणी मार खाल्ला आहे. मोठ्या मुलाला वेळप्रसंगी एखादी चापटी दिलेली आहे, धाकट्या मुलीला अजिबात नाही.
आम्हा तिघांच्यात मार खाल्लेली मीच बहुधा सर्वांत व्रात्य असेन. Proud

ऑन अ सीरियस नोट, हे सांगायचा उद्देश इतकाच की माझा वैयक्तिक प्रवास इथे चर्चेत आलेले सगळे टप्प्पे घेतच झालेला आहे.
आज मला मुलांना मारणं पूर्णपणे चुकीचं वाटतं, काही वर्षांमागे तसं वाटत नव्हतं हे खरं आहे. त्यामुळे मारणारे आणि न मारणारे असे दोन परस्परविरोधी गट आणि त्यापैकी मारणारे सगळे व्हिलन्स - असं काही चित्र माझ्या डोळ्यांपुढे नाही.

हा एक प्रवास - एक इव्होल्यूशन आहे. आपण सगळेच या वाटेवर काही पुढे, काही मागे चालत आहोत.
'न मारणं हा ऑप्शन असू शकतो' याची जाणीव होणं ही पहिली पायरी. कदाचित या चर्चेमुळे पुढच्या वेळी मुलावर हात उचलताना तुम्ही एखादा फ्रॅक्शन ऑफ सेकंद थबकाल. कदाचित फटका द्यालही, पण त्या बाबतीत थोडं अधिक 'माइंडफुल' व्हाल. जिंकलंच की!
मी मागेही म्हटलं होतं, अशा चर्चा वाचणार्‍या प्रत्येकाचं त्यातून सबकॉन्शस लर्निंग होत असतंच, अगदी 'ना ना करते'सुद्धा.

माऊमैया, लिहू की नको असा विचार करत होते, पण लिहितेच.
मी स्वतःची दोन मुलं वाढवण्यापलीकडे बालसंगोपन वा बालमानसशास्त्र या विषयांत माहीतगार नाही - हे आधीच मान्य.
पण
>>> यात पहिल्या दोन टप्प्यात, ती माझ्यावर आवाज चढवून किंचाळणे, विषय सोडून बडबडणे, दुसऱ्यांना ब्लेम करणे, मला बोलूनच न देणे, मलाच मारणे, लाथ मारणे हे प्रकार करते. या सगळ्यात साधारणपणे अर्धा तास जातो.
>>> आजी आजोबांचं न ऐकणं, त्यांना ओरडणं, मारणं,.... हे खूप जास्त त्रासदायक आहे
हे मला बिहेवियरल इश्यूज वाटत आहेत. तुम्ही तिच्या डॉक्टरशी याविषयी बोलला आहात का?

लोक्स,
इथे मुलांना "मारणे" याचा अर्थ इथली पब्लिक शब्दशः "काळेनिळे पडेपर्यन्त मारत असतील" असाच घेताय अस वाटतय.

>>इथे मुलांना "मारणे" याचा अर्थ इथली पब्लिक शब्दशः "काळेनिळे पडेपर्यन्त मारत असतील" असाच घेताय अस वाटतय. >> का असं वाटलं?

>>> इथे मुलांना "मारणे" याचा अर्थ इथली पब्लिक शब्दशः "काळेनिळे पडेपर्यन्त मारत असतील" असाच घेताय अस वाटतय.
१. असं का वाटलं?
२. कितपत मारलेलं चालेल याची सर्वमान्य मर्यादा कशी ठरवायची?

हे मला बिहेवियरल इश्यूज वाटत आहेत. तुम्ही तिच्या डॉक्टरशी याविषयी बोलला आहात का? >>>>>> स्वाती ताई, खरंतर हे मलाही बरेचदा वाटतं. मी माझ्या ओळखीच्या एक समुपदेशक मॅडमशी बोलले होते या विषयावर. म्हणजे एक सेशनच घेतलं होतं आमचं दोघांचं, पालकत्वावर. पण ते फोनवर झालं होतं. त्यांनी प्रत्यक्ष तिला पाहिलं नाहीये. त्यावेळेस जरा ते आमच्या बाजूने, आम्ही न मारता परिस्थिती कशी हाताळावी यावर झालं. तिच्यात तसा काही प्रॉब्लेम आहे का, हे विचारणं झालं नाही.
त्यानंतर मी आवर्जून प्रयत्न केला, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पाळण्याचा. आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, जरी मी पूर्णपणे यशस्वी झाले नाही तरी मी किमान अर्धा तास तरी देते प्रत्येक वेळेस. पण कधीतरी तेवढा वेळ हाताशी नसणे, आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींनी( यामध्ये घरातील नाही तर, शेजारी किंवा नातेवाईक; कारण आम्ही गावात राहतो) मध्येच माझ्या किंवा तिच्या बाजूने काहीतरी बोलून, तिला डिवचल्यासारखे केल्यामुळे ती अजून चिडणे आणि त्यांचे अनुभव, सल्ले यामुळे विषयांतर होणे ; यामुळे परिस्थिती अवघड होते.
अर्थातच, मी तिला मारणे किंवा ओरडणे या गोष्टी टाळण्यासाठीच प्रयत्न करतेय. (ती पाच वर्षांची होईपर्यंत मी फटके देत नव्हते तिला. ओरडायचे मात्र. ) वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे माझाही बदलाकडे प्रवास चालू आहे. पण पटकन एका दिवसात रुळ बदलणं शक्य नाही.
शिवाय हे फक्त माझ्या एकटीचं पालकत्व नाहीये, मी घरी नसताना सासू - सासरे तिला कशा प्रकारे सांभाळणार हे माझ्या हातात नाही. त्यांचं वय, त्यांच्या सहनशक्तीची मर्यादा, त्यांची शिस्तीची अपेक्षा यावर त्यांचं वागणं ठरतं. अर्थात तेही अगदीच वेळ आली तरच फटका देतात. पण ओरडा बऱ्याच गोष्टींवरुन मिळतो, ज्यातल्या काही गोष्टी माझ्यासाठी ओके असतात( जसं की कागद कापणे, मातीत खेळणे,पिठाचा गोळा घेऊन खेळ करणे). म्हणजे आमच्यातले हे पालकत्वाचे मतभेद हे तिला जाणवत असतीलच. एकतर ती गोंधळते, किंवा कोणत्या गोष्टीत कोण विरोधी पक्षात आहे, याचा विचार करून ती वागते, असं वाटतं. असो, आधी स्वतःचं वागणं बदलून मग हळूहळू त्यांना समजावणे, हा विचार डोक्यात आहे सध्या. पण रणभूमीवर असताना, मुलीची फार चूक नाही ,असं वाटतंय; पण तिच्यासमोर ज्येष्ठांना विरोध करणं म्हणजे तिच्या मनात त्यांची आदरयुक्त इमेज कशी राखणार हा प्रश्न उभा राहतो. जरी शांतपणे त्यांना सांगितले की, ठीक आहे, चालेल. तरीही त्यांचं मत चुकतंय, असा मेसेज जाऊ शकतो. ह्या आणीबाणीच्या परिस्थितीत काय करता येईल, हेदेखील कोणीतरी सुचवा.

वस्तू नाही दिली की झाले! ( तोच उद्देश आहे ना ?) मग शांतपणे तसे सांगायचे, का देत नाहीये तेही सांगायचे . मारायचे कशासाठी ? मारण्याने काय साध्य होते?
>>>खाऊचा हट्ट. जेवणाच्या वेळी खाऊ मागणे, आजारी असताना अपथ्यकर गोष्टी मागणे, >>>>>>>>> उद्देश काय आहे? अयोग्य वस्तू खायला न देणे . तो न त्या वस्तू दिल्यास साध्य होतो. का देत नाही तेही शांतपणे सांगता येते. इथेही मारण्याने काय साध्य होईल ?

मैत्रेयी, तुम्ही माझी पोस्ट नीट वाचली नाहीत का? फटका देणे ही शेवटची पायरी असते. आधी भरपूर वेळ देऊन शांतपणे समजावून सांगतेच की मी. पण मी काय बोलते, हे ऐकूनच घेतलं जात नाही. पण फटका मिळाला की, ती तिचे tantrums थांबवून माझं ऐकते. आम्ही बोलतो, चर्चा करतो. लिहिलंय हे सर्व सविस्तर त्या पोस्टमध्ये. मग फटक्याचा उपयोग काहीच होत नाही, हे कसं? असं वाटू शकतं ना.... पण हेही मला बदलायचंय, ते वर सांगितलंय मी.

अर्थात मी पर्सनली घेत नाहीये, पण दोन्ही धागे वाचताना जाणवलं की, न मारणारे पालक अशी समजूत करुन घेतात की मारणारे पालक तोच पहिला उपाय करतात. हे मला वाटतं, इथल्या बऱ्याच जणांच्या बाबतीत मारणं हा शेवटचा उपाय असंही असू शकेल. पण मारणं या शब्दावर फोकस केला की, इतर मुद्दे दुर्लक्षित होतात. जसं की माझ्या पोस्टमधले ठराविकच मुद्दे घेऊन तुम्ही प्रतिसाद दिलात. ( उदाहरण दिलंय, तुम्हीही पर्सनली घेऊ नका प्लीज )
मग काहीजण मारायची वेळ का आली, ते सांगू लागले की, ते माराचं समर्थन करतात, असे प्रतिसाद येतात. चिन्मयीच्या प्रतिसादानंतर, तर फक्त २ वर्षाची बाळंच मार खातात की काय असं वाटावं इतकी चर्चा झाली. अर्थात तिने फक्त चापट मारली की बाळ जोरात कळवळेल एवढ्या जोरात मारलं, हे कोणी विचारलं नाही. असं रोजच घडत होतं का हेही नाही. एकदा शिक्कामोर्तब झालं की झालं. माराचं समर्थन कोणी करत नाही. आपल्या बाळाला मारल्याचं वाईट वाटतंच. पण मग दुसरा उपाय काय याचा विचार केलेला नसतो बऱ्याचदा.

स्नेहमयीने म्हटल्याप्रमाणे, बरेचजण मार न देता काय करता येईल हे वाचण्यासाठीही या धाग्यावर येत असतील. मार चूक की बरोबर यापेक्षा आम्ही कुठल्या परिस्थितीत काय करून मार टाळला, हे सांगितलं तर त्याचा जास्त उपयोग होईल सर्वांना.

मी स्वतः प्रत्येक परिस्थितीत, शेवटचा उपाय करतेच असं नाही. माझ्याकडे पुरेसा वेळ असेल, तर हे नाही म्हणजे नाही यावर ठाम राहून तिच्या tantrums कडे दुर्लक्ष करते. खूप गोंधळ घालून ती शांत होतेही. पण त्यावेळी मी जे सांगितलं, ते तिने समजून घेतलं असेल की मी ऐकतच नाही म्हटल्यावर आता काही पर्याय नाही म्हणून ती गप्प बसते, हे कळत नाही.
कालच संध्याकाळी असा वेळ मी दिला तिला. मी तिचं ऐकत नसले की ती मला कपडे धरून खेचत राहते. त्यामुळे मी दुसरं काहीच काम करु शकत नाही. मग ती शांत झाल्यावर वेळेअभावी मी स्वयंपाक करू शकले नाही. कारण तिच्या शाळेच्या क्राफ्टच्या वस्तू करण्यात वेळ गेला. घरी इतर कोणीही नव्हतं त्या वेळात. नंतर माझा भाऊ येणार होता जेवायला. शेवटी मग आम्ही बाहेर जेवायला गेलो. अशी वेळेची आणि कामाची adjustment दर वेळेस शक्य नसते.

मी म्हणतेय म्हणून घरातील वेळापत्रक आणि कामाची विभागणी लगेच बदलू शकत नाही. हे सर्व बदलायला वेळ द्यावा लागेल आणि मला ठाम राहून इतरांना माझी मतं पटवून द्यावी लागतील, हे खरंय.

तर, असे बदल ज्यांनी घडवून आणलेत, त्यांनी याबद्दल मार्गदर्शन केलं तर ते या धाग्याच्या विषयाशी सुसंगत राहिल.

अमित,
स्वतःच्या क्रोधनियंत्रणासाठी मारणे चूकच आहे - सहमत!
त्या function at विरोधी निषेधार्थ पाठिंबा दिल्यामुळे विशेष आभार Happy

आस्वाद आणि इतरही ज्यांनी मला प्रतिसाद दिला आहे, त्यांचे आभार. काही मुद्दे पटले आणि काही अजून तरी नाही. पण वर काहींनी सुचवल्याप्रमाणे हा धागा मुलांना न मारता संगोपन कसे करता येईल याबद्दल असावा, त्यामुळे मी चूक की बरोबर ही चर्चा इथे माझ्यापुरती थांबवतो. अनेक उपयोगी सल्ले अनुभवी लोकांकडून मिळत आहेत, ते विचार करण्यायोग्य आहेत.

माऊमैय्या
तुम्ही मोकळे पणे लिहिताय म्हणून इथे माझं मत मांडायला धजावते आहे..
1) लेकीशी वागताना तिच्या वागण्यामुळे होणारे परिणाम तिला दिसू दिल्यास मदत होईल असं वाटतं - वर दिलेल्या स्वयंपाक करण्याच्या उदाहरणांमध्ये, मी तिच्या क्राफ्ट मध्ये वेळ घालवला नसता.... बघ तू टणटण करत राहिलीस आता आपल्याला क्राफ्ट करायला वेळ मिळणार नाही असं सांगून एखादा दिवस क्राफ्ट न करता शाळेत पाठवली असती- तुमच्या लिखाणावरून मुलगी अजून लहान आहे असं मला वाटतंय. अशावेळी तिचं क्राफ्ट / गृहपाठ एखादा दिवशी झाला नसेल तर शाळेत तिचा अपमान नक्की होईल पण शैक्षणिक नुकसान फार मोठे होणार नाही. मात्र मुलीला धडा नक्की मिळेल. अर्थात शाळेत टीचर ने आपल्याला बोल लावला तर त्याकडे दुर्लक्ष करायचा निगरगट्ट पणा अंगी बाणवावा लागतो (मुळातच मी तिच्या क्राफ्ट मध्ये किंवा शालेय अभ्यासात फारशी गुंतत नसे पण तो या धाग्याचा विषय नाही - तिचं काम तिने करायचं या वृत्तीचा तो भाग होता)

2- घरातले ज्येष्ठ नागरिक/ नवरा आणि मी यांच्यात मतांतर असल्याचा प्रकार आमच्या घरी ही होत असे. तो सांभाळताना तुम्ही म्हणताय ती काळजी मी पण घेतली- कुठच्याही मोठ्या व्यक्तीविषयी तिच्यासमोर अनादराचं वागणं होणार नाही याची काळजी घेतली, माझ्या मनात कितीही राग किंवा धुसफुस चालू असेल तरीही.... तुम्ही हेच करताय असं दिसतं - मात्र इतर कोणी सुरभिला ओरडत असेल, आणि तिची तितपत चूक नाही असं माझं मत असेल, तर त्या ओरडण्यात सुद्धा मी सहभागी होत नसे. त्यावेळेस माझा सहभाग केवळ लेकीला लवकर तिथून सोडवून आत नेणे एवढाच असे. या वागण्यावरून घरात माझ्या मागे चिडचिड भरपूर झालेली आहे... कधी कधी माझ्या मागे लेकीकडे माझ्याविषयी कुरकुर करण्याचे प्रकार सुद्धा झालेले आहेत - त्याच्याकडे मी संपूर्ण दुर्लक्ष करत असे. अगोदरच्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे मी आणि लेकीचा बराच खाजगी वेळ असेल याची मी काळजी घेत असे- या माझ्या वेळात आता आजी म्हातारी झाली आहे तिला काही काही बाबतीत वागण्याचं भान राहत नाही /पसारा सहन होत नाही- आपणच तिला सांभाळून घ्यायला हवं असं स्पष्ट सांगत असे. मात्र आजी माझ्याविषयी काय म्हणाली ग असं विचारून तिला आमच्या दोघींच्या मध्ये गॉसिप चा मार्ग करणे आवर्जून टाळलं
3- तुमचा तिच्याशी रेग्युलर संवाद असेल तर, ती तुमच्यापासून दूर होईल./ तुमचं तिचं नातं खराब होईल ही भीती मनातून काढून टाका... घरातले जेना किंवा इतरही कोणी कितीही प्रयत्न केले तरी आई ही आईच असते. लेकरू आणि तिच्यातलं नातं हे फक्त त्या दोघांच्या हातात असतं- इतरे जनतेनं प्रयत्न करूनही ते नातं कुणी खराब करू शकत नाहीत.

4- नातीने केलेला जो पसारा ज्याने आजीला त्रास होतो, त्यावरही वरच्या सारखा कार्यकारण भावाचा प्रयोग करून बघा... न चिडता शांतपणे " अगं किती हा पसारा... चल आवरूया असं तिला सांगून आवरायला बरोबर घेणे" आवरून झाल्यावर आवरण्याचं कौतुक करणे, मात्र अग बघ की हे आवरण्यात किती वेळ गेला आता आपल्याला xyz गंमत करायला वेळच उरला नाही ...
5- कपडे खेचणं /मारामारी करणं/ आताताईपणा करणे - यामध्ये सुरभि लहान असतानाचं मुख्य कारण म्हणजे म्हणजे तिला राग आवरता येत नसे - यासाठी मी आधी लिहिल्याप्रमाणे तिला राग व्यक्त करण्याचे फिजिकल पण सुरक्षित असे मार्ग शिकवावे लागले- एक ते दहा उड्या मारणे/ दहा दीर्घ श्वास माझ्याबरोबर घेणे/ खूपच राग आला असेल तर लोडाला किंवा उशीला बदडून काढणे. याचबरोबर अजून एक गोष्ट करावी लागली ती म्हणजे तिला आपल्या भावना शब्दात व्यक्त करायला शिकवणे- त्यासाठी त्या भावना मुळात ओळखायला शिकवावं लागलं तुला आता खूप राग आलाय कळतंय मला/ तुला खूप वाईट वाटतंय हे माझ्या लक्षात आलंय/ तुझा अपमान झाल्यासारखं तुला वाटतंय हे समजतंय ग मला अशा पद्धतीने तिच्या भावनांचा मी वर्णन केल्यामुळे तिला त्या वेगवेगळ्या भावना कळल्या शिवाय आईकडून व्हॅलिडेशन मिळाल्यामुळे तिच्या संतापाचा भर थोडा कमी होत असे .. मात्र हे करताना ती संपूर्ण मोठी आहे आणि मोठ्या माणसासारखा आपण तिला वागवतोय अशीच आपली बॉडी लँग्वेज असली पाहिजे आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये तिला लिंबू टिंबू समजलं जातंय असं दिसलं तर मुलांना हा खोटेपणा फार पटकन कळतो. आणि आपल्याला वाटतंय त्यापेक्षा बरंच जास्ती समजण्याची मुलांची ताकद असते. याच भावना ज्यावेळेला मला येतील त्यावेळेला आत्ता ना मला खूप आनंद झाला आहे /दुःख होतय /वाईट वाटतंय/ राग येतोय/ माझी चिडचिड होतेय अशा वेगवेगळ्या भावना शब्दात सुरभीला बोलून दाखवण्याचा सुद्धा उपयोग तिला स्वतःच्या भावना ओळखण्यासाठी होत असे

अर्थात या वेळेपर्यंत तुमचे लेकीचे आणि इतरजनांचे वागणुकीचे पॅटर्न्स बनलेले आहेत ते बदलताना थोडाफार त्रास होणार आहे हे गृहीत धरून चाला.... अशावेळी मुलं आणि घरातले ज्येष्ठ नागरिक दोघेही आपल्या पेशंनसचा संपूर्ण कस पाहत असतात.... तेव्हा एखाद्या वेळी तुमच्याकडून संयम सुटला तर फार स्वतःला दोष लावून घेऊ नका प्रत्येक दिवस हा नवा दिवस असं समजून पुढे चला..... कधी कंटाळा आला असेल कुरकुर करायची असेल तर विपू करा आपण बोलू.....

>>>>
मग फटक्याचा उपयोग काहीच होत नाही, हे कसं? असं वाटू शकतं ना...
>>
अशा वेळेला चालू असलेली घसरण थांबवण्याचा फटका मारणे हा शॉक व्हॅल्यू सारखा उपयोग तुम्हाला होतो आहे- मात्र अशा शॉक व्हॅल्यू असलेल्या गोष्टी वापरून आपल्या हातातली गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करणे योग्य आहे असा धडा मुलीला मिळत असेल का? म्हणूनच ती हातपाय आपटणे कपडे खेचणे चिडचिड करणे असे प्रकार जास्ती करू शकत असेल का अशी एक शक्यता माझ्या मनाला वाटून गेली

>>>>
ऐकतच नाही म्हटल्यावर आता काही पर्याय नाही म्हणून ती गप्प बसते, हे कळत नाही.
>>>>
सुरुवातीला मुलं पर्याय नाही म्हणूनच गप्प बसतात
मात्र त्यानंतर हळूहळू त्यांच्याशी आपण असं का वागतो/ आई असं का करते याविषयी बोलत राहावं लागतं

तू फक्त मला ओरडतेस आजीला बाबाला मैत्रिणीला काही म्हणत नाहीस असा एक सुरभिचा आक्षेप असे त्यावर तिला मी फक्त तुझी आई आहे तुला सांभाळून छान सवयी लावणं/तुला मस्त मोठं करणं ही आई म्हणून माझी जबाबदारी आहे इतर जणांना शिस्त लावणे ही माझी किंवा तुझी जबाबदारी नाही असं स्पष्टपणे सांगत असे.

दोन वर्षाच्या मुलासाठी टाईम आउट आणि मारण्यापेक्षा इतर चांगले उपाय वापरु शकता...
1. सकाळची कॉफी न देण्याची धमकी देणे.
2. छान वागला कि पैसे देणे..
3. कोक ऐवजी ग्रेप ज्यूस देऊन शिक्षा करणे.
4.पिझ्झा मागवून सर्वानी खाणे मात्र त्याला पिझ्झा न देता भेंडीची भाजी आणि चपाती देणे.
4. बोर्डिंग शाळेत टाकतो असे म्हणून घाबरवणे...

धागा वाचला.. माझाही प्रवास वेळप्रसंगी फटके देणे ते आता मार पूर्ण बंद असा झालाय.. मुलगी अगदी गुणी आहे असही नाही. बर्याचदा मला प्रचंड राग येतो तिच्या ऊचापतींचा. आणी ती आपण त्या गावचेच नाहीत या आविर्भावात असते. दोनेक वर्षापासून मी तिला अशी सिच्युएशन आली की आत्ता मला तुझ वागणं पटलेल नाहिये आणी राग आला आहे.
आपण आत्ता बोललो तर परत आपल भांडण होईल त्यापेक्षा मी तुला नंतर बोलावते. अस सांगते
पण नंतर काय झाल त्यात मला काय आवडल पटल नाही हे स्पष्टपणे सांगते. तिचही लाॅजिक ऐकून घेते. मधेमधे असही होत की परी बरोबर असते आणी मी चूक.
हा ऊपाय आमच्यापुरता ठीक सुरू आहे. We are still learning.
यात फक्त काही ग्राऊंड रूल्स आहेत की काहीही झाल तरी वस्तू फेकाफेक करायची नाही.
किंचाळून बोलायच नाही. रडू आल तर रड. नंतर शांत वाटल की पाणी पीत आणी मग बोलूयात

या धाग्यावर चांगली चर्चा चालू आहे. वाचतोय.

वर कोणीतरी लिहील्याप्रमाणे फटका मारणे कसे वाईट कसे चूक याच्यावर ऊहापोह होण्यापेक्षा आपण आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावताना काय क्लुप्त्या वापरतो हा लिहील्यास सर्वांना फायदा होईल.

मी सध्या वापरत असलेली युक्ती….
मुलांना आपण जे सांगतोय ते सांगताना आपण पाच स्टेज मधे सांगतो त्या स्टेजेस त्यांना व्यवस्थित माहीत असायला हव्यात.
1. एकच चूक परत परत करत असल्यास शांतपणे २-३ वेळा सांगणे.
2. तू हीच चूक परत परत करत आहेस, अमुक एक गोष्ट तू ऐकत नाहीस हे गंभीर टोनमधे सांगणे.
3. रागावणे
4. रुद्रावतार धारण करणे. यात मारायचे नाही पण जरब बसेल असा आवेश हवा.
प्रत्येक स्टेजला त्यांना हे सांगायचे की मी आता हे करत आहे आणि जर वागणं सुधारलं नाही तर पुढची पायरी काय आहे.

सध्यातरी याचा फायदा होत आहे. पालकत्व हा एक प्रवास आहे. आपण आपल्या चुकांचे निरिक्षण करत, कशाचा फायदा होत आहे कशाचा तोटा होत आहे, आपले मुल कोणत्या गोष्टींना कसे प्रतिसाद देत आहे याचे निरिक्षण करत, नवनवीन प्रयोग करत पुढे जावे लागते.

तुम्ही उल्लेख केलेल्या गो ष्टी आ म्हीही केल्या.
भिंत रण्गवली, एखादा प्रयोग केल्याने काही गडबड झाली, खे ळताना पसारा झाला - असल्या गो ष्टींनी आम्हाला फरक पडत ना ही. आमच्या कडे कुठल्याही वेळी या भरपूर जनता (शेजा रची पोरे, त्यांना सां भाळणार्‍या मावशा, नुसतीच पोरे हे सर्व आमच्या मुलांबरोबरच घरात धुडगुस घालत असतात). आम च्या घर च्यांच्या मते माझा पेशन्स अफाट आहे, मी बर्‍यापैकी गोष्टी सम जाऊन साण्गते, डिसिजन्स स्वतः घ्यायला प्रवृत्त करते वगैरे.
मात्र दोन मुलं मोठी करण आणि एक मोठ करण ह्यात खूप फरक असतो हे मी नम्र पणे नमुद करू इ च्छिते. नवरा बायको आणि मूल तिघच असतील आ णि आजी आजो बा + घ रातले जवळ चे नातेवाईक, इन्फोर्मल नाती असलेला शेजार, मित्रपरिवार, आणि २ मुलं असतील तर भर पूर फरक पडतो.
मध्ये अमे रिकेतला एक मित्र त्याच्या भावाच्या मुलांबद्दल बोलता ना पटकन म्हणाला, "अशी क शी झोपत नाहीत तुमची मुलं वे ळेत" तर आमच्या इथे ९:३० पर्यन्त जाग असते, आम्ही अनेक गोष्टी अण्डर कन्ट्रोल ठेवू शकत नाही. आणि त्याचे मुलांच्या वाढीसाठी अनेक फायदेही आ हेत तेव्हा आम्ही ते त्याच्या तोट्यांसकट स्विकारायला तयार आहोत.

दोन मुलं + बाकीची सगळी परिस्थिती असता ना, असे प्रसण्ग येतात. ९ व र्ष आणि तीन वर्ष ह्यांची मारामारी झाली आणि त्यात धाकटीच्या फिजिकल कपॅसिटीच्या पुढे जाऊन अ‍ॅक्शन हो ऊ शकत असेल, बेभान हो ऊन मारामारी चालली असेल, समजाऊन साण्गून फरक पडत नसेल, अशा वेळेस फटका पडतो.

हे एक उदाहरण झालं, प ण ट्रस्ट मी, मी एकूण हाताच्या बो टावर मोजण्याइतक्या वेळाच फटके दिले आहेत गेल्या १ वर्षात(९ वर्ष पालक आहे मी) - पण १००% न करण शक्य नाही. जेव्हा असे प्रसण्ग येऊ शकतात असे वाटते, तेव्हा सिच्युएशन डिफ्युज कर ण्याचा प्रयत्न करण्या बरोबरच मी मोठीला ही लेवल क्रॉस झाली तर फटका बसेल अशी वॉर्निग देते. (छोटी ३ असल्याने मारायचा प्रश्नच येत नाही.)

मी सेडिस्ट नाही - कु णालाही मारून म ला मजा वाटत नाही. माझा राग (मी शक्यतो पटकन चिडतनाही), पण चिडले तरी) मुलांवर काढत नाही.
दुसर्‍या माणसाच्या शरीरावर माझा हक्क नाही हे मला माहित आहे ( माझ्या मुलीण्चे कानही मी त्या म्हणाल्या तेव्हा टोचले) . पण अनेकदा मुलही आपल्याला राईडवर नेण्याचा प्रयत्न करतात.
आ पण आपल्या स्पाऊस ला मारत नाही, पण त्याला शू कर, खा, आवर, ऑफिसचे काम कर, बेसिक स्वच्छ्ता राख , स्वतःची ताटली उचल ह्या आणि अशा अने क गोष्टींकरता सतत मागे लागावे लागत नाही. आपल्यावर त्यांना वाढवण्याची,आयु ष्यात मीठ भाकरी तरी आपली आपण मिळवावी ह्याकरता आणि अशा अनेक गोष्टींकरता सक्षम करण्याचीही जबाबदारी नाही.
पालकांच म्हणाल तर त्यांच आयुष्य ते जगले आहेत - ते सेट आहेत.
पण मुलांपुढे भविष्य आहे आणि तिथे त्या ंना म्दत करावी , त्यांच्या पोटेण्शियल ला पोहो चेपर्यंत त्यांना जिथे ढकलाव लागेल तिथे ढकलाव हे प्रत्येक पालकाला नॅचरली वाटत.

((आपण आपल्या स्पाऊस ला मारत नाही, पण त्याला शू कर,... ...आणि अशा अने क गोष्टींकरता सतत मागे लागावे लागत नाही. .)))

हे प्रचंड आवडले आहे.... Proud

मीही ५ वर्षानंतर मुलीला फटके द्यायला सुरु केलेले; 4-५ वेळेला सांगून ऐकले नाही तेर फटका असेच hote.
पण नंतर जाणवले के frequency वाढत आहे. आता पर्यंत 5-७ वेळेला टोटल फटके मारले असतील (मी आणि नवऱ्याचे ईत्तरातीत); पण त्यातही 1-२ जोरात फटका मारला गेला हे नंतर जाणवलं आणि ठरवलं पूर्ण बंद हाच उपाय aahe.
आता ती ६ वर्षाची आहे; आणि काहीही झालं तरी फटका नाही हे मी ठरवलं आहे; आणि नवऱ्याला पण सांगितलं I will handle. जर आपला पाटीयन्स कमी पडतोय वाटलं तर मी baghin, पण फटका band.
एका सिरीयल मंध्ये अबुसीव्ह पॅरेण्ट ची मुलगी रडत सांगते; I made him mad; he loves me.
हे वाक्य माझ्झ्यासाठी eye ओपनर hot. भले मी सॉरी बोलेन; बाबा जवळ घेईल; पण कन्सेप्ट तीच. आणि ते डोक्यात राहणं मला चुकीचं watal.
सध्या आम्ही action and consequences मेथोड वापरात आहे; आणि काहीही झालं तरी फटका बंद आहे; I am sorry etc bolun zalaye.
ती अजिबात गुणी मुलगी नाहीये; पण हे जरा बर सुरूय.

इथे बरेच जण डीफेन्सिव होत आहेत . आम्ही मुद्दाम मारतो का, आम्ही "जास्त" मारत नाही, आधी रागावून नाही ऐकले तर मगच मारतो वगैरे
यातून मला तरी असे दिसतेय की मारणे हे योग्य नाही हे तुम्हाला मनातून माहित आहे /पटले आहे. आणि तरी मारणे हे घडते त्यामुळे जस्टिफाय केले जाते आहे.
उदा. ९ व र्ष आणि तीन वर्ष ह्यांची मारामारी झाली आणि त्यात धाकटीच्या फिजिकल कपॅसिटीच्या पुढे जाऊन अ‍ॅक्शन हो ऊ शकत असेल, बेभान हो ऊन मारामारी चालली असेल, समजाऊन साण्गून फरक पडत नसेल, अशा वेळेस फटका पडतो. >>>>> इथे विरोधाभास दिसतोय का तुमचा तुम्हाला? मोठ्या भावंडाला संदेश द्यायचाय की लहानाला मारू नकोस ती तुझ्यापेक्षा लहान आहे आणि तो संदेश देण्यासाठी तुम्ही, एक अ‍ॅडल्ट त्या ९ वर्षाच्या मुलीला मारणार ? Uhoh
मुळात फटके देणे का जरुरी वाटते इथे? मुख्य उद्देश जर दोघींची मारामारी सोडवणे हा असेल तर आपण पण मारणे (चक्क त्या फिजिकल आल्टर्केशन मधे स्वतः भाग घेणे) हे सोल्यूशन कसे ? लहानाला प्रोटेक्ट करणे हा मुख्य उद्देश असेल तर तिला बाजूला करणे पुरेसे नाही का?

आ पण आपल्या स्पाऊस ला मारत नाही, पण त्याला शू कर, खा, आवर, ऑफिसचे काम कर, ह्या आणि अशा अने क गोष्टींकरता सतत मागे लागावे लागत नाही >>> हे उदाहरण कंपेरेबल नाही Happy अ‍ॅडल्ट ला सू कराण्यासाठी कशाला मागे लागावे लागेल Happy पण अ‍ॅडल्ट ना इतर गोष्टीसाठी मागे लागावे लागते. किंवा मतभेद होतातच. मग तेव्हा माराणे योग्य असेल का या लॉजिक ने?

चांगली चर्चा सुरू आहे.
स्नेहमयी, तुमच्या पोस्ट्स आवडल्या.
माऊमैया, इथल्या सुचवण्यांनी नाराज न झाल्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे. घरातल्या इतर नातेसंबंधांच्या मुलांवर होणार्‍या बर्‍यावाईट परिणामांचा अनुभव मलाही आहे, तुमची कुचंबणा समजू शकते.
आस्वाद (रूट कॉज अनालिसिसबद्दल) आणि स्नेहमयी यांच्या त्यासंदर्भातल्या पोस्टला अनुमोदन.
अशा परिस्थितीत नाइलाजाने प्राधान्यक्रम ठरवावे लागतात/वाईटपणा घ्यावा लागतो. सगळ्यांनाच एकाच वेळी खूश ठेवणं शक्य नसतं आणि योग्यही नसतं.

आमच्याकडे फिजिकल स्ट्र्रेंथ कमी असुनही लहान मारामारी चालू करतो. मग 'टू राँग डझंट मेक वन राईट' अशी गीता वाचत मी युद्धापासून परावृत्त करायला रथात आपलं हाय चेअरवर म्हणजे ऑफिस मधुनच ओरडत मिटिंग अटेंड करत 'न धरी शस्त्र करी' करत बसतो. पण ऐकतय कोण! आमच्याकडे अर्जुन नाही निपजले शस्त्र गाळून बसायला. कोण कोणाला बाजुला काढणार!
आधी बारक्याचा राग, मग मोठ्याचा आणि मग माझा आणि मग अग्निअस्त्र! तरी सगळ्यांनी एकत्र जिवंत रहायचं इतकं मिनिमम ध्येय आहे माझं. त्यामुळे फार मारामारी सोडवायला जात पण नाही. दोन तीन चार वर्षांच्या गॅप मध्ये एका लिंगाची मुलं डोक्याला ताप असतो याबद्दल काही दुमतच नाही. बरं कालचं भांडणं का होतं? तर याने त्याला दिलेलं पोकिमॉन कार्ड त्याने शाळेत आणखी एका बरोबर ट्रेड केलं. म्हटलं 'अरे ते तू त्याला दिलं होतंस ना?' ... पण माझे संयमाचे बोल हवेत विरुन गेले.
अपडेटः आज सकाळी शाळेत जातानाचं भांडण. अ‍ॅमेझॉनच्या पॅकिंगला हवा भरुन आलेल्या पिशव्या तू जास्त का फोडल्यास यावरुन.

>>> आ पण आपल्या स्पाऊस ला मारत नाही, पण त्याला शू कर, खा, आवर, ऑफिसचे काम कर, बेसिक स्वच्छ्ता राख , स्वतःची ताटली उचल ह्या आणि अशा अने क गोष्टींकरता सतत मागे लागावे लागत नाही.
हे बहुधा गमतीने लिहिलं असावं, पण स्पाउजला मारणारे लोक जगात तुम्हाला वाटतात तितके दुर्मिळ नाहीत. त्यांनाही त्यांचं मारणं जस्टिफायेबलच वाटत असतं.

Pages