जबाबदारी

Submitted by पाचपाटील on 11 September, 2022 - 14:38

मघाशी बसल्या बसल्या जरा मूड झाला की बाबा आज
जरा पावसाचं गाणं ऐकायला पायजे.. म्हणून मग मी
लगेच बटण दाबून सगळं आभाळ एक केलं..!
मध्ये कुठंच एकबी फट शिल्लक ठेवली नाय..! मग
सगळी पाखरं बिखरं घरट्याकडं गेलेली बघितली..!
आणि सगळं मनासारखं वातावरण
झाल्यावर मग एक भिवई उचलून पावसाला इशारा केला..! त्यानं बरोब्बर लय पकडली..!

आमचं दोघांचं अंडरस्टॅंडींग तसं चांगलंय..! पण आता ह्या
पावसाचं वय जरा जाणवायला लागलंय..! मध्येच बंद पडतं ते.. मग पुन्हा डवचून चालू करावं लागतं त्याला..!
आणि एकदा चालू झालं की पुना बंद पडायचं विसरतं..! मग पुना येकदा डवचावं लागतं..! पण असो. अशा गोष्टींन्ला काय इलाज नसतो...! वयानुसार आता हे असं चालायचंच..!

बाकी ह्याच्यावरनं मी एक महत्त्वाचा माणूस असल्याचं
तुमच्या लक्षात आलंच आसेल.. नसलं आलं तरी काय
हरकत नाय. मी सांगतो. तुम्हाला म्हणून सांगतो.
त्याचं असंय की, ही सगळी पंचमहाभूतं वगैरे मी माझ्या
डाव्या हाताच्या बोटांवर खेळवतो.. उजवा हात मोकळा
लागतो.. टिचकीनं सिग्रेटची ॲश उडवायला बरं पडतं अधनंमधनं.

तर असा मी एक जिंदाबाद प्रवृत्तीचा मानूस असल्यामुळे
लोकांच्याही माझ्याकडनं खूप अपेक्षा असतात.. मलाही
काही त्याचं ओझं वाटत नाही.. सवय झालीय आता.
तुम्हालाही काही पायजे असेल तर सांगा..!
चांदणीरात, सूर्यग्रहण, सौरवादळं, कृष्णविवरं, बर्फाळ
शिखरं, उल्कांच्या चमचमत्या माळा, तुटक्या ताऱ्याचं तेज ??
यू ओन्ली नेम इट ॲन्ड यू विल हॅव इट..! जो जे वांछिल तो ते लाहो..! काय पायजे ते सांगा..! आपलंच है सगळं..!

आणि योगायोगानं आज मी इथं आहेच, तर भरभरून लाभ घ्या माझा..! उद्या कुणी बघितलाय? उद्याचं काही सांगता येत नाय..! कारण मी म्हणजे वेळेनं बांधला गेलेला मानूस आहे..! त्यामुळं माझा काय फिक्स ठावठिकाणा नसतो..!
कामानिमित्त सगळीकडं फिरावं लागतं..! सगळं व्यवस्थित चाललंय का नाय ते बगावं लागतं..!
आज ही आकाशगंगा..! उद्या ती सौरमाला..! परवा एखाद्या धूमकेतूचा काही मॅटर बिटर झाला तर, त्याचं शेपूट खेचून लायनीवर आणावं लागतं त्याला..! येकाद्या ताऱ्याचा प्रकाश जास्त झाला, तर मला तो माझ्या छातीत भरून इतरत्र
परावर्तित करावा लागतो..! बॅलन्स करावं लागतं..! जबाबदाऱ्या असतात..! मकसद असतेत..! करत राह्याचं..! आपापल्या परीनं एकेक मार्गी लावत राह्याचं न् काय?? बिकॉज धिस ईज द लाईफ, यू नो..!

नाय नाय..! आता पैशे बिशे काय मागू नका..! प्लीजss..!
इथं काय चेष्टा चाल्लीय की काय?? असल्या चिल्लर
गोष्टींसाठी माझ्याकडं नका येत जाऊ बरं..! आणि आता उगा टाईम खाऊ नका आणि गयावया तर बिलकुलच करू नका..! तुमची सगळी थेरं पाठ झालीयत..! कंटाळा कंटाळा आलाय मला अगदी..! नक्को नक्को झालंय आता सगळं..!!
म्हणजे आज समजा मी थोडे पैशे काढून दिले तर त्यात तुमचं भागणार नाईच..! मग पुन्हा तुम्ही अजून पैशे मागणार..!
आज समजा घर दिलं तर पुन्हा राजवाडा मागणार...!
राजवाडा दिला तर पुन्हा तो सी फेसिंग नाय म्हणून बोंबट्या मारत फिरणार..!
सी फेसिंग दिलं तर पुन्हा अरबी समुद्रातलं येकादं बेट
मालकीचं पायजे म्हणून किरकिरत बसणार..!
आता समजा गाडी दिली की पुढं जग्वारच पायजे न् हेलिकॉप्टरच पायजे न् जहाजच पायजे...! ह्याला काय शेवट
है का नाय..!अशानं कुबेराला बी भिकेला लावचाल तुमी..!

त्यापेक्षा कायतरी भरीव मागा..! कायतरी ठोस, टिकाऊ मागा..!
अचूक उपयोग करून घ्या माझा..! एवढी गंगा दारात आलीय तुमच्या आणि तुम्ही टमरेल भरून मागता..!! काय हे ??
तुम्हाला काही शरम वगैरे..??

अहो, काही आत्मज्ञान वगैरे मागून घ्या..!
परमसत्य हे तुकड्या तुकड्यांनी प्रकट होतं की येकदमच बदाबदा अंगावर कोसळतं, हे जाणून घ्या..!
किंवा समजा थेट मोक्ष बिक्ष पायजे आसेल तर सांगा सरळ..! मी त्यातला एक्सपर्ट मानूस है..! तुम्ही म्हणाल तर लगेच
तुमचा आत्मा ढिला करतो आणि हातावर ठेवतो.. ! कळणार पण नाय..! दोन मिनिटांत विषय क्लोज..! सगळ्या जन्म
मरणाच्या चक्रातनं कायमचा पोबारा..! काय टेन्शनच नाय..! बोला पायजे का ? पटकन बोला ओss..!
"विचार करून सांगतो" वगैरे बंडल हाणू नका माझ्यापुढं..!

(नायतर मग तसा मी लय डेंजर मानूस है..! कोसला मधी
त्या पांडुरंग सांगवीकरानं रमीला चटका दिलता, तसा चटका दील..! आता त्यांचं त्यांचं समजा कायतरी भांडान आसंल..! समजा कायतरी प्रेमाचं भांडान आसंल..!! आपल्याला त्यातलं काय कळत नाय..! आणि आपल्याला तसलं काय चालत बी नाय..! आपन त्याबाबतीत कठोर बैरागी मानूस..!
हरफनमौला वुईथ तांबारलेले डोळे इत्यादी..! किंवा समजा एकदम सख्त बंदा वगैरे..! जळकं लाकूडच असतं हाताशी..! हे एक आपलं सहज सांगितलं..!)

तर बघा मग तुमचं काय वगैरे..! सांगा नंतर..! औ?
मला जरा जायाला लागंल आता अर्जंट..! मागं त्या प्लुटो ला बाहेर काढलं नवग्रहामधनं.. तवापासनं ते बिचारं सारखं फोन करतंय.. त्येचीच मिटींग लावलीय उद्याला..
मलाच जायाला लागत असतं तिकडं..! स्वतः जातीनं बसूनच करून घ्यायला लागंल ते..! सगळ्यांनीच जबाबदारी
झटकली तर कसं चालनार ना?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय.

बारामतीकरांच्या ठाशीव टोनमध्ये वाचले.......प्रतिसाद आधी वाचल्याने अक्षरशः,त्याच टोन मध्ये वाचले.