#अनुषंग #मिनिमॅलिझम #नावड #स्वैपाकआणिबरंचकाही

Submitted by सई. on 9 September, 2022 - 14:43

Cooking for 2 hours just to eat for 10 min is the biggest scam in the world.
स्वैपाकाची आत्यंतिक नावड असणाऱ्या माझ्यासारख्याच कुणाचा तरी मनस्ताप असणार हा. वाचून अगदी सहानुभूती मिळाल्यासारखं वाटलं.

केव्हा तरी पडवीओसरीअंगणासकट स्वतःसाठी बारक्या दोन खोल्या बांधेन असं घोकत आलेय, ज्यात स्वैपाकघराला मात्र जागा असणार नाही. मागच्या ओटीवर उगीच पॅंट्रीसदृश एक ओटा आणि गॅसस्टोव्ह. एक तवा, उलथणं, चिमटा, एखादं बुरकुलं, झाकणी, उंच तटबंदीचा आटोपशीर थाळा आणि तुपाचं तांबलं. चिमटा. तांब्या आणि फुलपात्र. थाळ्यातच भाकरी थापून तव्यावरून काढली की त्यावरच अर्धीमुर्धी भाजी परतून शेजारच्या बर्नरवर आटवल रटरटवलं की झालं काम. एवढं होईतोवर थाळा धुऊन झालेला असेलच. हल्ली चटण्या लोणची मेतकुटं उत्तम पॅकींगमध्ये येतात. उघडून संपेपर्यंत त्यातच वापरलं की भरण्या, डबेडुबे नकोत. चहा पीत नाही, त्यामुळे तोही विषय आपोआपच रद्द होईल. दुधादह्याला बुरकुलं, फुलपात्र धावेल. आणखी काय लागतं एका माणसाला? हे एवढं माझ्याच्यानं जमेतोवर बाजारात (यंत्रमानवांनी) चावलेला घासही मिळायला लागलेला असेल. ते बेलाशक आणीन आणि वाटल्यास समर्थ कसे दहावेळा धुऊन अन्नप्राशन करत, तसं खळखळून धुऊन खाईन. रहाता राहिला अभ्यागतांचा पाहुणचार. येताना खाऊन पिऊन या अशी आधीच कल्पना देईन. अहो तोवर जजमेंट्स आणि शेरेबाजीच्या सातासमुद्रापार पोचणार मी, मग कुणाला काय वाटेल ह्याशी मज काही देणेघेणे उरेल म्हणता? त्यातून जे येतील ते निव्वळ मला भेटायला, माझ्याशी आंतरिक सख्य असणारे. म्हणजे मुळातच गाळण्यांमधून पोचलेले. आम्ही सगळेच आनंदानं मिळून करून खाऊ परतलेली भाकरी आणि भाजी. कधी थालिपीठ अन् केव्हा धिरडीघावनं. हाकेच्या अंतरावर एखादी ताई/दादा बघेन, जो येणाऱ्यांना चहा नाश्ता खाऊ घालील. झालं की, अरे हाय काय नाय काय.

'अंतरा'मध्ये असताना पशुपालकांबरोबर खूप संपर्क आला. तेव्हा धनगर आणि मेंढपाळांची जीवनशैली जवळून बघितली. आर्थिक सुबत्ता असलेल्या कुटुंबांचे पसारे दोन किंवा तीन बोजांचे जेमतेम. मोठाल्या खोल्यांमध्ये टांगलेल्या दांड्यांवर टाकलेली दोन लुगडी पोलकी, दोन दोन सदरे, बंड्या, धोतरं किंवा पायजमे. बाकी घोंगडी पसरलेली ऐसपैस रिकामी घरं. स्वैपाकघर नाही. पंजाबात असते तशा पद्धतीनं उघड्यावर शिजवणं. घराबाहेर अर्धगोलाकार पाव उंचीची भिंत आणि त्यावर सपरी. भिंतीच्या आत चूल. त्यावर तवा. भोवतीनं मांडलेला काथवट, पीठमीठतेलतिखटचहासाखरेचे थोडके डबेडुबे वगैरे सरंजाम. एका हाताला सरपणगोवऱ्या. वाऱ्याला बसून स्वैपाक. दोन किंवा तीन पदार्थ. उगीच लांबड नाही. होत आलं की तिथंच भोवतीनं सगळेजण थाळे, तांब्ये घेऊन ताजं, पहिल्या वाफेचं रपाटून पोटभर जेवणार आणि हातासरशी थाळे धुऊन आणणार. रांधणारीही बरोबरीनं गरम जेऊन चुलीभोवतीचं आवरून, तवा काथवट धुऊन रिकामी. नो उराउर, नो झाकपाक, नो शिळवड. अर्थात हे पक्क्या घरातल्या मुक्कामाचं. स्थलांतरं चालू असताना ह्याहीपेक्षा थोडक्यातला कारभार. शिवाय पिढ्यान् पिढ्यांचं दीक्षित डाएट. मधल्या वेळची खाणी अन् नाश्त्यांचे वाढाचार नसतातच. जोडीला सणकून डीथ्री, बिनतापवलेल्या दुधाबरोबर बी१२, बाकी प्रोटीन्सकॅल्शिअम्स वगैरे तर मुबलक. व्यायाम वेगळे करावे लागत नाहीत, रोजचं चालणं, शेरडामेंढरांची उसाभरच केवढीतरी. ह्या मिनिमल जगण्याची भुरळ मनावर कायमची पडली आहे.

खरेदीची फार असोशी मला कधी नव्हती. चार चार वर्षं कपडे घेत नाही, घेतलेले दहा दहा वर्षं वापरते. बरेचसे कपडे रिसायकल्ड असतात, बहिण-काकु सारख्या मापाच्या असण्याचे फायदे. क्वचित एखाददुसरा अपवाद वगळता घरातलं बहुतांश साहित्य कुटुंबातल्याच कुणा ना कुणाकडून विकत घेतलेलं आहे. पूर्वी समारंभात उलट आहेर म्हणून मिळायची तसली कशाचा कशात पायपोस नसलेली आणि साठलेली पोतंभर भांडी होती, बाबांनी तेच पोतं लग्नात मला पास केलं. त्यात उत्तम भागलं, अजूनही भागतंय. उगीच किरकोळ काही कधी आणलं असेल. सहा महिन्यांतून एकदा मारे यादी साठवून तुळशीबागेत जाणे आणि कशाला हवंय हे ते, असं करत नुसतंच भटकून रिकाम्या हाती घरी परतणे हा जवळजवळ रिवाज झालाय. पूर्वी पुस्तकं घेतली जायची, गेली चार पाच वर्षे तेही जवळपास बंद आहे. आणि असं असूनही घरातलं सामान बघितलं तर डोकं गरगरेल. उद्या आपण खपल्यावर मागच्यांना भरपूर डोकेदुखी ठेवून जाणार हे धडधडीत दिसतंय. संग्रह वाईट असं नुसतं म्हणायचं, पण आता आरामशीर जगायचं मुरलेलं अंगवळण अनडू कसं करावं ह्या विचारानं जीवाचा कायमचा अभिमन्यू झालाय.

गाडं गडगडत कुठवर पोचलं पहा. विचारांचेही पसारे आवरेनात, तिथं बाकी उजेड केव्हा पडायचा! भरल्या पोटाच्या गमजा सगळ्या. जेव्हा जे व्हायचं तेव्हा होवो खरं, आजच्यापुरती मनापासून एक दुवा देता दिली, एवढं पुष्कळ आहे.
- सई.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
Cooking for 2 hours just to eat for 10 min is the biggest scam in the world. >>> हे अगदी खरंय. स्वैपाकाच्या नावडीबद्दल मम.

पसारा, मिनिमलिझम वगैरे अगदीच रिलेट झालं. वस्तूंचा सोस काही संपत नाही हे आतापावेतो लक्षात आलंय. कधी जमणारे तो मिनिमलिझम ते देवच जाणे!

आवडलं. चांगलं लिहिता तुम्ही.
बाकी, 'लिहिण्याच्या बाबतीत' मिनिमॅलिझमचा (किमानवादाचा) मोह टाळून मटेरिॲलिस्टीक झालात अधूनमधून, तर वाचकांच्या दृष्टीने बरं होईल. Happy
आणि तसं तुम्हाला होता यावं, या शुभेच्छा.

खूप छान लिहिलंय...
Happy

इल्लूसा हा देह|
किती खोल मोह |

हे बऱ्याचदा जाणवतं... कळतं पण वळत नाही... Sad

खूप दिवसांनी तुमचं लिखाण वाचायला मिळालं इथे. त्यामुळे आधी प्रोफाईल बघून नक्की पाहिलं की हीच "सई" आहे ना ते.
पहिलं अवतरण अगदी आवडलं. मराठी अवतारात माझी आई हे नेहमी म्हणत असते. विशेषतः समारंभाचे वाढाचार करताना. हा शब्दप्रयोग आवडलाय. वेडाचार ला जवळचा वाटतो :डोमा:.
( सई, मिनिमलिस्टिक चा असा विचारपूर्वक प्रयत्न करणारे काही वेळा इतरांना कंजूष वाटतात.माझी आई मिनिमलिस्टिक ची अनेक वर्षे अनुयायी आहे. किमान काही बाबतींत यशस्वीदेखील झालीये)

काय लिहू..स्वयंपाकाची प्रचंड आवड आणि अगदी 4 - 5 वस्तू असल्या तरी काहीतरी मस्त बनवायचं(च) Proud

Cooking for 2 hours just to eat for 10 min is the biggest scam in the world>> ह्याला / हिला आधी कोणीतरी चांगलं चुंगल खायला घाला प्लिज Proud

माझं पण लंपन सारखं मत... 2 तास स्वयंपाक म्हणजे माझ्यासाठी छान मेडिटेशन किंवा एखादा गायक एखादा राग आरामात तासनतास आळवत बसतो तसं काहीतरी.
साधी मुगाची खिचडी केली तरी सोबत कढी, पापड,लोणचं सगळं साग्रसंगीत हवंच.. खाणं हा सोहळा व्हायला हवा.
आणि आमच्यासाठी तो 10 मिनिटात होणं शक्य नाही Happy

तरीपण तुझं लिखाण खूप आवडलं, त्या तव्यावरची भाकरी आणि चरचरीत भाजी सुद्धा चालेलच कधीतरी बदल म्हणून Happy

काय मस्त लिहीलंय.

मला दोन स्वैपाकघरं आवडतील. एक भरलेलं आणि एक अंगणातलं.

बाकी कपडेफिपडे बाबतीत जमतंय आपलं.

मस्तच लिहिलंय!
लंपन आणि स्मिता, तुमचंपण बरोबरच आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना..

छानच लिहिले आहे. पसारा कमी करत नेण्याबाबत सहमत. पण तेच, ...... वळत नाही Happy

तुमचा 'वाढाचार' आणि पाचपाटील यांचा मिनिमॅलिझमला 'किमानवाद' हे दोन्ही शब्द बेफाम आवडले आहेत !

लेख आवडला.स्वयंपाकाची नावड एकदमच पटली.बाकी थोडीफार मिनिमलिस्टिक आहे.लेखात म्हटल्याप्रमाणे यादी करून वस्तू खरेदीला जावे आणि मग कशाला लागणार आहेत ह्या वस्तू /मागच्यांना आवरायला त्रास म्हणून परत रिकाम्या हाती येते.

यावरुन आठवले. मुलाची ६-७ तास शाळा सुरु झाल्यवर एका शनिवारी मनात म्हटलं चला आज आपला स्वतःचा दिवस पुस्तक वाचूया, घरातला निवांतपणा अनुभवूया.भाजी चपाती आधी तयार होती.मग नवर्‍याने सांगितले आज तो ऑफिसाला जाणार नाही.काय खर्रकन चेहरा उतरला होता.परत भात आमटी करणे प्राप्त झाले.नको नको तो संसार असे झालेले.
प्रतिसाद अगदीच अवांतर आहे,पण तुझा लेख वाचल्यावर हीच आठवण झाली.

सगळ्यांचे मनापासून आभार! मस्त वाटतंय, खूप दिवसांनी काहीतरी खरड शेअर केली इकडे.
मिलिंद, मी मजेत, तुझा कुठे आहे पत्ता? सब खैरियत?
रुपा, मेधावि, वावे, अश्विनी, धनवन्ती, स्वान्तसुखाय, सर्वांना धन्यवाद.

प्राचीन, मीच ती Happy पाचपाटील, शुभेच्छा मस्त, प्रयत्न करते.
उपाशी बोका, म्हटलं तर सगळंच एकमेकांत गुंतलेलंय, नाही तर कशाचाच कशाशी संबंध नाही.
लंपन, खाण्याची आणि स्वैपाकाची, दोन वेगळ्या आवडी आहेत Happy स्मिता, अगदीच सहमत.

देवकी, आमटी भात नसता तर चाललं नसतं? ते दोघेही घरी असताना निवांतपणा हवा होत नाही? फार खोलात शिरणं योग्य नाही, पण न लिहिलेले बरेच प्रश्न पडले.

आमटी भात नसता तर चाललं नसतं? ......नवरा नको म्हणाला होता.प्रश्न तेवढाच नसून माझ्या स्पेसचा होता.मी लिहिताना कमी पडले.

सई ते लक्षात आलं. पण म्हणजे कोणी चांगलं चुंगल खात असेल तर तो भांडवलवादी झाला का? असेल तर कसा? निगुतीने करणाऱ्याला आणि आवड असणार्याला भांडी पण नकोत आणि जास्त फॅन्सी जिन्नस पण नकोत, आवड महत्त्वाची. ती नाही हे समजूच शकतो, पण त्याचा आणि भौतिकवादाचा सम्बम्ध कसा ते लेखावरून लक्षात नाही आले.

डिस्क्लेमरः एक ही वाक्य व मुद्दा कोणा लाही अपमानित करण्याच्या उद्देशाने लिहिलेला नाही. चर्चा व्हावी इतकेच. काही ऑफेन्सिव असल्यास सांगा प्रतिसाद एडिट करेन.
=============================================================

Cooking for 2 hours just to eat for 10 min is the biggest scam in the world.>> पूर्ण पणे असहमत. कधी बिर्याणी बनवली आहे का. सर्व मेहनतीचे फळ मिळते. व दीड तास लागतो बनवायला पहिला कांदा चिरायला घेतल्या पासून. किंवा बासुंदी तीन तास दूध आटवून. ह्याचा भांडवल वादाशी काय संबंध आहे ते कळले नाही.

ते धनगरांच्या लाइफ स्टाइल बद्दल कौतूक वाचले तसे काही दिवस जगुन बघा. इथे महानगरी कृर मुंबईत. जेव्हा भयानक पाउस पडतो तेव्हा काहीही नसलेले लोक व त्यांचे प्राणी रस्त्याकडेची एक भिन्त व प्लास्टिक शीट काहीखुं ट्यांना जोडलेले अशा आडोश्यास राहतात. ह्यांच्या
नावावर प्रॉपर्टी नाहीच पण पॅ न कार्ड नाही आधार कार्ड कुटुंब प्रमुखाचे असायची शक्यता आहे. इथे आत चांगल्या खाटा पण असतात. मी रोज हपिसातुन निघते तेव्हा एक स्त्री अशीच तीन दगडावर तवा ठेवुन ताज्या भाकर्‍या करत असते. मला नेहमी आपण हिला पीठ व महिन्याचे पैसे दिले तर रोज दोन भाक र्‍या घरी नेता येतील तिला विचारावे का असा मोह होतो. पण मला त्यांचा अवमान करायचा नाही. क्लास डिव्हाइड फारच ग्लेअरिन्ग आहे. त्यात बीएम सीने ह्यांना सावली मिळत होती ती झाडे पण तोडली दोन वर्शा पुर्वी. आर दे आस्किन्ग फॉर मच!! पण नाही.

. चार चार वर्षं कपडे घेत नाही, घेतलेले दहा दहा वर्षं वापरते. बरेचसे कपडे रिसायकल्ड असतात, बहिण-काकु सारख्या मापाच्या असण्याचे फायदे. क्वचित एखाददुसरा अपवाद वगळता घरातलं बहुतांश साहित्य कुटुंबातल्याच कुणा ना कुणाकडून विकत घेतलेलं आहे>> का असे? लोकांनी वापरलेल्या वस्तुंमध्ये त्यांचे गुणधर्म पण असतात. जॅक द रिपर चे मोजे किंवा रुमाल तर आपण घेउ नाही शकणार. नवे कपडे, फर्निचर आले की मला तर फार उत्साही वाट्ते. एस्प. आता हे सर्व कधीही सोडुनच जायचे आहे. तर आहे तितके दिवस व परव्डते आहे तोपरेन्त
मस्त टेचात राहायचे अशी मानसिकता आहे. शेवट मिनिमलिस्टच होणार आहे कफन व पंधरा मिनिटाचा वीज वापर. त्यामुळे विदाउट अ‍ॅटेच मेंट नव्या वस्तु घेत असते.

माझी आई ऑर्फन असल्याने आश्रितासारखी व हँड- मी - डाऊन्स वर मोठी झाली . आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यावरही माझ्या साबा तिच्यासठी द्यायच्या साड्या ( वापरलेल्या ) काढून ठेवत व तिने नको म्हटले की उखडत. लिहायचा उद्देश की तुम्हाला जो लाइफ स्टाइल चॉईस वाटतो आहे तो काही लोकांसाठी मजबुरी असु शकतो व त्यावरुन त्यांची मते वेगळी होउ शकतात. नॉट जजिन्ग एनीबडी हिअर.

एकदा मी कुत्र्याला घेउन नवे केनेल ट्राय करायला ठाण्यात गेले होते. अनोळखी जागा व तिथेच व्हेट पण होता म्हणून तिकडे जाताना माझी पिशवी ज्यात पॅण कार्ड आधार कार्ड डेबिट कार्ड, पैसे कॅश, फोन व घराची किल्ली हे सर्व होते ती कुठेतरी विसरली. मला हार्ट अ‍ॅटेक यायचाच बाकी होता. रिक्षेत राहिली म्हणावे तर तो रिक्षेवाला तर आता कुठेतरी अनंतात विलीन झाला असावा. घाम फुटला. मग एक दीर्घ श्वास घेउन व हातात ते बावरलेले कुत्रे!!! परत जिथे जिथे गेले होते तिथे गेले तर एका कोपर्‍यात पिशवी दिसली. ती मिनिमलीस्ट दहा मिनिटॅ फार भयानक होते.

जे लोक्स मिनिमलीस्ट जगु पाहतात त्यांनी शांतपणॅ पहिले स्वतःचे प्रिव्हिलेज आधी चेक करावे . खरंच होमलेस उपाशी पावसात भिजत रडायची वेळ आली की थिंग्ज लुक अ बिट डिफरंट.

अमा, तुमचा मुद्दा पण विचार करण्याजोगा वाटला.

सुबत्ता असताना स्वतःहून मिनिमलिस्टीक असणं आणि दारिद्र्याशी सामना करताना नाईलाजानी मिनिमलीस्टिक व्हावं लागणं ह्यातलं कारुण्य जाणवलं.

पण जागोजागी चंगळवाद बोकाळलेला असताना स्वखुषीनं मिनिमलिस्टिक होणंही चांगलंच म्हणावं लागेल.

लेख छान. स्वयंपाकाच्या बाबतीत मीही खूप उत्साही नाही, पण त्याला मिनिमिलिस्टिक मध्ये मला टाकता येणार नाही.
पण माणूस एकटं असेल तर मात्र बरोबर आहे.
सामान , वस्तू विकत न घेणे याला गरजेपेक्षाही मनाचा ठाम निग्रह लागतो.

अश्विनी मामींचा मुद्दा कळला नाही.
म्हणजे काही लोक खूप गरीब आहेत , त्यांना परवडत नाही, आणि आपली परिस्थिती चांगली आहे तर आपण भरपूर पैसे खर्च करून मजा करावी असं का?
पण उलट पाहिजे ना. जर कोणी रोज एवढ्या गरीब लोकांना बघत असेल आणि त्यांच्याबद्दल विचार करत असेल तर पैसे उधळताना हात मागे आला पाहिजे ना?
लेख वाचून असं वाटतंय की लेखिकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तरीही तिला पैसे उधळणे, अगदी वारंवार कपडे घेणे सुद्धा नको वाटतंय.
स्वयंपाकाच्या बाबतीत मतांतरे असू शकतात, पण मला परवडत असूनही मी वस्तू विकत घेत नाही, यात निगेटिव्ह काय असू शकतं हे नाही कळलं.

लेख प्रचंड आवडला... आणि फ्रेश जेवण लगेच संपवण्याबद्धल अनुमोदन...
अमा - ... लोकांनी वापरलेल्या वस्तुंमध्ये त्यांचे गुणधर्म पण असतात. -->> हे इंटरेस्टिंग आहे...

छान लेख, ओघवते लिहिले आहे.
मला थोडीफार आवड आहे स्वयंपाकाची. आणि अगदी रोज भाकरी भाजी, धिरडी वगैरे जमेल तशी असं नाही खाऊ शकणार. एकतर न्युट्रिशन बद्दल वाचून पोषक आहार घेणे याकडे लक्ष असते आणि ते पदार्थ चवदार कसे बनवता येतील याचे प्रयोग करत राहण्याचीही आवड आहे. तेव्हा मी मला हवे तसे घर बनवले तर माझ्या किचन मध्ये बऱ्यापैकी सामान असेल.
आपण गरजेपेक्षा खूप जास्त वस्तू घेत असतो हे केव्हाच लक्षात आलंय ते कमी पण केले माझ्या स्वतःपुरते. एकटा रहात असतो तर अजून कमी केले असते पण तरी ते मिनिमलीस्ट शैलीच्या जवळपासही नसते.

तुम्हाला तुमच्या आवडी/विचारा प्रमाणे सर्व करता यावे या करता शुभेच्छा.

ही खरड फक्त एक स्वैर उधळलेलं स्फुट आहे. कुणाला बरं वाटेल, कुणाला नाही. पण त्यात लॉजिक शोधत असाल तर जे मलाच लिहिताना सुचलेलं नाही ते तुम्हाला कसं सापडेल! तेव्हा नकाच उगीच खटपट करु Happy
त्यामुळे ह्याचा कोणताही वाद/इझम/हे चांगलं अन् ते वाईट/खाण्याची आवडनावड/गरीबीश्रीमंतीसुखवस्तुपणा/कमीजास्तलेखणं/जजमेंट्स्/मजबुरी/असंचतसंच ह्या कशाशीही संबंध नाही, हे ओघानं आलं. कुणाला कशाची आवडनिवड असावी, नसावी, का असावी, का नसावी हा कुणाचाही अगदीच वैयक्तिक मामला आहे.

अमा, मी खाऊनपिऊन सुखी प्रकारात मोडते, हा माझा गुण/दोष नाही. त्याबद्दल मी गिल्ट घेण्याची आवश्यकता दिसत नाही, तो तुम्हीही घेत असाल असं वाटत नाही. जगातली सगळी दु:खं प्रत्येकाला दिसतात, त्याचा रोजच्या जगण्यात जिथेतिथे संदर्भ लावण्याचं कारण दिसत नाही, लावायचा म्हटलं तर ते शक्यही नाही. तेव्हा, बेटर रिलॅक्स. मला अजिबातच काही ऑफेन्सिव्ह वगैरे वाटलं नाही, पण जजमेंटल तर तुम्ही झाला आहात, त्याशिवाय इतक्या तिरमिरीनं लिहिलंच जाणार नाही Happy बादवे, आम्ही त्यांच्याबरोबर पुष्कळशा अंतरापर्यंत मायग्रेशनला जात होतो अहो, वरचेवरच जायचो. हे नुसतंच फुकाचं लिहिलं नाही.

लंपन, मी चांगलंचुंगलंच खाते, म्हणुन तर तुपाचा उल्लेख Happy तो बहुतेक मिस केलात तुम्ही Lol सगळ्या भरल्या पोटाच्या गमजा असं लिहिलंय की धडधडीत. आणि तुम्ही लावताय तो संबंध मुळीच लागू शकत नाही. धनगर मेंढपाळांच्या सुबत्तेचाही उल्लेख आलाय. एकेक मेंढरु कित्येक हजार ते लाख लाखापर्यंत रुपयांचं असतं आणि त्यांचे मोठमोठाले व्यवहार असतात. त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचा आणि आर्थिक परिस्थितीचा अर्थाअर्थी काही संबंध नसतो. मला ते साधं सोपं जगणं लोभस वाटतं, इतकंच.

एका कॅज्युअल खरडीवर अनायासे एवढा विचार होतोय तर काही अनरिटन मुद्देही लक्षात आले असतील. सामानामुळे पसारे होत रहातात आणि आवराआवरीचे न संपणारे व्याप मागे लागतात. मग वेळ, एनर्जीचा खर्च आणि वेळप्रसंगी त्यामुळे ढळणारी मन:शांती अशीही माळ लागते. ज्या सामाजिक वर्गात आपण मोडतो, त्या हिशोबानं किमान तरी रहाणं भाग असल्यामुळे खुप गोष्टी टाळणं अशक्य होऊन जातं. मात्र हेही सब्जेक्टिव्ह आहे, कारण पसारे आवरणं हीसुद्धा अनेकांची आवड असते. जसं मला रिकाम्या घरात बरं वाटतं, तसं कुणाला भरलेल्या घरात मेडिटेटिंग वाटतं.
माझ्यासाठी दोन्ही छान आहे. रादर, माझ्यासाठी सगळंच छान आहे. अगदी इथे चाललेली आणि अनेक दिवसांनी मायबोलीवर येणं सार्थकी लावणारी ही चर्चा, आक्षेप, प्रतिवाद आणि मुद्दलात ती माझ्या खरडीवर होणं Happy

Submitted by सई. on 10 September, 2022 >>
प्रतिसाद आवडला.

अश्विनीमावशी यांचा प्रतिसाद पण आवडला. अमा यांनी तुम्हाला गिल्ट देण्यासाठी किंवा जज करण्यासाठी लिहिले आहे, असे व्यक्तिशः काही वाटले नाही. त्यांनी केवळ त्यांचे मत मांडले आहे. त्याच्यावर दिलेले उत्तर, जजमेंटल होण्याबद्दल (मला तरी) जरा हार्ष वाटले. अर्थात, तुम्ही म्हणालात तसे, to each his own.

आता मूळ विषयाबद्दल माझे मत. स्वयंपाक करायला वेळ लागतो यापेक्षा, मूळ कारण, तो रोज सतत करावा लागतो आणि त्यामुळे तो जास्त कंटाळवाणा होतो, हे आहे (माझ्या मते). बायकोला मी हे सांगितलं की जरा कष्ट कमी कर, रोज इतका आटापिटा करायची गरज नाही, बाहेरून मागवू की उलट मग मला बोलणी खावी लागतात. तुला आयतं गिळायला मिळतंय ना, वगैरे वगैरे. Beggars can't be choosers या नियमाने मग मी गप्प बसतो. Happy (मला स्वयंपाकाची अजिबात आवड नाही आणि तो शिकण्याची अजिबात शक्यता नाही, खिशात पैसे असताना आणि पर्याय असेल तर नाहीच नाही.)

रिसायकल केलेले कपडे मी वापरत नाही. इतकंच कशाला, तात्पुरते ही दुसऱ्या कुणाचे कपडे मी वापरत नाही. याचे कारण ते मला आवडत नाही.

माझ्या मते minimalism हे एक फॅड आहे. पैसे असतील, परवडत असेल आणि आवड असेल तर जरूर नव्या गोष्टी विकत घेऊन त्यांचा उपभोग घ्यावा. मात्र enough (पुरेसे) किती, needs vs wants (गरज vs चैन) ते कळले पाहिजे. मी या मताचा आहे. परवडत असून आणि आवड असूनही minimalism च्या नावाखाली मन मारून जगणे मलातरी आवडत नाही. परवडत नसेल किंवा आवडत नसेल तर लोक तसेही लोक मर्यादित गरजांमध्ये जगतातच, त्यासाठी minimalist व्हायची गरज नाही.

किमानवादी तत्वांशी इमान राखत, मनात आलेल्या स्वैर विचारांची नीट तर्कशुद्ध वर्गवारी लावल्याशिवाय शक्यतो लिहू नये, म्हणजे वाचकांच्या सहज प्रश्नांनी असं डिफेन्सिव्ह व्हावं लागणार नाही - असा एक अनाहूत सल्ला द्यावासा वाटतो.

उबो, अमा आणि लंपन यांनी उपस्थित केलेले प्रश्न मलाही पडले, तसंच अमांना दिलेला ‘बेटर रिलॅक्स’ सल्ला खूपच मजेशीर वाटला.

प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना ‘यात लॉजिक शोधू नका, कारण ते नाहीच्चै’ म्हणणं ही पळवाट नाही का? अनुकूल अभिप्रायांना ‘अहो, हे आवडलं/पटलं म्हणू नका, कारण यात लॉजिक नाहीच्चै’ असं म्हटलेलं दिसलं नाही कुठे.

>>> हाकेच्या अंतरावर एखादी ताई/दादा बघेन, जो येणाऱ्यांना चहा नाश्ता खाऊ घालील.
>>> बरेचसे कपडे रिसायकल्ड असतात, बहिण-काकु सारख्या मापाच्या असण्याचे फायदे.

तुमचा किमानवाद इतर कोणाच्यातरी कमालवादावर अवलंबून असणार तर! Happy

लेख/खरड मजा म्हणून वाचली, मजेत पटलीही.
अमांचे विचारही पटले.

मी स्वतः मिनीमलिस्ट नाही.चांगल्या गोष्टी आपल्यापाशी असाव्या, नवनव्या येत राहाव्या, त्या इतर कोणाला आवडल्यास फार मोह न ठेवता पास ऑन करता याव्या, आणि आपल्या पश्चात(भगवान करे आणि त्यापूर्वी कपाट नीट लावून ठेवण्या इतका, जमेल तितक्या छान ट्रिप करण्या इतका वेळ मिळोच) आपलं कपाट आवरणाऱ्याने फार शिव्या घालू नयेत इतकी माफक अपेक्षा Happy

पण त्यात लॉजिक शोधत असाल तर जे मलाच लिहिताना सुचलेलं नाही ते तुम्हाला कसं सापडेल>> ह्यासाठी धन्यवाद सई.

लंपन, मी चांगलंचुंगलंच खाते, म्हणुन तर तुपाचा उल्लेख Happy तो बहुतेक मिस केलात तुम्ही Lol >> तो नाही मिसला. मी जे विचारले त्याचे हे उत्तर नाहीये. पण वर स्पष्टीकरण आलं आहे, तेंव्हा धन्यवाद. Happy

मला हे मुक्तचिंतन खूप आवडलंय.

आपली प्रत्येकाची काही अशी स्वप्नं असतात. ती प्रत्यक्षात आपण जगू शकूच असं नसतं पण तरीही त्यातलं प्रॅक्टिकल सत्य गाळून आपण नेमका रोमँटिसिझम उचलतो आणि तिथून पुढे आपले इमले बांधतो. याला नेहमीच्या फुटपट्ट्या लावू नयेत असं वाटलं.

लहानपणी 'आपण गरीब आहोत आणि एका छोट्याश्या झोपडीत राहतोय.' ही अशीच एक माझी फँटसी होती. प्रत्यक्षात घरं निवडताना मोठी घरंच निवडली.

किंवा

लाकूडतोड्याच्या गोष्टीतलं दुसर्या वाक्यात हमखास येणारं वर्णन 'लाकडं विकून येणार्या पैशातून तो संध्याकाळी तांदूळ, डाळ, तेल, मीठ, मिरची विकत घेऊन खिचडी करत असे'. हे वाचून असं रोज खिचडी खाऊन जगणं किती भारी असं वाटायचं. शक्य होतं का हे? तर नाही.

इतकंच नाही तर राजकपूरच्या सिनेमात दाखवल्याप्रमाणे पाण्याच्या पाईपमधे घर असण्याची कल्पनाही एकेकाळी फारच भावली होती.

सईनं निदान शक्यतेच्या परीघावरची ध्येयं निश्चित केली आहेत. दुसर्‍या कोणाचे कपडे वापरणे हे नक्कीच मिनिमॅलिस्टिक आहे. दोघींनीही भरमसाठ खरेदी करण्यापेक्षा एकजणच करतेय आणि दुसरी तेच कपडे वापरून स्वतःला समाधान आणि पर्यावरणाला आधार देत असेल तर त्यात वाईट काय! To each her own.

काही प्रतिसाद उगाच जजमेंटल वाटले. अमा तर स्वतः विगन व्हायला निघाल्या होत्या की. मग पुढे बेत बारगळला बहुतेक. इतर कोणी जर तसा नेहमीपेक्षा वेगळा प्रयत्न करू पहात असेल तर अंगावर का धावून गेले लोकं हे कळलं नाही. त्यात तृटी किंवा अगदी विसंगती अहे असं वाटून ते दाखवणं वेगळं अन जजमेंटल होऊन प्रतिसाद देणं वेगळं.

Pages