Cooking for 2 hours just to eat for 10 min is the biggest scam in the world.
स्वैपाकाची आत्यंतिक नावड असणाऱ्या माझ्यासारख्याच कुणाचा तरी मनस्ताप असणार हा. वाचून अगदी सहानुभूती मिळाल्यासारखं वाटलं.
केव्हा तरी पडवीओसरीअंगणासकट स्वतःसाठी बारक्या दोन खोल्या बांधेन असं घोकत आलेय, ज्यात स्वैपाकघराला मात्र जागा असणार नाही. मागच्या ओटीवर उगीच पॅंट्रीसदृश एक ओटा आणि गॅसस्टोव्ह. एक तवा, उलथणं, चिमटा, एखादं बुरकुलं, झाकणी, उंच तटबंदीचा आटोपशीर थाळा आणि तुपाचं तांबलं. चिमटा. तांब्या आणि फुलपात्र. थाळ्यातच भाकरी थापून तव्यावरून काढली की त्यावरच अर्धीमुर्धी भाजी परतून शेजारच्या बर्नरवर आटवल रटरटवलं की झालं काम. एवढं होईतोवर थाळा धुऊन झालेला असेलच. हल्ली चटण्या लोणची मेतकुटं उत्तम पॅकींगमध्ये येतात. उघडून संपेपर्यंत त्यातच वापरलं की भरण्या, डबेडुबे नकोत. चहा पीत नाही, त्यामुळे तोही विषय आपोआपच रद्द होईल. दुधादह्याला बुरकुलं, फुलपात्र धावेल. आणखी काय लागतं एका माणसाला? हे एवढं माझ्याच्यानं जमेतोवर बाजारात (यंत्रमानवांनी) चावलेला घासही मिळायला लागलेला असेल. ते बेलाशक आणीन आणि वाटल्यास समर्थ कसे दहावेळा धुऊन अन्नप्राशन करत, तसं खळखळून धुऊन खाईन. रहाता राहिला अभ्यागतांचा पाहुणचार. येताना खाऊन पिऊन या अशी आधीच कल्पना देईन. अहो तोवर जजमेंट्स आणि शेरेबाजीच्या सातासमुद्रापार पोचणार मी, मग कुणाला काय वाटेल ह्याशी मज काही देणेघेणे उरेल म्हणता? त्यातून जे येतील ते निव्वळ मला भेटायला, माझ्याशी आंतरिक सख्य असणारे. म्हणजे मुळातच गाळण्यांमधून पोचलेले. आम्ही सगळेच आनंदानं मिळून करून खाऊ परतलेली भाकरी आणि भाजी. कधी थालिपीठ अन् केव्हा धिरडीघावनं. हाकेच्या अंतरावर एखादी ताई/दादा बघेन, जो येणाऱ्यांना चहा नाश्ता खाऊ घालील. झालं की, अरे हाय काय नाय काय.
'अंतरा'मध्ये असताना पशुपालकांबरोबर खूप संपर्क आला. तेव्हा धनगर आणि मेंढपाळांची जीवनशैली जवळून बघितली. आर्थिक सुबत्ता असलेल्या कुटुंबांचे पसारे दोन किंवा तीन बोजांचे जेमतेम. मोठाल्या खोल्यांमध्ये टांगलेल्या दांड्यांवर टाकलेली दोन लुगडी पोलकी, दोन दोन सदरे, बंड्या, धोतरं किंवा पायजमे. बाकी घोंगडी पसरलेली ऐसपैस रिकामी घरं. स्वैपाकघर नाही. पंजाबात असते तशा पद्धतीनं उघड्यावर शिजवणं. घराबाहेर अर्धगोलाकार पाव उंचीची भिंत आणि त्यावर सपरी. भिंतीच्या आत चूल. त्यावर तवा. भोवतीनं मांडलेला काथवट, पीठमीठतेलतिखटचहासाखरेचे थोडके डबेडुबे वगैरे सरंजाम. एका हाताला सरपणगोवऱ्या. वाऱ्याला बसून स्वैपाक. दोन किंवा तीन पदार्थ. उगीच लांबड नाही. होत आलं की तिथंच भोवतीनं सगळेजण थाळे, तांब्ये घेऊन ताजं, पहिल्या वाफेचं रपाटून पोटभर जेवणार आणि हातासरशी थाळे धुऊन आणणार. रांधणारीही बरोबरीनं गरम जेऊन चुलीभोवतीचं आवरून, तवा काथवट धुऊन रिकामी. नो उराउर, नो झाकपाक, नो शिळवड. अर्थात हे पक्क्या घरातल्या मुक्कामाचं. स्थलांतरं चालू असताना ह्याहीपेक्षा थोडक्यातला कारभार. शिवाय पिढ्यान् पिढ्यांचं दीक्षित डाएट. मधल्या वेळची खाणी अन् नाश्त्यांचे वाढाचार नसतातच. जोडीला सणकून डीथ्री, बिनतापवलेल्या दुधाबरोबर बी१२, बाकी प्रोटीन्सकॅल्शिअम्स वगैरे तर मुबलक. व्यायाम वेगळे करावे लागत नाहीत, रोजचं चालणं, शेरडामेंढरांची उसाभरच केवढीतरी. ह्या मिनिमल जगण्याची भुरळ मनावर कायमची पडली आहे.
खरेदीची फार असोशी मला कधी नव्हती. चार चार वर्षं कपडे घेत नाही, घेतलेले दहा दहा वर्षं वापरते. बरेचसे कपडे रिसायकल्ड असतात, बहिण-काकु सारख्या मापाच्या असण्याचे फायदे. क्वचित एखाददुसरा अपवाद वगळता घरातलं बहुतांश साहित्य कुटुंबातल्याच कुणा ना कुणाकडून विकत घेतलेलं आहे. पूर्वी समारंभात उलट आहेर म्हणून मिळायची तसली कशाचा कशात पायपोस नसलेली आणि साठलेली पोतंभर भांडी होती, बाबांनी तेच पोतं लग्नात मला पास केलं. त्यात उत्तम भागलं, अजूनही भागतंय. उगीच किरकोळ काही कधी आणलं असेल. सहा महिन्यांतून एकदा मारे यादी साठवून तुळशीबागेत जाणे आणि कशाला हवंय हे ते, असं करत नुसतंच भटकून रिकाम्या हाती घरी परतणे हा जवळजवळ रिवाज झालाय. पूर्वी पुस्तकं घेतली जायची, गेली चार पाच वर्षे तेही जवळपास बंद आहे. आणि असं असूनही घरातलं सामान बघितलं तर डोकं गरगरेल. उद्या आपण खपल्यावर मागच्यांना भरपूर डोकेदुखी ठेवून जाणार हे धडधडीत दिसतंय. संग्रह वाईट असं नुसतं म्हणायचं, पण आता आरामशीर जगायचं मुरलेलं अंगवळण अनडू कसं करावं ह्या विचारानं जीवाचा कायमचा अभिमन्यू झालाय.
गाडं गडगडत कुठवर पोचलं पहा. विचारांचेही पसारे आवरेनात, तिथं बाकी उजेड केव्हा पडायचा! भरल्या पोटाच्या गमजा सगळ्या. जेव्हा जे व्हायचं तेव्हा होवो खरं, आजच्यापुरती मनापासून एक दुवा देता दिली, एवढं पुष्कळ आहे.
- सई.
सगळ्यांचेच प्रतिसाद पटतायत.
सगळ्यांचेच प्रतिसाद पटतायत.
नीट तर्कशुद्ध वर्गवारी
नीट तर्कशुद्ध वर्गवारी लावल्याशिवाय शक्यतो लिहू नये >> बाईंचा आपण स्वतः खूप तर्कशुद्ध लिहीतो असा गोड गैरसमज झालेला दिसतोय
चांगली चर्चा चालु आहे. लेख
चांगली चर्चा चालु आहे. लेख लेखिके च्या दॄष्टीकोणातून भावला पण फारसा पटला नाही, कारण वरच्या काही प्रतिसादात आलेच आहे..व्क्क्ती तश्या प्रकृती.
मी_अनू अॅज युज्वल +१
मा तर स्वतः विगन व्हायला
मा तर स्वतः विगन व्हायला निघाल्या होत्या की. मग पुढे बेत बारगळला बहुतेक>> त्याची कारणे त्या बाफ वर पण दिलेली आहेत. सद्य परिस्थितीत साखर मीठ दही (पण !!!) हाय प्रोटीन हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ प्रोसेस्ड फूड इतके सोडले आहे त्यामुळे शक्य आहे त्यात विगन गिरी चालू आहे. दूध नाहीच. लेमन टी घेते. सिल्क कपडे नाही, लेदरचे काही नाही. पेट्रोल ची कार नाही. ८० प्रतिश त वीगन गिरी झालेली आहे पण विशेश तः महिलांसाठी वीगन गिरी केलीत तर कॅल्शिअम व डी व्हिटामिन साठी क्वालिफाई डॉक्ट्रर ला विचारूनच गोळ्या चालू करा. डि व्हिटामिन डेफि शिअन्सई बरोबर नाही. ऑस्टिओ पोरासिस चा पण धोका आहे हे विनम्र पण सांगू इच्छीते. अपनी तो जैसे तैसे कट जाएगी. ........
अजून एक अवांतर मुद्दा लिहायचा होता की जे लोक्स मिनिमलिस्ट व सुखी आहेत त्यांनी हेल्थ केअर साठी काय जुळ्णी केली आहे ते ही चेक करुन घ्यावे. कारण सध्या हेल्थ केअर कॉस्ट इतक्या भयानक आहेत की त्यासाठी हेल्थ इन्सुअरन्स, व तो प्रिमिअम भरायला पैसे जोडणी हे करावेच लागते. तिथे मिनिमलीझम उपयोगास येत नाही.
बाकी सुखे व स्वप्ने सर्वांची साकार होवोत हीच सदिच्छा.
माझ्याही गरजा कमी असल्याने
माझ्याही गरजा कमी असल्याने आपोआप मिनिमॅलिझम अमलात येतो. काही बाबत मात्र मी ब्रॅंडेड आहे. पण सरासरीमधे मिनिमॅलिझम च.
Cooking for 2 hours just to
Cooking for 2 hours just to eat for 10 min is the biggest scam in the world. >> अगदी अगदी झाले. मी पहिल्यांदा स्वयंपाक करायला शिकले तेंव्हापासून माझे हे मत आहे! कितितरी वेळ खर्चे करून जेवण बनवायचे आणि १० मि. ते १५ मि. सगळे संपते! असच वाटते!
पण आता हळूहळू स्वयंपाकातली गोडीही कळायला लागलीय म्हणा किंवा नवरा खायचा शौकीन असल्याने म्हणा पुर्वी सारखे मिनिमम खाणे जमेल की नाही असे वाटते. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे स्वयंपाक करणे खरतर आवडत नाही असे नाही रोज रोज करणे कंटाळवाणे आहे
वरच्या काही पोस्ट्स पाहून असं
वरच्या काही पोस्ट्स पाहून असं वाटलं की मिनिमलिझम म्हणजे दारिद्र्यात राहणं असं काहीसं लोकांना वाटतंय. मला वाटतं मिनिमलिझम म्हणजे गरजेच्या असलेल्याच गोष्टी वापरणं आणि ज्या गोष्टींची गरज नाही त्या discard करणं. आता प्रत्येकाची गरज वेगवेगळी सो त्या कुठल्या आणि किती गोष्टी ते ज्याचं त्याने ठरवायचं. शिवाय मिनिमलिझम असला तरी त्या वस्तू ब्रँडेड असू नयेत असंही मला वाटत नाही.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद
सगळ्यांना मनापासून धन्यवाद
रुपा, येस्स. पैसे हा मुद्दा नाही, नाही तर मेंढपाळांचा दाखला दिला नसता.
मामी, मस्त वाटलं तुझा प्रतिसाद बघून! काही स्टेशन्स वेगळी लागणं अपेक्षित होतं, तशी ती लागली आहेत. मजा येतेय अनेक सालं निघताना बघून. प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून बघण्याच्या अट्टाहासाचं आकलन माझ्या कुवतीपलिकडचं आहे. ह्याला चव घालवणं म्हणता येईल, पण ज्यांना शक्य आहे, आवड आहे, त्यांनी तेही जरूर करावं. त्यात काही चुकीचं नाही.
भिंग घेऊन दहांदा वाचलं मीच लिहिलेलं आणि डोकं खाजवत बसले
आणि मग नाद सोडून दिला, कारण निरंजन घाटेंनी लिहिलेली शेक्सपिअरची गोष्ट आठवली. शेक्सपिअर त्याच्या लेखनावरच्या परीक्षेत नापास होतो आणि परीक्षक सांगतात, तुला शेक्सपिअर कळला नाही, तू दुसरं काहीतरी कर
उबो, अगदीच To each his own. अमा इतक्या प्रेमानं बोलल्या, की मला अगदी अजीर्ण झालं
आणि माझे कपडे माझ्या घरच्या, माझ्या सख्ख्या, प्रेमाच्या लोकांचे असतात. अमांनी म्हटलंय त्याच नोटवर, पण उलट अर्थानं, त्यांचे उबदार वाटणारे गुणधर्म येतात त्याबरोबर. हे मी खुलेपणाने लिहिलंय म्हणून, कुणी आपणहून सांगत नसतील, पण हे कॉमन आहे.
स्वाती, मी समाजात रहाते. माझं सगळंच इतरांवर अवलंबून आहे, निव्वळ मिनिमॅलिझमच कशाला! बेटर रिलॅक्स माझ्याही मजा वाटण्यातूनच आलंय. कशाकशाचा आणि विकतचा त्रास कशासाठी करून घ्यावा अमांनी, अशानं त्यांचंच जगणं मुश्कील होईल. मुळात उंटावरून शेळ्या हाकूच नयेत, त्या कोण इतरांना जाणिवा करून देणार्या? तू एवढी सॉर्टेड आणि लॉजिकल, त्यांच्या बोलण्यातली विसंगती, हुकलेलं लॉजिक तुला दिसलं नाही, ह्याची मलासुद्धा जाम गंमत वाटली.
तुला जो डिफेन्स वाटतोय, त्याला मी आपुलकीनं वाचणार्या आणि प्रतिसाद देणार्या सगळ्यांना पोच देणं म्हणते. त्यात तू, अमा, उमो वगैरेही आलात. अरे लोक आवर्जून रेंगाळून सगळं वाचतायत, थांबून बरा-वाईट प्रतिसाद लिहितायत, ये बडी बात है. अपने अपने चष्मे का फर्क!
आवडलं, पटलं म्हणू नका, असं का म्हणे? तुम्हां दोन-चार जणांना नाही आवडलं, नाही पटलं, ठीकच आहे, बाकी सगळ्यांना आवडलंय की. ते महत्त्वाचे नाहीत, होय!
अनाहून सल्ला मनावर घेतला जाणार नाही आणि विचारल्याशिवाय मला तरी देऊही नको
सईताई, बऱ्याच दिवसांनी
सईताई, बऱ्याच दिवसांनी (किंबहुना वर्षांनी) लिहिती झालीस, लेख आवडला. दीप्ती(दक्षिणा) ताईही अलीकडे मायबोलीवर अजिबात येत नाही, तिलाही कधीतरी इकडे खरडपट्टी करायला सांग.
कधीतरी गावाला गेल्यावर अनेक चीरपरिचित वा अपरिचित लोकांशी भेटी होतात. ह्यातली अनेक मंडळी फारच अगत्यशील असतात, समजा
गावी मुक्काम झालाच तर सकाळी चहाचे आवर्जून आमंत्रण देतात (वेळेअभावी किंवा अन्य कारणांनी जाणे झाले नाही तर रागावतात). आणि बरं! नुसताच चहा नसतो, तर (बटाटे)पोहेही (कधीतरी सांजा) असतात. आपण गेल्यावर लगेच स्वतः (वा कुणाला तरी) वाण्याकडे जाऊन पोहे/रवा घेऊन येतात. तेव्हा वाटतं ह्यांचं आयुष्य किती सरळ व सोपं आहे. आपल्याकडे वाणसामानाच्या बरण्या भरून वाहतात आणि ही मंडळी आवश्यक तेव्हाच व मोजकेच सामान आणणार. त्यापैकी अनेकांचा तर अगदी मोजकीच भांडीकुंडी व अंथरूण-पांघरूण असलेला संसार बघून आश्चर्य वाटत! घरात एवढी माणसे असतांना (हल्ली वैयक्तिक कुटुंबातील सदस्यसंख्या कमी झाली असली तरी, एकत्र कुटुंबपद्धती अजूनही गावखेड्यांत बऱ्यापैकी टिकून आहे) मोजक्या जागेत व सामानात कसे निभावत असतील असा विचार येतो.
आणि होय जेवणाचेही तसेच आहे. जेव्हापासून शिक्षण व नोकरीमुळे घराबाहेर राहतोय, तेव्हापासून वनडिशमिल वरच जास्त भर आहे. खरं तर स्वयंपाक करायला मनापासून आवडते, लोकांना खाऊ घालून आपले कौतुक करून घ्यायलाही आवडते. पण निदान १ तास खपून एकट्यासाठी स्वयंपाक करा आणि १५-२० मिनिटांत पोटात ढकला. शेवटी पोटात तर सगळे अन्न एकत्रच होणार मग वनडिश मिलचा पर्याय योग्य वाटतो.
लेख आवडला.
लेख आवडला.
थँक्यु राहुल आणि शर्मिला
थँक्यु राहुल आणि शर्मिला
राहुल, तुम्ही वर्णन केलंयत ते चित्र मलाही खूप आवडतं. आपुलकी, अगत्य आणि ऐहिक परिस्थिती ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.
अस्तु, माझे हे सगळे कल्पनेचे वारू. तसं राहणं खरंच जमेल का, हे दाट धुक्यात लपलेलं आहे.
दक्षिणाला तुमचा निरोप नक्की देते.
थँक्यु राहुल आणि शर्मिला
एकच प्रतिसाद दोनदा गेला.
सई , सहज लिहिलेले आवडले आणि
सई , सहज लिहिलेले आवडले आणि पटलेही .
Cooking for 2 hours just to eat for 10 min is the biggest scam in the world. > हे कायम पटत आलय.
धन्यवाद, सामी
धन्यवाद, सामी
लेख प्रचंड आवडला आहे. खासकरून
लेख प्रचंड आवडला आहे. खासकरून मेंढपाळांचं जगणं.. गावात आता सेटल झालेल्या धनगरलोकांच्या घरी पाहिलेलं तंतोतंत आठवलं. मेंढपाळ म्हणजे गरीब असे समजत असाल तर, किलो किलोने सोने निघू शकते त्यांच्या बोचक्यात.
बाकी पैसे आहेत म्हणून खर्च करणे, पैसे नाहीत म्हणून मिनिमलिस्ट राहणे, पैसे आहेत तरी खर्च न करणे, पैसे नसताना कर्ज काढून खर्च करणे हा ज्याचा त्याचा पर्सनल चॉईस. या निमित्ताने स्वत:च्या जगण्याचे अवलोकन केले असता, या वरच्या चार कंडिशन्स पेक्षा वाईट कंडिशन मी जगतोय असं वाटायला लागलय. म्हणजे, इच्छा नसताना किंवा मिनिमलिस्ट जगणे आवडत असताना, लोकलाजेस्तव कर्ज काढून, मटेरिअलिस्टिक जगणे!
(टीप: माझ्यावर टीका करू शकता)
आणि अजून एक... चव चांगली असेल
आणि अजून एक... चव चांगली असेल तर अगदी कांद्याची किंवा टमत्याची चटणी आणि गरमागरम, तव्यावरून ताटात येणारी चपाती/ भाकरी सुध्दा आत्मा थंड करून जाते.
याशिवाय, घड्याळ लावून जेवण करणे हा आपल्या भुकेचा, बनविणाऱ्याच्या कष्टांचा, प्रेमाचा आणि खुद्द अन्नाचा अपमान आहे. मी तर म्हणेन जेवताना काहीच मोजू नये! मन आणि पोट भरेसतोवर खावं...
छान आहे लेख... असे माझे पण
छान आहे लेख... असे माझे पण बरेच इमले आहेत.
कधी ikea मध्ये चक्कर मारली की वाटतं आपण हे इतकं अवाढव्य घर कशाला घेतलय. असे सुबक ६०० sqft घर घ्यावे. पण अर्थात इतक्या छोट्या घरात राहणं आता तरी जमणार नाहीये, हे पण कळत असतं.
आजकाल इथे tiny house ची खूप फॅशन आलीये. ३००-४०० sqft घर असतं. पिटुकलं. अतिशय कमी किमतीत झोपायची सोय होते. नो लोन, नो emi. पाहिजे तितकं काम करा, हवे तेवढेच पैसे कमवा. अर्थात हे सगळे लोक हेल्थ इन्सु वगैरे काय करतात ते मला गौडबंगालच आहे.
बाकी मी पण कपडे घेण्यात फारच कंटाळा करते. पण दुसऱ्या कोणाचे कपडे नाही वापरात. माझेच जुने जुने कपडे घालून लोकांना बोर करते
मामी + 1
मामी + 1
अनेक जण मिळून अंगावर येणे, प्रत्येक गोष्टीत किस पाडणे, फक्त आपलाच चष्मा खरा आहे आणि बरोबर आहे असा समज करून घेऊन दुसऱ्याला गाळात काढणे नकोस वाटतं .
धनगरांबरोबर फिरून राहण्याचं आकर्षण मला पण वाटतं.
On side notes - अमा, d vitamin करता सूर्यप्रकाश लागतो फक्त. 100% vegan.
सई, तुझ्याकडचे काचांचे तुकडे
सई, तुझ्याकडचे काचांचे तुकडे आणि कलायडोस्कोपमधली त्यांची त्या क्षणी बनलेली नक्षी दोन्ही सुंदरच.
वर कुणीतरी लिहिल्याप्रमाणे, लिखाणातला मिनीमलीझ्म मात्र कमी कर.
फारा दिवसांनी, माधव चालेल.
फारा दिवसांनी, माधव
चालेल.
नानबा, आस्वाद आणि अजिंक्यराव, धन्यवाद.
अजिंक्यराव, काही गोष्टी करणं नाइलाजास्तव भाग असतंच.
नानबा, मायबोलीची आधीपासून असलेली आणि आता समस्त सोशल मिडियाची व्यवच्छेदक लक्षणं आहेत ही.
वरच्या काही पोस्ट्स पाहून असं
वरच्या काही पोस्ट्स पाहून असं वाटलं की मिनिमलिझम म्हणजे दारिद्र्यात राहणं असं काहीसं लोकांना वाटतंय. मला वाटतं मिनिमलिझम म्हणजे गरजेच्या असलेल्याच गोष्टी वापरणं आणि ज्या गोष्टींची गरज नाही त्या discard करणं. आता प्रत्येकाची गरज वेगवेगळी सो त्या कुठल्या आणि किती गोष्टी ते ज्याचं त्याने ठरवायचं. शिवाय मिनिमलिझम असला तरी त्या वस्तू ब्रँडेड असू नयेत असंही मला वाटत नाही.>>>
अगदी. अनुमोदन
छान लेख सई. लिहीत रहा गं.
आमची बदलीची नोकरी असल्याने कधी कधी पूर्ण सामान बरोबर घेऊन जाता येत नाही. किंवा पूर्ण सामान उघडले जात नाही. पण अशा वेळी आहे त्या लिमिटेड सामानातही २- २.५ वर्षे सुखात जातातच.
मला कधी कधी फार मजा वाटते माझीच की दोन कढया, चार भांडी एवढ्यात पण स्वयंपाक करून घर चाललेच की. पार्ट्या झाल्याच की. पण आता चार कढया पण कमीच पडतात. नवीन खरेदी केली जाते आणि मग पॅकिंगच्या वेळी डोक्याला ताप होतो. आता जाणून बुजून नवीन खरेदी टाळतेय. यावेळी पॅकिंग करताना बरंच सामान काढायचं ठरवलं आहे. तसंही दरवेळी ढीगभर कपडे देऊन टाकले जातातच. यावेळी भांडीही कमी करणार आहे.
कित्येक वस्तू न वापरता पडून आहेत, पण तरीही काही अडलेले नाही. त्या वस्तू काढून टाकायचे ठरवले आहे.
अर्थात, प्रत्यक्षात वेळ आली की किती इम्प्लिमेंटेशन होते बघायला हवे.
प्रत्यक्षात वेळ आली की किती
प्रत्यक्षात वेळ आली की किती इम्प्लिमेंटेशन होते बघायला हवे >>> खूप अवघड जातं हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. अगदी हृदयावर दगडबिगड ठेवावा लागतो कधी कधी. पण मिनिमलिझम पेक्षाही डीक्लटर साठी म्हणून हे करून पहा. एकदा अनावश्यक वस्तू काढून टाकणं जमलं की खरंच मोकळं, छान, सुटसुटीत वगैरे वाटतं. समहाऊ मेंदू पण डीक्लटर होत जातो या प्रोसेस मधे.
Cooking for 2 hours just to
Cooking for 2 hours just to eat for 10 min is the biggest scam in the world. >> हे मात्र डिपेंड्स आहे अगदी - कोण सैपाक करते आहे नि कोण खाते आहे त्यावर
वरच्या काही पोस्ट्स पाहून असं
वरच्या काही पोस्ट्स पाहून असं वाटलं की मिनिमलिझम म्हणजे दारिद्र्यात राहणं असं काहीसं लोकांना वाटतंय. मला वाटतं मिनिमलिझम म्हणजे गरजेच्या असलेल्याच गोष्टी वापरणं आणि ज्या गोष्टींची गरज नाही त्या discard करणं. आता प्रत्येकाची गरज वेगवेगळी सो त्या कुठल्या आणि किती गोष्टी ते ज्याचं त्याने ठरवायचं. शिवाय मिनिमलिझम असला तरी त्या वस्तू ब्रँडेड असू नयेत असंही मला वाटत नाही.>>> पटलंच!
सई, तुझ्या लिखाणातले, आजकाल न वापरातनसलेले अनेक शब्द पाहून छान वाटतेय अजून. हल्ली व्य्वच्छेदक, अनुषंग असे शब्द कानावरच पडत नाहीत.
परवाचाच नाशिक मधे झालेला किस्सा : इथे अजूनही बर्यापैकी मराठी बोलली जाते. गिरणीवाल्याला बोलताना मी म्हणाले की तुमच्याकडे सामान आणून ठेवले तरी चालते का ? सकाळी मी येऊन गेले तरी दिवे आले नव्हते, अश्यावेळी सामान ठेवून गेले तर माझी एक चक्कर वाचेल.
तर तो काहीतरी भलतेच बोलायला लागला.. मग मला कळाले कि दिवे नावाची कुणी व्यक्ती इथे नव्हती असे त्याला वाटले
मस्त लिहिले आहे. आवडल. माझेही
मस्त लिहिले आहे. आवडल. माझेही असे जिप्सी लोकांसारखे भटकण्याचे स्वप्न आहे. कमीत कमी समान घेऊन .
लेख वाचु वाचु म्हणत शेवटी आज
लेख वाचु वाचु म्हणत शेवटी आज वाचला. थोडा बिस्कळीत वाटला तरी काय म्हणायचे त्याचा अंदाज आला.
मिनिमलीझम ही वृत्ती असावी लागते हा एक साक्षत्कार माझ्यापुरता मला झालेला आहे. वस्तु दिसली, आवडली की ती घ्यावेशी वाटणे हा माझा नैसर्गिक स्वभाव आहे. आपल्याकडे ह्यासारख्या अनेक वस्तु (काही अद्याप न वापरताही) पडलेल्या आहेत ह्याची जाणिव स्बतःला करुन देऊन ह्या स्वभावाला आळा घालायचा प्रयत्न मी खुपदा केलेला आहे. हा प्रयत्न सतत करत राहणे व अनावश्यक वस्तु घरात न आणणे हे माझ्यापुरते मिनिमलीझम आहे. अजुनही ते तितकेसे जमलेले नाही. जेव्हा जमले तेव्हाच्या मनाला झालेल्या जखमा आजही भरलेल्या नाहीत.
(एका सुंदर प्रदर्शनात एक प्रचंड सुन्दर साडी पाहिली, मनात प्रचंड भरली असल्याने किंमतही योग्य वाटली, तशीही अगदीच खिशाचा तळ गाठवणारी नव्हतीच. पण डोळ्यांसमोर साड्यांनी भरलेले कपाट आणुन ‘ही साडी विकत घेच’ म्हणणार्या भावनेवर मिनिमलिझमचे झाकण बसवण्यात मी यशस्वी झाले. उरलेले प्रदर्शन पाहुन पुर्ण होईपर्यन्त भावनेने ते झाकण लाथेने भिरकटवुन दिले आणि मला फरफटत परत त्या साडीच्या स्टॉलपाशी नेले. साडी गेलेली होती
मुळात ते प्रदर्शन कलाकारांचे असल्यामुळे एकेकच पिस होता. मिनिमलिस्ट मीने ‘बरे झाले, तसेही साडी नेसुन कुठे जाणार होतीस ग टवळे? गेल्या चार वर्षात किती वेळा साड्या नेसल्यास ते हाताच्या बोटांवर मोजुन सांग’ असे म्हणत आनंद व्यक्त केला आणि भावना बिचारी मान फिरवुन डोळ्यातले पाणी डोळ्यातच जिरवत राहिली. आजही भावनेच्या डोळ्यासमोर ती साडी आहे आणि भावना मिनिमलिस्टकडे ‘जळ्ळी मेली ब्याद’ म्हणुन बघते.)
तरीही मिनिमलिस्ट व्हायचे प्रयत्न मी करते, कारणे अनंत आहेत.
वरचे काही प्रतिसाद कळले नाहीत. मिनिमलिस्ट होणे म्ह्णजे इन्स्युरन्स न काढणे असा होतो का ? मिनिमलिस्ट राहणे म्हणजे पैसे न कमावणे असा होतो का? कमाईचा आणि मिलिमलिस्ट राहणीचा काय संबंध हा प्रश्न पडला.
गरजे पुरतेच पैसे कमावणे भारतात कितपत शक्य आहे मला माहित नाही. माझी महिन्याची गरज समजा पन्नास हजार आहे तर महिन्याचे तेवढेच दिवस मी नोकरी करणार, बाकीचे दिवस पगार कापा सांगुन घरी बसणार. पुढच्या महिन्यात परत जाणार आणि पन्नास हजार होईपर्यन्त दिवस भरणार असे स्वातंत्र्य कोणीही इथे देत नाही. स्वतःचा धंदा असेल तर २४*७ तुम्ही अडकलाच. तिथेही महिन्याचे जमले आता शटर डाउन केले तर परत कोण दुकानात येईल शंका आहे. त्यामुळे गरजे पुरते कमावुन गप्प बसा कुठे शक्य आहे देव जाणे.
साधना गंमतीदार पोस्ट. पटलीच
साधना गंमतीदार पोस्ट. पटलीच बरंका
जनरेशनल प्रिवीलेज असताना
जनरेशनल प्रिवीलेज असताना मिनिमलिस्ट राहणे त्याचे कौतूक होणे व पूर्ण गरीबीचा सामना करत काहीही सामाजिक प्रिविलेज नसताना जगण्याचा प्रयत्न करत राहणे ह्यात गुणात्मक फरक आहे. सर्व संग परित्याग करून दीक्षा घेतल्यासारखे सर्व सोडले आहे का तर नाही. जमेल तसे जमेल तसेच चालू आहे. व त्यातही मिनिमलि स्ट जीवनाचे फक्त आकर्षण आहे. ते पूर्ण अंगिकारलेले नाही.
आजार पण आले तर झाडपाल्याची औष धे करणार का अॅडमिट होणार व हेल्थ इन्शुअरन्स वर कॅशलेस घेणार ह्या संदर्भाने विचारले होते. पण धनगराचे सारखे फक्त गरम भाकरी खायचे स्वप्न आहे. त्याची पूर्ण जीवन शैली अंगिकारायचे नाही. शिवाय हा त्यांचा चॉइस आहे. वल्कले नेसली व कंदमुळे खाल्ली तरी तो त्यांचाच चॉइस आहे. हे भान मला आहे. एंजॉय माडी.
अहो असं करतात काही लोक.
अहो असं करतात काही लोक. आवश्यक गरजा पूर्ण होण्या इतपत पैसे कमवायचे. म्हणून मग tiny घर घ्यायचं. घरंच पिटकूल असेल तर आपसूकच सामान कमी घेतलं जातं.
हे लोकं पार्ट टाईम किंवा फ्रीलान्सर असतात. मुळात पूर्ण ५ दिवस नाहीच करत कामं. उरलेला वेळ हायकिंग, कायाकिंग वगैरे किंवा दुसरा काही छंद असेल त्यात घालवतात. काही लोक वर्षातले ८-९ महिनेच काम करतात. बाकी २-३ महिने फिरतात जगभर.
बाकी इथे म्हणजे अमेरिकेत फुल्ल टाईम एम्प्लॉयी असाल तरच कंपनी health इन्शुरन्स देते. स्वतः हुन घ्यायला गेलात तर अव्वा च्या सव्वा रेट्स असतात. आणि health इन्शुरन्स प्रत्येकाला घेणं अनिवार्य आहे. म्हणून म्हटलं की ही लोकं काय करतात देव जाणे.
मुळात मिनिमलिसम म्हणजे कमीतकमी वस्तू जमवणे. घरापासूनच तर सुरुवात होते. छोटं घर = कमी जागा = कमी वस्तू. शिवाय छोट्या घरासाठी पैसे कमी लागतात. मग कामवायला ढोरमेहनत वर्षानुवर्षं कशाला करायची? असे सोपे गणित आहे त्यांचे. अर्थात इट इज नॉट everyone’स कप ऑफ टी.
साधना, त्या साडी बद्दल - न
साधना, त्या साडी बद्दल - न मिळाल्या बद्दल लिहिलेला दोन भावनांचा खेळ छान लिहिला आहे.
<<हे लोकं पार्ट टाईम किंवा फ्रीलान्सर असतात. मुळात पूर्ण ५ दिवस नाहीच करत कामं. उरलेला वेळ हायकिंग, कायाकिंग वगैरे किंवा दुसरा काही छंद असेल त्यात घालवतात. >> इंटरेस्टिंग. माबो आयडी सोनू यांची आठवण आली.
Pages