गंध

Submitted by आस्वाद on 26 December, 2019 - 15:58

कॉफी मशीन जवळ उभी होते माझ्या कॉफीची वाट पाहत. अचानक सिन्नमनचा गंध कुठून तरी आला. अहाहा.... !! क्रिसमस जवळ आलाय जाणवलं. तसं तर डिसेंबर सुरु झाला की सुट्ट्यांचे वेध लागतात. हवेत गारवा असतो. कधीतरी हलका फुलका स्नो पडायला सुरुवात झाली असते. पण जोपर्यंत हा ऍपल अँड सिन्नमनचा गंध दरवळत नाही, तोपर्यंत क्रिसमस आलाय हे जाणवत नाही. हा गोडसर, मंद सुवास कुठेतरी उबदार आणि आनंदी घराची आठवण करून देतो.

माझ्यासाठी तर गंध म्हणजे एक एक आठवण असते. भारतात उन्हाळा जवळ आला की हवेत एक विशिष्ट सुवास असतो. आंब्याला मोहोर आलेला असतो. गुलमोहोर, पळस मोहरलेले असतात. त्यातच मोगरा फुलायला लागलेला असतो. या सगळ्याचा एक संमिश्र सुवास हवेत दरवळत असतो. शिवाय मला वाटतं की 'उन्हाचा' सुद्धा स्वतःचा एक वास असतो. आजही उन्हाळा म्हणजे माझ्यासाठी मोगऱ्याचे ताटवे. तसेच गणपती-महालक्ष्म्या म्हणजे प्राजक्ताचा सडा, दसरा-दिवाळी म्हणजे झेंडूच्या माळा. माझं हे फुलवेड कधी कधी नवऱ्याला वात आणतं. एकदा आमचं शॉपिंग करताना कशावरून तरी भांडण झालं. आम्ही मॉलमध्ये होतो. अचानक राजनीगंधाचा सुवास आला. मला भांडता भांडता हसूच फुटलं. "हसायला काय झालं?" नवरा चिडून म्हणाला. "अर्रे, हा तर राजनीगंधाचा वास आहे." क्षणभर त्याला काहीच कळलं नाही. मी त्या वासाच्या मागावर रजनीगंधा शोधायला निघाले. नवरा डोक्याला हात लावून बसला.

हे फुलं-पानांमध्ये गुंग होणं माझं लहानपणापासूनच. शाळेच्या वाटेवर बुचीच्या फुलांचं झाड होतं. मी आणि माझी मैत्रीण कितीतरी वेळ फुलं वेचत बसायचो. तेव्हापासून बुचीचा वास म्हणजे मैत्रीण. जुईचा वेल आजीची आठवण करून देतो तर सोनचाफा आमच्या जुन्या घराची, त्या अडनिड्या वयात पाहिलेल्या स्वप्नांची आणि हो बारावीच्या बोर्डाची. बारावी म्हणजे त्या वेळी तरी सर्वात महत्वाचं वर्ष असे. थंडी सुरु झाली. कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल वगैरे संपलेले होते, कोचिंग क्लास सगळा कोर्स संपवून शेवटचा महिना फक्त उजळणी घेत होते. दिवसभर अभ्यास करून घरी बसल्या बसल्या कंटाळा येत असे. "आता महिनाभर अभ्यास कर, मग आयुष्य पडलंय मजा करायला" असं टिपिकल कारण देऊन आईने सरळसरळ 'ग्राऊंड' केलं होतं. मग फारच कंटाळा आला की मी अंगणात जाऊन फुलं वेचायचे. सोनचाफ्याच्या फुलांना घरात आणून प्रत्येक खोलीत सजवायचे. पूर्ण घर त्या वासाने घमघमत असे.

फुलांचा, ओल्या मातीचा, चहाचा आणि छोट्या बाळाचा वास न आवडणारा माणूस विरळाच. पण हे झाले आपले ओळखीचे वास.
अनोळखी वासांची सवय करून घ्यावी लागते. फायर प्लेस मधे जळणाऱ्या लाकडांचा वास, ताज्या ताज्या ब्रेडचा वास आणि ब्लॅक कॉफीचा वास हे आवडीचे झाले. त्याबरोबरच बेसिल, रोजमेरी आणि फ्रेश ब्लॅक पेपरचा वास पण आवडू लागला. पण काहीकाही वास अजूनही आवडतंच नाहीत. मागे एकदा एका कंपनीत लागले होते. कंपनीत खूप कोरियन लेबरर्स होते वेरहाऊसमध्ये कामाला. लंच मध्ये ते सगळे घरून आणलेले डब्बे खात. माझ्या ऑफिस जवळच त्यांची लंचरूम होती. तो वास आला की माझं डोकं उठायचं. मी बाहेर जाऊन लंच करून यायचे. त्या कंपनीत मी जेमतेम ६ महिने होते. पण आजही कोरियन restraunt मध्ये जाण्याची माझी इच्छा होत नाही. चुकूनही तो वास आला की त्या कंपनीत घालवलेले वाईट्ट ६ महिने आठवतात.

शिकत असताना अगदी सणावारी किंवा पार्टी बिर्टी मध्येच परफ्युम वापरला जात असे. आईच्या जरीच्या साड्यांना अत्तर लावलेलं असे. पण नौकरीला लागले आणि डियो 'मस्ट' झाला. रोज वापरायला बरेच ट्राय करून पहिले. मग एकदा शोधता शोधता एक फारसा परिचित नसणारा ब्रँड मिळाला. मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला लावून गेले. काय मस्त वास होता! एक मित्र माझ्यासारखाच गंधवेडा. त्याने पण मला ब्रँड विचारून डियो घेतला. "पण तुझाच मस्तय" हे त्याने पण कबूल केले. मला आता ब्रँड आठवत नाही पण तो वास आजही मी ओळखू शकेन.

प्रत्येकाला आपल्या आईच्या, आजीच्या हातची चव आवडते. मला आईसारखा स्वयंपाक येत नाही कारण मी जोपर्यंत आईकडे होते, कधी स्वयंपाक घरात गेलेच नाही. पण नौकरीसाठी घराबाहेर पडले आणि मग 'बॅचलर कूकिंग' करायला लागले. लग्नानंतरही फारसं मनावर घेतलं नाही. पण मुलगी झाली आणि मग मात्र निदान रोजचा स्वयंपाक तरी करायचाच हे ठरवलं. आणि ते पाळलं ही. गेल्या आठवड्याभरात खूप धावपळ झाली. आठवडाभर बाहेर खाणं झालं किंवा घरी शॉर्टकट डिनर झालं. काल मात्र मी मनापासून छान स्वयंपाक करायचं ठरवलं. मी किचन मध्ये असताना माझी लेक आली आणि म्हणाली, "wow, mumma, it smells so good! are you cooking something yummy like bhaji poli?" मला हसूच आलं. त्या पिटुकल्या जीवालासुद्धा त्या वासांची सवय झालीय. वासावरूनच ती आजकाल डिनर मध्ये काय आहे, हे ती ओळखू लागली आहे.

माझं गंधवेड तिच्यात उतरलंय!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages